सगळ्यांना आवडणारा एक पदार्थ म्हणजे दहीवडा. मस्तच लागतो तो. तर काल आमच्याकडे हाच बेत. किती किती कारणं त्याची - एक तर शनिवार म्हणून मारुतरायाला उडदाने मस्का मारायचा. दुसर्या दिवशी चतुर्थी म्हणून रात्री काही उरायला नको, सगळे मजेत काय बरं खातील? असला डोस्क्याला व्याप नको.... हुश्श. तर कसा केला ते देतेय.
साहित्यः
वड्यांकरिता: १ वाटी उडीद डाळ, २ हिरव्या मिरच्या, पाव इंच आलं, ४-५ मिरीचे दाणे, कढीपत्त्याची ७-८ पाने, चवीनुसार मीठ
दही: अर्धा किलो, ३ चमचे साखर, मीठ चवीपुतं.
चिंच-खजुराची दाट चटणी- मोठ्य लिंबाएवढी चिंच, ७-८ खजूर, चिंचे एवढाच गूळ, धने-जिरे पावडर पाव चमचा, लाल तिखट पाव चमचा.
सजावटीसाठी : मिरपूड, लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर.
तळण्यासाठी-तेल.
कृती: उडीद डाळ ४-५ तास भिजत ठेवा. त्याच प्रमाणे चिंच साफ करून आणि खजुरातल्या बिया काढून दोन्ही एकत्र भिजत घाला.
अर्धा किलो दह्यातील अगदी थोडसं दही बाजूला काढून उरलेलं दही छान फेटून त्यात साखर आणि मीठ घालून फ्रीज मध्ये ठेवून द्या.
बाजूला काढलेल्या दह्याचं अगदी पातळ ताक करून घ्या. तळलेले वडे पाण्याऐवजी या अगदी पातळ पाण्यात बुडवायचे. यामुळे हे वडे पांचट लागत नाहीत.
आता चिंच-खजूर एका कुकरच्या भांड्यात घेउन त्यातच (आधीच साफ केलेलं असल्याने चिंचेत रेषा वगैरे कचरा नसतोआ) गूळ घाला आणि मस्त २-३ शिट्ट्या काढून हे शिजवून घ्या. थंड झालं की मिक्सर मधून बारीक वाटा. हे खूप मऊ शिजतं आणि शक्यतो गाळायला लागत नाही. मग एका भांड्यात हे मिश्रण घेउन त्यात धने-जिरे पावडर, तिखट आणि मीठ घाला. एक-दोन सणसणीत उकळ्या येउद्या. झाली चटणी. ही फार पातळ नको. घट्ट्च हवी. ही पण थंड करून घ्या.
वडे करण्यासाठी डाळ लागलंच तर पाणी घालून बारीक वाटा. त्यातच मिरची, आलं मिरीदाणे आणि मीठ घाला. कढीपत्याची पानं हातानेच तोडून घाला. तेल तापत ठेवा एकीकडे आणि आता सगळी शक्ती एकवटून हे पीठ खूप फेसा. अगदी हलकं झालं पाहिजे. पाहिजे तर घरातल्या शक्तिमानची मदत घ्या ;) चमच्याने किंवा हाताने तेलात वडे घाला. मंदाग्नी वरच तळा. नाहीतर आतून वडे कच्चे आणि वरून करपलेले होतात. तळलेले वडे आपण केलेल्या पांचट ताकात बुडवा. (दुसरा घाणा होईतो). बाहेर काढताना वडे छान दाबून त्यातलं पाणी काढून टाका. या पद्धतीने सगळे वडे करून घ्या.
तळलेले वडे:
ताकाच्या पाण्यातून बाहेर काढून त्यातलं पाणी काढलेले वडे:
पुढचं एकदम सोप्पं आहे. घ्या हवा तो बाउल, त्यात हे ४-५ वडे घालून त्यावर दही घाला, तिखट, मिरपूड, चिंचेची चटणी आणि कोथिंबीर भुरभुरा आणि...
आणि काय? करा स्वाहा.. :)
दहीवडा:
प्रतिक्रिया
14 May 2017 - 4:56 pm | दिपक.कुवेत
कधीही, कितीहि आणि कुठेही......आण ती प्लेट ईकडे. लगेच फस्त होईल. मिरपूड ची अॅडिशन नविन आहे. मी चाट मसाला आणि लाल तिखट भुरभुरवतो. सहिच आलाय फोटो.
14 May 2017 - 5:04 pm | तुषार काळभोर
+१
असंच!
14 May 2017 - 8:28 pm | अत्रुप्त आत्मा
शेवटच्या फोटूत उडी मारल्या गेली आहे.
14 May 2017 - 8:47 pm | एस
किती वडे होतात? किती जणांना पुरतं? तसं पुरणार नाही आणि उरणारही नाहीच, पण निदान वड्यांची संख्या सांगितल्यास त्यानुसार मला बनवता येतील. चिंच-खजुराची आंबट-गोड चटणी ही आमच्या पाककलेची जन्माला येता क्षणी झालेली हत्त्या असल्याने ती करणार नाही. नुसते दहिवडे करून खाऊ घालण्यात येतील.
14 May 2017 - 9:05 pm | सविता००१
एक मोठी वाटी - १२५ ग्रॅम ची घेतली. पीठ कमी फेसलं तर वडे कमी होतील.
माझे २२ झाले या प्रमाणात. हॉटेल मध्ये मिळतो ना, त्यापेक्षा छोटा आकार होता मी केलेल्या वड्यांचा.
खूप अलवार होतात. अगदी छान. कढई छोटी आहे म्हणून फार मोठ्ठे नाही केले मी. आपला घरातला पोहे खायचा चमचा असतो ना? त्याने घातले. आधी चमचा पाण्यात बुडवून घ्यायचा. नाहीतर चमच्याला पीठ चिकटतं. सगळ्यात उत्तम आपला हात.- हातच.
आम्ही अगदी जेवायलाच केले होते. म्हणून सग्गळे संपले. भांडीफोड स्वैपाक.
येइल हो. इतकी काय अवघड नाही ही चटणी.
14 May 2017 - 11:42 pm | एस
धन्यवाद.
मला येते हो ही चटणी बनवता. पण... जाऊ द्या! :-)
14 May 2017 - 8:57 pm | पद्मावति
वाह!
14 May 2017 - 9:17 pm | रेवती
शेवटचा फोटू मस्त आलाय. मागील अठवड्यात शनिवार रविवार हे वडे हादडल्यावरही आज पाकृ पाहून जळजळ झाली.
14 May 2017 - 10:26 pm | अनन्न्या
14 May 2017 - 10:27 pm | अनन्न्या
पण चिंचेची चटणी नाही घातली कधी, आता करेन, प्रमाण मी एक किलो डाळ आणि वाटीभर तांदूळ घेते त्याने कुरकुरीत होतात वडे!
15 May 2017 - 12:37 am | मोदक
पत्ता द्या.
15 May 2017 - 8:35 am | सविता००१
दहीवडा करा आणि.................
पत्ता द्या. लग्गेच येते ;)
15 May 2017 - 11:43 am | सूड
दहिवड्याबरोबर श्रीखंडी ढंगातलं दही आवडत असल्याने चिंचगुळाच्या चटणीचा कधी विचार केला नाही. बघू आता तुमच्यासारखे वडे बनवता येतात का.
16 May 2017 - 7:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
येऊ द्या अजुन !!
-दिलीप बिरुटे
17 May 2017 - 5:00 pm | विशाखा राऊत
दहिवडे मस्त आहेत. मी येतेच बघ आता खायला
17 May 2017 - 5:10 pm | गवि
झक्कास. दही आंबट नसल्यास हे वडे अनलिमिटेड हाणू शकतो.
बाकी दहीवडा म्हटलं की आम्हाला गोलमाल (जुना... आमचं सगळं जुनं) सिनेमातल्या डायलॉगची आठवण येते. लडकी का मन दहीबडा खानेको न करे तो....