२०१४ च्या जानेवारीचे दिवस. नुकताच मेगा ट्रेक करून झाला होता तरी अस्सल ट्रेकभटक्या प्रमाणेच दोन-तिन आठवडे जाताच ट्रेकचा ज्वर चढायला लागला होता. ह्यावेळी असाच एक क्रॉसकंट्री घाटवाटा ट्रेक करण्याच योजत होतं. सोबतीला नेहेमीचे, हक्काचे आणि समानधर्मी सोबती होतेच. तसे तर आता इतक्या वर्षांच्या सहसह्यभटकंतीमुळे एखाद्याने ट्रेक ठरवला (हा एखादा होण्याचे काम आमच्या ग्रुपमध्ये मला आणि अजून दोघाना करावे लागते :) ) की बाकीचे पटापट बॅगा भरायला घेतात आणि आमच्या आधी तयार असतात :).
तर ट्रेक ठरवला होता काहीसा आडवळणाचा पण दुर्लक्षीत नव्हे. मानगड आणि त्याचे खोरे (जोर चनाट खोरे), त्यांचे लोकेशन, त्या परीसरातल्या घाटवाटा आणि रायगडाला प्रॉक्सीमिटी असल्याने त्यांचे भौगोलीक आणि ऐतीहासीक महत्त्व बर्याच जणाना माहीत असतेच पण याला जोडूनच आम्ही कुंभे घाट आणि बोचेघोळ घाट (याचे असेच नाव आहे काय करणार आणि नावाला साजेसे रुपही :) ) ही करणार होतो. म्हणजे मानगड पायथ्याच्या बोरगावहून सुरुवात करून घाटमाथ्यावर भटकून परत कोकणात रायगड पायथ्याला शेवट असा दोन दिवसांचा भक्कम प्लॅन होता. त्यातही पहील्या दिवशीचे घोळ गाव सोडले (ह्याच घोळ गावात आम्ही आमच्या पेठ धामणव्हाळ कोकणदिवा रायगड ट्रेक दरम्यान राहीलो होतो. मि ह्या ट्रेकवर लेखही लिहीला होता. ही लिंक बाकी परीसराच्या इतीहासाबद्दल जरी माहीती असली तरी भुगोलाबद्दल वर्तुळच होते. जालावरही देखील कुंभेघाट, बोचेघोळ घाटाबद्दल फार काय जवळजवळ माहीती नाहीच मिळाली.
नाही म्हणायला दुर्गवीर मुळे मानगड आता चांगलाच परीचयाचा झालाय. इथे दुर्गवीरबद्दल सांगीतलेच पाहीजे. संतोष आणि त्याच्या टीम ने दुर्गसंवर्धनाचे लावलेले रोपटे आज चांगलेच वरती आलेय, त्याने मुळ धरलेय आणि त्याची मुळे दुर दुरपर्यंत पसरायला लागलीत. अश्या ह्या निस्वार्थ भावनेने काम करणार्या आणि महाराजांच्या इतीहासाबरोबरच त्याच्या भुगोलावरदेखील प्रेम करून त्याला जपणार्या, त्याचे संवर्धन करणार्या, ह्या "बिनराजकीय" आणि तरूण संस्थेचे करावे तेवढे कौतूक कमीच आहे. तर अश्या ह्या संस्थेचा मानगड अतीशय लाडकाच. किंबहूना त्यांच्या कार्याचा आद्य साक्षीदार. त्यानी किल्ल्यावर, किल्ल्याखालील गावात जी उत्तम कामे केलीत त्याचा प्रत्यय आम्हाला अनेक वेळा आला. पुढे उल्लेख येईलच त्याचा. किरणमुळे संतोषची आणि माझी ओळख झाली होती. त्याला मानगडला जातोय असा एसेमेस टाकला आणि त्याचा लगेच प्रतीसाद आला. त्यात त्याने मानगडाखालील मशीदवाडीतील एकाचा संपर्क दिला. आता संतोष ने स्वत:नेच संपर्क दिलाय म्हटल्यावर काम होणारच ह्याची खात्री होती.
तर कुर्ला नेहेरूनगर बस स्थानकावर मुंबई-जिते गाडीची वाट बघताना बाकीच्यांना (हो नाही करता करता आम्ही सहाजण जमलो होतो) जेव्हा वरचा प्लॅन सांगीतला तेव्हा त्यांचे चेहेरे पाहण्यासारखे होते. एक दोघांनी मनातल्या मनात घातलेल्या शिव्याही मला मोठ्या आवाजात ऐकू आल्या :). कारणही तसेच होते. एक मानगड सोडला तर सगळा ट्रेक रस्ता शोधत जायचे होते. कोकणातून सुरुवात करून घाटमाथ्यावर जाऊन, बर्याच डोंगरारांगा ओलांडून, बराच वळसा मारून परत कोकणात उतरायचे होते आणी तेही दोन दिवसात. थंडिचा मोसम होता म्हणून ठीक होते नाहीतर भर उन्हाळ्यात असा प्लॅन करणे म्हणजे जाणून बुजून संकटाला निमंत्रण.
माणगाव परीसरात आमची पुर्वी भटकंती झाल्याने जिते गाडीची खासीयत आम्हाला माहीत होतीच. गाडी किमान ३० मि. उशीराने येणे, ती आधीच खचाखच भरलीले असणे, त्यातच घुसून आमच्या रीजर्वेशनच्या जागेवर आधीच माणसे बसलेली असणे, त्याना ऊठा म्हटल्यावर त्यांचा आणि आमचा "प्रेमळ" संवाद होणे आणि असेच अजून. "ह्यी पिकनीकवाली येतात म्हणून मंग आमा गाववाल्यानां आमच्याच गावाला जायला गाडीत जागा नाय" (थोडेफार खरेही आहे ते :) ) असे संवाद ऐकत आणि हे सर्व सोपस्कार नेमाने पडून मुंबईतून निघालो तेव्हाच थंडीने कुडकुडायला लागले होतो. इथेच असे तर पुढे कसे हा विचार होताच बॅकग्राऊंडला.
----------------------
दिवस पहीला:
यथावकाश माणगाव मार्गे पहाटे निजामपुरला उतरलो तेव्हा थंडी चांगलीच जाणवत होती आणि अजुन उजाडलेही नव्हते. मशीदवाडीच्या माणसाला एवढ्या पहाटे उठवणे जिवावर आले आणि म्हटले की जवळपास पोचलो की फोन करू. थोडेसे उजाडल्यावर निजामपुर रिक्षा स्थानकावर पहील्या रिक्षा येताना दिसल्या, त्याना तसेच परत वळवून आम्ही मशीदवाडीकडे निघालो. बोरवाडी फाट्याच्या पुढे त्या माणसाला फोन करायला मोबाईल काढला तर रेंज नाही. झालं, बोंबला..माझ्या आणि त्याच्या अगोदर झालेल्या बोलण्याप्रमाणे आम्ही त्याला फोन करणे गरजेचे होते कारण त्याचे घर कुठे आहे हे आम्हाला माहीत नव्हते. आता काय करायचे असा विचार करे पर्यंत बोरवाडी पाठीपडून लगेचच येणारा मशीदवाडी फाटापण आला. आणि किं आश्चर्यं... तो माणूस तिथे आमची वाट बघत उभा होता. म्हणला की संतोष भाऊंकडून येणारी माणसे, त्याना त्रास व्हायला नको म्हणून एस्टि येते त्यावेळेला येऊन उभा राहीलो. धन्य त्याची. धन्य संतोषबद्दलच्या आदराची. तिथपासून त्याच्या घरी जाईपर्यंत त्याने संतोष बद्दल आणि दुर्गवीरबद्दल खूप काही सांगीतले. ह्या परीसरातील लोक दुर्ववीरबद्दल आदराने बोलतात ते त्यानी केलेल्या कामामुळेच. सकळाचे ६.००-६.१५ वाजत होते. त्याच्या घरी पोचलो तर गाव हळू हळू जागे होत होते. गावातील त्याचे घरही उत्तम असे बांधलेले होते. घरी पोचलो तर दुसरा सुखद धक्का. त्याने त्याच्या पत्नीला सांगून सकाळी सकाळी आमच्यासाठी इडल्या करायला लावल्या होत्या आणि वहीनीनी प्रेमाने त्या केल्याही होत्या. त्या गरमागरम इडल्यांच्या आणि मस्त खोबर्याच्या चटणीच्या वासाने आम्ही सांडलोच.... भुक खवळली होतीच. भल्या पहाटे अश्या नाष्ट्याने ट्रेकची सुरुवात होणे हे भाग्याचे लक्षण आणि पुढच्या होणार्या उत्तम ट्रेकची नांदीच..
नको नको म्हणत म्हणत आम्ही त्या इडल्या संपवल्या (हाणल्या असे खरे खरे लिहायची जाम इच्छा होतेय :) ) तर लगेच गरम आलेयुक्त वाफाळता चहा हजर... तुडुंब ईडल्या खाऊन आणि सारवलेल्या अंगणात गरमागरम चहा घेतल्यावर इथेच ट्रेक संपवावा आणि परतीची गाडी धरावी अशी इच्छा आमच्या म्नात आली आणि एकाने बोलून दाखवलीच :). आमचा नाष्टा संपेपर्यंत हा आमचा माणूस, रामजी (अत्यंत प्रेमाने केल्याने आदरातिथ्याने हा आता आमचा माणूस झाला होता), आमच्या बरोबर मानगडावर यायला तयार झालाच होता.
मशीदवाडी गाव
वाटेवरील शिवमंदीरातले विरगळ
कोरीवकाम केलेला विरगळ (बहुतेक विरगळ असेच आहेत)
सतीशिळा
मशीदवाडीहून दिसणारा मानगड
मग आम्हीही वेळ न दवडता पटापट पाण्याच्या बाटल्या भरून मानगडागडे निघालो. त्याच्या घरापासून मानगड अगदीच जवळचा. वाटेतल्या शिवमंदीराचे दर्शन करत (ह्या शिवमंदीरात हारीने मांडावेत तसे ओळीने विरगळ मांडले आहेत. त्या बद्दल अधीक माहीती वल्लीच सांगू शकेल) मानगडाकडे जाणार्या ठळक वाटेने निघालो. वाटेत दुर्गवीरच्या कार्यकर्त्यांनी गडाची माहीती आणि दिशादर्शक बाण काढले आहेतच. एक सोपा चढ चढून अर्ध्या टप्प्यातल्या विंझाई देवी मंदीरापाशी आलो. मंदीर कौलारू आणि छोटे पण गडवाटेवर असल्याने मोक्याचे आणि मेटाचे ठीकाण. इथून प्रत्यक्ष गडाच्या चढाईला सुरुवात होते. हि चढाईपण सोप्या कॅटॅगरीतली असल्याने पटकन गडाचा दरवाजा चढून गडावर दाखल झालो. प्रवेश केल्याकेल्या जाणवली त्या पाण्याच्या टाक्यांची संख्या. ह्या छोटेखानी आणि पहार्याच्या (कुंभे घाटाच्या पायथ्याचा आणि नागोठणे-रायगड ह्या पुरातन वाटेतल्या जोर चनाट खोर्याचा रक्षक) किल्ल्यावर पण पाण्याच्या टाक्या मुबलक प्रमाणात होत्या. गडावर उद्ध्वस्त बांधकामे, तटबंदी, कबर, ढालकाढी बुरुज आणि दुर्गवीर संस्थेने प्रकाशात आणलेला चोरदरवाजा एवढीच ठीकाणे पाहण्यासारखी आहेत.
विंझाईदेवी मंदीर आणी वरती दिसणारा मानगडाचा प्रवेश दरवाजा
मानगडाचा प्रवेश दरवाजा
प्रवेश दरवाज्यातून दिसणारे विझाईदेवी मंदीर
गडावरील पाण्याचे टाके
गडावरील पाण्याचे टाके
मानगडावरून दिसणारे दृष्य आणी पडलेली मानगडाची सावली
दुर्गवीरांनी उजेडात आणलेला चोरदरवाजा
चटकन एकातासात किल्ला भ्रमंती उरकून आम्ही आमच्या पुढच्या टप्प्याकडे निघालो, कुंभेघाट..वाटेतल्या प्रचंड प्रमाणातल्या (त्याकाळी) कुंभ्याच्या झाडांमुळे ह्या देश आणि कोकणाला जोडणार्या घाटाला कुंभे घाट नाव पडले. खरी घाटवाट पायथ्याच्या बोरवाडी/चाचंगाव पासून सुरु होते आणि वाटेतल्या माजुर्णे गावाला कवेत घेत वर चढून माथ्यावरच्या कुंभे गावात जाते पण आमच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे आम्हाला परत बोरवाडी पर्यंत न उतरता मानगडासमोरच्या डोंगरातल्या ठळक वाटेने डायरेक्ट माजुर्ण्याला जाता येणे शक्य होते आणि अजुन होणारी पुढची चाल बघता आम्ही हाच मार्ग स्विकारला. चटकन मानगड फेरी उरकून आम्ही परत विंझाई मंदीरापाशी उतरलो. इथे आम्ही आमच्या माणसाचा निरोप घेतला, त्याला अनेक धन्यवाद देऊन (हाही दुर्गविरचाच माणूस असल्याने ह्याच्याशी मानधनाचे बोलणे अप्रस्तुत होते आणि त्यानेही मानधनातला फक्त "मान" घेतला आणि नम्रपणे "धन" नाकारले) विंझाईच्याच पाठीमागुन समोरच्या डोंगरावर चढणार्या वाटेला आम्ही लागलो. आमचा चांगलाच कस काढून ही वाट तासाभरात माजुर्ण्याच्या पठारावर आली जिथे आम्हाला पायथ्याकडून/बोरवाडीकडून येणारी वाट मिळाली आणि १५ मि. आम्ही माजुर्ण्यात दाखल झालो.
हे जरी सह्यपदरातले गाव असले तरी बाकीच्या सह्यपदरातल्या गाव किंवा वस्त्यांसारखे हे नव्हते. घाटमाथ्यावर होत असलेल्या कुंभे धरणासाठी बांधलेली पक्की सडक गावातून गेल्याने माजुर्ण्यात बर्याबैकी वस्ती आहे, मंदीर आणि शाळाही आहे. गावात एक छोटा ब्रेक घेतला आणि पुढच्या वाटेची चौकशी केली. गाववाल्यांनी विचारले कि कुंभे गावात थांबणार की पुढे मु़क्कामाला जाणार? आम्ही जेव्हा मुक्कामाचे ठिकाण घोळ सांगीतले तेव्हा गाववाले चक्रावले आणि आम्हाला म्हणाले की खुप लांबचा पल्ला आहे आणि मोठी चाल. मानगडावरून डायरे़क्ट गावात आल्याने नशीबाने आमच्या हातात बर्यापैकी वेळ होता (जो पुढे अपुरा पडलाच :) ). पुढच्या चालीचा अंदाज आल्याने गावातल्या लोकांना रस्ता विचारून पुढे निघालो. गावातल्या लोकांनी अजून एक चांगली माहीती दिली की गावातून साधारण अर्धातास चढल्यावर जेव्हा घाटाची शेवटची चढण (ही पण साधारण ३०-४५ मि ची आहे) येते तेथे खालून येणारी पक्की सडक लागते. त्या सडकेने गेलो तर पुढे डोंगराला बोगदा काढलाय त्यातून आपण लगेच पलीकडिल बाजूला पोचतो. व्वा अजून काय पाहीजे...
मानगडाहून माजुर्णेकडे जाताना
मानगडाहून माजुर्णेकडे जाताना
माजुर्णेच्या वाटेहून दिसणारा मानगड
समोर दिसणारे माजुर्णे गाव आणी पाठीमागे कुंभे घाट
माजुर्णॅ गाव
गावातून बाहेर पडून लगेच चढणीला लागलो. उजवीकडून पक्की सडक गेली होती साधारण अर्धा-पाऊण तास चढलो असू तर घाटाचा शेवटचा टप्पा/चढ दिसायला लागला. गावकर्यांच्या म्हणण्याप्रमाणे इथेच कुठेतरी आम्ही पक्की सडक पकडून गेलो तर बोगद्यातून सरळ पलीकडे जाऊ शकणार होतो. त्याचाच विचार करत होतो तर तेवढ्यात खालून पाठीमागून गाडीचा आवाज आला. आम्ही चकीत होऊन बघत होतोच तर एक सरकारी सुमो समोर आली. आतमधे पाटबंधारे खात्याचे कर्मचारी होते. आमच्या बॅगा (आणि खासकरून थकलेले चेहेरे :) ) बघून त्यांनीच आम्हाला विचारले की पलीकडे सोडू काय? नेकी और पुंछ पुंछ?? आजचा दिवस काही खास असावा...आम्ही लगेच हो म्हणून बॅगा टपावर टाकून आत बसलो पण. खात्याचे कर्मचारी होऊ घातलेल्या कुंभे धरणाच्या कामावर चालले होते. ते धरणाची अधिकची माहीती पुरवे पर्यंत थोडासा चढ चढून गाडी बोगद्यापाशी आली पण. सह्याद्रीच्या मुख्यधारेला आरपार भोक पाडून केलेल्या मानवी किमयेतून आम्ही चटकन पलीकडे आलो. बोगद्या पलीकडच्या समोरच्याच वळणावर आम्हाला सोडून गाडी पुढे निघून गेली.
आता पंचाईत अशी झाली की गाडी तर निघून गेली पण त्या तश्या आडबाजूला कुंभे गावाची दिशा सांगायला कोणीही नव्हते. नाही म्हणायला धरणाच्या कामावरचे मोठे मोठे ट्रक्स, जेसीबी, डंपर इकडून तिकडे जात होते. सगळीकडे धू़ळ आणि फक्त धुळच. त्या धुळ भरल्या रस्त्यावरून थोडे पुढे आलो आणि समोरून येणार्या एका डंपरवाल्याला हात दाखवून थांबवून विचारले की कुंभे गाव कुठे आले. कमनशीबाने तो ओडीसी निघाला, मागचा दोन्ही डंपरवाले बिहारी आणि युपी वाले निघाले. त्याना कुंभे, घोळ, माजुर्णे यातले ओकीठो काही कळत नव्हते. शेवटी तसेच त्या रस्त्याने पुढे निघालो तो सातारा जिल्ह्यातील डंपरवाला भेटला. त्याला थोडाबहूत अंदाज होता आणि त्याने दिशा सांगीतल्या रस्त्यावरच आम्ही होतो. २० मि. चालल्यानंतर कुंभे गावाकडे जाणारा फाटा आला आणि आम्ही झपाझप निघालो. साधारण २०-३० मि. चाली नंतर गावाच्या खुणा दिसायला लागल्या पण हे तर एकदमच छोटे गाव होते. गावात पोचलो आणि चौकशी केली तेव्हा कळले की ही खालची कुंभे वाडी आहे आणि मुळ कुंभे गाव धरणामुळे विस्थापीत होऊन बरेच लांब वसवले आहे. त्याना आमचा पुढचा प्लॅन सांगताच त्यानी प्रथम घड्याळ बघीतले आणि सांगीतले की जर का आम्ही पटापट पाऊले उचलली तरच अंधार पडायच्या आत घोळ मध्ये पोचणे शक्य आहे कारण चाल वर-खाली नसली तरी किमान चार तासांची होती.
जिपमधून कुंभे घाटाचा शेवटचा टप्पा जाताना
जिपमधून उतरल्यावर समोर दिसणारा कुंभे धरणाचा एक कालवा
कुंभे गावाकडे जाणारा रस्ता. ह्याच रस्त्यावरून जाणार्या डंपर ड्रायव्हरना आम्ही दिश विचारली होती पण छे.. काही उपयोग नाही.
कुंभेवाडीकडे जाणारा फाटा
कुंभेवाडी गाव
आत्ता वाजले होते दुपारचे १.३० आणि जानेवारीचा महीना असला तरी ऊन तापू लागले होते. तिथल्याच एका घराच्या पडवीत थोडेसे खाऊन, पाणी भरून धूळभरल्या शरीराने आम्ही पुढे निघालो. वाट म्हटली तर सरळ म्हटली तर अवघड. कुंभे आणि घोळ साधारण समान उंचीवर आहेत त्यामुळे कुंभे ते घोळ ही वाट कमी चढउताराची होती. गावातून उत्तरेला जाणार्या एका सरळ पायवाटेला लागायचे आणी दुरवर दिसणार्या डोंगररांगापैकी तिसर्या रांगेच्या मधून उजवीकडे वळून घोळ भागात शिरायचे. म्हटले तर तसे अवघड कारण पायवाट जरी एकच , ठळक असली तरी कुंभे ते घोळ पुर्णपणे निर्मनुष्य रस्ता, वाटेतले जंगली भय आणी किमान चार तासांची चाल. हे सर्व गणीत बांधून पटापट निघालो. लक्ष्य समोरच्या डोंगररांगांकडे होते. साधारण ४५ मि. चालल्या नंतर एका वाहण्यार्या ओढ्यापाशी सावलीत जेवणाचा ब्रेक घेतला. २० मिनीटानी लगेच उठलो आणि निघालो. रस्ता आता मोकळवनातून कारवीच्या जंगलातून आणि पुढे मोठ्या जंगलातून जात होता. जरी एकच वाट असली तरी या वाटेने बरेच दिवसात कोणी गेलेले नाही हे स्पष्ट जाणवत होते कारण वाटोवाट आम्ही मोठी कोळ्याची जाळी मोडत जात होतो. कुंभेवाडीतून निघाल्यापासून साधारण दोन तासानी आम्ही त्या तिसर्या डोंगराच्या मधून उजवीकडे वळणार्या वळणावर आलो आणि आम्ही बरोबर रस्त्यावर असल्याची जाणीव झाली. उजवीकडे वळल्यावर एक खिंड लागली आणि खिंडीपलीकडे येऊन जरासे मोकळवणात आल्यावर आम्ही गंडलोच... आम्ही अश्या काही जागी उभे होतो की तिथून फक्त समोरच्या डोंगररांगा, कॉम्प्लेक्स घनदाट जंगल, आणि दर्या दिसत होत्या. रस्ता अजून किती आहे माहीत नाही, घोळ कुठे आहे, कुठच्या दिशेला आहे माहीत नाही असे आम्ही उभे होतो. जरा ५ मि. पुढे गेल्यावर आम्हाला कोकणदिवा दिसला आणि हळूहळू कोडे उलगडावे तसा समोरचा टेरेन उलगडला. कोकणदिव्याच्या अनुषंगाने कावळ्याघाट कळला, गारजाई वाडी कळली, घोळची दिशा कळली आणि मुख्य म्हणजे आम्ही योग्य वाटेवर आहोत याची खात्री पटली. हो... कारण इथे आम्ही चुकलो असतो तर ह्या निर्मनुष्य जंगलात रात्र काढणे किंवा परत जाणे हेच पर्याय होते आणि दोन्ही एकदम डेंजर पर्याय होते :).
एकदा घोळ गावाच्या दिशेचा अंदाज आल्यावर चालण्याचा वेग वाढवला. जानेवारी महीना आणि जंगलातली चाल असल्याने वरून सुर्य कितीही तळपत असला तरी दमणूक कमी होत होती. आम्ही फक्त चालत होते ब्रेक न घेता आणी ५ वाजायला आले तरी गावाची चिन्ह दिसेनात. कुंभे गाव सोडून ४ तास झाले होते. पण आता परतीची शक्यता नसल्याने तसेच चालत राहीलो (दुसरा उपायतरी काय होता म्हणा :) ). ५.३० व्ह्यायला आले तरी तसेच. वळणावळणाचे एकामागोमाग एक कारवी आणि जंगलाचे ट्रॅवर्स. जंगल संपता संपत नव्हते. नाही म्हणायला पायवाट आता हळूहळू मोठी होत होती. अखेरीस गावाच्या खुणा दिसायला लागल्या. पुढे लगेच शेती लागली, कुत्री भूंकायला लागली आणि अचानक समोर गावच आले. फायनली आम्ही आमच्या ठरलेल्या मुक्कामाच्या ठीकाणी पोचलो होतो. गेल्या ट्रेकच्या वेळेला जिथे राहीलो होतो तिथेच शाळेत पाठीवरच्या बॅगा उतरवल्या आणि स्वस्थ बसून राहीलो. आजच्या दिवशी बोरवाडी ते घोळ व्हाया मानगड, कुंभे घाट असा जबराच पल्ला झाला होता.
कुंभेवाडीतून बाहेर पडल्यावर घोळकडे जाणारा रस्ता. दुरवर समोरील सर्वात शेवटच्या उंच डोंगराला उजवीकडे वळल्यावर घोळ गावाच्या भागात आपं प्रवेश करतो.
घोळच्या वाटेवर
घोळच्या वाटेवर
घोळच्या वाटेवरील पाण्याचा ओढा. ह्याच ओढ्याशेजारी आम्ही बजून जेवणाचा ब्रेक घेतला होता.
त्या तिसर्या डोंगराला असलेली वाटेवरची खिंड. हीच खिंड ओलांदली की आपण घोळ भागात शिरतो.
खिंड ओलांडून पलीकडे आल्यावर. समोरील कमी उंचीच्या भागात खिंड आहे.
खिंड ओलांडाल्यावर दिसणारा नजारा. घनदाट जंगल समोर कोकण दिवा आणि डावीकडे घोळ.
खिंडी नंतर घोळकडे जाताना लागणारे जंगल. हे जवळ जवळ घोळ गाव येईपर्यंत असेच घनदाट आहे.
घोळ गाव जवळ आल्यावर. समोरील डोंगर पायथ्याशी घोळ गाव आहे.
जरावेळानी उठून फ्रेश झालो जवळचे आणलेले खाल्ले आणि लगेच झोपेच्या स्वाधीन झालो.
एसभौ आणी वल्लीने सांगीतल्याप्रमाणे मुळ लेखातच तिनही नकाशे अपडेट केले आहेत.
१. मानगड ते कुंभेवाडी
२. कुंभेवाडी ते घोळ
३. मानगड ते कुंभेवाडी ते घोळ. पहील्या दिवसाचा संपुर्ण रुट.
(क्रमशः)
--------------------------
खरेतर हा संपुर्ण ट्रेक वृत्तांत एकाच भागात लिहायचा होता पण फोटांसहीत पुर्ण लेख बराच लांबलचक आणि कंटाळवाणा झाला असता म्हणून दोन भागात करायला लागला. दुसरा भागही तयार आहे. दोन तिन दिवसात तोही टाकतो...
--------------------------
हा लेख आपल्या वल्लीने मागे लागून लागून लिहायला लावला त्याबद्दल त्याचे आभार... :)
३.५ वर्षे झाली ह्या ट्रेकला तरी घेतलेले अनुभव एवढे जिवंत आणि भन्नाट होते की आजही त्या दोन दिवसात भटकलेले क्षण स्पष्ट आठवतात.
फोटो सगळे माझ्या कॅमेरातून.
प्रतिक्रिया
14 May 2017 - 5:41 pm | स्पा
एक नंबर
14 May 2017 - 5:45 pm | एस
बोचेघोळ नाळ! एकच नंबर!
14 May 2017 - 6:28 pm | प्रचेतस
लिहायला परत सुरुवात केल्याबद्दल धन्स रे.
जबरी वृत्तांत लिहिला आहेस. मानगडला वीरगळ खूप मोठ्या संख्येने आहेत हे माहीत होते. आधी ते सगळे इतरत्र विखुरलेले होते. दुर्गवीरने सगळे गोळा करून शिवमंदिराला लागून ठेवले आहेत का आता? त्यात एक सतीशीळा पण दिसतेय मला.
मानगडाचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. हा किल्ला बहुधा उत्तर कोकणच्या शिलाहारांच्याच ताब्यात असावा व पूर्वी येथे मोठे युद्ध झाले असावे त्यामुळेच वीरगळ येथे मोठ्या संख्येने आहेत.
बोचेघोळ नाळीच्या भागाची वाट पाहात आहे. लवकर येऊ दे पुढचा भाग.
15 May 2017 - 11:52 am | स्वच्छंदी_मनोज
दुर्गवीरने सगळे गोळा करून शिवमंदिराला लागून ठेवले आहेत का आता? >>> होय.. गावात इतस्ततः पसरलेले विरगळ दुर्ववीरच्या लोकांनी मंदीरात गोळा करून ठेवले आहेत..
व पूर्वी येथे मोठे युद्ध झाले असावे त्यामुळेच वीरगळ येथे मोठ्या संख्येने आहेत.>>> होय झाले होतेच. बहुदा जावळी युद्धाच्या वेळेसच, इथे महाराज्यांचे सैन्य आणि हणमंतराव मोरे यांचे तुंबळ युद्ध झालेय आणि बरेच माणसे खर्ची पडलीत. त्यांचेच वेळेचे विरगळ असावेत बहुदा. तसेही हा मार्च तत्कालीन अतीप्रसिद्ध अश्या नागोठणे रायगड वाटेवर असल्याने येथे एका पेक्षा अनेक युद्ध झालेले शक्यता आहेच. याच मार्गाने (नागोठणे-अष्टमी-मानगड-जोर-चनाट-सांदोशी-पाचाड-रायगड) राज्याभिषेकाच्या वेळेस इंग्रज वकील ऑक्झेंडन मुंबईहून रायगडास आला होता.
15 May 2017 - 12:24 pm | प्रचेतस
हे त्या युद्धातील वीरगळ नक्कीच नाहीत. शिवकाळात वीरगळांची रचना बदलली होती आणि त्याजागी थडी उभारायला सुरुवात झाली होती. थडं म्हणजे शिल्पविरहित चौकोनी उभी शिळा आणि त्यावर शिवलिंगसदृश गोलाकार भाग. किल्ल्यांवर किंवा खाली गावात थडी मोठ्या प्रमाणावर दिसतात. शिल्पसमृद्ध वीरगळ अधिक प्राचीन. मानगडाचे वीरगळ बहुधा यादवकालीन असावेत.
15 May 2017 - 4:28 pm | स्वच्छंदी_मनोज
शिल्पसमृद्ध वीरगळ अधिक प्राचीन. मानगडाचे वीरगळ बहुधा यादवकालीन असावेत. >>> व्वा..वा.. आम्ही तुला जाणकार उगीचच नाही म्हणत.. उत्तम निरीक्षण आणी जाणकार माहीती...
तुझ्या निरीक्षणाप्रमाणेच ह्या विरगळांमध्ये एक सतीशीळा पण होती आणी काही उत्तम कोरलेले विरगळ पण... खाली हे दोन उदाहरणादाखल फोटो -
सतीशीळा -
कोरलेला विरगळ (अधीक माहीती तुच सांग) -
14 May 2017 - 6:35 pm | अभ्या..
मस्तच रे. एकच नंबर भटकंती,
14 May 2017 - 6:55 pm | यशोधरा
उत्तम लिहिलेय पण काहीच माहिती नसताना असे ट्रेक करणे जरा रिस्की.
15 May 2017 - 11:53 am | स्वच्छंदी_मनोज
थोडेसे खरे आहे पण जुजबी माहीती होतीच ह्या परीसराची. अगदीच अननोन एरीया नव्हता आमच्यासाठी.
14 May 2017 - 8:21 pm | शैलेन्द्र
मस्त लिहिलंय..
नजरेच्या टप्प्यात नसलेल्या जंगलात वाट शोधणे नेहमीच आव्हानात्मक असतं
14 May 2017 - 9:24 pm | Nitin Palkar
प्रत्ययकारी वर्णनशैली. ओघवती भाषा. अतिशय सुंदर लेखन.
14 May 2017 - 9:26 pm | Nitin Palkar
प्रत्ययकारी वर्णनशैली. ओघवती भाषा. अतिशय सुंदर लेखन. बादवे कॅमेरा कुठचा आहे तुमचा.
15 May 2017 - 11:53 am | स्वच्छंदी_मनोज
बादवे कॅमेरा कुठचा आहे तुमचा >> Nikon L120
14 May 2017 - 9:43 pm | कंजूस
बराय!
14 May 2017 - 11:24 pm | दुर्गविहारी
अफलातून लिहीलय. हा प्रदेशच सर्वांग सुंदर आहे. मानगड हा प्राचीन किल्ला आहे, हे त्याच्या अर्धकोरीव अर्ध बांधीव टाक्यावरुन ( खांब टाकी) सांगता येते. किल्ल्याची दुरुस्ती शिवकाळात झाली हे गोमुखी प्रवेशद्वारावरून कळते. तसा हा फक्त रायगडाचा संरक्षक दुर्ग. फारश्या लढाया या ठिकाणी झाल्या नाहीत. पुरंदर तहात मोगलाना दिलेल्या २३ किल्यात याचा समावेश होतो.
तुम्ही कुंभे गावात गेला होतात तर तिथे कुंभी नदीवर २०० मी. उंचीचा धबधबा व जननी चे देउळ बघीतले नाही का? कुंभे ते घोळ यावाटेवर जो जंगल पट्टा आहे, त्याला मसना म्हणतात असे मी वाचले होते. आणि त्या खिंडीला रडतोंड खिंड म्हणतात. अत्यंत त्रासदायक वाटचाल आहे ही.
बाकी मला फोटो आणि वर्णन प्रचंड आवडले. शक्य तितक्या लवकर पुढचा भाग टाका.
15 May 2017 - 11:55 am | स्वच्छंदी_मनोज
तुम्ही कुंभे गावात गेला होतात तर तिथे कुंभी नदीवर २०० मी. उंचीचा धबधबा व जननी चे देउळ बघीतले नाही का?>>>> नाही बघीतले. पुढचा पल्ला गाठायचा असल्याने कुंभे गावात अतीशय थोडा वेळ थांबून पुढे निघालो.
कुंभे ते घोळ यावाटेवर जो जंगल पट्टा आहे, त्याला मसना म्हणतात असे मी वाचले होते. आणि त्या खिंडीला रडतोंड खिंड म्हणतात. >>> अरे वा. नवीन माहीती माझ्यासाठी.
14 May 2017 - 11:44 pm | एस
बादवे, तुम्ही यात नकाशा टाकल्यास बरे होईल.
15 May 2017 - 4:40 pm | स्वच्छंदी_मनोज
एसभौ.. नक्कीच फायदा होईल.. आमच्या रूटचा असा नकाशा बनवला नव्हता पण तुम्ही सांगीतल्यावर विकीवरून साधारण रुट मार्क केला.. हे तीन त्याचे फोटो..
१. मानगड ते कुंभेवाडी -
२. कुंभेवाडी ते घोळ -
३. संपुर्ण पहील्या दिवसाचा मानगड ते कुंभेवाडी ते घोळ रूट -
15 May 2017 - 6:40 pm | प्रचेतस
नकाशामुळे उत्तम काम झाले, पण मला एकच नकाशा दिसतोय.
हेच नकाशे वर धाग्यात देखील अपडेट कर.
15 May 2017 - 8:40 pm | स्वच्छंदी_मनोज
येस्स.. आता दोन विरगळ फोटो आणि तिनही विकि नकाशे मुळ लेखातच अपडेट केलेत :)
15 May 2017 - 11:40 am | स्वच्छंदी_मनोज
सर्वांच्या प्रतीसादाबद्दल धन्यवाद _/\_
15 May 2017 - 12:41 pm | सूड
भारीच!!
15 May 2017 - 3:26 pm | पैसा
खूप छान!
15 May 2017 - 3:33 pm | सागर
छान लिहिलाय मनोज. फोटो ऑफिसातून दिसत नाहियेत. पण मोबाईलवरुन पाहिले होते.
पुढचा भाग लवकर टाकावा.
फोटोंमुळे लेखातील डिटेल्सना एक उत्तम वजन प्राप्त झालंय.
उदाहरणार्थः रचून ठेवलेले वीरगळ.... कुंभे गाव... विस्थापित झालेले.... कुंभे वाडी... एकदम सुंदर फील येतोय वाचताना.
फुडचा भाग लव्कर टाक :)
15 Jun 2017 - 9:13 am | योगेश लक्ष्मण बोरोले
मस्तच!