शेअरबाजार – ‘मृगजळास येई पूर……’

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in काथ्याकूट
5 May 2017 - 4:37 pm
गाभा: 

गेल्याच पंधरवड्यांतील गोष्ट, माझ्या एका तरुण, आणि व्यवसायाने डॉक्टर असलेल्या क्लायंटचा फोन आला. "सर, जर तुम्हाला वेळ असेल तर मला तुमच्याशी चर्चा करायची आहे" नवगुंतवणुकदार वर्गांत मोडणारे हे उत्साही व्यक्तीमत्व काही कारणवश संपावर होते आणि कधी नव्हे तो मिळालेला मोकळा वेळ सत्कारणी लावण्याचा त्यांचा ईरादा होता. "मी गेले बरेच दिवस 'मल्टीबॅगर' शेअर्स कसे निवडावे याचा अभ्यास करतोय..तुमचे विचार जाणुन घ्यायला मला आवडेल" –डॉक्टर उवाच.. त्यांच्या या गुगलीवर 'सध्या मार्च एन्ड असल्याने जरा घाईत आहे.. सावकाशीने बोलु' असे सांगुन मी विषय टाळला.

दरम्यानच्याच काळांत मी मनाशी नोंदविलेली आणखी एक घटना म्हणजे 'बिट्कॉईन (BitCoin) याबद्दल काही माहिती आहे का?? त्यात गुंतवणुक करावी का?? हे प्रश्न मला गेल्या काही दिवसांत अनेक वेळा विचारले गेले. (या 'बिट्कॉईन’ बद्दल मी एक स्वतंत्र लेख लिहिला आहे)

सीतेला पडलेल्या देखण्या कांचनमृगाच्या त्या सुप्रसिद्ध मोहाने पुढे रामायण घडले..आणि तद्नंतर आजपावेतो तुमच्या माझ्यासारखे अनेक मर्त्य मानव जगाच्या या मयसभेंत पावलोपावली आडव्या आलेल्या मोहजालांत फसतात, आणि स्वतःच्या जीवनांत महाभारत घडवतात. आजची ही पोपटपंची खास अशा माझ्या हितचिन्तकांसाठी...

1999 साली आर्थिक सल्लागार या व्यवसायाला सुरवात करताना मी प्रथमच नवीन संगणक आणि शेअर्सच्या आलेखांचा तांत्रिक अभ्यास करणारे एक महागडे सॉफ्ट्वेअर घेतले होते. सुरवातीला भेटावयास आलेल्या प्रत्येकाला मी ते कौतुकाने दाखवित असे आणि 'तुम्हाला कोणत्या शेअरचा भाव बघायचा आहे का ?? असे विचारत असे.. त्यावेळचा माझा अनुभव हा, की बहुतेक प्रत्येक जण अशा कोणत्या तरी कंडम, डब्यांत गेलेल्या शेअरची नावे घेत...,की आधी तो शोधता शोधता नाकी नऊ येई..आणि मग भाव असलाच तरी तो कवडीमोलाचा असे.. गंमतीचा भाग म्हणजे हे कचरापट्टी शेअर्स संभाव्य ‘मल्टीबॅगर्स’ म्हणुनच कोणीतरी यांच्या गळ्यांत मारलेले असत. याउलट 'Value Investing' ची तत्वे पाळुन भागधारकांवर दीर्घकाळ लक्ष्मीकृपेचा वर्षाव करणारे शेअर्स घेणे बहुधा गुंतवणुकदारांना मानवत नसावे. अगदी एखादा अपवाद वगळता कोणीही असे शेअर्स मुद्दाम होउन घेतले आहेत, असे मला आढ्ळले नाही.

विसाव्या शतकाच्या अखेरीस आलेली बाजारातील अभुतपुर्व तेजी, जिचे वर्णन 'डॉट कॉम वा ईंटरनेट बबल' असे केले जाते..जेंव्हा क्लिक कंपन्यांचे गारुड बाजारावर पडले होते आणि पावलोपावली असणाऱ्या 'सो कॉल्ड मल्टीबॅगर्स'च्या जोरावर कोणीही सोम्या-गोम्या फंड मॅनेजर गलेलठ्ठ फायदा झाल्याचे दाखवित होता, तेंव्हाची गोष्ट, गंतवणुक शास्त्रातील मानदंड समजल्या गेलेल्या श्री वॉरेन बफेट यांच्या पोर्ट्फोलियोमध्ये मात्र 'जिलेट' ह्या FMCG कंपनीचे स्रवाधिक प्रमाण होते. बफेट साहेबांच्या या आणि अशाच 'बोअर' चॉईस बद्दल आणि ईतरांच्या तुलनेने कमी रिटर्न्स दाखविल्याबद्दल श्री. बफेट यांना छेडले तेंव्हा त्यांनी ज्या व्यवसायांतील प्रारुपे (models) मला कळत नाहीत, मी तेथे गुंतवणुक करायचे टाळतो असा तर्क दिला..(आणि पुढे 'संगणकाने जगांत कितीही क्रांती केली तरी लोक दाढी करण्याचे बंद करणार नाहीत' अशी कोपरखळीही मारली)

बाकी आपल्याकडेही या 'जिलेट्' सारख्याच व्यवसायाचे भक्कम प्रारुप असलेया एक नव्हे डझनावारी कंपन्या असताना त्याकडे दुर्लक्ष करणारे आपण 'बिट्कॉईन (BitCoin) सारख्या समजायला क्लिष्ट, अपारदर्शक असलेल्या (आणि कदाचित असंवैधानिकही) गुंतवणुक पर्यायाबाबत मात्र कसलीही माहिती समजवुन न घेता कोणातरी Life Coachच्या सल्यावरुन बिनादिक्कत गुंतवणुक करतो, हे आश्चर्यजनक नाही काय??

‘Making easy Money’ च्या असल्या फॅडामुळेच मल्टीबॅगर वा BitCoin सारख्या मृगजळामागे धावणाऱ्या किंवा अशाच अपारदर्शी नियमबाह्य भीशी वा चिट्स, फसवी आश्वासने देणाऱ्या, अधिक परताव्याचे आश्वासन देणाऱ्या पण मुळात मुद्दलच जोखीमीत टाकणाऱ्या गुंतवणुक योजना,अनावश्यक महागड्या विमा योजना,अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह असलेल्या पतपेढ्यांसारख्या संस्था, यांच्या भजनी लागणारी गुंतवणुकदार मंडळी 'मॅगीबंदीमुळे नेस्ले कंपनीचा शेअर 20% पडलाय.. घेवु का??' किंवा 'टाटा -मिस्त्री मतभेदांमुळे टाटा ग्रुपचे शेअर्स कमी भावात मिळतायत.... काय करायचे ?? अशा मुलगामी चौकशा करताना अभावानेच दिसतात.

अशा 'आज, आत्ता लगेच..' प्रकारच्या अधीर गुंतवणुकदारांनी एकेकाळचे जगांतील सर्वात श्रीमंत व्यक्ती व महान उद्योगपती श्री जॉन रॉकफेलर यांचे तत्वज्ञान न विसरता लक्षांत ठेवावे ते ही की 'Making money is boring...Smart money is slow'

‘क्षितिजाच्या पार दूर....मृगजळास येई पूर' असे लिहिणाऱ्या स्व. शांताबाई शेळक्यांचा जमाना आता सरला. हल्ली मृगजळे क्षितीजापार नव्हे अगदी दारापाशीच दिसु लागली आहेत. आसपास सगळीकडे फिरणारे सपनों के सौदागर, आणि वाढ्त्या संख्येने स्वप्नाळु दुनियेंत वावरणारे भ्रमित सर्वसामान्य गुंतवणुकदार, ही परिस्थिती केंव्हा बदलणार??.

मा. श्री. सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलेला किस्सा आहे, ते राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री असताना कसल्याश्या संम्मेलनाला प्रमुख पाहुणे म्हणुन गेले होते. भाषणाच्या शेवटी त्यांनी सदर संमेलनास वैयक्तिक 5000 रुपयांची 'रोख' देणगी जाहीर केली...मात्र हा आकडा ऐकुन व्यासपिठावरील आयोजक व समोरील जनता ढिम्म होती.. मग थोड्या वेळाने श्री. शिंदे साहेबांनी 'महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक कार्य मंत्री या नात्याने मी या सस्थेला 05 लाखाचे सरकारी अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न करेन' असे 'आश्वासन' देताच टाळ्यांचा कडकडाट झाला...या किश्याबरहुकुम गुंतवणुकीच्या क्षेत्रातही दरवर्षी उत्तम लाभांश, नियमित बोनस वा अशाच मार्गानी दीर्घकाळ महागाईपेक्षा जास्त दराने परतावा देवुन गुंतवणुकदारांचे भले करणारी एखादी कंपनी वा म्युचुअल फंडाची बावन्न्कशी ‘रोकडी’ योजना घेण्याऐवजी अशी बहुतेकदा गुंतवणुकदार भाविष्यात मालामाल बनविण्याच्या आभासी 'आश्वासनांनाच' भुलतात......ही निदान मला तरी जाणवलेली वस्तुस्थिती आहे.

सर हेनरी फोर्ड यांना एकदा एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला 'आयुष्यांत यशस्वी कसं व्हायचं?? यावर ते उत्तरले..."काही नाही,तयारीत रहायचे, आलेली संधी ताबडतोबीने पकडायची" ......"पण सर, संधी तर एकदाच येते.. आणि ती कधी येणार हे कुठे माहित असते.??" पुढचा बालसुलभ प्रश्न. "सोपे आहे, म्हणुनच तर'कायम' तयारीत रहायचे!!!" - सर फोर्ड यांनी लाखमोलाचा मंत्र दिला. बाजारात यशस्वी व्हायचे तर योग्य संधी साधता आलीच पाहिजे व त्याकरिता सदैव सावध असले पाहिजे हाच मुलमंत्र लक्षात ठेवुन मी माझ्या बाजारांतील सहभागास नुकतीच कुठे सुरवात केली होती आणि अतिउत्साहात, काहीतरी करुन दाखवायचेच या प्रयत्नांत 'Multi bagger'म्हणुन खात्रीने खरेदी केलेला शेअर मला 'Multi bEgger' बनविणार अशी दुःचिन्हे दिसायला लागली, परिणामी घाबरुन मी एका जाणत्या ब्रोकरला शरण गेलो तेंव्हा त्यांनी मला सर फोर्ड यांच्या विचारांपुढचा पार्ट II समजावुन सांगितला, मला त्यांनी 'संधी' आणि 'सापळा' यातील फरक समजावुन सांगितला.. त्यांचे माझा दृष्टिकोन कायमचा बदलणारे ते वाक्य म्हणजे Opportunity knocks only once....Temptation twice a second !!!.. मित्रांनो (मित्रों.. नको म्ह्णायला, उगीच पुढील भाग वाचायचा राहुन जायचा) 'मोह सर्वनाशाचे कारण ठरु शकतो' हे केवळ आध्यात्मिक नव्हे तर शेअर बाजारातही पुरेपुर लागु पडणारे वाक्य आहे.

सरतेशेवटी, माझ्या शिरस्त्याप्रमाणे कधीतरी वाचलेली, श्रीमद शंकराचार्यांच्या नावे सांगितलेली, एक छोटीशी गोष्ट सांगुन आपली रजा घेतो.. पहा काही आकलन होते का..

काशींतील त्या नयनरम्य घाटांच्या परिसरांत शंकराचार्यांची ख्याती वाढत चालली होती. परिसरांतील अनेक सुबुद्ध,सुशिक्षित,सुसंस्कृत मंडळी त्यांना आदराने मान देवु लागली होती.

शंकराचार्यांच्या ह्या वाढत्या लोकप्रियतेने आपली पिढीजात संस्थाने खालसा होतात की काय?? अशी भिती तेथील प्रस्थापित धर्ममार्तंडांना वाटु लागली आणि ह्याचा काहितरी बंदोबस्त केलाच पाहिजे या ईर्षेने पेटुन या मंडळींनी एक असा हटयोगी शोधला, ज्याला म्हणे हवेंतुन चालण्याची सिद्धी अवगत झाली होती.

ह्या हटयोग्याकरवी शंकराचार्यांना आव्हान द्यायचा बेत शिजला..हटयोगी काशी शहरात दाखल झाले व त्यांनी जाहिर केले "मी हे गंगा नदीचे पात्र चालत ओलांडणार !!" या बरोबरच त्यांनी "या शहरात कोणीही दुसरा उपासनेने, तपश्चर्येने माझ्याएवढा सिद्ध असेल, तर त्यानेही माझ्याप्रमाणे ह्वेतुन चालुन दाखवावे…..अन्यथा माझे शिष्यत्व पत्करावे" अशी गर्जना केली.

शहरांत खळबळ माजली, हा अद्भुत प्रयोग जाहीर केलेल्या दिवशी नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर लोकांनी अलोट गर्दी केली.

ते हटयोगी गंगातीरी दाखल झाले, तोंडाने काही मंत्र पुटपुटत थेट नदीपात्राच्या दिशेने चालु लागले. जमावाच्या उत्कंठेने परिसीमा गाठली होती..काशींतील समस्त जुने ढुढ्ढाचार्य 'बरं होईल, त्या अतिशहाण्या शंकराच्या नादी आता कोणी लागणार नाही' ह्या कल्पनेने विषेश खुष होते...

अहो आश्चर्यम..त्या योग्याने शांतपणे पाण्यावरुन चालत चालत गंगेचे पात्र ओलांडले. ह्या अघटितामुळे लोकांनी योगीरांजाच्या नावाचा जयजयकार केला, त्यांची पालखींतुन मिरवणूक काढली.

पण गंमतीचा भाग म्हणजे या चमत्कारिक प्रयोगाची एवढी आगावु जाहिरात होवुनही शंकराचार्य तो प्रयोग पहायलाही आले नव्हते. "कसा तोड लपवुन बसलाय आता??...पण आता त्याचा पुरता अधिक्षेप केल्याशिवाय सोडायचे नाही.." अशा भावनेने बाजुच्या ब्राम्हणांच्या कंपुने त्या योग्याला शंकराचार्यांच्या भेटीला नेले.
"अरे आत्मकेंद्री मुढ्मती माणसा.. ह्या महानुभावांनी सतत 12 वर्षे कठोर तपश्चर्या करुन अचाट सिद्धी प्राप्त केली...आणि तुम्हाला साधं हा चमत्कार पहायला येता आलं नाही??" त्या घोळक्यांतुन एक शहाणा शंकराचार्यांकडे पाहुन खेकसला.

यावर अविचल शंकराचार्य मंद हसले आणि त्या हटयोग्याकडे पहात म्हणाले "महाराज, अतिव पुण्याईने मिळालेल्या नरजन्मांतील अनमोल बारा वर्ष वेचुन हे काही क्षण अधांतरी चालण्याची सिद्धी आपण प्राप्त केलीत…आजच्या तुमच्या प्रयोगानं तुमचा अहंभाव नकीच सुखावला आहे पण,जगाच्या दृष्टीने या प्रयोगाचा काही उपयोग आहे का?? यापेक्षा एखाद्या कावळ्याचा जन्म घ्यायचा..हवेत चालताच कशाला, उडताही आले असते"

.योगी काय ते समजले, खजिल झाले अन् खाली मान घालून निघून गेले.

ही गोष्ट आध्यात्मिक, पारमार्थिक आहे, रुपकात्मक आहे, दंतकथाही असावी.. पण त्या मागील पोहोचवयाचा विचार खुप स्पष्ट आहे….जमीनीवरील वास्तवाकडे डोळेझाक करावयाची आणि हवेतील मनोरे बांधण्याच्या, काहीतरी अचाट, अमानवी पारलौकिक, आभासी गोष्टीं मिळविण्याच्या मागे लागुन 'होते तेथेचि, परि दुरावलों । ठायींच असोनि भुललो । मृगजळास पाणी समजोनि धांवलों । हरिणापरी ।। अशी परिस्थिती ओढवुन घेण्याची वृत्ती नसावी हेच या कथेतुन संगावयाचे आहे.

त्यापेक्षा वास्तववादी विचार, मुलभुत गोष्टींचा अभ्यास करणे अधिक महत्वाचे आहे. पाच वर्षांत 10(किंवा अधिक) पट वाढेल असे 'अंदाज' असणारा गुंतवणुकीचा अनाकलनीय व धोकेदायक पर्याय शोधण्यापेक्षा सनद्शीर मार्गाने महागाईच्या दरापेक्षा अधिक परतावा दीर्घकाळ देणारी गुंतवणुक, अर्थातच ब्ल्युचीप शेअर्स वा म्युचुयल फंडाच्या प्रमुख योजनांत करणे, हीच यशाची गुरुकिल्ली आहे.

लोहाचे सुवर्णांत रुपांतर करणाऱ्या परिसाच्या शोधांत आयुष्य व्यतित करण्यापरिस जवळील उपलब्ध पोलादाचे एखादे आयुध बनवुन कष्ट केल्यास आयुष्यांत खात्रीने अधिक सोने कमवता येईल.

-प्रसाद भागवत 9850503503

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

5 May 2017 - 4:54 pm | वेल्लाभट

उत्तम सल्ला. धन्यवाद.

अनुप ढेरे's picture

5 May 2017 - 4:59 pm | अनुप ढेरे

मस्तं लेख. एकदम समयोचित!

वरुण मोहिते's picture

5 May 2017 - 5:13 pm | वरुण मोहिते

असो बिटकॉइन सोडून आता ब्लॉक चेन चा जमाना आहे .
बाकी डॉट कॉम बबल मध्ये भारताने जाम कमवलंय.कारण फक्त तारखेचा घोळ १९६० च्या आसपास .कारण पहिल्या प्रोग्रामिंग कोड मूळे ३१/१२/१९६० ऐवजी ३१/१२/६० इतकंच टाकलं .त्यानुसार सॉफ्टवेयर काम करू लागले . कालगणने साठी .त्यामुळे ९९ च्या जागी २ शून्य येतील हि भीती . सगळ्या जगातल्या प्रोग्रामिंग कोड ची माती . तेव्हा दिवस रात्र भारत आणि चीन च्या लोकांनी काम केलं . अर्थात पैसे कमी लागायचे म्हणून . बाहेरच्या लोकांना आपल्याकडचं तंत्रज्ञान वापरायला .

पलाश's picture

5 May 2017 - 5:40 pm | पलाश

लेख आवडला.

सावध करणारा समयोचित लेख.

nanaba's picture

5 May 2017 - 6:50 pm | nanaba

मी ज्याच्या कडून गुंतवणूक करते तो फार मागे लागलेला आहे गेले अनेक महिने.
पण समहाऊ मला ते नको वाटत होते. जे खूप वेगाने वर जाते ते खूप वेगाने खाली येते असं वाटत असल्याने.
त्याच्या सततच्या माहितीने " आपण फारच कंझर्वेटीव्ह विचार करतो" असेही वाटत होते.
तुमचा लेख वाचून बरे वाटले.

राघवेंद्र's picture

5 May 2017 - 7:01 pm | राघवेंद्र

लेख आवडला !!!

भारतात रोबो सल्लागार कंपनीज आले आहेत का ?

bettermint , wealthrfront सारख्या कंपन्या आपल्या जोखीम घेण्याच्या ठरवून दिलेल्या नंबर ( रिस्क स्कोर ) नुसार कमीतकमी कमिशन मध्ये गुंतवणूक करतात. यामुळे म्युच्युअल फंडाची निवड आपोआप होते.

राघवेंद्र's picture

5 May 2017 - 7:07 pm | राघवेंद्र

यात फंड का निवडला याचे स्पष्टीकरण मिळते.

सध्या पहिलेच वर्ष आहे यामध्ये गंतवणूक केली आहे. बघू कसे होते ते.

रिस्क स्कोर नुसार
dividend, bluechip फंड, इंटरनॅशनल फंड , बॉण्ड या मध्ये गुंतवणूक diversify केली जाते.

सुबोध खरे's picture

6 May 2017 - 6:06 pm | सुबोध खरे

भागवत साहेब
अशा गरम गरम बाजारात तुम्ही कोणतीच "हॉट टीप" दिली नाहीत.
उलट आम्हाला सबुरीचा सल्ला देताय?
मग तुम्ही कसले अर्थ सल्लागार?
हे काय बरोबर नाही.

वरुण मोहिते's picture

6 May 2017 - 6:17 pm | वरुण मोहिते

भेटा मला .=)) असले सल्ले देणार त्या व्यक्तीला आयुष्यात भेटू नये .
पण अजून एक टिप्स ची रिस्क फक्त जे नुकसान सोसू शकतात त्यांनीच घ्यावी .

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

6 May 2017 - 8:30 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

लेख आवडला रे प्रसाद. गुंतवणूक ही विचार्पूर्वकच केली जावी. म्युच्युयल फंडबाबत ते डिस्क्लेमर का काय ते नेहमी असतेच म्हणा-
"Mutual Fund investments are subject to market risk. Please read the offer document carefully before investing"

गॅरी ट्रुमन's picture

7 May 2017 - 11:41 am | गॅरी ट्रुमन

लेख आवडला.

मध्यंतरी विप्रोमध्ये १९८० साली गुंतवलेल्या १० हजार रूपयांचे २०१४ पर्यंत ५३५ कोटी कसे झाले याची कहाणी वाचली होती. त्याचा गोषवारा पुढीलप्रमाणे:

१९८० मध्ये १०० रूपयाच्या दर्शनी मूल्याचे १०० रूपये किंमत असलेले १०० शेअर घेतले (एकूण गुंतवणुकः १० हजार रूपये)
१९८१ मध्ये कंपनीने १:१ बोनस जाहिर केला. त्यानंतर १०० शेअरचे २०० शेअर झाले.
१९८५ मध्ये कंपनीने १:१ बोनस जाहिर केला. त्यानंतर २०० शेअरचे ४०० शेअर झाले.
१९८६ मध्ये १०० रूपयाच्या दर्शनी मूल्य असलेले शेअर १० रूपयाच्या दर्शनी मूल्य असलेल्या शेअरमध्ये स्प्लीट झाले. त्यानंतर ४०० चे ४,००० शेअर झाले.
१९८७ मध्ये कंपनीने १:१ बोनस जाहिर केला. त्यानंतर ४,००० शेअरचे ८,००० शेअर झाले.
१९८९ मध्ये कंपनीने १:१ बोनस जाहिर केला. त्यानंतर ८,००० शेअरचे १६,००० शेअर झाले.
१९९२ मध्ये कंपनीने १:१ बोनस जाहिर केला. त्यानंतर १६,००० शेअरचे ३२,००० शेअर झाले.
१९९५ मध्ये कंपनीने १:१ बोनस जाहिर केला. त्यानंतर ३२,००० शेअरचे ६४,००० शेअर झाले.
१९९७ मध्ये कंपनीने २:१ बोनस जाहिर केला. त्यानंतर ६४,००० शेअरचे १,९२,००० शेअर झाले.
१९९९ मध्ये १० रूपयाच्या दर्शनी मूल्य असलेले शेअर २ रूपयाच्या दर्शनी मूल्य असलेल्या शेअरमध्ये स्प्लीट झाले. त्यानंतर १,९२,००० चे ९,६०,००० शेअर झाले.
२००४ मध्ये कंपनीने २:१ बोनस जाहिर केला. त्यानंतर ९,६०,००० शेअरचे २८,८०,००० शेअर झाले.
२००५ मध्ये कंपनीने १:१ बोनस जाहिर केला. त्यानंतर २८,८०,००० शेअरचे ५७,६०,००० शेअर झाले.
२०१० मध्ये कंपनीने २:३ बोनस जाहिर केला. त्यानंतर ५७,६०,००० शेअरचे ९६,००,००० शेअर झाले.

एप्रिल २०१४ मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ५५७ रूपये होती. म्हणजे ९६ लाख शेअर ५३५ कोटी इतक्या किंमतीचे झाले. या शेअरवर त्याला दरवर्षी चक्रवाढ व्याजाने ४७% चा परतावा मिळाला.तसेच गेली काही वर्षे दरवर्षी सरासरी ६ कोटी डिव्हिडंड मिळत होता तो वेगळाच आणि या उत्पन्नावर करही भरायची गरज नाही!! (संदर्भः http://getricher.in/2014/investment-of-rs-10000-to-rs-535-crores-in-34-y...)

दिसायला हे सगळे गणित भारदस्त दिसते. फक्त प्रॉब्लेम इतकाच की १९८० साली मुळातली गुंतवणुक करताना विप्रो हा इतका मोठा 'मल्टीबॅगर' शेअर होईल हे कळायचे कसे? बरं १९८० मध्ये विप्रो ही Western India Palm and Refined Oil Company होती आणि ती मुख्यत्वे तेल विकायच्या धंद्यात होती.आय.टी मध्ये विप्रो असेलही कदाचित. पण १९८० मध्ये आय.टी चा एकूण वाटा कितीसा असणार? वर दिलेली गोष्ट जळगावच्या एका माणसाची आहे आणि ती खरी गोष्ट आहे. त्याने केवळ आझीम प्रेमजी या नावावर विश्वास ठेऊन मुळात १९८० मध्ये कंपनीचे शेअर घेतले आणि ते कंपनीचे प्रमुख आहेत तोपर्यंत एकही शेअर विकायचा नाही असे ठरवले. त्यावेळी विप्रो ही आय.टी मधील कंपनी होईल असे त्या गुंतवणुकदाराला वाटले असायची शक्यता जवळपास शून्य (किंबहुना बहुसंख्य भारतीयांप्रमाणे १९८० मध्ये आय.टी म्हणजे काय हे सुध्दा त्याला माहित असायची शक्यता जवळपास शून्य). तेव्हा या मिळालेल्या जबरदस्त यशामध्ये नशीबाचा वाटा खूप मोठा नाही का? अर्थातच एकही शेअर विकायचा नाही हे ठरवून त्यावर कायम राहणेही महत्वाचे आहेच. पण कंपनी मोठी झाली म्हणून एकही शेअर न विकायच्या निर्णयाचे आणि त्यावर कायम राहायचे इतके चांगले परिणाम दिसले. समजा प्रेमजींची कंपनी इतकी मोठी झाली नसती तरीही त्या गुंतवणुकदाराने शेअर विकले नसते तर कदाचित ४७% नाही तर १०-१२% इतकाच परतावा मिळाला असता आणि त्याच्या शेअरची किंमत ५३५ कोटी अशी घसघशीत न दिसता ५ ते ५.५ लाख अशी त्यामानाने मिळमिळित दिसून त्या गुंतवणुकदाराविषयी वाचायला मिळालेही नसते.

तेव्हा असे मल्टीबॅगर शेअर कोणते हे आपण वाचतो त्या एका यशामागे किती अपयशी गुंतवणुकदार असतात याची कल्पना करता येणे कठिण आहे. मदरसन सुमी या शेअरनेही गुंतवणुकदारांना असेच करोडपती बनविले. पण निदान मदरसन सुमी ही कंपनी सुरवातीपासून गाड्यांच्या अ‍ॅक्सेसरीच्याच धंद्यात होती म्हणून भविष्यात या धंद्याला अच्छे दिन येतील हे वेळीच ओळखून गुंतवणुक केली असेल त्यांना सोन्याची खाण मिळाली. पण विप्रोबाबत तसेही म्हणता येणार नाही.

मल्टीबॅगर शेअर कोणते हे ठरवायला कंपनीचे बिझनेस मॉडेल बघा, प्रवर्तकांनी यापूर्वी काय केले आहे ते बघा इत्यादी इत्यादी नेहमी म्हटले जाते. फक्त प्रॉब्लेम हा की या सगळ्या गोष्टी बोलायलाच ठिक असतात. आज एखादी रॅन्डम कंपनी घेतली तर त्याच्या प्रवर्तकांनी नक्की काय केले आहे, त्यांची निर्णय घेण्याची क्षमता चांगली आहे की नाही, ते योग्य निर्णय घेतात की नाही वगैरे गोष्टींचा घरी बसून अंदाज घेता वाटते तितके सोपे नाही. १९९८-९९ च्या सुमारास इन्फोसिस आणि कुठली रसायनांची कंपनी (नाव विसरलो) या दोन्ही कंपनींविषयी या कंपन्या खूप मोठ्या होतील असे म्हटले जात होते असे वाचले आहे. पण इन्फोसिस खरोखरच मोठी झाली पण ती दुसरी कंपनी मात्र गुंतवणुकदारांना फार तर मिळमिळित परतावा देऊ शकली. जर का दोन कंपन्यांविषयी "या कंपन्या मल्टीबॅगर होतील" असे म्हटले जात असेल अशावेळी भविष्यात खरोखरच मल्टीबॅगर झालेल्या कंपनीत गुंतवणुक केली जाणे आणि दुसरी कंपनी टाळणे हा बर्‍याच अंशी नशीबाचा भाग नाही का? बरं इन्फोसिसचाच शेअर घेतला तरी त्या शेअरने नुसत्या शेअरच्या किंमतीत (लाभांश न धरता) फार परतावा दिला आहे का?आताच मनीकन्ट्रोलवर बघितले की ३ जानेवारी २००० रोजी इन्फोसिसच्या शेअरची किंमत (बोनस, स्प्लीट इत्यादी विचारात घेता) २४५ रूपये होती. तर परवा ९३१ रूपये होती. म्हणजे १७ वर्षात नुसत्या किंमतीत आठ-साडे आठ टक्क्याहून जास्त परतावा इन्फोसिसनेही दिलेला नाही. लाभांश लक्षात घेता हा परतावा किती होतो हे बघायला हवे. तेव्हा इन्फोसिसमध्ये खरोखरच घसघशीत फायदा होण्यासाठी २००० सालच्या पूर्वी कदाचित आय.पी.ओ आल्यावर १९९३-९४ मध्येच गुंतवणुक करायला हवी होती. त्याकाळी किती सामान्य लोक शेअरबाजारात गुंतवणुक करत असत? किती लोकांना आय.टी हा इतका मोठा उद्योग बनेल याची कल्पना आली असेल?

तसेच ब्लू चीप कंपन्याच बघितल्या तर सेन्सेक्समध्ये मारूती उद्योग सारखे शेअर आहेत तसेच भेलसारखे 'थकेले' शेअर पण आहेतच. २-३ महिन्याच्या काळात काही शेअर १५-२०% फायदा करून देऊ शकतात.पण अनेक वर्षांच्या कालावधीचा विचार करता असे 'थकेले' शेअर फार परतावा देत नाहीत. तेव्हा नुसते सेन्सेक्समध्ये आहे म्हणून ब्लू चीप या नावावर विसंबून राहिले तर ते कसे चालेल? एकेकाळी सन फार्मा हा एक सगळ्यांच्या गळ्यातला ताईत असलेला शेअर होता. पण ट्रम्प आल्यापासून फार्मा क्षेत्राविषयी मात्र अनिश्चितता वाढली आहे त्यामुळे पुढे काय होईल हे सांगता येत नाही.

म्युच्युअल फंडांचे म्हणाल तर काही फंड नक्कीच चांगला परतावा देत आले आहेत. पण त्यातही चांगला फंड निवडण्यावर बरेच काही अवलंबून असते. तसेच फंड मॅनेजर बदलला तर फंडाच्या परताव्यातही नक्कीच चढउतार होऊ शकतात. अनेकदा म्युच्युअल फंड मॅनेजरचे ध्येय 'मार्केटपेक्षा जास्त परतावा मिळवून देणे' हे असते. म्हणजे मार्केट १०% ने खाली आले आणि त्या कालावधीत या फंड मॅनेजरने ऋण ८% इतका परतावा दिला तरी परतावा ऋण असला तरी तो मार्केटपेक्षा जास्त असल्यामुळे त्या मॅनेजरची स्वतःची स्थिती सुरक्षित असते. बर्‍याचशा म्युचुअल फंडांमध्ये एच.डी.एफ.सी बँक, रिलायन्स, टी.सी.एस इन्फोसिस हे शेअर असतातच. कारण या चार शेअरचा सेन्सेक्समध्ये वाटा जवळपास २९% आहे. म्हणजे असे शेअर फंडात असले तर मार्केटपेक्षा कमी परतावा द्यायची शक्यता तितक्या प्रमाणात कमी होते हे कारण तर नसेल?

तेव्हा मला वाटते की या सगळ्या प्रकारात नशीबाचा वाटा मोठा आहे. मी तरी शेअरमार्केटमध्ये खेळताना कोणत्याही एका शेअरच्या प्रेमात पडत नाही आणि बराच काळ तो शेअर बाळगत नाही. कारण बाळगलेला शेअर विप्रो निघाला तर ठिक पण तो भेल निघाला तर वांदे व्हायचे. आणि असे शेअरच्या प्रेमात पडून सोन्याची खाण मिळालेल्या एका गुंतवणुकदारामागे अपयश आलेले कित्येक गुंतवणुकदार असतात आणि त्यांच्याविषयी आपल्याला कुठेही वाचायला मिळतही नाही. २-३ महिन्यात १५-२०% परतावा मिळाला तर फार हाव न धरता तो शेअर विकायचा. कितीही काहीही झाले तरी २-३ महिन्यात १५-२०% परतावाही वाईट नाहीच.

nanaba's picture

7 May 2017 - 2:53 pm | nanaba

पटला नाही.
स्प्लिट डिविडंट चा विचार केला नाहीये.

गॅरी ट्रुमन's picture

7 May 2017 - 3:51 pm | गॅरी ट्रुमन

स्प्लिट, बोनसचा विचार केला आहे. मार्च २००० मध्ये इन्फोसिसचा शेअर ७ हजार पेक्षा जास्त झाला होता हे लक्षात आहे. डिव्हिडन्डचा विचार करून किती परतावा आला यासाठीही एक्सेल फाईल अपलोड करतोच.

गॅरी ट्रुमन's picture

7 May 2017 - 6:03 pm | गॅरी ट्रुमन

याविषयी थोडी आकडेमोड केली. आंतरजालावर इन्फोसिसच्या शेअरची २ मे १९९५ पासूनची किंमत मिळाली. ती खाली दिलेल्या गुगल स्प्रेडशीटमध्ये टाकली. तसेच इन्फोसिसच्या बोनस आणि स्प्लीटचाही इतिहास मनीकन्ट्रोल, इकॉनॉमिक टाईम्स यासारख्या ठिकाणी मिळेल. उदाहरणार्थ १९ ऑगस्ट १९९७, ८ फेब्रुवारी १९९९ इत्यादी दिवशी कंपनीने एकास एक बोनस शेअर दिले. ते विचारात घेतले आहेत. समजा २ मे १९९५ रोजी इन्फोसिसचे १०० शेअर विकत घेतले असते तर मधल्या काळात मिळालेले बोनस आणि एकदा झालेली स्प्लीट यामुळे मे २०१७ मध्ये २५,६०० शेअर झाले असते. दरम्यानच्या २२ वर्षात कंपनीने किती लाभांश दिला याची माहितीही आंतरजालावर आहे. त्या माहितीचाही अंतर्भाव केला. या सगळ्या माहितीचा अंतर्भाव त्या गुगल स्प्रेडशीटमध्ये आहे.

समजा २ मे १९९५ रोजी १०० शेअर विकत घेतले असते तर ते वाढून ५ मे २०१७ रोजी २५,६०० शेअर झाले असते. २ मे १९९५ रोजी शेअरची किंमत ४५० रूपये होती. म्हणजे १०० शेअर विकत घ्यायला त्यावेळी ४५ हजार रूपये लागले असते. समजा ५ मे २०१७ रोजी हे सगळे शेअर विकले असते तर त्या दिवशीच्या शेअरच्या किंमतीप्रमाणे २ कोटी ४२ लाख रूपये झाले असते. आकडेमोडीच्या सोयीसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित असलेला प्रति शेअर १४ रूपये ७५ पैशाचा लाभांश ५ मे रोजी मिळाला असे गृहित धरले. हे शेअर विकून तसेच मधल्या काळात मिळालेला लाभांश लक्षात घेता प्रतिवर्षी किती टक्के परतावा मिळेल याची आकडेमोडही त्याच गुगल स्प्रेडशीटमध्ये आहे. त्यावरून कळेल की हा परतावा दरवर्षी ३९.७०% असेल. हा परतावा नक्कीच चांगला आहे. सध्या कंपनीचे शेअर खाली आले आहेत. पण वर्ष-दिडवर्षापूर्वी शेअर १२०० च्या वर होता.त्यावेळी विकले असते तर अजून चांगला वार्षिक परतावा आला असता. पण समजा ३ जानेवारी २००० रोजी १०० शेअर विकत घेऊन ते ५ मे २०१७ रोजी विकले असते तर मात्र चित्र पूर्ण पालटेल. त्या परिस्थितीत वार्षिक परतावा अवघा ९.५१% असेल म्हणजे एफ.डी पेक्षा फार जास्त नाही. तेव्हा शेअर विकत कधी घेतले आणि विकले कधी या टायमिंगवर बरेच काही अवलंबून असेल. म्हणजे इन्फोसिसही सगळ्यांसाठी मल्टीबॅगर नव्हताच. ज्यांनी कंपनीचा आय.पी.ओ आला त्यावेळीच शेअर विकत घेतले त्यांना मात्र सोन्याची खाण मिळाली असेल.

या आकडेमोडीची गुगल स्प्रेडशीटः
https://docs.google.com/spreadsheets/d/1AnZgQvdxecXV6WobG0fSdjhBafXhprKe...

चैतन्य ईन्या's picture

8 May 2017 - 9:19 am | चैतन्य ईन्या

हा लेख ज्याने लिहिला आहे त्याला मी ओलखतो. त्याने मुहमद लिहाला अहे. असा कोनिच मानुस अस्तितत्वात नाहिये. हा ओरिजिनल लेख https://prudentequity.com/index/proudentdetail/id/4

ह्या वर बरिच चर्चा झालि आणी त्याने सन्गितले कि फक्त ईत्रेट्रेश्ण साथि मी लिहिले आहे.

सतिश गावडे's picture

8 May 2017 - 9:33 am | सतिश गावडे

ईत्रेट्रेश्ण म्हणजे काय? :)

चैतन्य ईन्या's picture

8 May 2017 - 9:40 am | चैतन्य ईन्या

ईलसट्रेशन

sorry but could not write. very difficult to type Don't know how you guys manage this. One of the reason I stay away from writing anything.

सतिश गावडे's picture

8 May 2017 - 10:06 am | सतिश गावडे

मिपा फोनेटीक युनिकोड किबोर्ड लेआऊट वापरते. यात आपण मराठी शब्द किंवा वाक्ये रोमन लिपीत जशी लिहू तसेच टाईप करायचे.

asdf

या तक्त्यातील q, Q, X, R साठी मिपावर वेगळी अक्षरे उमटतात. बाकी तक्ता बरोबर आहे.

चैतन्य ईन्या's picture

8 May 2017 - 1:51 pm | चैतन्य ईन्या

धन्यवाद

vikramaditya's picture

7 May 2017 - 6:44 pm | vikramaditya

Is tax-free, unlike FD. So may be net return would be around 11%

सुबोध खरे's picture

7 May 2017 - 10:59 pm | सुबोध खरे

शेअर बाजारात सेन्सेक्स मध्ये जर तुम्ही १०,०००/- रुपये १९८० साली गुंतवले असते तर आज त्याचे ५३५ कोटी रुपये झाले असते असे मोठ्या आवाजात ओरडणारे अनेक शेअर बाजारातील पंटर आपल्याला दिसतात.
पण
वस्तुस्थिती काय आहे? याचा कोणी मागोवा घेण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही किंवा आपला पंटर आपल्याला कधीही सांगणार नाही.
वस्तुस्थिती अशी आहे कि
१९८० साली सेन्सेक्स मध्ये असलेल्या ३० पैकी २९ कंपन्या आजच्या सेन्सेक्स मध्ये नाहीत आणि त्यातील २५ कंपन्या दिवाळ्यात निघाल्या आहेत.

Today, Everyone will share message that if you had invested Rs. 100 in 1980 in BSE Sensex…Today Rs. 100 worth of 27000 means 17% CAGR return produced on your investments…But Most of us does not know bitter truth that 29 out 30 companies in 1980 Sensex are not part of 2015 sensex…means if you had bought 1 share of each company in 1980 Sensex…chances that you found that 25 companies delisted and balance 5 shares value produce less that 6% CAGR which is less than Bank FDs or PPF.

In last 35 years…Approx. 10,000+ (Ten thousand Plus) companies launched their IPOs but today active traded stocks are less than 3000+…means retail investor lost their capital in 70% (7000+ companies) and 25+ compaines who had issued their IPO between 2005 to 2012…today their share price just only 10% to 1% of Issue price…I found that approx 2000+ Crore money lost by retail investors.
http://www.thecfpaspirantclubindia.com/today-every-one-will-share-messag...

गॅरी ट्रुमन यांनी जे लिहिले आहे त्याचा साकल्याने विचार व्हावा अशी विनंती आहे.
मी एक सामान्य माणूस आहे आणि गेल्या दहा वर्षात मी माझ्या स्वतःच्या घामाचे पैसे शेअर बाजारात गुंतवले आहेत.
यातून मी एकच शिकलो आहे पडक्या बाजारात घेतलेले चांगल्या कंपनीचे शेअर सर्वात जास्त पैसे देऊन जातात आणि चढ्या बाजारात घेतलेले शेअर्स तुम्हाला तितका चांगला परतावा देत नाहीत कित्येकदा तुमचे व्याज सोडाच पण मुद्दलही परत मिळत नाही.
सध्या बाजार चढा आहे तेंव्हा सामान्य माणसाने आता बाजारात उतरू नये मग गुंतवणूक सल्लागार काहीही सल्ला देवोत.मी माझ्या स्वतःच्या चुकातून शिकत आहे. लोकांनी दिलेल्या टिप्स वर माझा संपूर्णपणे तोटाच झालेला आहे.
यशाचे सर्व गुणगान करतात आणि अपयशाला कोणी वाली नसतो.
माझा स्वतःचा बाजारातील प्रवेश हा "नेत्रदीपक" म्हणण्यापेक्षाही चांगला होता. १० रुपयाचे पॅन्टलूनचे IPO मध्ये घेतलेले समभाग मी शेवटी २३७० रुपयाला विकले. (यानंतर तो समभाग पडत गेला आणि शेवटी पहिला होता तेंव्हा तो ३७० च्या आसपास होता.)
परंतु यानंतर अशी कामगिरी मला कधीही करता आली नाही आणि पुढेही येणार नाही. अशी कामगिरी होणे हा नशीबाचा खेळ आहे. परंतु शेअर बाजारात पैसे गुंतवून तुम्ही दुसरा उत्पन्नाचा स्रोत तयार करू शकता अशा तर्हेचे रॉबर्ट कियोसकीचे म्हणणे हे स्वप्नरंजन आहे आणि ते फारतर १ % लोकांना जमू शकेल. बाकी आपली मूळ नोकरी किंवा धंदा हाच उत्पन्न मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग आहे हे मी स्वानुभवातून शिकलो आहे.

प्रसाद गोडबोले's picture

9 May 2017 - 11:50 am | प्रसाद गोडबोले

खूप सुंदर प्रतिसाद !!

एकदा सविस्तर चर्चा केली पाहिजे ह्या विषयावर !! आपण efficient market theory वर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी दिसता म्हणून म्हणल .

शेयर मधून पैसा कमावता येतो पण मग Value investing ला पर्याय नाही असे मला वाटते . ट्रेडिंग इस गम्बलिंग !!

निवांत बोलू ह्या विषयावर !

DeepakMali's picture

8 May 2017 - 1:57 am | DeepakMali

सर्वांचे विचार हे बाजारात विचार पूर्वक निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शक आहेत. प्रसादजी तुमचा यावर एखादा ब्लॉग आहे का?

प्रसाद भागवत's picture

8 May 2017 - 9:32 am | प्रसाद भागवत

साहेब, क्षमस्व. नाही. माझा ब्लॉग अथवा वेबसाईट नाही..अर्थात केवळ अंगी असलेल्या आळस ह्या सदगुणामुळे..मात्र अधेमधे बसल्या बसल्या WA वरुन पुड्या सोडणे ( मिपाकरांच्या भाषेत 'जिलब्या'), पीळ मारणे चालु असते..अनेक मिपाकर माझे डोस सहन करत असतात

इडली डोसा's picture

8 May 2017 - 11:48 am | इडली डोसा

महागाईच्या दरापेक्षा अधिक परतावा दीर्घकाळ देणारी गुंतवणुक, अर्थातच ब्ल्युचीप शेअर्स वा म्युचुयल फंडाच्या प्रमुख योजनांत करणे, हीच यशाची गुरुकिल्ली आहे.

याला स्वानुभव असल्यामुळे १००% अनुमोदन.

ज्ञानव's picture

8 May 2017 - 12:21 pm | ज्ञानव

पाणि कसे ओळखावे हे ही सांगू शकाल का?? कधीकधी मृगजळ समजून सोडून दिले हा मराठी माणसाचा बाणा नंतर "मराठी माणूस व्यापारात मागे का?" ह्या चर्चेला मुद्दे पुरवण्यासाठी पुरेसा होतो. शेअरबाजाराकडे वळताना काय करू नये ह्याचाच कंठषोष (कि कंठशोष) होताना दिसतो पण नक्की काय करावे हे सांगताना मोघम मुद्दे मांडले जातात म्हणजे एकजण म्हणतो "सावधानता बाळगा" ऊद्या तोच म्हणतो "दुसर्यांचे ऐकू नका, टिप्सच्या मागे जावू नका " ह्याचाच अर्थ "सावधानता बाळगा" म्हणजे शब्द वेगळे अर्थ तोच.
कुठला शेअर कधी मृगजळ होईल ते हीमाचल फ्युचरिस्टीक घेतलेले सावध गुतवणूकदार सांगतिलच आणि MRFमध्ये गुंतवणूक केलेल्या बेसावध गुंतवणूकीची लाॅटरी लागलेले पण नंतर आपण कसं मृगजळ का मृगजळ आणि पानी का पानी केले ते सांगत बसतील.
कालच्या शेअरचे ऊद्या काय होणार हे ब्रम्हदेवाचे तातपण सांगू शकत नाहीत.
फंडामेंटल अॅनालिसिस करून गुंतवणूकीतील चुका कमी कशा करता येतिल? मृगजळ आणि पाणी ह्यातला फरक कसा ओळखता येईल ह्यावर मार्गदर्शन व्हावे अशी अपेक्षा आहे.

मार्मिक गोडसे's picture

8 May 2017 - 12:35 pm | मार्मिक गोडसे

कालच्या शेअरचे ऊद्या काय होणार हे ब्रम्हदेवाचे तातपण सांगू शकत नाहीत.

कटु सत्य.