ये कश्मीर है - दिवस तिसरा - ११ मे

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
2 May 2017 - 11:58 pm

आज आम्ही उठलो ते नेमके सूर्योदयाच्या वेळी. आणि तो पहायला बोटीच्या छतापेक्षा आणखी चांगली जागा ती कोणती? तेव्हा आम्ही तडक बोटीच्या छतावर गेलो. सूर्यदेव आपल्या कामावर रुजू होत होते. नगीन सरोवराच्या दुस-या टोकाला नांगरलेल्या हाउसबोटी दिसत होत्या. शिका-यांची लगबग अजून सुरु झाली नव्हती. पक्षी मात्र इकडून तिकडे उडत होते. दूरवर 'हरी पर्वत' आणि त्यावरचा राजवाडा दिसत होता.(हा राजवाडा काल आम्हाला श्रीनगर शहर पाहतानाही दिसला होता, मात्र पर्यटकांना तो पाहण्याची परवानगी नाही अशी माहिती सज्जादने दिली.) आम्ही सूर्योदयाचे काही फोटो काढले आणि नगीन तलावात चालू असलेल्या घडामोडी पाहत थोडा वेळ घालवला. नंतर खाली येउन आंघोळी केल्या. (हाउसबोटीत सगळ्या सोयी असतात - गरम पाण्याची सोय, विजेची सोय, अगदी स्वयांपाकाचीही.) या हाऊसबोटीत आमचे वास्तव्य दोन रात्रींचेच होते; तेव्हा आमचे प्रेमळ यजमान गुलाम नबी यांचा निरोप घेतला. आज सज्जादने आम्हाला फार वाट पाहायला लावली नाही. आम्ही गाडीत बसलो आणि आमची गाडी सोनमर्गच्या दिशेन धावू लागली.

सोनमर्ग हे श्रीनगरपासून ८१ किमी दूर असलेलं एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. श्रीनगर पासून या शहराचे अंतर फार नसल्याने अनेक पर्यटक एका दिवसात सोनमर्गला जाउन परत येतात, आम्हीही तसेच करणार होतो. वाटेत एके ठिकाणी नाश्त्याला थांबून आम्ही जवळपास दोन तासात सोनमर्गला पोचलो.

सोनमर्ग पाहण्यासाठी इथल्या स्थानिक गाडीचा वापर करावा लागतो. बाहेरून आलेली गाडी स्थानिक स्थलदर्शनासाठी वापरण्याची परवानगी नाही. (अर्थातच हा स्थानिक गाडीमालकांनी बनवलेला नियम आहे, सरकारचा नव्हे.) आम्ही गाडीतळावर पोचताच एक माणूस आमच्या गाडीजवळ आला. पण त्याने सांगितलेले दर ऐकून आम्ही अक्षरश: गर्भगळीत झालो . त्याचे ते दर ऐकून पुण्यातल्या रिक्षावाल्यांनीही लाजेने आपल्या माना खाली घातल्या असत्या. सोनमर्गच्या सगळ्या जागा दाखवण्यासाठी हा माणूस चक्क १० हजार रुपये मागत होता. (सोनमर्गच्या नावात सोनं आहे हे मान्य, पण म्हणून एवढे दर? काहीही हं श्री!) आम्ही अर्थातच एवढे पैसे देणार नव्हतो. तेव्हा स्थानिक स्थलदर्शन करूच नये असे आम्ही चर्चेअंती ठरवले आणि गाडीत बसून राहिलो. पण तो माणूस आमचा पिच्छा सोडणार नव्हता. तो परत आमच्या मागे आला आणि 'थाजिवास पार्क' आणि 'थाजिवास ग्लेशियर' दाखवण्याचे त्याने ३ हजार रुपये सांगितले. हेही जास्तच आहेत असे मला वाटत होते, पण इथे आल्यावर काहीही न पाहता परत कसे जायचे असे आमच्या मातु:श्रींचे मत पडले आणि मी नाईलाजाने ते पैसे देण्यासाठी तयार झालो. असो, गाडीमालकाने गाडी मागवली, चालकाला सूचना दिल्या आणि गाडीत बसून आम्ही निघालो. थोडे पुढे जाताच आमच्या चालकाने आमच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला. “इथली सगळी स्थळे मी तुम्हाला दाखवतो, फक्त एक हजार रुपये जास्त द्या, पण हे गाडीमालकाला कळू देऊ नका” असा तो प्रस्ताव होता. हा प्रस्ताव ऐकून आम्ही बुचकळ्यात पडलो. त्याचे म्हणणे मान्य केले असते तर तो अप्रामाणिकपणा झाला असता, पण चार तासांच्या सहलीसाठी १० हजार रुपये मागणा-याशी अप्रामाणिकपणा करणे यातही काही गैर नव्हते. (जाओ पेहले उस आदमी का साईन लेके आओ जिसने हमे सिर्फ २/३ जागा दाखवनेके १० हजार रुपये मांगे.) आम्ही हा प्रस्ताव मान्य केला.

आमचा पहिला थांबा होता थाजिवास पार्क. इथे बाग वगेरे काही नाही, आहे तो फक्त बर्फाचा एक भला मोठा डोंगर. आम्ही उतरताच स्लेड (लाकडी ढकलगाडी) घेऊन काही तरूण आमच्या मागे लागले. त्यांना कसेबसे चुकवत आम्ही वर चढलो. बर्फ सोडून पाहण्यासारखे तिथे काही नव्हते. आम्ही काही छायाचित्रे काढली आणि परत फिरलो.

नंतरचा थांबा होता थाजिवास ग्लेशियर. थाजिवास ग्लेशियर असे म्हटले जात असले तरी इथे ग्लेशियर म्हणावे असे काहीच आम्हाला दिसले नाही, दिसला तो फक्त एक भला मोठा बर्फाच्छादित डोंगर. आमच्या चालकाने दूर वाहनतळाजवळ आपली गाडी थांबवली आणि आम्हाला डोंगराच्या दिशेने जायला सांगितले. इथे आमच्यावर स्लेड (लाकडी ढकलगाडी) चालवणा-यांचा परत एकदा हल्ला झाला. दोन तीन तरूण “स्लेडफेरी घ्या” असे म्हणत आमच्या मागे आले ते वाहनतळापासून थेट डोंगराच्या पायथ्यापर्यंत. आम्ही अनेकदा नाही म्हणूनही ते काही ऐकेनात. शेवटी आम्ही हार मानली आणि ढकलगाडी घेतलीच. (मी व माझ्या भावाने घेतली नसली तरी आई नि बाबांनी तरी.)

आईबाबा ढकलगाडीवर आणि मी व भाऊ पायी असे आम्ही हा डोंगर चढू लागलो. ढकलगाडी चढवणारे थोड्याच वेळात थकले असले तरी मी व भाऊ खूप वरपर्यंत चढलो. थाजिवास ग्लेशियर म्हणून ओळखला जाणारा हा बर्फाचा डोंगर सुंदर आहे हे मात्र खरे. (माझा बर्फाचा हा पहिलाच अनुभव होता म्हणून तर मला तसे वाटले नसेल?) हा सोनमर्गचा लोकप्रिय स्पॉट असावा. इथे भरपूर गर्दी होती. लोक वर म्हणजे अगदी बरेच वर गेले होते. कुणी चालत होते, कुणी पळत होते, कुणी ढकलगाड्यांवरून घसरत होते. दूर डोंगराच्या टोकाशी पांढरेशुभ्र बर्फ दिसत होते. असेच चालतचालत तिथे जावे, तिथले ते पांढरेशुभ्र बर्फ एक बचकभर खावे आणि तिथेच बसून वरून दिसत असणारे सुंदर दृश्य पहात रहावे असा एक धाडसी विचार माझ्या मनात येऊन गेला; पण आता ’अच्छे दिन येण्यास काहीच दिवस बाकी आहेत, ते आधी पहा नि मग नंतर असली काहीतरी विचित्र साहसं कर' असे स्वत:ला समजवत मी तो आवरला.

असो. साधारण एक तास या डोंगरावर घालवून आणि ढकलगाडी चालवणा-यांना आणि चढावरती ’ज्यादा इंजिन’ म्हणून त्यांना त्या ढकलायला मदत करणा-या त्यांच्या सहका-यांना भरपूर पैसे देऊन आम्ही खाली आलो. पायथ्याशी खाण्यापिण्याचे स्टॉल लावून स्थानिकांनी थाजिवासचा पार लोणावळा करून टाकला होता. या स्टॉलशेजारी प्लास्टिकचे कप, बशा असा कचरा पडला होता; हे दृश्य निश्चितच खटकणारे होते. आम्ही काही वेळातच गाडीजवळ पोचलो आणि निघालो. पुढचे आकर्षण? झीरो पॉईंट.

झीरो पॉइंटकडे जाताना एके ठिकाणी ड्रायव्हरने गाडी थांबवली, इथे २/३ हेलिपॅड्स होती. "हेलिकॉप्टर्स उतरू शकतात ती ही शेवटची जागा. इथे हेलिकॉप्टर्स थांबवून मग पुढे लष्कर सगळा माल ट्रकमार्गे नेतं" ड्रायव्हरने माहिती दिली. पुढे अमरनाथ यात्रा जिथून सुरू होते ती जागाही त्याने दाखवली.

काही वेळातच आम्ही झीरो पॉइंटला पोचलो. तिथे पोचल्यावर आम्हाला काय दिसले असावे? बरोबर ओळंखलंत तुम्ही! अजून एक बर्फाचा डोंगर. स्लेडवाले, बूट भाड्याने देणारे, खाद्यपदार्थांच्या टप-या असा सगळा मालमसाला इथेही होताच. पण इथे फारशी गर्दी नव्हती. आम्ही वर चढलो. अर्ध्या उंचीवर गेल्यावर बाकीचे मागे थांबले, मी मात्र आणखी पुढे गेलो. इथे एक ढकलगाडीवाला माझ्या मागे लागला. मी त्याला दहादा नाही म्हटले असेल, तरी तो ऐकेना. मी वर जवळपास २०-२५ मिनिटे होतो आणि हा पठ्ठ्या तो संपूर्ण वेळ माझ्या मागे होता. शेवटी मी त्याला म्हटले, 'मित्रा, मला ढकलगाडीत बसायचे नाही. हे ५० रुपये तुला मदत म्हणून घे, पण माझा पिच्छा सोड.' तरी गडी ऐकेना. शेवटी मी त्याच्या ढकलगाडीत बसूनच खाली आलो.

आम्ही परत जायला निघालोच होतो तेवढ्यात मधुचंद्रासाठी तिथे आलेल्या एका जोडप्याशी बोलताना आमच्या चालकाची चलाखी आम्हाला कळली. झिरो पॉइंट म्हणून आम्हाला दाखवले जात असलेले हे ठिकाण झिरो पॉइंट नव्हतेच मुळी. तो आणखी पुढे होता. आणि एक धक्कादायक गोष्ट म्हणजे ह्या जोडप्याकडून ह्या सहलीसाठी चक्क १० हजार रुपये घेण्यात आले होते. (हे ऐकून आपण फारच कमी फसलो असा विचार झर्रकन माझ्या मनात येवून गेला.) झिरो पॉइंटविषयी आमच्या चालकाला छेडल्यावर त्याचे उत्तर तयारच होते. 'झिरो पॉइंटला जाणारा रस्ता बर्फामुळे बंद झाला आहे. झिरो पॉइंट म्हणजे आपण रस्त्याने जिथपर्यंत जाऊ शकतो ते शेवटचे टोक. त्यामुळे सध्या हाच झिरो पॉइंट आहे.'

आम्ही गाडीत बसलो आणि परतीच्या प्रवासाला लागलो. पण खरे रामायण घडणे अजून बाकी होते. आम्ही गाडीतळाजवळ यायच्या साधारण अर्धा किमी आधी चालकाने त्याचे एक हजार रुपये आम्हाला मागितले. “आपण तिकडे पोचल्यावर तुम्हाला माझे पैसे देता येणार नाहीत, तेव्हा माझे पैसे आत्ताच देऊन टाका,” असे तो म्हटल्यावर आम्ही ते पैसे त्याला दिले. थोड्याच वेळात आम्ही गाडीतळावर पोचलो. तिथे पोचताच गाडीमालकाने आमच्याशी मोठमोठ्याने भांडायला सुरुवात केली. “कुठे गेला होतात तुम्ही? दोन ठिकाणे बघायला एवढा वेळ लागतो का? मला फसवताय तुम्ही. ते काही नाही, मला आता दुप्पट पैसे द्या.” आम्हाला हे सगळे अनपेक्षित होते. पण काही क्षणातंच हा सगळा प्रकार माझ्या लक्षात आला. गाडीचा चालक आणि हा मालक मिळालेले होते आणि आम्हाला फसवू पहात होते. मी सज्जादकडे पाहिले, पण त्याचीही स्थिती अवघड झालेली होती. आमच्या बाजूने बोलावे तर सोनमर्गच्या त्या स्थानिक काश्मीरींची नाराजी ओढून घ्यावी लागणार आणि त्यांच्या बाजूने बोलावे तर आमची.

गाडीमालकाचे गुरगुरणे सुरूच होते. आम्ही घाबरून जाऊ आणि गुपचूप पैसे देऊ असा त्या सगळ्या लोकांचा होरा होता, पण आम्ही असे सहजासहजी घाबरणारे नव्हतो. (शेवटी पुण्याचे आम्ही!) “मी तुम्हाला फक्त आणि फक्त ३००० रुपये देणार आहे. हे घ्यायचे तर घ्या नाहीतर आपण पोलिसांकडे जाऊ. मी तिथे यायला तयार आहे.” मी त्या गाडीमालकाला निर्विकारपणे सांगितले. आम्ही पोलिसांचे नाव काढताच गाडीमालकाने आता चालकाला शिव्या द्यायला सुरुवात केली. (चालक कुठेतरी लांब गाडीमालकाची नजर चुकवत उभा होता.) मी घरच्यांना आमच्या गाडीत बसायला सांगितले. मी स्वत:ही गाडीत बसलो. गाडीमालकाची बडबड चालूच होती. शेवटी आमच्याकडून जास्तीचे पैसे उकळणे अशक्य आहे हे त्याला कळले असावे. त्याने मुकाट्याने ३००० घेतले आणि आम्ही निघालो.

या कटू अनुभवामुळे आम्हाला धक्का बसला असला तरी अजून दिवस संपला नव्हता; आम्हाला अजून एक झटका मिळणे बाकी होते!

सोनमर्गला स्थलदर्शन करत असताना आम्ही जेवायचं पार विसरूनच गेलो होतो. आम्ही परतीचा प्रवास सुरू केला तेव्हा पाच वाजत आले होते. पोटात कावळ्यांनी समूहनृत्य सुरू केलं होतं; तेव्हा काही किमी पार केल्यावर आम्ही एका छोट्या हॉटेलात थांबलो. जेवण आत्ता करायचे नव्हतेच,तेव्हा भज्यांची ऑर्डर दिली. भजी होतेही मस्त. पण बिल देताना बारकाईनं पाहिलं तर असं दिसलं की त्यांनी बटाटा भज्यांऐवजी मिक्स भज्यांचे पैसे लावलेत. (दहा एक रुपये जास्त लावले असावेत, पण प्रश्न तत्वाचा होता.) मी थोड्या घुश्श्यातच तसं बोलून दाखवल्यावर गल्ल्यावरचा माणसानं लगेच सॉरी म्हणून १० रूपये बिलातून कमी केले. आम्ही तिथून निघालो. का कोण जाणे पण श्रीनगरला जाणा-या रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक जाम होतं. पाऊण तासात आम्ही फक्त २० किमी आलो असू. मी पुढे बसलो होतो. बसल्याबसल्या सगळ्या बॅगा आहेत की नाही हे तपासत राहणं हा माझी प्रवासातली नेहमीची सवय. त्यानुसार मी कॅमे-याची सॅक कुठेय असं विचारलं. कहर म्हणजे ती सॅक नेहेमी माझ्याकडेच असायची. सगळ्यांनी इकडेतिकडे शोधलं पण आत्ता ती गाडीच कुठेत दिसत नव्हती. “अरे आपली कॅमे-याची सॅक कुठेय?” मी जवळजवळ ओरडलोच. क्षणार्धात ती सॅक मगासच्या हॉटेलातच राहिल्याचं माझ्या लक्षात आलं. मी अक्षरश: हादरलोच. कॅमेरा आणि २/३ लेन्स मिळून त्या सॅकमधे जवळपास दीड लाखाचा माल होता. माझा आरडाओरडा ऐकून मी सांगायच्या आत सज्जादनं गाडी वळवलीही होती. त्यानं जोरात गाडी मारायला सुरुवात केली. तेव्हा ज्या वेगानं गाडी मारली तेवढ्या वेगात अख्ख्या प्रवासात कधीच मारली नव्हती त्यानं. आम्हाला त्या हॉटेलात जायला २५ मिनिट लागले असावेत, पण मला ते २५० मिनिटांसारखे वाटले. आम्ही त्या हॉटेलात पोचलो. पण पाहिलं तर आम्ही जिथे बसलो होतो तिथे आमची सॅक कुठेच दिसत नव्हती. मी आता रडायच्याच बेतात होतो. तरीही एकदा विचारावं म्हणून आम्ही हॉटेलमालकाला सॅकविषयी विचारलं. “अरे वो सॅक आपकी थी क्या? हमने २/३ लोगोंसे पुछा, लेकिन वो नही बोले तो वो हमने संभालकर रखदी|” असे म्हणून त्याने त्याच्या कपाटात व्यवस्थित ठेवलेली ती सॅक काढून दिली. आयुष्यात मी एवढा मोठा सुस्कारा कधीच सोडला नसेल!

आम्ही श्रीनगरला पोचलो तेव्हा नऊ वाजून गेले होते. पण अजूनही दिवस संपायला तीन तास होते: अर्थात अजून थोडी गंमत बाकी होती. आमची आजची हाउसबोट नगीन तलावातच पण अगदी आत होती; अर्थात् तिच्यात चालत जाणे शक्य नव्हते. तेव्हा आम्हाला नेण्यासाठी शिकारा पाठवायला आणि जेवण बनवायला सांगण्यासाठी मी (अर्थातच सज्जादच्या मोबाईल फोनवरून) बराच वेळ हाऊसबोटमालकाचा नंबर फिरवत होतो. पण हा नंबर लागतच नव्हता. आता आम्ही पुरते हवालदिल झालो होतो. एका दिवसात त्रास व्हावा व्हावा म्हणजे किती? पण सज्जाद तरीही शांत होता. “घाबरू नका. हाऊसबोटीत जाता आले नाही तर मी तुमची काहीतरी सोय करीन.” त्याने आम्हाला धीर दिला. शेवटी फोन लागला नाहीच. पण सज्जाद ह्या हाऊसबोट मालकाला ओळखत होता आणि त्या माणसाला चांगलं ओळखणा-या एका व्यक्तीचा नंबर सज्जादकडे होता. त्याने त्या माणसाला फोन करून हाऊसबोटमालकाचा नंबर मिळवला आणि त्याला फोन केला. अखेर “शिकारा येतोच आहे.” हे वाक्य त्याच्या तोंडून ऐकल्यावर मी त्याला आनंदाने मिठीच मारायचा बाकी होतो.

शेवटी आम्ही मालकांनी पाठवलेल्या शिका-यात बसलो आणि हाऊसबोटीकडे निघालो. त्या मिट्ट काळोखात शिका-यात बसून नगीन सरोवर पार करणे हा एक गूढ अनुभव होता. (तो कुणालाही घ्यावा लागू नये अशी माझी देवाकडे मनापासून प्रार्थना आहे!) नशिबाने पुढे आणखी काही विचित्र घडले नाही. आम्ही हाऊसबोटीत सुखरूप पोचलो आणि आम्ही सांगितले नसले तरी हाऊसबोट मालकाने तयार ठेवलेले जेवण करून पटकन बिछान्यात घुसलो.

सोनमर्ग आम्हाला आवडले असले तरी सहलीशेवटी आलेल्या या अनुभवांमुळे मन नाही म्हटले तरी थोडे खट्टू झालेच. पण आज असे झाले असले तरी हा अनुभव एकमेव होता, उद्या किंवा नंतरही असे काही होणार नाही याची आम्हाला खात्री होती.

उद्या? गुलाबी गुलमर्ग!

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

3 May 2017 - 12:36 am | संजय क्षीरसागर

या सगळ्या लफड्यांमुळे मी पर्यटनापासून कायम दूर राहातो आणि रोजचा दिवसच सहलीला आल्यासारखा जगतो!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 May 2017 - 12:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पर्यटनस्थळावरील दुकाने तर पर्यटकांना लूटन्यासाठीच असतात, असा माझाही पक्का समज आहे, सालं आपल्याला वाटत असतं स्वस्त मिळावं आणि स्वस्त असलेल्या वस्तू महाग मिळतात. मला तर अशा लोकांची गचांडी पकडून ...असो.

-दिलीप बिरुटे

खूप सुंदर अनुभव...असा अनुभव मला पहलगाम ला आला होता...एक घोडेवाला केला होता त्याने भलतीकडेच नेऊन हाच तो मिनी स्वित्झर्लंड आहे असा सांगितलं नंतर कळलं मन पॉईंट दुसरीकडे आहे..मग त्याच घोडेवाल्याला इतका फिरवला मी आणि नवऱ्याने की आयुष्यात कधी कोणाला फसवणार नाही तो..२-३ तास पांढऱ्या शुभ्र बर्फात घोडसवारी म्हणजेच स्वर्ग..बारा झाला तुम्ही सोनमर्ग बद्दल लिहिला..आमचा ते राहिलंय फिरायचं.

लोनली प्लॅनेट's picture

3 May 2017 - 11:15 am | लोनली प्लॅनेट

फार भारी अनुभव आला तुम्हाला
भारतात सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे कुठेही जा तेथील स्थानिक लोक फार मागे लागतात त्याचा त्रासच होतो मनापासून स्थळाचे सौंदर्य अनुभवताच येत नाही त्यामुळे मी फक्त कोकणात जातो

संजय पाटिल's picture

3 May 2017 - 11:31 am | संजय पाटिल

सुंदर वर्णन ......
हि लुबाडण्याची व्रूत्ती सगळिकडेच थोड्याफार फरकाने दिसून येते.
:(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 May 2017 - 12:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनुभव वाईटच, फोटो छान. वृत्तांत वाचतोय.

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2017 - 1:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

फोटो मस्तं, अनुभव :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2017 - 1:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा ! स्मायल्या पुन्हा सुरू झाल्या !!

असे अनुभव विसरून जा, हे घडत असतेच.
पुढील लेखाबद्दल उत्सुकता आहे.

नि३सोलपुरकर's picture

3 May 2017 - 3:33 pm | नि३सोलपुरकर

छान वृत्तांत आणि दशानन ह्यांच्याशी १०० % सहमत .
वात्रटराव ,छान लिहिताय .
पुलेशु .

अवांतर : धाग्याचे "काश्मीर" होणे हे मिपावर बऱ्याच वेळा पाहिले आहे ...पण तिथल्या लोकांनी चक्क थाजिवासचा ग्लेशियर (काश्मीर) चा लोणावळा करून टाकला . हे वाचून डोळे पाणावले .

पैसा's picture

3 May 2017 - 5:14 pm | पैसा

असला अबेकार अनुभव आम्हाला फतेहपुर सीक्रीला आला होता. उत्तर भारतात जाऊच नये हे शहाणपणाचे.

सोनमर्गला हमखास हे अनुभव येतात. आम्ही गेलेलो तेव्हा घोडेवाले आणि गाडीचालक यांच्यात भयानक भांडण सुरु होते. घोडेवाले कोणालाही गाडी घेऊ देत नव्हते. शेवटी त्यांनी आमच्यासमोर एक सुमो गाडी डिझेल टाकून जाळली होती. नंतर आमच्या ओळखीचे काश्मिरी गृहस्थ म्हणाले हे रोजचे आहे तिथे. हे लोक अतिशय मग्रुर आहेत. त्यांनी दहशत बसवलीये.
तुम्ही तीन हजारात धडधाकट परत आलात हेही नसे थोडके.

एस's picture

3 May 2017 - 6:29 pm | एस

बापरे!

वरुण मोहिते's picture

3 May 2017 - 6:42 pm | वरुण मोहिते

चालायचं

एक_वात्रट's picture

4 May 2017 - 10:06 pm | एक_वात्रट

प्रतिक्रिया देणा-या सगळ्यांना धन्यवाद.