नमस्कार मित्रहो,
आज गोष्ट सांगणार आहे माझ्या लोहोपे तलाव भेटीची.
तर झाले असे कि, 50x7 हे आव्हान तीळसे येथील शिवमंदिराला भेट देऊन पूर्ण केल्यानंतर अस्मादिकांनी तानसा जलाशयावर स्वारी नेण्याचे आयोजिले होते मागच्या रविवारी. परंतु ऐन वेळी आमचे सहप्रवासी घोडेस्वार परगावी गेल्यामुळे तानसा अभयारण्य आणि प्रचंड जलाशयाला एकट्याने भेट द्यायचे धाडस होईना म्हणून आम्ही वेळेवर पंचक्रोशीतील गणेशपुरी-वज्रेश्वरी-अकलोली हि गरम पाण्याच्या कुंडांसाठी प्रसिद्ध तीर्थस्थळे पाहण्याचे योजिले. पण त्यातही विघ्न आले, अर्धा रास्ता पार केल्यावर ध्यानी आले की आम्ही पाण्याव्यतिरिक्त कुठलीही रसद घेतली नव्हती आणि पोटात तर आतापासूनच कावळे ओरडू लागले होते. रिकामी झोळी आणि पोट घेऊन ५० किमी अंतर आणि तीन तास फिरणे अशक्य वाटले म्हणून पुन्हा एकदा यशस्वी माघार घेत मोर्चा वळवून रस्त्यातील आडवळणाच्या लोहोपे तलावाला भेट दिली. त्यातही झाले असे की आम्ही(नेहमीप्रमाणे) आमचा मोबाईल चार्ज करायचा विसरल्यामुळे या मोहिमेची छायाचित्रे, Strava वरील अंतर आणि मुख्यत्वे रस्त्याचा नकाशा बनवू शकलो नाही. याची खदखद मनातून घालवण्यासाठी आम्ही या रविवारी पुन्हा एकदा लोहोपे तलावाची वारी करून ती कसर भरून काढली. त्याचा वृत्तांत देत आहे.
तर, माझा बराचसा रस्ता हा माळरान आणि डोंगरांच्या कुशीतून जात असल्यामुळे या रस्त्याचे व्हिडीओ रेकॉर्ड करून ग्रुपात आग लावण्याची फार्फार विच्छा मनात होती, पण वेळेवर आमच्या कुडूस प्रांती मोबाइल सायकलला अडकवण्यासाठी होल्डर मिळाले नाही त्यामुळे एकूण एक मोबाईल दुकानदाराच्या नावाने बोटं मोडीत सकाळच्या राईडसाठी खायला ब्रेड तेवढे घेतले आणि घरी आलो.
सकाळी पावणे सहल उठून भराभर तयारीला लागलो. पाण्याची एक आणि गुलाब सरबताची(ह्येच आमचं एनर्जी ड्रिंक) एक अश्या दोन बाटल्या, ब्रेड्स, आणि लोणावळा आणि महाबळेश्वर व्यतिरिक्त इतर ठिकाणी अत्यंत दुर्मिळ असलेले ऑरेंज मार्मालेड तोलून मापून बॅगेत भरले आणि साडेसहाच्या आसपास निघालो. अंतर अर्थातच जास्त नसल्याने वेळ जास्त लागणार नव्हता पाच किमी महामार्गावर सायकलिंग केले की डाकीवाली गावाकडे जाणारा रस्ता पकडला, खड्ड्यांनी भरलेला. अर्थात, हि सुरुवात होती. लवकरच डाकीवाली पार करून पुढे आलो. उजव्या बाजूला दगडाच्या खाणींमुळे अर्धा पोखरलेला डोंगर आणि त्यावर चढणारे ट्रक्स आणि ट्रॅक्टर्सचे धुळीने भरलेले रस्ते. थोड्याच वेळात लोहोपे गाव लागले. तिथून उजवीकडे अर्धा एक किमीवर गेलो की आलाच लोहोपे तलाव. आता पुंर्णपणे कच्चा रस्ता सुरु झाला. धुळीच्या रस्त्यावर आत्ताच एक साप गेल्याच्या खुणा दिसल्या म्हणून थांबलो, म्हटलं नागोबा असतील तर देतील दर्शन. पण नाही दिसले नागोबा, निघालो पुढे. पाचच मिनिटात लोहोपे गावातून निघून ताळ्यावर पोचलो.
आजूबाजूला छोट्या छोट्या टेकड्या आणि पश्चिमेला मंदाग्नी/मंदाकिनी डोंगराने वेढलेल्या तळ्याच्या दर्शनाने डोळे सुखावले. आत्ताच सूर्य पूर्वेच्या डोंगरातून वर येत होता. पाणी सोन्याप्रमाणे चमकत होते. गुडघाभर पाण्यात जाऊन तोंड धुवून घेतले आणि थोडा वेळ रेंगाळलो. आता थोडा डाव्या बाजूला असलेल्या बांधावरून सायकल चालवत तळ्याच्या दुसऱ्या बाजूला गेलो. तिथे एका ठिकाणी कालव्याला पाणी जाण्यासाठी विहिरीसारखं बांधकाम केलं आहे त्या धक्क्यावर परिसर न्याहाळत बसलो. अजून साडेसातही वाजले नव्हते. थोडावेळ बसल्यानंतर घरून आणलेली न्याहारी संपवली आणि तळ्याच्या काठाशी थोडा फिरलो.
अश्या रस्त्याला आमच्याकाठी दंड म्हणतात. पूर्वी हेच गावांना जोडणारे रस्ते. दोन्ही बाजूंनी निवडुंगाच्या कुंपणांनी संरक्षित केलेले असत.
हि सापाने तयार केलेली नक्षी, उन्हाळ्यात धुळीने भरलेल्या रस्त्यांवर लगेच लक्षात येते.
सोनसळी उन्ह.
हमसफर.
तळ्याला घातलेला बांध. समोर मंदागीनी पर्वत.
न्याहारी.
आदिवासी मासेमारीसाठी आता असे थर्माकोलचे किंवा पाईपचे तराफे बनवतात.
रानफुलं.
तळ्याच्या पाण्यावर पोहणारे, मधेच डुबक्या मारणारे पक्षी, काठावर ध्यानस्थ बसलेले बगळे, कोकिळेची कोहूकुहू आणि इतर पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्यावर चार चांद लावणारा रानफुलांचा सुगंध... आहाहा... कोणालाही हेवा वाटावा असा भोवताल. पावसाळ्यात इथे किती सुंदर दृश्य असेल याची कल्पनाच करवत नाही.
आठ वाजले तसे निघालो. पुढचा रस्ता रानातून जातो आणि जास्त ऊन पडले तर पाणी कमी पडेल म्हणून निघालो. आता फक्त रस्त्याचा मनमुराद आनंद घ्यायचा होता. सतत उंचवटे आणि उतार, दुतर्फा झाडी आणि पक्ष्यांचा किलबिलाट...
मधेमधे आदिवासींच्या एकट्या दुकट्या झोपड्या, अगदी पाच दहा किमीवर आलेल्या विकासापासून अलिप्त, आपल्याच विश्वात मश्गुल. मिळेल तिथे मजुरी करायची, थोडंसं धान्य विकत घेण्यापुरते पैसे मिळवायचे आणि जेव्हा इच्छा होईल तेव्हा तळ्यावर जाऊन भाजीपुरते मासे पकडून 'आता कशाला उद्याची बात' म्हणत आजचा दिवस गावठी दारूत तर्रर्र होऊन ढकलायचा, अगदी साधं सोपं जगण्याचं तत्वज्ञान.
आदिवासींची झोपडी.
रस्ता...
रस्ता.
दोन चार किलोमीटर पुढे आल्यावर धुळीने भरलेला रस्ता सोडून एक शॉर्टकट निवडली. शॉर्टकट नसून खरेतर भन्नाट रस्ता म्हणून मी हि वाट निवडली. एका बऱ्यापैकी बांधलेल्या आदिवासींच्या घरासमोरून निघालो, अंगणातल्या झाडाला बांधलेल्या झोपाळ्यावर झोके घेणारी पोरं माझे धुळीने भरलेले पाय आणि डोक्यावरचं हेल्मेट बघून हसायला लागले. जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत नीट निघालो आणि पुन्हा सायकलवर स्वर होऊन निघालो. आजूबाजूला विविध रानफुलं फुलली होती आणि करवंदांची झुडुपं मस्त टप्पोऱ्या करवंदांनी बहरली होती. चार पाच पिकलेली करवंदे मिळालीही. पुढच्या आठवड्यात पुन्हा आलो तर भरपूर पिकलेली करवंदे मिळतील असे अंदाज मनाशीच बांधत निघालो. डोंगराच्या उतारांवर आढे वेढे घेत जाणारी पायवाट पुन्हा त्याच मातीच्या रस्त्याला जाऊन मिळाली.
करवंदांच्या झुडुपांतून जाणारी पायवाट.
आंबट.... तोंपासु?
पायवाट...
पायवाट...
खिंड...रानवाटांचा शेवटचा माग...
खिंड...रानवाटांचा शेवटचा माग...
या धुळीत गुडघ्यापर्यंत बुडतो कि काय असं वाटलं.
थोडं पुढे गेल्यावर रस्ता एका खिंडीसारख्या भागातून जातो. दोन्ही बाजूंनी वाढलेली झाडे बोगद्यातून जात असल्यासारखा फील देत होती. हि छोटी खिंड पार केली आणि पुन्हा शेतं दिसू लागली. म्हणजे आता गुंज गावाची हद्द सुरु होत होती. थोडा पुढे आलो आणि डाव्या बाजूला मंदाकिनी/मंदाग्नी डोंगराच्या पायथ्याचं वज्रेश्वरी देवीचं मूळ स्थान असलेल्या मंदिराचा परिसर दिसला डाव्या बाजूला(होय, असं म्हणतात कि चिमाजी अप्पांनी वज्रेश्वरी देवीचं जे मंदिर उभारलं ते या मूळ मंदिराच्या जागी न उभारता आताच्या सर्वश्रुत वज्रेश्वरी येथे उभारलं). तिकडे नंतर कधीतरी जायचं ठरवत गुंज गावात शिरलो.
पुन्हा एकदा डांबरी रस्ते सुरु झाले म्हणायचे, गुंज गावातून थेट कुडूसकडे प्रस्थान करीत सडे नऊ पर्यंत घरी पोचलो, आठवडाभरासाठी ऊर्जा घेऊन. एकांतातले ते तीन तास म्हणजे स्वतःने स्वतःलाच शोधण्याची खटपट वाटते जणू. काहीतरी असं बघायला मिळाल्याचं समाधान जे कॅमेरा साठवू शकत नाही आणि असे अनुभव जे शब्दात सांगता येत नाहीत. सोबत मनात एक सलही असते कि भरभरून मिळालेल्या या निसर्गाचं या परिसरात कोणाला कौतुकही नाही. मी तरी कधी फिरलो असतो इथे सायकल नसती घेतली तर? या प्रश्नाचं उत्तरदेखील नकारार्थी येईल.
आता ठरवलंय, पावसाळ्याच्या आधी एकदा तरी इथे पुन्हा यायचं, खास करवंदे खाण्यासाठी. आणि सोबतच्या भटकणाऱ्या गँगला पावसाळ्यानंतर कॅम्पिंग साठी. आम्हाला कॅम्पिंगचा खास अनुभव नाहीये हरिश्चंद्रगड व्यतिरिक्त. त्यामुळे कॅम्पिंगचा श्रीगणेशा इथेच करायचा असं ठरवलंय.
प्रतिक्रिया
26 Apr 2017 - 8:27 pm | दुर्गविहारी
मस्त. एका वेगळ्या जागेची ओळख करून दिलीत. बाकी एक सुचना, कोणताही प्रवास अथवा भटकंती अशी आली लहर केला कहर , करु नये. पुरेशी तयारी असावी. खाणे, पिण्याचे पाणी व इतर आवश्यक साहित्य हे असलेच पाहिजे. ट्रेक करताना काय काळजी घ्यावी याचा एक धागा काढतो.
26 Apr 2017 - 11:53 pm | यशोधरा
दुवि, काढा धागा.
27 Apr 2017 - 10:14 am | इरसाल कार्टं
सहमत, म्हणूनच सगळी तयारी करून गेलो होतो. नाही म्हटले तरी जंगलात आणि अनुल्लेख जलाशयात एकट्याने जाणे टाळावे म्हणून या वेळी पोहण्याची इच्छाही आवरली मी. आणि याच कारणाने अजून तानसा तलावाला भेट दिली नाही एकट्याने.
पूर्ण गृहपाठ केल्याशिवाय मी कुठेही ट्रेकलाही जात नाही.
27 Apr 2017 - 10:15 am | इरसाल कार्टं
*अनोळखी.
26 Apr 2017 - 10:25 pm | कंजूस
मजेदार फोटो आणि भटकंती.
# दुर्गविहारी,काढा धागा.
26 Apr 2017 - 10:44 pm | इडली डोसा
बादवे मोदक यांचा धागा आहे ट्रेक करताना काय करावे याचा.
हा बघा
26 Apr 2017 - 11:12 pm | सतिश गावडे
आहा... फोटो पाहून अख्खं बालपण नजरेत उभं राहीलं. एकुण एका फोटोने बालपणीच्या आठवणी जागवल्या.
>>अश्या रस्त्याला आमच्याकाठी दंड म्हणतात.
कोकणात दांड म्हणत असत. एक प्रसिद्ध लोकगीत आहे, "या गो दांड्यावरना बोलतंय नवरा कुणाचा येतो".
>>पूर्वी हेच गावांना जोडणारे रस्ते. दोन्ही बाजूंनी निवडुंगाच्या कुंपणांनी संरक्षित केलेले असत.
या "निवडुंगांना" आम्ही टेपरा म्हणतो. ही काटेरी वनस्पती म्हणजे उत्तम नैसर्गिक कुंपण. टेपरा तोडला की त्यातून दुधासारखा पांढरा शुभ्र चिक निघतो. हा चिक पूर्वी लोक विंचू चावलेल्या जागी लावत असत. त्यानं विंचू "उतरतो" म्हणे. वाळल्यावर सरपण म्हणूनही वापर होतो टेपर्याचा.
27 Apr 2017 - 10:18 am | इरसाल कार्टं
निवडुंगे = निंगुरा
अथवा
निवडुंगे = वंदा.
26 Apr 2017 - 11:52 pm | यशोधरा
धागा आवडला.
26 Apr 2017 - 11:55 pm | एस
फारच छान भटकंती! रानवाटांची रानभूल म्हणावी अशी!
27 Apr 2017 - 10:34 am | संजय क्षीरसागर
एकदम दिलखुष सहल केलीत !