पूर्वार्ध
पुणे ते वाडा... भाग १
काल मोहनकडे पोचलो तेव्हाच ठरवलं होतं कि लवकर झोपायचं, पहाटे पाचलाच उठून सहा वाजेपर्यंत निघायचं, जेणेकरून उन्हं पडेपर्यंत जास्तीत जास्त अंतर कापता येईल. पण झालं उलटंच, मोहनबरोबर केलेलं लांबच लांब वॉक, त्यानंतर रंगलेल्या गप्पा. जेवण हे सगळं उरकायला रात्रीचे बारा वाजले. माझा सक्काळीच निघण्याचा निर्णय वाहिनीसाहेबांनी साफ धुडकावून लावला. अजून काय पाहुणचार करायचा राहिला होता देव जाणे. मग माघार घेत फोनमधले सकाळचे सगळे अलार्म रद्द केले, आणि जेव्हा येईल जाग तेव्हा उठू म्हणत झोपायच्या तयारीला लागलो. खरंतर जागरण करून मग एवढ्या उन्हात सायकलिंग करणे मलाही योग्य वाटले नाही. गप्पा मारता मारताच कधीतरी झोप लागली, अगदी शांत.
सकाळी सात वाजता जाग आली. उठलो आणि आपली नित्यकर्मे चालू केली. मोहन आणि वैनीहि उठले होतेच. पुन्हा रेंगाळत रेंगाळत भरपेट न्याहारी उरकली. वाटेत लागणारं पाणी भरून घेतलं, तिघांचा निरोप घेत निघालो, सकाळी ०९:३० वाजता. सगळ्यात आधी स्टेट बँकेचं ए टी एम गाठलं. आजच्या प्रवासासाठी पैसे काढले आणि निघालो.
आजच्या प्रवासात प्रेक्षणीय असे काही नव्हते. काही मोजक्या फोटोंमधील हे एक.
आजचा कल्याण ते वाडा हा अर्धा रस्ता अगदी तोंडपाठ होता आणि पनवेललाही वर्षातून तीन चार फेऱ्या होताच असतात त्यामुळे विशेष मोठे चढ लागणार नाहीत रस्त्याला हे माहीतच होतं. अर्थात, रस्त्यातले फ्लाय ओव्हर ब्रिज सोडले तर. मोहनने सांगितलेल्या रस्त्याने हळू हळू निघालो. दहा वाजत आले होते, उन्हं चढत होती. हळूहळू आर्द्रतेने भरलेल्या वातावरणाने रंग दाखवायला सुरुवात केली. घामाच्या धारा सुरु झाल्या. थांबे वाढायला लागले, मिळेल तिथे उसाचा रस आणि कलिंगड खात शरीरातील ऊर्जा आणि पाणी टिकवण्याचे प्रयत्न चालू होते. पनवेल येईपर्यंतच आजचा प्रवास खडतर असणार याची जाणीव झाली. तरी बरे कालच्या प्रवासात घेतलेल्या काळजी मुळे आज त्याचा काही विशेष परिणाम झाला नव्हता. अन्यथा आज टेम्पो करावीच लागली असती. रस्ता ओळखीचा आहे या एका सकारात्मक मुद्याला धरून स्वतःला प्रेरणा देत होतो.
कसातरी पनवेलमध्ये पोचलो. फ्लाय ओव्हरला टांग देत त्याच्याच सावलीत खालून निघालो, थोडा पुढे गेल्यावर मात्र ट्राफिक मध्ये पुरता अडकलो. माघार न घेण्याचा भारतीय मानसिकतेमुळे ट्राफिक बराच वेळ अडकून पडले. सगळे जण फक्त जोरजोरात हॉर्न वाजवत होते पण जगाचे हलायला कोणी तयार होईना. या सगळ्याचा गोंगाट ऐकून कंटाळलो. दुर्दैवाने मी मधोमध अडकलो होतो. मग काय, सायकलला अडकवलेली पाण्याची बाटली काढून बॅगेत कोंबली आणि उतरलो सायकल वरून. हेल्मेट नीट सावरलं आणि उचललीच उजव्या खांद्यापर्यंत. अख्ख्या ट्रॅफिकच्या नाकावर टिच्चून गाड्यांच्या गर्दीमधून निघालो अर्धा किमी पर्यंत. रस्ता मोकळा मिळाला तसा पुन्हा आपलं ग्रुपचं ब्रीदवाक्य 'धर हॅन्डल, मार पायडल' सुरु.
बारा वाजून गेले होते, घामाच्या धारा पुशीत कसातरी तळोज्यापर्यंत आलो आणि आता अंगात त्राण उरले नाही. खिश्यात ठेवलेल्या फोनने सिस्टमचे तापमान ४५ अंश से. पर्यंत गेल्याचे दाखवले होते. उन्हामुळे तो प्रचंड गरम लागत होता. याचं पॉपकॉर्न होतं कि काय आता अशी भीती वाटली म्हणून बंद करून बॅगेत ठेवला. वैराण रस्ते, औद्योगिक विकासामुळे आलेलं प्रदूषण, बंदर/गोदी जवळ असल्याने येणारे जाणारे मोठे मोठे कंटेनर्स आणि प्रचंड ऊन यांच्यापुढे काही चालेना. रस्त्यात दिसणाऱ्या एक ढाब्यासमोर सायकल लावली आणि आत जाऊन बसलो.
काही खाण्याची इच्छा नव्हतीच, ग्लासभर ताक पिलं. म्हटलं जरावेळ बसेन आणि लगेच निघेन पण हिम्मत होईना. घामामुळे लगेच तहान लागत होती, अजून एक ग्लास ताक रिचवलं. बरोबर आणलेली चिक्की खाल्ली बळेबळेच. टेकवलं डोकं टेबलावर आणि आजही झोप काढली जवळजवळ पाऊण तासाची. सायकलच्या घंटीच्या आवाजाने जाग आली, बघतो तर सायकल भोवती कट्टा जमला होता. ट्रक्सचे ड्रायव्हर्स आणि ढाब्यातील एक दोन मुलं मिळून कुतूहलाने सायकल न्याहाळत होते. त्यातीलच एकाने घंटी वाजवली होती, आता तो गिअर शिफ्ट करणार तेवढ्यात मी त्यांना दचकवलं. म्हटलं बाबारे, हवि तर चालावं पण बंद सायकलचे गिअर्स शिफ्ट नको करू. मग त्यांनी माझ्याकडे मोर्चा वळवला. कितनेमे ली? इतनी महंगी कैसे? कहासे आये? कहा जाओगे? अशी सरबत्ती सुरु झाली. मग त्यांच्यातच बसत थोड्या गप्पा मारल्या. अजून एक ग्लास ताक प्यायलो, दोन ग्लास बाटलीत भरून घेतले. आणि निघालो. अख्ख्या आयुष्यात एका दिवसात एवढे ताक मी पहिल्यांदा प्यायलो असेन. पुन्हा असा योग येऊही नये.
कोकण रेल्वे.
सकाळपासून जेमतेम ३० किमी अंतर पार झाले होते, कल्याण अजून २५किमि पेक्षा जास्त होते आणि तिथून घर ४० ते ४५ किमी. अंदाजे ६५ ते ७० किमी अंतर या असल्या हवामानात अत्यंत कठीण वाटायला लागले. जमेल तसा सायकल हाणत निघालो. वाटेत मिळेल तिथे उसाचा रस आणि पाणी पीत निघालो. एक एक करत स्वतःच ठरवलेले रस्त्यातले चेकपॉइंट्स पार करत होतो. कधीतरी वाटेत बोर्ड दिसला कल्याण 11 किमी असल्याचा. कल्याण फक्त 11 किमी वाचून जरा बरे वाटले. कल्याणला गेलो म्हणजे घरीच कि, म्हणत स्वत:ला धीर देऊ लागलो.
दिलासादायक.
पाच वाजून गेले तसा उन्हाचा तडाखा कमी होऊ लागला. मजल दरमजल करत, फ्लाय ओव्हर चालत पार करत कसातरी ६:०० वाजताच्या आसपास कल्याणला पोचलो. आता भूक लागली होती, काहीतरी थंड खायची इच्छा अनावर झाली. कल्याणला पोचल्याचं सेलिब्रेशनही व्हायलाच हवं होतं. मग एकामागोमाग एक मिल्कशेक आणि आईसक्रीम हाणले. फोन चालू करून ग्रुपमध्ये कळवलं आणि थोड्या गप्पा झोडल्या, घराच्या गृपमध्येही कळवलं. मधल्या वेळात सागर आणि विकासने कल्याण पासून काही बॅकअप लागल्यास कळव असा निरोप दिल्याचे बायकोने कळवले. आतापर्यंत सगळं ठीक चाललंय म्हणत मी साभार नकार कळवला.
समोर कल्याणमधली ट्राफिक दिसत होती. ती मोकळी होण्याची वाट बघत बसलो पण काही फायदा झाला नाही. म्हणून कल्याण-भिवंडी प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांचा वळणावळणांचा मार्ग जो गल्लीबोळांतुन जातो त्यानेच जायचे ठरवले. एक दोन जणांना विचारत ट्रॅफिकला बगल देत निघालो. सायकल चालवता चालवता एक मोटारसायकल वाल्याला भिवंडीचा रस्ता विचारला तर तो म्हणाला चल मी तिकडेच राहतो, तुला दाखवतो रस्ता. आणि आम्ही रस्त्यावर गप्पा मारत जाऊ लागलो, मी पुण्याहून सायकल चालवत आलोय हे ऐकून तोंडाचा चंबू झाला होता त्याचा. स्वतःचा वेग कमी करत माझ्याशी त्याच्या गप्पा चालू होत्या. पुन्हा तेच प्रश्न, कितनेमे ली? इतनी महंगी कैसे? कहासे आये? कहा जाओगे?.
त्याच्या गल्लीतून जाताना सगळ्या मित्रांना सांगत होता "अरे ये देख पागल पुनासे सायकलपे आया है, वाडा जायेगा." मला मात्र अवघडल्यासारखे झाले होते. त्याचं घर आल्यावर घरी येऊन नाश्ता करून मग पुढे जा असा आग्रह धरू लागला. किमान सरबत पिऊन आणि रस्त्यात लागेल तेवढं घेऊन जायला सांगत होता. पण उशीर होईल म्हणत मी निघालो. थोड्याच वेळात छोट्याश्या दुर्गाडी किल्ल्याजवळ जवळ आलो. पुलावरून कल्याणाची खाडी पार केली कि गेलं कल्याण आणि कल्याणची ट्राफिक मागे. खाडी पार करून थेट निघालो. अंधार पडत चालला होता म्हणून रस्त्यात थांबून लाईट्स लावल्या आणि थेट भिवंडीकडे प्रस्थान केलं.
कल्याणची हद्द पार करताना.
भिवंडीमध्ये पुन्हा ट्राफिक, तिथेही हळूहळू प्रवास करावा लागला त्यामुळे तासभर लागलाच. कसतरी भिवंडी पार केलं, आता शेवटचा टप्पा, ३० किमी. अंधार पडूनही प्रचंड थकवा, घामाच्या धारा पिच्छा सोडत नव्हत्या. एवढ्याश्या अंतरासाठी कोणाला मदतीला बोलावयाचीही इच्छा होत नव्हती. घर जवळ असल्याची चाहूल काय ती एक प्रेरणा देऊन जात होती. भिवंडी सोडताना ठरवले होते कि आता मध्ये थांबायचं नही पण तरीही घामामुळे तहान काही कमी होत नव्हती आणि कितीही निग्रह केला मनाचा तरी थांबावंच लागत होतं. भिवंडीनंतरही तीन चार वेळा थांबून पाणी पिऊन मग निघावं लागलं. आता घरच्यांनाही घाई व्हायला लागली. मी रात्री १०:३० ला पोचेन असा अंदाज सांगितलं होता संध्याकाळी. अंदाज जवळ जवळ बरोबर ठरत होता. एक एक गाव मागे पडत होता तशी घराची ओढ जास्त प्रेरणा देत होती. अनगाव, कवाड करत करत दुगाड फाटा लागला... आता अजून जवळ. पण शरीर थकलं होतं. शक्ती झपाट्याने कमी होत होती. आता एवढ्याश्या अंतरासाठी बोलवावं का कोणाला असा विचार करू लागलो पण थांबलो नही. शेवटची पाण्याची बाटलीही संपवली. पण घर काही येईना. १०.३० वाजता अंबाडी पार झाली, आणि वेग वाढला आपोआप. आता फक्त पाच सहा किमी राहिले. मग आपण आपल्या घरी असणार. हळू हळू तानसा नदीचा पूल पार केला. आता तीन चार किमी राहिले फक्त. रोजचाच रस्ता आज खूप लांबचा वाटत होता. आता चालत जावे लागले तरी बेहत्तर पण कोणाला बोलावण्याचा प्रश्न उरला नव्हता. तरी मेट नंतरचा अगदी न जाणवणारा चढही जड गेला. मग उतरून थोडे चाललो. शेवटच्या क्षणाला दुखापत नको होती. शेवटचा एक किमी राहिला, धडधडत्या छातीने तो पार केला आणि सायकल नारे फाट्यावरून गावात जाणाऱ्या रस्त्याला लागली. गावात जाणारा एक किमीचा रस्ता म्हणजे 'हाय काय नि नाय काय' वाटलं. सायकल लोवेस्ट गिअरवर ठेवून स्पिनिंग करत आरामात निघालो. पावणे अकरा वाजले होते, अर्धं गाव झोपलं होत. दारात आलो आणि ट्रिंग ट्रिंग केली. भिजल्या अंगाने घरात घुसलो आणि जमिनीला पाठ टेकवली. काहीतरी उमगलं होतं, शब्दांत अवर्णनीय असं.
मोदक, प्रशांत आणि मोहनला पोचल्याचे निरोप धाडले आणि मगच फ्रेश झालो.
जवळजवळ पंधरा वर्षांनी सायकल चालवणे आणि तेही एवढ्या मोठ्या अंतरासाठी हे माझ्यासाठी प्रचंड आव्हानात्मक होते. याची तयारी ग्रुपमधल्या सदस्यांच्या चर्चांमधून केली. तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून घेतला. इतरांचे लेखन वाचून काढले आणि शरीराची तसेच मनाचीही तयारी करून घेतली. दोन महिन्यांपासून धावपट्टीवर गाळलेला घाम फळास आला. असलं काहीतरी अचाट आणि काही अंशी धोकादायक करण्यास घरून पाठिंबा मिळाला हेही खूप प्रेरणादायक होतं. घरच्या मित्रमंडळींच्या गृपमधूनही प्रोत्साहन मिळत होतं. वेळ आल्यास असतील तसे आणि असतील तिथून माझ्यासाठी धावून यायला तयार असलेली सागर, विकास, अमोल, मोहन आणि विशालची ही टीमही मोठा आधार होती. सायकल सर्व्हिस करण्यापासून ते स्टार्टींग पॉईंट पर्यंत आणून देणारे आणि दटावत सूचना देणारे, मी कुठपर्यंत पोचलोय याची चौकशी फोन करून विचारणारे मोदक आणि प्रशांत नसते तर हे शक्यच नसतं झालं. मधल्या वस्तीला माझा यथेच्छ पाहुणचार करणारे मोहन आणि पूनम वैनी आणि जोरदार स्वागत करणारी त्यांची छकुली यांनी दुसऱ्या दिवसाची ऊर्जा दिली.
आता रोजचे सायकलिंग चालू आहेच, मधेच लांबचे दौरेही करिन पण हा प्रवास खास आठवणीत राहील...
लेखमाला संपवतोय, तोपर्यंत...तेच आपलं... धर हॅन्डल मार पायडल.
प्रतिक्रिया
8 Apr 2017 - 7:55 pm | दिपस्वराज
दणदणीत स्वागत मित्रा ! काय जिगर दाखवलीस ......एक नंबर ! मनापासून शुभेच्छा ....आणि असाच फिरता रहा सदैव .
8 Apr 2017 - 8:13 pm | पैसा
वा! मस्त लिहिलंय!
8 Apr 2017 - 9:01 pm | कंजूस
एकूण किनारपट्टीला सायकल चालवणे आणि सोबतीला ट्राफिक म्हणजे कठीणच दिसतय. कूर्ग माडिकेर जाऊन सायकलिंग करायला मजा येईल. फोल्डिंगची सायकल हवी.
8 Apr 2017 - 10:52 pm | मोदक
नंबर एक - सायकल नजरेआड कधीही होवून द्यायची नाही. सायकल धाब्यावर पार्क करून झोपणे तर अशक्यच.
नंबर दोन - कोणीही कितीही वेळा विचारो.. सायकलची किंमत ५ हजार रूपयेच्च सांगायची. इतकी स्वस्त कुठे मिळाली असे विचारले तर डिफेक्टिव आहे असे बिन्धास्त सांगायचे. ;)
नंबर तीन - "काहीतरी उमगलं होतं, शब्दांत अवर्णनीय असं." याच्यासाठीच सायकलिंग, ट्रेकिंग, रनींग वगैरे छंद जोपासायचे.
एंजॉय इच राईड. असेच सायकलिंग करत रहा. फोटो काढत रहा आणि राईडबद्दल मिपावर लिहित रहा. :)
9 Apr 2017 - 10:08 am | एस
या बहुमोल टिपांबद्दल धन्यवाद.
इरसाल भौ, मस्त झाली राईड. पायडल मारत राहा.
9 Apr 2017 - 11:00 pm | इरसाल कार्टं
लिहीत राहीन नक्कीच
9 Apr 2017 - 11:15 pm | देशपांडेमामा
छान लिहिलाय ! पहिली लॉंग राइड नेहमीच अविस्मरणीय असते !!
देश
13 Apr 2017 - 11:03 pm | प्रशांत
मस्त लिहिलंय!
सायकल चालवत रहा....लिहत रहा....
10 Apr 2017 - 8:23 pm | बाबा योगिराज
मस्तच राईड मारलिये. सुरवातिचा अर्धा प्रवास होई पर्यंत काहिच वाट्त नाही. नंतर च्या अर्ध्या वाटेवर मात्र जीव जायला येतो.शेवट्चे काही किलो मीटर तर निव्वळ कस लागतो. तरीही, प्रचंड ईच्छाशक्ति दाखवून राईड पुर्ण केली त्या बद्दल अभिनंदन.
पुढिल सायकल अभियानासाठी शुभेच्छा.
(सायकल वाला) बाबा योगिराज.
10 Apr 2017 - 8:51 pm | कौशी
राईड पुर्ण केल्याबद्द्ल अभिनंदन.
11 Apr 2017 - 5:01 pm | टवाळ कार्टा
जब्राट
11 Apr 2017 - 5:45 pm | अप्पा जोगळेकर
छान. अभिनंदन.
पुढच्या खेपेला रहदारी टाळली जाईल असे रस्ते निवडा. आणि शक्यतो ओळखी पाळखीच्यांकडे राहू नका लॉजवर राहा सायकल स्वारी चालू असताना.
सकाळी लवकर निघायला बरे पडते असा अनुभव आहे.
14 Apr 2017 - 7:10 am | इरसाल कार्टं
हे मलाही पटलं.
11 Apr 2017 - 8:18 pm | शलभ
मस्तच लिहिलय कल्पेश..
याचसाठी तर केला होता अट्टाहास..:)
14 Apr 2017 - 7:06 am | इरसाल कार्टं
अगदी अगदी!
11 Apr 2017 - 8:26 pm | सुबोध खरे
--/\--
11 Apr 2017 - 11:40 pm | वेल्लाभट
खत्तरनाक्क्क !
12 Apr 2017 - 12:41 am | राघवेंद्र
एकदम जबरदस्त !!!
पुढील ट्रीपसाठी शुभेच्छा !!!
13 Apr 2017 - 3:12 am | इडली डोसा
छानच झाली तुमची पहिली सायकल सफर!!
13 Apr 2017 - 6:56 pm | ताल लय
काहीतरी उमगल होत. ...
फार उत्तम.....
13 Apr 2017 - 6:56 pm | ताल लय
काहीतरी उमगल होत. ...
फार उत्तम.....
14 Apr 2017 - 10:21 am | किसन शिंदे
ज ह ब ह रा ट !!
14 Apr 2017 - 6:23 pm | अभिजीत अवलिया
दोन्ही भाग आवडले ...
21 Apr 2017 - 7:23 pm | नि३सोलपुरकर
इरसाल भो ,
खतरनाक एकदम ...जबरदस्त
आणि पुढील ट्रीपसाठी खूप खूप शुभेच्छा .