या प्रवासाचा पूर्वार्ध म्हणून हा धागा वाचावा.
आता सायकलची शोधाशोध सुरु झाली, मिपावर सायकल संदर्भातला एक लेखही वाचनात आला. सुरुवातीला एखादी कमी किमतीची जुनी सायकल घेऊन आपण किती सातत्याने चालवतोय हे स्वत:च बघावं नंतर एखादी चांगली सायकल घ्यावी असे ठरवले. लगेच ओ एल एक्स आणि क्विकर सारखे पर्याय वापरून शोधाशोध केली पण त्यात सायकलचे व्यवस्थित डिटेल्स मिळत नव्हते. आणि मलाही या क्षेत्रातील काही विशेष माहिती नव्हती. आजूबाजूला कोणीही नव्हतं मार्गदर्शन करायला. मग मोदकशी संपर्क साधला. त्याने माझ्या गरजा आणि बजेट मॉन्ट्रा या ब्रॅण्डची सायकल घेण्याचे सुचवले. मग मॉन्ट्राच्या वेबसाईट वरून पर्याय शोधले पण तरीही एकूणच तंत्रज्ञानाबद्दल मी अनभिज्ञ. पुन्हा मोदकाला फोन करून मी निवडलेल्या सायकलचे गिअर्स, साईझ आणि इतर गोष्टी बरोबर आहेत का ते तपासायला सांगितले. पण त्याच्या मते गिअर्स अजून चांगल्या प्रतीचे हवे होते पण मग माझ्या बजेटचा प्रश्न येत होता. एक पर्याय म्हणून त्याने त्याच्याकडे असलेली मॉन्ट्रा रॉक १.१ ट्राय करण्याचे सुचवले. पुढल्याच आठवड्यात पुण्याला जाऊन सायकलची टेस्ट ड्राईव्ह करून आलो आणि हीच सायकल घ्यायचे पक्के केले.
आतापर्यंत बर्याच जणांना काये होते मी सायकल घेतोय ते. काही जण थट्टा तर काहीजण कौतुक म्हणून सारखे सायकल कधी येणार असले प्रश्न विचारू लागले. स्वत: माझ्या बायकोलाही हा सगळा आरम्भशूरपणा वाटत होता. पण हळू हळू चित्र बदलायला लागले… आम्ही प्रवास करत असताना जर कोणी सायकलस्वार दिसला कि ती विचारू लागे “आपली सायकल कधी येणार?” म्हणून. ‘तुमची' सायकल आता ‘आपली' झाली होती हाच आमचा विजय.
सायकल पुण्यहुन कशी आणायची हा प्रश्न होता. परिसरातील पीक अप ट्रक्स पुण्याच्या उद्योगांना लागणारा कच्चा माल इकडून नेत असतात हे माहित होते, येताना ते रिकामेच असतात म्हणून काही जणांशी तशी विचारणा करून झाली पण सकारात्मक प्रतिसाद काही मिळत नव्हते. सगळेच बघू बघु असे म्हणत होते. यांच्या भरवश्यावर राहणे परवडणार नाही हे कळून चुकले. दुसऱ्या पर्यायांचा विचार करत असताना मोदकने एक भन्नाट कल्पना मांडली, पुण्याहून घरी सायकल चालवत नेण्याची. जवळ जवळ २०० किमी सायकलिंग! तेही १२-१५ वर्षानंतर. सुरुवातीला मी हबकलोच पण तो बोलला कि जमेल म्हणून. हवं तर तो यायला तयार झालं माझ्या जोडीला. पण तो आधीच खूप व्यस्त असल्यामुळे मीच नको म्हटले आणि एकटाच सायकल चालवत यायला तयार झालो.
आता गृहपाठ सुरु केला. सगळ्यात आधी मनाची तयारी म्हणून, गूगल मॅप्स वरून सगळा रस्ता धुंडाळून झाला, नवा एक्सप्रेस वे वर दुचाकींना परवानगी नाही म्हणून पुन्हा जुन्या पुणे मुंबई महामार्गाचे नकाशे शोधले, रस्त्यांच्या उंचीचा आणि घाटाचा अंदाज यावा म्हणून रास्ता ३डी मध्ये बघण्यासाठी गूगल अर्थ वापरले. सायकल तसेच मोटारसायकल वरून पुणे-मुंबई प्रवास केलेल्या लोकांचे ब्लॉग वाचून काढले. सायकलचे गिअर्स कसे बदलावेत ते युट्युब वर बघून घेतले. रस्त्याचे फोटोसुद्धा गुगलले. शरीराचीही तयारी सुरु केली. रोजच्या धावण्याचा क्रम कटाक्षाने पाळला. एखादा दिवस दांडी झाली तरी दुसऱ्या दिवशी आळस ना करता धावणे चालू ठेवले. गावाजवळील थोड्या उंचीवर असलेल्या ताळ्यावर भराभर चालत जाणे ठरवले. माझ्या रोजच्या धावण्याच्या मार्गाच्या बाजूला असलेल्या टेकडीवर दर रविवारी चढणे चालू केले. आहारावर लक्ष दिले, भरपूर पाणी पिण्याची सवय जी आधीपासूनच होती, अजून वाढवली.या प्रवासात सवंगडीही वाढवले. आधी एकटा धावत होतो आता छोटा भाऊ लांज्यात आणि इतर तीन मित्र माझ्या जोडीला जसा वेळ मिळेल तसे येऊ लागले.
आता नियोजन केले. एका दिवसात सगळे अंतर पार करण्याचा विचार होता. शनिवार २५ मार्चला पुण्यात जाऊन जमेल तेवढ्या मिपाकरांना भेटायचे, २६ मार्चला असलेला ICC(इंडो सायकलिस्ट क्लब) चा बाईक अँड हाईक हा कार्यक्रम करायचा थोडा, अराम आणि पुणे दर्शन करून सोमवारी पहाटे निघायचं असा कार्यक्रम आखला. पण एक समस्या उद्भवली, मी ज्या मावस भावाकडे राहणार होतो तो चिंचवड(सायकल इथे होती माझी) पासून ३०-३५ किमी दूर राहतो त्यामुळे दुसऱ्या दिवशी मला ३० किमीचा फेरा वाढणार होता, तेही पुण्याच्या ट्राफिक मधून. मग मी आणि मोदकने पुन्हा नियोजन केले, त्यानुसार मी शनिवारी पुण्याला येणार, जमल्यास मिपाकरांबरोबर कट्टा टाकणार, रात्री मोदककडे थांबून सकाळी त्याच्याबरोबर ICC च्या इव्हेन्टला जाणार आणि इव्हेन्ट पूर्ण होताच तडक घराकडे निघणार. ICC चा इव्हेंट करून निघायला उशीर होणार होता म्हणून पुणे ते वाडा हे अंतर एकाच दिवसात पार ना करता मध्ये रसायनी येथे राहणार मित्र मोहन यांच्याकडे रात्रीचा मुक्काम करून सोमवारी सकाळी थेट घर गाठणार.
प्रवास दोन दिवसांत विभागल्यामुळे मला अराम करायला पुरेसा वेळ मिळणार होता. त्यामुळे रस्त्यात टेम्पोची मदत शक्यतो घायची नाही आणि सगळे अंतर सायकलिंग करतच पार करायचे असे मी मनोमन ठरवले.आणि मग स्वात:साठीच काही नियम बनवले.
दिवसाला मला ८० ते ९० किमी पार करायचेच होते त्यानुसार वेळेचे नियोजन केले.
पहिला नियम सरासरी वेगाचा, जिथे ग्रुपातले दिग्गज २५किमि प्रति तास चा आकडा पार करतात तिथे मी सरासरी वेग गृहीत ठेवला फक्त १० किमी प्रतितास.
जास्त तीव्र चढाव सायकलने चढायचे नाहीत, सरळ चालत पार करायचे. भरपूर अंतर कापायचे असल्यामुळे पायांवर जास्तीचा ताण नको.
घाटातले तीव्र उतारही सायकल नियंत्रित करण्यास कठीण वाटली तर पायीच पार करायचे.
भरपूर पाणी, फळांचे रस(पॅकेजड नाही, ताजे) प्यायचे.
दुपारी १ ते २ वाजता सक्तीचा आराम.
बॅगेत कमीत कमी कपडे आणि इतर सामान घ्यायचे.
या दोन दिवसांसाठी चहा कॉफी पूर्ण बंद.
आणि सगळ्यात महत्वाचे, खंडाळ्याचा घाट अंधार पडायच्या आधी पार करायचा.
या प्रवासासाठी हेल्मेट, सायकलिंग शॉर्ट्स, हेडलाईट्स आणि टेललाईट्स ओंलीने ऑर्डर केल्या. ऍमेझॉन च्या कृपेने या सगळ्या वस्तू वेळेवर आल्याही.
एकदाचा २५ मार्चचा दिवस उजाडला. सगळं सामान पॅक केलं आणि ऑफिसात गेलो. तिथून ११ वाजताच निघून तडक कल्याण गाठलं. भराभर बसेस मिळाल्याने १:०८ ची नागरकोईल एक्सप्रेस मिळाली आणि आपण ५ वाजेपर्यंत पुण्यात पोहोचू एवढं पक्क झालं. मोदक चिचंवडलाच भेटणार होता, त्याआधी मिपाकर गोगल्याला भेटायचे होते. दोघांशी संपर्कात होतोच. चिंचवडला एक्सप्रेस थांबणार नाही म्हणून लोणावळ्यात उतरून पुणे लोकल मध्ये चढलो. चिंचवडला उतरलो, थोड्याच वेळात गोगल्या आला घ्यायला. तिथून सरळ सीसीडी मध्ये. दोघेही मोदकची वाट बघत तिथेच बसलो. गप्पा रंगल्या. गोगल्या म्हणजे नुसता हास्याचे फवारे. आम्ही अगदी जुन्या मित्रासारखे बोलत बसलो. त्यात मोदक आल्यानंतर अजूनच भर पडली. एकमेकांचे लिखाण वाचत होतो पण प्रत्यक्ष सगळेच पहिल्यांदा भेटत होतो. थोड्या वेळाने तिघेही निघालो. आम्ही गोगल्याचा निरोप घेऊन ICC च्या इव्हेंटची तयारी चालू होती तिथे गेलो. मोदक आणि प्रशांत या इव्हेंटसाठी स्वयंसेवकांची होते. रात्री सिंहगड रोडला मोदकाने कट्टा प्लॅन केला होता तिथे गेलो. मी, मोदक, एसव्हीजी आणि --- मिळून छान गप्पा मारत जेवलो. गप्पांमध्ये रात्रीचे अकरा वाजले तरी कळलेच नाही. मी आणि मोदक घाईघाईत घरी येऊन १२ वाजता झोपलो. मोदक आणि प्रशांत स्वयंसेवक असल्याने रविवारच्या इव्हेंटसाठी त्यांना लवकर जायचे होते. साहजिकच मलाही मोदकांबरोबर लवकर निघायचे होते. प्रशांतकडे असलेली सायकल घेऊन आम्हाला निगडित भक्तीशक्ती पार्कजवळच्या स्टार्टींग पॉईंटला जायचे होते.
सकाळी चार ऐवजी टीनालाच जाग आली. पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. मग उठलो आणि मोदकाला जागं न करतच फ्रेश झालो. तरी माझ्या गडबडीमुळे तो जागा झालाच. चार वाजता तोही उठला. फ्रेश होऊन प्रशांतकडे जायला निघालो. मोदकची बुलेट अखं पुणं जागं करीत पहाटेच्या मोकळ्या रस्त्यांवर बुंगाट पळत होती. प्रशांतकडे गेलो, तो तयारच होता. माझी सायकल प्रशांतकडेच होती. अगदी तयार. आता तीच माझी सोबत करणार होती वाड्यापर्यंत. मी आणि प्रशांत करणे आणि मोदक सायकलने स्टार्टींग पॉईंट पर्यंत आलो. प्रशांत आणि मीही आज पहिल्यांदाच भेटत होतो.
गाडीमध्ये गप्पा मारत स्टार्टींग पॉईंटला पोचलो आणि मी तर आश्चर्यचकितच झालो. तीनशेच्या वर सायकलिस्टस तिथे हजार होते. सायकल्सच्या लाईट्स सगळीकडे लुकलुकत होत्या. प्रत्येकजण उत्साहात इव्हेन्ट सुरु होण्याची वाट पाहत होता. या गर्दीत चिमुकल्या सायकलिस्टस पासून वयस्कांचाही समावेश होता. आपल्या चिमुकल्यांना घेऊन आलेले पालक त्यांना सूचना देत होते. प्रशांत आणि मोदक स्वयंसेवकांच्या गर्दीत हरवून गेले होते. सगळं इव्हेंट अगदी पद्धतशीरपणे आयोजित केला गेला होता. कुठेही विस्कळीतपणा जाणवत नव्हता. बरोबर सहा वाजता फ्लॅग ऑफ झाले आणि सगळे सायकलस्वार निघाले. पुढचे ११ किमीचे अंतर सायकलने पार करायचे होते.
(फोटो: ICC )
हमसफर
दिशादर्शनासाठी चौकाचौकात स्वयंसेवक उभे होते. तेच इतर वाहनांनाही आवरत होते. रस्त्यालाही काहीजण बाइक्सवर सायकलस्वारांना सूचना देत होते. जिथे खराब रास्ता होता त्या आधी सायकल हळू चालवण्याची सूचना देत होते. ठिकठिकाणी पाण्याच्या बाटल्यांनी सज्ज हायड्रेशन पॉईंट्स ठेवले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या सायकलिस्टसची रॅली पूर्ण रस्ता व्यापात पुढे पुढे सरकत होती. कारने जाणारे पुणेकरही कौतुकाने सायकलस्वारांना प्रात्साहन देत होते. सगळं उत्साही वातावरण होतं. हळूहळू आमची रॅली एमसीए पुणे इंटरनॅशनल स्टेडियम पार करून घोरावडेश्वरच्या डोंगराच्या पायथ्याशी आली. तिथे पार्किंगसाठी व्यवस्था केली होती. तिथे सायकल व्यवस्थित पार्क करून चढाईला सुरुवात केली. मागच्या काही दिवसात चढाईचा सर्व आणि कोहोजची ट्रेक यामुळे चढताना काही विशेष थकवा जाणवत नव्हता. इतर सायकल स्वारांशी गप्पा मारत, मधेच फोटो काढत डोंगरावर चढलो. वरून दिसणारं सकाळचं दृश्य विलोभनीय होतं. डोंगराच्या एका बाजूला पसरलेलं पुणे शहर, एका बाजूने जाणारा पुणे-मुंबई एक्सप्रेसवे आणि दुसऱ्या बाजूने जाणारा जुना पुणे मुंबई रास्ता. माथ्यावर बसून ICC ने दिलेल्या गुडी बॅग मधली न्याहारी संपवली, थोडावेळ बसलो आणि आपल्याला पुढे जायचे आहे हे लक्ष्यात घेत उतरायला सुरुवात केली. पथ्याशी सगळ्यांसाठी नाश्त्याची सोय केलेली होती. सगळेच तुटून पडले होते. लगेच बक्षीस समारंभ सुरु झाला. एक एक करत सगळ्या सायकल स्वारांना पदक आणि प्रमाणपत्र वाटलं गेलं. तीनशेपेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतलेल्या या कार्यक्रमाचा हा बक्षीस समारंभ चांगला एक दीड तास चालला.
पार्किंग
पार्किंग (फोटो: ICC )
ट्रेक (फोटो: ICC )
चढताना
छोटे बायकर्स
ICC ची धमाल टीम.
ICC ची धमाल टीम.
मी माझं पदक आणि प्रमाणपत्रक घेतल्यावर निघायची तयारी सुरु केली. सायकल स्टेजजवळ आणून उभी करून प्रशांत आणि मोदक कामातून मोकळे होण्याची वाट बघत राहिलो. ग्रुपचा आणखी एक सदस्य विनायकही भेटला. ते मोकळे झाल्यावर लगेच निरोप घ्यायला लागलो. प्रशांतच्या लक्षात आले कि माझ्या सायकलची चेन निसटली होती. अश्यावेळी ती कशी लावायची त्याचे प्रात्यक्षिकही त्यांनी माझ्याकडून लगेच करवून घेतले. ICC ने ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्यांपैकी तीन लिटर पाणी बरोबर घेतलं कारण रस्त्यात कुठे पाणी मिळेल याची मला काहीच कल्पना नव्हती, मोदक आणि प्रशांतला निरोप दिला आणि निघालो.
ते दोघेही “थोडा पुढे गेला कि टेम्पो पकड रे” अशी दटावणी करत होते.
अर्थात, मी त्याचं ऐकणार नव्हतो...
निघाल्याबरोबर थेट जुन्या पुणे मुंबई महामार्गाला लागायचे होते, रस्त्यात तळेगावहून आलेले काही सायकलिस्टस भेटले. सकाळी एकमेकांना प्रोत्साहन देताना त्यांच्याशी ओळख झाली होती आणि मी वाड्याला सायकल घेऊन जाणारे हे त्यांना कळले होते. तळेगाव जुन्या हायवेला लागूनच असल्यामुळे त्यांनी मला त्यांच्याच मागे यायला सांगितले. त्यांनी कुठूनतरी शॉर्टकट घेतला त्यामुळे अंतर आणि वेळ थोडाफार वाचला. थोडावेळ त्यांना फॉलो केल्यानंतर मी मात्र एका उसाचा रस वाल्याजवळ थांबलो आणि उसाचा रस पिऊन थोडा थांबलो. पुण्याहून निघाल्याचे घरी कळवून निघालो. अकरा वाजत आले होते आणि उन्हं चढायला सुरुवात झाली होती. हळूहळू अंतर कापत होतो, छोटे छोटे चढ अगदी खालच्या गिअरवर शांतपणे चढत होतो. असे करता करता तळेगाव आले . तिथे बघतो तर ते सगळे सायकलिस्ट माझीवात बघत थांबले होते. मी तिथे पोचताच पाणी/ज्यूस साठी विचारणा झाली, काही मदत हवीय का तेही विचारले त्यांनी आणि पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देऊन पुढे निघाले. आता माझ्याही खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली होती. जुना हायवे माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी रस्ता होता आमच्या सायकल सायकल ग्रुपमधल्या पुणेरी सदस्यांच्या संवादात येणारी काही गावं रस्त्यात भेटत होती, कामशेत, पानशेत असल्या नावांच्या पाट्या तेवढ्या ओळखीच्या वाटत होत्या. चढणीला मेहनत आणि उताराला पायांना आराम असे करत कामशेत पर्यंत आलो. दुपारचा एक वाजत आला होता आता उन्हामुळे थकायला होत होतं. कसातरी कामशेत पार केलं आणि समोर मोठा वळण घेत जाणारा चढ दिसला. एवढ्या उन्हात तो चढ पायी पार करायचीही हिम्मत होईना. तसेच आता अराम करणे गरजेचे वाटू लागले. सुदैवाने चढाच्या आधीच एक जय मल्हार नावाचा ढाबा दिसला. तिचेच सायकल लावली आणि आत गेलो. एवढ्या उन्हात जेवण्याची इच्छा उरली नव्हती म्हणून कुठले ज्यूस मिळेल का म्हणून विचारले मालकांना. नाही म्हणून उत्तर आले. पॅकेज्ड ज्यूस प्यायचे नव्हते ते मीच नाकारले. 'थोडा वेळ बसू का?' असे विचारताच मालक 'तासभर बसलात तरी हरकत नाही' म्हणाले. बाहेरच असलेल्या एका टेबलासमोर बसलो. सावली मिळाल्यामुले खूप शांत वाटले, फोनही चार्ज करायला लावला. थोडं पाणी पिऊन घेतलं. आता पुढच्या अर्ध्या दिवसाच्या कसरतीसाठी पोटात काहीतरी ढकलणं गरजेचं होतं पण 'सॉलिड' असा खायची इच्छा होतं नव्हती. मग बॅगेतला एनर्जी बार फस्त केला, कालच्या भेटीच्या वेळी गोगल्याने दिलेलं भलं मोठं डेअरी मिल्क आता उन्हामुळं 'लिक्विड' फॉर्म मध्ये आलं होतं. लहानपणी खाल्लेल्या कॅडबरी चॉकी सारखं तेही 'पिऊन' टाकलं, प्रशांतने दिलेल्या चॉकलेटचीही तीच अवस्था होती, त्याचाही शेवट असाच केला. भरपूर चॉकलेट पोटात गेल्यामुळे आता काही खाण्याची गरज उरली नव्हती. टेबलावर डोकं टेकवलं आणि मस्त अर्धातास झोप काढली. आता फोन आणि मीही बऱ्यापैकी चार्ज झालो होतो. इतका कि समोरचा चढ चालत न जाता सायकलने पार करायचे ठरवले. निघण्यापूर्वी बॅगेत असलेले मोदकने दिलेले अमूल छासचे पॅकेट रिकामे केले आणि मालकांना धन्यवाद देत निघालो. लोवेस्ट गियर वर चढ संपवला आणि लोणावळ्याच्या दिशेने बुंगाट निघालो. उजवीकडे कार्ल्याच्या डोंगर आणि डावीकडे लोहगडला सलाम ठोकत लोणावळ्याच्या जवळ आलो. एक उसाच्या रसाचा गाडा दिसला तिथे थांबत थोडा आराम आणि उसच्या रसाचा आस्वाद घेत थोडा रेंगाळलो. आता लोणावळा पार केलं कि पोचलोच कोकणात, मग काय आपलेच रस्ते(अर्थात 'आपल्या' कोकणाचे खरे रंग उद्या दिसणार होते). लोणावळ्याजवळ पोचल्याचे सगळ्यांना व्हाट्सअप वर कळवले. मोदक आणि प्रशांत कावत होते थोडे पण मी व्यवस्थित आहे आणि काहीही अडचण आल्यास टेम्पो करेन अशी ग्वाही वेळोवेळी त्यांना देत होतो. सगळेजण प्रोत्साहन देत होते. आता लोणावळा तीन चार किमी राहिले होते. रस्ता सरसपाट होता पण विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाऱ्याने थकवले. आतापर्यंत येणाऱ्या चढावांचा किमान एक फायदा होता कि तो पार झाल्यावर उतार मिळायचा आणि पायांना अराम मिळायचा. पण इथे तर फक्त कष्ट पडत होते पायांना आणि उतार मिळणे केवळ अशक्यच होते. एखादा किमी सायकल चालवली आणि समोर लोणावळा शहर दिसायला लागल्यावर उतरलो रागारागात सायकलवरून आणि निघालो चालत चालत. लोणावळ्यात ए टी एम शोधात फिरलो पण एकही ए तो एम मध्ये पैसे उपलब्ध नव्हते. जवळची रक्कम दोन दिवसात संपल्यात जमा होती आणि मला अजून खोपोली पार करून रसायनीला जायचे होते. रस्त्यात लागणाऱ्या पाणी आणि इतर गोष्टींसाठी जवळचे पैसे पुरतील कि नाही याची खात्री नव्हती. लोणावळ्यातील चार पाच ए टी एम पालथे घालूनही हाती निराशाच पडली. कार्ड चालेल का म्हणत मगनलालचे तीन चार आउटलेट्स फिरून झाले, 'कार्ड चालेल' म्हणणाऱ्या एका आउटलेट मधीं उद्याच्या प्रवासासाठी स्वदेशी एनर्जी बार अर्थात चिक्की(आयड्या डॉ. श्रीहास यांचेकडून ढापणेत आलेली आहे) आणि मित्र मोहनच्या चिमुकलीसाठी खाऊ घेऊन पुन्हा निघालो. शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे पर्यटकांनी बहरलेलं लोणावळा बरंचसं पायीच पार केलं. लोणावळ्याला मागे टाकत पुन्हा जुना पुणे मुबई हायवे पकडला.
कामशेत पार
लोणावळ्याआधीच्या वाऱ्याने आडवे व्हायला लावले.
लोणावळा पार होतंय...
खंडाळ्याकडे जातानाचा एक तलाव.
नव्या एक्सप्रेसवे मूळे ही दृश्ये मी अजून बघितली नव्हती.
लोणावळा राहिलं मागे.
खंडाळ्यापर्यंत थोडा चढ लागला तो पुन्हा पायीच पार केला. चुकून नव्या एक्सप्रेसवेल लागू नये म्हणून वाटेत भेटेल त्याला व्यवस्थित विचारात खोपोलीच्या रस्त्याला लागलो एकदाचा. आता पुढचे १०-१२ किमी फक्त उतार होता. सायकल सुसाट पळवाट निघालो. हा अनुभव अवर्णनीय होता. उत्साही ओसरत असल्यामुळे मस्त गारवा जाणवत होता. दिवसभराच्या दगदगीचं हे बक्षिसाचं म्हणायचं. वाटेत जिथे सुरक्षित वाटलं तिचे थांबून फोटो काढले आणि सूर्य मावळायच्या आत घाट संपवून खोपोलीत पोचलो. मोहनला फोन करून मी खोपोलीत पोचल्याचे कळवले, सायकल सायकल आणि घरच्या ग्रुपवरही कळवले आणि मोहनाकडून पुढचे दिशानिर्देश घेत खालापूरच्या दिशेने निघालो. तिथून चौक मार्गे मला त्याच्याकडे पोचायचे होते. खोपोलीच्या अरुंद रस्त्यातून आणि गच्चं रहदारीतून निघत निघत नाकी नऊ आले, तीन चार किमी पार करता करता चार पाच वेळा उतरून चालावे लागले. कशीतरी खोपोली पार केली आणि रोडच्या शेजारी थांबलो.
घाटातील फोटो:
आता अंधार पडायलासुरुवात झाली होती, एका झाडाच्या पारावर बसलो आणि बॅगेतली शेवटची पाण्याची बाटली काढली, अर्धी संपवली लगेच. हेडलाईट्स आणि टेललाईट्स लावल्या आणि पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालो. व्हाट्सएपच्या दोन्ही ग्रुप आणि फेसबुकवर अपडेट केलं, 'राहिलेले अंतर २०किमि आणि राहिलेले पाणी, २०० मिली' मग मी माझ्या मुक्कामी पोचणार होतो.
रात्रीच्या प्रवासाची तयारी.
आता उन्हं सारली होती, भराभर पेडल हाणत नीघालो. पण परिस्थिती बदलली होती, नाही म्हटले तरी शरीर थकले होतेच, अंधारामुळे ते जास्त जाणवत होते. हवामानात प्रचंड बदल झाले होते. पुण्याकडच्या कोरड्या हवामानातून मी कोकणच्या आर्द्रतेने भरलेल्या हवामानात आलो होतो. रात्र असली तरीही बदल जाणवत होताच. घामाचे प्रमाण वाढले, घश्याला कोरड पडायला लागली, तहान झपाट्याने वाढायला लागली आणि माझे थांबे वाढायला लागले. उरलेले पाणीही संपले पण अंतर संपेना. पुन्हा एकदा एका ढाब्यावर थांबून थोडा अराम केला, थंडगार पाण्याची बाटली घेतली आणि निघालो. आता एक एक किमी अंतर मोजत चाललो होतो. कसेतरी चौक पर्यंत पोचलो, आता शेवटचे तीन चार किमी राहिले. मित्राला वर्दी दिली. तो निघाला आणि मी मजल दरमजल करत, येणाऱ्या प्रत्येक चढावाला सायकलवरून उतरून उताराला पुन्हा स्वार होत ऊर्जा आणि धीरही वाचवण्याचा प्रयत्न करत दांडफाट्यापर्यंत पोचलो आणि हायवे सोडून आत गुसलो. थकलो इतका होतो कि चौक नंतर येणार प्रत्येक फाटा मला दांडफाटा असल्याचा भास होत होता. हरिणांना मृगजळ दिसावे तसा. दंडफाट्यापासून चाम्भार्ली या मित्राच्या गावापर्यंत पुन्हा चढ उताराची मालिका सुरु झाली आणि त्याला खराब रस्त्याची साथ मिळाली. अगदी शेवटच्या क्षणांना रास्ता अंत पाहत होता पण आता थोडेच अंतर राहिलेय म्हणत स्वात:लाच धीर देत कसातरी चाम्भार्ली गावात पोचलो आणि मोहन भेटला. आता जीवात जीव आला. त्याच्या बाईकच्या मागे मागे जात त्याच्या घरापर्यंत पोचलो. सायकल घेऊनच त्याच्या घरात प्रवेश केला आणि मी येणारे हे दुपारी कळल्यापासून वाट बघणाऱ्या च्या चिमुकलीने कल्पेश काका आले चा गजर सुरु केला. दिवसभराच्या कष्टांपासून पार दूरवर नेऊन ठेवले एका क्षणात त्या छकुलीने मला. समाधानाचं दुसरं नाव ते काय असावं याहून वेगळं..?
क्रमश:
प्रतिक्रिया
5 Apr 2017 - 5:00 pm | किसन शिंदे
एवढ्या फोटोंवरून तुम्ही सायकल चालवायला गेलेले कि फोटो काढायला असा प्रश्न पडतोय. =))
बाकी एवढे मोठे अंतर सायकल चालवून पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन !!
5 Apr 2017 - 6:24 pm | इरसाल कार्टं
खरं बोललात, पण मी सायकलवर असल्याने थांबणे जास्त सोपे होते. मोटारसायकलवर असतो तर फोटोंसाठी नसतो थांबलो.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या नितांत सुंदर घाटाचे प्रवासवर्णन फोटो न काढता लिहिणे म्हणजे अरसिकतेचा कळस म्हणेन मी. ; )
5 Apr 2017 - 9:37 pm | किसन शिंदे
_/\_
खरेच रसिक आहात.
रच्याकने अगदी पहिल्याच प्रयत्नात एवढे मोठे अंतर पार केल्याबद्दल प्रचंड कौतुक आहे. प्रयत्न असेच सुरू राहुद्या.
5 Apr 2017 - 5:41 pm | अप्पा जोगळेकर
एक्स्प्रेस वे स्किप कसा केला. मधल्या कॉमन पॅचने जावेच लागते ना.
5 Apr 2017 - 6:15 pm | इरसाल कार्टं
एक छोटा रास्ता आहे, खंडाळ्याहून बाहेर पडल्यावर जिथे जुना आणि नवा हायवे जुळतात तिथेच डाव्या बाजूला एक रस्ता माती टाकून बंद केलाय, तेवढी माती पार केली कि एक्स्प्रेस वे स्किप होतो.
5 Apr 2017 - 5:45 pm | देशपांडेमामा
पहिल्याच प्रयत्नात एवढे अन्तर पार केलेत !! जबरदस्त !
देश
5 Apr 2017 - 5:54 pm | आदूबाळ
सॉलिड आहे बॉस! पुणे ते दांडफाटा एवढं अंतर सायकलिंगची सवय नसताना एकट्यानेच पार करणं हे भारी काम आहे.
पुभाप्र आणि तुमच्या सायकलिंगला शुभेच्छा!
5 Apr 2017 - 7:26 pm | मोदक
झक्कास रे..!
5 Apr 2017 - 8:14 pm | शलभ
वाट बघत होतो याची..मस्त लिहिलय..
5 Apr 2017 - 8:53 pm | कंजूस
नवी सायकल घेऊन लगेच मोहिम!!
सायकलवाल्यांसाठी स्वस्त ढाबे ( राहाण्यासाठी ) झालेच पाहिजेत.
5 Apr 2017 - 9:08 pm | एस
अभिनंदन! भारी झाली राईड. पुराशु.
5 Apr 2017 - 10:31 pm | अमित खोजे
अरे यार. मिपाकर एवढा मोठा प्रकल्प चालू करून पुढे नेऊ शकतात याची मला कल्पनाच नव्हती. या सायकल सायकल ग्रुप मध्ये मला पण सामील करून घ्या ना. इथे टोरांटोमध्ये बँकेची ४ जून ला सायकल मॅरेथॉन आहे. त्यात भाग घ्यायचा विचार करतो आहे. २५-५५-७५ असे तीन ग्रुप आहेत. ५५ साठी एकटाच तयारी करतोय. त्यातून आपले मिपाकर हे असे लेख पाडतात त्याने उत्साह तर वाढतो पण तयारी पण कशी करावी काळात नाही. २ महिने आहेत. हा लेख वाचून मग तर ७५ करायला हि जमेल असे वाटते. परंतु सायकल सायकल मध्ये नक्की टाका रे. कोणाला व्यनि करू माझा नंबर?
5 Apr 2017 - 11:19 pm | मोदक
प्रशांत, डॉ श्रीहास किंवा मोदक.
7 Apr 2017 - 7:27 pm | अमित खोजे
व्यनि केलेला आहे.
6 Apr 2017 - 6:11 am | कौशी
सायकल राईड वर्णन आणि फोटो अप्रतिम..पु.भा.प्र.
6 Apr 2017 - 8:39 am | कंजूस
साइकलला चेनचे गिअर्स असतात - मोटारसारखे का नसतात?
6 Apr 2017 - 11:30 am | इडली डोसा
पहिल्याच प्रयत्नात एवढा मोठा पल्ला गाठण्याचे ध्येय ठरवुन ते पुर्ण केल्याबद्दल अभिनंदन!
6 Apr 2017 - 11:50 am | सूड
हा भागही रमणीय. पुभाप्र!!
6 Apr 2017 - 12:43 pm | एकनाथ जाधव
फोटो का दिसत नाहीत?
6 Apr 2017 - 12:47 pm | इरसाल कार्टं
सगळे फोटो दिसतायेत.
6 Apr 2017 - 2:32 pm | नितीन पाठक
अभिनंदन ............
पहिल्याच प्रयत्नात खूप मोठी राईड केल्या बद्दल मनापासून अभिनंदन ....
फोटो आणि प्रवास वर्णन एकदम मस्त
पुढील भाग लवकर येउ द्या ..............
7 Apr 2017 - 9:33 am | दिपस्वराज
झक्कास ....! मजा आली .सायकलस्वारीचे प्रवासवर्णन एवढं छान लिहिलंय कि जणू आम्हीही प्रवासात बरोबर आहोत असं वाटलं.
मनापासून अभिनंदन .... आणि शुभेच्छा !
मोदकरॊवांचे स्पेशल अभिनंदन ......... सगळ्यांना मोटिवेट करण्याची , मदत करण्याची आणि ' जेथे कमी तेथे आम्ही ' या वृत्तीला सलाम .....
7 Apr 2017 - 9:59 am | स्थितप्रज्ञ
अत्यंत खडतर राईड अल्पावधीतच पूर्ण केल्याबद्दल जोरदार अभिनंदन!!!
एक सजेशन असे की हायवे वर (आणि शक्यतो शहरात सुद्धा) दिवसाही टेल लाईट चालूच ठेवावा. कारण बाकीच्या गाड्यांच्या तुलनेत आपला वेग नगण्य असतो आणि लांबून एखादा पॉवरफुल लाईट ब्लिंक होत असेल तर तो अधिक लक्ष वेधून घेतो (शिवाय आपल्या वेगाचा अंदाज मागच्या गाडीला लौकर येतो) जेणेकरून आपल्या सेफ्टीकरिता योग्य ती काळजी घ्यायला मागील गाड्यांना भरपूर वेळ मिळतो.
दुसरी गोष्ट जी शहरात मी observe केली ती अशी की जर आपण (म्हणजे सायकलिस्ट) एखाद्या बिल्डिंग किंवा झाडाच्या सावलीतून जात असू, समोरून सूर्य असेल आणि मागच्या गाडीचालकाने डार्क गॉगल लावला असेल तर बरेच जवळ येईपर्यंत आपण त्याला दिसत नाही पण जर पॉवरफुल टेललाईट ब्लिंक होत असेल तर लांबूनच अंदाज येतो (हे मी सकाळी कोरेगाव पार्कात बाइकवर जाताना अनुभवले आहे. लांबून मला एकच सायकलिस्ट आहे असे वाटत होते कारण एकानेच लाईट लावला होता. अगदी १०० फुटावर गेल्यावर दुसरा सायकलिस्ट त्याला parallel चाललाय हे दिसले).
सो, काळजी घ्या आणि बिनधास्त सायकल हाकत राहा....
8 Apr 2017 - 10:24 am | इरसाल कार्टं
अत्यंत मोलाचा सल्ला दिलात.
7 Apr 2017 - 10:09 am | मोदक
>>>रात्री सिंहगड रोडला मोदकाने कट्टा प्लॅन केला होता तिथे गेलो. मी, मोदक, एसव्हीजी आणि --- मिळून छान गप्पा मारत जेवलो.
यात तिसरा SYG आणि चौथा मृत्युंजय होता.
8 Apr 2017 - 10:54 am | इरसाल कार्टं
धन्स मोदकराव.
7 Apr 2017 - 10:39 am | पैसा
खूप छान लिहिलय. फोटोही अप्रतिम! आता चांगला आत्मविश्वास आला असेल!
7 Apr 2017 - 11:59 am | प्रीत-मोहर
भारी!!!
7 Apr 2017 - 5:16 pm | झेन
पहील्या प्रयत्नात एवढं धाडस मस्तच.
लिखाण सुध्दा सुरेख.
11 Apr 2017 - 11:33 am | उत्तरा
अभिनंदन...
पहिल्याच प्रयत्नात एवढे अंतर.... तुमच्या जिद्दीचे कौतुक... फारच मस्त वर्णन लिहीले आहे.
11 Apr 2017 - 12:27 pm | पिंगू
लय भारी.. आता मला माझी सायकल पण अशीच आणायला हवी..
12 Apr 2017 - 6:23 pm | भ ट क्या खे ड वा ला
कौतुकास्पद राइड आहे तुमची. "स्थितप्रज्ञ" यांनी केलेली सुचना अगदी योग्यआहे. मी तर अस सुचवेन कि, रिफ्लेक्टर जाकीट किंवा पाठपिशवी वर लावायला एक हाय व्हिजिबल पट्टा मिळतो तो जरूर वापरा. मी स्वत: कायम वापरतो. रहदारीत आपण जेव्हढे उठून दिसू तेव्हढे जास्त सुरक्षित, आपल्याकडील रहदारीत सायकलवाला हा मध्येच कडमडणारा प्राणी समजला जातो. तेव्हा खबरदारी घेणे इष्ट. सायकल सायकल गटात मलाही सहभागी व्हायला आवडेल.
14 Apr 2017 - 7:15 am | इरसाल कार्टं
सायकल सायकल गटात मलाही सहभागी व्हायला आवडेल.
मोदक, सरपंच अथवा डॉ. श्री यांना व्यनि करा.
27 Apr 2017 - 8:29 am | विनोद वाघमारे
जोरदार अभिनन्दन !!!
27 Apr 2017 - 1:57 pm | अजया
जबरदस्त!
चांभार्लीतच मी राहते! पुढच्या वेळी फ्लेक्सच लावून बोलवु तुम्हाला!
27 Apr 2017 - 3:30 pm | इरसाल कार्टं
धन्यवाद बरं का.
23 Jun 2017 - 3:43 pm | वन्दना सपकाल
खुप छान राईड.