आमची बागलाण मोहीम
१६७१ मध्ये शिवाजी महाराजांनी बागलाण मोहीम काढली आणि साल्हेर किल्ला जिंकून घेतला. ही बातमी दिल्लीच्या बादशहाला समजताच त्यानी इखलास खान आणि बहलोल खानाला प्रचंड मोठे सैन्य घेऊन रवाना केले. ही गुप्त खबर शिवाजी महाराजांना मिळताच त्यांनी मोरोपंतांना कोकणातून वार घाटीतून निघण्यासाठी व प्रतापरावांना थेट बहलोल खानाला जाऊन भिडण्याविषयी गुप्त खलिते धाडले. आणि धुळीच्या प्रचंड लोटांनी सूर्य झाकोळून जाईल अशी घनघोर लढाई झाली. मराठ्यांनी खानाच्या सैन्याचा पराभव करुन भरपूर लूट मिळवली आणि शिवाजी महाराजांची पकड बागलाणावर पक्की झाली. या बागलाणातील किल्ल्यांना भेट देण्यासाठी डिसेंबर जानेवारी हे महिने उत्तम कारण किल्ले सगळे उंच आणि कुठेही सावली नाही. या मोहीमेसाठी रात्री ठीक साडेदहाला ठाण्यातून निघालो. प्रवास मोठा होता पण चौघेही जण चालक असल्यामुळे चिंता नव्हती. कसाऱ्याला बाबा दा ढाब्यावर रात्रीचा पहिला चहा घेतला आणि तरतरीत होऊन पुढे निघालो. नाशिकचा लांबच लांब उड्डाण पूल पार करुन पुढे गेल्यावर वणी-कळवण मार्गे जाणारा जरा जवळचा रस्ता होता पण तो कसा असेल हे माहीत नसल्यामुळे आम्ही हायवेवरुनच प्रवास सुरु ठेवला. पिंपळगाव मागे टाकल्यावर चांदवडच्या आधी सावधपणे सोग्रास फाट्याला गाडी वळली आणि मग चालक बदल. रस्त्याच्या उजवीकडे एका ढाब्यावर जरा उजेड दिसला. गाववाले ब्लँकेटमध्ये गुरफटून बसले होते. इथे चहा, बिस्किट, सफरचंद खाऊन कुडकुडत गाडीत बसलो. नंतर मात्र जीपीएस् च्या मदतीने मुल्हेरचे थेट उद्धव महाराज मंदिर गाठले.
१. उद्धव महाराज मंदिर
पहाटेचे चार वाजत आले होते. रामभाऊकाका घोंगडी घेऊन देवडीवर आडवारले होते. पण आमची चाहूल लागताच लगेच उठले. तास दीड तास आराम करुन आणि उद्धव महाराजांचे दर्शन घेऊन साडेसातला पंङितांच्या देवघरी पोहोचलो. गरमागरम उपमा आणि वाफाळत्या चहाचे घोट घेत परिसराचे अवलोकन सुरु होते. गप्पांच्या ओघात समजले की पंडितांचे हे राहते घर ४०० वर्ष जुने होते. या घरात नांदत असलेली ही तेरावी पिढी. बाजूचा वाडा ५०० वर्षे जुना होता. तिथे पूर्वी उद्धव महाराजांचा निवास होता. पंडित कुटुंबीय अत्यंत अगत्यशील माणसं. घरामध्ये मोठा हॉल, भजन-कीर्तन, उत्सव असे अनेक कार्यक्रम होतात. आमचा वाटाड्या राजू आल्यावर मात्र आम्ही झटपट निघालो.
२. खुणेच्या आंब्याकडून ट्रेकला सुरुवात
आज प्रथम हरगड आणि नंतर मुल्हेर आणि मोरा या किल्ल्यांना भेट देण्याचा मानस होता. खुणेच्या आंब्याखाली गाडी लावून मार्गस्थ झालो. वाटेत हनुमान मंदिर, वनखात्याच्या छत्र्या आणि धनगरांची खोपटी लागली. या छत्र्यांखाली आसरा घेऊन धनगरांच्या सोबतीनेही गडावर जाता येते. उजवीकडे ४४५० फूट उंच हरगड दिसत होता. इथे थोडी वाट वाकडी केल्यास एक तोफ बघायला मिळते. सुरुवातीपासूनच बऱ्यापैकी वेग ठेवल्याने लवकरच तळ्याकाठी मंदिरात येऊन पोहोचलो.
३. मग्न तळ्याकाठी
शंकर आणि गणपती या पिता-पुत्रांचे इथे प्राचीन मंदिर आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. तीन बाजूंनी कमानी व सुरेख कोरीव काम आहे. ही जागाही मुक्काम करण्यासाठी उत्तम वाटली.
४. मंदिराच्या सभामंडपातील कमानी
या मंदिराकडून उजवीकडची वाट हरगडाकडे जाते. तिथे थोडी झाडी आहे, या झाडीत कधी वाट हरवू शकते. थोडे चढून वर गेल्यावर एक पडझड झालेला दरवाजा व तटबंदीचे अवशेष दिसले.
५. हरगडाचे प्रवेशद्वार
६. तटबंदीचे अवशेष
पुढे रामेश्वर मंदिर लागले.
७.रामेश्वर मंदिर
रामेश्वराचे दर्शन घेऊन किल्ल्याच्या टोकावर ठेवलेली भली मोठी बांगडी तोफ पाहिली.
८. बांगडी तोफ
मंदिराबाहेर उभ्या ठाकलेल्या हनुमानाभोवती मांडून ठेवलेले तोफगोळे परतून आल्यावर पाहिले.
९. तोफगोळ्यांनी लढायला सुसज्ज हनुमान
किल्ल्याच्या टोकावरुन देखणा परिसर बघण्यात अर्धी घटका घालवून पुन्हा मंदिराकडे आलो व सावलीत बसून जेवण केले. मग फलाहार व मुखशुद्धी घेऊन लगेच खिंडीकडे उतरु लागलो.
१०. हरगडावरुन दिसणारे दश्य
एक किल्ला बघून जेवण झालेले असल्यामुळे डोक्यावर ऊन तापले होते तरी अंगात उत्साह संचारला होता. खिंड पार करुन मुल्हेरची ( उंची ४५०० फूट ) वाट चढू लागलो.
११. मुल्हेरकडे उत्साहात वाटचाल
चौघेही जण आपापल्या तब्येतीत मागे-पुढे चालत होतो. दूरवर दिसणारी मुल्हेरच्या बांधून काढलेल्या दरवाजांची व तटबंदीची वैशिष्ट्यपूर्ण रचना लक्ष वेधून घेत होती. आपल्या पूर्वजांनी केवढे हे प्रचंड काम केले आहे! हा वारसा मनःपूर्वक जपला पाहिजे. दरवाजांकडे न जाता प्रथम बागलाणच्या लढाईत कामी आलेल्या सूर्याजी काकडे यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले.
१२. सूर्याजी काकडे यांचे स्मारक
संरक्षक भिंतींच्यामध्ये दरवाजा व पायऱ्या असे क्रमाक्रमाने लागत गेले.
१३.मुल्हेरचा दरवाजा
कातळात खोदून काढलेल्या गुहा व पाण्याची टाकी लागली.
१४. मुल्हेरवरील पाण्याची टाकी
वर गेल्यावर दूरवर दिसणाऱ्या डोंगररांगा व किल्ले पठारावरुन डोळ्यांत साठवून घेतल्या.
१५. मुल्हेर गाडावरुन दिसणारे दृश्य
डेरेदार वृक्षाला बांधलेला पार आणि त्यावर स्थापन केलेली भैरवनाथाची उग्र मूर्ती व खाली फरसबंद जमीन होती.
१६. ॐ नमो भैरवनाथाय नम
भैरवनाथाला नमन करुन मोऱ्याकडे कूच केले. मुल्हेर आणि मोऱ्याच्या खिंडीतली ही वाट बांधून काढलेली आहे. परंतु घरंगळत आलेल्या धोंड्यांनी काही ठिकाणी वाट बंद केली आहे. त्यामुळे बरीच कसरत करत जावे लागते.
१६. मुल्हेर व मोऱ्यामधील खिंड
खिंड ओलांडल्यावर मोऱ्याच्या ( उंची ४२०० फूट ) कातळात खोदून काढलेल्या पायऱ्या व दरवाजा लागला. हे बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.
१७. मोऱ्याच्या पायऱ्या
किल्ल्याचा विस्तार बेताचा असून वर पाण्याचे एक टाके आहे.सूर्यास्ताच्या वेळी विस्तीर्ण प्रदेशात दिसणाऱ्या डोंगररांगा नजर खिळवून ठेवत होत्या. पण परत फिरणे भाग होते. आता खिंड ओलांडून पटापट उतरायला सुरुवात केली. वाटेत मिळालेले मोती टाक्याचे पाणी फार गोड होते. सोमेश्वर मंदिराकडे जरा वाट वाकडी करुन गेलो परंतु तेथे खोल पायऱ्या उतरुन मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर अतिशय शांत वाटले. त्यानंतर गायत्रीमंत्राच्या धीर गंभीर सामूहिक उच्चारांनी दिवसभराचा सगळा थकवा निघून गेला. मंदिरातून परत फिरेपर्यंत वाटेवर अंधार पसरला. पुढचे मार्गक्रमण विजेरीच्या प्रकाशात वाटेचा अंदाज घेत सर्वांनी एकत्र राहून काळजीपूर्वक केले. वाटेतच पंडितांचा फोन आला की किल्ल्यावरुन सरळ घरीच या, म्हणजे गरमा-गरम जेवणाबरोबर मनसोक्त गप्पाही मारता येतील. पंडितांकडे गावातील कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव, नदीत लाखो दिवे सोडून साजरी केली जाणारी दिव्याची अमावास्या, तुळशीचे लग्न, एकमेकांच्या अंगावर फटाके टाकून केली जाणारी मजामस्ती यांबद्दल तसेच बागलाणामध्ये अधिकांश काळ असणाऱ्या हिंदू राजांच्या वर्चस्वाबद्दल भरभरुन ऐकायला मिळाले. उत्सवकाळात पुन्हा भेट देण्याचा प्रेमळ आग्रहही झाला.भोजनानंतर तृप्त होऊन उद्धवमहाराज मंदिरात पोहोचलो व शांत झोपी गेलो.
२६ जानेवारीला सकाळी ठीक साडेसात वाजता राजू गाइड वाड्यावर आला. तोपर्यत न्याहरी आणि चहा घेऊन आम्ही निघण्याच्या तयारीतच होतो. पंडित कुटुंबीयांचा निरोप घेऊन त्वरेने साल्हेरकडे निघालो.
१८. साल्हेरवाडीकडून साल्हेर किल्ल्याच्या दिशेनी आगेकूच
साल्हेर किल्ल्याला जायला तीन वाटा आहेत. साल्हेरवाडीतून साल्हेरला जाऊन खिंडीत उतरुन सालोट्याला जावे व मग सालोट्याकडून खिंडीत उतरुन वाघांब्याला जावे हे सोयीचे पडते. त्याचप्रमाणे मागधरवरुन पण खिंडीत नेणारी नवी वाट आहे. ही वाटही तशी सोयीची असावी. पण गाडीच्या आम्हा चारही चक्रधरांना दोन्ही किल्ल्यांवर जायचे होते. वाघांब्यामध्ये आमचे झेंडावंदन झाले. पण जीप अडकली होती.म्हणून जीपची वाट बघत थांबण्यापेक्षा आम्ही गाडी थेट साल्हेरवाडीच्या दिशेनी पळवली. तिथून मग साल्हेर किल्ल्याला थेट भिडलो. धारवासिनी साल्हेरवासिनीचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊन उत्साहानी चढाई सुरु केली.
१९. धारवासिनी साल्हेरवासिनी मंदिराचा रम्य परिसर
साल्हेरची उंची ५२१८ फूट; महाराष्ट्रामध्ये कळसूबाईनंतर उंचीमध्ये दुसरा क्रमांक. सुरुवातीचा प्रशस्त वाटेचा टप्पा संपून थोडी अरुंद वाट खडी चढू लागली. मग कातळात खोदून काढलेल्या पायऱ्या आणि दरवाजा मग पुन्हा पायऱ्या आणि दुसरा दरवाजा अशी मालिका सुरु झाली. वाटेत उजावीकडच्या कातळात खोदून काढलेली मुबलक पाण्याची टाकी होती. मुक्काम करण्यायोग्य ऐस-पैस गुहादेखील लागली.
२०. साल्हेरच्या दरवाजावर भालदार चोपदार
परशुरामाच्या पादुका, रेणुकादेवीचे मंदिर, यज्ञकुंड, व्यवस्थित बांधून काढलेला प्रशस्त तलाव, आयताकृती आकाराचं स्वच्छ, नितळ पाण्यानी तुडुंब भरलेलं टाकं हे सर्व पाहिलं.
२१. रेणुकादेवीची मूर्ती
२२. रेणुकादेवी मंदिर परिसर
टाक्यातील थंडगार पाणी पोटभर पिऊन व तोंडावर मारुन हुशारी आली. परशुराम देव मात्र उंचावर जाऊन बसलेले होते. त्यामुळे मंदिरावरील ध्वजाला खालूननच प्रणाम करुन उजवीकडे खिंडीत उतरु लागलो.
२३. साल्हेर वरुन सालोटा
समोर दिसणारी सालोट्याची उंची ( ४५९५ फूट ), अरुंद वाट आणि डोक्यावर तापणारा सूर्य सारे थरकाप उडवित होते. पण हिंमत मजबूत होती. सालोट्यावर दोघेजण चढताना आम्हाला साल्हेरवरुन दिसत होते. पण ते चुकीच्या वाटेनी जाताना दिसल्यामुळे राजूनी हाकारे देऊन त्यांना वरच्या अंगाची वाट घेऊन दिवटीला लागायला सांगितले. खिंड पार करुन सालोटा चढायला लागल्यावर एक टप्पा पार केल्याचे समाधान अनुभवले. इथे स्वस्थ बसायला उंच दगडावर छान जागा शोधली. इतक्यात सगळे आलेच. दुपारचे १२.१५ म्हणजे खरं तर जेवणाची वेळ झाली होती. पण इथे शेजवान रोल, आंबा पोळी, लाडू, चिक्की, सुका मेवा असा चविष्ट आणि पौष्टिक खाऊ खाऊन सालोट्याची घसरंड चढू लागलो. एका बाजूला खोल दरी, डोक्यावर तळपणारा सूर्य आणि पायाखाली सरकती जमीन अशा त्रेधा तिरपीटीतून सही सलामत सुटून आम्ही दिवटीला लागलो. दिवटी म्हणजे दगडात खोदून काढलेल्या उभ्या पायऱ्या; या चढून गेल्यावर पटकन उंची गाठता येते हे एक बरे!
२४. सालोट्यावरील एक दरवाजा
मग सालोट्याचे दरवाजे ओलांडून किल्ल्यामध्ये प्रवेश केला. शेवटच्या दरवाज्याचे प्रवेशद्वार एका प्रचंड मोठ्या धोंड्याने पूर्ण बंद केले आहे.
२५. सालोट्यामध्ये चंचूप्रवेश
शिल्लक जागेतून किल्ल्यामध्ये चंचूप्रवेश केला. वर पोहोचल्यावर थंड सावलीत घटकाभर विश्रांती घ्यायला अंमळ बरे वाटले. मग पुढे जाऊन सालोट्यावरुन साल्हेरदुर्गाचे दिसणारे रांगडे रूप डोळे भरुन पाहून घेतले.
२६. सालोट्यावरुन दिसणारे साल्हेरचे रांगडे रुप
कारण आता थोड्या वेळानी तिकडेच निघायचे होते. परशुरामाच्या दर्शनाची आस लागली होती. वाटेत पाण्याच्या टाक्याजवळ बसून बडा खाना झाला. टाक्यातल्या शेवाळ्याखालचे गार पाणी पिऊन खूप समाधान वाटले.
मग वेगानी खाली उतरताना घसरंडीवर मात्र मधे-मधे ब्रेक लावावे लागत होते. पुन्हा एकदा खिंडीच्या बाजूने साल्हेर चढून रेणुकादेवीच्या तळ्याकडे पोहोचलो. गार्डचा डबा पोहोचला नसल्याने थोडा वेळ मिळाला; मनसोक्त फोटो काढले आणि तळ्यातील पाण्याचे तोंडावर हबके मारुन ताजा उत्साह भरला.
२७. रेणुकामाता मंदिरासमोरील टाके
मग मात्र एकच लक्ष्य; चलो परशुराम.
२८. परशुराम मंदिर
वाटेत दोन ग्रुप्सनी गरमागरम स्वयंपाक केला होता आणि आम्हाला जेवणाचा आग्रह करत होते पण मोह टाळला आणि शिखराकडे प्रयाण केले. परशुरामाच्या पदचिह्नांचे दर्शन घेऊन राजगिरा लाडूंचा प्रसाद सेवन केला. आता बोचरे वारे वाहून वातावरण थंड करु लागले. खाली टाक्याच्या बाजूला दोन रंगी-बेरंगी तंबू उभारुन मुक्कामाची जय्यत तयारी केली होती.
२९. या महालांनी क्षणभर वाट अडवली होती!
आम्हाला मात्र साल्हेरवाडी गाठायचे होते त्यामुळे पटापट पाय उचलणे आवश्यक होते. ठरवल्याप्रमाणे दोन दिवसात पाचही किल्ले बघता आले याचा डोंगराएवढा आनंद होता. हेडलाइट लावून काळोखात वाट कापण्यासाठी सज्ज झालो; आणि पायऱ्या, दगड धोंडे, खाच खळगे सारे ओलांडून साल्हेर किल्ल्याच्या रस्त्याकडील प्रवेशद्वाराजवळ झपाझप पोहोचलो. रात्रीचे आठ वाजले होते. राजूला मुल्हेरला सोडून गाडी ताहराबादला थांबवली. इथे एका प्रशस्त जैन रेस्टाॕरंटमध्ये झणझणीत जेवण आणि चहा घेऊन गाडी सोग्रास फाट्याकडे धावू लागली. येतानाच्या प्रवासात चौघेही जागे होतो पण आज मात्र आळीपाळीने झोपायचे ठरवले होते. नासिकला चालक बदलला. मग कसारा घाटात चहा घेऊन डोळे ताणत आसनगावपर्यंत गाडी हाकली आणि कसारा घाटात नवीन चक्रधराकडे चक्र सोपवले. पहाटे ठीक साडेचार वाजता ठाणे मुक्काम गाठला.
३०. मुल्हेरवाडीतून दिसणारा न्हावी किल्ला, याची भेट पुढल्या वेळी
प्रतिक्रिया
2 Apr 2017 - 4:00 pm | किसन शिंदे
जबरदस्त भटकंती झालीये तुमची. साल्हेर-मुल्हेर ही जोडगोळी अजून पर्यंत पाह्यलेली नाहीये. लवकरच योग यावा.
2 Apr 2017 - 4:48 pm | पैसा
दोन दिवसात पाच किल्ले बघून शिवाय इतका प्रवास??? साष्टांग नमस्कार तुम्हा लोकांना!!
फोटो सुरेख आणि लिहिलंही आहे अगदी छान!
2 Apr 2017 - 6:10 pm | भ ट क्या खे ड वा ला
नमिता, मस्तच लिहिलंय ,भरपूर भटकंती केली आहेस, मिपावर येउ देत सर्व अनुभव.
3 Apr 2017 - 5:09 pm | मोदक
सहमत, पुढील लेखांच्या प्रतिक्षेत..! :)
2 Apr 2017 - 6:17 pm | यशोधरा
मस्त लिहिलेय. लिहित रहा.
2 Apr 2017 - 6:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
वा....खुप छान माहिती आणि फोटोज...!! टु व्हिजीट लिष्टीत टाकतोय हे.
2 Apr 2017 - 6:52 pm | ऋतु हिरवा
जबरदस्त मोहिम. आणि फोटो ही सुंदर
2 Apr 2017 - 7:05 pm | कंजूस
फोटो भारी आले आहेत
2 Apr 2017 - 7:08 pm | रेवती
ग्रेट! फोटू, वर्णन आवडले.
2 Apr 2017 - 8:45 pm | दुर्गविहारी
उत्क्रुष्ट माहिती. फोटोसुधा सुन्दर आहेत.
2 Apr 2017 - 9:51 pm | प्रचेतस
अफाट स्टॅमिना आहे तुमचा.
दोन दिवसात हे उत्तुंग किल्ले म्हणजे अशक्य प्रकरण आहे.
3 Apr 2017 - 12:20 pm | खेडूत
+१
पुढील मोहिमेला शुभेच्छा!!
2 Apr 2017 - 10:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
जबरदस्त मोहिम !
2 Apr 2017 - 11:49 pm | अत्रुप्त आत्मा
प्लस वण!
3 Apr 2017 - 2:39 am | पर्णिका
मस्त वर्णन... फोटोंमुळे मजा आली.
कातळात खोदून काढलेल्या गुहा व पाण्याची टाकी तर खासच... !
3 Apr 2017 - 6:57 am | प्रीत-मोहर
जबरदस्त. खूप सुरेख फोटो, तितक्या सुंदर लिखाण अाणि तुमच्या स्टॅमिनाला __/\__
3 Apr 2017 - 8:48 am | आषाढ_दर्द_गाणे
फोटो आणि वर्णन एकदम फिट्ट बसले आहे!
तुमच्या दांडग्या उत्साहाला सादर प्रणाम!
3 Apr 2017 - 11:07 am | वेल्लाभट
क. ह. र.
भारी आहात तुम्ही आणि हे किल्ले पण. वेड वेड वेड निव्वळ वेड.
क्लास. लिहीत रहा ! पुलेशु.
मिपावर पुन्हा चार दोन ट्रेकवृत्तांत येताना बघून बरं वाटतंय.
????? ने संपणार्या राखीसावंती धाग्यांना फाटा बसायला मदत होईल. तीही सार्थ.
3 Apr 2017 - 6:58 pm | सुमीत
दणका दिलात "????? ने संपणार्या राखीसावंती धाग्यांना फाटा बसायला मदत होईल"
बाकी व्रुत्तांत भारीच पण पाच गडांच्या मानाने लवकर आटोपता झाला. हा ट्रेक करायचा आहेच, तुम्हाला फोन होईलच त्या साठी
3 Apr 2017 - 3:11 pm | बरखा
एकही फोटो दिसत नाहिये.
3 Apr 2017 - 7:59 pm | भम्पक
दोन दिवसात पाच किल्ले अन तेही त्या भयंकर बागलाणचे म्हणजे अचाटच पराक्रम. कृपया राजू वाटाड्याचं नंबर द्यावा.
3 Apr 2017 - 11:27 pm | रिकामटेकडा
बागलाण मधील हे किल्ले भटक्यांना नेहमीच खूणावत असतात.
एक दुरुस्ती आहे फोटो क्र १२ मधील शिल्प सूर्याजी काकडे याचे स्मारक नसावे. सूर्याजी काकडे यांचे स्मारक साल्हेर किल्याच्या साल्हेरवाडी बाजूला आहे
3 Apr 2017 - 11:41 pm | शलभ
मस्त जबरदस्त ट्रेक..फोटो पण झकास..
आम्ही 2007 ला केला होता हा ट्रेक..सालोटा, साल्हेर, मुल्हेर, मोरा, हरगड, मांगी-तुंगी, न्हावी/रतनगड..तुमच्या वृतांताने आमच्या आठवणी जाग्या झाल्या..
4 Apr 2017 - 6:24 pm | अनुप ढेरे
अप्रतिम!
7 Apr 2017 - 9:36 pm | स्पार्टाकस
भटकंतीचा वृत्तांत आणि फोटो मस्तं!
बागलाणचे किल्ले हे असेच वेड लावणारे आहेत.
कळसूबाई हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर असलं तरी सर्वात उंच किल्ल्याचा मान नि:संशय साल्हेरचाच!
साल्हेरवाडीहून परत येताना मुल्हेर - ताहराबाद - नाशिकमार्गे येण्याऐवजी साल्हेरवाडी - कळवण - नाशिक असा थेट रस्ता आहे. या मार्गाने किमान तासभर प्रवास कमी होतो.
8 Apr 2017 - 10:51 am | इरसाल कार्टं
आज बऱ्याच दिवसांनी ऍसिडिटी झाली.
22 Apr 2017 - 5:40 pm | नमिता श्रीकांत दामले
लेख वाचून भरघोस प्रतिक्रिया पाठवल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद!
संबंधित संपर्क हवा असल्यास जरुर कळवावे .