गेल्या काही दिवसांत कोकिळ गान कानी येउ लागलय ..
आणि शहरातील वृक्ष ही वसंत आगमनाची चाहूल देताहेत ..
आजची सायकल यात्रा याच उद्देशाने , वेग कमी ठेउन , वसंत आगमनाचे अवलोकन करण्याच्या उद्देशाने करायचे ठरवले होते .
पहाटे सहा ला निघालो ..
मार्ग ठरवला अंबरनाथ वेस्ट वरुन वन ट्री (अंबरनाथ मधील ) पॉइंट मार्गे टिटवाळा ते सोर गाव जेथे नाशिक हायवे लागतो तिथपर्यंत .
अंबरनाथ वेस्ट वरुन वन ट्री हिल कडे वळलो कि थोड्याच वेळात छान चढ लागतो ..
अनेक जण या रस्त्यावर मॉर्निग वॉक साठी जातात ..
वन ट्री नंतर मात्र रस्ता मोकळा असतो ..
सुरवातीला उक्षी ,कुडा बहरलेले दिसले ..
थोड पूढे गेल्यावर
एक जलस्त्रोत (नदी ) लागते .. इथे ही छान झाडी आहे ..
या रस्त्याला गेल्यावर्षी वडीलांच्या अस्थि विसर्जित करण्यासाठी आलो होतो ..
त्याजागी आल्यावर क्षणभर त्यांच्या आठवणीने मन कातर झालं.
मग सायकलच्या फ्रंट पाउच मधला एम पी थ्री प्लेअर सुरु केला ..
(हे सुरक्षित आहे , कानात इयरफोन घालून गाणी ऐकणे असुरक्षित)
बेसुरी रस्ता आणी अजिबात बेसुर न होणारी आशा यांच्या साथीने प्रवास सुरु केला ..
थोड्याच वेळात रस्त्याला ही सुर सापडला आणी वेग वाढवायचा विचार करत असतानाच एका मोह वृक्षाने आकर्षीत केले ..
काळ्याभोर डांबरी रस्त्यावर सात आठ फुलांचा सडा पडला होता ... मग काय थांबलो ..
एक फुल तर थांबल्यावर समोरच टपकले ..
सात आठ फूले उचलली थोडी साफ सुफ करण्याचे नाटक केले व मस्त पैकी मटकावली ..
त्याची गोड तुरट चव जीभेवर रेंगाळत ठेउन परत सुरु झालो ..
नंतर अनेक मोह वृक्ष दिसले पण ते अजुन फुलू लागले नव्हते ..
सकाळी साडेसात / ७:४५ लाच टिटवाळा मंदीराशी पोहोचलो ..
अजुन भक्तीचा बाजार सुरु व्हायचा होता ..
बाहेरुनच नमस्कार केला .. तलावात जरा डोकावलो आणि पुढे मार्गस्थ झालो ..
थोड्याच वेळात एक रेल्वे फाटक लागलं.
ते बंद असल्याने थांबलो ..
लोकं सायकल व माझे ध्यान पहात होती .. एक दोघानी काही शंका विचारल्या त्याचे निरसन करुन फाटक उघडताच पुढे सटकलो ..
परत रस्ता बेसुर झाला ..
आशा मात्र सुरात , ओपीची गाणी म्हणत होती .
इतक्यात तीन पिंपळ वृक्ष दिसले , अगदी जवळ जवळ आणी भले थोरले ..
एकाची पाने चमकदार पोपटी , एकाची काळसर लाल , तीसर्याची तजेलदार लाल ..
मस्त मजा आली .. निसर्गाची अशी अनोखी रुपे पहायला मजा येते
काही फोटो काढले ..
वसंत आगमन सायकल यात्रा सफळ संपूर्ण होणार याची ग्वाहीच देत होते जणू हे पिंपळ .
त्यानंतर दिसला एक पुर्ण बहरलेला कुंभा .पांढरी तुरेवाली फुले मिरवत उभा .
मी थांबताच त्यावरचे पक्षी मात्र उडाले ..
त्यांची क्षमा मागुन , एक दोन फोटो काढले .
इतक्यात घरुन फोन : घरी केव्हा येणार..
जेवायला येतो ..
अस सांगुन पुढे निघालो ..
उजव्याबाजुला कुंपणाला राजतुरा (संकासुर ) दोन्ही रंगात बहरला होता ..
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ने लावलेली झाडे ही छान मोठी झाल्येत या रस्त्याच्या दुतर्फा ..
हे खरे संत .. समजाला योग्य मार्गाला लावणारे ... काही वर्षातच हरित महाराष्ट्र करणार आहेत यांचे अनुयायी..
त्याना मनोमन नमस्कार करुन पुढे निघालो ..
पास्ता नावाची नदी , तीच्या तीरावर असलेले विपश्यना केंद्र , त्या नदीच्या पात्रातील खडकांवर असलेले काही गवताने शाकारलेले ढाबे .. आणि डुंबायला येणाऱ्यांसाठी बांधलेले आडोसे , हे सर्व न्याहाळत, पूढे निघालो ..
थोड्याच वेळात सोर नावाचे गाव आले , येथेच नाशिक हायवे लागतो .
इथून परत फिरायचे ठरवले (हो उगाच सायकल वाला हायवे वर आला म्हणून गडकरी नाराज व्हायचे )
येताना एक छान दृष्य दिसले ..
एक कारागिर काही मुर्त्याना छान सोनेरी धातुकाम करत होता ..
त्याच्या परवानागीने एक फोटो काढला .
आता पोटात कावळे ओरडु लागले होते ..
पण पास्ता नदी जवळचा ढाबा नुकतच उघडला होता ..
फक्त चहा घेतला .. ढाब्यावर एक गोंडस मनीमाउ च पिल्लू होत त्याला हातात घेतल व बिस्किटे घेउन देणार इतक्यात ते हातून निसटायचा प्रयत्न करु लागलं.
मागे एक कुत्रा होता .. तो मला दिसत नव्हता ..
माउ ला खाली सोडून बिस्किटे टाकली तर शेपटीचे केस ताठ करुन बिस्किटे खाउ लागल
मग लक्षात आलं घाबरगुंडी का उडाल्ये ते .
त्या कुत्र्यालाही काही बिस्किटे दिली तेव्हा कूठ माउ च खाण्यात लक्ष लागलं..
बस झाले माउ चे लाड अस म्हणून सटकलो ..
तो थेट टिटवाळा गाठले .
मिसळ पाव व लस्सी असा भरपेट नाष्टा करुन निघणार तो समोरच एक टांगेवाला दोन्ही घोड्याना तोबरा देत होता ..
मजा वाटली .. एक फोटो काढला ..
टांगेवाल्याने सायकल ची चौकशी केली ..
आता अशा प्रश्नांची सवय झाल्ये ..
त्याला माझा ही एक फोटो काढायला सांगितला ..
निघालो ..
आता उन जाणवत होते ..
इतक्यात नजर गेली एका छोट्याशा " शिमट " वृक्षाकडे पर्ण हिन होउन तुरे मिरवित होता ..
काढला फोटो ..
दोन पॅडल मारली तोच एका वृक्षा वर गोविंदीची काटेरी वेल ही बहरलेली दिसली ..
उगाचच खेड ची आठवण झाली ..
खेड ला नारंगी नदीच्या पुलाची उंची वाढवताना तीथली गोविंदी नष्ट झाली , त्या नंतर आज दिसली कित्येक वर्षानी ..
आता मात्र वसंताचे कौतुक खूप झाले , चल घरी असे मनाला समजावले ..
चांगला चार किमी चा चढ चढायचाय तुला ..
वेग वाढवला ..
आज पाठपिशवीत नळीवाली पाण पिशवी असल्याने तहान लागायच्या आत जलपान सुरु होते ..
त्यामुळे न थांबता सलग चढाई करत वन ट्री ला आलो .. तीथल्या वट वृक्षाची सावली उपभोगावी असे वाटत होते ,पण एक रिक्षावाल्याने आधीच त्यावर आपला हक्क सांगितला होता ..
मग न थांबता अंबरनाथ शहराकडे दामटली सायकल ..
शहरात येताच एक सायकल चा डॉक्टर भेटला एम डी असावा , कारण जी पेशंट होती हातात ती होती एक रेसर सायकल .
मग थांबलो ..
जावेद भाई ३० साल से ये काम करते है , कुछ भी हुवा तो लेके आओ , ठिक करदेगा ..
असे आश्वासन मिळवून निघालो ..
ट्राफिक लागले , ब्रिज पार करुन इस्ट ला आलो ,
एक नारियल पानी मलई वाला , नेहमीच्या नारळवाल्याकडे घेउन , तडक घर गाठले .
प्रतिक्रिया
29 Mar 2017 - 4:26 pm | संजय क्षीरसागर
लव यू मॅन . एकदम दिलखुष !
29 Mar 2017 - 7:03 pm | एस
क्या बात है! सायकल राईड छान चालू आहेत सर्वांच्या.
29 Mar 2017 - 7:48 pm | कंजूस
वावा! वसंत आवडला.
31 Mar 2017 - 10:17 pm | आषाढ_दर्द_गाणे
त्या विळीने मन जिंकलय!
आणि ती फळे कुठली आहेत? मोहाची का?
2 Apr 2017 - 6:17 pm | भ ट क्या खे ड वा ला
हातावर घेऊन फोटो काढलाय ती मोहाची फूले आहेत, रस्ता व झाडाची फांदी असा फोटो आहे ती शिमट या झाडाचा मोहोर आहे
3 Apr 2017 - 9:56 am | पैसा
मस्त वर्णन!
3 Apr 2017 - 10:06 am | नंदन
छान लिहिलंय. नेमकं, विशेषणपसार्याशिवाय.
4 Apr 2017 - 2:55 pm | पाटीलभाऊ
छान भटकंती आणि वर्णन.