होळीचा हंगाम आला की वेध लागतात ते सुरंगीच्या हळदी, सुगंधी वळेसरांचे/गजर्यांचे. मार्च- एप्रिल महिन्यांचा कालावधीत सुरंगीचे झाड दोन भरगच्च बहरात बहरते.
१)
२)
सुरंगीचे शास्त्रीय नाव mammea suriga. सुरंगीच्या बहराची चाहूल लागली की माझे पाय वळतात ते सुरंगीच्या ऐटदार झाडाकडे. हे फुललेले झाड प्रत्यक्ष पाहणे म्हणजे कोवळ्या किरणांतील जणू फुलांची दिवेलागण अनुभवणे.
३)
४)
ह्याच्या खोड-फांद्यांतून विशिष्टपणे लागणार्या कळ्या म्हणजे जणू देठाला लागलेले मोतीच.
५)
६)
खोडाला लागलेली फुले पाहताना भानच हरखून जावे अशी अजब रचना.
७)
८)
सुरंगीच्या फुललेल्या फुलांचे पिवळे धमक केशर सुगंधी रोषणाई करून पाकळ्यांच्या ओंजळीतून मंत्रमुग्ध सुगंधाची उधळण करत असतात. झाडाजवळचा कोवळ्या किरणांतील परिसर जणू अत्तरात चिंब झालेला असतो . खाली पडलेल्या सुक्या फुलांचा सडाही धरणी मातेला सुवासिक अभिषेक घालत असतो.
९)
फुलांमधील मधूरस टिपण्यासाठी ह्या झाडावर माशांचीही सुरात भुणभूण चालू असते.
१०)
११)
सुरंगीच्या कळ्या सूर्यप्रकाशात साधारण १०-११ ला पूर्ण उमलतात.
१२)
१३)
गजरे वळण्यासाठी कळ्याच काढाव्या लागतात म्हणून अगदी पहाटेच ह्या झाडावर चढून फांद्यांना लागलेली एक एक कळी काढावी लागते.
१४)
झाड चिवट असल्याने हलक्या पायांनीच कोवळ्या कळ्यांना सांभाळत फुलायला आलेल्या कळ्या काढाव्या लागतात. वर्षातून एकाच हंगामात फुलणारी व एवढ्या मेहनतीने झाडावरून काढून गजरा करूनही ह्या गजर्याला मात्र बाजारभाव कमी असतो. बर डिमांड काही कमी नसत. चार दिवस आधीच बुक करून ठेवावे लागतात गजरे.
१५)
सुरंगीमध्ये पण दोन प्रकार आहेत. एक कमी वासाची सुरंगी आणि एक वासाची सुरंगी. दोन्हीची झाडे सारखीच असतात फक्त कमी वासाच्या सुरंगीच्या फुलांमध्ये परागकण जास्त असतात तर वासाच्या सुरंगीला कमी असतात. स्त्रियांसाठी गजरा हा ऋदयात घर करणारा असतो. पूर्वापार ह्या गजर्यांची प्रेमपूर्वक देवाण घेवाण करून स्त्रिया एकमेकींच्या ऋदयात मैत्रीची सुगंधी गुंफण करीत आहेत. केसाच्या वेणीवर लांबसडक सोडलेल्या किंवा आंबाड्यावर गोलाकार माळलेल्या पिवळ्या धमक गजर्याने स्त्रियांच्या सोज्वळ लावण्य अधिक फुलून येते.
१६)
होळीची धमाल म्हणून की काय सुरंगीचा गजरा आपल्या पिवळ्या रंगाची उधळण आपल्या परागकणांनी करत असतो. केसात दरवळणार्या सुरंगीच्या मनमोहक सुगंधात क्षण अन क्षण प्रसन्न होतो . गजरा काढला तरी दोन तीन दिवस हा सुगंध केसात तसाच टिकून राहतो व त्या सुगंधी क्षणांच्या स्मृती ताज्या करतो.
सुरंगीच्या गजर्याला कोंकणांत प्रचलित असणारे वळेसर हे नाव त्या गजर्याच्या कलाकृतीला अगदी समर्पक वाटत.
१७)
सुरंगीच्या फुलांचे पूर्वी अत्तरही मिळायचे. आता ही वनस्पतीच दुर्मिळ झाली आहे. ह्या वनस्पतीचे जतन होणे आवश्यक आहे. म्हणून आपल्या वृक्षारोपण कार्यक्रमात अशा प्रकारच्या दुर्मिळ झाडांचेही वृक्षारोपण झाले तर ह्या झाडांचे महत्त्व, अस्तित्व पुढच्या पिढीला कळू शकेल. सुरंगीचा हा सुगंधी आनंद आताच्या व पुढच्या पिढीलाही मिळण्यासाठी ह्या झाडाची लागवड होवो ही सदिच्छा.
१८)
१९)
टीप :
कृपया लेख किंवा फोटो काहीही शेयर करताना नावासकट शेयर करा.
मागील वर्षी मी सुरंगीवर लिहीलेले लिखाण व फोटो असेच वॉट्स अॅपवर शेयर होत होते व फेसबुकवरही इतरांच्या नावाने शेयर होत होते. त्यामुळे मी मागिल वर्षी काढलेले हे फोटो तेव्हा जरा जास्तच मोठ्या वॉटरमार्कमधे टाकले आहेत.
प्रतिक्रिया
17 Mar 2017 - 4:30 pm | पैसा
फोटो दिसत नाहीयेत.
17 Mar 2017 - 4:45 pm | जागु
फोटो गुगल क्रोम ब्राउसरने दिसतील.
17 Mar 2017 - 4:45 pm | जागु
फोटो गुगल क्रोम ब्राउसरने दिसतील.
17 Mar 2017 - 4:56 pm | किसन शिंदे
एवढ्या चांगल्या फोटोंवर अगदी मधोमध वॉटर्मार्क टाकून तुम्ही त्या फोटोंचे सौंदर्य बिघडवताय, अगदी त्यामुळेच की काय इतक्या सुंदर फोटोंचा मनापासून आस्वाद घ्यायला शक्य होत नाही.
प्लीज असं करू नका!
17 Mar 2017 - 4:58 pm | किसन शिंदे
१५) आणि १६) नंबरचा फोटो कायप्पावर कुणीतरी पाठवल्याचं स्मरतंय.
17 Mar 2017 - 11:04 pm | नूतन सावंत
मस्त मस्त.
18 Mar 2017 - 11:36 am | पूर्वाविवेक
सुरंगीचा गजरा म्हटलं कि कथाकादंबऱ्यातील शृंगार करणाऱ्या नायिका आठवतात.
हल्ली बरेच दिवसात दिसली नाहीत ही फुलं. काय वेड लावणारा सुवास असतो ना त्यांचा.
लेख आणि फोटो नेहमीप्रमाणेच उत्तम.
20 Mar 2017 - 11:36 am | जागु
किसन पुढच्यावेळेसाठी नोट केली आहे तुमची सुचना. धन्यवाद.
सुरंगी, पूर्वा धन्यवाद.
20 Mar 2017 - 4:23 pm | पल्लवी०८
जुन्या आठवणी ताज्या झाल्या! खरंच खूप आवडतात हि फुलं मला, बराच काळ लोटला सुरंगीचा गजरा घालून, आणि सुरंगीच्या सीजनला गावीही जाणं होत नाही, त्यामुळे हि फुलं आमच्यासाठी तशीही दुर्मिळच!
20 Mar 2017 - 5:35 pm | एस
सुंदर. सुरंगीची रोपे कुठे मिळाल्यास यंदा पावसाळ्यात वृक्षारोपण कार्यक्रमात लावता येतील.