'पिंजर' चित्रपटातला एका प्रसंगात 'पगली'ला दिवस गेल्याचे कळते, तेव्हा पुरोला धक्काच बसतो. अगदी दु:खी होऊन ती विचार करते, "कैसा आदमी होगा वो, जिसने ..."
फाळणीवर आधारीत ही कादंबरी १९५०मध्ये लिहिली गेलेली. पगलीसारख्याच स्त्रियांची परिस्थिती मात्र तेव्हाच्या भारतापासून आताच्या 'डिजिटल इंडिया'पर्यंत अजूनही तशीच आहे; खरं तर त्याहून वाईट म्हणावी अशी! रस्त्यावरच्या या निराधार वेड्या महिलांना स्वतःची खाजगी मालमत्ता समजणारे नराधम समाजात कमी नाहीत. आपण तरी मानसिक स्वास्थ्य ढळलेल्या अशा स्त्रियांबद्दल हळहळ व्यक्त करून पुढे जाण्याव्यतिरिक्त काय करतो? अहमदनगरचे डॉ. राजेंद्र धामणे आणि डॉ. सौ. सुचेता धामणे हे दांपत्य मात्र याला अपवाद आहेत. कपड्यांचे, देहाचे भान नसणार्या, रस्त्यावर फिरणार्या अशा अनेक अनाथ स्त्रियांची 'माऊली' बनून त्यांना हक्काच्या घरात आणून शक्य होईल तेवढे 'नॉर्मल' आयुष्य जगता यावे, यासाठी हे दोघे अविरत कष्ट घेत आहेत.
(धामणे दांपत्य)
माऊली प्रकल्प हा सुरुवातीला थोडा मर्यादित स्वरूपात होता. १९९८ साली 'माऊली सेवा प्रतिष्ठान'ची स्थापना झाली ती डॉ. धामणे यांच्या आईच्या स्मरणार्थ. आईची आठवण आणि त्यांच्या जीवनातील ज्ञानेश्वर माऊलींचे स्थान याला अनुसरून त्यांनी हे माऊली नाव दिले. गोरगरिबांना मोफत औषधोपचार, सुट्टीच्या दिवशी आरोग्य शिबिरे भरवणे असे तेव्हा संस्थेचे कार्य होते. शिंगवे गावात असलेल्या त्यांच्या घरून प्रॅक्टिससाठी नगरला रोज ये-जा करताना हायवेवर दिसणार्या अनेक वेडसर व्यक्तींना ते पाहत. त्यांच्या पत्नी सुचेता तेव्हा होमिओपॅथिक कॉलेजमध्ये लेक्चरर होत्या, त्यामुळे त्याही बरोबर असत. एकदा वेडसर दिसणार्या एका व्यक्तीला उकिरड्यावर नको ते खात असलेले पाहिल्यावर त्यांना फारच वाईट वाटले. तेव्हापासून त्यांनी 'अन्नपूर्णा' योजना सुरू केली. ४०-५० लोकांसाठी डबे बनवून ते रोज त्यांच्यापर्यंत अन्न पोहोचवू लागले. पण एकदा एक मानसिकरित्या पीडित आणि अर्धनग्न तरुणी त्यांना हायवेवर दिसली आणि तिला तसेच सोडून पुढे जायला त्यांचे मन तयारच झाले नाही. अशा निराधार स्त्रियांसाठी हक्काचे घर असावे, म्हणून त्यांनी २००८मध्ये एक वास्तू बनवायला सुरुवात केली.
तेव्हापासून कित्येक स्त्रिया या संस्थेत दाखल झाल्या आहेत. या स्त्रिया जेव्हा संस्थेत येतात, पोहोचवल्या जातात, तेव्हा बर्याचदा अतिशय अस्वच्छ असतात. कधी रोग प्रादुर्भाव झालेल्या असतात. त्यांच्या मानसिक स्थितीमुळे त्यांना स्त्री-देहाची शुद्ध नसते. शरीराची, केसांची निगा त्यांना राखता येत नसते, त्यांत उवा झालेल्या असतात. त्यामुळे त्यांचे केस बारीक केले जातात, शिवाय शरीराला येणारी दुर्गंधी, त्वचारोग या सर्वांवर उपचार केले जातात. मानसिक स्वास्थ्य सुधारावे म्हणून उपचार होतात. ही सर्व कामे हे दोघेही सुरुवातीला स्वतः करत. व्याप वाढत आहे, तसा आता सुधारलेल्या महिलाही ही कामे करतात. यातही काही महिला त्यांच्या मुलांसहित किंवा काही गर्भवतीही असतात. त्यांची मुलेही आता याच संस्थेत वाढत आहेत. या मुलांची जबाबदारीही हळूहळू या सुधारलेल्या महिलांवर टाकण्यात येते. शिवाय जेवण बनवणे आदी कामेही बर्या झालेल्या महिला करतात. त्याशिवाय, संस्थेत उदबत्त्याही बनवल्या जातात, शिवणकाम केले जाते. तेही काम या महिला करतात. या सर्वांमुळे त्यांच्यात काहीतरी करण्याचा आत्मविश्वासही येतो आणि त्यांचे मनही रमते. मुळातच त्या मनोरुग्ण असल्यामुळे त्यांचे 'मन रमवणे' हाच त्यांच्यावरच्या प्रमुख उपचार. कारण संस्थेत आलेल्या बर्याच महिलांमधून जगण्याची उमेदच निघून गेलेली असते...
त्यांच्या संस्थेत आलेली पहिली महिला 'अक्का'. "चहा पिऊन येतो" असे सांगून नगरच्या एका चौकात तिला सोडून गेलेल्या सख्ख्या भावाची वाट पाहत तिने सहा वर्षे घालवली. मग हे दांपत्य तिला त्यांच्याबरोबर घेऊन गेले. तिथे आल्यावर हळूहळू जगण्यातली मजा आवडायला लागलेली अक्का नंतर मात्र आजारपणात गेली. ९३व्या वर्षी बलात्कार झालेल्या एक आजी... बातमी कळल्यावर आंदोलने झाली; पण आजींची खबर, ठावठिकाणा कुणी घेतला नाही. त्या आजी तीन वर्षे माऊलीमध्ये राहून ९६व्या वर्षी देवाघरी गेल्या. नगरच्या रेल्वे स्टेशनजवळ तीन वर्षे वयाच्या चिमुरडीवर बलात्कार झाला, तिचे संगोपन आता माऊलीत होत आहे. जन्मतः मतिमंदत्व असलेली, अंध आणि बहुविकलांग असल्यामुळे उकिरड्यावर टाकून दिलेली, तिथेही अनेक हाल झालेली एका मतिमंद बालगृहातून दुसरीकडे असा प्रवास करत शेवटी माऊलीत आलेली 'करुणा' तिथे राहत आहे. तिला सांभाळायला प्रशिक्षित असे कुणी नसले, तरी जोवर ती जगेल तोपर्यंत 'माणूस' म्हणून तिला जगायला मिळावे यासाठी माऊली परिवार तयार झाला. चालता-फिरता न येणारी, जिचे दोन्ही कान कापून टाकलेले अशी 'रमा' असाच काहीसा प्रवास करत तिथे पोहोचली. अगदी डायपर घालून ठेवावे लागेल अशी तिची स्थिती झालेली, महत्प्रयासाने हळूहळू ती नाव सांगण्याइतपत सुधारली, पण शेवटी मरणप्राय वेदनांपुढे हरलीच. येथे येणार्या एकेकीची कहाणी सुन्न करणारी.
त्याहूनही सुन्न करणारे आहेत ते समाजाकडून आलेले अनुभव. हे कार्य सुरू केल्यावर तर डॉ. राजेंद्र आणि सुचेता यांच्या वाट्याला हेटाळणीच आली आणि खूप त्रासही झाला. डॉ. धामणे यांच्या वडिलांनी या प्रकल्पासाठी जागा दिली. त्यांच्या कामाबद्दलची बातमी वाचून काहींनी मदतीचा हात पुढे केला. पण बाकीचे नातेवाईक, परिचित यांनी मात्र नावेच ठेवली. शिवाय उपचारांची गरज पडल्यावर खाजगी रुग्णालयात नेल्यावर, कायदेशीर मदत घेताना पोलिसांकडूनही सहकार्य मिळणे कठीणच. जिवंत असताना त्या स्त्रीवर अत्याचार होत असताना कुणाला त्याबद्दल काही वाटत नाही, 'आपल्या' जाती-धर्माची आहे म्हणून कुणी ते अत्याचार होण्यापासून तिला वाचवत नाहीत. पण माऊलीला भेट देणारे काही गृहस्थ तिथल्या भगिनींवर अंतिम संस्कार मात्र तिच्या धर्माच्या प्रथेप्रमाणे व्हावेत हे जरूर सुचवतात. माणूस जगताना भले कसाही जगो, पण मेल्यावर त्याच्या देहाची काळजी मात्र आहे समाजाला! हा जातींचा पगडा इतका वाईट, की बाकी गोष्टींची शुद्ध नसली तरीही इथल्या काही स्त्रियांचे वर्तन 'जाती'प्रमाणे. म्हणूनच रमाने तिचे नाव सांगताना 'बाबासाहेबांची रमा' असे सांगितले. संस्थेत आलेली मूळची बिहारची 'अछूत' स्त्री पाणी वरून ओतायला सांगायची, अन्न ताटात घेण्याऐवजी हातावर घेऊन खायची, गोड नाही खायची. सुरुवातीला बुजलेली सिंधू डॉक्टरांनी जेव्हा तिला "तू ज्या जातीची, तीच माझी जात" असे सांगितल्यावर कमालीची बदलली आणि बरी झाली. माऊलीतल्या प्रत्येक स्त्रीसाठी डॉक्टर 'तिच्याच जातीचा आणि धर्माचा' आहे. हे सर्व वाचताना, पुन्हा 'पिंजर'मधलीच पगली गेल्यावर ती अमुक धर्माची म्हणून तिच्या मुलावर हक्क सांगणारे आठवल्याशिवाय राहत नाहीत. काळ बदलला, संदर्भ बदलले, पण समाज मात्र तसाच राहिला. आणि अशा समाजात राहूनसुद्धा अशी मानवसेवा करणारे हे दांपत्य पाहिले की खरोखरच त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायला होते.
(आनंदाचे-तणावाचे प्रसंग)
काही कारणाने मनोरुग्ण बनलेल्या या स्त्रियांवर अत्याचार झालेले असतात आणि त्यांना ते कळतही नाही. त्यात कधी त्या गर्भवती होतात. संस्थेत येईपर्यंत कधी बराच अवधी गेलेला असतो, अशा वेळी बाळंतपण करण्यावाचून पर्याय नसतो. मुले आणि आई दोघेही माऊली परिवाराचाच हिस्सा होऊन जातात. ही मुले डॉक्टरांना आई-बाबा म्हणतात, त्यांच्या शालेय जीवनाची आणि इतर जबाबदारी डॉक्टरच घेतात. तरीही त्यांना जन्म देणारी आई आहे. त्यामुळे त्यांना कायदेशीररित्या दत्तक घेतले नाही, तरी त्या मुलांना डॉक्टर स्वतःचे आडनाव देतात. संस्थेतल्या सर्व महिलांसाठी आधार कार्ड बनवणे सुरू आहे, शिवाय त्यांना कुठल्या योजनांचा लाभ करून देता येईल त्या मिळवून देणे ही कामेही असतात. रोजच्या रोज प्रार्थना, ध्यान, व्यायाम, जेवण या गोष्टी वेळेवर होतात. रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. गिरणी, पोळ्या बनवण्याचे यंत्र हेसुद्धा येथे आहे. कधी गाणी, कविता असे कार्यक्रम होतात, सणवार साजरे केले जातात. बालदिन आणि माता-दिन साजरे होतात, सहली काढल्या जातात. संस्थेतल्याच भगिनींच्या साहाय्याने 'माइंड रेडिओ' चालवला जातो. थोडक्यात, माऊली हे रुग्णालय नाही की रीहॅब सेंटर नाही; तर येथे येणार्या स्त्रियांचं हक्काचे घर आहे आणि 'माणूस' म्हणून जगण्याचा त्यांचा हक्क इथे अबाधित आहे. डॉक्टरांच्याच शब्दांत सांगायचे, तर "आयुष्यामध्ये सार्थकता काय आहे आणि आपण करीत असलेलं काम खरंच मूलगामी आहे का हे यातून उमजतं. कुणी आमच्या अल्पस्वल्प कामाची दखल घेवो अगर ना घेवो. आमचं माऊलीच घर असं नांदतं आणि आनंदी आहे. आम्ही सगळे कृतार्थ आहोत. आता माऊलीचं गोकुळ १७ मुलांनी बहरलं आहे आणि आमच्या मायभगिनी आणि या पोरांच्या आया तब्बल ११०! असं आमचं मोठ्ठं कुटुंब."
(माऊलीमधली दिवाळी)
येथे येणार्या भगिनींची संख्या वाढते आहे, त्यामुळे तशा मोठ्या जागेची गरजही आहे. त्यासाठी मनगाव येथे नवीन प्रकल्प सुरू होत आहे, जे ३०० भगिनींना आणि मुलांना हक्काचे घर होऊ शकेल. शिवाय सोयींनी युक्त असे रुग्णालय, मुलांसाठी शाळा, भाजीपाला उगवण्यासाठी जागा, गोपालन हेही तिथे असेल. त्याशिवाय कचर्याचे नियोजन आदी प्रकल्प असतील. याचे काम सध्या सुरू असले, तरी हा प्रकल्प फार मोठा आहे. अनेक पूरक प्रकल्प तिथे साकारायचे आहेत. वेगवेगळ्या रूपांनी मदत येत आहे, परंतु, आणखी खूप काम बाकी आहे. माणुसकीच्या या आगळ्यावेगळ्या कार्यात जास्त लोकांच्या सहभागाची, मदतीची गरज आहे. माऊलीचे स्वतःचे संस्थळ आहे, त्यावर या प्रकल्पाची माहिती आहे. संस्थेमधल्या वेगवेगळ्या 'वॉर्ड्स'चे फोटो आहेत. संस्था चालवण्याबरोबरच इथे पर्यावरणाचा विचारही केला जातो, संस्थेत वापरली जाणारी सर्व वीज सौर प्रणालीतून निर्माण केली जाते.
या सर्व व्यापांतून, वेगवेगळ्या अनुभवांतून सवड काढून आपली आवडही जोपासण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करतात. नाट्यस्पर्धेत भाग घेतात, उत्तम फोटो काढतात, एक शॉर्ट फिल्मसुद्धा त्यांनी बनवली आहे, आणि स्वतः शूट केली आहे. त्यांचा एडिटिंग स्टुडिओसुद्धा आहे. ते अतिशय उत्तम लिहितातसुद्धा! २०१६मधल्या महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी एक वेगळीच कल्पना लढवून एके काळी समाजाने 'वेडी' ठरवलेल्या महिलांची सौंदर्यस्पर्धा भरवली आणि जिंकणार्या तीन जणींना 'माऊली सुंदरी' हा किताबसुद्धा दिला. या स्पर्धेच्या फेर्याही आगळ्यावेगळ्या आणि बक्षिसेही आगळीवेगळी. त्यांचे वर्तन, पाककला, इतर कलागुण, इतरांबद्दलचा जिव्हाळा या सर्वांवर आधारित गुण त्यांना देण्यात आले आणि त्यातून तीन सौंदर्यवती निवडण्यात आल्या! जिंकल्याबद्दल त्यांना हॉटेलमध्ये जेवण, मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट, नवीन कपडे देण्यात आले!
महिला दिनाला कर्तृत्ववान स्त्रियांबद्दल आपण वाचतो, ऐकतो. पण समाजातल्या उपेक्षित स्त्रियांना कर्तृत्ववान बनवण्याचा ध्यास घेणारे हे दांपत्य! महिला दिनानिमित्त अनाहिताच्या या अंकात त्यांच्याबद्दल लिहिणे हा अनाहिताचा सन्मानच आहे!
(सर्व फोटो डॉ. धामणे यांच्याकडून साभार)
प्रतिक्रिया
8 Mar 2017 - 11:48 pm | पैसा
नतमस्तक आहे! यांची ओळख करून दिल्याबद्दल रूपी, धन्यवाद!
9 Mar 2017 - 10:20 am | प्रीत-मोहर
भरून आलं हे वाचताना. खूप छान लोकांची ओळख या अंकाच्या निमित्ताने होत आहे. धन्यु रुपी!!
9 Mar 2017 - 11:14 am | सविता००१
अतिशय छान ओळख, रुपी
9 Mar 2017 - 11:58 am | हेमंत८२
एकदम भावपूर्ण सदर,
कृपया जर कोणाला देणगी वैगैरे देण्याची उच्च असेल तर कोठे द्यावी आणि जर त्यांचं पत्ता किंवा काही संपर्क क्रमांक असेल तर देण्यात यावा. जेणेकरून भेट देता येईल.
10 Mar 2017 - 11:23 am | रुपी
धन्यवाद!
डॉ. धामणे फेसबूकवर आहेत आणि 'माऊली सेवा प्रतिष्ठान'चा गूगलवर शोध घेतल्यास वेबसाइटही मिळेल. त्यांचा जी-मेल आयडी त्यावर आहे, त्यावरही संपर्क करु शकता.
11 Mar 2017 - 4:52 am | जुइ
आताच हे वाचले. धन्यवाद!
9 Mar 2017 - 10:11 pm | कौशी
धन्यवाद रूपी...
10 Mar 2017 - 2:13 am | रेवती
किते मोठं काम आहे हे!
10 Mar 2017 - 2:20 am | पद्मावति
नतमस्तक! नतमस्तक!!!!
10 Mar 2017 - 12:35 pm | सुचेता
खरच , किते मोठं काम आहे हे!
11 Mar 2017 - 4:51 am | जुइ
मन खूप हेलावून गेले धामणे दांपत्याच्या कार्या बद्दल वाचून. यांना मदत करायला काही संपर्क असल्यास अवश्य द्यावा.
11 Mar 2017 - 5:39 am | इडली डोसा
त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. नतमस्तक _/\_
डॉ. धामाणे यांना इथे संपर्क करता येईल.
11 Mar 2017 - 10:45 am | रुपी
दुव्यासाठी धन्यवाद!
11 Mar 2017 - 5:42 am | इडली डोसा
डॉ. धामाणेंचे कार्य सगळ्यांसमोर आणल्या बद्दल रूपीला खूप खूप धन्यवाद!
11 Mar 2017 - 2:02 pm | स्वप्नांची राणी
किती सुन्नं करणारे अनुभव आणि किती मोठं काम य दांपत्याचं...त्रिवार अभिवादन!!!!
रुपी ही ओळख करुन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!
11 Mar 2017 - 4:18 pm | इशा१२३
+ फारच मोठ कार्य आहे.केवढे कष्ट घ्यावे लागले असतील यासाठी कल्पना करवत नाहि.अतिशय आदर वाटतो अशा लोकांचा.
11 Mar 2017 - 4:47 pm | मोनू
नतमस्तक या दांपत्यापूढे! सुन्न करणारे अनुभव...अशा अभागी स्त्रीयांसाठी ते साक्षात देवदूत आहेत. त्यांची ओळख करून दिल्याबद्दल खूप खूप आभार रुपी.
14 Mar 2017 - 11:02 am | अभिजीत अवलिया
फार मोठे काम !!!
14 Mar 2017 - 12:46 pm | मनिमौ
पण यांच्या कार्याची ओळख करून देणारा लेख आला होता. परत नव्याने वाचून पुन्हा थक्क झाले मी
14 Mar 2017 - 5:35 pm | कविता१९७८
छान लेख, छान कार्य
14 Mar 2017 - 5:48 pm | अभ्या..
अरे, हि खरी माऊली.
त्यांचा पत्ता घेतला आहे.
धन्यवाद.
14 Mar 2017 - 8:06 pm | अजया
_/\_
15 Mar 2017 - 9:32 pm | स्वाती दिनेश
ह्या दांपत्यापुढे नतमस्तक.
रुपी, ही ओळख इथे करून दिल्याबद्दल तुझे आभार,
स्वाती
16 Mar 2017 - 3:20 pm | कवितानागेश
माणुसकी जपलेली माणसे!
खूपच ग्रेट!
16 Mar 2017 - 5:06 pm | पुष्करिणी
धामणे पती-पत्नींचे कार्य सगळ्यांसमोर आणल्या बद्दल अनेक आभार,
नतमस्तक
16 Mar 2017 - 7:30 pm | निशदे
उत्तम लेख. डॉक्टरांच्या कामाची ओळख करून द्यावी तितकी थोडी आहे.
या वर्षीच्या उपक्रमाद्वारे आम्ही माऊलीसाठी मदत गोळा करत आहोत. अधिक माहितीसाठी खालील धागा पहा.
http://www.misalpav.com/node/39108
यात कोणालाही सहभागी व्हायचे असल्यास मला संपर्क करा.
16 Mar 2017 - 8:50 pm | शलभ
__/\__
18 Apr 2017 - 5:08 am | रुपी
सर्वांना (उशिराने) धन्यवाद!
काही महिन्यांपूर्वी माझ्या आईवडिलांनी 'माऊली'ला भेट आणि मदत दिली होती. या कार्याबद्दल त्यांच्याकडून ऐकल्यापासूनच या दांपत्याबद्दल खूप आदर वाटला. असे कार्य कुणीतरी करत आहे याबद्दल कौतुक आणि विशेष वाटत होतं आणि ते अधूनमधून मनात यायचं. आर्थिक मदतीशिवाय आपण काय करु शकतो याचा विचार चालू होताच. या अंकात 'सामान्यातले असामान्य' यात याबद्दलच लिहायचं ठरवलं. खरं तर हा लेख लिहिणं भावनिक दृष्ट्याही अवघड होतं. जितकी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कित्येक वेळा ती वाचताना भरुन यायचं आणि आपण किती हतबल आहोत असं वाटून लिहायलाही जमायचं नाही. पण त्याच वेळी हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यात निदान खारीचा वाटा तरी असावा म्हणून पुन्हा लेखन पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचे.
डॉ. धामणे आणि इतर अनेकांनी यात मोलाची साथ दिली त्यांनाही सर्वांना धन्यवाद.
19 Apr 2017 - 3:50 pm | स्वराजित
_/\_