काSssहे लायेssss परदेssssस

Primary tabs

पलाश's picture
पलाश in लेखमाला
8 Mar 2017 - 6:28 am

.

बदली बदली दुनिया है मेरी।
जादू है ये क्या तेरे नैनन का?

आपलं जग बदलत जातं, हे अगदी खरं!! या बदलाचंं तरुण वयात असणारंं 'नैनका जादू' हे एक कारण भलतंच गोड!! बदलांसाठीची इतर कडू-गोड व्यावहारिक कारणं मात्र अनेक. वाढणारं वय व अनुभव हे या कारणांपैकीचे दोन मानकरी.

नवर्‍याच्या नोकरीत बदली चालू झाल्याने गेली १६ वर्षं घरं आणि गावंही बदलली. अशी एकूण ६ घरं बदलली. घर बदललं की परिसर बदलतो आणि शेजारही. प्रत्येक वेळी वेगवेगळे अनुभव आणि शहाणपण मिळालं. याचंच एक उदाहरण म्हणजे माझी मुंबईतली एक शेजारीण. उत्तर भारतीयांविषयीचे काही पूर्वग्रह ह्या मुलीमुळे मावळले. हिच्या घरी अदबशीर हिंदी ऐकू यायचं. तेव्हा दुसरी आणि चौथीत असणार्‍या तिच्या दोन गोड लेकींनी भातुकली खेळता खेळता त्यांंना लागणार्‍या वस्तूंसाठी 'सामग्री' हा शब्द वापरलेला मला फारच आवडला होता. :) आमची संंवादभाषा हिंंदी होती. दोन प्रकारची हिंंदी!! मराठीची झणझणीत फोडणी दिलेलं माझं हिंदी आणि तिचं निर्भेळ हिंदी. मी वेळोवेळी तिची व्यावहारिक मराठीची शिकवणी पण घेत असे. शाळेतली पाचवी ते सातवीची तीन वर्षं आणि दूरदर्शन व हिंदी चित्रपट यातूनही मिळवलेल्या हिंदीचा तिच्याशी बोलताना चांगलाच कस लागे. पावसाळ्यात एकदा "माश्या फार झाल्यात!" असं म्हणायचं असताना 'मख्खियाँ'ऐवजी शब्द न आठवल्याने ऐन वेळी 'मच्छियाँ' असं म्हणाले होते. :D नंतर लक्षात आला गोंधळ, पण तोवर मी चुकीचा वापरलेला शब्द तिने बरोबर करून ऐकला होता आणि "आप गलत हो"च्या व्यत्ययाच्या पाटीविना बोलणं चालू होतं. मग मीपण झाकली मूठ सव्वा लाखाचीच ठेवली. अशा गमती उभय पक्षांकडून होत. व्यक्त होताना किरकोळ अडचणी येत, पण आम्ही तरीही बोलणं काही सोडलं नाही. अगदी व्यवस्थित कळायचं आम्हाला एकमेकींचं बोलणं!! :)

मुंबईत एका वर्षभरासाठी मला सौ. कुसुम हिचा शेजार लाभला. त्यानंतर अजिबात संपर्क नाही. हा असा विषय आला की गदिमांच्या गीतरामायणातल्या 'पराधीन आहे जगती' या गाण्यातल्या
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा ।।

या ओळी हटकून आठवतात आणि सुधीर फडके यांच्या आवाजात ऐकूही येतात. ऐकू आल्या तरी सध्या डोळे काही वर्षांपूर्वीसारखे पाणावत नाहीत. हा बदल वय आणि अनुभव वाढल्यावर येतो त्या खंबीरपणामुळे की कोरडेपणामुळे, ते नक्की कळत नाही. :।

माहेर व सासर दोन्ही उत्तर भारतातल्या एका राज्याच्या राजधानीत असलेली ही मुलगी. एक भिंत सामाईक असलेली आमची जुळी घरं होती. थोडी ओळख वाढल्यावर कुसुम मोकळेपणे बोलायला लागली. नवर्‍याच्या बदलीमुळे मुंबईत आल्यावर तिने आयुष्यात पहिल्यांदा अगदी रोजच्या भाजीपाल्याइतकी छोटी वस्तूसुद्धा एकटीने जाऊन विकत आणली होती. याची कथा ती सांगत होती. "आमच्याकडे लग्नाआधी भाऊ व वडील व नंतर दीर व सासरे अशी पुरुषमाणसंच बाहेरची सगळी कामे करतात. बाई खरेदीला गेली तरी जाताना त्यांच्यापैकी कोणी सोबतीला हवेच. इथे मुंबईत नवरा नोकरीसाठी दूर अंतरावरून घरी फार उशिरा येतो. त्याला ही सगळी बाहेरची कामं करायला वेळ मिळत नाही. घरात दूध, भाजीपाला असं सगळं नाही आणलं, तर स्वयंपाक कसा करणार आणि घर कसं चालवणार? बाहेर एकटीने जाऊन सामान आणणं भागच पडलं. दोन्ही घरी, सासरी व माहेरी, लोक खूप काळजीत होते. मीसुद्धा घाबरले होते. पण कोपर्‍यावरून भाजी, किराणा आणणं जमवलं एकदाचं! आता वर्षभरानंतर मी कधीकधी लोकलने नवर्‍याच्या आॅफिसपर्यंत इतक्या लांब एकटी जाऊ लागले आहे." हे बोलताना मोठ्या अभिमानाची व आत्मविश्वासाची चमक तिच्या चेहर्‍यावर दिसत होती.

हे ऐकून मी आश्चर्याने पाहतच राहिले तिच्याकडे. नवीन असताना मुंबईत लोकलने एकटीनेच काय, कोणी सोबत असतानाचा प्रवास ही मोठी अवघड गोष्ट वाटते, ही अगदी सोळा आणे पटण्यासारखी बाब! पण दिवसाउजेडी काही खरेदीसारखी दैनंदिन कामं करायला जाणंं अवघड वाटावंं? हे काही गळी उतरेना. वयाने दहा-बारा वर्षांनी माझ्यापेक्षा लहान असलेली, काॅलेजात शिकलेली आणि एका राज्याच्या राजधानीत वाढलेली मुलगी असं बोलतेय??????

माझा चेहरा पाहून तिने आणखी भर घातली. "तिकडे माझी सासूही अजून अशी एकटी जात नाही. आताही माझ्या सासूला नवीन बांगड्या जरी भरायच्या असतील, तरी सासरा किंवा तिच्या दोन मुलग्यांपैकी कोणीतरी सोबत असायला लागतात. त्यांचं असं, तर आमचं काय? गावातच माहेरी जायचं असेल तर एक तर वडील/भाऊ किंवा या घरातला कोणी पुरुष सोबत हवा. असं घरचं पुरुषमाणूस सोबत नसताना जाऊ नाही शकत आम्ही कुठे! त्यांचंही बरोबर आहे. तशी पद्धत आहे आणि परिस्थितीपण." सासूबाईंना बांगड्या भरायला जाण्यासाठी पूर्ण करायला लागणारी अट कळल्यानंतर सूनबाईंचं आधीचं सगळं बोलणं अगदी नीटच कळलं.
त्रयस्थांना कितीही किरकोळ वाटलं, तरी या मुलीने तिच्या सवयीच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडल्यावर, बदलत्या स्थळकाळानुसार हे बदलाकडे नेणारं एक दमदार पाऊल उचललं होतं.

त्या एक वर्षाच्या काळात तिथल्या स्त्रीजीवनाविषयी बरीच नवीन माहिती मिळत गेली. उदाहरणार्थ, मुलाच्या हुद्द्याप्रमाणे हुंडा वाढत जातो. चांगल्या सरकारी नोकरीतल्या कारकून माणसाला तीन ते पाच, तर अधिकारी माणसाला आठ ते दहा मिळतो. (हे आकडे आहेत लाखातले आणि ही गोष्ट आहे २००२ सालातली! आजचे काय आकडे आहेत ते देवच जाणे.) या रोख रकमेशिवाय सोनं वेगळं. जेवणातला मेनू बर्‍याच अटींसह वरपक्ष ठरवणार आणि नंतर त्यात सतरा खोडी काढून दंगा घालणार, ही अगदी सवयीची घटना. फ्रीज, वाॅशिंग मशीनपासून सगळा संसार मुलीला लग्नात द्यायचा म्हणे. लग्नाआधी पंधरा दिवस घरची पाहुणेमंडळी जमतात. त्यांनी फक्त मौजमजा करायची. कपडे, दागिने, मेंदी ही महत्त्वाची कामं! आलेल्या बायकांनी हाताला मस्त मेंदी लावून बसायचं. जेवणाचं ताटही तुम्ही जिथे असाल तिथे आणून देण्यासाठी माणसं ठेवलेली असतात.

असं सगळं या पद्धतीचं ऐकल्यावर मग मी विचारलेल्या "इतक्या सगळ्या खर्चाचं कसं जमवतात?" या प्रश्नाचं "बेटी है तो पैसा पहलेसे जमा किया होता है, या थोडा खेती बेच देते हैं। और एक बात है, बेटेके शादीके समय मिला दहेज बेटीकी शादीपे दे देते है।" हे उत्तर मिळालं. "लेकिन जिसके पास बहुत जादा पैसा, बिकनेलायक खेती या बेटा दोनो न हो वो क्या करे?" यावर "कुछ तो होता ही है।" असंं सोप्पंं उत्तर आलंं.... असं काही बोलणं झालं की ते ऐकताना माझ्या चेहर्‍यावर कल्पनेपलीकडचं ऐकल्यावर येतात तसे भाव यायचे. पाठोपाठ "आजच्या काळातही असंच असेल, तर हे स्त्रीच्या बाजूने बदलायला आणखी किती वेळ लागणार आहे? की हे असंच राहणार आहे?" अशी निराशेचीही पावलं उमटायची. पण सर्वात शेवटी ही इथे येऊन बदलत्या परिस्थितीमुळे बदलते आहे, नवीन गोष्टी शिकते आहे हे लक्षात येऊन बरं वाटायचं. हे सगळं बोलताना ती शांंत व आशावादी असायची. काळाप्रमाणे हळूहळू तोही समाज बदलतो आहे असंही तिचं मत होतं. ती सांगते तर ते खरं असणारच. :)

हे वर झालं ते सगळे लांब चेहेरा करून गंभीरपणे बोलावं असे मुद्दे. पण आमच्या दैनंदिन जीवनात बाकीचेही हलकेफुलके असे काही बदल होत होते. एक उदाहरण म्हणजे आठवड्यातून निदान पाच-सात वेळा तरी घरी मृदुमुलायम पनीर बनवणार्‍या या उत्तर भारतातल्या मुलीकडून मी घरी चांंगलंं पनीर करायला शिकले. तिनेही माझ्याकडून अगदी आपली पुरणपोळी नाही, पण दाक्षिणात्य इडली-सांबार-चटणी शिकून घेतली आणि तिच्या नवर्‍याने तिच्यावर केलेला "तुला या जन्मी चांंगली इडली बनवायला येऊच शकत नाही" हा आरोप पुसून टाकला. :D

.

आज एका तपाहून जास्त काळ लोटूनही पनीरसाठी दूध उकळताना "पनीर बनाना बहुतही आसान है। हम सिखा देते है।" असं म्हणणारी कुसुम हटकून आठवते. :)

काही ना काही कारणांनी ते दिवस अधूनमधून आठवतात, तेव्हा तेव्हा गेल्या चौदा वर्षांत कुसुमसारख्या मुलींपासून सुरुवात होऊन आणखी असेच बदलाचे वारे तिकडेही वाहोत व मुलींंची परिस्थिती सबळ होवो, असं मनापासून म्हणते.

.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

मनिमौ's picture

8 Mar 2017 - 3:53 pm | मनिमौ

ताई. मला कधीकधी मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलय म्हणून महाराष्ट्रात जन्म झाला अस वाटत. आता तुझा लेख वाचून समज दृढ झाला

पद्मावति's picture

8 Mar 2017 - 4:03 pm | पद्मावति

मला कधीकधी मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलय म्हणून महाराष्ट्रात जन्म झाला अस वाटत. आता तुझा लेख वाचून समज दृढ झाला

अगदी अगदी. लेख आवडलाच.

रॉजरमूर's picture

8 Mar 2017 - 4:15 pm | रॉजरमूर

छान लेख ....!
तिकडच्या लोकांची शुद्ध हिंदी मात्र ऐकण्या सारखी असते .

शीर्षक वाचून आधी असं वाटलं की , झी मराठी वर सध्या सुरु असलेल्या त्या भंगार मालिकेवर धागा आला की काय ....?

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2017 - 11:03 am | प्रीत-मोहर

हा हा मलाही असच वाटलं होत. लेख फार छान आहे ताई

हे असं वातावरण अजूनही आहेच. फार नाही १ दिड वर्षापुर्वी नवर्‍याच्या एका मित्राच्या मेवणीच्या लग्नातल्या गोष्टी अजून आठवताहेत. ह्या दोन्ही मुली आणि त्यांचा भाऊ आर्मी किड्स. एकदम मोडर्न. गोव्यात वाढलेली. त्यात आई नसल्याने घरात टिपीकल वातावरण नाही. पण तिथे युपीमधे धाकट्या बहिणीच्या लग्नात गेल्यावर स्त्रीयांनी घुंघटशिवाय रहायचं नाही, एक्टं फिरायच नाही हे नियम. वधुपक्ष नवरदेवाची आणि कुटुंबियांची सम्जुत काढत होताच. पण मोठे जावई देखील मग रुसुन बसले मलाही गाडी हवी!!! आणि जिच लग्न होत होत तिला तिच्या माहेरच्यांचे हाल होत असताना या सगळ्याच कौतुक होत आणि!! तुमची लग्नं पचकी असतात कुणी रुसतच नाही हे आणि वरून.

हात जोडून नमस्कार केला आणि दुसर्‍या दिवशी घरची वाट धरली .

इरसाल कार्टं's picture

9 Mar 2017 - 12:53 pm | इरसाल कार्टं

उत्तर भारतात मीही बऱ्याचदा फिरलो कामानिमित्ताने. अगदी अशीच परिस्थिती आहे काही ठिकाणी.
हुंड्याच्या कथा तर एकाहून एक सरस.
माझ्या ओळखीचा एक तरुण ज्याला एक वाक्यही इंग्रजीत लिहिता येत नाही त्याला प्रिन्सिपल बायका आणि १८ लाख हुंडा मिळाला. मुंबईत नोकरीला आहे एवढेच कारण. तीही बापाच्या जोरावर.

बापरे! हे असं अजूनही भारतात आहे याबद्दल कल्पना नव्हती. परराज्यात जाऊन तेथील नव्या गोष्ती शिकणं ही मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी.
पलाशजी, अब आप भी हमें पनीर बनाना सिखा दिजिए.......क्रिप्या. हमी भी आपकी हटकून आठवण काढेंगे.

अजया's picture

9 Mar 2017 - 8:31 pm | अजया

लेख आवडला ताई!

अशी स्थिती आहे खरी.अवघडच.आपण नशिबवान म्हणायचे.
लेख छान ताई.

अशी स्थिती आहे खरी.अवघडच.आपण नशिबवान म्हणायचे.
लेख छान ताई.

उत्तरा's picture

10 Mar 2017 - 4:20 pm | उत्तरा

छान लेख. आवडला.
त्याचबरोबर माझी तेलुगु मैत्रिण आठवली.. :)

विभावरी's picture

10 Mar 2017 - 5:10 pm | विभावरी

छान लेख!

पैसा's picture

10 Mar 2017 - 7:02 pm | पैसा

हृद्य आठवणी. फार छान लिहिलंस.

आदूबाळ's picture

11 Mar 2017 - 11:19 am | आदूबाळ

काय सुंदर लेख आहे!

स्वाती दिनेश's picture

11 Mar 2017 - 7:40 pm | स्वाती दिनेश

लेख आवडला,
स्वाती

इडली डोसा's picture

12 Mar 2017 - 1:38 am | इडली डोसा

पुरणपोळी, इडली आणि पनीरचे फोटो विषेश आवडले

नूतन सावंत's picture

15 Mar 2017 - 5:57 pm | नूतन सावंत

पालाश,मस्त आठवणी.मुंबईत राहूनही मीही अनेक घरे फिरले.त्या सगळ्या शेजीबाईंच्या आठवणी ताज्या झाल्या.

कविता१९७८'s picture

16 Mar 2017 - 2:15 pm | कविता१९७८

सुंदर लेखन

चिगो's picture

16 Mar 2017 - 4:10 pm | चिगो

गावातच माहेरी जायचं असेल तर एक तर वडील/भाऊ किंवा या घरातला कोणी पुरुष सोबत हवा. असं घरचं पुरुषमाणूस सोबत नसताना जाऊ नाही शकत आम्ही कुठे!

अजुनही मुल झाल्यावर नवरा किंवा सासरचं कुणी घ्यायला आलं नाही, म्हणून माहेरीच राहतात पोरी कित्येक दिवस.. आणि ही सो कॉल्ड उच्चशिक्षीत घरांमधलीदेखील परीस्थिती आहे. पन्नास-साठ वर्षांपुर्वी महाराष्ट्रातदेखील पोरीला न्यायला सासरचे आले नाहीत, म्हणून आयुष्य माहेरीच कुंठत जगणार्‍या बायका होत्या.. :-(

सानझरी's picture

16 Mar 2017 - 4:32 pm | सानझरी

लेख आवडला !!

मदनबाण's picture

17 Mar 2017 - 8:25 am | मदनबाण

सु रे ख ले ख न !
क्षणभर मला अम्माजी आणि ढम्माजीच्या कटकारस्थांनवर लेख आहे की काय ? असं वाटुन गेलं होत ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- We don't talk anymore, we don't talk anymore, We don't talk anymore, like we used to do... (feat. Selena Gomez) :- Charlie Puth [Official Video]

सर्व वाचकांना व प्रतिसाद देणार्‍या सदस्यांना धन्यवाद!!
शीर्षक सध्या प्रसिद्ध असलेल्या मराठी मालिकेच्या नावाशी साधर्म्य असणारे आहे. नायिकेला अपरिचित ठिकाणी करावे लागलेले स्थानांतरण हा मालिकेशी समान धागा जाणवल्यावर सुरवातीला ठरवलेले "बदली बदली दुनिया है मेरी" शीर्षक बदलले. मालिका आवडणारे व मुळीच न आवडणारे हे दोन्हीही गट या शीर्षकामुळे लेख वाचून गेले असे जाणवले. :)
परिस्थिती अजूनही फारशी बदलली नाही हे प्रतिसादांवरून कळालं. हळूहळू का होईना योग्य तो बदल होईल अशी आशा आहे.

जागु's picture

20 Mar 2017 - 12:19 pm | जागु

लेख छान.

अनेक ठिकाणी सुधारणा होत आहेत. ज्यांना अशा रुढी परंपरा पटत नाहीत असे कोणीच नसावेत तिथे ज्यांनी ह्या गोष्टी विरोधात बंड पुकारावा? लवकरच तिथली परिस्थितीत सकारात्मक बदल घडो.

माहेर व सासर दोन्ही उत्तर भारतातल्या एका राज्याच्या राजधानीत >> name?

खूप सुंदर, मनापासून लिहिलेला लेख!