होरपळ

पैसा's picture
पैसा in लेखमाला
8 Mar 2017 - 6:51 am

.

"आई, मनीकडे जाते गं खेळायला."
"ये जाऊन. जेवायच्या वेळेपर्यंत ये, म्हणजे झालं."
"हो, येते गं"

म्हणत आमची स्वारी निघाली रस्त्याकडे. वाटेत रहाटाच्या पाळीवरून विहिरीत डोकावलं नाही, तर पाप लागलं असतं. जरा टाचा उंचावतेय, तोच शेजारचे काका पंप सुरू करायला आले.
"काय बघतेस गं?"

मी फक्त मान उंचावून डोळे विस्फारून हसले. बेड्यातून बाहेर. रस्त्यावर. गोंद्या बैलगाडी घेऊन तरीकडे निघालेला. त्याला वाट दिली. हो, बैलांनी मला शिंग मारलं तर काय घ्या! काही मुलं सायकलचे टायर काठीने पळवत होती. त्यांच्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकून मी वेगाने मनीच्या घराकडे निघाले. वाटेत बैलगाडीच्या चाकोर्‍यांनी रस्त्यात दोन्ही बाजूला घळी आणि मध्ये उंचवटा तयार झालेला. धुळीत टायरचे ठसे आणि मण्यार गेल्याच्या पुसट खुणा. काळजीपूर्वक त्या उंचवट्यावरून चालत राहिले. एवढ्यात मनीच्या परसवाचं बेडं आलंच.

बेड्यातून आत चार दळे पार करून धावत गेले, तर मनीच्या घरच्या मागच्या सोप्यात काहीतरी गडबड दिसली. बरीच माणसं जमली होती. मोठ्या माणसांच्या पायातून वाकून पाहिलं, तर माई - म्हणजे मनीची मोठी बहीण हात-पाय आखडून भिजलेली आणि जमिनीवर पडलेली दिसली. लोक मोठ्याने बोलत होते. कोणीतरी सायकलवरून तरीकडे गेला. डॉक्टरांना आणि त्यांच्याकडे कंपाउंडर असलेल्या बंड्यादादाला बोलवायला.

"काय झालं?"
"अशी कशी पडली?"
"पुन्हा फीट आली का काय?"

तेवढ्यात कोणीतरी आम्हा पोरांना हाकललं, तसे आम्ही खळ्यात जाऊन उभे राहिलो. कोणीतरी सगळं बघितलेली पोरं बोलत होती, त्यावरून थोड कळलं, थोडं डोक्यावरून गेलं.

माई पायरहाटावर बसून पाणी रहाटत होती. तिला फीट आली आणि ती विहिरीत पडली. खळ्यात असलेल्या पांडू गड्याने ती पडताना आवाज ऐकून ओरडत धाव घेतली आणि दोघातिघांनी तिला वेळीच वर काढून वाचवली म्हणे. माई म्हणजे मनीची दोन नंबरची बहीण. ताई लग्न होऊन मुंबईला होती. माई मनीपेक्षा मोठी. तिच्याहून लहान बंड्यादादा. त्याच्याहून लहान मनी आणि मनीहून लहान ठकी. माई काळीसावळी, अगदी शेलाटी आणि मोठ्या मोठ्या डोळ्यांची. अबोलच. कधीतरी आमच्याकडे बघून हसायची तेवढंच. नेहमी घरातली कामं करत गपचूप वावरत असायची. त्यांच्या घरात सगळेच काहीतरी काम करत असलेले.

मनी दर वर्षी न चुकता नापास व्हायची. त्यामुळे मी अचानक तिच्या वर्गात जाऊन पडलेले. शाळेत जाईपर्यंत माझी अ‍ॅल्युमिनियमची नवी पेटी मला भारी वाटायची. पण शाळेत जाता जाता तिचा कंटाळा येऊ लागायचा. सरळ शाळेत जायचा रस्ता मला आवडायचा नाही. पर्‍ह्याच्या बाजूने एकट्याने जाताना भीती वाटायची. मग आधी मनीच्या घरी आणि मग तिथून शाळेत अशी आमचे वरात जायची. मनीच्या घरी रायावळ्याचं, चिंचेचं, साखरी बिटकी असली कसली कसली झाडं होती. दुसरी-तिसरीतल्या मुलीला जगायला अजून काय पाहिजे!

धावत मनीच्या अंगणात जाऊन उभं राह्यलं की बहुधा मनी आंघोळ करत असायची. माई म्हणणार, "आत ये गं, झोपाळ्यावर बस. मनी येतेच आहे." हे नेहमी ठरलेलं. सांगून माई कामाला निघून जायची. जोशीकाका मुंबईला कापडाच्या दुकानात काम करत म्हणे. ते दर वर्षी मे महिन्यात आपल्या घरी यायचे. मनीची ताईसुद्धा यायची. मनीचा भाऊ तरीवर डॉक्टरांच्या दवाखान्यात कंपाउंडर. आणि जोशीकाकू आपल्या चार म्हशी, भाताच्या पेंड्या, उडव्या, गायीला चरवणं असल्या काहीबाही कामात सतत असायच्या.

पण त्यांच्या घराला मस्तपैकी खिडकी असलेली माळ्याची खोली होती. तिथे मनीसोबत तिची चिंध्यांची बाहुली घेऊन छत्रीचं घर करून खेळायला जाम मजा यायची. दादांनी आणलेली डोळे मिटणारी माझी बाहुली घरीच पडून रहायची मग. मनीची धाकटी बहीण सतत आमच्या मागे यायची, हीच एक कटकट. तिला चुकवून मग आम्ही शिताफीने पळ काढायचो. त्यांच्या घरच्या वरच्या बेड्यातून पलीकडे एक दगडी पाळंद होती. तिच्यातून जाताना राम राम म्हणायचं आणि करवंदीच्या जाळ्यांकडे बघायचं नाही, हा आमचा न चुकता नेम. पाळंदीतून गेलं की एका बाजूला रस्ता आमच्या पूर्ण प्राथमिक शाळेकडे जायचा, तर दुसर्‍या बाजूला बापटीणकाकूंच्या घराकडे. त्यांच्याही मुली आमच्या मागे-पुढे शाळेत असायच्या.

मनीच्या साड्या नेसणार्‍या बहिणी, त्यातली एक लग्न झालेली. कंपाउंडर बंड्यादादा, मुंबईला असलेले जोशीकाका हे मला तर सगळं फारच भारी वाटायचं. आमच्या घरात सगळे शाळेत जाणारे. वेळ मिळाला की कुठे स्कॉलरशिपचा अभ्यास कर, पुस्तकं वाच, कुठे गीतेचे अध्याय पाठ कर असल्या तापातून उसंत मिळाली की मी मनीच्या घरी खेळायला धाव घ्यायची. माई अधूनमधून हात-पाय आखडत, तोंडातून फेस काढत फीट येऊन पडायची. मग जो कोण बाजूला असेल तो चप्पल, कांदे काय मिळेल ते घेऊन तिच्या नाकाला लावायला धावायचा. हे सगळ्यांच्याच अंगवळणी पडलेलं.

एकदा खेळता खेळता मला जाम भूक लागली. "घरी जाऊन पटकन खाऊन येते" म्हटलं, तर मनीने साबुदाण्याची खिचडी करायचा बेत केला. तूप नव्हतंच घरात. मग मस्त चुलीवर कढईत गोडेतेलात आमची खिचडी शिजली. खाऊन झाल्यावर आम्ही नेहमीप्रमाणे खळ्यात. आणि माई काळवंडलेली कढई उचलून घासायला न बोलता घेऊन गेली. चुलीजवळ का गेलात म्हणून ती ओरडलीसुद्धा नाही.

त्या वर्षी तुळशीचं लग्न झालं, त्यानंतर कधीतरी मनीच्या अंगणात मांडव पडला. माईचं लग्न लागलं. माईचा नवरा तिच्यापेक्षा अगदीच 'हा' दिसतोय असं म्हणून नाक मुरडत आम्ही जिलबी-मट्ठा आणि मसालेभातावर ताव मारायच्या महत्त्वाच्या कामाला पळालो. दुसर्‍या दिवसापासून माई नवर्‍याच्या घरी अन मनीला घरात जास्त कामं पडायला लागली. ठकी तर तिची पाठच सोडत नसे. एकूण कंटाळवाणा प्रकार झाला आणि मलासुद्धा एकटीने जरा लांब जाता यायला लागलं. मग मनीच्या घरच्या फेर्‍या कमी झाल्या.

थोड्याच दिवसात शाळेत जाताना माई पुन्हा मनीच्या घरी दिसायला लागली. फरक म्हणजे गळ्यात लोंबणारं मंगळसूत्र आणि हातात जरा जास्त बांगड्या. मे महिन्यात मनीची ताई माहेरपणाला यायची. जोशीकाका सुटीवर यायचे. आम्ही मात्र आजोबांकडे जायचे. सुटी संपवून परत आले आणि शाळेत उड्या मारत निघाले, तरी माई आपल्या घरात होतीच. संध्याकाळी घरी येऊन खाणं खाता खाता काहीतरी आठवलं आणि आईला विचारलं, "ती माई अजून कशी गं इथे?" आईने कानावर आलं, ते सांगितलं. त्याचा अर्थ असा की जोशीकाकांनी माईचं लग्न ठरवताना तिला फीट येतात हे तिच्या सासरच्याना सांगितलंच नव्हतं. त्यांनी चिडून तिला एक-दोन फीट्स आल्यावर परत पाठवून दिलं ते कायमचंच.
.
(चित्रस्त्रोत, http://www.jitendrasule.com/about.php# फोटोशॉप करून)

त्या वर्षी वटपौर्णिमेला वडाच्या पूजेला आईच्या पाठून गेले, तर तिथे बाकी बायकांबरोबर माईसुद्धा पूजा करून वडाला दोरा गुंडाळत होती. काही बायका जरा सावरून तिच्याकडे बघत. तर जोशीकाकूंशी आणि तिच्याशी सांभाळून बोलत होत्या. घरी येताना सगळ्या बायकांचं बोलणं कानावर पडत होतं.

"अशी कशी आली ती पूजेला?"
"नवर्‍याने टाकलीय ना?"
"अहो, घटस्फोटाची केस घातलीय म्हणे कोर्टात."

तोपर्यंत आम्हाला जराशी शिंगं फुटून घटस्फोट म्हणजे नवरा-बायकोचं जोरात भांडण होऊन लग्न मोडून टाकणं या माहितीची सामान्यज्ञान म्हणून डोक्यात भर पडली होती. सगळ्याचा जो काय अर्थ माझ्या एवढ्याशा डोक्यात लागत होता, त्यालाही नवर्‍याचं भलं व्हावं आणि सात जन्म नवरा पुन्हा मिळावा म्हणून पूजा करणारी माई एकदम वेगळीच आणि बिचारी वाटायला लागली होती.

नंतर माईला एकदा फीट आली आणि ती पडली ती नेमकी आंघोळीच्या पाण्याला थाळ पेटवलेली तिच्यात. खूप भाजली होती. कितीतरी दिवस जोशीकाकूंच्या घरी अंधारात खाटेवर पडलेली असायची. मनीची कामं आणि ठकीचं रडगाणं संपायचं नाही. बरेच दिवसांनी माई तिच्या अंगावर भाजल्याच्या खुणा घेऊन घरात हळूहळू वावरू लागली. तिच्या हाताची बोटंही एकमेकांना चिकटल्यासारखी वेगळ्याच आकाराची लहान दिसायला लागली होती. मनी आपली जास्त जास्तच कामात असायची. मग मला तिकडे जायचा मनस्वी कंटाळा यायला लागला आणि हळूहळू पर्‍ह्याच्या कडेने जाताना भीतीही वाटेनाशी झाली. मग कधीतरी माझा शाळेत जायचा रस्ताही बदलला. ते वर्ष असंच कधीतरी संपून गेलं.

सुटी संपून शाळा पुन्हा सुरू झाली. मनी त्या वर्षी नापास होऊन खालच्या वर्गात आणि मी पुढे पाचवीत हायस्कूलला पोहोचलेली. आता तर मनीच्या घराकडे मुद्दाम गेलं, तरच ती भेटायची आणि माईसुद्धा. जोशीकाकू कधीतरी म्हणायच्या, "येत जा हो!" पण तोपर्यंत माझं लक्ष दुसर्‍या मैत्रिणींकडे वळलेलं. मनीच्या घराच्या बाजूला जाणं जवळपास बंदच झालं मग.

शाळा सुरू झाली, त्यानंतर त्या वर्षी पाऊस भरपूर पडला. अगदी आठ आठ दिवस ऊन पडत नव्हतं. शेजारच्या काकांच्या शेतात असलेली तळी अगदी वरपर्यंत पूर्ण भरली, तसे लोक तिथे पोहायला जायला लागले.

एक दिवस सकाळी जोशीकाकू घाबर्‍याघुबर्‍या झालेल्या. "माई आली का?" विचारत आमच्या घरून अजून पुढे गेल्या. एवढ्यात तळीवर पोहायला गेलेली कोणीतरी पोरं किंचाळत मागे आली. त्यांना तळीत एक बाईचं प्रेत तरंगत असलेलं दिसलं म्हणून. सगळे तिथे धावले. ती माई होती. तिची होरपळ अशी कायमची संपली होती. एकदम खूप वाईट वाटायला लागलं. अगदी गुरुजी ओरडले तर जेवढं वाईट वाटायचं, त्याहून जास्त वाईट. घशात खूप दुखल्यासारखं वाटायला लागलं. समोर पांडू गड्याने पातेरा गोळा करून पेटवला होता. त्याच्या धगीने आंब्याची पालवी होरपळत होती. तिकडे बघत फ्रॉकचं टोक हातात पकडून उंबरठ्यात बसून राहिले मग नुसतीच.

**********
(सत्यघटनेवर आधारित. नावे बदलली आहेत.)
**********
.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

स्मिता श्रीपाद's picture

8 Mar 2017 - 6:35 pm | स्मिता श्रीपाद

:-(

स्मिता श्रीपाद's picture

8 Mar 2017 - 6:36 pm | स्मिता श्रीपाद

पैताई , छान लिहिलयस असं पण म्हणवत नाहिये.
सत्यघटनेवर आधारित.>> हे वाचुन अजुनच वाईट वाटलं गं

मनिमौ's picture

8 Mar 2017 - 8:06 pm | मनिमौ

एकेकाच्या वाट्याला येतात. माणूस आपला कठपुतळी सारखा नाचत राहतो.

पद्मावति's picture

8 Mar 2017 - 9:08 pm | पद्मावति

लेखनशैली फार सुरेख.
गोष्ट सत्यघटनेवर आधारित आहे हे वाचल्यावर वाईट वाटलं :(

रुपी's picture

11 Apr 2017 - 3:52 am | रुपी

+१

सविता००१'s picture

8 Mar 2017 - 10:30 pm | सविता००१

कशी गं एखाद्याची अशी उगीच होरपळ होते नाही?
अस्वस्थ झालं अगदी

सुचेता's picture

10 Mar 2017 - 1:04 pm | सुचेता

अगदि ग

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2017 - 12:42 pm | प्रीत-मोहर

सत्यघटनेवर आधारित.

हे नस्तं तर बर वाटल असतं. :(

पूर्वाविवेक's picture

9 Mar 2017 - 12:55 pm | पूर्वाविवेक

खूप मनापासून लिहिलं आहेस. कथा म्हणून अगदी उत्तम मांडणी.
गोष्ट सत्यघटनेवर आधारित आहे हे वाचल्यावर काळजात कळ उठली बघ.
एक अशीच एक मिळतीजुळती जुनी आठवण आहे. फरक इतकाच कि त्या मुलीला अंगावर कोड येऊ लागलं होत.

इशा१२३'s picture

9 Mar 2017 - 3:14 pm | इशा१२३

सुरेख शैलीतील कथा ताई. पण सत्यघटना वाचुन वाइट वाटले :(

लेखनशैली खूपच सुंदर पैसाताई...पण घटना मत्र सुन्न करणारी... किती दुर्दैवी आयुष्य.

मंजूताई's picture

9 Mar 2017 - 3:35 pm | मंजूताई

कथा म्हणूनच असायला हवी होती ..... सत्य घटनेवर आधारित ... हम्म . लेखनशैली आवडली.

कविता१९७८'s picture

9 Mar 2017 - 3:54 pm | कविता१९७८

छान लेखन

होरपळलेलचं आयुष्य .कथा आवडली...

धग वाचकांपर्यंत पोचते आहे. ही लेखनशैलीची किमया!! चित्रसुद्धा अगदी साजेसं आहे.

मराठी कथालेखक's picture

9 Mar 2017 - 4:33 pm | मराठी कथालेखक

लेखनशैली आवडली. ..

नूतन सावंत's picture

9 Mar 2017 - 4:36 pm | नूतन सावंत

लेखनशैली झकास.पण ते तेवढं सत्यघटनेवर नसतं तर बरं झालं असतं ग.

म्हणजे लेखन म्हणून चांगलं आहे पण.......

सुबोध खरे's picture

9 Mar 2017 - 6:55 pm | सुबोध खरे

चटका लावणारं वास्तव

अजया's picture

9 Mar 2017 - 7:30 pm | अजया

सत्यघटना :(

ताई खूप छान लिहिलंय ... अशीच एक सत्यघटना जवळून पहिलीये .. :(

आनंदयात्री's picture

9 Mar 2017 - 8:32 pm | आनंदयात्री

गोष्ट आवडली असे म्हणवत नाही. कथावस्तू इंटेन्स आहे, आणि ती तशी आम्हा वाचकांपर्यंत तुम्ही पोचवलीही आहे.
तुमच्या लेखणीतून अजून असे कथाकथन वाचायला आवडेल.

प्रदीप's picture

9 Mar 2017 - 8:55 pm | प्रदीप

छानच आहे, आवडली. तिच्यात एका सहनशील स्त्रीच्या, स्त्री म्हणून होरपळण्याचा भाग आहे हे खरे, पण त्याव्यतिरीक्त गावांतील - निदान काही दशकांपूर्वीचा-- अडाणीपणाही त्यासाठी कारणीभूत आहे, असे वाटून गेले.

पैसा's picture

12 Mar 2017 - 7:33 pm | पैसा

अडाणीपणा होय, होताच. म्हणजे तसे घरातले सगळे कमीजास्त साक्षर असले तरी ते शिक्षण प्रत्यक्षात वापरात येत होते असे नाही. आता या घटनेला ४ दशके झालीत आणि गावातली परिस्थिती काही प्रमाणात बदलली आहे.

मात्र या घटनांमागे अडाणीपणा होता तसे दारिद्र्यही होते. घरात थोडीफार शेती आणि २ म्हशी, गाय असताना लालभडक चहा असायचा आणि ताक असले तरी तूप लोणी नसे. अशी अवस्था या घरात पाहिलेली मला अजून आठवते आहे.

मुलींचे लग्न कसेही करून व्हावे हे कम्पल्शन तेव्हा फारच होते.

त्या सगळ्या घटना आणि त्यामागची गुंतागुंतीची कारणे याचा अन्वयार्थ आता लावणे मला कठीण आहे. त्यामुळे घटनेला धक्का न लावता तेव्हा एका लहान मुलीने जे पाहिले ते तसेच वाचकांच्या नजरेसमोर ठेवले आहे.

काही माणसं सोसायलाच जन्माला येतात नाही?
जसं घडलं तसं साधं सरळ छान लिहिलं आहेस..

ही तर सत्यकथा ...मन सुन्न झाले वाचुन...

प्राची अश्विनी's picture

10 Mar 2017 - 8:05 am | प्राची अश्विनी

बाप रे!

सस्नेह's picture

10 Mar 2017 - 11:58 am | सस्नेह

शेवट काळजात कळ उठवून गेला !

गिरिजा देशपांडे's picture

10 Mar 2017 - 12:41 pm | गिरिजा देशपांडे

आई गं!!!!!!! वाईट वाटलं वाचून आणि अशीच एक दुर्दैवी "माई" आठवली. आता तीच डोळ्यासमोर येत राहणार दिवसभर :(

चित्र कीती वास्तव दर्शी आहे , अशा खुप " माइ " असतील :( , तुझी लेखन शैली फारच जिवन्त आहे :)

उल्का's picture

10 Mar 2017 - 6:25 pm | उल्का

पण वाचताना वाईट वाटत होतं. :(

खूप संयत तरीही खूप संवेदनशील लिहिलं आहेस ताई !

रेवती's picture

11 Mar 2017 - 1:54 am | रेवती

वाचूनच अंगावर काटा आला.

सही रे सई's picture

11 Mar 2017 - 2:06 am | सही रे सई

कोकणातील वर्णन वाचून सुरवातीला खूप छान वाटलं.. लहानपणीची आजोळची आठवण झाली
पण पुढे कथा वाचल्यावर आणि ती सत्यघटनेवर आधारित आहे हे वाचून मन हळहळल.

त्रिवेणी's picture

23 Mar 2017 - 3:08 pm | त्रिवेणी

मलाही सुरुवातीच वर्णन खुप आवडल पण हळूहळू एक करुण झालर लागली कथेला. आई वडिलांची परिस्थितीमुळे का असु देत पण चुक आहे. लग्न थोड उशिरा ठरल असत किंवा आहे ती परिस्थीती सांगायला हवी होती. त्यामुळे माईचे हाल थोडेतरी कमी झाले असते अस वाटत.

पैसा's picture

12 Mar 2017 - 7:39 pm | पैसा

सर्व वाचक आणि प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद! _/\_

शामसुता's picture

16 Mar 2017 - 12:36 pm | शामसुता

काय प्रतिक्रिया देवू कळत नाही. लेखनशैली आवडली पण शेवट वाचून अंंगावर काटा आला.

पुष्करिणी's picture

16 Mar 2017 - 5:14 pm | पुष्करिणी

'सत्यकथा' आहे वाचून फार वाईट वाटलं.
लहान मुलीच्या नजरेनं टिपलेलं वर्णन फार छान उतरलय.

अद्द्या's picture

16 Mar 2017 - 5:28 pm | अद्द्या

सत्यघटनेवर आधारित

हे नसतं टाकलं तरी त्रास व्हायचा तो झालाच असता ..

एका लहान मुलीच्या नजरेतून पाहून सुद्धा घटनेतील गांभीर्य,कारूण्य,होरपळ तीव्रतेने जाणवते.
लेखन शैलीचे वैशिष्ट्य यातूनच सिद्ध होते.
पैसाताई +++१११

एमी's picture

23 Mar 2017 - 6:28 pm | एमी

हम्म....

सपे-पुणे-३०'s picture

12 Apr 2017 - 4:00 pm | सपे-पुणे-३०

शेवट मनाला चटका लावून गेला. उत्तम लेखनशैलीमुळे माईची होरपळ जाणवली.

उपेक्षित's picture

12 Apr 2017 - 8:47 pm | उपेक्षित

पैसा ताई लिखाणात मनातील अस्वस्थता जाणवली.

असो
तुमच्याकडून अजून खूप लिखाणाच्या प्रतीक्षेत असलेला उपेक्षित (तुमच्या गोव्याच्या लेखमालेचा एक पंखा)