गायत्री आपटेकर एक व्यावसायिक कथाकथनकार, थेरपिस्ट आणि लेखिकाही आहे. मोठ्या माणसांचं आणि लहान मुलांचं भावनिक आरोग्य राखणं हे तिच्या कामाचं क्षेत्र, तर गोष्टींच्या माध्यमातून समस्या सोडवायला मदत करणं हे त्याचं स्वरूप. मानसिक आरोग्य आणि त्यासंबंधीची आव्हानं हा विषय लोकांपर्यंत नेण्याबद्दल ती आग्रही आहे.
विशेष म्हणजे गायत्रीने स्वतः वैयक्तिक आयुष्यात नैराश्यावर बऱ्याच प्रयत्नान्ती मत केली आहे. हे करत असताना गायत्रीच्या लक्षात आलं की मदतीची गरज असलेली अशी अनेक निराश माणसं आवतीभोवती आहेत, आणि म्हणून तिने थेरपिस्ट म्हणून काम करायचं ठरवलं. तिच्या अनुभवांबद्दल -
--------------------------------------------------------------
तुझ्या गोष्टीबद्दल आणि त्यातून तू जे काम करतेस त्याबद्दल आम्हाला सांग.
मी माझ्या आईच्या आईवडिलांच्या घरी लहानाची मोठी झाले. माझे वडील सांगतात, लहानपणी मला जेवू घालणं हे एक फार अवघड काम असायचं. एखादी छानशी गोष्ट सांगितली तर मात्र मी आनंदाने जेवायचे. माझ्या लहानपणीच्या बऱ्याचशा आठवणी अशा गोष्टींशी जोडलेल्या आहेत.
गोष्ट ऐकणं प्रत्येकालाच आवडत असतं. आणि त्याहीपेक्षा, प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःचं असं एक कथानक असतं. 'अन्न, निवारा, आणि नाती यानंतर आपल्या आयुष्यात काही महत्त्वाचं असेल तर त्या आहेत गोष्टी.' हे फिलिप पुलमन यांचं वाक्य आहे. मोठी माणसं आपापल्या गोष्टीला घट्ट धरून असतात, त्याच गोष्टी स्वतःला सतत सांगत असतात. उदा., हे मला जमणार नाही, मी फारच सुमार दिसते, मला नेहमीच डावललं जातं, इत्यादी. असंच बरंच काही ते त्यांच्या मुलांनाही सांगत असतात. या नकळत सांगितल्या जाणाऱ्या 'गोष्टीच' हळूहळू त्या मुलांची स्वतःबद्दलची प्रतिमा तयार करत जातात.
स्मॉल टेल्समध्ये या गोष्टी समजून घ्यायला मी त्यांना मदत करते. कथाकथनाचा उपयोग करून घेत मुलांना मोकळेपणे विचार करायला शिकवते, त्यांच्या सर्जनशीलतेशी त्यांची ओळख करून देते. आत्मविश्वास वाढवणाऱ्या, स्वतःवर प्रेम करायला शिकवणाऱ्या त्यांच्या नव्या गोष्टी आम्ही लिहितो. त्यांच्या आनंदी आणि अधिक चांगल्या आयुष्याची ही नवी सुरुवात असते.
कथाकथनातून समुपदेशन हा व्यवसाय स्वीकारण्यापूर्वी तू काय करत होतीस?
मला गोष्टी सांगायाला कायमच आवडतं. चार वर्षांपूर्वी मी ते व्यवसाय म्हणून सुरू केलं. त्याआधीही माझं आयुष्य आणि रिसर्चर म्हणून मी करत असलेली नोकरी छान सुरू होती. तिथे मी छान प्रगतीही करत होते. कॉर्पोरेट क्षेत्रात तुमच्या सर्जनशीलतेला वाव मिळणं कठीण असतं. माझी ही बाजू दुर्लक्षित राहतेय हे मला सारखं जाणवत होतं, नोकरीमधला तोचतोचपणा दिसत होता. याउलट कथाकार समुपदेशक म्हणून काम करताना प्रत्येक दिवस नवा असतो, दररोज नवं आव्हान असतं. त्यामुळेच खूप जास्त मजाही असते. आणि मी स्वतः नैराश्य खूप तीव्रपणे अनुभवलं आहे. त्या काळातल्या मन:स्थितीची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळेच माझ्यासारख्या अनेकांना हवी असलेली उत्तरं शोधायला मदत करणं गरजेचं वाटत होतंच.
मग यासाठी माध्यम म्हणून गोष्टींची निवड कशी केलीस?
या सगळ्याची सुरुवात माझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये झाली. २५-३० उत्साही मुलांना केक कापला जाईपर्यंत कसं गुंतवून ठेवावं, हा प्रश्न मला पडला होता. आणि तीच माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात ठरली. त्या वेळी मी सांगितलेल्या गोष्टी आलेल्या मुलांना आणि त्यांच्या आईबाबांनाही खूप आवडल्या. हळूहळू मी कोणत्याही पार्टीला गेले की मुलांकडून मला गोष्टी सागंण्याचा आग्रह होऊ लागला. त्यांनी मला 'स्टोरीवाली आंटी' हे नावच देऊन टाकलं. अर्थातच मलाही हे सगळं आवडत होतंच. एकीकडे नोकरी सोडण्याचे विचार मनात येत होतेच. मुलांसाठी काहीतरी करावं असं वाटत होतं, पण काय ते समजत नव्हतं. त्याच सुमारास मी 'टॉल टेल्स'चे संस्थापक मायकेल बर्न्स यांच्या कार्यशाळेत सहभाग घेतला. या कार्यशाळेनंतर मात्र मला नेमकं काय करायचं आहे हे माझ्यासमोर स्पष्ट झालं.
व्यवसाय म्हणून हे काम करण्याच्या तुझ्या प्रवासातले टप्पे कोणकोणते होते? तुझे मार्गदर्शक, प्रशिक्षक यांच्याबद्दल काय सांगशील?
शिकणारा तयार असला की शिकवणारा आपोआपच भेटतो, तसंच माझंही झालं. माझ्या सर्वच प्रशिक्षकांची मी ऋणी आहे. विशेषतः चेन्नईच्या 'स्कूल ऑफ एक्सलन्स'मधल्या अँटोनियो सोलार जॉन यांच्याकडून मला खूप काही शिकता आलं. इथून मी माझा एन.एल.पी.चा कोर्स (uP!withNLP) पूर्ण केला. तर 'टॉल टेल्स'च्या मायकेल बर्न्स यांच्याकडून मी गोष्टी सांगण्याच्या कार्यशाळेत सहभाग घेतला आणि 'स्मॉल टेल्स'च्या काही कार्यशाळाही घेतल्या. गीता रामानुजम यांच्या 'कथालय'मधून मी या विषयातलं प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्रदेखील मिळवलं. या सर्वांनी माझ्या गोष्टी सांगण्याच्या आवडीचं व्यावसायिक कौशल्यामध्ये रूपांतर केलं. गोष्टी सांगणं हे एखाद्या सतत वाहणाऱ्या प्रवाहासारखं आहे, तो प्रवाह जसा नेहमीच तुमची तहान भागवू शकतो, तसंच गोष्टी तुम्हाला तुमची उत्तरं शोधून देण्यासाठी तत्पर असतात, हे मी शिकत गेले.
या सगळ्याचा उपयोग माझ्या जवळपास असणाऱ्या मुलांसाठी करावा, म्हणून २०१६मध्ये मी 'गायत्री’ज एज्युवर्ल्ड' हे माझं स्वतःचं लर्निंग सेंटर सुरू केलं. इथे मुलांना गुंतवून ठेवतील अशा पद्धतींनी मी त्यांचा अभ्यास घेते. त्यासाठी आम्ही गोष्टींचा वापर करतोच, शिवाय क्रिएटिव्ह थिंकिंग, क्रिएटिव्ह रायटिंग, स्टोरीटेलिंग, या सगळ्या कार्यशाळा सुरू असतात.
'स्मॉल टेल्स'मधल्या तुझ्या गोष्टींमध्ये आणि 'टॉल टेल्स'च्या कार्यक्रमांमध्ये काय फरक आहे?
लहान मुलांसाठीच्या माझ्या गोष्टी काल्पनिक असतात, तर टॉल टेल्समध्ये मोठ्यांच्या आयुष्यात दररोज घडणाऱ्या खऱ्या गोष्टी सांगितल्या जातात. इथल्या वक्त्यांमध्ये व्यावसायिक आणि अव्यावसायिक लेखक, कथाकार, येऊन खऱ्याखुऱ्या, वैयक्तिक गोष्टी सांगतात. तर श्रोत्यांमध्येही ज्यांना स्वतःची गोष्ट सांगायला आवडेल अशीच माणसं येतात.
तुझ्या गोष्टींचा मुलांवर आणि त्यांच्या कुटुंबावर सकारात्मक परिणाम होताना बघणं हा अनुभव कसा असतो?
हा सगळा अनुभवच जादुई असतो! ४-६ वर्षांच्या १० मुलांना तुम्ही रोज गोष्टी सांगताय आणि एक दोन आठवड्यातच तुम्हाला आईबाबांचे मेसेज येऊ लागतात, "गायत्री तू नक्की काय केलंस?? माझी मुलगी आता फळं खायला लागलीय. माझ्या मुलगा आता आम्हाला त्रास देत नाही. दोघा भावंडातल्या मारामाऱ्या आता अगदीच कमी झाल्यात." थेट समुपदेशन करणं लहान मुलांसाठी परिणामकारक ठरू शकत नाही. पण तेच मुद्दे छानशा गोष्टीतून सांगितले की ते त्यांना सहज समजतं, हे यामागचं गमक आहे. गोष्टींमधली ही कायापालट करण्याची, जोडण्याची, मनोरंजनाची, बोध देण्याची, किंबहुना 'बरं' करण्याची जी ताकद आहे, ती फारच आश्चर्यकारक आहे!
इतका मोठा परिणाम व्हावा असं या गोष्टींमध्ये काय वेगळं असतं? समस्या सोडवण्याच्या दृष्टीने यांचा कसा उपयोग होतो?
आपण गोष्टी ऐकतच लहानाचे मोठे झालो. आजीच्या गोष्टींनी आपल्याला नीतिमत्ता, मूल्य यांची जाण दिली, नाही का? त्यातूनच आपण या जगाबद्दल बऱ्याच गोष्टी शिकत गेलो. मी माझ्या मुलांसाठी बहुतांशी हेच करते. मुलांना पूर्वीपासून माहीत असलेल्या गोष्टी घेऊन माझ्या समोर येणार असलेल्या मुलांच्या गटानुसार मी त्यात बदल करते. एकच कथा वेगवेगळ्या गटासमोर, भिन्न वयाच्या मुलांसमोर वेगवेगळ्या तऱ्हेने सादर केली जाते. 'स्व'चा स्वीकार, दयाळूपणा, दादागिरी, अशा एकेका विषयावरच्या कथांचं सादरीकरण या कार्यशाळेत मी करते. या कथांशी मुलं स्वतःला जोडून बघतात, आणि मग फरक घडताना दिसून येतो.
मी पालकत्व आणि मानसिक आरोग्य या विषयांवर नियमित लेखनही करते. फक्त मुलांनाच नाही, तर अनेकदा मोठ्या माणसांनाही थेरपीची गरज असते. मानसिक ताणतणाव वाढतच जात आहेत, आणि मी स्वतः ते अनुभवले असल्यामुळे माझं काम कदाचित जास्त परिणामकारक होत असेल.
यापुढच्या तुझ्या योजनांबद्दल सांग.
मी मुंबईजवळ कल्याणला राहते. इथे मुलांना व्यक्त होण्यासाठी फारच कमी पर्याय उपलब्ध आहेत. पुस्तकं, नाटकं, नाच हे सगळं इथे सहज उपलब्ध नाही. या सगळ्याशी संबंधित नवनवे उपक्रम करून जास्तीत जास्त मुलांना आणि त्यांच्या आईवडिलांना जोडून घेणं यावर मी सध्या लक्ष देतेय. कथाकथन हा अर्थातच या सगळ्याचा पाया असणार आहे. गायत्री’ज एज्युवर्ल्डमध्ये या गोष्टींच्या मदतीने एक मोकळ्या मनाची, सक्षम, आणि तरीही संवेदनशील पिढी घडवण्याचं स्वप्न मी बघते आहे.
प्रतिक्रिया
8 Mar 2017 - 10:15 pm | सविता००१
मस्तच गं. छानच आहे मुलाखत. गोष्टींच्या माध्यमातून नवीन पिढी घडवायची कल्पनाच खूप छान आहे.
9 Mar 2017 - 6:29 pm | प्राची अश्विनी
+11
9 Mar 2017 - 12:53 am | पिशी अबोली
भन्नाट!
9 Mar 2017 - 12:40 pm | प्रीत-मोहर
सही!! गोष्टींमधुन समुपदेशन मस्तच कंसेप्ट आहे.
9 Mar 2017 - 5:16 pm | गिरकी
वेगळंच क्षेत्र ... आवडलं :)
9 Mar 2017 - 7:32 pm | अजया
अतिशय छान घेतलेली मुलाखत आहे ही. इनि राॅक्स!
9 Mar 2017 - 9:01 pm | सही रे सई
छानच लेख आहे .. कथाकथनातून समुपदेशन ही कल्पना मस्त आहे आणि त्याचा व्यवसाय पण होऊ शकतो हे या लेख मुळे कळलं.
कालच इथल्या लायब्ररी मधे गेले होते ३ वर्ष वय असलेल्या लेकी साठी गोष्टीची पुस्तक आणायला.. तर तिथे या वयाच्या मुलांसाठी पण हजारो पुस्तक होती .. एका पानावर मोठ्ठ चित्र आणि त्या चित्राशी संबंधीत २-४ ओळी गोष्टीच्या अशी ही पुस्तक बघून खूप मजा वाटली आणि हे ही जाणवलं की एव्हढ्या लहान वयातील मुलांसाठी पण त्यांच्या वयाला साजेलशी किती विचार करून गोष्टीची असंख्य पुस्तक उपलब्ध करून दिली आहेत.
तसचं लहानपणी ऐकलेल्या खूप सार्या गोष्टी आणि त्या गोष्टी सांगणारी प्रेमळ माणसं पण या लेखाच्या निमित्ताने आठवली आणि मन प्रसन्न झालं.
10 Mar 2017 - 2:40 am | रेवती
खूपच वेगळा उपक्रम आहे.
10 Mar 2017 - 12:57 pm | सुचेता
कल्पनाच खूप छान आहे.माधुरी पुरंदरे च्या पुस्तकाबद्दल असंच आहे काहिस
11 Mar 2017 - 10:04 am | पैसा
उत्तम कल्पना आणि तिची उत्तम अंमलबजावणी!
11 Mar 2017 - 10:13 am | नूतन सावंत
गोष्टीवेहाल्प्नातून नवा व्यवसाय उभारू शकतो.हे या मुलाखतीतून लक्षात आलं.
इनि,खूप छान मुलाखत.
11 Mar 2017 - 2:59 pm | स्वाती दिनेश
मुलाखत आवडली.
स्वाती
11 Mar 2017 - 3:07 pm | Maharani
एकदम वेगळच क्षेत्र..मुलाखत आवडली
11 Mar 2017 - 3:18 pm | पद्मावति
मस्तच.
मुलाखत आवडली.
24 Mar 2017 - 1:12 pm | बरखा
मुलाखत आवडली. अशा प्रकारे मुलांचे समुपदेशन करने सोपे काम नाही.
'स्टोरीवाली आंटी' यांना एक सलाम.
11 Apr 2017 - 3:21 am | रुपी
मस्त! इच्छा आणि कल्पनाशक्ती असेल तर किती वेगवेगळ्या क्षेत्रांत काय काय करता येतं!