*** *** ***
कंजूस
यांचे सर्व लेखन इथे पाहा
*** *** ***
माथेरान -भिवपुरी ते गारबट
भटकंतीची सुरसुरी आली की ज्या दोनचार डोंगरवाटा ठेवणीतल्या आहेत त्यांपैकी एक माथेरान. इतर -राजमाची, ढाक,भिमाशंकर आणि पेठ. वर्षात कोणत्याही महिन्यात जाऊ शकतो या ठिकाणी. प्रत्येकी दोनतीन घाटवाटा आहेत परंतू माथेरानला बय्राच आहेत. पुर्वी एका वाटेने चढून दुसय्रा वाटेने दुपारी- संध्याकाळी उतरत असे. आता मात्र परतताना टॅक्सी/बसने येतो त्यामुळे घाई होत नाही.
गारबट पॅाइंटमार्गे माथेरानला वर येण्याची बरेच दिवसांपासूनची इच्छा होती. परवा शनिवारी ठरवलेच की जायचेच तिकडून. या ट्रेकमध्ये फक्त पाणी बरोबर नेणे हेच जरुरीचे. बाकी सामानसुमान लागत नाही कारण वर वस्ती न करता परत येणार असतो. सकाळची शनिवारची गर्दी ओसरल्यावर दहाची गाडी पकडून अकराला भिवपुरी रोड स्टेशनला उतरलो तेव्हा हवेत उकाडा नव्हताच. जवळच असलेला बदलापूर - कर्जत रस्त्यावर आलो. इथे एक छोटासा डोंगर आडवा पसरलेला आहे त्यामागे माथेरानचा डोंगर असल्याने दिसत नाही. एका हॅाटेलमध्ये चहा वडा घेऊन गारबटची वाट विचारली.
"इकडून माथेरानला जाता येईल?"
"आहे इथूनच पण ही लांब पडेल. नेरळवरूनच जा."
"भटकायचे आहे फक्त."
"डॅमवरून पुढे वरती गेलात की ठाकरवाड्या आहेत तिथूनच वर जा. चुकण्यासारखे नाही पण संध्याकाळ होईल."
दहा मिनिटांत डिकसळ गावातला हा डोंगर चढून वर आलो तर हा मोठा जलाशय.
फोटो
पाली भुतवली धरण
पाली भुतवली डॅम. तलावाच्या मागे दूर दिसणारे माथेरानचे गारबट,माउंट बॅरी आणि पॅनोरमा पॅाइंट्स.
आता मार्चमध्येही भरपूर पाणी आहे. मागच्या बाजूला माथेरानचा गारबट पॅाइंटचा भाग दिसतोय आणि उतारावर वाड्या दिसताहेत. एक दोन गावकरी भेटले.
" इकडून फार लांब पडेल हो."
"तुम्ही कुठले?"
"सागाच्या वाडीतले."
ऊन पार लागत नव्हते पण तलावाकाठी उंच झाडेच नाहीत. कधीकाळी असावीत. डॅमच्या काठाने (डॅम उजवीकडे ठेवून) चालत राहिलो. वीसेक मिनिटांत धबधब्यापाशी पोहोचलो. इथेच पावसाळ्यात फार गर्दी होते. इथे उजवीकडचा पहिला चढ चढला की सागाची वाडी.
सागाची वाडीवरून दिसणारा डॅमचा भाग
वाडीच्या रस्त्यावर एक स्कुटर दिसली म्हणून विचारले "कुठून आहे रस्ता? "
"ती समोर जुमापट्टी दिसतेय तिथून/ भोरीच्या वाडीतून आहे."
"पाणी?"
"पुढे बावडी आहे. जूनपर्यंत राहाते पाणी. तिथूनच वर जा. नायतर पुढची भोरीची वाडी आहे तिथून गारबटच्या खालच्या टेपावर. मागच्या बाजूस गारबटवाडी आहे तिथून वर चढून अमन लॅाज स्टेशन आणि दस्तुरी नाका."
आता दोनशे मिटर्स वर आलो होतो. अजून साडेचारशे बाकी. विहिरीतले पाणी काढून तोंडावर मारले. इथून वर न जाता आडव्या कच्च्या रस्त्याने पुढच्या भोरीच्या वाडीत पोहोचलो.
"इकडे शाळा ?"
" पाचवी - सातवीपर्यंत इथे सागाच्या वाडीतच जातात मुले. नंतर समोर जुमापट्टीतल्या /कडावच्या आश्रमशाळेत."
"आमची लोकं वर माथेरानला जाऊन येऊन कामाला असतात."
गायी गुरं गुटगुटीत दिसत होती. हवा एकूण छान. एक कुत्री आणि तिचं पिल्लू मागे आले. पोळी देऊन पिल्लाची खाऊन झाल्यावर कुत्रीने पिलाला मागे हाकलले आणि बरोबर येऊ लागली.
आणखी एक चढ चढून टेपावर पोहोचलो
अगदी वर आल्यावर
गारबटच्या खालचा टेप. इथून गारबट दीडशे मि वरती आहे.
गारबट पॅाइंटच्या खाली आल्यावर एक पायवाट खडी वरती पॅाइंटला जाताना दिसते पण तिकडे न जाता एक कच्चा रस्ता वळसा घालून गेला आहे ( गारबट उजवीकडे ठेवून) त्याने निघालो आणि लगेच गारबट वाडीत पोहोचलो. तिथे काही मुले पाइपातल्या पाण्याने अंघोळ करत होती.
"पाणी पिण्याचे आहे का?"
"हो काका, पण गरम आहे."
"गरम?"
"वरून माथेरानवरून पाइप टाकलाय, इथे बावडी न्हाई."
पाणी भरून घेतले आणि एका छान वाटेने वर गारबटच्या वाटेला चढून गेलो. इथे मात्र गार झाडी लागली. माकडंही होती.
चढ संपून गारबटच्या दाट झाडीत शिरताना.
सूर्य अजून बराच वर होता. माथ्यावरचा गारवा जाणवू लागला. एका शेकरूने दर्शन दिले. शामा पक्षाचे गाणे ऐकू येत होते.नंदननाचण (पॅरडाइज फ्लाइ कॅचर ) पांढरी शेपटी उडवत चिलटं पकडण्यात मग्न होता.
माकडांचा फांद्यांवरचा हैदोस. बार्बेटचे कुटुरकुटुर सुरू झाले आणि माथेरानात आल्याची पावती मिळाली.
कुटरू
(गारबटचा डोंगर हा माथेरानचा एक वेगळा पूर्वेकडचा बाहेर आलेला भाग आहे. अमन लॅाजकडून बाजाराकडे रुळातून जाताना लगेचच एक वाट डावीकडे जाते तिला पुढे दोन फाटे फुटतात. डावीकडची गारबट पॅाइंट कडे आणि उजवीकडे गारबटवाडीकडे खाली जाते.)
कुत्रा
ती कुत्री अजुनही बरोबरच होती.
पाच वाजता अमन लॅाजपाशी आलो. चांगले फलाट, वरती मोठी शेड ( हे उगाचच वाटलं) उभारली आहे परंतू मार्च २०१६ पासून मिनी ट्रेनची शिट्टीच ऐकली नाहीये. सगळं भकास वाटतय. दस्तुरी नाक्यावरच्या हॅाटेलात पाव घेऊन कुत्रीला खायला घालावा असा विचार केला पण तिथल्या पाचसहा कुत्र्यांना घाबरून ती परत गेली बिचारी. माथेरान -कर्जत बस येण्यास थोडा अवकाश होता. चहा वडा खाऊन स्टॅापवर येताच बस आलीच. वीस मिनिटांत नेरळ स्टेशनला ( मेन रोडला सोडतात) आलो. ६.४४ च्या ट्रेनने परत.
रूट ट्रेस :-भिवपुरी रेल्वे स्टेशन - पाली भुतवली धरण - सागाची वाडी - भोरीची वाडी - गारबट वाडी - गारबट पॅाइंट - अमन लॅाज - दस्तुरी नाका माथेरान ट्रेक. सकाळी अकरा ते पाच.
भिवपुरी स्टेशनपासून दस्तुरीटर्यंतचा रूट
रूट डेटा. ( अमन लॅाज स्टेशनची पाटी 758 meters elevation दाखवत होती तिथे माझ्या मोबाइलच्या gpsने 689 meters दाखवले. )
प्रतिक्रिया
9 Mar 2017 - 7:12 pm | प्रचेतस
मस्त भटकंती काका.
रखरखाट मात्र खूपच दिसतोय. बार्बेटचा आवाज छान पकडलाय.
9 Mar 2017 - 7:13 pm | सत्याचे प्रयोग
मस्त , फोटो पण मस्त एकूण ५ तास ४६ मिनिटे लागलीत काय
10 Mar 2017 - 4:15 pm | कंजूस
होय. भिवपुरीपासूनच रूट ट्रेस चालू करून बॅकग्राउंडला अॅप चालू ठेवले ते दस्तुरीला बंद केले. वर पोहोचण्याची घाई करत नाही.
9 Mar 2017 - 7:26 pm | अजया
तुमचा लेख वाचून आमचा मागच्या वर्षीचा वन ट्रि हिलचा ट्रेक आठवला.
मी मरत मरत पूर्ण केला! त्यामुळे तुमचा अॅपचा फोटो बघून _/\_!
10 Mar 2017 - 4:32 pm | कंजूस
अगदी थंडीतही चालताना ऊन लागतेच. टोपीपेक्षा काळी छत्री वापरल्यास डीहाइड्रेशन होत नाही. काही खाणे झाल्यावर दीड तासानेच ट्रेक सुरू केल्यास दमायला होत नाही. वाटेत केळी खावीत.
वनट्री ट्रेकमध्ये वनट्री पॅाइंटला चढून आल्यावरही आणखी पाच किमी दस्तुरीपर्यंत चालावे लागते. शिवाय नोव्हे -डिसेंबरला सूर्य त्याच बाजूला असल्याने त्या ओढ्यातले दगड फार तापतात. त्या ट्रेकमध्ये बुरुजवाडीनंतर रामबाग पॅाइंटकडे गेल्यास ऊन कमी लागते.
10 Mar 2017 - 2:26 pm | अत्रुप्त आत्मा
आप का तो जव्वाब नही!
10 Mar 2017 - 7:12 pm | पिलीयन रायडर
मस्तच काका!!
10 Mar 2017 - 9:05 pm | जेपी
मस्त..
11 Mar 2017 - 11:27 am | संजय पाटिल
झकास भटकंति! पण एकटेच गेला होतात का?
11 Mar 2017 - 12:10 pm | कंजूस
होय एकटाच. गेली वीस वर्षं एकटाच जातोय.
11 Mar 2017 - 12:13 pm | संजय पाटिल
_/\_
11 Mar 2017 - 1:04 pm | टवाळ कार्टा
भारी
13 Mar 2017 - 4:08 am | राघवेंद्र
भारी एकदम !!!
13 Mar 2017 - 1:17 pm | एस
भारीच.
14 Mar 2017 - 6:31 pm | जगप्रवासी
तुमच्यासोबत एकदा भटकायची इच्छा आहे बघूया कधी योग येतो ते
14 Mar 2017 - 7:47 pm | कंजूस
मागच्यावर्षी तीन मिपाकर आलेले.
तारीख ठरवा जाऊ. बस/टॅक्सी असल्याने फार ताण न पडता फक्त वरतीच फिरता येईल.
14 Mar 2017 - 7:32 pm | रेवती
मस्त वृत्तांत. फोटूंमुळे त्या दिशेला जात असल्यासारखे वाटले. बार्बेट बर्डचा आवाज ऐकला.
14 Mar 2017 - 10:50 pm | सुमीत
छान झाला ट्रेक, फोटो आवडले. भन्नाट आहात, एकेकटेच जाऊ नका, आम्ही पण येतो.
रुट दिलात ते मस्तच आणि ते पण windows phone वापरून हे तर अजून भारी. असे गूगल मॅप वर timeline वर करता येते.
15 Mar 2017 - 7:23 am | कंजूस
windows phone वर बॅटरी ड्रेन होत नाही,मल्टी टास्किंग - फोटो,रिकॅार्डिंग करता येते. फक्त डेटा ओफ ठेवायचा,व्हिडिओ फार काढायचे नाहीत. दिवसभर टिकते बॅट्री.
14 Mar 2017 - 10:50 pm | सुमीत
छान झाला ट्रेक, फोटो आवडले. भन्नाट आहात, एकेकटेच जाऊ नका, आम्ही पण येतो.
रुट दिलात ते मस्तच आणि ते पण windows phone वापरून हे तर अजून भारी. असे गूगल मॅप वर timeline वर करता येते.
15 Mar 2017 - 10:32 am | नमिता श्रीकांत दामले
मी हा ट्रेक पावसाळ्यात केला होता. सकाळी तलावाच्या काठाकाठानी चालत जायला फारच छान वाटते. वर पठारावर पोहोचलो तर तुफान पाऊस आणि वारा होता. डबे खाताना खूप सर्कस करावी लागत होती सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. मस्त !
15 Mar 2017 - 10:39 am | किसन शिंदे
मस्त !! या वयात तुमच्या एकटे ट्रेक करण्याचं कौतूक वाटतं खूप.
19 Mar 2017 - 9:56 pm | अभिजीत अवलिया
आतापर्यंत एकदाच माथेरानला गेलोय. पण त्या वर्षी पाऊस असा पडलाच न्हवता त्यामुळे खूप कंटाळा आला होता. ह्या वर्षी बघू जमतेय का. पावसाळ्यात आखा की एकदा माथेरानचा बेत.