आकाशाशी जडले नाते - रचना भाटवडेकर

Primary tabs

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in लेखमाला
8 Mar 2017 - 6:29 am

.
.

--(मुलाखत भाषांतरः अजया)

.

आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणी काही स्वप्ने बघितलेली असतात. मोठे झाल्यावर अमुक क्षेत्रात करिअर करायचे किंवा मी तमुक होईन. पण सगळ्यांनाच आपले स्वप्न पूर्ण करता येत नाही. काही वेळेला परिस्थिती साथ देत नाही, तर काही वेळेला आपल्या आवडी बदललेल्या असतात, तर काही वेळेला काळाची गरज आणि त्यानुसार आपल्या गरजा पूर्ण करण्याचा मार्ग बदललेला असतो. फार कमी लोक त्या पूर्ण करतात. खरेच, सामान्यातील असामान्य असे ते लोक असतात. अशीच आपली एक मैत्रीण रचना भाटवडेकर, जिने बालपणी जे स्वप्न पाहिले, ते आज ती जगत आहे... त्या दिशेने वाटचाल करत आहे. सर्वांगाने विचार करून, सॉफ्टवेअरसारखे क्षेत्र, लठ्ठ पगाराची नोकरी सोडून आपल्याला आवड असलेल्या, आवडीपेक्षा तिचे पॅशन असणारे क्षेत्र निवडले. तिच्या या एकंदरीत प्रवासाबद्दल जाणून घेऊ या.

.

प्रश्नः रचना, तुझ्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल आम्हाला सांग.

रचना: मी भारतातून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये बी.ई केलंय. यूएसच्या मेरिलँड विद्यापीठसतून (काॅलेज पार्क) इलेक्ट्रिकल अँड कॉम्प्युटर इंजीनिअरिंगमध्ये मास्टर्स केलंय. यूकेमधल्या मँचेस्टर विद्यापीठामधून मास्टर्स बाय रिसर्च डिग्री इन अॅस्ट्राॅनाॅमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (खगोल आणि खगोलभौतिकशास्त्र) केलं. सध्या मी युनिव्हर्सिटी आॅफ नाॅटिंगहॅम, यूकेमध्ये खगोलशास्त्रात पीएच.डी. करत आहे!

प्रश्नः साॅफ्टवेअर इंजीनियर ते खगोलभौतिकशास्त्रज्ञ (अॅस्ट्रोफिजिसिस्ट) या प्रवासाबद्दल काय सांगशील? याबद्दल आवड कशी निर्माण झाली? सुरुवातीला या क्षेत्रात तुला काही अडचणी जाणवल्या का?

रचना: अगदी लहानपणापासून मला रात्रीचं आकाश बघायला आवडायचं. मी आकाशाकडे तासनतास बघत बसायचे. प्रो. जयंत नारळीकरांची पुस्तकं वाचून मला खगोलशास्त्रात करिअर करावं असं मनापासून वाटायला लागलं. मी जेव्हा बारा वर्षांची होते, आठवीत असेन, तेव्हा मी त्यांचा आयुकामधला IUCAA (Inter-University Centre for Astronomy and Astrophysics, Pune) पत्ता शोधून, त्यांना मला या करिअरसंबंधी मार्गदर्शन कराल का असं विचारणारं पत्र पाठवलं होतं. त्या वयात मला खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी कोणता करिअर मार्ग स्वीकारावा हे माहीतच नव्हतं. बर्‍याच महिन्यांनी मला त्यांच्याकडून पत्रोत्तर आलं. त्यात त्यांनी मला फिजिक्समध्ये किंवा गणितात एम.एस.सी किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजीनिअरिंग कर असा सल्ला दिला होता. ( ते पत्र मी आजही जपून ठेवलंय!)

मग बारावीनंतर मी वेगवेगळ्या सायन्स इन्स्टिट्यूट्समध्ये आणि इंजीनिअरिंग काॅलेजना अॅप्लाय केलं. पण मी दोन कारणांमुळे इंजीनिअर होण्याचा पर्याय निवडला - एक म्हणजे माझ्या कुटुंबातले सर्व सदस्य, माझे काका, भावंडं इंजीनियर आहेत, त्यामुळे हा पर्याय आपोआप जवळचा वाटला. दुसरं - त्या वेळी इंजीनिअरिंगचा पर्याय वापरून मला सायंटिस्ट किंवा इंजीनियर होणं हे दोन्ही मार्ग खुले ठेवायचे होते. आपण बारावीनंतर फिजिक्स / गणित आणि बायोलाॅजी हे सुरक्षित पर्याय इलेक्ट्रॉनिक्स किंवा फिशरी सायन्स वगैरेपेक्षा ठेवतो, तसंच काही मी केलं! एकतर खगोलशास्त्रात करिअर नेमकं काय असेल याची मला खातरी नव्हती. त्यात नोकरी असते का नसते, काय असतं. त्याउलट माझ्या कुटुंबातलं चित्र होतं. इंजीनियर होऊन भरपूर पगार देणाऱ्या नोकर्‍या असणारे सर्व जण. त्यामुळे खगोलशास्त्र करिअर नाहीच जमलं, तर इंजीनिअरिंग हात नक्की देईल ही खातरी होती. मी यूएसला मास्टर्स करायला गेले ते याच विचारधारेतून. पण मी जेव्हा मेरिलँडला मास्टर्स करत होते, तेव्हा मी तिथल्या खगोलशास्त्र विभागात काही प्रोजेक्ट करायची संधी आहे का, निदान अनुभवासाठी म्हणून विचारायला गेले आणि मला नशिबाने NASAच्या डीप इम्पॅक्ट मिशनवर काम करायची संधी मिळाली (यात Tempel1 या धूमकेतूच्या अंतर्भागाचा अभ्यास करण्यासाठी त्यात एक प्रतिघातक म्हणजेच impactor सोडला जातो) आणि मला कळलं की मला अजूनही खगोलशास्त्रातच काम करायची इच्छा आहे. मग माझं मास्टर्स झाल्यावर मी काही काळ भारतात येऊन एका आयटी कंपनीत नोकरी केली. का? तर तोपर्यंत मला कळलं होतं की मी स्पेसक्राफ्ट, उपग्रह यांच्या डिझाईनचं काम इंजीनियरची डिग्री असल्याने करू शकत होते. मला ते अतिशय सुरस वाटलं. पण माझा आतला आवाज सांगत होता की संशोधन हे माझं पॅशन आहे, तेही core scienceमधलं. त्यातल्या डेटाशी खेळणं आणि विश्वाचा अभ्यास करणं या गोष्टींची मला आवड आहे. मग मला परत या अभ्यासात जाणं भाग होतं. यूकेला आल्यावर मी परत एका आयटी कंपनीत जाॅब घेतला. पण या वेळी मला पक्कं माहीत होतं की संशोधनात जाण्यासाठी मला खगोलशास्त्रात पीएच.डी. करणं अत्यावश्यक आहे. मी तसं डायरेक्ट पीएच.डी.साठी नाव नोंदवू शकत होते, कारण माझ्याकडे मास्टर्स डिग्री होती, पण ती खगोलशास्त्राशी संबंधित नव्हती आणि पीएच.डी. हे मुख्यतः फारशा मार्गदर्शनाविना स्वतः संशोधन करण्याचं क्षेत्र आहे, म्हणून मग मला या क्षेत्राचा व्यवस्थित अभ्यास करणं जरुरीचं वाटलं. त्याच्यामुळे मी मँचेस्टर विद्यापीठातून संशोधनातील मास्टर डिग्री मिळवली.

प्रश्नः तुला या क्षेत्रात काम करताना काही अडचणी जाणवल्या का?

रचना: हो, नक्कीच. ते मुख्यतः मला खगोलशास्त्राची पार्श्वभूमी नसल्याने. त्यामुळे मला इतरांपेक्षा खूप जास्त मेहनत घेणं भाग होतं. पण मला खगोलशास्त्राची पार्श्वभूमी नसल्याने आणि इंजीनिअरिंग आणि आयटीची अशी वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी असल्याने माझ्या संशोधनाला ते अडथळा न बनता श्रेयस्करच झालं!

प्रश्नः खगोलभौतिक (अॅस्ट्रोफिजिक्स) म्हणजे नेमकं काय? तू या क्षेत्रात नेमकं कशावर काम करतेयस?

रचना: सोप्या शब्दात सांगायचं, तर खगोलशास्त्र हा आकाशातले ग्रह, तारे आणि आकाशगंगा यांचा अभ्यास आणि भौतिकातले नियम, विश्वाची जडणघडण आणि उत्क्रांती यांचा अभ्यास करायचा एक मार्ग. मी अतिदूरच्या अगदी फिकट दिसणाऱ्या आकाशगंगा शोधणं आणि त्यांचा अभ्यास करणं याचा प्रयत्न करते. संख्येत बोलायचं, तर आपलं विश्व १३.८ अब्ज वर्षांपूर्वी एका बिग बँगमध्ये जन्माला आलं. मी त्यानंतर ४८० दशलक्ष वर्षांनी जन्मलेल्या आकाशगंगांना बघते! आणि यासाठी मी हबल स्पेस टेलिस्कोप, स्पिट्झर स्पेस टेलिस्कोप आणि चिलेमधला the VERY LARGE TELESCOPE (VLT) यांच्याकडून येणारा डेटा अभ्यासते.

प्रश्नः तू मागे म्हणाली होतीस की या क्षेत्रात येण्याचा निर्णय तसा तू उशिराच घेतला, तर त्या वेळी तुझ्या कुटुंबाची काय भूमिका होती? त्यांनी कसा सपोर्ट केला?

रचना: ते अर्थातच सोपं नव्हतं. कारण रूढार्थाने 'सेटल' व्हायच्या वयात मी माझी करिअर बदलायला निघाले होते आणि या बदलण्याचा अर्थ होता रोजच्या जगण्यातल्या अनेक गोष्टींत तडजोडी, त्याग करणं. पीएच.डी. करणं हे काही नऊ-ते-पाचची नोकरी नाही. ते अतिशय ताण आणणारं काम आहे - मानसिक, शारीरिक आणि खरं तर आर्थिकसुद्धा. मी रोज घरी उशिरा येते आणि वीकान्तालाही कामात बुडालेली असते. त्यामुळे मला स्वयंपाक, आवरणं वगैरे या कामासाठी फारसा वेळ देता येत नाही आणि माझ्या नवर्‍याला बरीच कामं करावी लागतात. (हे ढगाला चंदेरी किनार म्हणायचं, कारण तो आता स्वयंपाकात एक्स्पर्ट झालाय ;) मी भारतात असलेल्या माझ्या आईवडिलांना गेल्या दोन वर्षात भेटू शकलेले नाही त्यांची अतिशय इच्छा असूनसुद्धा. हे कठीण आहे. पण खगोलशास्त्र हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे हे ते सुदैवाने जाणतात आणि जर आत्ता मी माझ्या मनाचं ऐकलं नाही, तर आयुष्यात पुढे पस्तावेन हे त्यांना कळतं. पण नक्कीच माझ्या कुटुंबाच्या आधाराशिवाय हे शिवधनुष्य पेलणं माझ्यासाठी शक्यच नव्हतं. मी असं मानते - आय वुड रादर हॅव अ लाइफ ऑफ ओह वेल्स दॅन अ लाइफ ऑफ व्हॉट इफ्स आणि मी माझ्या ध्येयाकडे वाटचाल करताना व्हॉट इफ्स कमी करण्याचा प्रयत्न करतेय :)

प्रश्नः तुझ्या कामाबद्दल (आकाशगंगा / गॅलॅक्सी) जरा आम्हाला माहिती देशील का? विश्वात किती आकाशगंगा आहेत?

रचना: मी आधी सांगितल्याप्रमाणे, विश्वातल्या सगळ्यात पुसट दिसणाऱ्या आणि अतिदूर असणाऱ्या आकाशगंगा शोधणं आणि त्यांचा अभ्यास करणं हे माझं काम आहे. आपलं विश्व 'बिग बँग'मध्ये १३.८ अब्ज वर्षापूर्वी जन्मलं आणि मी त्यातल्या आकाशगंगा बघते, ज्या बिग बँगनंतर ४८० दशलक्ष वर्षांनंतर अस्तित्वात आल्या, जेव्हा हे विश्व अगदीच तरुण होतं!

मग मी हे काम का करते? कारण आपल्याला माहीत नाही या आकाशगंगा कधी, कशा अस्तित्वात आल्या. हे सर्व शोधण्यासाठी अतिदूरचं अवकाश निरीक्षण करणाऱ्या साधनांचा - विशेषतः हबल अवकाश दुर्बिणीचा उपयोग होतो. हबल आपल्याला बिग बँगच्या ४३५ दशलक्ष वर्षं इतकं विश्वरूपदर्शन घडवू शकते. पण तीच त्या दुर्बिणीची मर्यादा आहे. तांत्रिक कारणांमुळे आपण त्याच्या पलीकडचं विश्व बघू शकत नाही. हबलच्या या मर्यादेपलीकडच्या विश्वातल्या आकाशगंगा आपल्याला शोधता याव्या, म्हणून आणि जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST) या २०१८मध्ये कार्यरत होणाऱ्या दुर्बिणीच्या आगमनाआधी जी आपल्याला या हबलच्या मर्यादेपलीकडच्या विश्वातल्या आकाशगंगा शोधायला मदत करू शकेल, २०१३मध्ये 'फ्रंटियर फील्ड्स' म्हणून कार्यक्रम आखण्यात आलेला आहे. फ्रंटियर फील्ड्स आइनस्टाइनच्या रिलेटिव्हिटी सिद्धान्तावर आधारित ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग या प्रणालीवर काम करतं.

ग्रॅॅव्हिटेशनल लेन्सिंग म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचा प्रयत्न करते! खाली चित्रात दाखवला आहे तशा एक ताणलेल्या कापडाच्या तुकड्याच्या मध्यावर एक भलंमोठं कलिंगड ठेवलें, तर कलिंगडाच्या वजनाने या कापडाच्या भागाचा खळगा तयार होईल. आता जर याभोवती आपण एक सफरचंद फिरवलं, तर ते सरळ रेषेत न जाता कलिंगडामुळे जी वक्ररेषा तयार झालेली आहे, तसं फिरलं जाईल. हेच गृहीतक अवकाशातल्या प्रचंड वस्तूंना लागू होतं. भव्य वस्तू स्वतःभोवतीच्या अवकाशात वक्ररेषा तयार करतात. त्यामुळे त्यांच्याजवळून जाणारे प्रकाशकिरण वळून दुसरीकडे दृश्यमान होतात. जेवढी वस्तू भव्य, तेवढी किरणांची वक्ररेषा जास्त, तेवढंच प्रकाशाचं अपवर्तन जास्त. फ्रंटियर फील्डमध्ये आम्ही असे सहा प्रचंड आकाशगंगांचे क्लस्टर / समूह ग्रॅव्हिटेशनल लेन्स म्हणून वापरतो. (ज्यात शंभर ते हजारो आकाशगंगा असतील!) या क्लस्टर्स / समूहांच्या ग्रॅव्हिटी वक्रतेमुळे अतिदूर अवकाशातल्या आकाशगंगांचा अगदी पुसट प्रकाशही वाढवतं आणि यामुळे आपल्याला एरवी न दिसू शकणार्‍या अतिदूरच्या अगदी पुसट आकाशगंगाही दिसू शकतात. तर फ्रंटियर फील्डमध्ये मी हे काम करते आणि खरंच सांगते, मला खूप मजा येते माझ्या कामात!!

,

प्रश्नः विश्वात किती आकाशगंगा आहेत?

रचना: हा खगोलशास्त्रातला एक मूलभूत प्रश्न आहे. नुकताच एक अंदाज होता की दिसू शकणार्‍या विश्वात साधारण १००-२०० अब्ज आकाशगंगा असाव्यात. पण २०१६ आॅक्टोबरमध्ये क्रिस्टोफर कोन्सेलिचे यांच्या टीमने युनिव्हर्सिटी आॅफ नाॅटिंगहॅम इथे केलेल्या संशोधनात दिसून अालंय की बघू शकत असणाऱ्या अवकाशात आधी विचार केलेल्यापेक्षा दहा पट जास्त आकाशगंगा आहेत! आणि हो, हेच क्रिस्टोफर कोन्सेलिचे हे माझे पीएच.डी.चे मार्गदर्शकही आहेत.

प्रश्नः तू हवाईला International Astronomical Unionच्या कॉन्फरन्ससाठी गेली होतीस, माल्टालाही गेली होतीस. तो अनुभव कसा होता?

रचना: मी हवाईला International Astronomical Unionच्या २९व्या सार्वजनिक परिषद सभेसाठी गेले होते. ही सभा दर तीन वर्षांनी भरणारी जगातली सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित खगोलशास्त्रीय सभा असते. मी जेव्हा आॅगस्ट २०१५मध्ये तिला उपस्थित राहिले होते, तेव्हा जगभरातले ४००० खगोलशास्त्रज्ञ तिथे आपलं संशोधन मांडायला घेऊन आले होते. या सभेचं स्वरूप असं असतं की अनेक खगोलशास्त्रज्ञ आपले प्रकल्प / अ‍ॅबस्ट्रॅक्ट्स आयोजक / समितीला पाठवतात आणि त्यांच्या अ‍ॅबस्ट्रॅक्ट्सचं नाव संक्षिप्त सूचीत नोंदवलं गेलं, तर त्यांना आपला रिसर्च / संशोधन तेथे सर्वांसमोर सादर करण्याची संधी मिळते. जेव्हापासून मला खगोलशास्त्र कळायला लागलंय, तेव्हापासून आयुष्यात एकदा तरी या कॉन्फरन्सला उपस्थित राहायचं माझं स्वप्न होतं. मी जेव्हा पी.एचडी.च्या अगदीच पहिल्या वर्षाला होते, तेव्हा त्यांनी या कॉन्फरन्ससाठी अ‍ॅबस्ट्रॅक्ट्स मागवले होते आणि माझी त्यासाठी निवड होणं ही अशक्य कोटीतली गोष्टच होती. जेव्हा मला त्यांचं या कॉन्फरन्समध्ये आपला विषय मांडायचं बोलावणं आलं, ती भावना, तो आनंद मी शब्दात सांगणं अवघड आहे! मी तिथे काहीही करून नुसतीच उपस्थिती लावायला नाही, तर या शास्त्रातल्या, जगातल्या नामवंत लोकांसमोर माझं संशोधन मांडायला जात होते. तिथे मला खगोलशास्त्रातल्या नामांकित रथी-महारथींना - ज्यांना सायंटिफिक पेपर्समधून, आॅनलाइन आर्टिकल्समधून आणि बातम्यांमधून ओळखत होते, त्यांना भेटणं, त्यांच्याशी हात मिळवणं हा माझ्यासाठी अद्भूत अनुभव होता.

.

रचना: माल्टाची काँफरन्स अगदी माझ्या विषयाशी निगडीत होती. त्याच विषयाबद्दल -High redshift galaxies. त्यामुळे ती हवाईपेक्षा खूपच छोट्या प्रमाणात होती. पण ती एकाच मुख्य विषयावर केंद्रित असल्याने मला माझ्या विषयाचे अजून ज्ञान मिळवता आले आणि यावर संशोधन करणाऱ्या इतर लोकांशी चर्चा करता आल्या. मुख्यतः अशा काँफरन्स तुम्हाला सारख्याच क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना भेटवतात, तुमची तुमच्या क्षेत्रातल्या लोकांशी परिचयाचे पूल बांधले जातात, त्याचा अर्थातच नोकरी मिळवायला तसंच संशोधनासाठी जरुर फायदा होतो.

प्रश्नः चिलेच्या (CTIO)Cerro Tololo Interamerikan observatory दिलेलेया भेटीबद्दल आम्हाला काय सांगशील? तुला या भेटीचा कसा फायदा झाला?

रचना: मी माझ्या प्रोजेक्टसाठी ज्या प्रतिमा वापरते त्या हबल स्पाइट्झरसारख्या दुर्बिणीतून येतात. पण या दुर्बीणी अवकाशस्थित असल्याने मला त्यांनी साठवलेला मूळ डेटा मिळत नाही. मी त्यांनी पाठवलेल्या प्रक्रिया केलेल्या प्रतिमा बघते. तसंच त्या अवकाशात पण मी नाही त्यामुळे मी या दुर्बिणी बघू शकत नाहीच! या त्रुटीमुळे मला निरीक्षण करण्याचे तंत्र आणि पध्दती अवगत करण्यासाठी एखाद्या भूतलावर असणाऱ्या दूर्बिणीची गरज पडते. पण भुतलावरुन करायच्या अवकाश निरीक्षणाचा शत्रू आपले वातावरण आहे. ते या अवकास्थित वस्तूंकडून येणाऱ्या प्रकाशावर परिणाम करतं, कधीकधी तर पूर्णपणे ब्लाॅक / अडथळा आणतं. हा त्रास कमी करायला अवकाशातल्या दुर्बिणीशिवाय पर्याय म्हणून अती उंच आणि कोरड्या(पाऊस पाणी टाळायला) हवेच्या ठिकाणी वेधशाळा बांधल्या गेल्या आहेत. चिले देशाच्या उत्तरेला जगातले सर्वात कोरडे अटाकामा वाळवंट आणि अँडीज पर्वत आहे. ही वेधशाळेची जगातल्या सर्वोत्तम जागांपैकी एक आहे म्हणून मी नोव्हेंबर २०१६मध्ये The Dark Energy Survey ची निरीक्षणे घेण्यासाठी तिथल्या (CTIO)Cerro Tololo Interamerikan observatory ला भेट दिली. तिथल्या पर्वतांच्या मंत्रमुग्ध करणार्‍या देखाव्यांशिवाय (२२०७ मिटर्स उंचीवर) मला पुढच्या सहा रात्री दररोज मिल्किवे आकाशगंगेचं दर्शन झालं. तसंच जगभरातल्या खगोलशास्त्रींची भेट झाली आणि रोजच्या जेवणाबरोबरच विज्ञानातल्या विविध गोष्टींवर चर्चा करायला मिळायची हा मोठा बोनस! त्यामुळेच मला खगोलशास्त्राशी ,माझ्या संशोधनाशी जास्त जवळीक वाटायला लागली.

.

.

.

प्रश्नः खगोलशास्त्र व ज्योतिषशास्त्र यात काय फरक आहे?

रचना: खगोलशास्त्र ही विज्ञानाची ती शाखा आहे जी अवकास्थित वस्तू, अवकाश आणि संपूर्ण विश्वाबद्दल भाकितं केली जातात आणि ती वैज्ञानिक कसोट्यांवर पारखली जातात. खगोलशास्त्रज्ञ या अवकास्थित गोष्टींच्या जागा आणि हालचाली यांचा संशोधन आणि निरिक्षण यावर आधारित अभ्यास करतात. म्हणजेच ते नव्या डेटा माहितीवर आणि निरीक्षणांच्या मदतीने स्वतःच्या अभ्यासातल्या सिद्धांतांमध्ये सतत सुधारणा करत असतात. ज्योतिषशास्त्र हे या ग्रहताऱ्यांच्या जागा आणि हालचाली यांचा उपयोग करुन भूतलावर भविष्यात घडणार्‍या घटनांचा वेध घेण्याचा प्रयत्न असतो.

हे एक थोतांड विज्ञान समजले जाते कारण याला कोणतीही शास्त्रीय वैधता नाही. उदा: ज्योतिषी ज्या राशींच्या आधारे पत्रिका तयार करतात त्यात सूर्याची तार्‍यांमध्ये पुरातन काळातली स्थिती दाखवतात जी आता अजिबातच नाही. त्यामुळे पारंपारिक राशींची जी यादी आपण वर्तमानपत्रात वाचतो ती आपण हजार वर्षापूर्वी जन्मलो असू तरच बरोबर ठरते! त्यामुळे ज्या लोकांना ते सिंह राशीचे वाटतात ते खरंतर वृश्चिक राशीचे ठरतात! याचाच अर्थ आताच्या पत्रिका या कालबाह्य झालेल्या माहितीवर आधारित आहेत. सूर्यराशी तर कायम अंदाजच आहे !

प्रश्नः डाॅ. जयंत नारळीकर हे तुझे आदर्श आहेत, त्यांना भेटण्याचा योग आला त्या अनुभवाबद्दल काय सांगशील?

रचना: मला सुदैवाने त्यांना एकदा नाही तर दोनदा भेटण्याचा योग आला आहे. पहिला मी दहावी झाल्यावर तेव्हा IUCAA /आयुकामध्ये त्यांची अपाॅइंटमेंट घेऊन भेटले होते. तेव्हा मी त्यांनी मला पाठवलेले पत्र पण सोबत घेऊन गेले होते :) त्या भेटीचा निव्वळ उद्देश त्यांनी मला पत्रात लिहिल्याप्रमाणे त्यांचा सल्ला खुद्द त्यांच्याकडून घेणे होता कारण मला दहावीनंतर काय करायचे याचा निर्णय घ्यायचा होता. दुसर्‍यांदा भेटले २०१३ मध्ये. यावेळी मी त्यांना मी त्यांचा सल्ला अमलात आणलाय हे फक्त सांगण्यासाठी भेटले! या दोन्ही भेटींचे स्वरूप किती वेगळे होते याचे मला आता नवल वाटते. पहिली भेट अगदीच थोडक्यात आटोपलेली कारण मी खगोलशास्त्राबद्दल अनभिज्ञ होते आणि माझ्याकडे सांगण्यासारखे काहीच नव्हते. पण दुसर्‍या भेटीत मात्र मी माझ्या दृष्टिकोनाबद्दल ,माझ्या संशोधनाबद्दल अगदी सखोल चर्चा करु शकले आणि यावेळेस माझ्याकडे खू प काही सांगण्यासारखं होतं!

.

प्रश्नः अनाहितांना, मिपावाचकांना आणि या क्षेत्रात येऊ इच्छिणार्‍यांना तू काय सांगशील? या काय स्कोप आहे?

रचना: हा सगळ्यात अवघड प्रश्न वाटतोय मला! खगोलशास्त्र हे पूर्णपणे उत्सुकतेवर, कुतुहलावर आधारित शास्त्र आहे. त्यामुळे तुम्ही यात काय करता, का करता अशी जेव्हा सरकारी पातळीवरुन यासाठी लागणारा पैसा पुरवताना विचारणा होते तेव्हाही हे सर्व पटवणे अवघड जाते. त्यामुळे यात उदा: काही आय टि क्षेत्रासारखे खूप नोकर्‍या नाहीत. लोक म्हणतात या अभ्यासाने मानवजातीचा काय फायदा आहे. पण आपण हे विसरता कामा नये की जेव्हा रेडिओलहरींचा शोध लागला होता तेव्हा त्यांना रेडिओ म्हंटले जायचे कारण तेव्हा रेडिओ नव्हतेच! त्या किरणोत्सर्गासारख्या लहरी म्हणून शोध समजला गेला होता. पण आज आपल्याला त्याचे अनेक उपयोग माहिती झाले आहेत. जेव्हा आइनस्टाइन सापेक्षतावादाचा सिध्दांतावर काम करत होता तेव्हा त्याला हे माहीतही नव्हतं की याचा वापर पुढे जिपिएस तयार करायला होईल. डेव्हिड कॅल्पन हा particle physicist याबद्दल काय म्हणतो वाचण्यासारखे आहे. Basic science for big breakthroughs needs to occur at a level where you are not asking "What is the economic again?" but you are asking, "What do we not know and where can we make progress?" त्यामुळे या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना मी म्हणेन की तुम्हाला यात खरोखरच रूची असेल, काही करायची इच्छा असेल तरच या. तुम्हाला याशिवाय आपले दुसरे आयुष्य असू शकत नाही असे वाटत असेल तरच करा. कारण यात शिक्षणाचे एक दशक असेच जाते. चार वर्ष बॅचलर मग दोन वर्ष मास्टर आणि परत चार वर्ष पीएचडी ची. यानंतर पोस्ट डाॅक्टरल जाॅब्ज असतात विविध संस्थामध्ये पण ते काही फार उत्तम पगाराचे असतीलच असे नाही आणि मिळायलाही अवघड. तुम्हाला एक स्वतंत्र संशोधक म्हणून आपली लायकी सिद्ध करावी लागते, सगळं बाजूला सोडून कामाला वाहून घ्यावे लागते. हे अतिशय उच्चदर्जाचे क्षेत्र आहे पण कमी उत्पन्न आणि निरनिराळ्या प्रकारची असुरक्षिततेची भावना यांच्याशी न थांबणारा लढाया या क्षेत्राच्या काळ्या बाजू म्हणता येतील. ( असे अगदी कमी दिवस असतील जेव्हा मला माझी पीएचडी सोडाविशी वाटत नाही ;) जर हा तुमचा ड्रिम जाॅब नसेल तर तुम्हाला अक्षरशः तिरस्कार वाटू शकतो या कामाचा. हे सर्व असतानाही संशोधन तुमच्या आयुष्यात ते अती आनंदाचे क्षणही देऊन जातं हे तितकंच खरं. तुम्हाला सतत वाटत असतं की तुम्ही या विश्वातलं काहीतरी रहस्य शोधुन काढत आहात आणि त्यासारखा दुसरा आनंद नाही!

प्रश्नः भविष्यात या क्षेत्रामध्ये काय करायचे योजले आहेस?

रचना: मला नोबेल पारितोषिक जिंकायला आवडेल :) गंभीरपणे सांगायचं तर आत्ता यावर बोलणे घाईचे ठरेल. मला अजून पीएचडी संपवायला दीड वर्ष बाकी आहे. पण मला याच क्षेत्रात काम करत राहायला आवडणार आहे त्यामुळे यानंतरची पायरी पोस्ट डाॅक्टरल जागांसाठी अर्ज करणे असेल!

प्रश्नः फावल्या वेळेत तूला काय करायला आवडतं?

रचना: मी हायकिंग करते. मला बॅडमिंटन खेळायला, वेगवेगळ्या जागा फिरायला व पुस्तकं वाचायला आवडतं :)

रचना आम्हाला या क्षेत्राबद्दल इतके छान समजावून सांगितलेस, उंच माझा झोका या अनाहिताच्या अंकासाठी सखोल माहिती दिलीस त्याबद्दल तुझे अनेक आभार. खरंय, शिक्षणाला वयाची मर्यादा नसते तसेच आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू ज्या जिद्दीने, ठामपणे विचारपूर्वक पावले उचललीस ते अगदी वाखण्याजोगे आहे. तुझा अनुभव अतिशय प्रेरणादायी आहे. या तुझ्या चिकाटीला आम्हा अनाहितांचा सलाम! तुला तुझ्या क्षेत्रात यश मिळो. तुझ्या पुढच्या वाटचालीस आम्हा सर्वांकडून तुला अनेकोत्तम शुभेच्छा!!

धन्यवाद.

* लेखातील सर्व छायाचित्रे रचना यांची आहेत*
.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

फार छान मुलाखत. प्रश्न आणि तिने दिलेली उत्तरंही . अगदी वाचनीय.

सविता००१'s picture

9 Mar 2017 - 10:37 am | सविता००१

अतिशय सुरेख मुलाखत गं सानू. आपलं कुतूहल आपल्याला छंदात आणि व्यवसायातही बदलता आलं की किती छान.. नाही का? कंटाळा हा फॅक्टरच नाही.
फारच सुंदर, सहज समजेल असं त्यांनी समजावलंय. बेस्ट

पूर्वाविवेक's picture

9 Mar 2017 - 2:34 pm | पूर्वाविवेक

खूप छान !
अतिशय प्रेरणादायी आहे रचनाची वाटचाल. तिच्या चिकाटीला, मेहनतीला सलाम!

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2017 - 5:04 pm | प्रीत-मोहर

मस्त मुलाखत.

मस्त झालीये मुलाखत सानिका ..

पद्मावति's picture

9 Mar 2017 - 9:18 pm | पद्मावति

सुरेख झालीय मुलाखत सानिका. रचनाच्या बुद्धीला , मेहेनतीला सलाम!

उल्का's picture

10 Mar 2017 - 10:54 am | उल्का

खूप आवडली ही मुलाखत.

पैसा's picture

10 Mar 2017 - 10:57 am | पैसा

सुरेख ओळख! आपल्या आवडीला रोजचे काम बनवणे सगळ्यांनाच जमत नाही! छान मुलाखत सानिका आणि अजया!

नूतन सावंत's picture

10 Mar 2017 - 4:50 pm | नूतन सावंत

सानी,खूप सुरेख आणि प्रामाणिक मूूल्ये जपणारी मुलाखत.

नूतन सावंत's picture

10 Mar 2017 - 4:52 pm | नूतन सावंत

अजयाचेही कौतुक,योग्य भाषांतरासाठी.

खगोलशास्त्रा बद्दलची किती तरी माहिती मिळाली या मुलाखती तून .जिद्दीने करियर करणार्या रचनाचे कौतुक वाटते .

खगोलशास्त्रा बद्दलची किती तरी माहिती मिळाली या मुलाखती तून .जिद्दीने करियर करणार्या रचनाचे कौतुक वाटते . +१

हुषार बाई आहेत. इतका पेशन्स ठेवून शिकत रहायचं म्हणजे विषयाबद्दल तितकं प्रेमही वाटायला हवं. लेखन आवडलं.

जव्हेरगंज's picture

11 Mar 2017 - 10:32 pm | जव्हेरगंज

लेख आवडला!!!

मिहिर's picture

11 Mar 2017 - 11:44 pm | मिहिर

छान मुलाखत.

--(मुलाखत भाषांतरः अजया)

मूळ मुलाखत मराठीत नव्हती का?

नाही. रचनाची उत्तरं इंग्रजीत होती. त्यामुळे भाषांतर केले आहे.

Sachind's picture

16 Mar 2017 - 9:30 am | Sachind

Rachna great. Great to read ur interview. Feeling proud to b ur school batchmate(Hadar 95)

कविता१९७८'s picture

16 Mar 2017 - 2:15 pm | कविता१९७८

मस्त झालीये मुलाखत साने

सुचेता's picture

16 Mar 2017 - 10:32 pm | सुचेता

फार छान मुलाखत.

मधुरा देशपांडे's picture

18 Mar 2017 - 11:41 am | मधुरा देशपांडे

छान झाली आहे मुलाखत सानिका आणि अजया ताई...
इतकी कर्तृत्ववान, स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेगळ्या वाटेने जाणारी रचना ताई आणि तिला साथ देणारे तिचे आई बाबा यांना जवळून ओळखते याचा अभिमान आहे...तिला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!!

फार छान आणि प्रेरणादायी मुलाखत. खूप कमी लोकांना स्वतःचे स्वप्न जगायला आणि त्यासाठी इतके कष्ट घ्यायला जमते.

हेडर-फूटरही खूप सुंदर आहेत.