उद्याच्या करियर्स - A Curtain Raiser

इनिगोय's picture
इनिगोय in लेखमाला
8 Mar 2017 - 6:10 am

.

१२ प्रकारची मूलभूत कौशल्यं. करियर्सचे ६००पेक्षा जास्त मुख्य गट आणि त्याच्या दसपट संख्येने उपलब्ध असलेले शैक्षणिक पर्याय

....आणि फक्त एक आयुष्य!

विद्यार्थ्यांसाठी आणि मिड करियर चेंजसाठी करियर प्लॅनिंग करत असताना असं लक्षात येत गेलं की 'अपुऱ्या माहितीवर बेतलेले निर्णय' हे व्यावसायिक असमाधानाचं, अपयशाचं मोठंच कारण आहे. करियरची निवड सहसा नेहमी ऐकल्या-बोलल्या जाणाऱ्या पर्यायांमधून होते. त्यात मुलाला, मुलीला काय आवडतंय, काय जमतंय आणि त्याचा-तिचा स्वभाव कसा आहे, याचा विचार अजूनही फारसा होत नाही. तर मग त्या क्षेत्रात पुढची वीस-तीस वर्षं कोणत्या संधी मिळणार आहेत, किती बदल होणार आहेत हे लक्षात घेऊन करियर ठरवणं तर आणखीनच दुर्मीळ. साहजिकच अपेक्षा आणि क्षमता यांची मोट बांधताना दमछाक होते. हे टाळायचं, तर पहिली पायरीच विचारपूर्वक निवडणं आलं. एखाद्या तज्ज्ञाच्या मदतीने आजचाच नाही, तर पुढच्या दशकभराचा अंदाज घेणं आलं.

आज शिकत असलेल्या मुलांच्या करियर्स आणखी काही वर्षांनी मार्गी लागतील. त्यांच्या आयुष्याचा आकार ठरवणाऱ्या भविष्यकाळातल्या करियर्सचा हा कर्टन रेजर!
------

२००७मध्ये फेसबुक हे नाव फारसं प्रसिद्ध नव्हतं. व्हॉट्स अ‍ॅप या शब्दाचा जन्म व्हायचा होता. आणि टच स्क्रीन काय असतं हे बहुतेकांच्या कल्पनेतही नव्हतं. याच तीन गोष्टींचा आज होत असलेला वापर त्या वेळी कोणाच्या मनातही आला नसेल. अवघ्या दहा वर्षांत आपली संवादाची, संपर्काची साधनं बदलली. तंत्र बदललं. असेच वेगवान - काहीसे भयावह - बदल सगळ्याच क्षेत्रांमध्ये होताना आपण बघतोय. त्याचबरोबर प्रचंड वेगाने त्या त्या व्यवसायांच्या आणि करियरच्या संधीही बदलतायत.

केवळ फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर या सगळ्यांनी शेकडो नव्या करियर्स जन्माला घातल्या आहेत. यात हार्डवेअर तंत्रज्ञ, सॉफ्टवेअर तंत्रज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, माहिती विश्लेषक असे औपचारिक पर्याय तर आहेतच, त्याचबरोबर निव्वळ खरेदी करण्याची, खाण्याची, भटकण्याची, व्हिडिओ गेम खेळण्याची आवड असलेल्यांसाठीही असंख्य करियर्स घडत आहेत. नव्या करियर्स जन्माला येत आहेत, त्याहूनही कितीतरी जास्त निरुपयोगी ठरत आहेत. आज वेगवेगळ्या टॉप १० याद्यांमध्ये असलेले अनेक पर्याय दहा वर्षांपूर्वी माहीतही नव्हते. असं असताना दहा वर्षांनंतरच्या टॉप १० याद्यांमध्ये काय दिसून येईल? काय नाहीसं होईल? म्हणजे आज शिकत असलेली पिढी नोकरी-व्यवसायात शिरेल, तेव्हा चित्र नेमकं कसं असणार आहे?

काय जाईल?

ऑटोमेशन या सर्वपरिचित शब्दापासून सुरुवात केली, तर इंडस्ट्रिअल ऑटोमेशन, प्रॉडक्शन लाइन, फूड प्रोसेसिंगमध्ये झालेले बदल हे आता जुने झालेत. येत्या काळात जी क्षेत्रं संपूर्णपणे स्वयंचलित, स्वतंत्र होतील, त्यात कस्टमर केअर - फ्रंट एंड आणि बॅक एंड दोन्हीचा समावेश असेल. मोबाइल कंपन्या, बँक्स, अर्थसाहाय्य देणाऱ्या कंपन्या, मॉल्स या सर्व ठिकाणी येत्या काही वर्षांतच संपूर्ण स्वयंचलन झालेलं दिसून येईल. इतकंच नाही, तर अकाउंटिंग, कायदे सल्लागार, मालवाहतूक आणि पुरवठा (transport and logistics), सफाई व्यवस्थापन याही ठिकाणी आॅटोमेशन आणि सोबत कृत्रिम बुद्धिमत्ता आपले हातपाय पसरताना दिसत आहे. थोडक्यात, हे सर्वच पर्याय संभाव्य करियर्सच्या यादीतून हळूहळू नाहीसे होतील. (कंपनीने नवीन सॉफ्टवेअर आणल्यामुळे ४०-५० जणांची टीम गारद होऊन त्यातल्या सीए मंडळींच्या नोकरीवर गदा आल्याचं उदाहरण नुकतंच कानावर आलंय.)

काही क्षेत्रामध्ये नोकऱ्या राहतील, पण त्यांचं स्वरूप बदलेल. उदा. आंतरराष्ट्रीय कंपन्यांची सेवा केंद्रं - या क्षेत्रात स्पर्धक वाढल्यामुळे आता या ठिकाणी अनेक बदल घडताना दिसत आहेत. कायमस्वरूपी कर्मचारी कमी करून त्याऐवजी Extended Workforceचा (Cloud Talent Sourcingचा) वापर सुरू झाला आहे. म्हणजेच प्रोजेक्ट्सवर स्वतंत्रपणे काम करता येतंय अशांकडे काम वाढेल. जास्तीत जास्त कंपन्या हा पर्याय स्वीकारून ताळेबंदातला एक मोठाच खर्च कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. याचा आणखी एक परिणाम म्हणजे मानवी संसाधन विभागाचं काम पूर्णपणे पालटताना दिसतंय. पूर्वीसारखं एचआरमधली नोकरी म्हणजे निवांतपणा हे यापुढे समीकरण राहणार नाही.

येत्या १५ वर्षांत आपल्या आयुष्यातून वृत्तपत्रं, लँडलाइन फोन, मोबाइल फोन, क्रेडिट कार्ड, छापील चलन, हार्ड डिस्क आणि पेन ड्राइव्ह्ज, केबल टीव्ही अशी असंख्य उत्पादनं नाहीशी होणार आहेत. आणि अर्थातच त्यांच्याशी संबंधित असंख्य करियर्सदेखील..?

काय बदलेल?

रोटी-कपडा-मकान या माणसाच्या मूलभूत गरजा. त्यापैकी अन्नधान्य उत्पादनाचं तंत्र झपाट्याने बदलतं आहे. ग्रीनहाऊस फार्मिंग, ऑरगॅनिक फार्मिंग हे आजचे चलनी शब्द आहेत. पण ते फक्त आजचे. यापुढचा काळ हा डिजिटल मॅपिंग केलेल्या मातीत ड्रोनच्या निरीक्षणाखाली पिकवलेल्या अन्नधान्याचा असेल. मातीशिवाय पिकवलेल्या, न धुताच खाता येतील अशा हायड्रोपोनिक फळांचा आणि भाज्यांचा असेल. अ‍ॅपच्या मदतीने तुम्हाला हव्या असलेल्या उत्पादनांची शेतातली प्रगती तुम्ही पाहू शकाल, समाधानकारक वाटल्यास मागणी नोंदवू शकाल, आणि ती थेट शेतातून तुमच्या घरी पाठवली जातील. म्हणजेच अॅग्रोइंजीनियरिंग, वेदर अॅनालिसिस, लाॅजिस्टिक्स, इ-काॅमर्स हे सगळं शेतकऱ्याच्या दिमतीला हजर राहील.

तयार अन्न हवं असेल, तर ते ३डी प्रिटिंग करून मिळवण्याचा काळही फार दूर नाही :) या क्षेत्रात सध्या होत असलेली अविश्वसनीय प्रगती पाहता हे सर्वत्र दिसू लागेल, अशी चिन्हं आहेत. गोल्डमन सॅक्सने 'पारंपरिक व्यवसायपद्धती संपूर्णपणे नष्ट करण्याची क्षमता असलेलं कल्पक तंत्र' असं या तंत्राचं वर्णन केलं आहे. आंतरजालाने जसे आपले सर्व व्यवहार अक्षरशः गिळंकृत केले आहेत, तसं हे तंत्रदेखील दररोज नवनवी क्षेत्रं काबीज करत आहे. आतापर्यंत प्रायोगिक तत्त्वावर ३डी प्रिटिंगच्या मदतीने इमारती बांधल्या गेल्या आहेत, अन्नपदार्थाचं प्रिटिंग थोड्याफार प्रमाणावर सुरू झालं आहे. जसजसा याचा वापर वाढत जाईल, तसतशी त्रिमित इमारती बांधणारे - नव्हे, छापणारे वास्तुतज्ज्ञ, '३डी प्रिंट' केलेले अवयव बसवणारे शल्यविशारद, शिक्षणासाठी त्रिमित नमुन्यांची निर्मिती करणारे तज्ज्ञ, या तंत्राने कपडे छापणारे व्यावसायिक अशा अनेक वेगवेगळ्या करियर्सचा जन्म होऊ लागेल. तसंच साध्या प्रिंटरशी ज्या ज्या व्यावसायिक संधी जोडलेल्या आहेत, त्याच किंचित फरकाने ३डी प्रिटींगमध्येही राहतीलच. खुद्द घरबांधणी व्यवसायात घडत असलेले अनेक बदल आजही पाहता येत आहेतच. त्यावरून भविष्यातली स्मार्ट, किंबहुना इंटेलिजंट घरं कशी असतील याचा अंदाज बांधणं अगदीच अशक्य नाही. हे सगळं आज कदाचित साय-फाय कथेसारखं वाटत असलं, तरी पुढची पिढी या सगळ्याचा अनुभव घेताना दिसणार आहे.

याउलट हेल्थ सायन्समधले मानसिक आरोग्याशी संबंधित व्यवसाय अबाधित राहतील... खरं तर वाढतीलच. समूळ बदलत असलेल्या या जगात कुटुंबीय सर्वदूर पांगत आहेत. आप्तेष्ट जवळपास नसल्यामुळे आणि फक्त आभासी नात्यांचाच गोतावळा जमल्यामुळे स्वतःचा तोल राखण्यासाठी काउन्सेलर्स, लाइफ कोच, केअरगिव्हर्स अशा लोकांची गरज खूप मोठ्या प्रमाणावर भासणार आहे. अगदी सध्याचंच उदाहरण घ्यायचं, तर अमेरिकेतून मनाविरुद्ध परत यावं लागलेल्या भारतीय कुटुंबांना इथे सामावून घ्यायची वेळ येईल, तेव्हा या अशा व्यावसायिकांचा आधार आवश्यक ठरेल. दुर्दैवी असलं, तरी यात सायकाॅलाॅजी आणि काउन्सेलिंग या क्षेत्रांमधल्या करियर्स मोठ्या प्रमाणावर दिसून येतील.

स्पर्धात्मक खेळांमध्ये मोठ्या प्रमाणावर आणि नवनवे बदल दिसत आहेत. केवळ खेळाशी संबंधित असलेल्या अनेक व्यवस्थापन पदव्याही आता मिळवता येतात. व्याप्ती वाढू लागल्यामुळे केवळ या एका क्षेत्रातच गेल्या काही वर्षांमध्ये करियरचे १० ते १२ नवे पर्याय जन्माला आले आहेत, आणि त्यासाठी तो खेळ खेळत असणं, संघात असणं हे अजिबात आवश्यक नाही! प्रत्यक्ष न खेळता एखाद्या खेळामध्ये करियर करणं आता फारसं नवं राहिलेलं नाही.

(जाता जाता एक नोंद - किमान ५० विषयांमध्ये एमबीए करता येतं. फायनान्स, एच आर आणि मार्केटिंग हे त्या पन्नासपैकी सगळ्यात जास्त गर्दी असलेले आणि सगळ्यात कमी संधी असलेले पर्याय आहेत.)

काय येईल?

लेखाच्या सुरुवातीला मांडलेला हा सगळ्यात कळीचा मुद्दा. २०२७मधलं जग कोणकोणत्या प्रकारे आपल्याला विस्मयचकित करणार आहे? ग्राहक म्हणून आणि नोकरदार किंवा व्यावसायिक म्हणूनही आपलं आयुष्य कसं असेल? आज दहा-पंधरा वर्षांची असलेली मुलं जेव्हा त्यांच्यासमोर असलेले करियरचे पर्याय निवडतील, तेव्हा ही उत्तरंच महत्त्वाची ठरणार आहेत. इतकंच नाही, तर जी मंडळी आज तिशीत आहेत, त्यांच्यावरही याचे परिणाम होताना दिसतील. कारण करियर हा केवळ एकदा घ्यायचा निर्णय नसून आपण पुढची ३०-४० वर्षं काय करणार आहोत, या प्रश्नाचं उत्तर आहे. ‘नोकरी’ या शब्दाची व्याख्या बदललेली असणार आहे. आणि नोकरी म्हणजे दीर्घकालीन सुरक्षा हे समीकरणही संपलेलं असेल. हवं तिथून काम करण्याची संस्कृती रुळलेली असणार आहे. त्यामुळे 'ऑफिसला जाणं' हा प्रकार फारच कमी झालेला असेल. आणखी एक मोठा फरक पडेल तो स्त्रियांनी आणि पुरुषांनी करायच्या कामांमध्ये. या दोन प्रकारच्या कामांमधलं अंतर झपाट्याने कमी होत नाहीसं होईल. शिवाय जसजसं मनुष्यबळाची जागा उपकरणं घेत जातील, तसतसं पुरुषांनी करायची श्रमाची कामं कमी होत जातील. त्याच वेळी ज्या कामांमध्ये स्त्रिया अजूनही पिछाडीवर आहेत, वरच्या पदांवर पोहोचू शकलेल्या नाहीत, किंवा कमी वेतनावर काम करत आहेत, तिथे परिस्थिती हळूहळू बदलत जाईल.

रिन्युएबल किंवा पर्यायी एनर्जी, रोबोटिक्स, ऑग्मेंटेड रिअ‍ॅलिटी, बायोइंजीनिअरिंग ही सगळी नावं यापुढे वारंवार ऐकायला मिळणार आहेत. 'बिग डेटा'च्या मदतीने ट्रम्प यांनी दिलेल्या धक्क्याची तर अजून बहुतेकांना जाणीवही नसावी. हाही ३डी प्रिटिंगसारखाच अकराळविकराळ क्षमता असलेला आणि अनेक संधी देऊ करणारा एक विषय आहे. कला, संवादमाध्यमं, आर्थिक व्यवहार, आरोग्य या क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडतील. वैद्यकीय सुविधांचा आणि आयुष्यमानाचा दर्जा सुधारल्याने माणसाला बराच जास्त काळ जगता येणार आहे. म्हणजेच ते जगणं सुसह्य करण्यासाठी रोबोटिक केअरगिव्हर्स, अवयवांचं प्रत्यारोपण असे अनेक नवे शोध लावले जातील. मार्केटिंग आणि फायनान्स अशा नोकऱ्यांमध्ये तंत्रज्ञान आणि विश्लेषण अधिकाधिक महत्त्वाचं होईल. कागदी चलन नाहीसं होऊन आभासी चलन त्याची जागा घेईल. क्राउडफंडिंग, शेअर्ड इकॉनॉमी, क्रिप्टोकरन्सी या सगळ्यामुळे आर्थिक व्यवहारांचं रूप पालटेल. अर्थशास्त्रामध्ये नवनवे विषय समाविष्ट होतील. आज शिकवली जाणारी जवळजवळ ३०% कौशल्यं बाद होऊन, त्यांची जागा Spatial Visualisation, Concept Formation, Abstract reasoning अशी नवी कौशल्यं घेतील. आणि हो… या सगळ्या प्रकारच्या मागण्या पुरवण्यासाठी योग्य ते कर्मचारी शोधून देणारी मध्यस्थांची एक नवी जमातही जन्माला येईल!

अवाढव्य जगाचं तळहातावर मावेल असं ग्लोबल खेडं बनताना आपल्या पिढीने ऐकलं आणि प्रत्यक्ष पाहिलंदेखील. 'कनेक्शन'च्या जादुई छडीने हे रूपांतर घडवून आणलंय. 'कनेक्ट' हा आजच्या जगाचा पासवर्ड आहे, आणि पासवर्ड नेहमीच बदलते असतात. या ग्लोबल खेड्याचा नवा पासवर्ड असेल 'आभास'. प्रत्यक्ष वस्तूंची, अनुभवांची जागा त्यांचे आभास घेतील. कपडे विकत घेताना, कार विकत घेताना, अगदी घर घेतानादेखील प्रत्यक्षात पाहणं, हात लावणं वगैरे करावं न लागता त्याऐवजी सिम्युलेटेड, ऑग्मेंटेड रिअ‍ॅलिटीचा उपयोग होईल. त्याचबरोबर जेनेटिक बदल घडवलेलं अन्नधान्य, बायोनिक अवयव, त्याहीपुढे जाऊन कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत सर्व काही प्रत्यक्षात येताना दिसेल. नैसर्गिक बुद्धिमत्ता आणि सुज्ञता टिकवून ठेवणं हे आतापासूनच एक मोठं आव्हान ठरत आहे, ते आणखी कठीण होत जाईल.

थोडक्यात सांगायचं, तर बदल व्हायचे कोणासाठी थांबले नाहीत, यापुढेही थांबणार नाहीत. संपूर्णपणे नैसर्गिक आयुष्य जगलेली पिढी यापूर्वीच संपली. आत्ताची पिढी नैसर्गिक संसाधनांवर जगणारी शेवटची पिढी असेल. २०१७मधलं जग हे कल्पनेपलीकडच्या संधींचं आणि शक्यतांचं आहे. आजच्या जगापेक्षा कैक पिढ्या आधुनिक - बहुतांशी माणसाने (बि)घडवलेलं - असणार आहे. आणि उद्याच्या या विश्वामित्री दुनियेची 'एमिनंट सिटिझनशिप' आपल्या मुलांना मिळावी, यासाठी आत्तापासूनच प्लॅन ठरवायला हवा आहे.

- योगिनी नेने (Parenting Coach and Career Planning Mentor)

.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

पिशी अबोली's picture

8 Mar 2017 - 7:42 pm | पिशी अबोली

हा आवाका वाचून थक्क व्हायला झालं. सगळं bits and pieces मध्ये सतत ऐकू येत असलं, तरी एकत्र वाचून सगळं एकदम जाणवलं.

ट्रेड मार्क's picture

8 Mar 2017 - 10:07 pm | ट्रेड मार्क

ऑटोमेशन येतंय हे कळतंय, पण तुम्ही लिहिलेलं एखाद्या sci-fi मूव्ही सारखं वाटतंय. तुमच्यासारख्या एक्सपर्ट कडून मुलांच्या करिअरसंबंधी सल्ला घेतला पाहिजे.

जाता जाता: यात चाळिशीतल्या व्यक्तींना काही स्कोप किंवा पर्यायी कामधंदा असणार आहे का?

ही सगळी प्रगती फक्त नोक-या हिरावून घेणारी नाही. नव्या नोक-या निर्माण करणारीही आहेच. फक्त यापुढच्या संधी या वय, पदवी यापलीकडे तुम्ही स्वतः काय देऊ शकताय यावर अवलंबून असणार आहेत. काही गोष्टी नव्याने शिकून आणि शिकलेल्या काही विसरून (unlearning) टिकून राहणं शक्य आहेच.

व्यक्तिगत कौशल्यं आणि अनुभव हे दोन्ही तपासून त्याप्रमाणे तिशी चाळिशीतल्या मंडळींसाठी करियर चेंजचं प्लॅनिंग जरूर करता येतं.

आनंदयात्री's picture

9 Mar 2017 - 8:09 am | आनंदयात्री

येऊ घातलेल्या भविष्याचा अतिशय डोळस आढावा, असे या लेखाचे कौतुकमिश्रित वर्णन करता यावे. लेख अतिशय आवडला हे वेगळे सांगायची गरज नाही.

माणसाच्या दीड दोन लाख वर्षाच्या इतिहासात कोणत्याच पिढीने पहिली नसेल इतकी वेगवान प्रगती आणि जीवनशैलीतील आमूलाग्र बदल आपली पिढी पाहतेय, त्यामुळे दर दशकातली स्थित्यंतरं ही तुमच्या वर्णनाप्रमाणे डोळे दिपवणारी आहेत. औद्योगिक क्रांतीपासून सुरु झालेला ऑटोमेशनचा वारू आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे "ऑन स्टिरॉइड्स" धावू लागलेला आहे. ऑटोमेशन करतांना लागणारी माणसाची गरजही कमी कमी होत आहे. आयबीएम वॉटसन* सारख्या कॉग्निटिव्ह तंत्रज्ञानाने मागच्या २०-३० वर्षातल्या 'नव्या' म्हणवल्या जाणाऱ्या आयटीचेही आयाम बदलत आहेत. कोड लिहिणारे रोबोट्स येत्या काही वर्षात अतिशय कॉमन होतील, डाटाबेस मेंटेनन्स, बॅकअप वैगेरे वैगेरे कामं करणारे रोबोट्स आजची रिऍलिटी आहे. बदलत्या काळाबरोबर शिकत नवनवी स्किल्स आत्मसात करणे ही सवय आजच्या त्यामानाने 'सेटल्ड' असलेल्या लोकांनी अंगी बनवण्याची गरज आहे.

*आयबीएम वॉटसन बद्दल एक जुनी पण रोचक डॉक्युमेंट्री

एकेकाळी अतर्क्य वाटणार्‍या गोष्टी प्रत्यक्षात येऊन जग बदलताना आपण सर्वांनीच पाहिलं आहे. हे बदल किती वेगाने आणि किती व्यापक प्रमाणात घडू शकतात हे सांगणारा हा लेख फारच आवडला.

इरसाल कार्टं's picture

9 Mar 2017 - 9:48 am | इरसाल कार्टं

हा आवाका वाचून थक्क व्हायला झालं. सगळं bits and pieces मध्ये सतत ऐकू येत असलं, तरी एकत्र वाचून सगळं एकदम जाणवलं.

माझंही असंच झालंय.

सविता००१'s picture

9 Mar 2017 - 10:31 am | सविता००१

अतिशय आबडलाय हा लेख. खूप अभ्यासपूर्ण. विचार करायला लावणारा आहे खरच.

संदीप डांगे's picture

9 Mar 2017 - 11:08 am | संदीप डांगे

भन्नाट भन्नाट भन्नाट!

खूपच जबरदस्त लेख! भविष्यातले करिअर्स हा माझ्या कायम आवडीचा विषय....
तुमचे खूप खूप धन्यवाद.

मराठी_माणूस's picture

9 Mar 2017 - 11:23 am | मराठी_माणूस

ह्या नव्या (आभासी ?) जगात "आनंद" असणार आहे का ?

इनिगोय's picture

9 Mar 2017 - 4:21 pm | इनिगोय

मोलाचा प्रश्न.
आनंदी असणं ही निवड आहे, परिणाम नव्हे. त्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत असू शकतो, किंवा कोणत्याच स्थितीत नसू शकतो.

सस्नेह's picture

9 Mar 2017 - 4:05 pm | सस्नेह

या शक्यता वाटतात खऱ्या !
....'ऑग्मेंटेड रिअ‍ॅलिटी' ही साधारणपणे आयटीवाल्यांचीच पिल्ली ना ?

एक प्रदर्शन भरवले होते. त्यामध्ये याचे प्रात्यक्षीक होते. तुम्ही एका क्यामेर्यापुढे उभे राहुन आपला चेहरा मोनिटर वर बघत असतानाच त्यात कानातील अलंकार / गळ्यातील अलंकार आपोआप दिसु लागतात. तुम्ही जसा चेहेरा फिरवाल / वळवाल तसे ते अलंकार पण बदलतात.
खरे अलंकार परीधान करण्याचे श्रम वाचतात आणी सुरक्षीत [कारण खरा अलंकार तुम्हाला हातात देण्याची गरजच उरत नाही]

अभ्या..'s picture

9 Mar 2017 - 4:42 pm | अभ्या..

सुंदर लिहिलय इनाबाय.
ह्या येत्या जगात आमच्यासाठी कुठला तुकडा आहे हे बघायला पाहिजे.
.
अगदी स्वतःच्या फुलपात्रातला विचार केला तरी ड्राईंग कॉलेजात जाईपर्यंत मी हाताने ब्रश बिश वापरुन ड्रॉ करत होतो, डीटीपीची झालेली सुरुवात शाळेपासून पाहिलेली पण मी पीसी वापरुन तसे काही करीन कधीच नाही वाटलेले. पहिला स्कॅनर, पहीला फ्लॅट एलईडी, पहिले ग्राफीक्स, पहिले अ‍ॅनिमेशन, पहिली थ्रीडी असाईनमेंट, पहिला मोबाईल, पहिले ड्राईंग पॅड अन लाईट पेन्सील. वापर करताना भांबावल्यासारखे नाही झाले. फक्त टूल्स बदलत गेली. डीव्हाईसेस बदलत गेली. अगदीच १०-१२ वर्षापूर्वीचा काळ लक्ख आठवतो. येत्या १०-१२ वर्षात सगळे, सगळीकडेच, सगळ्यांसाठीच चेंज होईल असे वाटत नाही. बदलत्या काळासोबत बदलायची प्रवृत्ती थांबली की मग अवघड आहे. मन तसा नकार कधी देते तेच पहावे लागेल आता. ;)

संदीप डांगे's picture

9 Mar 2017 - 5:43 pm | संदीप डांगे

गुंफाचित्र व्हायलीत तेंव्हापासून आपुन आहोत... माणसं नावाची जात असेतोवर आपण असणार... भले आता भविष्यात हातात पेन पेन्सिल माउस टच पॅड धरायला नाही लागेल. डोक्यात एक चिप लावून इमाजीनेशन थेट स्क्रीनवर दिसेल, 3d मध्ये दिसेल....मूळ ते इमाजीनेशन... टूल्स आर सेकंडरी...

इमाजीनेशन जोवर आहे तोवर काळजी नाही... जो साधनांत अडकतो तोच कालबाह्य होतो.

अभ्या..'s picture

9 Mar 2017 - 5:51 pm | अभ्या..

येप्प्प.
मी तर आजकाल डोक्यातच कॉम्प्झीशनस कम्प्लीट करायला सुरुवात केलीय. ही प्रोसीजर जमत असतेच आर्टिस्टना पण जरा वापरतो त्या त्या अ‍ॅप्लिकेशननुसार गेलो की १/४ वेळात एक्झिक्युट होते. बराचसा माइंडगेम, उरलेली कारागीरी.

टूल्स तर बदलतीलच आणि गरजाही बदलतील.

उदाहरणच द्यायचं तर पुढच्या काही वर्षात तू ट्रान्सपरन्ट, 3डी, QR कोड किंवा बारकोड असलेली किंवा मग इंटरअॅक्टिव्ह बिझनेस कार्डस् यामधला एक्स्पर्ट होऊ शकशील.

वेब-टू-प्रिंटच्या मदतीने तू जगभरात कोणाचंही कोणतंही काम घेऊन पूर्ण करून देऊ शकशील आणि तुझं पेमेंट तुला बिटकाॅईन मध्ये मिळून जाईल. आता यात तुला काय काय नवं शिकायचं हे लक्षात आलं की डन. ☺

पूर्वाविवेक's picture

9 Mar 2017 - 5:35 pm | पूर्वाविवेक

ओह, एखाद्या कथेसारखं वाटलं. भविष्याचा वेध घेतल्यास तू. लेख अतिशय आवडला आहे.
तुझ्याकडून याविषयावर अजून वाचायला आवडेल.

प्राची अश्विनी's picture

9 Mar 2017 - 5:46 pm | प्राची अश्विनी

अगदी पटलं. मुलगी दहावीला आहे, तिला पण देते वाचायला.

इनिगोय's picture

9 Mar 2017 - 6:11 pm | इनिगोय

जरूर, हेच अपेक्षित आहे.

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2017 - 6:09 pm | प्रीत-मोहर

भविष्यातील करियर्स चा उत्तम आढावस घेतलायस इनि!

पैसा's picture

9 Mar 2017 - 6:12 pm | पैसा

आपण सहसा नवे काय बदल आले ते स्वीकारता आले तर स्वीकारणे इतपत त्यावर विचार करतो. पण ते बदल काय असतील याचाही अंदाज लावता येईल आणि त्या अंदाजाचा प्रत्यक्षात वापर करता येईल हा फार वेगळा, चाकोरी सोडून जाणार विचार आहे. मस्त!!

लॉरी टांगटूंगकर's picture

9 Mar 2017 - 8:54 pm | लॉरी टांगटूंगकर

+1!

माहितगार's picture

9 Mar 2017 - 9:19 pm | माहितगार

शेतीच्या उत्पादन पद्धतीत काय बदल होऊ शकेल याचे कल्पनाचित्र रंगवले आहे. कायदा आणि प्रॉपर्टीइंटरेस्टची जंजाळ मिटवली गेलीतर नव्हे त्या शिवाय मानवतेस तुर्तास गत्यंतर नही. अ‍ॅटोमेशन स्थिती वाढेल हे खरे पण खरेदीदाराच्या हातात क्रयशक्ती दिल्या शिवाय अर्थशास्त्राचे चक्र आकारास येऊ शकत नाही आणि अ‍ॅटोमेशनने माणूस बाहेर होतो असे नव्हे त्याच्या क्रयशक्तीचे अस्तीत्व संपते आणि ग्राहकाकडे क्रयशक्ती नसेल तर तो खरेदी कसे करेल आणि अ‍ॅटोमेशन मधल्या इन्व्हेस्टमेंटची परतफेड कशी होईल ही अर्थशास्त्रीय शंका मनात येते आहे.

एनी वे रोचक बघूया काय काय होते ते

लेखासाठीं रिसर्च करत असताना हा प्रश्न वारंवार मनात येताच होता. नोकऱ्याच कमी झाल्या तर रोबोट्स नी बनवलेली उत्पादनं विकत कोण आणि कसं घेणार? कदाचित याची दोन उत्तरं संभवतात. एक तर हे सगळं प्रकरण ब्लॅक हॉल सारखं फक्त शोषून घेणारं होईल, आणि एका पॉईंटला उत्पादनांच्या किमती पराकोटीच्या स्वस्त होऊन ब्रेक इव्हन साधणे उलट दिशेने अशक्य होऊन बसेल. या स्थितीला येण्याआधी फारच फार जास्त काळ जाऊ शकेल.
दुसरं उत्तर जास्त आव्हानात्मक आणि कम्फर्ट झोन च्या बाहेर काढणारं आहे.. ऑटोमेशन ने कोण फायद्यात असेल? ज्याच्याकडे ऑटोमेशन ची साधनं आहेत अशी माणसं. त्यामुळे त्या साधनांचा पुरवठा करण्याच्या वाटेने गेलं तर स्वतःची क्रयशक्ती टिकवणं आणि फायद्यातही राहणं शक्य आहे.
आणि १००% व्यवसाय ऑटोमेट होतील ही अर्थातच खूपच दूरची शक्यता आहे. त्यामुळे आहेत त्या नोकऱ्या गेल्या तरी वेगळ्या नोकऱ्या संधी उपलब्ध होत राहणारच आहेत. संपूर्ण जगाच्या अनएम्प्लॉयमेन्टचा गेल्या दहा-वीस वर्षांचा ग्राफ कोणी इथे देऊ शकलं तर यातलं तथ्य समजेल.

तेजस आठवले's picture

9 Mar 2017 - 10:29 pm | तेजस आठवले

(जाता जाता एक नोंद - किमान ५० विषयांमध्ये एमबीए करता येतं. फायनान्स, एच आर आणि मार्केटिंग हे त्या पन्नासपैकी सगळ्यात जास्त गर्दी असलेले आणि सगळ्यात कमी संधी असलेले पर्याय आहेत.)
एमबीए साठीचे राहिलेले ४७ विषय कुठले? त्यांची पण थोडक्यात ओळख करून दिलीत तर उत्तम. तसेच चालू असलेली नोकरी सोडून एमबीए करणे हा पर्याय स्वीकारणारे लोक मी साधारण ८-१० वर्षांपूर्वी पाहिले होते. सध्याच्या काळात एमबीए करण्याला किती महत्व आहे ? आतबट्ट्याचा व्यवहार ठरण्याची भीती वाटते. हातचे सोडून पळत्याच्या पाठी पळायला जावे तसे होईल असे वाटते. (एमबीए : मागणी पेक्षा पुरवठा जास्त, दर्जाचे काय)

आयटी क्षेत्रातल्या संधींबद्दल काही परखड मते ऐकायला आवडतील. कामाचे स्वरूप, ताण आणि अपेक्षांचे ओझे यांचा फुगा प्रमाणाबाहेर फुगला आहे असे वाटते. सतत बदलणारे तंत्रज्ञान, ते शिकून त्यात निष्णात होण्यासाठी लागणारा वेळ, श्रम आणि कौटुंबिक पातळीवर त्याची चुकवावी लागणारी किंमत ह्याबद्दल पण मते ऐकायला आवडतील.

जगात आलेली आणि पुढे कदाचित येऊ शकणारी उजव्या विचारसरणीची सरकारे, जागतिकीकरणापेक्षा स्थानिक गोष्टींना जास्त महत्व देतील का? त्यांचा करियर ठरवण्यात/बिघडवण्यात नक्कीच मोठा वाटा असेल.

उद्याच्या या विश्वामित्री दुनियेची 'एमिनंट सिटिझनशिप' आपल्या मुलांना मिळावी, यासाठी आत्तापासूनच प्लॅन ठरवायला हवा आहे.
म्हणजे नक्की काय करायचं ? मुलांचे बालपण हिरावून न घेता हे कश्या प्रकारे करता येईल? व्यावसायिक-कौटुंबिक समतोल सांभाळा असे नुसते मेल पाठवून प्रत्यक्ष्य वेळ आल्यावर मात्र सुट्टी ना देणे किंवा जास्तीचा वेळ काम करायला लागणे, आणि मग त्यातून घरच्यांना वेळ ना देता आल्याची खंत.... ह्या सगळ्याचा सामना आपण आत्तापासूनच करत आहोत, उद्याची पिढी ह्याकडे कश्या तऱ्हेने पाहील ?

सतत कोणाशी/ कशाशी तरी कनेक्टेड राहण्याची सवय(खरंतर व्यसन) चांगल्या मार्गाकडे घेऊन जाईल का तुटकपणा वाढून नात्यांवर अजून परिणाम होईल? आणि ह्या सगळ्यात "एक उनाड दिवस" अनुभवलेल्या आणि त्यातली गंमत कळलेल्याचे भवितव्य काय? का तो त्या चित्रातच नसेल?

ह्या धाग्यावर चांगल्या चर्चेच्या प्रतीक्षेत . धन्यवाद.

संदीप डांगे's picture

9 Mar 2017 - 10:35 pm | संदीप डांगे

चांगला प्रतिसाद! दर्द जाणवतो आहे.. उत्तरांच्या व चर्चेच्या प्रतीक्षेत.

तुमच्या प्रतिसादाला उत्तर द्यायला जास्त वेळ घेतला, कारण तुम्ही मांडलेला प्रत्येक मुद्दा हा जवळपास एकेका लेखाचा विषय आहे. पैकी काहींची थोडक्यात उत्तरं -

सध्याच्या काळात एमबीए करण्याला किती महत्व आहे ? --- हे तुम्ही कोणता विषय निवडताय यावर अवलंबून आहे. फायनान्स मध्ये पूर्ण वेळ एमबीए करूनही दरमहा 20-25 हजारापलीकडे जाऊ न शकणाऱ्यांमध्ये वर्षागणिक भरच पडते आहे. हा त्यांचा दोष नसून उमेदवारांची संख्या खूप जास्त झाली आहे, हे कारण आहे. उरलेले सगळे विषय इथे मांडणं शक्य नाही, पण उदाहरणच द्यायचं तर सस्टेनेबल एनर्जी, शेतकी, क्रीडा, रिअल इस्टेट, उद्योजकता हे विषय टॉप १० मध्ये घेता यावेत. या विषयांमध्ये एमबीए करण्याचा पर्याय देणाऱ्या संस्था भारतात आणि भारताबाहेरही आहेत. मुदलात आज कोणता विषय चालतो आहे तो निवडूया असं करण्यापेक्षा ज्यात दीर्घकालीन प्रगती शक्य आहे ते क्षेत्र निवडणं हा जास्त शहाणपणाचा निर्णय ठरावा.

आयटी क्षेत्रातल्या संधींबद्दल --- यावर इथे पूर्वी बरंच लेखन झालंय, आणि लेखाचा विषय भविष्यातल्या संधी हा असल्याने सध्याच्या परिस्थितीबद्दल फार तपशीलात ना शिरता एवढंच म्हणेन की कुठे आणि का थांबायचं हा सर्वस्वी स्वतःचा निर्णय असायला हवा, ऑटोमेशन तिथेही येणार आहेच, त्यामुळे स्वतःच्या ज्ञानाचा नोकरीतच उपयोग करायचा की आणखी वेगळ्या आणि खरोखरीच समतोल साधणाऱ्या संधी शोधायच्या हे वेळेवर ठरवायला हवं, नाही का? केवळ आयटीतच नाही तर अन्य बऱ्याच ठिकाणी कामाचे तास, नॉन प्रॉडक्टिव्ह गोष्टींचा ताप, डेडलाईनपायी होणारी फरपट, कुटुंबाला होणारे त्रास हे सगळं आहेच.

स्वतःला काही प्रश्न विचारून त्यांची उत्तरं कायम लक्षात ठेवली तर हे जरा सोपं होऊ शकेल. मला किती पैसा आणि कशासाठी लागणार आहे? त्यासाठी मला किती काळ नोकरी करावी लागेल? नोकरीशिवाय माझे उत्पन्नाचे पर्याय काय आहेत? नोकरीनंतर माझ्या कौशल्यांचा माझ्या सोयीने मी कसा वापर करू शकेन? हे ते प्रश्न. खेरीज ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कम याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

उद्याच्या या विश्वामित्री दुनियेची 'एमिनंट सिटिझनशिप' आपल्या मुलांना मिळावी, यासाठी आत्तापासूनच प्लॅन ठरवायला हवा आहे. --- मुलांचे बालपण यात बालपणाबाबतची व्याख्या काय आहे? गेल्या काही काळात या व्याख्येत सर्वसाधारणपणे बिघाड झाला आहे, हे आपण मान्य करतोय का? इथंपासून सुरुवात करायला हवी.

मुलांना ताण वाटू न देता त्यांची प्रगती घडवत राहणं शक्य आहे का? तर याचं उत्तर हो असं आहे. प्रोऍक्टिव्ह पेरेटिंगसाठी कोचिंग हाही माझा विषय असल्याने हे मी खात्रीपूर्वक सांगू शकेन की आईवडिलांचा सामायिक दृष्टिकोन, संपूर्ण बांधिलकी आणि योग्य वेळी controlled exposure मिळालं तर बहुसंख्य मुलं फार थोड्या काळात अफाट, चौफेर प्रगती साधू शकतात.

सगळंच इथे मांडणं अवघड आहे, पण मुद्दा हा की परिस्थिती माझं नियंत्रण करतेय की मी परिस्थितीचं - याचं उत्तर माहित असणं, आणि माझी कृती त्यानुसार आधारलेली आहे का, हे वेळोवेळी तपासून पाहणं अत्यंत आवश्यक.

संदीप डांगे's picture

10 Mar 2017 - 11:11 pm | संदीप डांगे

सुंदर उत्तर! धन्यवाद! सविस्तर चर्चेसाठी एखादा कट्टा करायला हवा तुमच्यासोबत.

तेजस आठवले's picture

11 Mar 2017 - 10:06 pm | तेजस आठवले

माहितीपूर्ण प्रतिसाद. बऱ्याच गोष्टी विचार करण्याजोग्या आहेत. बाकी मुलांचे बालपण हा एक अगदी संवेदनशील विषय आहे. माझ्या आईचे बालपण, माझे बालपण आणि पुढच्या पिढीचे बालपण ह्यात खूप फरक असणार आहे.आहेच.
जगात ज्या गतीने गोष्टी बदलत आहेत, त्या महाभयंकर वेगाला सामोरे जाण्याची कुवत प्रत्येकाची असेलच असे नाही.अर्थात कितीही काही बदलले, तरी काही गोष्टी मूळ स्वरूपात तश्याच राहतील.राहाव्यात.

मला तर कधी कधी असे वाटते की नोकरी हे उत्पन्नाचे साधन हळूहळू नाहीसे होत जाईल आणि परत एकदा व्यवसायाधारित समाजजीवन चालू होईल. एक तर नोकरीच्या संधी कमी होत जात आहेत, आणि रिकाम्या जागा आणि त्यासाठी भरमसाठ इच्छुक उमेदवार ही परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. पूर्वी लोक अंगीभूत कौशल्यांचा वापर उपजीविकेसाठी करत(लोहारकाम, सुतारकाम, कुंभार, गवळी इ. इ.) आणि आपले कौशल्य पुढच्या पिढीत हस्तांतरित करत. जसे लोहाराचा मुलगा पुढे मोठा होऊन लोहारच होई.पिढीजात व्यवसाय असत. त्यातून बाहेर पडून नवे काही करण्याची पद्धत फारशी प्रचलित नव्हती आणि तिला समाजमान्यता ही नसावी. समाजातल्या प्रत्येक घटकाला इतर घटकांची गरज भासे. त्यानंतर आलेला शिक्षणाचा काळ, ज्यात ते सर्वाना खुले झाले आणि जो शिकून ज्ञानी होईल त्याला संधी उपलब्ध होऊ लागल्या. पण वरती लेखात आले आहे तसे. एमबीए फायनान्स केलेल्यांची संख्या जर जास्त आहे आणि उपलब्ध जागा कमी आहेत तरी परत बेरोजगारीचा प्रश्न येतो. गुणवत्तेचा प्रश्न आहेच.

ह्या लेखाचा विषय जरी तो नसला तरी फारश्या गुणवत्ता नसलेल्या, गुणवत्ता असलेल्या पण संधी ना मिळालेल्या, वैद्यकीय /कौटुंबिक कारणांमुळे काही संधी सोडाव्या लागलेल्या, कौशल्यबदल (स्किल चेंज) करणे काही कारणाने न जमलेल्या (आणि त्यामुळे नोकरी गेलेल्या) अशा आणि अशा अनेक कारणांनी घरी बसायची पाळी आलेल्या लोकांचे काय होईल हा पण एक प्रश्न आहेच. कदाचित तेव्हा आपले छंदच आपल्याला तारून नेतील. ऑटोमेशन आले, कॉस्ट कटिंग मुळे श्रेणीवाढ/पगारवाढीवर बंधने आली, कामाचे तास आणि त्रास वाढले. ह्याचा परिणाम पण होणारच आहे आणि पुढील करियर करताना हे ही विचारात घ्यावे लागेल.
परिस्थिती माझं नियंत्रण करतेय की मी परिस्थितीचं - याचं उत्तर माहित असणं, आणि माझी कृती त्यानुसार आधारलेली आहे का, हे वेळोवेळी तपासून पाहणं अत्यंत आवश्यक. हे मात्र खरं. हे ज्याला कळले तो तरला. बऱ्याचदा आपल्याला वाटते की खेळ आपण आपल्याला हवा तसा खेळतो आहोत पण खेळ संपायच्या वेळी लक्षात येते की आपण फक्त एक प्यादे होतो.

असो. असेच चांगले प्रतिसाद येउदेत आणि विचारमंथन होऊ दे. धन्यवाद.
आपल्या विस्तृत प्रतिसादाबद्दल आभार.

इनीने उत्तम प्रतिसाद दिलाच आहे त्याला माझ्या बघण्यात जे आलं आहे त्यावरुन माझे दोन पैसे जोडते.

(जाता जाता एक नोंद - किमान ५० विषयांमध्ये एमबीए करता येतं. फायनान्स, एच आर आणि मार्केटिंग हे त्या पन्नासपैकी सगळ्यात जास्त गर्दी असलेले आणि सगळ्यात कमी संधी असलेले पर्याय आहेत.)
एमबीए साठीचे राहिलेले ४७ विषय कुठले? त्यांची पण थोडक्यात ओळख करून दिलीत तर उत्तम. तसेच चालू असलेली नोकरी सोडून एमबीए करणे हा पर्याय स्वीकारणारे लोक मी साधारण ८-१० वर्षांपूर्वी पाहिले होते. सध्याच्या काळात एमबीए करण्याला किती महत्व आहे ? आतबट्ट्याचा व्यवहार ठरण्याची भीती वाटते. हातचे सोडून पळत्याच्या पाठी पळायला जावे तसे होईल असे वाटते. (एमबीए : मागणी पेक्षा पुरवठा जास्त, दर्जाचे काय)

मागच्या ४ वर्षात मी ज्या अमेरीकन कंपनीत काम करते त्यातल्या ओळखीच्या जवळपास ४०% लोकांनी पार्टटाईम एम्बीए पुर्ण केले किंवा त्यासाठी सुरुवात केली. ध्येय पगार वाढ आणि आहे त्या क्षेत्रातुन बाहेर पडणे ( म्हणजे बर्‍याच लोकांसाठी टेक्निकल मधुन मॅनेजमेंटमधे जाणे कारण वरच्या जागांवर जाण्याची संधी) पण त्यातील फक्त ५% लोकांनाच अपेक्षित परतावा मिळाला. म्हणजे नावापुढे एम्बीए पाहिजे म्हणुन ते केल्याने त्याचा फायदा होईलच असे नाही. त्यापेक्षा एखादा स्किलसेट डेवलप केला तर त्यातुन जास्त फायदा होईल असे वाटते. (Tim Ferriss चे 4 -Hr Work Week) हे पुस्तकं वाचुन बघा असं सुचवेन.

आयटी क्षेत्रातल्या संधींबद्दल काही परखड मते ऐकायला आवडतील. कामाचे स्वरूप, ताण आणि अपेक्षांचे ओझे यांचा फुगा प्रमाणाबाहेर फुगला आहे असे वाटते. सतत बदलणारे तंत्रज्ञान, ते शिकून त्यात निष्णात होण्यासाठी लागणारा वेळ, श्रम आणि कौटुंबिक पातळीवर त्याची चुकवावी लागणारी किंमत ह्याबद्दल पण मते ऐकायला आवडतील.

जर एखाद्याने आयटी क्षेत्र करीअर म्हणुन निवडले असेल तर या गोष्टी ओघाने येतीलच. असं करताना प्रत्येकजण स्वतःला मार्केटमधे ठेवण्यासाठी धडपडत असतो. इनी म्हणते तसे जोपर्यंत तुमच्याकडे पर्यायी व्यवस्था नाही (दुसरे अ‍ॅक्टिव /पॅसिव्ह इंकम) तोपर्यंत या कुतरओढीला सामोरे जाण्याशिवाय काही गंत्यंतर नाही.

उद्याच्या या विश्वामित्री दुनियेची 'एमिनंट सिटिझनशिप' आपल्या मुलांना मिळावी, यासाठी आत्तापासूनच प्लॅन ठरवायला हवा आहे.
म्हणजे नक्की काय करायचं ? मुलांचे बालपण हिरावून न घेता हे कश्या प्रकारे करता येईल?

मला वाटतं मुलांवर शिक्षण लादायला नको तर त्यांनी त्याचा स्वतःहुन स्विकार करायला हवा. दुर्दैवाने अशी व्यवस्था अपल्या शिक्षण पद्धती मधे नाही. सध्या माझी मुलगी( वय ४ पुर्ण) मॉन्टेसरी प्रकारच्या शाळेत आहे त्यात तिला बर्‍यापैकी काय शिकायचं यासाठी निर्णय स्वातंत्र्य आहे. असं काही जर मुलांसाठी देता आलं तर त्यांचा कल लवकर कळुन त्यातच त्यांना पुढे शिक्षण देता येईल. अनस्कुलिंग किंवा होमस्कुलिंग हे सुद्धा चांगले पर्याय आहेत. यात अधिक महिती मिळवण्यासाठी John Holt यांचे How Children Fail पुस्तक वाचुन सुरुवात करा आणि त्या सिरिज मधली इतरही पुस्तके वाचा.

व्यावसायिक-कौटुंबिक समतोल सांभाळा असे नुसते मेल पाठवून प्रत्यक्ष्य वेळ आल्यावर मात्र सुट्टी ना देणे किंवा जास्तीचा वेळ काम करायला लागणे, आणि मग त्यातून घरच्यांना वेळ ना देता आल्याची खंत.... ह्या सगळ्याचा सामना आपण आत्तापासूनच करत आहोत, उद्याची पिढी ह्याकडे कश्या तऱ्हेने पाहील ?

याचंही उत्तर वर आलंच आहे. ज्या व्यावसायीक क्षेत्राची सुरुवातीला निवड केली असेल त्याचे सगळे साइड इफेक्ट पण त्यात येणारच.

सतत कोणाशी/ कशाशी तरी कनेक्टेड राहण्याची सवय(खरंतर व्यसन) चांगल्या मार्गाकडे घेऊन जाईल का तुटकपणा वाढून नात्यांवर अजून परिणाम होईल?

ज्याला समतोल कसा राखयचं हे कळालं तो यातुन तरुन जाईल असं वाटतं.

आणि ह्या सगळ्यात "एक उनाड दिवस" अनुभवलेल्या आणि त्यातली गंमत कळलेल्याचे भवितव्य काय? का तो त्या चित्रातच नसेल?

त्यासाठी हे (झैरात)वाचुन बघा तुम्हाला काय वाटतं.

तेजस आठवले's picture

11 Mar 2017 - 10:11 pm | तेजस आठवले

तुमचा लेख वाचला, चांगला आहे.हे करायला खूप हिम्मत लागते.तुम्ही आर्थिक स्वावलंबनाचे उद्दिष्ट गाठू शकलात हे खरंच कौतुकास्पद आहे.
तसेच एमबीए चे जे उदाहरण तुम्ही दिलेले आहे तशी परिस्थिती बघितलेली आहे. त्यामुळे आहे ते सोडून (नोकरी/व्यवसाय) पूर्ण खात्री आणि आत्मविश्वास असल्याशिवाय फक्त समाजभावनेत वाहून जाऊन निर्णय घेउ नयेत हे ही खरंच.
प्रतिसादाबद्दल आभार.

अजया's picture

10 Mar 2017 - 8:33 am | अजया

विचार करायला लावणारा लेख. करिअरच्या उंबरठ्यावर असणार्या माझ्या मुलाला वाचायला देते आहे.
मला एक प्रश्न आहे. आर्टिफिशयल इंटेलिजन्स म्हणजे काय. कशात येते हे कार्यक्षेत्र?

बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या भोवती असलेल्या परिस्थितीचं आकलन करून घेऊन त्या माहितीचा योग्य त्या वेळी पुनर्वापर करू शकणे.

जसं, ऐकलेल्या सूचनेप्रमाणे कृती करणे, नव्या संकल्पना ऐकल्यास त्या स्मृतीत साठवून ठेवून गरजेच्या वेळी पुन्हा आठवू शकणे, आत्ता समोर आलेल्या मुद्द्याची संगती पूर्वीच्या एखाद्या गोष्टीशी लावू शकणे, इ. यात बौद्धिक / मानसिक क्षमता, तर्क शक्ती, कारण मीमांसा, आकलन, व्यवहारज्ञान, असं बरंच काही येतं.

कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशल इंटेलिजन्स (AI) म्हणजे या सगळ्या गोष्टी एखाद्या यंत्राकडून करून घेणं.

समोरच्या दृश्याचा अर्थ लावणं, कृतीतून त्याला प्रतिसाद देणे, उच्चार समजून घेणे, एका भाषेतल्या प्रश्नाला वेगळ्या भाषेत उत्तर देणे, असं बरंच काही ही यंत्रं करू शकतात. मात्र अजूनही सारासार विवेक ही बाब माणसाच्याच मेंदूपुरती मर्यादित असल्याने आजतरी AI म्हणजे पर्यायी मानवी मेंदू नव्हे.

(हे अगदी सोपं असं स्पष्टीकरण झालं, यात अर्थातच बऱ्याच तांत्रिक संकल्पना समाविष्ट असतात.)

या विषयावर इथे डिटेल मध्ये वाचायला मिळेल असे सुचवतो

Frey, Carl Benedikt, and Michael A. Osborne. "The future of employment: how susceptible are jobs to computerisation?." Technological Forecasting and Social Change 114 (2017): 254-280.

http://www.oxfordmartin.ox.ac.uk/downloads/academic/The_Future_of_Employ...

अत्रे's picture

10 Mar 2017 - 8:50 am | अत्रे

याच्या अपेंडिक्स मध्ये व्यवसायांची लिस्ट इंटरेस्टिंग आहे. (पान ६१)

स्नेहल महेश's picture

10 Mar 2017 - 10:06 am | स्नेहल महेश

खूप छान लिहिलंय खूप अभ्यासपूर्ण लेख
याविषयावर अजून वाचायला आवडेल.

डेटा अॅनालिसीस आणी त्याच योग्य ते साॅर्टिंग करण या दोन्ही गोष्टी ना भविष्यात प्रचंड महत्त्व येणार आहे. कदाचित असे ही होईल की प्रत्येक माणसाचा अथ पासून ईति पर्यंत बायोडेटा तयार असेल. मी काय खाते मला कुठला रंग आवडतो. माझी क्रयशक्ती किती आहे यावरून डायरेक ऊत्पादने घरी येण्याचे दिवस आता फारसे लांब नाहीत

लेखात बिग डेटाच्या संदर्भाने जे लिहिलंय, त्यात या सगळ्याचा उपयोग केला गेलाय - तोही एका राष्ट्राच्या निवडणुकांचे निकाल बदलवू शकेल इतक्या परिणामकारकपणे. ब्रेक्झिटमध्येही डेटा अॅनालिसिसचा वापर झाला, असं दिसतंय.

आनंदयात्री's picture

10 Mar 2017 - 11:20 pm | आनंदयात्री

आणि आता ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन इल्लिगल इमिग्रण्टस विरुद्ध कारवाई करायला palantir या कंपनीची मदत घेईल अशी चर्चा आहे. palantir ने कोट्यवधी लोकांचे सोशल नेटवर्क वरचे प्रोफाईल्स वाचून त्यांचे वेगवेगळ्या पॅरामीटर्स वर प्रोफाईलींग केले आहे/ किंवा तसे करण्याची त्यांची क्षमता आहे हा या चर्चेतला मूळ मुद्दा.

या नाटकाचा पहिलाअधिकृत अंक इथे - https://motherboard.vice.com/en_us/article/how-our-likes-helped-trump-win

स्वाती दिनेश's picture

10 Mar 2017 - 11:00 pm | स्वाती दिनेश

उत्तम आढावा घेणारा लेख अतिशय आवडला आहे. सवडीने परत शांतपणे वाचणार आहे.
स्वाती

इडली डोसा's picture

11 Mar 2017 - 1:27 am | इडली डोसा

अंकाच्या अवाहन धाग्यात जेव्हा नव्या संधी नव्या वाटांविषयी लिहिलं तेव्हा एक्झॅक्टली हेच डोक्यात होतं. वेळात वेळ काढून हा लेख दिल्याबद्दल इनीगोय यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत.

धन्यवाद इनीगोय _/\_

मदनबाण's picture

17 Mar 2017 - 8:10 am | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- We don't talk anymore, we don't talk anymore, We don't talk anymore, like we used to do... (feat. Selena Gomez) :- Charlie Puth [Official Video]

एमी's picture

29 Mar 2017 - 5:27 am | एमी

लेख आवडला.

अभिजीत अवलिया's picture

4 Apr 2017 - 9:57 am | अभिजीत अवलिया

चांगला लेख आहे.
बाकी इतर काहीही बदलले/नाहीसे झाले तरी मिपा मात्र बदलू/नाहीसे होऊ नये हीच इच्छा.

मदनबाण's picture

5 Apr 2017 - 12:19 pm | मदनबाण

@इनिगोय
पलिकडे तुम्हाला चिप इंप्लांट बद्धल बोललो होतो, त्याची अधिकॄत बातमी आलीच शेवटी !
संदर्भ :- CYBORGS AT WORK: EMPLOYEES GETTING IMPLANTED WITH MICROCHIPS

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dragon embrace will prove costly for India

प्रसाद गोडबोले's picture

5 Apr 2017 - 6:40 pm | प्रसाद गोडबोले

लेख वाचुन इन टु द वाईल्ड चित्रपटातील एक डायलॉग आठवला :
I think careers are a 20th century invention and I don't want one!

किती वाईट अडकलोय आपण ह्या कंझुमरीझम च्या चक्रात ... काही तरी कंझुम करायचंय म्हणुन राब राब राबत रहा आणि मग एक्सेस पैसा आला की परत अजुन कंझम्शन वाढवा मग परत त्या नीड्स सॅटिसफाय करायला अजुन गाढवा सारखे राबा !

१९ व्ह्या शतकाच्या आधी कीती मस्त होतं सगळं ! करीयर नावाची गोष्टच नव्हती ! मनाला वाटतय ते करा , आनंद मिळतोय ज्यातुन ते करा ! पैसा मिळाला ठीक , नाही मिळाला तरी ठीक . आनंद महत्वाचा ! ह्या डार्विन, न्युटन , मेंडेल , जॉन् लॉक , बेंजामिन फ्रँकलीन , टेस्ला ह्या लोकांनी कुठे करीयरचा विचार केला होता ! जे आवडत गेलं ते करत गेले !!

ह्या करीयरच्या टेंशन ने शिक्षणाचा नितांत सुंदर अन्हुभवातुन आनंद हिरावुन घेतलाय . अन वाईट गोष्ट अशी की तो आनंद हरवलाय हेच कित्येकांच्या लक्षातही येत नाहीये !

असो. मी तर ठरवलंय की पोराला सांगणार आहे - तुला शिकायचे ते शिक , पैसा नाही मिळाला तरी चालेल , (आम्ही एवीतेवी ओझ्याचे बैल आहोतच मी कमवेन तुला आयुष्यभर पुरेल इतका पैसा) , पण तु तुला हवे ते शिक , भारतीय शाश्त्रीय संगीत , इतिहास , वेद , उपनिषद , फिलॉसॉफी , मुर्तीकला , चित्रकला , नृत्यकला , नॅचरल सायन्स , गोल्फ , चेस , किंव्वा वेगवेगळ्या भाषा , वेगवेगळ्या देशांस्च्या संस्कृती , पाककला , .... जे काही जे काही तुला वाट्टेल ते शीक! पण करीयर करायचे म्हणुन आधी ईंजिनियरींग नंतर एम बी ए मार्केटिंग असला गाढवपणा नको !!

असो....

प्रसाद गोडबोले's picture

5 Apr 2017 - 6:43 pm | प्रसाद गोडबोले

#I am here to live, Not to increase GDP#

संदीप डांगे's picture

5 Apr 2017 - 6:50 pm | संदीप डांगे

ह्या डार्विन, न्युटन , मेंडेल , जॉन् लॉक , बेंजामिन फ्रँकलीन , टेस्ला ह्या लोकांनी कुठे करीयरचा विचार केला होता ! जे आवडत गेलं ते करत गेले !!

>> करीयर चा खरा अर्थ जगले ते भौ... बाकी सगळे जी गधामजुरी करतात त्याला करीयर हे गोंडस नाव देतात. :-)

मदनबाण's picture

14 Apr 2017 - 8:53 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Knight Rider Theme - Only Minimoog Cover