गंध हलके हलके - प्राजक्ता पटवर्धन

प्रीत-मोहर's picture
प्रीत-मोहर in लेखमाला
8 Mar 2017 - 6:15 am

.

नमस्कार मंडळी! अनाहितातर्फे आज आपण भेटणार आहोत प्राजुला. मिपाची लाडकी मुलगी, जिच्या नावावर 'गंध हलके हलके' आणि 'ये प्रिये' हे मराठी गाण्यांचे आल्बम, 'फुलांची आर्जवे' आणि 'मौनाची आर्जवे' हे दोन कवितासंग्रह, 'काच खड्यांची नक्षी' हा ललित लेखांचा संग्रह आणि 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला', 'सखी', 'बे दुणे दहा', 'प्रीती परी तुजवरती' आणि 'किती सांगायचंय मला' अशा पाच मराठी मालिकांचं पटकथा लेखन जमा झालं आहे. मराठीतली एक उगवती कवयित्री, जी मिपाच्या सुरुवातीपासून आपल्या सुरेख कवितांनी लक्ष वेधून घेत आली, त्या प्राजुला. तिची मिपावरची ओळख बघाल, तर जरा हटके आहे..

अस्सल कोल्हापुरी मिरची आहे. जरा जपून. कारण नसताना कोणाच्या वाटेला नाही जाणार. माझ्या जगात रमलेली असते मी बहुधा. कोल्हापुरी असले, तरी कोणत्याही उत्कट क्षणी टचकन् पाणी येतं डोळ्यात. ई-प्रसारणसाठी काम करते आहे. लोकांना माझा आवाज आवडतो आहे. माझे कार्यक्रम ऐकताहेत आवडीने.. हेच उद्दिष्ट नेहमी उराशी बाळगून होते आणि पुढेही राहील. माझ्या लेखनातून, माझ्या निवेदनातून, माझ्या कार्यक्रमातून रसिकांचं निखळ मनोरंजन व्हावं. बस्स! कविता लिहिते बर्‍या. थोडेफार ललित लेख लिहिले आहेत. तात्यांच्याकडून प्रेरणा घेऊन व्यक्तिचित्र लिहायला लागले.. हळूहळू जमते आहे.
विडंबन सम्राट केशवसुमार उर्फ अनिरुद्ध अभ्यंकर यांच्याकडून गझल लिहायला शिकण्याचा प्रयत्न करते आहे.. आणखी काय सांगू?? जे काही लेखन आहे ते मिपावर आहेच..
कविता, कथा, ललित. गाणे, गाणी ऐकणे. कथाकथन करणे ऐकणे. हिंडणे
पाणीपुरी खाणे.
आणि ऑफकोर्स... रेडिओगिरी करणे. आर.जे. आहे ना मी.

आणखी थोडं जाणून घेऊ प्राजु उर्फ प्राजक्ता पटवर्धनला.

1

प्रश्नः ताई, नमस्कार. तुला अनाहिताबद्दल माहीत आहे, मिपाचं महिलांसाठी असलेलं खास दालन. त्याचा डिजिटल अंक ८ मार्चला येतो आहे. त्यासाठी मी आज तुझ्याशी खास बोलते आहे. मिपा आणि अनाहितातर्फे स्वागत! मला सांग, तुला कवितांची आवड कधी आणि कशी लागली?

प्राजक्ता: मला कवितांची आवड कधी आणि कशी लागली सांगणं जरा अवघड आहे. पहिली कविता कधी लिहिली हेसुद्धा सांगणं कठीण आहे खरं तर. मात्र माझी आई मंजुश्री गोखले ही स्वतः उत्तम लेखिका, कवयित्री होती. तिच्यामुळे मला कवितांची आवड लागली. म्हणजे शाळेत असताना कवितांची वही वगैरे मी काही तयार केली नव्हती. मात्र मी छान निबंध लिहीत असे. या निबंधात मी कविता टाकायचे अधूनमधून. शिक्षकांकडून या निबंधांचं खूप कौतुक केलं जायचं. स्पर्धात पाठवले जायचे. शाळेच्या बोर्डावर लागायचे. म्हणजे आपण लिहू शकतो हे मला कळत होतं, पण कविता लिहायचा सीरियसनेस असा नव्हता.

प्रश्नः ताई, तुझ्या इतर छंदांबद्दल सांग ना!

प्राजक्ता: छंद म्हणजे मला शाळेत खूप गोष्टी करायला आवडायच्या. वक्तृत्व, कथाकथन स्पर्धेत मी भाग घ्यायचे. त्यात भरपूर बक्षिसं मिळायची. नाटकं, नाट्यवाचन स्पर्धेत भाग घ्यायचे, त्यातही बक्षिसं मिळायची. त्याशिवाय मी गाण्याच्या चार परीक्षा दिल्या आहेत. त्यात चांगले मार्क्स मिळाले आहेत. कथ्थकच्या चार परीक्षा दिल्या आहेत. त्यातही छान मार्क्स मिळवले आहेत. पण त्याचं पुढे फार काही नाही केलं. एकूण शांत लाइफ आहे. काही तडजोडी वगैरे कराव्या लागल्या असं कधी झालं नाही.

मला आठवते ती माझी पहिला कविता मी १९९४-९५ला लिहिली होती. कॉलेजात बारावीला असताना. तेव्हा खग्रास सूर्यग्रहण झालं होतं. त्यावर मी कविता लिहिली होती. ती वाचून आईने पेपरला पाठवायला लावली होती. आणि छापूनही आली होती. तिचं खूप कौतुक झालेलं तेव्हा. तेव्हा मला कळलं की आपण चांगलं लिहू शकतो. तोपर्यंत मी कविता फक्त निबंधात वापरायचे. पण त्यानंतर हळूहळू स्वतंत्रपणे कविता लिहायला लागले.

प्रश्नः बरं एक सांग, तुझ्या सुरुवातीच्या कविता आणि आताच्या कविता यात तुला काही फरक जाणवतो का? आणि असेल तर कोणत्या प्रकारचा?

प्राजक्ता: फरक तर नक्कीच आहे. माझ्या सुरुवातीच्या कविता जर बघितल्या, तर माझी आई स्वतः उत्तम कविता लिहिणारी असल्याने त्यावर तिच्या कवितांचा प्रचंड प्रभाव आहे. आईच्या कवितांतले शब्द, स्टाईल, उपमा, अलंकार शैली या सगळ्याचा इतका प्रभाव होता की मी तशाच कविता लिहायचे. कारण तिच्या लिखाणाची मीच पहिली वाचक असायची. बारावीनंतर मी माझ्या कवितांची वही केली त्या कविता जर वाचल्या, तर आईच्याच कविता वाटतील इतका प्रभाव होता.

नंतर माझं लग्न झाल्यावर २००६ला मी यू.एस.ला गेले. त्याच दरम्यात मिपाचा शोध लागला. आणि मायबोलीचासुद्धा. माझ्या सुरुवातीच्या वाटचालीत मिपाचा मोठा वाटा आहे. म्हणजे मी मनोगतवर आधी लिहीत होते. पण तिथे एवढं महत्त्व असं नव्हतं. मिपाच्या सुरुवातीपासून मी मिपावर आहे. तेव्हा मी एच-४ म्हणजे डिपेंडंट व्हिसावर यू.एस.ला गेले होते. काही काम करणं शक्य नव्हतं. हाताशी वेळ खूप होता. तेव्हा मी खर्‍या अर्थाने माझ्या कविता लिहायला सुरुवात केली. तिथून माझी स्वतःची शैली सुरू झाली. माझी कविता प्रगल्भ होण्यात मिपाचा खूप मोठा वाटा आहे.

प्रश्नः मीसुद्धा तुझ्या मिपावरच्या कवितांची फॅन आहे, बरं का! आता जरा वेगळा प्रश्न. म्हणजे कविता सुचणं, कविता लिहिणं ही नेमकी काय प्रोसेस असते?

प्राजक्ता: अगं, ती मोठी प्रोसेस अशी नसते खरं तर. म्हणजे बाकीच्यांचं माहीत नाही. पण मी एखादी कल्पना डोक्यात येते तशी लिहीत जाते. एखादेवेळी एकदम एकापाठोपाठ चार कविताही लिहिल्या जातात. किंवा मग बरेच दिवसात काही नाही. कधीतरी एखादी ओळ डोक्यात येते आणि मग तिच्या आजूबाजूने इतर ओळी गुंफल्या जातात. 'मराठी कविता समूह' नावाचा एक ग्रूप फेसबुकवर आहे. त्या ग्रुपमध्ये चांगले चांगले कवी आहेत. तिथे बरेच उपक्रम केले जातात - उदा., एखादा विषय घेऊन किंवा एखादी ओळ घेऊन त्यावर कविता लिहा. त्यावर माझ्या बर्‍याच कविता लिहिल्या गेल्या. मग मला कविता, गझल, त्यातले रदीफ, काफिये, शेर इत्यादींचं वेड लागलं. तेव्हा मला गझलचं तंत्र येत नव्हतं सुरुवातीला. ते नंतर शिकले.

मला वाटतं की कवितेचं सौंदर्य एखाद्या विमानाच्या फ्लाइटसारखं असलं पाहिजे. म्हणजे सुरुवातीचा टेक ऑफ, नंतर तरंगणं, हुरहुर आणि शेवट लँडिंग. लिखाणाची पद्धत मला अशी आवडते. माझी कविता अशी लिहिली जाते. शेवट नीट झाला नाही, तर मला रात्र रात्र झोप येत नाही. कधीतरी मात्र सुरुवात ते शेवट कविता नीटच जमून येते. आता लिहिली आणि तीच फायनल असंही खूपदा होतं. ती कविता माझ्या मनासारखी झाली असेल तर मी त्यात कधीच बदल करत नाही. त्यावरून मला लोकांनी कधी अतिशहाणी वगैरे म्हटलं आहे पूर्वी, पण माझी कविता ही अशीच आहे. कवितेचं लँडिंग जमलं नाही म्हणून मी कितीतरी कविता अर्ध्या सोडल्यात!

1

प्रश्नः देव करो आणि तुझ्या सगळ्या अपुर्‍या कविता पूर्ण होऊन आम्हाला लवकर वाचायला मिळोत! आपण कविता लिहिण्याच्या प्रोसेसबद्दल बोललो, तसाच तुझा मराठी गाण्याचा आल्बम आला आहे. 'गंध हलके हलके'. त्यासाठी तू गीतं लिहिली आहेस. कविता लिहिणं आणि आल्बमसाठी गीतं लिहिणं यात काय फरक वाटला?

प्राजक्ता: माझा 'गंध हलके हलके' आल्बम आला २०१०ला आणि 'ये प्रिये' २०१२ला. आल्बमसाठी लिहिणं यात दोन प्रकार असतात. कधी कविता तयार असतात त्याना चाली लावल्या जातात किंवा मग आधी चाली तयार असतात, त्यावर शब्द लिहायला सांगतात. माझ्या सुरुवातीच्या कवितांना चाली संगीतकाराने लावल्या. नंतर त्याच्याकडे असलेल्या चालीवर शब्द लिहिता येतात का बघ, म्हटलं. ते मी कधी केलं नव्हतं, म्हणून मग टेन्शन आलं. नभ कसं दूर दूर हे गाणं मी असं चालीवर लिहिलं. चाल आधी ऐकली, मग ते सुचत गेलं. चालीवर लिहिणं खूप कठीण आहे असं नव्हे, पण चालीच्या मीटरमध्ये गाणं, शब्द बरोबर बसले पाहिजेत. थोडक्यात सांगता येईल की कविता आपण लिहितो आपल्या मनासाठी, मात्र दुसर्‍याने सांगून त्यासाठी कविता लिहिणं जरा कठीण वाटलं.

प्रश्नः या आल्बमच्या वेळच्या काही आठवणी सांग ना.

प्राजक्ता: आल्बम तयार करताना बर्‍याच नवीन गोष्टी कळल्या. गंध हलके हलके आल्बमसाठी बेला शेंडे, वैशाली सामंत, मधुरा दातार अशा सगळ्या गायिकांनी आणि ये प्रियेसाठी हृषीकेश रानडे आणि वैशाली सामंत यांनी गाणी म्हटली. त्या प्रत्येकीच्या कामाची पद्धत कशी, संगीतकाराची कामाची पद्धत कशी, गाण्यातले आलाप, ताना कशा रेकॉर्ड होतात, कोणी उत्स्फूर्त अ‍ॅडिशन कशा करतात, अ‍ॅरेंजर कसा काम करतो, गाणं तयार होताना बर्‍याच गोष्टी असतात. त्यांच्याबद्दल कळलं.

प्रश्नः आता एक वेगळा अनुभव विचारते. कोणी आम्हाला कविता कशा करायच्या शिकवा, असं म्हणत येतात का, किंवा आले तर तू काय करतेस?

प्राजक्ता: काय आहे ना, कविता करायला शिकवा म्हटलं तर मला जमणार नाही... अशा अर्थाने, की मनात काय येतं ते असं शिकवता येतं का कधी! पण कवितेचं तंत्र शिकवा म्हटलं तर मी शिकवू शकते. म्हणजे शब्द मीटरमध्ये कसे हवे वगैरे. पण कवितेसाठी सगळ्यात महत्त्वाची आपली कल्पना. तीच असायला हवी डोक्यात, तर कविता जमेल.

कविता लेखनाच्या कार्यशाळा वगैरे घेतात. त्यात हे तंत्र शिकवलं जातं फक्त.

प्रश्नः तुझ्या पुस्तक प्रकाशनाचा अनुभव कसा होता>

प्राजक्ता: माझी पुस्तकं तीन आहेत फक्त! खूप अशी नाहीत. मात्र त्यातलं पहिलं पुस्तक कवितासंग्रह 'फुलांची आर्जवे' हे २०१०ला प्रकाशित झालं. त्याच्या आठवणी आहेत. मजा म्हणजे मीच त्याच्या प्रकाशनाला नव्हते, कारण मी तेव्हा यू.एस.मध्ये होते. माझ्या या पुस्तकासाठी कविता आईने चाळून, निवडून घेतल्या होत्या. त्याचं प्रूफ रीडिंगसुद्धा आईनेच केलं. प्रकाशनाच्या वेळी एक छान मिपा कट्टाच झाला होता! पुस्तक प्रकाशन लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झालं होतं. अरुणा ढेरे प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. तो माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता. त्यानंतरचा गझल संग्रह 'मौनाची आर्जवे' २०१३ला आला आणि ललित लेखांचा संग्रह 'काच खड्यांची नक्षी' २०१४ला प्रकाशित झाला.

1

प्रश्नः ताई, तुझ्या एकूण लिखाणाच्या प्रवासाबद्दल सांग ना! म्हणजे लिखाणाच्या प्रवासात तुझा सर्वात अविस्मरणीय क्षण कोणता?

प्राजक्ता: माझ्या मनाच्या जवळ असलेलं माझं सर्वात आवडतं लिखाण म्हणजे एक ललित लेख आहे. ललित लेखांचा संग्रह २०१४ला आलेला काच खड्यांची नक्षी. माझ्या मुलाने मदर्स डेला गिफ्ट तयार केल होतं, त्याबद्दलचा ललित लेख माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.

प्रश्नः आता सध्या तुझे काय प्रोजेक्ट सुरू आहेत?

प्राजक्ता: सध्या मी मराठी भाषेची शिक्षिका आहे आणि मराठी मालिकांसाठी पटकथा लिहिते. आतापर्यंत माझ्या पाच मालिका आल्या. असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, सखी, बे दुणे दहा, प्रीती परी तुजवरती, आणि किती सांगायचंय मला. सध्याचे प्रोजेक्ट्स म्हणजे दोन मराठी मालिकांच्या कन्सेप्ट्स झी मराठी आणि कलर्सला दिल्या आहेत. त्याचे अ‍ॅप्रुव्हल झाले की ब्रॉड स्टोरीचे काम सुरू होईल. सीरियलची कन्सेप्ट ही एक ओळीची गोष्ट असते. म्हणजे एक मुलगा आणि मुलगी प्रेमात पडून लग्न करतात ही कन्सेप्ट झाली. त्याचं अ‍ॅप्रुव्हल झालं की साधारण सहाएक महिने-वर्षभर त्याचे बारकावे घेऊन पुरी कथा लिहिली जाते. मग तो मुलगा, मुलगी, त्यांचे आई-वडील, इतर उपकथानकं वगैरे, कॅरेक्टर्स डेव्हलप केली जातात.

प्रश्नः तू एवढं सगळं काम करते आहेस, तर घरचा पाठिंबा वगैरे कसा आहे तुला?

प्राजक्ता: आधी आईचा पूर्ण पाठिंबा आणि प्रोत्साहन होतंच. नंतर माझ्या नवर्‍याचाही छान पाठिंबा आहे. माझा मुलगा अथर्व अगदी लहान होता, तेव्हा यू.एस.मध्ये मी त्याच्यासोबत कायम होतेच. आता ती फेज पार पडल्यानंतर आम्ही भारतात परत आलोय. मला अनेक ठिकाणी मुशायर्‍यांना वगैरे जावं लागतं. इतर कविसंमेलन वगैरेला जावं लागतं. तेव्हा मी प्रवासात असताना नवरा मुलांचं वगैरे सगळं बघतो. त्याचा अगदी छान सपोर्ट आहे.

प्रश्नः आता एक जरा वेगळा प्रश्न. तू म्हटलंस तसं तुझ्यावर तुझ्या आईचा प्रभाव सुरुवातीला खूप आहे. नंतरच्या काळात तुझ्यावर आणखी कोणाच्या कवितांचा प्रभाव पडला का? कोण सध्याचे आवडते कवी आहेत?

प्राजक्ता: सुरुवातीच्या काळात माझ्यावर आईच्या लिखाणाचा प्रभाव होता. आता नंतरच्या काळात मला आवडणारी कवयित्री म्हणजे क्रांती साडेकर. अनिल आठल्येकर, संतोष वाटपाडे, जनार्दन म्हात्रे, प्रमोद खराडे, सुप्रिया जाधव... या सगळ्यांचा वेगवेगळा बाज आहे. वेगवेगळ्या शैली आहेत. संतोष वाटपाडे गावाकडच्या किंवा रोमँटिक कविता लिहितात. सुप्रियाच्या गझल नात्यावर भाष्य करणार्‍या असतात. मला या सगळ्यांच्या कविता, गझला आवडतात.

प्रश्नः नवकवींवरही कवितांचा प्रभाव पडत असेलच ना? त्यात साहित्यचोरी हाही एक मुद्दा आहे.

प्राजक्ता: हो, कविता वाचून त्याचा सकारात्मक प्रभाव पडणं चांगलंच. म्हणजे एक विषय आवडून त्यावर संपूर्ण वेगळ्या शब्दांत रचना करणं समजू शकते. पण जशीच्या तशी कॉपी मारू नये ना! पण काही काही जण करतात. खयाल आवडला तर आपल्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करावा. तो टकराव खयालों का असेल. मात्र कॉपी करू नये. शब्दात जरासा बदल करून दुसर्‍याची रचना आपल्या नावावर खपवली, तर आपण काही करू शकत नाही. जशी सीडीची पायरसी चालते, तसाच हा प्रकार झाला.

पण मध्यंतरी असा एक प्रकार झाला की माझी एक जुनी गझल 'षंढ सारी लेकरे गे, मायभूमी माफ कर' कॉपी करून कोणीतरी अनिल मेढे नावाने पुढारीमध्ये छापली होती. तेव्हा मी इंग्लंडमध्ये होते. इथे क्रांती साडेकर वगैरे मंडळींनी पुढारीच्या ऑफिसात फोन करून त्यांना विचारलं की तुम्ही अशी शहानिशा वगैरे न करता गझल कशी छापलीत सरळ? मग त्यांनी दुसर्‍या दिवशी 'चुकून दुसर्‍याचे नाव दिले गेले' असं काहीतरी स्पष्टीकरण दिलं होतं. अशा वेळी मित्रमंडळींचा खूप पाठिंबा मिळतो.

मित्रांच्या ग्रूपमध्ये आम्ही कविता, गझल आवडली, नाही आवडली तरी सरळ सांगून त्याची चर्चा करतो. मित्रांचा असा ग्रूप असणं चांगलंच कधीही.

प्रश्नः ताई तुझ्या मिपावरच्या अनुभवांबद्दल बोल ना जरा.

प्राजक्ता: मी आधी मनोगतवर होते. मिपा सुरू झालं, तशी मिपावरही आले. मी म्हटलं तसं माझ्या कवितेत प्रगल्भता येण्यात मिपाचा मोठा हातभार आहे. मनोगतवर कवितांकडे एवढं लक्ष दिलं जात नव्हतं. मिपावर मात्र माझ्या कवितांचं खूप कौतुक झालं. मिपावर केशवसुमार म्हणजे अनिरुद्ध अभ्यंकर यांनी मला गझल लिहायला शिकवली. तेव्हा ते जर्मनीत होते. मला गझलेचं तंत्र माहीत नव्हतं. मग व्हिडिओ कॉन्फरन्सवर माझ्या गझला मी त्यांना ऐकवायची आणि वृत्त वगैरे नीट आहे का बघायला पाठवायची. मला ते म्हणाले एकदा, गझलेत एकवेळ खयाल नसला तरी चालेल, पण तंत्र अजिबात चुकता कामा नये! मग मी तंत्रातही पक्की होत गेले. अशी मिपावरच वेगवेगळं लिखाण वाचत माझी कविता प्रगल्भ होत गेली.

प्राजुताई, तुझ्यासोबत गप्पा मारून खूप छान वाटतंय. पुन्हा नक्की भेटू आणि तुझ्याकडून खूप कविता ऐकू, वाचू! आमच्याशी इतकं सगळं शेअर केलंस, त्यासाठी अनाहिता आणि मिपातर्फे धन्यवाद!

1
----------------------------------

सौजन्यः CTMM Diwali Function 2010.
प्राजु - नभ कसं दूर दूर गाताना

.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

उल्का's picture

8 Mar 2017 - 3:59 pm | उल्का

छान!
प्रिमो दोन्ही मुलाखती मस्त!

मुलाखत आवडली. त्यानिमित्ताने प्राजुची भेट झाल्यासारखे वाटले.

सानिकास्वप्निल's picture

9 Mar 2017 - 3:35 am | सानिकास्वप्निल

आपल्या मिपाकर प्राजुची मुलाखत मस्तचं, आवडली :)

पूर्वाविवेक's picture

9 Mar 2017 - 5:30 pm | पूर्वाविवेक

अरे वा मस्त ! इतकी प्रतिभावान मुलगी मिपाकर आहे. अभिमान वाटतोय.
प्रिमो, मस्त ओघवती घेतली आहेस मुलाखत.

पैसा's picture

9 Mar 2017 - 5:33 pm | पैसा

झकास! प्राजुशी प्रत्यक्ष गप्पा मारल्यासारखं वाटलं अगदी!

मोनू's picture

9 Mar 2017 - 5:52 pm | मोनू

प्रीमो ... खूपच छान मुलखत...अगदी मनातले प्रश्न विचारले आहेस. प्राजू ने पण दिलखुलास गप्पा मारल्यात...ती मिपाकर आहे हे वाचून तर फारच आनंद झाला. आता मिपावरच्या तिच्या कविता नक्की वाचेन.

प्राची अश्विनी's picture

9 Mar 2017 - 5:58 pm | प्राची अश्विनी

वा! मुलाखत आवडली.

मंजूताई's picture

9 Mar 2017 - 6:24 pm | मंजूताई

पासून तिचे लेख कविता वाचतेय. छानउमनमोकळी मुलाखत!

पद्मावति's picture

9 Mar 2017 - 7:17 pm | पद्मावति

खुप मस्त मनमोकळी मुलखत.

मनिमौ's picture

10 Mar 2017 - 12:15 pm | मनिमौ

मुलाखत

नूतन सावंत's picture

10 Mar 2017 - 9:46 pm | नूतन सावंत

आपलंच माणूस मोठं होताना पाहण्याचा आनंद मिळाला.प्राजु,अशीच मोठी हो.
प्रीमो,झकास झालीय मुलाखत.

छान मुलाखत. प्राजु अनाहितात पण भेटायला आवडेल तुला!

संजय क्षीरसागर's picture

11 Mar 2017 - 12:35 am | संजय क्षीरसागर

प्राजक्ताला शुभेच्छा !

छान मुलाखत ! प्राजु मिपावर लिहिती रहा ग प्लीज !!!

सविता००१'s picture

11 Mar 2017 - 11:48 am | सविता००१

मस्तच मुलाखत.
प्रिमो, छान घेतली आहेस गं
त्यानिमित्ताने वाटलं - आओअल्या मिपावरच कितीतरी मोठ्ठी माण्सं सापडतील आपल्याला-वेगवेगळ्या क्षेत्रांत आघाडीवर असलेली.
ही अगदी आपल्याच घरची मुलाखत. मस्तच

सविता००१'s picture

11 Mar 2017 - 11:50 am | सविता००१

आओअल्या - आपल्या असं वाचा कृपया.

मिपा सदस्य प्राजु बद्दल एवढी माहिती नव्हती.मस्तच.छानओळख प्रिमो.

शामसुता's picture

11 Mar 2017 - 6:40 pm | शामसुता

प्रिमो...मुलाखत आवडली आणि प्राजुही. मिपावरच्या तिच्या कविता नक्की वाचेन

जव्हेरगंज's picture

11 Mar 2017 - 11:50 pm | जव्हेरगंज

व्वा!!
हे आवडलं!!

त्यांच्या मिपावरील लिखाणाची लिंक द्या की!!