मारुतराव आज लय कावला होता. आलटुनपालटुन कधी तो पंजावर मुठ आपटत ओसरीवर अस्वथपणे येरझार्या घालत होता, तर कधी उंबर्यावर बसुन तांबारलेल्या डोळ्यानी आढयाकडे पहात होता. शिरपतरावानी आज त्याच्या शेपटावर पाय दिला होता. छबुरावनी रस्त्यावरुन जाताना डोकवलं आणि नेहमीप्रमाणे मारुतरावला रामराम केला. मारुतराव फक्त तोंडातल्यातोंडात पुटपुटला. छबुरावने ओळखलं की काही तरी बिनसलंय. छबुराव डायरेक्ट घरात घुसला.
“ओ आप्पा!! ही काय पद्धत म्हणावा का काय माणसानी? बॉलणं नाय, रामराम नाय. तुम्ह्याच आसं केल्यावं आम्ह्या कोणच्याकं पघायचं?“ छबुरावनी काडी टाकली.
“काय सांगायला ताँडच नाय पघ छबुराव. तो सुक्काळीचा शिर्पतराव, त्याला म्या गोडीत काय म्हणलं, का बॉ तुह्या पॉराचं आन माह्या मच्छिंदरचं लगीन येकाच आठवडयात आगंमागं वाजणार हाये, तं आपुण बस्ता संगच बांधू. म्हई कसं व्हईन, का नवरानवरीची कापडं, पाहुण्यारावळ्यांचं मानपान, आहेराची लुगडी दॉघांनी मिळुन घितली तं जरा सोस्त पडतील. म्या काय वंगाळ बोललो का? आँ? तं शिर्पतराव बिघाडला. म्हणला - ”, मारुतराव हाताचा पंजा हलवत वाकुल्या दाखवत म्हणाला, “हॅ हॅ हॅ ….. तुमचं न आमचं न्ह्याय जमायचं. आमच्या मॉठया घरला शोभंल असा बस्ता बांधणारहे आम्ही – तालुक्याला जाऊन! तुम्ही आपलं घ्यावा गावच्या वाण्याकं तुमच्या ऐपतीपरमाणी. तिह्यायचा बाजीराव. मोठया घरचा म्हणं!!” मारुतराव संतापानी नुस्ता फुसफुसत होता.
“अस्सं हाय व्हय.”, छबूराव म्हणाला, “ तिह्यायचं बांडगुळ तेहे ते शिर्पतराव!! काह्याचं मॉठं घर आप्पा!! खायाची बोंब न हागायचा तरफाडा! मपल्याला इच्चारा!“
“आस्सं!! कस बॉल्ला! माहं टक्कुरं पार भणाणलंय. मी बी तेच्या चढेल हाये. त्यो तालुकाल्या तेच्या पॉराचा बस्ता बांधणार हाये ना? मी बी आता तालुक्याला बस्ता बांधीतो. पघतोच कसा उडया मारतोय त्यो.” मारुतराव ईरेला पेटला.
हे ऐकताच छबुरावचे डोळे लकाकले. गेले कित्येक दिवस तो ज्याची वाट पाहत होता, ती संधी आलीय असं त्याला वाटून गेलं. कमळी – त्याची बायको – तिने मुंबईला तिच्या थोरल्या बहिणीकडे जायचा सारखा लकडा लावला होता. छबुराव काही ना काही कारणं सांगून कमळीला गप्प बसवत होता. पण कालपासून तिने छबुरावचा पिच्छाच पुरवला होता. मुंबईला जायचं म्हणजे खर्चाचं काम होतं. आणि छबुरावचं घोडं तिथंच पेंड खात होतं. तो दहा वर्षांपूर्वी कमळीबरोबर मुंबईला पहिल्यांदा गेला होता आणि त्याला मुंबई लई म्हणजे लई आवडली होती. त्या मोठमोठ्या आणि उंच इमारती, ट्रेन, स्टेशनं, बस, मोठमोठे रस्ते, त्यावरून धावणार्या असंख्य मोटारी, समुद्र, बागा, प्रेक्षणीय स्थळं, हॉटेलं, फॅशनेबल स्त्रीपुरुष बघून त्या वेळी तो पार हरखून गेला होता. त्याच्या साडूने त्याला थोडीशी मुंबई दाखवली होती. समुद्रकिनार्यावर आडोशाला बसलेली जोडपी जशी एकमेकांना चिकटून बसली होती, तशी कमळीला घेऊन बसायची त्या वेळी त्याला खूप इच्छा झाली होती. पण त्या वेळी त्याला ते शक्य झालं नव्हतं. परत पुढच्या वेळी मुंबईला आलो तर कमळीसंगं समुद्रकिनार्यावर भेळ, पाणीपुरी खायची, फिरायचं आणि मस्त त्या जोडप्यांसारखं आडोशाला बसायचं, असं त्याने मनोमन ठरवलं होतं. त्यात त्याची मेव्हणी सुगरण. तिच्या हातच्या मटणाची चव छबुरावच्या जिभेवर अजून रेंगाळत होती. पण पुढची दहा वर्षं त्याला परत मुंबईला जाणं शक्य झालं नाही. भरीस भर म्हातारा-म्हातारीचाही जाच होता. त्याला न कमळीला ते जराही कुठं हलू देत नव्हते. आर्थिक परिस्थितीही तशी बेतासबातच होती.
छबुराव परत मुंबईला जायची संधीच शोधत होता आणि अनायासेच संधी चालून आलीय असम त्याला वाटलं. बास, फक्त मारुतरावला पटवायला पाहिजे.
“आप्पा!! माह्याकं एक नामी आयडया हाये त्या शिरपतरावची जिरवायची. पघा तुम्हाला पटती का” छबुरावने सावध सुरुवात केली.
“नाय, म्हणजे तुम्ही तालुक्याला बस्ता बांधान, पण मंग शिरपतराववर कुरघोडी कशी व्हणार? तो बी तिथंच बस्ता बांधणार. काय मजा नाय तालुक्याला बस्ता बांधण्यात."
“असं म्हणतो? मंग काय करावा असं म्हणणं हाय तुझं? “ मारुतराव डोळे वटारून म्हणाला.
“माहा ऐका. डायरेक मंबयला नामी बस्ता बांधा. मंग पघा शिरपतरावचं नाक कसं खाली व्हतंय,“ छबुरावने घोडं दामटलं.
“अरं पण!!” मारुतरावने जरा विचार केला. “तू म्हणतो तेबी खरं हाय. पर मम्बईचं मला काय म्हाईत नाय गडया. म्या कवा मम्बईला गेलो नाही बॉ!!” मारुतराव म्हणाला.
“अर्र!! त्ये तुमी माज्यावं सॉडा आप्पा. अहो, माहा साडू हाये ना मंबईला. आपुण त्याच्याकं जाऊन राहू. त्यो न्हिन आपल्याला चांगल्या दुकानात. फक्त ते खर्चाचं पघा तुमी.” छबुराव म्हणाला.
हो-ना करता मारुतराव तयार झाला. जायचा दिवस ठरला. मारुतराव, त्याचा लग्नाचा मुलगा मच्छिंद्र, छबुराव आणि त्याची बायको कमळी- एवढ्यांनी जायचं ठरलं.
छबुराव उत्साहाने जाण्याची तयारी करायला लागला. छबुराव तसा नेहमी इतरांच्या मदतीला तत्पर अशी त्याची ख्याती, पण धांदरटपणा आणि उगाचच इतरांवर भाव मारणं हे त्याच्या स्वभावात मोठे दोष होते. त्यामुळे त्याचं बर्याच वेळा हसंही व्हायचं. अर्थात लोक चेष्टा करतात याचं त्याला काही वाटायचं नाही. त्याने साडूला आधी पत्र लिहून कल्पना दिली. निघायच्या दिवशी त्याने त्याच्या लग्नाच्या वेळी शिवलेला ठेवणीतला ड्रेस काढला. आता तसा तो जुना झाला होता, पण त्यापेक्षा भारी ड्रेस छबुरावकडे नव्ह्ता. फक्त कमळीने त्याच्या शर्टचा फाटलेला खिसा भलत्याच रंगाच्या दोर्याने हातशिलाई मारून शिवला होता आणि एक तुटलेलं बटन वेगळंच लावलम होतं. तेवढं जरा विजोड दिसत होतम. छबुराव नेहेमी सदरा पायजमा आणि टोपी या वेषात वावरायचा. बर्याच वर्षांनी शर्ट-पँट घातल्याने आणि केस चापून चोपून बसवल्याने तो एकदम कार्टून दिसत होता. वर त्याने कोणाचा तरी गॉगल लावला होता. कमळीने नवीन नऊवारी साडीची घडी मोडली. मारुतराव आपला पांढरा पायजमा, सदरा आणि टोपी या वेषात होता. मच्छिंद्र जरा बरा, म्हणजे आजचा तरुण वाटावा इतपत सजला होता. मारुतरावने सहा-सात हजार रुपयांचम बंडल शर्टाआतच्या कोपरीच्या खिशात ठेवलं होतं.
मुंबईची एस.टी. ज्या फाटयावर थांबायची, तो फाटा गावापासून तसा दूर होता. छबुराव, त्याची बायको कमळी, मारुतराव आणि मच्छिंद हातात पेटारा, पिशव्या घेऊन चालत चालत फाट्यावर पोहोचले. एकदाची मुंब्ईची एस.टी. आली. छबुराव सगळ्यांना गाडीत चढवून स्वतः शेवटी चढला. आत बरीच गर्दी होती. छबुरावला भाव मारायची लहर आली. गाडीत चढल्या चढल्या “२४,२५,२६,२७ उठा. रिझुरीशन हे आमचं!” असे ओरडला आणि कमळीला हसून डोळा मारला. त्या दोन शिटांवर नेमकं एक सुशिक्षित कुटुंब बसलं होतं. “ओ मिष्टर, रिझुरिशन हे आमचं” छबुराव त्या पँटवाल्याला म्हणाला. पँटवाल्याला हसू आवरेना. त्याने कंडक्टरलाच आवाज दिला, “ओ मास्तर, यांचं रिजर्वेशन् जरा चेक करा.” कंडक्टर छबुरावला ओळखत होता. “काय छबुराव, माणसं बघून तरी बोलायचं. त्यांचं रिझरवेशन हाये त्या शिटांचं. लाटणं आलं का व्हईल गर्दी कमी. तव्हा मिळल बसायला जागा. तवर र्हावा उभं. तिकिटं घ्या चला”. कंडक्टर म्हणाला.
थोड्या वेळाने कुणाला तरी गाडी लागली आणि त्याने नेमकी छबुरावच्या पँटवर उलटी केली. ”शॅट!!धिस रूरल पिपल, दे डोंट…..अं….” छबुराव अडखळला. पुढे काही त्याला इंग्लिश सुचेना. मगाचा तो पँटवाला चेष्टेने छबुरावकडे बघून हसला. इतर टोपीवाले, फेटेवाले मान उंचावून छबुरावकडे बघायला लागले.
एकदाचं लाटणे नावाचं गाव आलं आणि गाडीतली गर्दी थोडी कमी होऊन गाडीत हवा खेळायला लागली. मारुतराव आणि मच्छिंद्र एका सीटवर आणि छबुराव आणि कमळी दुसर्या सीटवर बसली. गाडी सुरू झाल्यावर कमळीने हुश्श करत म्हटलं, “बया, लाटणं सरलं तव्हा कुठं जिवाला बरं वाटलं.” छबुराव दचकला. “कमळे, हळू बोल. लॉकांना वंगाळ वाटंन.“ त्याने बायकोला गप केलं.
पाच तासांचा प्रवास करून एकदाची गाडी मुंबई सेंट्रल बस स्थानकावर आली. छबुराव सगळ्यांना घेऊन मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनकडे निघाला. तसा तो दहा वर्षांपूर्वी आला होता, त्यामुळे त्याला मुंबईचं फार काही आठवत नव्हतं. पण त्याचा आत्मविश्वास दांडगा होता. मारुतराव, मच्छिंद्र, कमळी त्याच्या मागोमाग तो नेईल तिकडे चालले होते. मारुतराव, मच्छिंद्र पहिल्यांदाच मुंबईत आले होते, त्यामुळे प्रचंड बावरले होते. छबुरावने रेल्वे स्टेशन शोधलं आणि चौघांचं तिकीट घेऊन आला. बाकीचे तिघेही बिचारे मुंबईची आणि रेल्वे स्टेशनवरची गर्दी आणि ती घाईगडबड बघून बुजले होते. छबुराव त्यांना आवेशात म्हणाला, “काय काळजी करू नका तुम्ही. आपुण हाये ना. पार बालीस्टर जरी आला तरी म्या घाबारणार नाही.” चौघांना घेऊन तो प्लॅटफॉर्मवर गेला आणि कुठली ट्रेन आहे ह्याचा विचार न करता सगळ्यांना घेऊन त्या गर्दीत चढला. चार पाच स्टेशनं गेल्यानंतर पुढच्या स्टेशनवर उतरणार्यांच्या रेटयाने छबुराव आणि मारुतराव त्यांच्या बॅगा आणि पिशव्यांसकट प्लॅटफॉर्मवर पडले. आतमध्ये कमळी भीतीने किंचाळायला लागली आणि मच्छींद्रला बिचार्याला काय करावं समजेनासं झालं. छबुराव, मारुतराव कसेबसे पडलेलं सामान गोळा करून धडपडत उभे राहिले, तेवढ्यात ट्रेन सुटली. छबुराव जिवाच्या आकांताने ट्रेन पकडायला धावत सुटला, पण कुणाला तरी धडकून पडला. कुणी तरी त्याला उठवलं आणि बोललं, “अरे कायकू जान खत्रेमे डाल रहेला है. दुसरी ट्रेन लगेच आयेंगी.” पाच मिनिटांनी आलेल्या ट्रेनमध्ये छबुराव आणि मारुतराव चढले. पुढच्या स्टेशनवर त्याने डोकावून बघितलं तर कमळी आणि मच्छिंद्र उतरले होते आणि कमळीने आकांत मांडला होता. ही गर्दी भोवती जमली होती. छबुरावच्या जिवात जीव आला आणि तो आणि मारुतराव ट्रेनमधून उतरले. छबुरावला बघताच कमळी मोठ्याने गळा काढायला लागली. “अवं, काय नगं तुमची टेरेन बिरेन. चिपाडासारखं चॅम्बलं मला पार त्या गर्दीत. त्यांचा मुडदा गाडला त्यांचा.” कमळी शिव्या द्यायला लागली. छबुरावने तिची कशीबशी समजूत काढली. गोंधळ ऐकून टी.सी. काय गडबड आहे म्हणून बघायला आला. खेडवळ लोक बघून त्याला आणखी चेव चढला. त्याने छबुरावकडे तिकिट मागितलं. “हे तर घाटकोपरचं तिकिट आहे. तुम्ही वांद्र्याला उतरलेत. चुकीच्या ठिकाणी आले तुम्ही. चला केबिनमध्ये. दंड भरायला लागेल.” तो सगळी वरात केबिनमध्ये घेऊन् गेला. छबुराव आणि मारुतराव आता घाबरले. दोघेही बिचारे टी.सी.च्या हातापाया पडून अजिजी करायला लागले. “हा आहे की सुशिक्षित तुमच्याबरोबर. यालाही कळलम नाही का?” टीसी मच्छिंद्रकडे पाहत म्हणाला. मच्छिंद अजून कावराबावरा झाला. बाहेर गर्दी, कोई तो भी घाटी को पकडा है म्हणून हसत होती. शेवटी टीसीला दया आली आणि त्यांना दादरला उतरून कुठे कसं जायचं ते सांगितलं. मारुतराव बजरंग पावला म्हणत टीसीच्या पाया पडला. टीसीच्या केबिनमधून बाहेर पडल्यावर दोन सभ्य दिसणार्या इसमांनी छबुरावला विचारलं, “कुठं जायचमय दादा तुम्हाला? चला, आम्ही सोडतो.” छबुरावचम अवसान पार गळलं होतं, त्यामुळे त्याला मोठाच आधार वाटला. त्या दोन इसमांनी घाटकोपरपर्यंत त्यांची साथ दिली. ट्रेनमध्ये मारुतराव आणि छबुरावशी भरपूर गप्पा मारल्या. पैशाला वगैरे मुंबईच्या प्रवासात जपायला सांगितलं. त्यामुळे मारुतराव अधूनमधून कोपरीला हात लावून खातरी करून घेत होता.
छबुरावनेपण गावाकडच्या खर्या-खोट्या गमतीजमती सांगून त्यांचं मनोरंजन केलं. घाटकोपरला उतरताना छबुराव आणि मारुतरावने त्यांना तोंड भरुन आशीर्वाद दिले. ते दोघे इसम पुढे निघून गेले.
“म्या म्हणलं व्हतं ना आप्पा? शेहेरात लय चांगली माणसं अस्त्यात? आसं कुणी बीनवळखीच्याला मदत करीन का? आन त्या दोघांचं बोलणं बी कसं मिठ्ठास व्हतं कनाय?” छबुराव भलताच इम्प्रेस झाला होता.
घाटकोपरल्या उतरल्यावर छबुरावच्या पाहुण्याकडं रिक्षाने जायचं ठरलं. छबुरावने रिक्षावाल्याला पत्ता सांगितला. छबुरावच्या साडूच्या बिल्डिंगखाली रिक्षा थांबल्यावर सगळे उतरले आणि पैसे द्यायला मारुतरावनी कोपरीच्या खिशात हात घातला, तसा त्याचा हात खिशामधून आरपार बाहेर आला. “अरे माह्या कर्मा!!!”, मारुतराव डोक्याला हात लावून मटकन खाली बसला आणि कपाळ बडवत ओरडला, “अरं छबुराव, त्या दोन भूतखान्यांनी आपल्याला बोलण्यात गुतवून खिसा कापला रे. तेंच्या आयला तेंच्या सकासा. समदे पैशे पळावले.”
इतका वेळ मच्छिंद्र शांत होता. आता त्याचं टाळकं सरकलं. “म्हणत व्हतो आप्पा तुमाला छबुरावच्या नादी नका लागू म्हणून. घ्या आता.” मच्छिंद्र भडकून बोलला.
मारुतरावचाही कंट्रोल सुटला. तो छबुरावला संतापाने म्हणाला, “तुह्या आयचं इद्र तेहे छब्या!! म्हणलं तालुक्याला बस्ता बांधू. तं म्हणं नको. मम्बयला बांधून शिरपतरावचं नाक कापू. आता शिरपतरावपुढं काय लंगुटी लावून जाऊ? लय तमाशा झाला सक्काळपसून. आत्ताच्या आता परत गावाला निघायचं. बास झाली तुही मम्बई.”
कमळी नवर्याची बाजू सावरायला पुढं झाली. "आप्पा, त्यानला बॉलायचं काम नायी. आमी मम्बयला येणारच व्हतो. तुमाला काय गूळ खॉबरं दिऊन आवताण नव्हतं दिलं आमच्याच बरुबर या म्हणून.”
“कमळे, तू चिप रहा. तेच्याबरुबर तुहापण खर्च करायला लावलाय छब्यानी. तू मपल्याला शानपणा शिकवीती?” मारुतराव पिसाळला.
खाली गोंधळ ऐकून छबुरावचा साडू बाहेर आला. तो पळतपळतच रिक्षाजवळ आला. भांडणावरून त्याला अंदाज आला. त्याने रिक्षावाल्याचे पैसे दिले आणि पाहुण्यांना घरात घेऊन गेला. चहापाणी झाल्यानंतर त्याने सविस्तर विचारपूस केली. तो तसा भला माणूस होता. त्याने मारुतरावला शांत केलं. ऐन वेळी पैसे जमा करुन त्याने मुंबईला मारुतराव आणि मच्छींद्रच्या मनासारखा बस्ता बांधून दिला. छबुराव आणि कमळीचाही भरपूर पाहुणचार केला. मारुतरावच्या डोळ्यात निघताना पाणी आलं आणि पैसे लवकरात लवकर पाठवून देईन असं आश्वासन देऊन तो, मच्छिंद्र, छबुराव आणि कमळी गावाला परत आले.
------- समाप्त ---------
प्रतिक्रिया
26 Feb 2017 - 10:38 am | पैसा
कथा आवडली. बोलीचा बाज मस्त जमला आहे!
26 Feb 2017 - 12:24 pm | प्राची अश्विनी
आवडली.
26 Feb 2017 - 2:05 pm | अॅस्ट्रोनाट विनय
कथा आवडली.पुणे ग्रामीणची वेगळी बोलीभाषा असेल याची कल्पना नव्हती.
26 Feb 2017 - 2:32 pm | बबन ताम्बे
जुन्नर , आंबेगाव , खेड , शिरूर या तालुक्यात ग्रामीण भागात ही बोली ऐकायला मिळते .
27 Feb 2017 - 9:54 pm | मित्रहो
आणि पुणे ग्रामीण मधे पण फरक असतो का?
मला कुणीतरी नगरला विचारले होते कोठाल्ले तुम्ही? सुरवातीला कळलेच नाही.
आता तुम्ही तालुके सांगितल्यावर आठवले नगर कल्याण एसटीच्या प्रवासात ही भाषा ऐकली होती.
27 Feb 2017 - 10:50 pm | बबन ताम्बे
फारसा फरक नाही. थोडेसे शब्द ( आणि शिव्या ☺) इकडेतिकडे .
1 Mar 2017 - 5:44 pm | सूड
पुण्यातली एक भाषा असते आणि पुन्यातली येक भाषा आसती.
26 Feb 2017 - 3:47 pm | पद्मावति
कथा आवडली.
26 Feb 2017 - 10:15 pm | मित्रहो
संवादातला ठसका जाणवला.
मस्त आहे
27 Feb 2017 - 5:55 pm | चौथा कोनाडा
मस्त,
झक्कास,
फर्मास !
कथा आवडली.
द मा मिरासदारांच्या शैलीची आठवण झाली.
मारुतरावला छबूरावच्या साडू ने मदत केली म्हणून बरे, नाय तर सगळाच बट्ट्याबोळ !!
27 Feb 2017 - 6:03 pm | बबन ताम्बे
.
27 Feb 2017 - 5:59 pm | सविता००१
आवडली. आमच्या शेजारचं एक कुटुंब आळेफाट्याहून पुण्याला आलं होतं रहायला. त्यांच्याकडे असं बोललेलं कायम ऐकलंय.
27 Feb 2017 - 6:07 pm | बबन ताम्बे
.
27 Feb 2017 - 6:02 pm | नूतन सावंत
झकस.मजा आली वाचायला.
27 Feb 2017 - 7:50 pm | मितान
छान !
27 Feb 2017 - 11:11 pm | चतुरंग
आमच्या नगरकडल्यावानीच हाय की ये! लै भारी लिवता राव तुमी, एक नंबरी!
तुमी कुठल्ले म्हनले भौ?
-चतुरंग नगरकर
28 Feb 2017 - 8:55 am | बबन ताम्बे
जुन्नर तालुक्यातील ओतूर नावाचे गाव आहे . ओझर आणि लेण्याद्री च्या जवळ . ते माझे गाव.
28 Feb 2017 - 10:16 am | vcdatrange
खरं वाट्ना
28 Feb 2017 - 10:35 am | बबन ताम्बे
☺☺☺
27 Feb 2017 - 11:47 pm | भिंगरी
मस्त!
28 Feb 2017 - 1:10 pm | विनिता००२
मस्त :)
माझी एक कलिग नगरची होती. ती 'इथ्थल्ल, तिथ्थल्ल' अशी बोलायची.
28 Feb 2017 - 1:34 pm | प्रकाश घाटपांडे
नगरकल्डी बी इकल्ड्यावानीच उलिसाक फरक
28 Feb 2017 - 3:19 pm | स्वीट टॉकर
मस्त !
1 Mar 2017 - 11:20 pm | उत्तरा
कथा आवडली..
आमचे पुन्यातले जुने घरमालक अस्सेच बोलतात. एकदम भारी!!!
2 Mar 2017 - 5:45 pm | कविता१९७८
मस्त लेखन
25 Mar 2017 - 11:27 pm | एमी
छान आहे. आवडल.