धोडपचे धाडस - सोलो ट्रेक

भटक्या चिनु's picture
भटक्या चिनु in भटकंती
15 Feb 2017 - 6:09 pm

शीर्षक वाचून काही जण गोंधळतील तर काहींचा विश्वास बसणार नाही. पण जे अनुभवलयं तेच इथे लिहीत आहे. सतरा वर्षांच्या ट्रेकींग प्रवासातील मी एकट्याने केलेला पहिलाच ट्रेक. एक वेडेपणाच.

            नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात माझी पंढरीची वारी (परीक्षा) आटोपली होती. त्यानंतर आँफिसला रूजू होण्याची घाई नसल्याने खूप निवांत झालो होतो. आजच्या काळात नशिबाने मिळालेल्या अशा मोकळ्या वेळात वाचन पुन्हा सुरू केलं. पण यंदा चटक लागली ती e-sahityवरच्या 'भूतकथा, रहस्य, गूढकथा, तंत्र-मंत्र' ह्यांची. दिवसरात्र ती पुस्तक वाचवून संपवत होतो. त्यात आमच्या गृपच्या नोव्हेंबरच्या ट्रेकची वाट बघत होतो. पण ट्रेकच्या ठरलेल्या तारखा आणि कुटूंबासमवेत देवदर्शन-इतर भटकंती करण्याच्या तारखा नेमक्या जुळून आल्या. अर्थातच घरच्यांसोबत जाण्यावाचून ट्रेकचा पर्याय उडवावा लागला. वर्षातून तीनचार वेळा माझी नाशिकला नातलगांकडे चक्कर होतेच. आत्ताही होती ती 'सप्तशृंगीदेवी'च्या दर्शनानिमित्ताने. त्यासाठी नोव्हेंबरचा शेवटचा शनिवार-रविवार ठरला गेला. नाशिकला मी दोन-तीन दिवस आधीच जाणार होतो. सहज नेटवर आजूबाजूचे किल्ले शोधून काढले आणि आपोआप आकर्षित झालो ते नाशिक जिल्ह्यातील आणि सातमाळा डोंगररांगेतील सर्वात उंच, शिवलिंगासारखा दिसणार्या 'धोडप' गडाकडे. धोडपची माहिती काढली तर तो नाशिक शहरापासून काही अंतरावर होता (७०किमी).धोडपवर शिक्कामोर्तब झाला आणि सोबत म्हणून काही नेहमीच्या मित्रांना येण्याचं विचारलं पण अपेक्षेने नकारच मिळाला.(टांग देतील ते मित्र कसले;-|) म्हणून एकट्याने ट्रेकला जायचा विचार मनात आला. खरं तर त्या भूतकथा, तंत्रमंत्राच्या गोष्टी वाचून मनापासून एकट्याने जाण्याची काही हिम्मत होत नव्हती (ही उगाचच मी घेतलेली भिती). त्यात गावाकडच्या वाचलेल्या काही सत्यकथा जास्तच होत्या. मनात मग नकारात्मक विचार येत होते. ट्रेक पूर्ण करू का? वर काही घडलं तर? कोणी गावकर्याने एकटेपणाचा फायदा घेतला तर? ट्रेकमध्ये जीवाचं काही बरं वाईट झालं तर? असे प्रश्नात्मक विचार मनात घर करून बसले. ट्रेक तर करायचाच होता पण हे असं भूताच्या भितीचा बाऊ करून नाही. शेवटी हा मनाच्या अंधश्रध्देचा खेळ आहे हे मनाशी पक्के करून एकट्याने जाण्याचा निर्णय घेतला.

            २३ नोव्हे.ला दुपारी नाशिक गाठले म्हणजे ट्रेकच्या आधीचा दिवस. मी ट्रेकला जातोय ह्याची घरच्यांना फक्त कल्पना दिली. एकट्याने जाण्याची नाही(अन्यथा ट्रेक झालाच नसता). फक्त नातेवाईकांना तशी पूर्वसूचना दिली. स्वाभाविकपणे त्यांचही 'कशाला जातोस? एकटा जातोस का? काय आहे एवढ्या वर? सोबत ने कोणालातरी' अशी प्रश्नावली सुरू झाली. त्यांच्यासमोर एकट्याने जाण्याची वरवर फुशारकी जरी मारत असलो तरी आतून जरा धाकधुक होतीच. त्यांना तेवढ्यावर पटवले आणि दुसर्या दिवसाचा विचार करण्यात गुंतून गेलो.

            दि.२४ नोव्हे'१६. गुरुवार. Odd day. धोडप इतर महत्वाच्या गड-किल्ल्यांप्रमाणे फार काही प्रसिध्द नसल्याने गडावर फक्त आपण एकटे असणार ह्याची पक्की खात्री झालेली. लवकर निघून लवकर घरी परतायचं असं ठरवलेलं. नेमका सवयीनुसार उशीरा उठलो आणि घरातून उशीरा म्हणजे सकाळी ८:३०ला निघालो (निघायचं होतं ७ वाजता). द्वारकेवरून चांदवड-मालेगावला जाणार्या बर्याच काळ्या-पिवळ्या टँक्सी असतात. त्यातलाच एका टँक्सीत बसलो. ती १२ आसनी टँक्सी भरायला खूप वेळ लागला. अखेर पक्का व्यवसायिक असलेल्या ड्रायव्हरने १५ प्रवासी बसवून ९:३०वाजता टँक्सी काढली आणि माझा ट्रेकचा प्रवास सुरू झाला (इथे 'स्वदेस'मधला मोहन भार्गव झालेला माझा). हायवे उत्तम असल्याने ड्रायव्हरने पाऊण तासातच 'वडाळीभोई' फाट्याला उतरवले. धोडपने धूसर दर्शन दिले. इथूनच धोडपपर्यंत पोहोचता येतं. वडाळीभोई-धोडांबेगाव-हट्टीगाव-धोडप. फाट्यावर बसची चौकशी केली तर दहा मिनीटाआधीच निघून गेलेली. टमटमही होत्या पण प्रवासी मिळत नव्हते. थोडावेळ तिथेच घुटमळून चहापान केला आणि मिळेल त्या गाडीने गावात जायचं ठरवलं. सुदैवाने एक टेम्पो आला. नुकताच कांद्यांनी रिकामा केलेला. "वणीला जातोय. धोडांब्याला सोडतो तुम्हाला. बसा मागं. काय द्यायचं ते द्या." इति टेम्पोवाला. माझ्यासोबत अजून दोन प्रवासीही टेम्पोत चढलो (दिवाना मै चला..किल्ले धोडप करने बडे शौकसे ;-)). माझा शहरी अवतार पाहून एकाने कुठे चाल्ल्याचं विचारलचं. 'किल्ल्यावर जातोय. मागन मित्रमंडळी येतातचे' ह्या माझ्या उत्तराने तो काही बोलला नाही. नागमोडी आणि खड्ड्यांच्या रस्त्याने रिकाम्या टेम्पोचा उभ्यानेच तो खडखडाट सहन करुन अर्ध्या तासात धोडांबेला पोहोचलो. टेम्पोत खाली बसायची हिम्मतपण झाली नाही. टेम्पोवाल्याला २० रूपयाची नोट देऊन चौकशीला वळलो. तिथे चौकशी केली तर हट्टीला जायची सर्वसाधारण अशी कुठली सोय नव्हती. गावात मुलांना घ्यायला-सोडवायला शाळेची रिक्षा, एक-दोन टँक्सी अन्यथा एखाद्याची दुचाकी. एवढीच सोय.
धोडांबेचा रस्ता

     ११:२० झालेले. उशीर झालेला. एका दुचाकीस्वाराला विचारून चालतच हट्टीची वाट पकडली. अंतर ६ किमीच होतं. नेटवरुन काढलेल्या माहितीनुसार ह्या आणि इतर परिस्थितीचा अंदाज बांधलेला होता. हट्टीच्या वाटेवर असताना तोच दुचाकीस्वार मागून आला आणि 'बसा तुम्ही..पुढं एक किमीपर्यंत सोडतो तुम्हास्नी' असं म्हणाला. फुल ना फुलाची पाकळी सही असं मानून गाडीवर बसलो आणि त्याने गाडी हाकली. त्यानेही न राहवून विचारलेच की एकटे चाल्लायत का किल्ल्यावर. मनात दुसरा विचार असल्याने नकळत मी 'हो' म्हणून गेलो. तो म्हणाला "आवं कशाला जातात एकले. चांगल न्हाय तसं. काही महिन्यांआधीच एक म्हातारं एकट वर गेलेलं. वाघानं फाडून खाल्लं त्याला वर." त्याच्या शेवटच्या वाक्यावर मला खूप हसायला आलेलं पण हसू दाबून मी त्याला तू कितीवेळा गेल्याच विचारल्यावर तो दोन-तीन वेळा गेल्याच बोलला. फार काही न बोलता त्याने मला एका पाड्यापाशी उतरवले. त्याचे आभार मानून पुढच्या वाटेला निघालो. अजून अंदाजे ५ किमी गाठायचं होतं. उनही वाढायला सुरूवात झालेली. मनात वेळेचे नियोजन बदल घेत होते. रस्ता तुडवत असताना समोर धोडप दर्शनानेच खुणावत होता. 'काही वाईट होणार नाही. जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जायचं. नाहीच जमलं तर माघारी फिरायचं. उजेडातच आपल्याला धोडांबेला कसही पोहोचायचं.' हे मनाशी तेव्हाच पक्क केलेलं. सुरक्षेची छोटी हत्यारं सोबत होतीच. फोटोग्राफी करत १२:१५ला हट्टीत प्रवेश केला. तोच धोडपविषयी पर्यटन विभागाची पाटी दिसली. इथवर प्राथमिक कामगिरी पार पडलेली. गावातल्या मारुती मंदीरात जाऊन मारुतीरायाचे दर्शन घेतले. एका म्हातार्याला किल्ल्याचा रस्ता विचारला. त्याने रस्ता सांगितला पण त्यानेही माझी वर जाण्याची विचारपूस केलीच. 'मागनं मित्र येताहेत. मी जरा पुढं होतोय.'असं सांगून निघालो. गावातून चांगली मळलेली वाट किल्ल्याच्या पायथ्याशी जाते. पुढे एका वळणावर पर्यटन खात्याचे काम चालू आहे. मुलांच्या खेळण्यासाठी तात्पुरती सोय केलेली दिसली. त्यापुढे एक तलाव लागला. त्यात पूर्ण धोडपचे प्रतिबिंब दिसत होते. वाटेत मोकळ्या माळरानात एक गुराखी बसलेला दिसला. त्याला रस्ता नीट विचारून घेतला. दोन रस्ते आहेत वर जायला. माहीत नाही पण त्याने मला सोपा पण लांबचा रस्ता सांगितला (हे पुढे गेल्यावर कळलं). वर देवीच्या तेलासाठी त्याने माझ्याकडे भाविकतेने पैसे मागितले. त्याला २०रूपये देऊन मी गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. तरी हट्टीपासून परत २-३ किमी तंगडतोड झालेली.
हट्टीकडे
हट्टीकडे
हट्टीकडे
तलाव
तलाव

              गडाच्या पायथ्याशीच मारुतीचं छोटसं मंदिर आहे. 'सुखरूप परत येण्याची, घरी जाण्याची शक्ती दे' असे प्रार्थुन चढायला सुरूवात केली. घडाळ्यात १२:४० झालेले. उन चांगलच तापलेलं. एवढी तंगडतोड करून लगेच चढायला घेतल्याने सुरूवातीला चांगलीच हासहूस होत होती.(एवढ्या उशीराने सुरु केलेला प्रथम ट्रेक). पाच मिनीट चढलो की दहा मिनीट थांबायचो. शरीराची आणि मनाची एकमेकांशी हातापायी चालू होती. चढ सहन होत नव्हता म्हणून ग्लुकोज पाण्याचा एक छोटा ब्रेक घेतला. पुन्हा चढायला सुरूवात केली. चढ सरळ असल्याने थकवा लगेच जाणवत होता. एकटा असल्याने स्वतःच मनाची समजूत घालायला कस लागत होता. त्यात दोन आठवड्यानंतर डिसें.ला एका प्रोफे.गृपसोबत 'अ-म-कु' करण्याचा मनात विचार चालू होता. 'तुला हा ट्रेक झेपत नाहीए आणि तू अ-म-कु काय घंटा करणार' इति मन. अशा विचारातच असताना छोट्या पाँईंटला आलो जिथून दोन वाटा फूटतात. गावकर्याने मला उजवीकडच्या वाटेने जायला सांगितलेले. पण मला छोटा बाण डावीकडच्या वाटेचा दिसला. अगोदरच उशीर झालेला. रिस्क घेण्यात अजून वेळ घालवायचा नव्हता. पण तरीही त्या बाणावर विश्वास ठेवून मी डावीकडचीच वाट पकडली. फार फार तर वरपर्यंत न जमल्यास परत मागे फिरायचं असं एकट्याशीच पुटपुटलो. पुढे दोनदा वाट चुकल्याने परत योग्य वाटेच्या शोधात थोडा गोंधळलो. इथे मी चितळेला(माझ्या मित्राला)आठवून मागे फिरलो आणि अचूक वाट सापडलीच (चितळेगिरी की जय). एक तास होऊन गेला. चढताना वर एक पत्र्याचं घरं दिसलं. जीवात जीव आलेला. काही मिनीटात तिथे पोहोचलो आणि एका झाडाखाली विसावलो. हायसं वाटलं. पत्र्याच्या घराच्या बाजूलाच अजून एक छोट घर होतं. तिथून एक साधू माझ्या दिशेने आला. भगवे कपडे, पांढरे केस, दाढी-मिश्या, सावळा चेहरा. जरा ढोंगीच वाटला मला. त्यानेही माझी विचारपूस केली. माझी मोजकी उत्तर बघून निर्मळ मनाने तो किल्ल्याविषयी सांगू लागला. किल्ल्याचा इतिहास, इंग्रजांचा घुसखोरीचा तोकडा प्रयत्न, मराठ्यांचा किल्ल्यावरचा ताबा, इ. त्याच्याबाबतचा माझा आधीचा समज खोटा ठरला. त्याला पाण्याचं विचारल्यावर झाडामागचं तळ त्याने दाखवलं. तळ्याच्याबाजूने गोड पाण्याचा लहान झरा वाहत होता. ते गोड पाणी अमृत मानून-पिऊन तृप्त झालो. तिथून पंधरा-वीस पावलांवर ४-५ घरांचा सोनारपाडा आहे. आता तिथे आदिवासी राहतात. 'शेळ्यांच्या दूधापासून तिथे रोजचा ५०-६०किलो खवा बनवून नाशिकला पोहोचता केला जातो' इति साधूमहाराज. साधूला दुसर्या रस्त्याविषयी विचारल्यावर तो म्हणाला "तो रस्ता जरा लांबचा हाय. अजून एक तास गेला असता तुमचा. दोन दरवाजे लागतात तिथनं. बरं झालं तुम्ही गुराख्याचं ऐकलं नाही अन हिथनं आलात. हा रस्ता शार्टकट हाय. आता हिथून पुढं पायर्या लागल्यात की अर्ध्या घंटात वर पोहोचता तुम्ही." 'वाह...बाबाने तो मेरा हौसला बढा दिया था..सही पकडे है बालक..दटे रहो.' एक पारले-जीचा पुडा त्याला अर्पण करून मी पुढे निघालो.
वरुन दिसणारा परिसर

झोपडीतून दिसणारा गडमाथा

पाण्याचे तळे व गणेशमुर्ती

             एव्हाना २ वाजून गेलेले. कातळीचा टप्पा सुरु झाला. पहिली, दुसरी शिडी पार करुन उजव्या हाताला बुरुजापाशी पोहोचलो. बुरुजाजवळच्या वाटेत दगडांची पडझड झालेली. डाव्या हाताला लोखंडी कठडे बसवलेत. तिच पायवाट पकडली. वार्याची सूमसूम आणि गवताची सळसळ गडावरच्या शांततेचा भंग करीत होती. पुस्तकातल्या भयकथा आठवत होत्या. इथे जरा फाटायला सुरूवात झाली. चढ-उतार करणाऱ्या त्या वाटेबद्दल शंका वाटली कारण पुढे सरळसोट कातळ दिसत होती. २० मिनीट चालून एका वळणाला कठडेही संपले आणि वाटही. समोर अख्खी कातळ. वैतागून त्याक्षणी तोंडातून अक्षरशः शिव्या बाहेर पडत होत्या. '**$@%** पुढे जायला वाटच नाहीये तर झक मारायला कठडे बसवलेत...*#$%* बनवायचे धंदे' असं बोलून तिथला क्लिक करून धावतच माघारी निघालो. पडझड झालेले दगडांपलीकडची वाट पकडून मुख्य दरवाजापाशी पोहोचलो. पायर्या चढताना उर्दू भाषेतला एक शिलालेख दिसला. थोड्याच वेळात माथ्याशी पोहोचलो. माळरानच. पडका वाडा व कबर ओलांडून प्रशस्त गुहेतल्या देवीमंदिरात पावले थांबवली.

वरुन दिसणारी झोपडी

अनोळखी डोंगर

गडवाट

माथ्याकडे

लोखंडी शिडी

चुकवणारी वाट

शेवटच्या पायर्या

माळरानावरील अवशेष

गुहेकडे

             ३:०५ झालेले. "Yess...Mission Dhodap completed..I repeat..Mission Dhodap completed" एक विजयी गर्जना करीत देवीचे दर्शन घेतले. गुहेच्या दाराशीच श्रमपरिहार उरकला. गुहेतला अंधार, आतली नीरव शांतता, बाहेर वार्याचा आवाज, माझं एकटेपण यांमुळे तिथले वातावरण थोडेसे भयावह वाटत होते. एकीकडे विजयी भावना तर दुसरीकडे भितीची भावना. मन खरंच संभ्रमित झालेले पण प्रँक्टिकली राहणं खूप महत्वाचं होतं. ह्या विचाराने तात्पुरती भिती घालवलेली. सह्याद्रीच प्रेम, आकर्षण हे ही कारणीभूत असावं. सगळं आटोपून किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला पोहोचलो. दोन भगव्यांसमोर 'इखारा' सुळका ताठपणे उभा होता. (जीवधनच्या वानरलिंगीची आठवण करुन देणारा). किल्ला आणि सुळक्यातली ती चौकोनी खाच लक्षवेधी अशीच आहे. परिसर न्याहाळल्यावर मार्कंड्या-सप्तश्रुंगीगड ओळखता आले. बाकी साल्हेर-मुल्हेर, पूर्ण सातमाळा पर्वतरांग काही जमलं नाही ओळखायला. तिथले पोटभर फोटो काढून दहा मिनीट तिथल्या वातावरणाशी, शांततेशी संलग्न झालो. गडाला प्रदक्षिणासुध्दा घालता येते. घडाळ्यात बघितले तर ३:४५ वाजलेले. गुहेपाशी येऊन देवीला वंदून परतीच्या वाटेला निघालो. पायर्यांपाशी येऊन मागे फिरून समाधानाच्या नजरेने धोडपच्या त्या उंच माथ्याला अखेरचे पाहिले. एक क्लिक केला आणि आता पावलांनी वेग पकडला. ५ वाजता धोडांबेहून हट्टीमध्ये मुलांना सोडवायला शाळेची रिक्षा येते. तीच रिक्षा मला परत जायला एकमेव पर्याय होता. ह्याबाबतीत रिस्क घ्यायची नव्हती. पाय दुखणे मांडत होते..सळसळणारी पाती मागे बघायला सांगत होती; पण मनाने तिकडे दुर्लक्ष केलेलं. अर्ध्या तासात तळ्यापाशी येऊन पाणी भरुन पुढे निघालो. आलेल्या वाटेनेच खाली मारुतीच्या मंदिरापर्यंत पोहोचलो. ५ वाजतच होते. सूर्य पश्चिमेकडे कलांडून घरी पोहोचायच्या तयारीत होता. मारुतीचे आणि धोडपचे मनापासून आभार मानले व परत आमच्या (गृपसह) कुटुंबासह तुझ्या भेटीला येईन असे मनोमन म्हणून धोडपसोबतचा शेवटचा सेल्फी काढला. आता तर धावण्याशिवाय पर्याय नव्हता. पाय अजूनही नाही म्हणत होते पण परत दुर्लक्षच. फक्त परतताना यावेळी एकटा नव्हतो. सोबत होती ती गावातल्या गुराख्यांची, गाई, म्हशी, शेळ्या, घोडे यांची.
श्रमपरिहार

गुहेतले देवीमंदिर

गुहेच्या द्वारातून

इखारा सुळक्याकडे

इखारा

गडमाथा

सोनारपाडा

उतरताना

उतरताना

शेवटचा सेल्फी

धोडपचा निरोप

हट्टीत पोहोचलो तर ५:२० झालेले. रिक्षेबद्दल विचारलं तर आत्ताच निघून गेल्याचं एक गावकरी बोलला. तोच समोरून एक काळी-पिवळी प्रवाशांनी भरुन आली. ड्रायव्हरला परत जाणार का विचारल्यावर 'नाही' असं ठाम उत्तर मिळालं. माझी अवस्था त्या गावकर्याने ओळखली आणि एक तरुण दुचाकीस्वार गावातून निघतच होता. त्याने 'सर..पाहुण्यांना धोडांब्याला जायचयं. द्या सोडून' अशी विनंती केली. दुचाकीस्वार शर्ट इन, बुटात होता. मी ही पुढेपर्यंत सोडायची विनंती केल्यावर तो सोडायला तयार झाला. हे सर्व इतक फटक्यात घडलं की मला काळजी करायलाही वेळ नाही दिला परिस्थितीनं. अखेर हट्टी सोडलं. ओघाने आमच्या गप्पा सुरु झाल्या. ते गावातल्या जि.प.च्या प्राथमिक शाळेचे एकमेव शिक्षक असल्याचं कळलं. पाच वर्ष झालीत हट्टीत नोकरी करून पण एकदाही किल्ल्यावर गेले नाहीत. इथेही परिस्थितीने मला सांभाळून घेतलं. म्हणजे शाळा सुटल्यावर ते सर ४:३०लाच हट्टीतून निघून गेलेले. परत गावात आले ते शाळेतल्या मँडमना घ्यायला. पण मँडम शाळेच्या रिक्षेने निघून गेल्यान त्यांची चूकामूक झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्या सरांपेक्षा शाळेच्या मँडमची आठवण काढून मी मनातच त्यांचे आभार मानले..;-). बरं त्यांना मी ते कुठे चाल्ल्याचं विचारलं तर ते म्हणाले "वडाळीभोई." खरचं नशीबवान होतो मी त्या दिवशी..लक्की बाँय. हे म्हणजे असं झालं गरज होती ३०mlची पण मिळाली ९०ml. जाताना एका लांडोरने दर्शन दिलं. आमच्या गप्पा चालू असताना सूर्याने आमचा निरोप घेतलेला. गाडी सुसाट पळवल्याने ६ वाजताच मी वडाळभोईला पोहोचलो. ठरल्याप्रमाणे घडलं सगळं. थोडा उजेड होता अजूनही. त्या सरांना देवासारखे धावून आल्याचं सांगून जाहीरपणे आभार मानले. पैसे देऊ केले पण नाहीच(९०ml मिळाली तिही फुकट). वर हायवेला आलो आणि लगेच नाशिकला जाणारी काळी-पिवळी मिळाली. प्रवासात असतानाच ट्रेक गृपवर ट्रेकचा पहिला फोटो टाकला आणि सोलो ट्रेक केल्याचा भाव खाऊन गेलो. 
संध्याकाळी ७ वाजता द्वारकेला उतरून ७:१५ला जय-मल्हार बघायला घरी हजर.. :-)

------------ ट्रेकनंतर ------------- 
हा पहिलाच सोलो ट्रेक खूप काही सांगून गेला, शिकवून गेला, अनुभवून गेला. स्वतःचे काही प्रश्न उत्तरीत तर काही अनुत्तरीत मिळाले. परिस्थिती कशीही, कोणतीही असली तरी मन जोपर्यंत सकारात्मक, जिद्दी आहे तोपर्यंत तुमचा स्वतःवरचा विश्वास अढळ आहे. घर सोडल्यापासून धोडप करायची मनापासून इच्छा होती. इच्छा कितपत पूर्ण होईल हे मलाही ठाऊक नव्हते. काही ठिकाणी वेळ मला साथ देत नव्हता तर परिस्थिती निभावून घेत होती. रनरेट सुरुवातीलाच कमी झाला होता पण शेवटच्या ओव्हर्समध्ये हाणामारी करुन एकूण स्कोअर समाधानकारक होता. नाँटआँऊट राहून. :-) एकट्याने एन्जाँय करण्यातही एक वेगळीच मजा आली. बहुतेक त्या दिवशी धोडपलाही आमची भेट व्हावीशी वाटत असल्याने कोणत्याही अडचणींविना माझी इच्छा पूर्ण झाली. दैवाचे आणि देवाचे आभारच. धोडपच्या आठवणी ताज्या असतानाच दोन दिवसांनी म्हणजे शनिवारी पुन्हा त्याचे सप्तश्रुंगीगडावरुन दुसर्या बाजूचे दुरून दर्शन होणे ह्यासारखा द्विगुणित झालेला आनंद कोणता? मनाचे क्षणिक समाधान कोणते?

मार्कंड्या पर्वत व लांब असलेला धोडप

प्रतिक्रिया

Nitin Palkar's picture

15 Feb 2017 - 6:45 pm | Nitin Palkar

'परिस्थिती कशीही, कोणतीही असली तरी मन जोपर्यंत सकारात्मक, जिद्दी आहे जोपर्यंत तुमचा स्वतःवरचा विश्वास अढळ आहे'..... अत्यंत महत्त्वाचे. तुमच्या पुढील ट्रेक्सना आणि भावी आयुष्यासाठी अनेकानेक शुभेच्छा.

भटक्या चिनु's picture

15 Feb 2017 - 11:39 pm | भटक्या चिनु

खूप खूप धन्यवाद तुमचे.

फोटो दिसत नाहीयेत. फक्त लिंका दिसत आहेत.

हरकत नाही. ट्रेक छान झालाय आणि वर्णनही. पण एकट्याने ट्रेक करू नये असे नक्कीच सुचवेन. बाकी ज्याचीत्याची मर्जी.

भटक्या चिनु's picture

15 Feb 2017 - 11:43 pm | भटक्या चिनु

खूप धन्यवाद. फोटो दुरुस्तीचा प्रयत्न चालू आहे. लवकर फोटोंचे दर्शन होईल. तोपर्यंत लिंकवर क्लिक करुन फोटो पाहू शकता. पुढच्या वेळी जास्तीची खबरदारी नक्कीच घेईन.

मनिमौ's picture

15 Feb 2017 - 8:55 pm | मनिमौ

पण फोटोचा गणेशा झालाय. बायदवे हा ट्रेक सुखरूप पार पडला पण असे धाडस पुन्हा करू नका

भटक्या चिनु's picture

15 Feb 2017 - 11:45 pm | भटक्या चिनु

धन्यवाद. फोटो लवकर लेखात दिसतील. नक्कीच काळजी घेईन पुढल्या वेळी.

कंजूस's picture

15 Feb 2017 - 10:01 pm | कंजूस

सोलो ट्रेक डरने का नय।

तुमच्या लिंक्स दुरुस्त करा,फोटो येतील.
.jpg" नंतर width="550" चिकटवा.

उदाहरणार्थ शेवटची लिंक <img src="https://s31.postimg.org/4edifziu3/20161126115741.jpg" width="550" alt="मार्कंड्या पर्वत व लांब असलेला धोडप" />

मार्कंड्या पर्वत व लांब असलेला धोडप
मार्कंड्या पर्वत व लांब असलेला धोडप

भटक्या चिनु's picture

15 Feb 2017 - 11:49 pm | भटक्या चिनु

शतशः आभार. खूप मोलाची मदत केलीत आपण. तुम्ही सांगितलेला प्रयत्न केला पण दुरुस्ती होत नाहीए. alt नंतरची कुठली ओळ पुन्हा लिहावी हे कृपया सांगावे.

कंजूस's picture

15 Feb 2017 - 10:04 pm | कंजूस

alt पुढची ओळ पुन्हा लिहावी लागेल.

कपिलमुनी's picture

16 Feb 2017 - 1:33 am | कपिलमुनी

सोलो मद्धे पाय मुुरगळण्यापासून ते मधमाशांपर्यंत असंख्य धोके असतात. अपघात झाला तर काय ? म्हणून सोलो टाळावेत

कपिलमुनी, सल्ला बरोबर आहे परंतू प्रत्येकवेळी आपल्याला ट्रेकिंगची हुक्की आली की त्याच दिवशी त्याच ठिकाणी जायला कोणी मिळत नाही.

माझेही गेले सोळा वर्षं सोलो ट्रेकच आहेत.

भटक्या चिनु's picture

16 Feb 2017 - 9:46 pm | भटक्या चिनु

असल्या धोक्यांची जाणीव ठेवूनच टप्प्याटप्प्यावर खबरदारी घेत होतो.

कंजूस's picture

16 Feb 2017 - 6:19 am | कंजूस

असं करा-

१ )तुमची शेवटच्या फोटोची लिंक =
<img src="https://s31.postimg.org/4edifziu3/20161126115741.jpg" alt="मार्कंड्या पर्वत व लांब असलेला धोडप" />

२) दुरुस्ती करून =

मार्कंड्या पर्वत व लांब असलेला धोडप
<img src="https://s31.postimg.org/4edifziu3/20161126115741.jpg" width="550" alt="मार्कंड्या पर्वत व लांब असलेला धोडप" />

भटक्या चिनु's picture

16 Feb 2017 - 9:48 pm | भटक्या चिनु

पुनःश्च धन्यवाद आपले. पुन्हा प्रयत्न करतो.

IT hamal's picture

16 Feb 2017 - 11:48 am | IT hamal

छानच झालाय तुमचा ट्रेक...माझे मूळगाव धोडपच्या उत्तर-पूर्वेला ६/७ कि. मी.वर आहे. शाळेत असतांना दरवर्षी ३/४ वेळेस आम्ही मुलं किल्ल्यावर जात असू.. आजकाल जाणं बंदच झालंय . साल्हेर मुल्हेर किल्ले उत्तरेस व तिथून २०-२५ किमी अंतरावर असल्याने देवीच्या मंदिराजवळून दिसत नाहीत. देवीमंदिराच्या गुहेतून दक्षिणेचा परिसर दिसतो... देवीमंदिर ज्या नंदीसारख्या सुळक्याच्या तळाशी आहे, त्या सुळक्याच्या टोकावर ही जात येते... अवघड आहे पण बरेच लोक जात तेव्हा .. .. तुमचा लेख व फोटो बघून लहानपणीच्या आठवणी ( खवा , सोनारवस्ती , तिथल्या म्हशी .... आवळकंठी /गावठी आंब्याची झाडं ...किल्ल्यावर असलेले साधू..... आणि त्यांची openly लावलेलं खसखशीचे पीक ईत्यादि !!!) जाग्या झाल्या..

भटक्या चिनु's picture

16 Feb 2017 - 10:42 pm | भटक्या चिनु

खूप धन्यवाद. साल्हेर-मुल्हेर, रावळ्या-जावळ्या, सालोटा व संपूर्ण बागलाण प्रदेशच ट्रेकरसाठी विशेष आहे. तुमच्या आठवणी जागवल्याबाद्दल नशीबवान आहे.

आषाढ_दर्द_गाणे's picture

16 Feb 2017 - 8:36 pm | आषाढ_दर्द_गाणे

एकट्याचा ट्रेक आणि त्यात घडत गेलेले योगायोग वाचायला मजा आली!
पुढील ट्रेक्ससाठी शुभेच्छा!

भटक्या चिनु's picture

16 Feb 2017 - 10:44 pm | भटक्या चिनु

मनापासून आभार...!!!

पैसा's picture

16 Feb 2017 - 8:49 pm | पैसा

छान लिहिलंत! पण दर वेळी इतके योगायोग आपल्या बाजूला नसतात. त्यामुळे जरा जास्त प्लॅनिंग करून आणि शक्य असेल तेव्हा अनोळखी ठिकाणी कोणी सोबत घेऊनच जावा!

भटक्या चिनु's picture

16 Feb 2017 - 11:38 pm | भटक्या चिनु

धन्यवाद. तुमची सुचना योग्यच आहे. नेटवरुन सगळा तपशील मिळवलेला आणि त्यावरुनच परिस्थितीचा अंदाज बांधून पुढे कूच करत गेलो.

छान लिहिलंय पण सोलो ट्रेक करु नयेत ( विषेशतः अवघड, अनोळखी) ह्या मताचा मी आहे.

कंजूस's picture

17 Feb 2017 - 12:26 pm | कंजूस

"सोलो ट्रेक करु नयेत ( विषेशतः अवघड, अनोळखी) ह्या मताचा मी आहे."

तिथे गाववाल्याला सोबत म्हणून घ्यावे. त्यालाही पैसे मिळतात व जोखिम निघून जाते. इकडच्या मित्रांना विनवणी करून नेण्यापेक्षा उत्तम मार्ग. मी आतापर्यंत चारवेळा गाववाल्याला बरोबर घेतले आहे. ( पेब,नागेश्वर,भिमाशंकर,रतनगड)

भटक्या चिनु's picture

17 Feb 2017 - 4:29 pm | भटक्या चिनु

सल्ला योग्यच. गावातून जातानाच गावकर्यांकडून वर जातानाची माहिती विचारलेली. एकटे जाऊ शकू ह्याची खात्री पटल्यावरच पुढे जात राहिलो आणि सुखरुप खाली आलो.

शुभां म.'s picture

17 Feb 2017 - 2:24 pm | शुभां म.

खूप छान वर्णन केलं आहे आणि फोटो तर फारच सुंदर................

भटक्या चिनु's picture

17 Feb 2017 - 4:30 pm | भटक्या चिनु

मनःपूर्वक धन्यवाद....!!!

यमगर्निकर's picture

10 Mar 2017 - 2:28 pm | यमगर्निकर

छान, मस्तच झाला ट्रेक.

भटक्या चिनु's picture

5 Apr 2017 - 12:21 am | भटक्या चिनु

धन्यवाद

किसन शिंदे's picture

10 Mar 2017 - 2:58 pm | किसन शिंदे

जबराट. असा सोलो ट्रेक केला तर मी फक्त राजगडलाच जाईन, इतर कुठेही नाही.

भटक्या चिनु's picture

5 Apr 2017 - 12:22 am | भटक्या चिनु

धन्यवाद. काळजी घ्या फक्त.

कविता१९७८'s picture

5 Apr 2017 - 12:01 pm | कविता१९७८

मस्त अनुभव