'मुर्ग तंगडी छाल-के-साथ'. अर्थात - चिकन आळशी!

आषाढ_दर्द_गाणे's picture
आषाढ_दर्द_गाणे in पाककृती
1 Feb 2017 - 6:33 am

विनम्र सूचना: कृपया वेळ कमी असल्यास नमनाचे घडाभर तेल गाळून थेट पाककृती वाचणे.
जर गरज हि शोधाची जननी असली तर आळस हि आजी आहे.
एकट्याचा स्वयंपाक करताना भाज्या सोलणे, त्या छान बारीक बारीक चिरणे असल्या गोष्टींचा मला भयंकर आळस.
कारण सोपे आहे - 'रांधा, वाढा नी उष्टी काढा' हे सगळे स्वतःच करायचे असल्याने (संजीव कपूर बनायची विच्छा असूनही) 'मिनिमम कष्ट, मॅक्सिमम
उदरभरण' ह्या तत्वावर चालणे क्रमप्राप्त असते.
तर अश्याच आळशीपणाच्या गरजेतून जन्माला आलेला हा एक नवा प्रकार.

ज्यांना खायला घातला त्यांनी 'चव छान आहे' अशी (कदाचित सौजन्यातुन आलेली; असेनात का) प्रतिक्रिया दिली.
येथील इतर सहाळश्यांना ह्या प्रयोगाचा फायदा होईल ह्या (उदात्त) हेतूने पाककृती देतो आहे.

तर झालं असं कि मध्यंतरी मोठ्याबाजारातून(सुपरमार्केट) कोंबडीचे अस्थिरहित 'ब्रेस्टपीस'(कृपया सुटसुटीत प्रतिशब्द सुचवा) आणून, त्याचे तुकडे करून रस्से/मसाले बनवायचा आळस आला.
मग ब्रेस्टपीसना स्वस्त आणि मस्त पर्याय म्हणून आधीच सुटे सुटे असणारे, कापाकापीची गरज नसणारे अस्थियुक्त 'लेगपीस' (कृसुप्रसु) आणून खायला सुरवात केली. लेगपीस ची किंमत अर्धी, मांस अधिक लुसलुशीत आणि चवही चांगली होती. शिवाय कुर्चा (कार्टिलेज) आणि हाडे चावायला मजा येत होती ती वेगळीच. पण ह्यात गोची अशी कि इकडे जे लेगपीस मिळतात ते त्यावरच्या त्वचेसकट.
मग दर वेळी ती (लिबलिबीत आणि पटकन न निघणारी) त्वचा हाताने ओढून काढायचा अतिरिक्त आळस आल्याने 'थेट अख्खे लेगपीसच का वापरू नयेत?' हा विचार मनात डोकावला. भर म्हणून इकडे कोंबड्या सर्रास त्वचेसकट खाल्ल्या जाताना (रोटीसेरी आणि विन्ग्स (पंखे?)) पहिले होतेच.
मग काय? कोंबडीच्या त्वचेच्या मानवी शरीरावरील संभाव्य परिणामावर थोडा फार व्यासंग केला आणि मनाचा हिय्या करून अख्खे लेगपीस मुरवायला (ब्राइनिंगला) ठेवले. बाकी तयारी केली. म्हणजे आले, लसूण आणि नेहमीच्या मिरच्या मिळत नसल्यानं मोहक केशरी रंगाच्या हाबानेरो मिरच्या इत्यादी.
शिवाय अख्खे (उत्तर भारतीयांच्या भाषेत बिचारे 'खडे' (!)) मसाल्याचे पदार्थ आणि इतर (बैठे, सोये कि लेटे?) मसाले गोळा केले.
tayaari

सामग्री:
५ ते ६ चिकन लेगपीस (म्हणजे अख्खी तंगडी नव्हे. गुढघ्यापासून खालचा भाग. जिज्ञासूंनी प्रकाशचित्र पहावे)
२ मोठे लाल कांदे (चिरायची हौस असतील तर ३ मेळवावे)
४ ते ५ मोठ्या लसणीच्या पाकळ्या
पावणेतीनच इंच आले (का ते विचारू नका)
५ ते ६ हिरव्या मिरच्या. नसल्यास मिरची घराण्यातील इतर नातलग, चवीनुसार
कपभर दही

अख्खे मसाले -
एक तमालपत्र
अर्धा चमचा अक्ख्या मिऱ्या
इंचभर दालचिनी
तीन-चार वेलच्या
एक जावित्री (जायफळाच्या बीजाचे वेष्टन)
एक चक्रफुल (उर्फ स्टार-अनिस, नावाप्रमाणेच ह्या पदार्थातिल स्टार मसाला आहे)

इतर मसाले -
अर्धा चमचा लाल मिरच्यांची पूड
अर्धा चमचा मिरपूड
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा धन्याची पूड
अर्धा चमचा जिऱ्याची पूड
अर्धाच चमचा विकतचा 'मीट मसाला' (किंवा तत्सम जो मिळेल तो)
मीठ चवीनुसार
tayaari 2

कृती:
सर्वप्रथम आलं लसूण आणि मिरच्या वाटून घेतले.
भांड्यात (कुकर, कृसुपसु) अख्खे मसाले पळीभर तेलात पळभर परतले.
masale
मग (आळस न करता जितके बारीक कापता आले तितकेच) चिरलेले लाल कांदे घालून त्यांना भाजायला सुरवात केली, साधारण पाच मिनिटे.
kaanda
(वाफ धरल्याने प्रकाशचित्र धूसर आलेय)
दहा मिनिट परतल्यावर, कांदा आपला मूळ वाण सोडून कॅडबरी सारखा दिसायला लागल्यावर (तपकिरी रंगावरून होऊ शकणाऱ्या बाष्कळ विनोदाचा मोह आवरलाय) आलं,लसूण आणि हाबानेरो मिरचीचे वाटण सोडले आणि अजून ५ मिनिट शिजवले.
नंतर त्वचेसकटचे लेगपीस, इतर मसाले आणि दही मिसळले.
dahi
शेवटी अगदी थोडा 'मीट मसाला' घालून (अति सर्वत्र वर्जयेत। आधीच टाकलेल्या खड्या-बैठ्या मसाल्यांची आठवण ठेवून) कुकरला दोन (बहुतेक तीन) शिट्ट्या काढल्या. मीठ बेताने घातले, कारण मुरवताना लेगपीसेस मध्ये बरेच टाकले होते.
curry
पाककृतीत अगदी गरजेच्या वगळता इतर कुठल्याही गोष्टी (भाज्या, टोमॅटो, बटाटे वगैरे) न घालण्याचे कारण 'लेखकाचा अंगभूत अमाप आळस' हे असल्याचे चाणाक्ष वाचकांच्या एव्हाना लक्षात आले असेलच!

तर ह्या ठिकाणी, अश्या प्रकारे, मिनिमम कष्टांनंतर तयार झालेला प्रकार म्हणजे 'चिकन आळशी'
chicken aalshi
चित्रात लेगपीसवरची त्वचा थोडी ओढून दाखवली आहे.
chicken aalshi 2

नेहमीपेक्षा चवीत फार फरक नाही पडला.
पण रस्सा थोडा चिकट झाला आणि बहुदा त्वचेची मूळ चव गोडुस असल्यानं बऱ्याच हाबानेरो घालूनही हवा तितुका तिखट नाही झाला.
असो.
तात्पर्य हे कि आळश्यास गंगा जरी फलदायी होत नसली तरी त्याची कोंबडी चवदार होऊ शकते.
ह्यातून प्रेरणा घेऊन अजुन कोणी असा प्रयोग करून पहिला तर त्याविषयी वाचायला आवडेल.
पाककृती कशी वाटली ह्यावरचे विचार आणि सुचलेल्या सुधारणा ह्यांचे स्वागत.
धन्यवाद.
आपले,
आषाढ_दर्द_गाणे

प्रतिक्रिया

फेदरवेट साहेब's picture

1 Feb 2017 - 7:59 am | फेदरवेट साहेब

जिज्ञासूला एकही फोटू दिसलेला नाही. अपलोड करताना लफडं झालेलं दिसतं आहे कृपया तपासावे.

बाकी कोंबडी म्हणजे आपला जीव का प्राण

(इंग्लिश लॉन्गहॉर्न प्रेमी ब्रिटिश) फेदूदा

ता.क. - साहेब आपुन को तुमने रेसिपी दिया तो आपुन भी तुमको एक फॅक्ट बताता है. नशीब इलेक्शन लागली आहेत ५-१५ राज्यांत नाहीतर, जलीकट्टू नंतर इथल्या एका खुटा गाडून बसलेल्या महामहिम सदस्यांनी थेट कोंबडीखाऊ कसे नालायक नावाचा धागा काढला असता.

रेवती's picture

1 Feb 2017 - 8:22 am | रेवती

गणेशा झालाय.

पैसा's picture

1 Feb 2017 - 9:41 am | पैसा

तुमची लिहायची इष्टाईल लैच चित्ताकर्षक आहे. ते फटूचं तेवढं बघा!

आषाढ_दर्द_गाणे's picture

1 Feb 2017 - 10:18 am | आषाढ_दर्द_गाणे

प्रोत्साहनाकरता धन्यवाद.
हे फोटो प्रकरण म्हणजे पहिल्या चेंडूवर स्वयंचित होण्यातला प्रकार आहे.
तसे व्हायचेच हे गृहीत धरून फोटोखाली लिंक टाकली तर ती ही चालत नाहीये.
बाकी 'फोटो कसे चढवावेत'वाल्या धाग्यातील सूचनांचे पालन करून फ्लिकर वापरले.
नक्की काय करायचे हे कोणी सांगू शकल्यास फार मदत होईल.
लिहिलेला लेख संपादित करता येत नाही ह्याची कल्पना नव्हती.

फ्लिकरवर जो एम्बेड कोड मधे निबंध येतो तो सगळा घेऊ नका. त्यातला कामाचा फार थोडा भाग असतो. गूगल फोटो शेअर वगैरे नीट करत असाल तर गूगलवरून फोटो इथे देणे जरा जास्त सोपे असावे.

आषाढ_दर्द_गाणे's picture

2 Feb 2017 - 3:01 am | आषाढ_दर्द_गाणे

निबंधातील नक्की कुठला भाग वापरायचा हे मी तुम्हाला व्यनि करून विचारतो

पियुशा's picture

1 Feb 2017 - 11:24 am | पियुशा

वा वा !! पाक्रु जरी आळ शी असली तरी लेख बरा खुसखुशीत लिहिला हो ;) आवडली पाक्रु :)

संजय पाटिल's picture

1 Feb 2017 - 12:16 pm | संजय पाटिल

पाक्रु. आवडली... आणि मला फोटु पण दिसले!!

फेदरवेट साहेब's picture

1 Feb 2017 - 1:48 pm | फेदरवेट साहेब

फोटू दिसले, आता लवकरच एखादी कोंबडी कापतो म्हणे मी.

पहिल्या वाक्यानंतर थेट स्क्रोल करून आधी प्रतिसाद पाहिले. नंतर निवांत धागा वाचला. फोटो पाहून भूक लागली आहे. पण स्किनसकट चिकन लेगपीस खायची छाती होत नाहीये. तस्मात, आम्ही एखादा कष्टाळू शेफ शोधू आणि त्याच्याकडून /तिच्याकडून बनवून घेऊ. हाकानाका.

आषाढ_दर्द_गाणे's picture

2 Feb 2017 - 3:24 am | आषाढ_दर्द_गाणे

पण स्किनसकट चिकन लेगपीस खायची छाती होत नाहीये

मनमुराद हसलो ह्यावर

दोन सप्ताहांचा तुमचा कालावधी बघता, तुमच्या धाडसास दाद दिल्या गेली आहे. (दाताखाली खडा (अश्म) आल्यासारखं वाटलं तरी इथे क्रियापदं अशीच लिहीतात.).
पाकृचा पौष्टिक दर्जा आम्हास लाभदायक नसला तरी भाषिक दर्जा अप्रतिम आहे. लिहीत राहावे. पुपाप्र.

'ब्रेस्टपीस'(कृपया सुटसुटीत प्रतिशब्द सुचवा)

'लेगपीस' (कृसुप्रसु)

चुकून माकून पुण्यनगरीत आलात तर या अशा जागांसाठी आपणास मस्तानी (पेय) देण्यात येईल

आषाढ_दर्द_गाणे's picture

2 Feb 2017 - 3:11 am | आषाढ_दर्द_गाणे

नका हरभऱ्यावर चढवू!

बाकी वापर दोन सप्ताहाचा असला तरी लपवावर (lurking) बरेच दिवस चालू होते.

"...भाषिक दर्जा अप्रतिम आहे. ...जागांसाठी आपणास मस्तानी (पेय) देण्यात येईल"

फारच झालं. पण धन्यवाद.
शेवटची मस्तानी प्यायल्याला कैक वर्षे झाल्या आहेत (जमलं का क्रियापद? कि पाठभेद अंगवळणी पडेस्तोवर अश्या ठेचा लागत राहणार? ;) )

शेवटची मस्तानी प्यायल्याला कैक वर्षे झाल्या आहेत

झाल्या गेली आहेत. (हो गये हय चं मराठी व्हर्जन. भाषासौंदर्यसौजन्य खरडफळा)

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2017 - 6:34 pm | अत्रुप्त आत्मा

शेवटचे फोटू पायल्यावर आऴशीच्या जागी ....

असो! =)).

इकडे जे लेगपीस मिळतात ते त्यावरच्या त्वचेसकट.

यावरून फॉरेनात दिसता. इंड्यात पुढं लिवलंय ते बेसिक आहे. खटक्याला नीट समजतं. फारेनातल्या खटक्याला लेग्पीस ब्रेस्टपीस बरोबर समजते. मराठी बोलाल तर अ‍ॅ? म्हणेल तो.

'ब्रेस्टपीस'(कृपया सुटसुटीत प्रतिशब्द सुचवा)

सीना.

'लेगपीस' (कृसुप्रसु)

तंगडी.

रच्याकने त्वचा उर्फ चामडी सोलायला तुम्हाला ऑलरेडी येते असे दिसते. तेव्हा कधीतरीचा आळस इज ओके ;)

आता अवांतरः

स्किनसकट चिकन खाताना पिस मोठ्ठा दिसतो, पण भरपूर फॅट देखिल वाढते. लीन चिकन = स्किनलेस चिकन.

लेगपीस ब्रेस्टपेक्षा महाग का असतो?
इंड्यात तंगडी जास्त महाग असते. का ते ठाऊक नाही, पण तंगडीचे मसल जास्त मजबूत असतात म्हणून असावे.
अ‍ॅक्चुअली, मीट किती टेंडर, ते त्या भागाचा वापर किती त्यावर अवलंबून असते. व्यायाम करणारे स्नायू जास्त कडक होतात. तस्मात, पोल्ट्री (फ्रीरेंज नसली, तरीही पायावर उभे रहावे लागते.) ब्रेस्टचे : पंखाचे स्नायू फार वापरले जात नाहीत, तस्मात नरम असतात. चवीला चांगले. पायावर उभे रहाण्याचा किमान व्यायाम. म्हणून ते जास्त कडक. म्हणून तुलनेने स्वस्त. हेच लॉजिक मटनला लावायचे तर कोअर मसल्स जास्त नरम. म्हणून लोइन चा भाग जास्त महाग मिळतो. नंबर २ ला चॉप्स येतील.

*

लास्ट बट नॉट लीस्ट.

ब्रायनिंग करताहात. अन "आळश्याचे" काम म्हणताहात? हे कटकटीचे व प्लॅनिंगचे काम आहे. आळश्याचे नव्हे. कांदे/मिरच्या/लसूण जो कापलाय, ते सराईत बल्लवाचे काम आहे.

उग्गं अमॅच्युरिश आव आणल्याबद्दल निषेढ!

बाकी पाकृ तोंपासु. केव्हा येऊ खायला? ;)

आनंदी गोपाळ's picture

1 Feb 2017 - 9:57 pm | आनंदी गोपाळ

त्याच कांदे कापण्याच्या फोटूखाली, टोटल ५ लॉलिपॉप पीसपैकी ३ ची स्कीण काढून ठेवलेली मला आंधळ्यालाही दिसते आहे. उगंच २ पीस थोड्या स्किनसकट टाकून गम्मत करायलात. :रागः

आषाढ_दर्द_गाणे's picture

2 Feb 2017 - 3:01 am | आषाढ_दर्द_गाणे

क्षमा असावी, पण असे करण्याला सबळ पारिस्थितिक कारणे होती.
पहिल्यांदाच प्रयोग करत असल्याने थोडे कातडीबचाव धोरण अवलंबले ;)
सगळे पीस त्वचेसकट ठेवून अख्खा रस्सा वाईट झाला असता तर सगळी मेहनत वाया गेली असती ना!

पण आनंदी गोपाळांनी खणखणीत प्रतिसाद देऊन माझा निर्धार मोडीत काढला.
तर मिपावर धाग्याच्याबाबत 'पहिलटकरिण' असल्याच्या हक्काने तुमच्या प्रतिसादातल्या एकेक मुद्द्याला आमचा गुद्दा (ह. घ्या. :))

"इंड्यात पुढं लिवलंय ते बेसिक आहे. खटक्याला नीट समजतं."

भारतात कोंबडी विकत घ्यायचा अनुभव नसल्याने उद्भवलेला अडाणीपणा अश्या ठिकाणी उघडा पडतो. चूभूद्याघ्या :(

"सीना"

नाय जमलं. हिंदी/उर्दू आहे. मांस न खाणाऱ्या लोकांच्या डोक्यावरून जाईल नई का?
मला प्रतिशब्द मुख्यत्वेकरून मराठी आंतरजालावरच्या वापराकरता हवा आहे.
जो नंतर मराठी शब्दकोशात पाठवता येईल.
'सोच बडी होनी चाहिये' - अज्ञात

"स्किनसकट चिकन खाताना पिस मोठ्ठा दिसतो, पण भरपूर फॅट देखिल वाढते. लीन चिकन = स्किनलेस चिकन. "

खरं आहे.
पण व्यायाम करत असाल तर थोडेसे संपृक्त स्निग्ध (saturated fats) पचवणे जड नाही असे वाटते.
आणि कोंबडीच्या त्वचेमधील सगळीच स्निग्ध संपृक्त नसतात. ह्याबाबत जिज्ञासूंनी हार्वर्ड विद्यापीठाच्या एका ब्लॉग वरती दिलेली माहिती येथे पाहावी.
पण शेवटी हे प्रत्येकाच्या आहार, व्यायाम आणि सवयिंवर अवलंबून आहे.
हा प्रयोग चवीकरता केला होता. आहारमूल्यसंवर्धनाकरिता नाही.

"लेगपीस ब्रेस्टपेक्षा महाग का असतो?"

ह्यावर तुम्ही केलेली मीमांसा आवडली नि मांस नरम असण्याचे कारण पटले.
भावातल्या फरकाविषयी माझे दोन आणे -
एकाच पक्ष्याच्या दोन भागाच्या किमती वेगळ्या असण्याची आर्थिक, सामाजिक (आणि कदाचित राजकीय देखील) कारणे आहेत.
त्यावर स्वतंत्र संशोधनच होऊ शकते; गेला बाजार इकडे एखादा धागा तरी सहज निघू शकतो.

एक मतप्रवाह असा आहे कि अमेरिकेन लोक फारच प्राणीप्रेमी(!) असल्याने इकडे एकंदर जे मांस खाल्ले जाते ते मूळ प्राण्यांसारखे दिसलेले त्यांना आवडत नाही. म्हणून कोंबडीचे तुकडे असे काही करून शिजवतात कि दिसायला छान-छान पांढरेशुभ्र दिसते.
मग ते सॅण्डविचात भरून खातात (भारतात सबवे मध्ये असेच चिकन मिळते).
बहुतेक सगळ्या पदार्थात (पिझ्झा, पास्ता अगदी चिकन बर्गर) शक्यतोवर चिकन ब्रेस्टच वापरतात.
अर्थात ह्याला अपवाद आहेत. पण थोडकेच.
अश्या परिस्थितीत कोंबडीच्या ब्रेस्टपीसला मागणी असली तरी तिच्या दोन-दोन पायांचा कोणी वाली उरत नाही.
तद्वत मोठ्याबाजारात लेगपीस नेहमीच स्वस्त असतात.
भारतात मात्र ह्याउलट परिस्थिती - लेगपीसची हौस, मागणी आणि किंमत सगळेच जास्त!

वास्तविक भारत आणि अमेरिका हे एकाच पक्ष्याच्या वेगवेगळ्या भागावर प्रेम करत असल्याने 'इकडचे सीने तिकडे आणि तिकडचे पाय इकडे' वळवणे सहज शक्य आहे. पण ह्यात भारतीय कुक्कुटपालन महासंघ, जागतिक व्यापार संस्था (WTO) इत्यादी प्रभुतींच्या तंगड्या अडकल्या आहेत.
जिज्ञासूंनी ह्या विषयावरील हा रोचक लेख वाचावा. आणि मग अमेरिकन प्रसारमाध्यमे त्यांच्या देशाला फायदेशीर असणाऱ्या गोष्टींना कशी छान फिरकी (spin) देऊन सादर करतात ते इथे पहा. विस्तारभयास्तव इथेच थांबतो.

"ब्रायनिंग करताहात. अन "आळश्याचे" काम म्हणताहात"

इकडे तुम्ही ब्रायनिंग शब्दशः घेतलेत आणि घोळ झाला
माझे 'ब्रायनिंग' म्हणजे कोंबडीचे समुद्रातून खारट पाण्यात विसर्जन करून तासभर व्यायाम करायला जाणे; नि आलो कि सरळ पाणी फेकून देऊन मांस वापरणे. मी काही पाणी उकळून रीतसर ब्रायनिंग करत नाही.

"कांदे/मिरच्या/लसूण जो कापलाय, ते सराईत बल्लवाचे काम आहे"

छे हो, इतके काही छान नाही कापलेले. पण तरी धन्यवाद :)

"उग्गं अमॅच्युरिश आव आणल्याबद्दल निषेढ!"

बिनबुडाचा आरोप!
हौशी असल्याचा आव आणला नसून आळशी असण्याचा भाव व्यक्त केला आहे :)
पहा, परिच्छेद तिसरा, वाक्य पहिले - '.... रस्से/मसाले बनवायचा आळस आला...'
इथे लेखक नियमित स्वयंपाक करत असल्याचे सपष्ट होते.

"बाकी पाकृ तोंपासु. केव्हा येऊ खायला? ;)"

म्हणाल तेव्हा! पाककृतीचे इतके सूक्ष्म वाचन करून उत्तम अभिप्राय दिल्याबद्दल तुम्हाला एक ट्रीट ड्यू आहे

आपले,
आषाढ_दर्द_गाणे

ता. क.
सूड ह्यांनी माझ्यासाठी राखलेली 'मस्तानी' एखादा कट्टा करून तुम्हाला देता येईल किंवा कसे?

अंतु बर्वा's picture

1 Feb 2017 - 11:12 pm | अंतु बर्वा

आमचा एक मुस्लिम मित्र स्किनसहित पिसेस टाकायचा पण एरवी ४०-४५ मिनिटात होणार्या कोंबडीला एक-दिड तास एकदम कमी आचेवर शिजवायचा. स्किन पुर्ण वितळुन त्याचं तेल होउन जायचं. अर्थात कोणते पिस स्किनसहित टाकायचे आणि कोणते नाही हे त्याचं ठरलेलं असायचं. त्याच्या खास नोर्थ इंडियन टोन मधे म्हणायचा, इस से स्किन 'गल' जाती है :-) आक्खी कोंबडी अशी सराईतासारखी सोलायचा की बास! बाकी तुमची लिहायची स्टाईल आवडली आणी आनंदी गोपाळ यांनी वर लिहिल्याप्रमणे यु डोंट लुक लाईक सच अ आळशी पर्सन लुकिंग अ‍ॅट युवर रेसिपी :-)

अनरँडम's picture

2 Feb 2017 - 9:52 pm | अनरँडम

वाचायला मजा आली.

एकविरा's picture

7 Feb 2017 - 3:48 pm | एकविरा

स्वतःला आळशी म्हणत म्हणत कांदे मिरच्या छान बारीक कापल्यात की हो . आणि फोटो पण काढलेत। बाकी मी हाडाची चिकन खाणारी असल्या मुळे कातडी पण सोडत नाहि

मीता's picture

21 Feb 2017 - 8:34 pm | मीता

भारी लिहिलंय ..