एनडुरोचा थरार - भाग १

केडी's picture
केडी in क्रिडा जगत
10 Jan 2017 - 2:52 pm

ह्या वर्षी, ११/१२ फेब्रुवारी, २०१७ ला होणाऱ्या NEF एनडुरोचे हे पंधरावे वर्ष! त्या निमित्ताने, अमित आणि माझे अनुभव ह्या लेखमालेतून एकत्रितपणे लिहायचा केलेला हा आमचा एक प्रयत्न.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"केड्या, मी आता इथून हलणार नाहीये, काहीही झालं तरी" असं म्हणत अमित ने तिथेच बसकण मारली. वेळ, पहाटेच्या साधारण ४:०० ते ४:३० दरम्यान, ठिकाण, कोंकण दिवा च्या पायथ्याशी असलेल्या सांडोशी गावाच्या वेशीवर!

फेब्रुवारी २०१४ च्या पहिल्या विकांताला, स्वानंद, अमित आणि मी सुरु केलेले हे धाडस. २ दिवसात अतिशय अवघड मातीच्या रस्त्यांवरून ७० किमी सायकलिंग, १२ किमी हाईक विथ बाईक आणि २५ किमी डोंगरातून हायकिंग अश्यां स्वरूपाचा अडव्हेंचर स्पोर्ट्स इव्हेंट म्हणजे एनडुरो!
दर वर्षी होणाऱ्या ह्या अडव्हेंचर स्पोर्ट मध्ये आम्ही कसे "पडलो", त्या साठी थोडं मागे जावं लागेल.

स्वानंद ने आदल्याच वर्षी एनडुरो मध्ये भाग घेतलेला. त्याची आणि त्याच्या पार्टनेर्स ची पहिलीच वेळ होती. दर वर्षी फेब्रुवारी च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या ह्या इव्हेंट साठी स्वानंद ने जोरात सायकलिंग ची तयारी सुरु केलेली. त्यानं दरम्यान मित्र अमेरिकेला निघालेला, म्हणून त्याची 6 गियर ची सायकल मी विकत घेऊन रिपेअर करून कपडे वाळवायला बाल्कनीत ठेवलेली! मग तेवढीच त्याला कंपनी म्हणून त्याच्या सोबत सायकल चालवू लागलो. मजल दर मजल करत 20 ते 25 किमी त्याच्या सोबत चालवू लागलो. ह्या आधी सराव म्हणून कॉलॉनीत ४ ते ५ किमी सायकल चालवायचो. अवास्तव प्रमाणात वाढलेले वजन घेऊन साधे साधे चढ चढताना दमछाक होऊ लागली. स्वानंद बरोबर मग आधी नेकलेस रोड, मग खडकवासला पर्येंत सायकल चालवू लागलो.

यथावकाश स्वानंद, अजय आणि त्यांचा तिसरा पार्टनर ह्यांनी एनडुरो केली. अतिशय खडतर प्रसंगांना तोंड देऊन सरतेशेवटी स्वानंद च्या सायकल चे सीट तुटल्यामुळे त्यांनी ती रेस अर्धवट सोडली. इकडे अमित आणि मी दोन दिवस त्यांची काही खबरबात मिळते का त्याचे निष्फळ प्रयत्न करत होतो. (हि स्पर्धा ज्या रस्त्यांवर किंवा भागात घडते, तिथे नेटवर्क ची बोंब असते कायम).

स्वानंद परत आला आणि त्याला गाठून त्याच्या अनुभवाची सगळी रोमांचित करणारी गाथा ऐकली. तेव्हाच मी ठरवलं, कि बस्स, आता आपण असं काहीतरी करायचंच!
_______________________________________________________________________________________________________________________________

"अरे चला ना आपण करू एनडुरो एकत्र" असं स्वानंद आम्हाला दर खेपेला भेटला कि म्हणायचा. आम्ही सगळेच तसे फिटनेस enthusiasts, पण हौशी सायकलिस्ट ! त्यामुळे अशी स्पर्धा असते आणि ती आपल्यासाठी असते ह्याची जाणीवच नव्हती. तोवर आमचे पराक्रम म्हणजे ६-८ किमी पळणे आणि जुन्या सायकलवर १०-२० किमी च्या राईड मारणे! एनडुरो करायची तर खूप प्रॅक्टिस हवी. आम्हाला भिती हिच कि आपल्याला काही हे जमयच नाही ! शेवटी स्वान्याने कंटाळून त्याचे भिडू गोळा केले आणि एक जुनी सायकल रिपेअर करून एनडुरो ला गेला.

पुढे २ दिवस तो संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्याने त्याची काहीच खुशाली समजली नाही. स्वानंद चा फिटनेस कमाल आहे, त्याने तयारी जोरदार केली होती आणि त्याचा उत्साह तर त्याहीपेक्षा दुप्पट होता. सोमवारी तो परत आल्यावर त्याची रोमहर्षक स्टोरी ऐकायला मिळाली.

दुपारी त्याची रेस सुरु झाली. अवघड रस्त्यात खडखडाट करत ह्या तिघांनी सायकल दामटली. अंधारात, मिणमिणत्या हेडलाईट च्या प्रकाशात हे लोकं पानशेतवरून पुढे निघाले. अंधारामुळे तिघांमध्ये बरच अंतर पडलेलं. गारजाईवाडीच्या अलीकडे मिट्ट काळोखात एक खिंड लढवत स्वानंद वरती पोचला. उतार सुरु झाला असेल नसेल आणि एका स्पीडब्रेकर ने घात केला! स्वानंद ने मोठा अपघात टाळला पण सायकलच हॅण्डल मात्र वाकड झालं आणि सीट मोडलं! त्याने तरी देखील पुढे काही अंतर कापलं पण शेवटी सायकल ने मIन टाकली! दुर्दैवाने त्याला पुढे रेस अर्धवट सोडून मिळेल त्या वाहनाने परत यावं लागलं.

हे सगळं ऐकत असताना आपण मित्राच्या हाकेला ‘ओ’ न देऊन ह्यावेळी संधी दवडली ह्याची तीव्रतेने जाणीव झाली. नंतर स्वानंद ही स्पर्धा पुढील वर्षी करूच म्हणाला, आणि तेव्हाच खरंतर मी स्वानंद आणि केडी अशी टीम तयार झाली!

क्रमश:

सायकल

प्रतिक्रिया

पाटीलभाऊ's picture

10 Jan 2017 - 3:10 pm | पाटीलभाऊ

लेख अजून थोडा मोठा पाहिजे होता. सुरुवात केली आणि लगेच संपला.
पण असो...पुढील भागाच्या प्रतीक्षेत...! लवकर येऊ द्यात.

देशपांडेमामा's picture

10 Jan 2017 - 3:15 pm | देशपांडेमामा

वाचतोय. पुढील भाग पटापट टाका!

देश

किरण कुमार's picture

11 Jan 2017 - 11:09 am | किरण कुमार

अजून सविस्तर वाचायला आवडेल ,
मातीच्या रस्त्यांवरून ७० किमी सायकलिंग, १२ किमी हाईक विथ बाईक आणि २५ किमी डोंगरातून हायकिंग
भारी आहे .../\....

शलभ's picture

11 Jan 2017 - 1:29 pm | शलभ

एन्ड्युरो..
खूप वर्षापासून लिस्ट मधे आहे.

तुमचे अनुभव वाचण्यास उत्सुक..सुरूवात मस्तच..लवकर येऊद्या पुढचे भाग..

चाणक्य's picture

11 Jan 2017 - 2:28 pm | चाणक्य

एक शंका - एन्ड्युरो मधे स्विमिंग नसतं का ?

स्विमिंग नाही पण रिव्हर क्रॉसिंग आणि कयाकिंग असते. पण तो अतिशय छोटा भाग आहे अख्या रेस मधला