सचिननामा - १: ओळख

फारएन्ड's picture
फारएन्ड in क्रिडा जगत
30 Dec 2016 - 6:06 am

सचिन तेंडुलकर च्या कारकीर्दीतील विविध फेजेस बद्दल अनेकदा सोशल नेटवर्क्स वर चर्चा होत असे, अजूनही होते. सुमारे २३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमधे त्याचा खेळ, त्याच्या भोवतालची टीम, प्रतिस्पर्धी कसे बदलत गेले, त्याचे यश-अपयश, खेळाबद्दलचा अॅप्रोच याबद्दल सलग माहिती एकत्र करावी असे अनेक दिवसांपासून वाटत होते. हाच प्रयत्न येथे करत आहे. येथे शक्यतो भर "भारतीय क्रिकेट मधे मुंबई क्रिकेट म्हणजे रत्नहार, आणि सचिन रमेश तेंडुलकर म्हणजे त्यातला मुकुटमणी" टाईप (लिटरली) अलंकारिक भाषा टाळायचा प्रयत्न करून त्यापेक्षा प्रत्यक्ष निरीक्षणे, स्कोअरकार्ड्स व यू ट्यूब वरच्या क्लिप्स मधून ही माहिती पुढे यावी अशा पद्धतीने हे लिहीत आहे. पण तरीही हे एका फॅन ने इतर फॅन्स करता लिहीलेले आहे अशाच अर्थाने वाचावे. त्यामुळे कठोर वस्तुनिष्ठता आणण्याचा प्रयत्न मुळात फॅन असल्याने एका मर्यादेपर्यंतच शक्य आहे :). गेल्या काही दिवसांत येथे आलेले क्रिकेट वरचे सुंदर लेख वाचून क्रिकेट पुन्हा डोक्यात घुसले, आणि अनेक ठिकाणी विस्कळितणे असलेली ही माहिती एकत्र करून लेखमाला करावी असे वाटले.

माझ्या दृष्टीने सचिनच्या कारकीर्दीचे सुमारे १०-११ वेगवेगळे भाग/कालखंड होतात. या प्रत्येक काळात इतर काळाच्या मानाने काहीतरी नक्की फरक दिसेल. तो सचिन च्या बॅटिंग मधे, बरोबरच्या टीम मधे, त्याच्यावरच्या जबाबदारीमुळे अशा अनेक कारणाने असेल पण फरक दिसतो हे नक्की. तो मला दिसला तसा मांडत आहे. हे सगळे पूर्णपणे मेमरीमधून आलेले आहे असे नाही. पण अनेक माइलस्टोन्स, अनेक इनिन्ग्ज, कित्येक फटके अगदी आज बघितल्यासारखे लख्खपणे लक्षात आहेत (त्यातले कित्येक "आजही" बघत असतोच). त्याच बरोबर गेल्या अनेक वर्षात सतत बघितलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट, आणि संदर्भ व अचूकतेकरता उपलब्ध क्लिप्स व स्कोअरकार्डस शोधून ते वापरून हे सर्व लिहीलेले आहे.

हे लिहीताना जितकी मजा आली तितकी तुम्हाला वाचताना आली तर जरूर सांगा. तसेच काही चुका असतील, तर त्याबद्दलही.

१. कसोटी पदार्पणापूर्वी - साधारण १९८७ ते नोव्हें. १९८९
क्रिकेटच्या बाबतीत तो बर्‍यापैकी भाकड काळ होता. भारताचा १९८७ च्या कप मधला पराभव, गावसकरची निवृत्ती याच काळातले. कपिल हा दुसरा हीरो पण तो ही उतरणीला लागलेला होता. बहुधा फक्त वेंगसरकर फॉर्म मधे असे. श्रीकांत अधूनमधून खेळे पण एकूण क्रिकेट त्या एक दोन वर्षांत जरा बोअरच झालेले होते.

याच सुमारास सचिन बद्दल बातम्या येउ लागल्या. सर्वात पहिली अर्थातच ती कांबळीबरोबरच्या भागीदारीची. त्यानंतर अधूनमधून काहीतरी येत असे. मुंबईतील लोकांनी त्याचा खेळ तेथे कदाचित पाहिला असेल. यातून गावसकर नुकताच निवृत्त झाल्यानंतर भारताला लगेच मुंबईतून दुसरा भारी बॅट्समन मिळत आहे असे दिसू लागले होते. अर्थात तेव्हाचा मुंबईचा दरारा व विजय मांजरेकर, वाडेकर, गावसकर, वेंगसरकर, संजय मांजरेकर ही परंपरा पाहता भारतीय क्रिकेटचे बखोट धरून पुढे नेणारा पुढचा बॅट्समन कोणीतरी मुंबईकरच असणार हे अपरिहार्य वाटायचे तेव्हा.

मग त्याने आधी शालेय क्रिकेट, मग अंडर-१५, अंडर-१७ वगैरे मधे इतका धावांचा रतीब घातला की रणजी साठी त्याची चर्चा लगेच सुरू झाली. तेव्हाचा मुंबईचा कर्णधार दिलीप वेंगसरकरला अनेकांनी सचिन बद्दल सांगितले होतेच. ही माहिती अनेकदा प्रकाशित झालेली आहे - नेट मधे सचिनला त्याने कपिल ची बोलिंग सहज खेळताना पाहिले, आणि मुंबईच्या रणजी संघात त्याची निवड झाली. तरी त्याने रणजीचा पहिला सीझन प्रत्यक्ष संघाबाहेर बसूनच काढला. कल्पना करा तेव्हाच जर तो रणजी खेळला असता, तर संघातही तितका आधी आला असता. नंतर जेव्हा संधी मिळाली तेव्हा रणजी पदार्पणातच त्याने शतक ठोकले (वय १५ वर्षे). मग दुलीप आणि इराणी ट्रॉफीतही दोन्हीकडे पहिल्याच मॅचेस मधे शतके मारली. या सर्वांतून सचिन बद्दलच्या बातम्या, त्याची चर्चा वाढतच गेली.

त्याचा पहिला रणजी कर्णधार लालचंद राजपूत याच्या तेव्हाच्या आठवणी. आणखी एका क्लिप मधे मिलिंद रेगे ही तेव्हा साडेचौदा वर्षाच्या असलेल्या सचिन बद्दल म्हंटला आहे - "He was completely at ease with the surroundings of the big time cricket!"

याकाळात १९८९ च्या (बहुधा) मे मधे भारतीय संघ विंडीज ला गेला होता. त्याच संघात सचिन ची निवड होणार असे चित्र निर्माण झाले होते. पण बहुधा अजून तो वयाने खूप लहान होता म्हणून त्याला घेतला नव्हता बहुधा. असेही तेव्हा म्हंटले जायचे की या एका दौर्‍यात जर अपयशी झाला (१९८९ ची विंडीज म्हणजे अजूनही खतरनाक होती) तर करीयर सुरू व्हायच्या आधीच संपू नये म्हणून गावसकर ने त्याला परावृत्त केले होते. खरे खोटे माहीत नाही.या काळात एकदा टॉम ऑल्टर ने त्याची मुलाखत घेतली होती. ती आता मजेदार वाटते. मी तरी ही नंतरच पाहिली. त्यात "फास्ट बोलिंग खेळताना भीती वाटत नाही/सहज खेळता येते" हे कसलाही आव न आणता बोललेले ऐकायला मजा वाटते. पुढे खतरनाक पेस समोर इतर जण चाचपडत असताना सचिन स्ट्राइक घ्यायला हपापलेला असे ते बघून ते किती खरे होते ते जाणवते.

यानंतर नोव्हेंबर १९८९ मधे भारताच्या पाक दौर्‍यात त्याची निवड झाली. तेथून पुढे पुढच्या भागात.

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

30 Dec 2016 - 6:19 am | अत्रुप्त आत्मा

लै मससससससस्त.
पण फार पटकन संपला हा भाग. लवकर पुढचा टाका अता.

स्पार्टाकस's picture

30 Dec 2016 - 6:35 am | स्पार्टाकस

मस्तं सुरवात!

सचिन आणि कांबळीच्या पार्टनरशीपच्या वेळी पुढचा बॅट्समन होता अमोल मुजुमदार. तो म्हणतो,

नावातकायआहे's picture

30 Dec 2016 - 8:57 am | नावातकायआहे

पुढचा भाग टाका लवकर

किसन शिंदे's picture

30 Dec 2016 - 10:14 am | किसन शिंदे

वाह!! पुढील भाग पटापट येऊ द्या.

सिरुसेरि's picture

30 Dec 2016 - 11:54 am | सिरुसेरि

वाचत आहे . छान . +१

पद्मावति's picture

30 Dec 2016 - 5:12 pm | पद्मावति

खुपच सही.