साहित्य
पिझ्झा बेस साठी
३ १/२ कप (अधिक थोडे) गव्हाचे पीठ
२ कप गरम पाणी
१ मोठा चमचा ऍक्टिव ड्राय यीस्ट
१ चमचा साखर
२ चमचे मीठ
तेल, लागेल तसं
चिकन पिझ्झा साठी
५०० ग्राम चिकन खिमा
२ मोठे कांदे
२ ते ३ हिरव्या मिरच्या
१/२ इंच आलं
८ ते १० लसूण पाकळ्या
१ चमचा हळद
१ चमचा लाल तिखट
१ चमचा धने पावडर
१/२ चमचा जिरं पावडर
१ मोठा चमचा तेल, किंवा बटर
मीठ, चवीनुसार
व्हेज पिझ्झा साठी
१ मोठा कांदा, गोल चकत्यांमध्ये कापून
१ मोठी ढोबळी मिरची, गोल चकत्यांमध्ये कापून (असतील तर रंगीत मिरच्या वापरा)
४ ते ५ मशरूम उभे बारीक चिरून
१० ते १२ लहान चेरी टोमॅटो (नसतील तर नेहेमीच्या टोमॅटोच्या पातळ गोल चकत्या)
४ ते ५ काळे ऑलिव्ह, धुवून, बी काढून आणि गोल चिरून
पिझ्झा साठी
पिझ्झा सॉस (विकत चा)
किसलेले पिझ्झा चीज, लागेल तसे
पिझ्झा मसाला (सीझनिंग)
कृती
पिझ्झा बेस
एका बाऊल मध्ये २ कप गरम पाणी घ्या (पाण्याचे तापमान तुमच्या हाताला सोसेल असे असले पाहिजे). ह्यात साखर आणि १ चमचा पिठ मिसळून घ्या. ह्यात आता यीस्ट घालून मिश्रण ढवळून, १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवून घ्या.
उरलेली कणिक आपल्याला मळून घायची आहे, त्यासाठी त्यात मीठ घालून पिठाच्या मध्ये एक खोलगट विहीर करून घ्या. ह्यात आता हळू हळू यीस्टचं पाणी घालून, कणिक मळून घ्या. (पाणी लागेल तसं घाला, सगळं पाणी एकदम घालू नका). हि कणिक चांगली हातानं तिंबून घ्या. पीठ हाताला आणि टेबलवर नं चिकटता एकजीव गोळा होईस्तोवर मळून घ्या. हाताला आणि पिठाच्या गोळ्याला लागेल तसं तेल वापरा (ऑलिव्ह ऑइल असेल तर उत्तम). हा असा पिठाचा गोळा आता आपल्याला प्रूफ करायला ठेवायचा आहे. एका तेल लावलेल्या भांड्यात हा गोळा ठेवून त्यावर एक ओले फडके ठेऊन एखाद्या दमट कोपर्यात ठेऊन द्या.
साधारण एका तासाने, हा गोळा चांगला दुप्पट फुगून वर येईल. हलक्या हाथाने तो गोळा दाबून घ्या. त्याचे चार ते ५ सम प्रमाणात भाग करून पुन्हा गोळे करून घ्या. हे गोळे परत ओल्या फडक्याखाली झाकून ठेवा, साधारण एक तास.
हे गोळे परत फुगून येऊस्तोवर चिकन चा खिमा करून घ्या.
चिकन खिमा
कांदे, मिरच्या, आलं, लसूण मिक्सर मधून बारीक करून घ्या. पॅन मध्ये तेल/बटर घालून हे मिश्रण परतुन घ्या. ह्यात लाल मिरची पावडर, हळद घालून मिश्रण ढळवून घ्या. मंद आचेवर थोडा वेळ परतून मग ह्यात चिकनचा खिमा घाला. तो थोडा परतून झाला कि मग त्यात गरम मसाला आणि धने जिरे पावडर घाला. थोडं पाणी आणि चवीनुसार मीठ घालून झाकण ठेऊन ४ ते ५ मिनिटे खिमा शिजवून घ्या. खिमा कोरडा व्हायला पाहिजे. मिश्रण थंड करायला बाजूला काढून ठेवा.
पिझ्झा कृती
ओव्हन १८० डिग्री ला प्रि-हिट करून घ्या. ओट्यावर थोडं पीठ पसरून, एक गोळा दाबून घ्या. तो शक्य तेवढा पातळ लाटून घ्या. एका गोलाकार प्लेट ने कापून पिझ्झा बेस बनवा. अलगद हाताने ओव्हन-प्रूफ प्लेट वर हा बेस ठेवा.
व्हेज पिझ्झा साठी, ह्यावर पिझ्झा सॉस (कोपर्यापासून साधारण अर्धा इंच जागा सोडून), लावून घ्या. ह्यावर थोडं चीज टाकून मग भाज्या टाकून घ्या. थोडं सीझनिंग वरून भुरभुरा, आणि अजून एक चीज चा लेयर टाका. (चिकन चा करताना, भाज्यां आधी खिमा पसरवून घ्या, इतर कृती व्हेज पिझ्झा प्रमाणे).
हा पिझ्झा आता ओव्हन मध्ये २० ते २५ मिनिटे बेक करून गरम गरम खायला घ्या!
प्रतिक्रिया
6 Dec 2016 - 7:15 pm | एस
काय त्रास आहे! छ्या! :-(
7 Dec 2016 - 9:08 am | पगला गजोधर
पिझ्झा सॉस व सिजनिंग ची रेसिपी पण द्या ना केडी
मी ट्राय करणार, माझ्या एअर फ्रायर मध्ये, (होय माझ्या एअर फ्रायर मध्ये पिझ्झा करता येतो, रेडिमेड फंक्शन आहे पिझ्झ्या साठी)
7 Dec 2016 - 1:22 am | रेवती
मगाशीच गरम पिझ्झा खावा असे वाटून गेले आणि आता ही पाकृ पाहताना बरे वाटतेय. प्रत्यक्ष नाही पण चित्रात तरी पहायला मिळाला.
7 Dec 2016 - 7:17 am | देशपांडेमामा
नेहमी प्रमाणेच जबर्या!!!
देश
7 Dec 2016 - 8:50 am | तुषार काळभोर
अवांतर: रेडिमेड बेस ना वापरता मायक्रोवेव्ह मध्ये पिझ्झा बनवता येईल का?
7 Dec 2016 - 10:42 am | केडी
हा पिझ्झा ओव्हन नसेल तर तव्यावर करू शकता..त्यासाठी अगदी मंद आचेवर आधी ५ ते ८ मिनिटे नुसता बेस अर्धवट भाजून घ्यायचा. मग त्यावर टॉपिंग्स घालून परत मंद आचेवर चीज वितळेस्तोवर भाजायचा. आता भाजताना वरून झाकण लावायचे.
7 Dec 2016 - 12:17 pm | संजय पाटिल
करतोच आता..
7 Dec 2016 - 11:01 am | अजया
पिझ्झा आवडत नाही पण तुमचे सादरीकरण लाजवाब असते.
7 Dec 2016 - 4:45 pm | केडी
_/\_
7 Dec 2016 - 3:43 pm | पियुशा
म्ला फोटु न्य दिसले :(
7 Dec 2016 - 6:50 pm | पाटीलभाऊ
नाहीतर आमच्यासारखे आतल्या आत कण्हत राहाल :(
7 Dec 2016 - 4:50 pm | कैलासवासी सोन्याबापु
आरं काय चाललंय काय?? खाली प्रशांत भाऊंचा मिपा फिटनेस विकांत अन वरती केडी भाव चा डब्बल पिझ्झा बोनान्झा!! आमचे मत पिझ्झाच्या पारड्यात वट्ट पडले असून, ह्या इंडिसिप्लिन बद्दल आम्ही मागाहून ४ किमीची रगडा परेड करून भरपाई करून घेऊ =))
7 Dec 2016 - 5:27 pm | केडी
:=) :=)
11 Dec 2016 - 1:39 pm | त्रिवेणी
किती उच्छाद मांडावा माणसाने.जा बर डबल शिफ्टमध्ये काम करा आॅफिसची.
14 Dec 2016 - 3:58 pm | सविता००१
केला. छानच झाला..फस्त केला
फोटो वगैरे काढायचा असतो हे पण आठवलं नाही.
धन्स.. :)
14 Dec 2016 - 4:22 pm | केडी
पुढल्या वेळेला फोटो काढून इथे नक्की टाका!
14 Dec 2016 - 6:49 pm | सचिन कुलकर्णी
मला फोटो दिसत नाहीयेत. क्रोममध्ये नाही. IE मध्ये पण नाही. :(
14 Dec 2016 - 7:17 pm | अत्रुप्त आत्मा
14 Dec 2016 - 9:46 pm | मनिमौ
भाऊ. काय एकेक कातील रेसिपी.
23 Dec 2016 - 8:01 pm | यशोधरा
आता हे करुन बघायचे की काय? त्रास आहे!
23 Dec 2016 - 10:49 pm | पैसा
सुपर्ब!