भूनंदनवन काश्मीर – भाग ३ (चरार-ए-शरीफ़ – पाखेरपोरा – युसमर्ग)

के.के.'s picture
के.के. in भटकंती
7 Dec 2016 - 12:45 pm

====================================================
भूनंदनवन काश्मीर - भाग-१ भाग-२ भाग-३ भाग-४
====================================================

भूनंदनवन काश्मीर – भाग ३ (चरार-ए-शरीफ़ – पाखेरपोरा – युसमर्ग)

काश्मीरमधे आमची पुढची भेट चरार-ए-शरीफ व युसमर्गला होती. तसेच, इथे ‘असीम' ह्या पुण्यातील एका स्वयंसेवी संस्थेतर्फे, जी काश्मीरमधील युवकांसाठी कामे करते, पाखेरपोरा गावात एक बिस्कीट उत्पादन युनिट चालवले जाते. त्यालासुद्धा भेट देणार होतो. चरार-ए-शरीफ व युसमर्ग ही ठिकाणेसुद्धा सहसा पर्यटन कंपन्यांच्या कार्यक्रमपत्रिकेत नसतात. ही ठिकाणेसुद्धा श्रीनगरच्या दक्षिणेला बडगाम जिल्ह्यातच आहेत. इकडे जाणारा रस्तादेखिल दूधपथरीसारखाच छान होता. प्रथम आम्ही चरार-ए-शरीफला गेलो. इथे एक अंदाजे ६०० वर्षे जुना ऐतिहासिक दर्गा आहे.

1
(आंतरजालावरुन साभार)

शेख नुरुद्दीन नुरानी, जे ‘आलमदार-ए-काश्मीर’ म्हणुन ओळखले जातात, यांची कबर इथे आहे. मुख्य भागात फक्‍त पुरुषांनाच प्रवेश होता. महिलांना बाजूच्या प्रवेशद्वारातून फक्‍त जाळीतून पहायची सोय केलेली होती. दर्ग्यात अंतर्गत भागात तसेच छतावर खूप छान लाकडी कलाकुसर केलेली होती. बाकी तिथे काय करायचे असते काय नाही हे माहित नसल्याने तिथे जास्त रेंगाळलो नाही व लगेच बाहेर पडलो. बाहेर आल्यावर एक विचित्र प्रकार दिसला. एक माणुस एक मोठे पातेले घेउन एका जाळीच्या खोलीत गेला. तो जसा तिथे गेला तशी तिथे माणसे जमा होऊ लागली. तो त्या पातेल्यात जे होते ते त्यांना वाटू लागला. आम्हाला वाटले की प्रसाद असावा म्हणुन नीट पाहिले तर तो मांसाचे तुकडे वाटत होता. त्याने जसे ते वाटायला सुरुवात केली तशी लोकांची झुंबडच उडाली. काही स्त्रीया तर अगदी गळे काढुन त्याला ते त्यांना द्यायला सांगत होत्या. हे सगळेच फार विचित्र वाटत होते. बरोबर लहान मुलगा असल्याने आम्ही तिथुन लगेच काढता पाय घेतला.

इथुन पुढे आम्ही पाखेरपोराला गेलो, जिथे मुश्ताक़ व हिलाल आमची वाट बघत होते.

‘असीम’च्या काश्मीरमधल्या सामाजिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणजे रोजगार निर्मीती हा देखिल आहे. उद्देश हा की युवकांना अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध होतील व ते चुकीच्या मार्गाकडे आकर्षित होणार नाहीत. ह्या बेकरी प्रकल्पात ते सफरचंद व अक्रोड वापरून बिस्कीट (Apple-Walnut Biscuits) तयार करतात. काश्मीरमधे असीमचे असे २-३ प्रकल्प आहेत. मुश्ताक़ व हिलाल हे साधारण पंचविशीतील युवक असीमशी जोडले गेलेले असुन पाखेरपोरामधे हा प्रकल्प चालवतात. मुश्ताक़च्या घरी आमची दुपारच्या जेवणाची सोयदेखिल केलेली होती.

पाखेरपोरा हे युसमर्गच्या मार्गावरचे एक छोटेसे गाव आहे. मुश्ताक़ व हिलाल आम्हाला मुख्य चौकातच भेटले त्यामुळे त्यांचे घर शोधायला फारसे कष्ट पडले नाहीत.

पाखेरपोरा हे इतर कुठल्याही एखाद्या छोट्या गावासारखे गाव होते. एक-दोन मुख्य रस्ते सोडले तर बाकी सारे कच्चेच रस्ते होते. छोटी छोटी टुमदार घरे. मुश्ताक़चे देखिल एक स्वतंत्र ‘वाडा’सद्रुश्य घर होते. घरात गेल्यावर मुश्ताक़ आम्हाला दिवाणखान्यात घेउन गेला. दिवाणखाना एका छानश्या वॉलपेपरने सजवला होता. पूर्ण दिवाणखान्यात एक छानसे कार्पेट घातलेले होते. पण बसायला मात्र सोफा किंवा खुर्ची असे काही नव्हते. जमीनीवरच बैठक मारून बसायचे. गेल्यावर ओळख वगैरे झाली इकडच्या-तिकडच्या गप्पा करुन आम्ही त्यांचा बिस्कीट प्रकल्प पहायला गेलो. त्यांच्या घराच्या आवारातच एक खोलीत त्यांनी हा छोटेखानी प्रकल्प थाटला होता. मुश्ताक़ व हिलालने बिस्कीट बनवायची सगळी प्रक्रिया दाखवली व नमुना म्हणुन एक-दोन बिस्कीटे खायला दिली. ही चवीला साधारण कयानी बेकरीमधे मिळणार्‍या श्रुजबेरी बिस्कीटांसारखी लागत होती.

जेवायला वेळ होता म्हणुन पुन्हा गप्पा मारत बसलो. ‘असीम'शी कसे जोडले गेले ते त्यांनी सांगीतले. ‘असीम'तर्फे गावात अजुन काय काय उपक्रम चालू आहेत हे पण त्यांनी सांगीतले. मुश्ताक़ हा M.A. (Political Science) तर हिलाल M.A. (English) शिकलेला होता. त्या दोघांची घरची शेती आहे. नोकरीचे विचारले तर दोघांनाही नोकरी नव्हती. बेकरी, शेती व आली तर मनरेगाची कामे असे त्यांचे उद्योग होते. बोलता बोलता मुश्ताक़ने विचारले “कैसा लगा आपको कश्मीर?” आम्ही “बहोत सुंदर" असे उत्तरलो. त्यावर त्याने विचारले “क्या सोचते हो आप कश्मीरके बारे मे?” त्याच्या प्रश्नाचा रोख माझ्या लक्षात आला. ज्या विषयाकडे आम्हाला जायचे नव्हते तिकडेच घेउन जाणारा हा प्रश्न होता. “जैसा भारतके किसी दुसरे शहरमे या टुरिस्ट प्लेसमे होता है वैसा ही है यहांपे. कोई फर्क नहीं” असे मी सोईस्कर उत्तर दिले. पण मुश्ताकला त्यावर अजुन बोलायचे होते. मुश्ताक़ थोडा संवेदनशील वाटला. त्याच्या बोलण्यातुन तिथली परीस्थिती कळत होती. रोजगाराच्या संधी नाहीत, दहशतवादामुळे बिघडलेले वातावरण, कुठले नविन उद्योग/कंपनी तिथे येत नाही, अफ्स्पाचा त्यांना होणारा त्रास असे बरेच काहीकाही तो सांगू लागला. घरातून बाहेर पडताना न चूकता कुठलेतरी ओळखपत्र बरोबर असावेच लागते. संध्याकाळनंतर कोणी ओळखपत्राशिवाय पोलिस/सैनिक यांना सापडला तर त्याचे काय होईल सांगता येत नाही. दोघांनीही आपापल्या पाकीटात तीन-तीन ओळखपत्रे ठेवलेली होती. बोलताना तो बराच भावूक झाला होता. एक जाणवत होते की त्याला मुख्य प्रवाहात सामील व्हायची इच्छा तर आहे, पण संधी उपलब्ध नाही. त्याच्या म्हणण्यानुसार तिथले तरुण ह्याच कारणामुळे अस्वस्थ आहेत. निष्क्रीय सरकार, बेरोजगारी अशाने तरुणांच्या हातात काम नाही व अशातलेच काही तरुण चुकीच्या मार्गाकडे वळतात/वळवले जातात. “असीम" त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देत आहे व त्यांना मुख्य प्रवाहाचा हिस्सा बनायला मदत करत आहे.

नंतर जेवण केले. जेवणाच्या आधी हात धुवायला त्यांनी खास काश्मीरी आदरातिथ्यानुसार “तश्त-ए-नारी” आणले.

2
(आंतरजालावरुन साभार)

जेवणात राजमा-पनीर मसाला-भात असे होते. जेवण ठीकठाक होते. ह्या सगळ्यात एक गोष्ट आमच्या नजरेतून सुटली नाही ती म्हणजे घरातल्या बायका आमच्या समोर येत नव्हत्या. किचनमधुनच ह्या मुलांमार्फत निरोप, खाणे-पिणे पाठवणे चालू होते. जेवणानंतर आम्ही त्यांचे शेत पहायला गेलो. मुश्ताक़ची सफरचंद-अक्रोड-पेअरची शेती होती. भरपूर झाडे होती आणि मुश्ताक़च्या सांगण्यानुसार आपल्या धान्याच्या शेतीपेक्षा ह्या फळांच्या शेतीत जास्त कष्ट पडतात. असो. मुश्ताक़ने एक अभिप्राय वही बनवली होती. त्यात आम्ही आमचा अभिप्राय नोंदवून तिथुन निघालो. सोहैलने विचारले की जेवण कसे होते? आम्ही ठीकच होते असे सांगीतल्यावर तो हसला आणि त्याच्या नेहमीच्या शैलीत म्हणाला “मान लिजीए, आपको व्हेज खाना मिला यही बहोत है| कश्मीरमे सिर्फ व्हेज खाना कभी बनता ही नहीं हैं| अगर कोई मेहमान बोले की उसको व्हेज खाना है तो घर की औरत सोच मे पड जाती है के क्या बनाऊं|” भाताबद्दलपण त्याने जे सांगीतले ते आम्हाला माहिती नव्हते. तो म्हणला की “यहां पे हर डिश चावलके साथ ही खाई जाती है| रोटी बनती नहीं है|” आमच्यासाठी ही नविन माहिती होती. माझ्या अंदाजानुसार उत्तरेकडे जेवणात रोटीच असणार. पण काश्मीर अपवाद निघाला. सोहैलच्या माहितीनुसार काश्मीरचे मुख्य पीक हे तांदुळ आहे. त्यामुळे भात हा जेवणाचा अविभाज्य भाग आहे.

तिथुन आम्ही युसमर्गला गेलो. युसमर्गचा शब्दशः अर्थ ‘येशूचे कुरण' (Meadow of Jesus). इथले स्थानिक लोक मानतात की येशू काश्मीरमधे जेव्हा आला होता तेव्हा त्याने इथे वास्तव्य केले होते. युसमर्ग हे साधारण दुधपथरीसारखेच होते. पण दुधपथरीएवढे मनमोहक नव्हते. (सोहैलचे म्हणणे बरोबर होते ) युसमर्गलादेखिल दुरवर कुरण पसरलेले होते. त्याच्या आजुबाजूला मस्त देवदार, पाईनची झाडे होती. खरेतर, दुधपथरी व युसमर्ग एका डोंगररांगेने विभागलेले आहेत. काही लोक युसमर्ग ते दुधपथरी असा ट्रेक देखिल करतात. युसमर्गलापण घोडेवाल्यांनी खूप त्रास दिला. जिथे जाउ तिथे मागे-मागे येत होते. पाखेरपोरामधे जरा उशीर झाल्याने, तसेच मुलगा कंटाळलेला असल्याने आम्ही युसमर्गमधे जास्त फिरलो नाही. कुरणावरच निवांत फिरलो.

3

4

5

6

7

8

9

10

11
युसमर्ग डॅम

12
युसमर्ग डॅम

संध्याकाळी श्रीनगरला परत आल्यावर मस्त काश्मीर स्पेशल गरमागरम ‘काहवा' पिला. छान होता एकदम. काश्मीरमधला दुसरा दिवसपण छानच गेला. काही नविन पहायला तसेच अनुभवायला मिळाले. काश्मीरी लोकजीवन जरा जवळून पाहता आहे.

====================================================
भूनंदनवन काश्मीर - भाग-१ भाग-२ भाग-३ भाग-४
====================================================

प्रतिक्रिया

Ram ram's picture

7 Dec 2016 - 2:01 pm | Ram ram

सुंदर वर्णन

वाचत आहे. फार छान वर्णन आणि फोटो. पुभाप्र.

पद्मावति's picture

7 Dec 2016 - 3:10 pm | पद्मावति

सुंदर!

पाटीलभाऊ's picture

7 Dec 2016 - 3:33 pm | पाटीलभाऊ

छान वर्णन आणि फोटो

अजया's picture

7 Dec 2016 - 4:09 pm | अजया

सुंदर वर्णन आणि फोटो.
असिमचे कार्य फारच उल्लेखनीय आहे या भागात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Dec 2016 - 10:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

काश्मीरची नेहमीपेक्षा वेगळी सफर आवडली. फोटो अप्रतिम आहेत.