सर्वात खतरनाक शिकार
मूळ लेख : रिचर्ड कॉनेल (१८९३-१९४९)
यॉटच्या इंजीनाची घरघर आणि झपाट्याने पाणी कापत जाणार्या तिच्या पात्यांनी दुतर्फा उसळणार्या लाटा, यांचाच काय तो आवाज त्या काळोख्या रात्रीच्या शांततेचा भंग करीत होता. चिरूटाचे झुरके ओढत रेन्सफोर्ड आपल्या सीटवर आरामात पहुडला होता.
‘इतका मिट्ट अंधार आहे!’ तो मनात म्हणाला, ‘डोळे बंद करायची गरजच नाही जणू! या दाट काळोखाच्याच पापण्या करून झोपता येईल मला...’
बंदुकीच्या बारच्या चिरपरिचित आवाजाने तो अचानक खडबडून उठला. त्याच्या उजव्या हाताला, दुरून कोणीतरी पहिल्यांदा एक, आणि मग पुन्हा पुन्हा... किमान तीन वेळा तरी... बंदुकीचे बार काढलेले त्याच्या अनुभवी तीक्ष्ण कानांना ऐकू आले. तो चांगलाच चक्रावला आणि तत्काळ उडी मारून यॉटच्या कठड्यालगत आला. डोळे फाडफाडून आवाजाच्या दिशेने अंदाज घेऊ लागला. पण त्या काळोखाच्या गोधडीतून काहीच दिसत नव्हते. तेव्हा थोड्या उंचावरून काही दिसले तर पाहावे, म्हणून यॉटच्या कठड्यावर चढून तोल सावरत तो उभा राहिला आणि नेमका तेव्हाच, कठड्याला लागून बांधलेल्या दोरीला अडकून त्याचा पाईप त्याच्या तोंडातून अलगद निसटला. पाईप वाचवण्याच्या नादात जसा तो पुढे ओणवा झाला, तसा त्याचा तोल पार गेला. आपला तोल जातोय आणि आपण जरा जास्तच बाहेर वाकलो, इतके समजेपर्यंत तो कॅरिबिअन समुद्रात गटांगळ्या खात होता. पाण्यात पडता पडता त्याच्या तोंडातून उमटलेली अस्फुट किंकाळी त्या लाटांच्या कल्लोळामध्ये विरून गेली.
पाण्यातून डोके वर काढून ओरडण्याचा त्याने पुन्हा अगतिक प्रयत्न केला खरा, परंतु त्या यॉटमुळे उसळणार्या लाटांचे खारे पाणी त्याच्या नाकातोंडात गेले. मोठ्या मुश्किलीने स्वतःला सावरत, जोरदार हात मारत त्याने यॉट गाठण्याचा प्रयत्न चालवला. पन्नासएक फूट असे जीव तोडून पोहल्यावर मात्र, थांबून त्याने एकवार शांतपणे प्राप्त परिस्थितीचा आढावा घेतला. तशीही, अशा प्रकारे काहीतरी विलक्षण अडचणीत सापडण्याची त्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. यॉटमधून खाली कोसळताना त्याच्या ओरडण्याचा आवाज कोणी ऐकला असेल का? पण यॉट तर वेगाने पुढे निघाली, तिचे दिवेही आता अंधारात लुप्त होत चालले, म्हणजे त्याचे हे अपघाती पडणे कोणाच्या लक्षात आले नसावे. त्याने अंगावरचे कपडे कसोशीने अक्षरशः सोलून काढून टाकले, कारण पोहताना आता त्यांची अडचण व्हायला लागली होती. एक शेवटचा प्रयत्न म्हणून सारे बळ एकवटून त्याने यॉटच्या दिशेने जोरदार हाकाटी केली. मात्र उत्तरादाखल ती यॉट फक्त त्याच्या नजरेआड झाली.
मघाशी उठलेले ते बंदुकीचे बार आता त्याला आठवले. उजवीकडूनच ते ऐकू आले होते. तेव्हा मग त्याने आपली पोहण्याची दिशा बदलली. अतिशय शिस्तबद्धपणे, सावकाश, एक एक हात मोजून मारत, आपली शक्ती बेताने खर्च करीत, त्या अथांग समुद्रात कितीतरी वेळ तो लाटांशी झगडत, पुढेपुढे पोहत राहिला. ‘आणखी फार वेळ नाही निघणार माझ्याच्याने – कदाचित शंभरएक हात मारता येतील?’ नैराश्याचे विचार त्याच्या मनात येताहेत, इतक्यात –
एक चित्कार त्याच्या कानांवर पडला - त्याच दिशेने, अंधारातून - कोण्या हिंस्र श्वापदाचा, आत्यंतिक भीती आणि संताप यांनी भरलेला, कर्कश, भेसूर!
कोणता प्राणी असेल हे ओळखण्याचा प्रयत्नही नाही केला त्याने, पण आता त्याच्या अंगात पुन्हा नवे बळ संचारले, आणि आवाजाच्या रोखाने तो त्वरेने हात मारत निघाला. पुन्हा एकदा तोच, तसाच आवाज उमटला; मात्र दुसर्याच क्षणी अधिक तीक्ष्ण, अगदी स्वच्छ आणि स्पष्ट आवाजात तो छाटला गेला. –‘अरे! हा तर पिस्तुलाने गोळी घातलेल्याचा आवाज!’ पोहता पोहता तो उद्गारला.
आणखी दहाच मिनिटात त्याला एक सुखद नाद ऐकू यायला लागला. हा होता खडकांवर आदळणार्या, फुटून फेसाळून परतणार्या समुद्राच्या लाटांचा, आपण जमिनीजवळ पोहोचलो आहोत याची जाणीव करून देणारा. त्याच्या हातापायांना खडकाळ जमिनीचा अचानक स्पर्श झाला. आज समुद्र शांत होता म्हणून बरे. नाहीतर एरव्ही खवळलेल्या समुद्रात या खडकावर आपटून त्याचे शरीर विदीर्ण झाले असते. उरल्यासुरल्या शक्तीनिशी त्याने आपले शरीर त्या घोंघावणार्या लाटांमधून समुद्राबाहेर काढले. तळहाताने काळोखात त्या खडकाचा अंदाज घेत तो त्या खडकाच्या पृष्ठभागावर पोहोचला. खडकाच्या अगदी लगतच किर्र झाडी होती. पण सध्यातरी रेन्सफोर्डला समाधान होते, ते एका शत्रूच्या - समुद्राच्या – तोंडातून सुरक्षितपणे बाहेर पडल्याचे. आत्तातरी जंगलात त्या झाडांच्या जाळ्यांमागे कोणते अदृष्ट दडले आहे, याचा विचार करण्याचे त्राण त्याच्या अंगात उरले नव्हते. जंगलाच्या पायथ्याशी आपले अंग झोकून देऊन तो निश्चेष्ट पडला, केव्हा निद्राधीन झाला ते त्याला कळलेही नाही.
जाग आली, तेव्हा निवळणार्या सूर्यप्रकाशावरून त्याने ताडले की आता दुपारही टळून गेली आहे. गाढ झोप लागल्यामुळे त्याच्या रोमारोमात नवा उत्साह संचारला होता, भूकही खवळली होती.
‘जिथे पिस्तुलाचे बार निघाले, तिथे मनुष्यवस्ती तर खचितच असणार आणि माणसांची वस्ती आहे, म्हणजे जेवण्याखाण्याचाही प्रश्न सुटणार.’ तरतरीत होऊन इकडे तिकडे दृष्टिक्षेप टाकत तो पुटपुटला. पण कोणत्या संस्कृतीतले, कसे लोक असतील – तेही असल्या दुर्गम बेटावर - याची कल्पना येत नव्हती. समुद्रकिनार्याला अगदी लागूनच जंगलाची, झाडावेलींची गर्द जाळी होती. त्या निबिड, घनदाट अरण्यातून आत शिरकाव करायला, वस्तीवर जाणारा कोणताच मार्ग किंवा खाणाखुणा त्याला सहजासहजी दिसेनात. आता तर सूर्यही कलला होता आणि अंधार पडायला लागला होता. त्यामुळे पटापट पावले उचलणे आवश्यक होते. त्यामुळे किनार्याकिनार्यानेच जाणे रेन्सफोर्डला ठीक वाटले. त्याला फार काही दूर जावे लागले नाही. खडकावर ज्या ठिकाणी तो प्रथम समुद्रातून बाहेर पडला, तिथून थोड्याच अंतरावर तो थबकला. तिथल्या वेलींच्या जाळीतून त्याला दिसले की शिकार झालेला एकादा मोठा प्राणी तिथून फरफटत गेला असावा. त्याच्या धुडाने तिथले गवत दबले होते. ओल्या मवाळ जमिनीवरच्या लहानमोठ्या वनस्पती, झुडपे कापत तो गेला होता. त्या जाळीतून रेन्सफोर्ड आत शिरला. गवतात एक मोठा भाग काळपट लाल रक्ताने माखलेला होता. जवळच पडलेली काहीतरी चमकणारी वस्तू त्याने उचलली.
‘२२ नंबरचं रिकामं काडतूस...’ तो पुटपुटला; ‘पण हे जरा विचित्रच आहे. जनावर जर मोठे असेल, तर इतक्या लहान पिस्तुलाने अशा प्राण्याशी लढणे धार्ष्ट्याचे आहे. यात शिकार्याचे कसब, मातबरी दिसते. त्या श्वापदानेही झगडा केलेला असणार हे तर दिसतेच आहे.’
जमिनीवर वाकून त्याने बारीक परीक्षण केले आणि तो शोधत असलेल्या शिकारी बुटाच्या खुणाही आता त्याच्या नजरेस पडल्या. सुळक्याच्या दिशेने जो तो चढत निघाला होता, त्याच मार्गाने त्या बुटाच्या खुणा चालल्या होत्या. तो पुढे निघाला. अंधारातून, कधी लहानमोठे दगडगोटे, तर कधी कुजलेले लाकडाचे ढलपे यांच्यावरून घसरत, तसेच सावरत, त्याने वर त्या खडकाच्या शिखराकडे भराभर पावले उचलायला सुरुवात केली. आता त्या बेटावर हळूहळू रात्र पसरायला लागली होती.
समुद्रकिनार्यालगत एका लांब वळणावर रस्ता वळला. अंधाराच्या साम्राज्यात समुद्र आणि जंगल दोन्ही धूसर व्हायला लागले होते. वळता वळता त्याला वरच्या अंगाला उंचावर प्रथमच दिवे दिसले. बहुतेक हे एखादे गाव लागले असावे. पण जसा तो अधिक पुढे सरकला, तेव्हा तो चकित झाला. ते सर्व दिवे एकाच प्रचंड उंच इमारतीत लागले होते. त्या प्रकाशाच्या अनुषंगाने पाहताना त्याला लक्षात आले की ही इमारत एकाद्या अस्मानी गढीची असावी. तिच्या तीन बाजूंनी कातळावर उभारलेले मनोरे आणि त्यांच्या पायथ्याला आदळणार्या समुद्राच्या लाटा, असे ते दृश्य मोठे विलक्षण दिसत होते.
‘स्वप्न तर पाहात नाही मी?’ तो उद्गारला.
पण हे स्वप्न नसून प्रत्यक्ष, सत्यस्थिती आहे, हे थोडे पुढे आल्यावर त्याला उमगले. थोड्याच अंतरावर त्याला एक प्रचंड लोखंडी सुळ्यांचे दार लागले. ते ढकलून तो आत शिरला. दगडाच्या पायर्या चढून वर आल्यावर महाद्वार होते. त्याच्या एका अंगाला कुठल्याशा विचित्र प्राण्याच्या डोक्याच्या आकार भिंतीतून बाहेर आला होता. हा खटका होता, दार ठोठावण्यासाठी. यात तर कुठेही काही स्वप्नवत नव्हतेच; तरी सगळे कसे अद्भुत, परिकथेतल्यासारखे भासत होते. कष्टानेच त्याने तो मुखवटा उचलला. करकरत तो जेमतेम वर उचलला गेला असेल, जणू कोणी कधी तो वापरलाच नसावा. हात काढून घेतल्यावर प्रचंड आवाज करत तो खाली आदळला आणि त्या आवाजाने सर्व परिसर दणाणून गेला.
रेन्सफोर्डला पावलांची चाहूल लागली असे वाटले, पण दार उघडलेच नाही, म्हणून त्याने पुन्हा एकदा तो खटका त्याच पद्धतीने उचलून आदळला. या वेळी मात्र दार उघडले, ते मात्र इतके अलगद, आवाज न करता, की जणू स्प्रिंगवर बसवलेले आहे असे वाटावे. दरवाजातून एक झगझगीत सोनेरी प्रकाशझोत त्याच्या अंगावर आला. त्या प्रकाशाने, बाहेरच्या अंधाराला सरावलेले त्याचे डोळे दिपले. त्याच्या दृष्टीस प्रथम पडली, ती एक काळीकभिन्न आणि अजस्र माणसाची आकृती. आजवर इतके अवाढव्य शरीर रेन्सफोर्डने पाहिलेच नव्हते. बळकट शरीर, पोटापर्यंत वाढलेली काळी दाढी, रेन्सफोर्डच्या काळजावर रोखून धरलेले लांब नळीचे रिव्हॉल्वर, आणि त्या दाढीच्या जंजाळात लपलेले त्याचे ते दोन बारीक लुकलुकते डोळे! त्याच्या अंगावर बहुतेक कसलातरी काळा गणवेश होता – पर्शियन बकर्याच्या कातडीचे अस्तर असावे त्याला.
"तुला काळजी करायचे काही कारण नाही, मी काही कोणी चोर-दरवडेखोर नाही." स्वरात शक्य तितके मार्दव आणत, किंचित हास्यवदनाने रेन्सफोर्ड म्हणाला, "मी यॉटवरून अपघाताने पाण्यात पडलो. मी सँगर रेन्सफोर्ड, न्यू यॉर्क सिटीहून आलो."
त्या नजरेतला खुनशीपणा जरासाही बदलला नाही. एकाद्या पुतळ्यागत तो राक्षस त्याचे रिव्हॉल्वर तसेच रोखून धरून उभा ठाकलेला होता. बहुतेक रेन्सफोर्ड काय म्हणाला ते त्याला समजले तरी नाही, किंवा त्याला ते ऐकूच आले नाही.
"मी सँगर रेन्सफोर्ड, मूळचा न्यू यॉर्क सिटीचा," त्याने पुन्हा सांगायला सुरुवात केली, "मी यॉटमधून अपघाताने पडलो; मी प्रचंड भुकेलेला आहे."
उत्तरादाखल त्याने रिव्हॉल्वरचा दट्ट्या एका अंगठ्याने वर सरकवला. त्याचा दुसरा मोकळा हात सैनिकी शिस्तीनुसार कपाळावर सलामासाठी गेला, टाचा जवळ येऊन एकमेकांवर कडक आपटल्या आणि तो ‘अटेंशन’मध्ये आला. वरून दुसरा माणूस संगमरवरी पायर्या उतरत खाली येत होता. उंच, ताठ आणि सडसडीत शरीरयष्टीचा. हा इथला मालक असावा. ‘म्हणजे तो सलामही यालाच होता तर...’ रेन्सफोर्ड मनात म्हणाला. त्याचा घरगुती पेहरावसुद्धा त्याचा दर्जा दाखवून देणारा होता. आपल्या सैनिकी, कमावलेल्या पण तरी आदबशीर स्वरात तो उद्गारला, "प्रथितयश शिकारी मि. सँगर रेन्सफोर्ड! माझ्या घरात तुझे सहर्ष स्वागत आहे. तिबेटमधल्या बर्फात केलेल्या वाघांच्या शिकारीविषयीचे तुझे पुस्तक मी वाचले आहे." तो उद्गारला, "मी जनरल झेरॉफ."
एका नजरेत रेन्सफोर्डला जाणवले ते त्याचे अतिशय आकर्षक आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व. पण पुन्हा पाहताना त्याचा तो चेहरा मात्र त्याला विकृत, रापलेला असा वाटला. साधारण मध्यमवयीन किंवा जरा अधिकच असावा तो – कारण त्याचे केस लख्ख पांढरे होते, पण त्याच्या भरघोस भुवया आणि सैनिकी टोकदार दाट काळ्या मिशा पाहून रेन्सफोर्डला मात्र काल रात्रीच्या मिट्ट अंधाराची आठवण झाली. गालाची हाडे वर आलेली, धारदार नाक, एकंदरीत लोकांवर हुकमत गाजवणारा असा त्याचा चेहरामोहरा होता. जनरलने गणवेशातल्या त्या राक्षसाकडे वळून त्याला खूण केली. क्षणात बंदूक खाली वळवून, एक कडक सलाम ठोकून तो तिथून चालता झाला. "आयव्हान हा एक अफाट ताकदीचा, पण दुर्दैवाने मुका आणि बहिरा प्राणी आहे. खरे तर सरळसोट माणूस आहे, पण त्याच्या जातकुळीतल्या इतरांसारखाच क्रूर आणि पाशवीही आहे." जनरल म्हणाला.
"रशियन आहे का तो?" रेन्सफोर्ड.
"हो, रशियन कोझॅक, एक युद्धप्रेमी जमात." जनरलच्या हलक्या स्मितहास्यातून त्याचे लाल ओठ आणि अणकुचीदार दात प्रकटले. "मीही त्याच जमातीतला आहे!" त्याने पुस्ती जोडली.
"चल, आपण इथेच बोलत उभे राहिलो आहोत. ते आपण नंतर करू शकू. तुला सध्या कपडे, अन्न आणि विश्रांती यांची खरी गरज आहे. तुला त्या गोष्टी इथे उपलब्ध होतील. ही जागा अतिशय आरामदायी आहे. रेन्सफोर्ड, आयव्हान तुला आवश्यक त्या सर्व गोष्टी पुरवेल. मला वाटते, माझे कपडे तुला व्यवस्थित होतील. तू आलास तेव्हा मी जेवायला सुरुवातच करणार होतो. आता मी तुझ्यासाठी थांबतो."
आयव्हानने रेन्सफोर्डला त्याची बेडरूम दाखवली. ही एक प्रचंड मोठी, उंच छताची खोली होती. पलंगाच्या चार खांबांवरून एकाद्या तंबूप्रमाणे पडदा सोडला होता. तो पलंगही एवढा मोठा होता की एका वेळी त्यावर किमान पाच-सहा तरी जण सहज झोपू शकले असते. जेवायला जाताना घालण्यासाठी आयव्हानने दिलेल्या जनरलच्या पोषाखावरचे लेबल पाहून रेन्सफोर्ड चमकला. लंडनचा हा कारागीर केवळ ड्यूक किंवा राजपुत्र यांच्याच दर्जाच्या लोकांचे कपडे शिवणारा शिंपी होता. छोट्या छोट्या गोष्टींतही जनरलची श्रीमंती नजरेत भरणारी होती.
जेवणाचा हॉल जुन्या जमान्यातल्या अमीर-उमरावांच्या घरांची आठवण करून देणारा, आणि अनेक बाबतीत विलक्षण होता. ओक लाकडाची अजस्र दारे, तशाच दारांच्या चौकटी, उंचच उंच छत, एका पंगतीत किमान चाळीस लोक तरी सहज एकत्र बसू शकतील इतके मोठे आणि लांबलचक डायनिंग टेबल; हॉलच्या भिंतींवर जनरलने शिकार केलेली निवडक डोकी - वाघ, सिंह, हत्ती, रानडुकरे, काळवीट अशा मातब्बर प्राण्यांची - रेन्सफोर्डने याहून मोठी डोकी यापूर्वी कधीही पाहिली नव्हती आणि तीही इतकी जिवंतपणे मांडलेली. टेबलावरचा डिनर सेट वगैरेंची रचना नेटकी, आणि मांडलेल्या वस्तूही उत्कृष्ट दर्जाच्या - काचेच्या, चांदीच्या किंवा चिनी मातीच्या होत्या.
थोड्या दिलगिरीच्याच सुरात जनरल म्हणाला, "सुसंस्कृत समाजात मान्य अशा प्रथा, सुविधा आमच्या इथे पुरविण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो. तरीही काही त्रुटी राहून गेल्या असतील, तर त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आधुनिक सुखसोयींपासून आम्ही दुरावलेले आहोत, याची तर कल्पना आम्हाला आहेच."
जनरल झेरॉफ आतिथ्यात अगदी तत्पर होता हे तर स्पष्टच होते. पाहुण्यांची यथायोग्य सोय अगदी बारकाईने तो पाहत होताच. पण रेन्सफोर्डला जाणवले की याशिवायही तो आपले अगदी बारीक निरीक्षण करीत आहे. जेवता जेवता मध्येच सहजही जेव्हा जनरलशी दृष्टादृष्ट होई, तेव्हा जनरलची चौकस, शोधक नजर त्याला बोचत होती.
"मी तुला नावाने ओळखले याचे तुला आश्चर्य वाटले असेल ना?" जनरल म्हणाला, "त्याचे असे आहे, की शिकारीवर प्रकाशित होणारी इंग्लिश, फ्रेंच, रशियन वगैरे सर्व पुस्तके मी वाचतो. शिकार हे माझे सर्वस्व आहे."
"हो, तू हॉलमध्ये मांडलेली नामांकित डोकी लक्षणीय आहेत. त्या दक्षिण आफ्रिकन काळ्या रानटी म्हशीचे एवढे मोठे डोके तर मी प्रथमच पाहिले. व्यक्तिशः मला विचारशील, तर पहिल्या पाच सर्वांत हिंस्र प्राण्यांत तुझी ती ‘केप’ म्हैस सर्वाधिक धोकादायक आहे." रेन्सफोर्ड.
काही क्षणच जनरल गप्प राहिला; पण त्याच्या ओठांवर एक सुप्त मिश्कील हसू अवतरले. तो हलकेच उद्गारला, "नाही, नाही, तू चुकतोस; ही केप म्हैस जरी भयंकर धोकादायक असली, तरी सर्वाधिक धोक्याची शिकार ती नक्कीच नाही." वाईनचा एक घुटका घेत तो दबक्या स्वरात म्हणाला, "या इथे माझ्या गेम रिझर्वमध्ये – अभयारण्यामध्ये मी सर्वाधिक धोकेबाज सावजांची शिकार करतो."
"या इथे? तू म्हणतोस की या बेटावर अशी मोठी जनावरे आहेत?" रेन्सफोर्ड अविश्वासाच्या स्वरात उद्गारला.
"निसर्गतः नसली, तरी मी माझ्या शिकारीच्या हौशीखातर त्यांचा या बेटावर साठा करतो." जनरल.
"अच्छा, म्हणजे तू ते प्राणी बाहेरून आयात करवतोस तर?" रेन्सफोर्ड विचारात पडला, "उदाहरणार्थ काय, वाघ वगैरे जमवले आहेस?"
"नाही, नाही." मंद स्मित करीत तो पुढे म्हणाला, "वाघांची शिकार करणे सोडून मला आता काही वर्षे झाली. खरे सांगायचे तर त्यात मी इतका सराईत झालो, की मला वाघांच्या शिकारीचा कंटाळा आला. त्यांच्यापासून धोका म्हणून अजिबातच वाटेनासा झाला. तुला सांगू, मी हाडाचा शिकारी आहे आणि शिकार्याला धोके झेलत खेळण्यात खरी मजा असते. रेन्सफोर्ड, आपण दोघे मिळून अशा काही मोठ्या हत्या करू. तुझ्या साथीने त्या करायला मला फारच आवडेल."
"पण कसली शिकार?" रेन्सफोर्ड पुन्हा मूळ मुद्द्याकडे वळला.
"मी तुला त्याची हळूहळू कल्पना देईन. तू निश्चितपणे खूपच खूश होशील, म्हणजे मला त्याची खातरीच आहे. स्वतःकडे मोठेपणा न घेता सांगायचे, तर ‘शिकार’ या विषयावर मी ही एक वैचारिक क्रांतीच केली आहे असे मला वाटते." जनरल विशेष खुशीत येऊन बोलत होता. "असे पाहा, की देवाने कोणाला कवी बनवले - कोणाला राजा, तर कोणाला भिकारी. मला त्याने शिकारी बनवून पाठवले. माझा हात हा बंदुकीचा चाप ओढण्यासाठी बनवला आहे, असे माझे वडील म्हणत. माझ्या वयाच्या पाचव्याच वर्षी त्यांनी मला एक रशियन बनावटीची लहान बंदूक आणून दिली, चिमण्या मारायला. वयाच्या दहाव्या वर्षी मी पहिले अस्वल मारले. माझे संपूर्ण आयुष्य जणू एक लांबलचक शिकारीची खेळी आहे! रशियन सैन्यामध्ये एकेकाळी माझ्या हाताखाली कोसॅक घोडदलाची सबंध फळी होती. परंतु तेव्हाही माझा जो खरा शिकार्याचा पिंड होता, तो जागृत होता. मी आजवर शिकारी करत सर्वत्र सर्वदूर फिरलो आहे, सर्व प्रकारच्या शिकारी मी केल्या आहेत. किती प्राणी आजवर मी मारले असतील, याची तर गणतीच नाही.
रशियन राज्यक्रांतीनंतर मी देश सोडला. माझ्यासारख्या, झारच्या सैन्यातल्या कोणा उच्चपदस्थाने तिथे राहणे अप्रशस्त झाले होते. सुदैवाने अमेरिकन बाजारात मी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. त्यामुळे कुठे पॅरिसमध्ये टॅक्सी चालव, कुठे मोन्टे कार्लोमध्ये चहाचा स्टॉल टाक, असले काही प्रयोग केवळ पोटापाण्यासाठी मला करावे नाही लागले. अगदी नैसर्गिकपणेच मग मी मला अत्यधिक प्रिय अशा शिकारींमध्येच गुंतलो. उत्तर अमेरिकेच्या रॉकीजमधली प्रचंड अस्वले, हिमालयामध्ये गंगेतल्या मोठमोठ्या सुसरी, पूर्व आफ्रिकेतले अजस्र गेंडे – विचारूच नकोस. अॅमेझॉनमध्ये जाऊन मी तिथल्या चट्टेरी पट्टेरी जग्वारकडे वळलो – ते म्हणे अतिशय धूर्त आणि क्रूर श्वापद असते या एकाच कारणास्तव. अर्थात, मला तरी काही ते तसे भासले नाहीत!" एक मोठा सुस्कारा टाकून जनरल म्हणाला, "एक हुन्नरी शिकारी, हातात शक्तिशाली रायफल घेऊन असलेला – याच्यापुढे त्यांचे काहीच चालले नाही. माझी फारच घोर निराशा झाली. आता तर शिकार करण्याचा मला कंटाळा येऊ लागला होता. म्हणजे असे बघ, की शिकार हीच जी माझे जीव की प्राण, तिच्यातच मला काही स्वारस्य वाटेनासे व्हायला लागले. माझ्या शिकारीच्या तंबूत प्रचंड डोकेदुखीने मी आजारीच पडलो. त्या तळमळीच्या स्थितीत पडल्या पडल्या मी विचार करत होतो, की हे असे का व्हावे?" जनरल बोलत होता.
"आता तू तसा माझ्याहून बराच लहान आहेस, पण एक शिकारी म्हणून तू माझे मनोगत ओळखू शकशील. मला सांग, रेन्सफोर्ड, याचे काय कारण असेल, असे तुला वाटते?"
"काय कारण आहे त्याचे?" रेन्सफोर्डने विचारले.
"इतकेच, की शिकारीमधला ‘खेळ’ नष्ट झाला होता. शिकार इतक्या सहजपणे विनासायास होत असल्यामुळे मला नेहमीच माझे सावज सापडायचे, अगदी न चुकता! धोकादायक, स्पर्धात्मक असे काही उरलेच नव्हते. सगळेच अगदी योजल्याप्रमाणे घडत गेले, तर त्यासारखे नीरस दुसरे काय असणार?"
जनरलने नवीन सिगारेट शिलगावली. "माझ्यापुढे कोणत्याही प्राण्याच्या जगण्या-वाचण्याचा, प्रतिकार करण्याचा, आक्रमण करण्याचा काही धोका उरलाच नाही असे झाले – मी स्वतःचे कौतुक म्हणून नाही सांगत, पण ते एक गणितच होऊन बसले. कोणत्याही प्राण्याजवळ युद्धात प्रतिस्पर्धी म्हणून काय काय असते – तर त्याचे चापल्य आणि त्याच्या नैसर्गिक संप्रेरणा, जगण्यासाठी प्रतिकार करण्याची संवेदना. पण ही संवेदना, जाणिवेची शक्ती माणसाच्या तर्कशक्तीपुढे केव्हाही हारच खाते. या वास्तवाचा मला खोल परीक्षणानंतर शोध लागला, आणि नैरश्याने मला अगदी ग्रासून टाकले."
रेन्सफोर्ड त्याच्या बोलण्यात अगदी मग्न झाला होता.
"या अडचणीवर मात कशी करावी याचे उत्तरही मला त्या अस्वस्थतेतूनच स्फुरले."
"आणि काय होते ते उत्तर?" रेन्सफोर्डचे कुतूहल शिगेला पोहोचले होते.
जनरलच्या ओठांतून एक विजयी हास्य प्रकटले – पराभवावर मात करणार्या यशस्वी माणसाचे. "शिकारीसाठी मला एक नवीन प्राणी शोधून काढावा लागणार होता." तो म्हणाला.
"नवीन प्राणी? काहीतरीच सांगतोस झाले." रेन्सफोर्ड.
"छे छे, काहीतरीच का?" जनरल गंभीरपणे उद्गारला, "तुला मी म्हणालो ना, की शिकार ही माझे सर्वस्व आहे; आणि त्यामुळे या विषयावर थिल्लर विचारांना माझ्याकडे जराही वाव नाही. मी हे बेट विकत घेतले, त्यावर ही गढी उभारली, घर बांधले, आणि या इथे मी माझा शिकारीचा खेळ मांडला. ही जागा माझ्या शिकारींसाठी अत्यंत योग्य अशी आहे – चहूबाजूंनी वेढलेले जंगल, त्यात अनेक गुंतागुंतीचे रस्ते, चकवे, उंचसखल परिसर, कुठे दलदल, तर कुठे डोंगर, पठारे..."
"ते सगळे तर खरेच, पण जनरल झेरॉफ, शिकारीसाठी प्राणी लागतात, त्या प्राण्यांचे काय?"
"अरे, काय सांगू तुला! जगात इतरत्र कुठे सापडणार नाही इतकी आकर्षक शिकार ही जागा मला पुरवते. रोज मी शिकार करतो, आणि आता माझा कंटाळा पार पळून गेला आहे, कारण आता माझ्याकडे सापडणार्या सावजाकडे हे बुद्धिचातुर्यही आहे. त्यामुळे शिकारीत दररोज काहीतरी नवीन समाधान लाभते."
रेन्सफोर्डचा गोंधळ उडाला होता आणि तो आता त्याच्या चेहर्यावरूनही स्पष्ट दिसत होता.
जनरलने समजावले, "शिकारीसाठी मी एका आदर्श प्राण्याच्या शोधात होतो. तर मग प्रश्न होता की आदर्श प्राणी कसा असावा, त्याच्याकडे कोणते गुणविशेष असावेत? आणि अर्थातच उत्तर होते, तो शूर, क्रूर, धैर्यवान असावा, आणि या सर्वापेक्षाही, युक्तीबुद्धीने, तर्कसंगत काम करणारा असावा."
"पण देवाने कोणत्याच प्राण्याला तर्कशक्ती दिलेली नाही..." रेन्सफोर्डने प्रत्युत्तर दिले.
"अरे बाबा, एका प्राण्याला दिली आहे." जनरल.
"पण... काय बोलतोस काय तू..." रेन्सफोर्डने आवंढा गिळला.
"का, त्यात काय झाले?" जनरल बेफिकिरीने म्हणाला.
"हे सगळे तू काहीतरीच सांगतो आहेस, जनरल झेरॉफ, मला हे ऐकवत नाही. ही तर तू क्रूर थट्टा चालवली आहेस." रेन्सफोर्ड.
"त्यात थट्टा कसली? मी तर शिकारीबद्दल बोलतो आहे." जनरल.
"याला शिकार म्हणतोस तू? अरे बापरे! देवा! जनरल झेरॉफ, तू ज्याचे इतके वर्णन करतो आहेस, त्याला आमच्या सुसंस्कृत जगात खून असे म्हणतात." रेन्सफोर्ड.
जनरल हसला. त्याने रेन्सफोर्डला पुन्हा कोड्यात टाकले. "तुझ्यासारख्या इतक्या आधुनिक जमान्यातल्या आणि तरुण पिढीतल्या माणसाने मानवी जीवनाबद्दल असल्या स्वप्नाळू कल्पना बाळगाव्यात, हे मला तर पटतच नाही. तू मला सांग, तुझा युद्धातला, युद्धकैद्यांबद्दल अनुभव ..."
"युद्ध म्हणजे खून करण्याचा परवाना नाही." रेन्सफोर्डने त्याला मध्येच तोडले.
"काय विलक्षण विनोदी माणूस आहेस तू!" जनरल तर रेन्सफोर्डच्या वक्तव्यावर हसतच सुटला. "अरे, जरा आजूबाजूला जग कुठे चालले आहे ते पाहा! आजकालचे तुझ्या वयाचे शिकले-सवरलेले तरुण, अगदी अमेरिकेतलेही, ही असली व्हिक्टोरिअनकालीन जुनाट आणि बुरसट विचारसरणी बाळगत नाहीत. हे म्हणजे लिमोझिनसारख्या अद्ययावत गाडीला बैलगाडीची चाके जोडण्यासारखे झाले! माझ्याबरोबर शिकारीला येताना खातरीपूर्वक तुला हे तुझे विचार बासनात गुंडाळून ठेवूनच यावे लागतील. तुझ्यासमोर केवढे मोठे आनंददायक भांडार मी उघडले आहे, याची तुला कल्पनाच नाही, रेन्सफोर्ड!"
"आभारी आहे मी तुझा; पण मी शिकारी आहे, खुनी नाही." रेन्सफोर्ड उद्विग्नपणे म्हणाला.
"अरेच्या! पुन्हा तीच अप्रिय भाषा!" अजिबात अनुत्साहित न होता जनरल उत्तरला, "पण मी तुला खातरीने पटवून देईन की तुझ्या मनातले हे आदर्श वगैरे विचार या इथे अगदीच गैरलागू आहेत." जनरल.
"ते कसे?" रेन्सफोर्ड.
"असे पाहा, की हे आयुष्य बलवंताचे आहे. या जगात बलवान लोकच जगणार आणि गरज पडल्यास दुर्बळांचा जीव घेणार; हाच निसर्गनियम आहे. कमकुवत, दुबळे लोक बलवानांच्या सुखपूर्तीकरताच बनवलेले आहेत. मी बलवान आहे. देवाने मला दिलेले हे सामर्थ्य मी का वापरू नये? मी जन्मजात शिकारी आहे. शिकार करावीशी वाटली, तर ती मी का करू नये? मी कोणाची शिकार करतो? या पृथ्वीतलावरचे जे अगदी टाकाऊ, हीन दीन, असे लोक इथे येतात, त्यांची. उदाहरणार्थ, अवजड बोटींवरचे खलाशी, सैनिक, कृष्णवर्णीय लोक, चिनी, गोरे, संकरित जातींचे – मी तर म्हणेन, की एकादा उमदा घोडा किंवा कोल्हा हे प्राणीसुद्धा असल्या वीस जणांपेक्षा जगायला अधिक लायक ठरतील. यांचा शिकारीसाठी वापर करून घेण्यात वावगे ते काय?"
"पण मिळतात कुठून हे लोक तुला?" रेन्सफोर्ड.
"या बेटाला ‘बोटींचा सापळा’ असे नाव आहे. काही वेळा क्रोधाविष्ट झालेला समुद्र त्यांना माझ्याइथे पोहोचवतो; काही वेळा सृष्टीकडून मदत आली नाही, तर मी सृष्टीला मदत पुरवतो! ये, तुला या खिडकीतून गंमत दाखवतो."
"ते पाहा," रात्रीच्या त्या मिट्ट काळोखाकडे बोट करत जनरलने दाखवले आणि एका बोटाने भिंतीतली एक कळ त्याने दाबली. तत्क्षणी समुद्रातल्या दाट अंधारात दीपमाला उजळली. जनरल हसत म्हणाला, "त्या दिव्यांच्या अनुरोधाने समुद्रात एखादा मार्ग असावा असा आभास निर्माण होतो, पण प्रत्यक्षात मात्र तिथे तसा मार्ग अस्तित्वातच नाही. या चमत्कृतीला भुलून संकटात सापडलेल्या कित्येक बोटी इथे वळतात आणि त्या ठिकाणी अकराळविकराळ राक्षसाप्रमाणे पसरलेल्या शिळांच्या धारदार कपारींवर आदळून फुटतात, शतशः विदीर्ण होतात, त्यांचा चक्काचूर होतो." आपल्या हातातल्या शेंगदाण्याचा आपल्या बुटांच्या टाचेखाली भुगा करीत जनरल म्हणाला, "या शेंगदाण्याप्रमाणे!"
"अर्थात, आमच्या इथे वीज आहे; आम्ही इथे येणार्यांना सभ्य आणि सुसंस्कृत वागणूक देतो." तो बरळला.
"आणि तुम्ही लोकांना गोळ्या घालून ठार करता. ही तुमची संस्कृती?" रेन्सफोर्ड.
जनरलच्या काळ्या डोळ्यांवर संतापाची लकेर उमटून गेली. पण क्षणभरच. दुसर्याच क्षणी आवाजात नेहमीचे मार्दव आणत तो उत्तरला, "अरे मित्रा, तत्त्वाला किती चिकटून बसला आहेस तू! आणि असे कसे मी करीन? हा तर भ्याडपणा झाला. मी या लोकांना सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करून देतो. भरपूर आणि उत्तम खाद्य देतो, आणि त्यांच्यासाठी व्यायामाचीही सोय केली आहे. त्यांची तब्येत उत्तम ठणठणीत होते इथे. तू उद्या सकाळी पाहशीलच स्वतः म्हणजे तुला कल्पना येईल."
"म्हणजे? हे सगळे नेमके कशासाठी? तुला म्हणायचे काय आहे?" रेन्सफोर्ड प्रश्न करता झाला.
हसून जनरल म्हणाला, "या इथे तळघरात एक प्रशिक्षण कक्ष आहे, तिथे उद्या मी तुला नेईन. सध्या तिथे दहा-बारा प्रशिक्षणार्थी आहेत. एका दुर्दैवी जहाजाच्या भीषण अपघातातून वाचलेले ते स्पॅनिश खलाशी आहेत. हे अडाणी जीव खरे म्हणजे बोटींवर काम करण्याच्याच लायकीचे; इथे जंगलात ते अगदीच निरुपयोगी आहेत."
रेन्सफोर्डने मोठ्या कष्टाने प्रतिकाराची आपली ऊर्मी आवरली.
इतक्यात, जनरलने हात उंच करून खूण केली आणि आयव्हान एका ट्रेमध्ये टर्किश कॉफी घेऊन आत आला. "असे पाहा, की शिकार हा खेळ आहे." जनरलने संथपणे पुन्हा आपल्या विवेचनाला सुरुवात केली. "यांच्यातल्या एकाद्याला मी शिकारीला प्रोत्साहित करतो. त्याला अन्नाचा भरपूर साठा आणि शिकारीसाठी एक उत्तम धारदार सुरा पुरवतो. पाठलाग सुरू करण्यापूर्वी या माझ्या सावजाला तीन तासांचा अवधी देतो. या वेळात त्याने जंगलात कुठेही जावे, लपावे. मी त्याचा माग काढून त्याला शोधायचे, हाच खेळ. माझ्याजवळ मी एक अगदी लहान आणि कमीत कमी शक्तीचे पिस्तूल ठेवतो. माझ्या सावजाने सलग तीन दिवस जर मला हुलकावणी दिली, त्याच्यापर्यंत मी पोहोचू शकलो नाही, तर तो जिंकला; आणि मला जर ते सावज सापडले, तर..." – जनरल हसत म्ह्णाला.
"पण तो जर शिकारीच्या या खेळाला राजी नसेल तर?" रेन्सफोर्ड.
"हे पाहा," जनरल उद्गारला, "मी त्याला खेळायची संधी देतो. त्याला ते मान्य नसेल, तर मग शेवटचा पर्याय म्हणून मी त्याला आयव्हानकडे सुपुर्द करतो. आयव्हान मागे त्या रशियन झारकडे असताना त्याच्याकडे युद्धकैद्यांना हाताळण्याचे काम होते. त्यामुळे कैद्यांशी खेळण्याच्या त्याच्या पद्धती काही वेगळ्याच आहेत. त्यामुळे, शिकारीचा पर्यायच अगदी न चुकता कोणीही निवडतो."
"आणि तो जिंकला, तर?" रेन्सफोर्ड.
जनरलच्या चेहर्यावर हसू फाकले. "आजवर मी कधीच हरलो नाही, रेन्सफोर्ड," आणि मग घाईघाईने पुस्ती जोडली, "मी आत्मप्रौढी गातो आहे, असे वाटेल तुला; त्यांच्यापैकी बहुतेक अगदीच सामान्य कुवतीचे असतात. क्वचितच एकादा हुशार खेळाडू निपजतो. मला स्मरते, की एकदा एक जण जवळजवळ जिंकलाच होता. तेव्हा मग मला माझ्या शिकारी कुत्र्यांचा वापर करावा लागला होता. पाहायची आहेत तुला? थांब, तुला दाखवतो." जनरलने समोरची एक खिडकी उघडली. रात्रीच्या त्या काळोखात, खिडकीतून बाहेर पडणार्या प्रकाशाच्या झोतामुळे समोरच्या पठारावर अनेक विचित्र सावल्या हलताना दिसू लागल्या. खिडकीतून त्याने खाली नजर वळवल्यावर रेन्सफोर्डला किमान डझनभर तरी काळ्या तगड्या प्राण्यांचे हिरवट डोळे आपल्याकडेच पाहाताहेत असे भासले.
"जातिवंत शिकारी आहेत माझ्या या कळपातली कुत्री. रोज संध्याकाळी सातपासून त्याना मोकळे सोडले जाते, ते थेट पहाटेपर्यंत. या वेळात जर कोणी माझ्या घरात घुसण्याचा किंवा घरातून निसट्ण्याचा प्रयत्न करील, तर पश्चात्तापाशिवाय त्याच्या पदरी काहीही पडणार नाही." जनरल कोणत्याशा गाण्याची ओळ गुणगुणायला लागला.
"अरे हो, तुला मी सांगितले का? तुला माझी अगदी अलीकडच्या शिकारींमधली काही डोकी दाखवायची आहेत. चल, माझ्याबरोबर माझ्या लायब्ररीमध्ये येतोस?" जनरलने विचारले.
"जनरल झेरॉफ, मला आता अगदी बरे वाटेनासे झाले आहे. मला आता खरोखरच विश्रांतीची गरज आहे!" रेन्स्फोर्डला आता हे सगळे नकोसे झाले होते.
"अरेच्या, खरेच की काय?" जनरलने काळजीच्या स्वरात विचारले. "हो, बाकी तुला समुद्रातून पोहत येण्याने खूपच परिश्रम झाले असतील. उद्या तू निश्चितपणे, नव्या उमेदीने येशील. मग आपण एकत्र शिकार करू, काय म्हणतोस? मला एक तसेच जबरदस्त सावज मिळाले आहे..."
जनरलचे बोलणे चालू असतानाच, रेन्सफोर्ड ते वाक्य अर्धवट तोडत दरवाजाकडे वळला.
"पण आज रात्री तू माझ्याबरोबर शिकारीला येत नाहीस, हे वाईट झाले." जनरल बोलतच राहिला. "एक खूप मोठा आणि ताकदवान गडी आहे आज. हुशारही वाटतोय. चांगली शिकार झाली असती बघ...? अरे! अगदी निघालासच? बरे तर, रेन्सफोर्ड, गुड नाईट! चांगली विश्रांती घे."
झोपण्याचा, पलंग, त्यावरची चादर, नाईट गाऊन हे सर्व छानच होते. अंगावरचा पायजमा मऊ सिल्कचा होता. आणि रेन्सफोर्ड नसानसांतून थकला होता. पण डोळ्यांवर झोप आलेली असूनही, त्याचा मेंदू मात्र स्वस्थ नव्हता. पलंगावर आडवा झाला खरा, पण त्याचे डोळे सताड उघडे होते, आणि कान सावध. कुणाची तरी चोरटी पावले वाजल्याचा भास त्याला झाला, तत्क्षणी तो उडी मारून उभा राहिला. त्याने दार ढकलून उघडायचा निष्फळ प्रयत्न केला. तेव्हा मग पलंगावर चढून, उंचावर असलेल्या एका खिडकीतून बाहेर डोकावताना चंद्राच्या मंद प्रकाशात त्याला दिसले की त्याची खोली गढीच्या एका मनोर्यामध्ये आहे; गढीचे दिवे बंद झाले आहेत आणि बाहेर सर्वत्र सगळे शांत झाले आहे; चंद्राचा पिवळट हलकासा प्रकाश गढीच्या चौकात पसरला आहे आणि त्यात कसल्याशा काळ्या आकृत्या फिरत आहेत; आणि त्याची चाहूल लागून ते हिरवे डोळे अचानक त्याच्याकडे वळले... ‘म्हणजे, त्या कुत्र्यांच्याच त्या आकृत्या होत्या तर’, तो पुटपुटला, आणि परत खाली उतरून पलंगावर आडवा झाला. पहाटेच्या सुमाराला त्याचा जरा डोळा लागला आणि तेव्हाच, दूर जंगलामध्ये कुठेतरी पिस्तुलाचा बार काढल्याच्या आवाजाने तो सावध झाला.
जनरल झेरॉफ दुसर्या दिवशी अवतरला तो थेट दुपारीच. लोकरीपासून बनवलेला त्याचा पोषाख एकाद्या जमीनदारासारखा होता. त्याने अगत्याने रेन्सफोर्डच्या तब्येतीची विचारपूस केली.
"माझ्यापुरते सांगायचे, तर" जनरल बोलत होता, "काल रात्रीच्या शिकारीबद्दल माझ्या अपेक्षा बहुतेक फार जास्त उंचावल्या होत्या. अगदीच अपेक्षाभंग झाला माझा. मला तर माझा तीच जुनी डोकेदुखी पुन्हा सुरू होणार, असे वाटले. अरे, या प्राण्याने आपले डोके मुळी वापरलेच नाही. तो आपला सरळसोट रस्त्यानेच निघाला आणि त्यामुळे त्याचा माग असा काढावा लागलाच नाही. या खलाशांची हीच मोठी अडचण आहे बुवा. एक तर त्यांच्याकडे अक्कल कमी, आणि त्यातून जंगलात कसे वावरावे, हेही त्यांना कळत नाही. हे सगळे अतिशय तापदायक झाले आहे."
"जनरल, मला तुझ्या या बेटावरून लगेच निघायचे आहे." रेन्सफोर्डने निर्वाणीच्या सुरात म्हटले.
जनरलने आपल्या घनदाट भुवया उंचवल्या. रेन्सफोर्डच्या या बोलण्याचे त्याला वाईट वाटले असावे.
"अरे मित्रा," त्याला आपला विरोध पुन्हा दर्शवत तो म्हणाला, "पण तू तर आत्ता कुठे माझ्याकडे आला आहेस; अजून शिकारीचे तर नावही नाही..."
"मला आजच्या आज जायचे आहे." त्याला मध्येच तोडत रेन्सफोर्ड म्हणाला. त्याच्यावर खिळलेले जनरलचे डोळे त्याला निरखत, त्याचा अंदाज घेत असलेले त्याला जाणवले; त्याचा चेहरा एकदम उजळला, आणि तो म्हणाला, "चल, आज रात्री आपण शिकार करू – तू आणि मी."
पण रेन्सफोर्ड आपल्या निर्णयावर ठाम होता. "नाही जनरल, मी ही शिकार करणार नाही." त्याने जाहीर केले.
अखेर खांदे उडवत जनरलने आपले जाळे पसरले, "ठीक आहे, जशी तुझी इच्छा, मित्रा," तो म्हणाला, "कोणता पर्याय निवडायचा याचा निर्णय अखेर तुला करायचा आहे. पण मला सांग की आयव्हानशी खेळण्यापेक्षा माझी शिकारीची संकल्पना अधिक मनोरंजक नाही का वाटत तुला?"
"याचा अर्थ तू...?" रेन्सफोर्डला जनरलची ही जीवघेणी चाल लक्षात येऊन तो ओरडलाच!
"अरे मित्रा," जनरल थंडपणे म्हणाला, "मी तुला सांगितले नाही का, की शिकारीच्या विषयावर मी फार गंभीर आहे. मी जे जे तुझ्याशी बोललो, ते ते सगळे अगदी विचारपूर्वकच बोललो. शिकार ही माझ्यासाठी फार मोठी प्रेरणादायी गोष्ट आहे." जनरलने एका हातात ग्लास उंचावत म्हटले, "अखेर माझ्याशी तुल्यबळ अशा युद्धातल्या प्रतिस्पर्ध्याला मी आव्हान देतो!"
पण रेन्सफोर्ड उसासे टाकत त्याच्याकडे नुसताच अवाक होऊन बघत राहिला. जनरलने त्याच्यासाठी कोणतीच पळवाट शिल्लक ठेवली नव्ह्ती.
पुन्हा उत्साहाने जनरलने बोलायला सुरुवात केली, "तुला या शिकारीत खेळण्याचे खरे समाधान मिळेल. तुझ्या डोक्याविरुद्ध माझे डोके, तुझ्या अनुभव आणि निपुणतेविरुद्ध माझे अनुभव व नैपुण्य, तुझ्या क्षमतेविरुद्ध माझी, आणि हे सगळे विनामोबदलाही नाही, नाही का?"
"आणि मी जिंकलो तर...?" रेन्सफोर्ड अस्फुटपणे म्हणाला.
"जर मी तुला तिसर्या दिवसाअखेरीस मध्यरात्रीपर्यंत शोधू शकलो नाही, तर मी माझा पराभव आनंदाने मान्य करीन." जनरल उत्तरला. "माझ्याकडच्या युद्धनौकेतून मी तुला या बेटावरून पार करून, इथल्या राज्याच्या मुख्य शहरात पोहोचवीन. माझा शब्द मी पूर्ण खिलाडू वृत्तीने आणि सभ्यपणाने विनाअट पाळीन. अर्थात तूही इथे घडलेल्या गोष्टींची कुठीही वाच्यता न करण्याचे वचन मला दिले पाहिजेस."
"असली कोणतीही अट मी मान्य करणार नाही." रेन्सफोर्ड.
"ओहो, तसे असेल तर मग...! पण ती सगळी चर्चा आत्ताच कशाला?" असे म्हणत जनरल आपल्या विषयाकडे पुन्हा वळला. "आयव्हान तुला तुझे शिकारीचे कपडे, पुरेसे अन्न पाणी आणि शिकारीसाठी उपयुक्त एक मोठा सुरा देईल. मी तर म्हणेन की तू त्या हरणाच्या कातड्याच्या जाळीदार मोजड्या वापर. त्यांचा माग घेणे खूप कठीण जाते. आग्नेयेकडे दलदलीचा प्रदेश आहे, तो शक्यतो तू टाळावास असे मी म्हणेन. आम्ही त्या भागाला ‘मरणाची खाई’ म्हणतो. तिथली भुसभुशीत माती एखादे मोठे जनावरही गिळून टाकते. एकदा माझे एक सावज तिथे लपायला गेले. त्यात त्याचे आणखी दुर्दैव असे की माझ्या शिकारी कुत्र्यांपैकी लॅझॅरस हा सर्वोत्तम कुत्रा त्याच्या मागावर होता.
बरे पण, हे सर्व असो. जेवणानंतर नेहमी मी वामकुक्षी घेतो. तुला मात्र विश्रांतीला फारसा वेळ मिळणार नाही. तुला आता निघायला हवे. सूर्यास्तापर्यंत मी तुझ्या शोधात बाहेर नाही पडणार. रात्री शिकार करण्यात वेगळीच मजा आहे, नाही? चल तर मग, रेन्सफोर्ड!" असे म्हणून जनरल झेरॉफने राजेशाही थाटात वाकून त्याचा निरोप घेतला आणि त्या खोलीतून बाहेर पडला. दुसर्या दरवाजातून आयव्हान आत शिरला. रेन्सफोर्डने बघितले की त्याच्या एका हातात होते शिकारीचे खाकी कपडे, अन्नपाण्याने भरलेली एक हॅवरसॅक, लांब पात्याचा चामडी कातड्यात म्यान केलेला सुरा, आणि त्याच वेळी दुसरा हात त्याच्या कमरेला डकवलेल्या चामडी पट्ट्यातल्या रिव्हॉल्वरवर घट्ट पकड ठेवून होता!
गेले दोन एक तास जंगलाच्या दाट झाडीतून भराभर चालत रेन्सफोर्ड मार्गक्रमण करत होता. 'शांत राहा, आता डगमगायचे नाही' असे स्वतःशीच पुटपुटत, स्वतःवर संयम राखत पुढे पुढे चालला होता.
गढीचे दरवाजे त्याच्यामागे बंद झाल्यापासून आतापर्यंत, नेमके काय करायचे याचा त्याने फारसा विचार केला नव्हता. सर्वप्रथम जनरल झेरॉफपासून दूरवर कुठेतरी जायचे, इतकेच मनाशी धरून अतिशय अधिरपणाने तो धावत होता. आता मात्र त्याने स्वतःवर ताबा मिळवत, संयमाने प्राप्त परिस्थितीचा आढावा घ्यायचे ठरवले.
असेच मुख्य रस्त्याने सरळ रेषेत चालत राहणे काही उपयोगाचे नव्हते. इथून पुढे तर ही वाट सरळ समुद्राच्या दिशेने जात होती. "त्याला चकवण्यासाठी मी मुद्दाम काही भूलभुलैया निर्माण करून ठेवतो" असे मनात म्हणत तो जंगलाच्या जाळीत शिरला. आता इथून आपणच आपला रस्ता काढायचा होता. एकामागून एक अनेक गुंतागुंतीची वळणे घेत, पुन्हा पुन्हा मूळच्याच ठिकाणी येऊन पोहोचत त्याने असा व्यूह रचला, की माग काढणार्याचा गोंधळ उडावा. पूर्वी केलेल्या कोल्ह्यांच्या शिकारी त्याला आठवल्या; त्यांच्यासाठी रचलेले सापळे, चकवे, असे सगळे आठवले. मनातल्या मनात तो त्या गोष्टी घोळवत होता. रात्र होता होता त्याचे पाय जड झाले. त्या पठारावरच्या घनगर्द झाडी-झुडपांतून मार्ग काढताना हातातोंडावर त्यांच्या फांद्यांचा सतत मार बसून तो बेजार झाला. जवळच जाडजूड खोडाचा एक प्रचंड वृक्ष होता. त्याच्या फांद्या मोठ्या विस्तृत आणि दाट होत्या. अतिशय हलक्या पावलांनी, कोणताही मागमूस न ठेवता, तो त्या उंच झाडावर चढून गेला. वरती एका ढोलीमध्ये जाऊन त्याने हातपाय ताणले. विश्रांतीमुळे, आतापर्यंत प्रचंड दडपणाखाली असलेले त्याचे चित्त जरा स्वस्थ झाले. जनरल झेरॉफ कितीही कसलेला शिकारी असला, तरी इथपर्यंत पोहोचू शकणार नव्हता. रात्रीच्या त्या गर्द काळोखात एखादे पिशाच्च सोडले, तर दुसर्या कोणालाही ते शक्य होणार नव्हते.
पहाटेच्या सुमारास अंधार विरळ होऊ लागला, तशी अचानक कुणा पक्ष्याच्या अस्वस्थ ओरडण्याने रेन्सफोर्ड सावध झाला. रेन्सफोर्ड ज्या आडवळणाने इथपर्यंत येऊन पोहोचला, त्याच रस्त्याने माग काढत काहीतरी पुढे सरकत होते. तो त्या फांदीवर पूर्ण आडवा झाला, आणि झाडाच्या पानांच्या घनदाट पडद्याआडून पाहू लागला. येणारी आकृती कोणा मनुष्यप्राण्याची होती.
तो जनरल झेरॉफच होता. एकाग्र चित्ताने, जमिनीचे बारकाईने निरीक्षण करीत तो अखेर रेन्स्फोर्ड बसलेल्या झाडापाशी येऊन पोहोचलासुद्धा! तिथे गुडघ्यांवर बसून तिथल्या जमिनीवर उमटलेल्या खुणा, ठसे शोधू लागला. इकडे रेन्सफोर्डला वाटले की एकाद्या चित्त्यासारखी उडी मारून खाली जावे आणि त्याच्याशी भिडावे. पण त्याने पाहिले की जनरलच्या हातात काहीतरी धातूचे शस्त्र चमकत आहे – ते एक लहान स्वयंचलित पिस्तूल होते. तेव्हा त्याने खाली उतरण्याचा विचार डोक्यातून झटकून टाकला.
वारंवार डोके हलवत, इकडे तिकडे मागोवा घेत, जनरल तिथे घोटाळत राहिला. रेन्सफोर्डच्या अपेक्षेप्रमाणे तो शिकारी चक्रावला होता. शेवटी तो पुन्हा ताठ उभा राहिला, आपल्या सिगारेटच्या डबीतून एक सिगारेट काढून शिलगावली; तिचा उग्र दर्प रेन्सफोर्डच्या नाकातोंडात शिरला. रेन्सफोर्डला ही युक्ती नवीन नव्हती. त्याने आपला श्वास रोखून धरला. जनरलने जमिनीवरून आपली नजर काढून आता एक एक इंच झाडावर चढवत न्यायला सुरुवात केली. ज्याअर्थी जमिनीवर काहीच खुणा नाहीत, त्याअर्थी सावज झाडावर गेले असेल, त्याच्या काही खुणा त्याची तीक्ष्ण नजर शोधत होती. रेन्सफोर्ड जागच्या जागी थिजला. केव्हाही उडी मारण्याच्या बेताने त्याच्या शरीराचा एक एक स्नायू तयारीत होता. पण तो बसल्या जागेपर्यंत नजर पोहोचण्याआधीच जनरलच्या चेहर्यावर हास्य विलसले. जाणूनबुजून त्याने सिगारेटच्या धुराची लांब वलये पुन्हा एकदा आकाशात सोडली आणि नवल म्हणजे आता पाठ फिरवून तो आला त्याच मार्गाने माघारी चालू लागला. मार्गातल्या झुडपांवर आपटत जाणारा त्याच्या बुटांचा नाद त्याच्या मागोमाग विरत गेला.
रेन्सफोर्डच्या नाकातून कोंडलेला गरम गरम श्वास आता बाहेर फुटला. तो थक्क झाला होता. इतक्या काळोख्या रात्रीसुद्धा जनरलने त्याचा माग काढला होता, त्याला इतका कठीण भासणारा व्यूह सहजी भेदला होता. अगदी थोडक्याने त्या कोसॅकला त्याचे सावज गवसले नव्हते.
रेन्सफोर्डच्या मनात आलेला दुसरा विचार मात्र अधिक भयावह होता. त्याला जनरलचे ते हसू आठवले. आपल्यापर्यंत पोहोचता तर नाही आले त्याला. मग हसला का असेल तो? आणि मग सगळे प्रयत्न थांबवून, तिथून तो माघारी का फिरला? रेन्सफोर्डने आताच्या घटनाक्रमाचा क्रमशः पुन्हा पुन्हा विचार करून त्यांची तर्कसंगतपणे कारणे जुळवली, त्यातून त्याचा अधिकच गोंधळ उडाला. त्याला खातरीने वाटू लागले की जनरल आपल्या जिवाशी खेळ खेळतो आहे. बहुतेक दुसर्या दिवसाच्या खेळासाठी रेन्सफोर्डला त्याने राखून ठेवले होते! कोसॅक त्याच्याशी उंदीर-मांजराचा खेळ खेळत होता तर. रेन्सफोर्डला आता खर्या धोक्याचा अंदाज येऊ लागला होता.
‘आत्ता धीर सोडून चालणार नाही, मोठ्ठा श्वास घे, धीर धर!’ त्याने स्वतःला बजावले.
झाडावरून झरझर खाली उतरून तो पुन्हा खोल जंगलात निघाला. एकाग्र चित्त करून त्याने आपले मन आणि शरीर कामाला जुंपले. आता काहीतरी वेगळा विचार करायला हवा होता. त्याच्या मघाचच्या झाडापासून साधारण तीनशे यार्डावर तो आला असेल. इथे एक जुने वठलेले झाड दुसर्या लहान झाडावर आडवे झाले होते. जरासाही धक्का लागला तर अंगावर येईल असे धोकादायकपणे ते रेलले होते. त्याच्या डोक्यात विचार पक्का झाला. आपली हॅवरसॅक बाजूला टाकून, म्यानातला सुरा काढून रेन्सफोर्ड पटापट कामाला लागला.
एकदाचे काम आटोपले आणि तिथूनच पलीकडे सुमारे शंभर फुटांवर पडलेल्या ओंडक्यामागे धावतच जाऊन तो दडून बसला. त्याचा अंदाज बरोबर होता. फार वेळ त्याला वाट पाहावी लागली नाही. उंदराला खेळवायला मांजर फिरून येत होते!
रेन्स्फोर्डच्या मागावर एकाद्या रक्तपिपासू हिंस्र श्वापदाप्रमाणे जनरल झेरॉफ निघाला होता. त्याच्या त्या शोधक नजरेतून काहीही सुटत नव्हते – एकादे दबलेले गवताचे पाते, मोडलेली फांदी, वाकलेले झुडूप, जमिनीवरील हिरवळीवर उमटलेली किंचितशीही खूण – काहीही. एकेक पाऊलसुद्धा तो अगदी मोजून मापून टाकत होता. जमिनीच्या परीक्षणात तो इतका गर्क होता, की रेन्सफोर्डचा आताचा सापळा त्याच्या दृष्टीत येण्याआधीच तो त्या जागेवर येऊन ठेपला. त्या सापळ्याचा, स्प्रिंगसारखे काम करणारा फांदीचा बाहेर आलेला भाग त्याच्या पायात आला. जनरलला तो स्पर्श जाणवताक्षणी भयानक धोक्याचा अंदाज आला आणि तो एकाद्या माकडासारखा उडी मारून चपळाईने बाजूला झाला. पण ते दुसर्या झाडाच्या आधाराने रेललेले झाड त्याला निसटता मार देऊनच जमिनीवर कोसळले. खांद्याला चांगलीच जखम झाली. त्याचा तोल गेला, पण खाली न पडता हातातल्या पिस्तुलावरची पकड घट्ट करीत एका हाताने आपला दुखावलेला जखमी खांदा चोळत त्याने स्वतःला सावरले आणि पाठोपाठच जसे त्याचे छद्मी हसू तिथे जंगलात फाकले, तसे रेन्सफोर्डच्या पोटात पुन्हा एकदा भीतीचा गोळा उठला.
"रेन्सफोर्ड," जनरल ओरडून म्हणाला, "तू इथेच जवळपास असशील याची मला खातरी आहे. तुझे हार्दिक अभिनंदन! तू रचलेला मलाय जमातीचा, माणसाला जेरबंद करण्याचा सापळा फार कमी लोकांना माहीत असतो. माझ्यापुरते म्हणशील, तर मीही मलक्कामध्ये शिकारी केलेल्या आहेत, त्यामुळे मला हा नवीन नाही. तुझ्याबरोबर शिकारीचा हा खेळ खरोखरच मजेदार होत चालला आहे. तशी ही सुदैवाने लहानशीच जखम मला झाली आहे. मलमपट्टी करून मी माघारी येतोच आहे, तुला फार वेळ वाट पाहावी लागणार नाही!"
आपला जखमी खांदा कुरवाळत जनरल तिथून नाहीसा झाल्याबरोबर रेन्सफोर्डने पुन्हा जंगलात कूच केले. आता मात्र अटीतटीचा प्रसंग होता. कसोटीचा क्षण - कदाचित अपयशाची चाहूल देणारा? सूर्यास्त झाल्यावरही तो तसाच पुढे पुढे रेटत राहिला. त्याच्या त्या जाळीच्या पातळ मोजड्यांमधून पायाखालची जमीन आता अधिकाधिक मृदू लागत होती. जमिनीवरची पाणवनस्पती, शेवाळे जास्त जास्त घनदाट वाटू लागले होते. कृमीकीटकांचे डंखही पायांना जास्तच जाणवू लागले होते. त्याने एक पाऊल आणखी पुढे घातले आणि त्याचा पाय अलगद चिखलात रुतायला लागला. त्याने ओळखले आपण कुठे आलो आहोत ते. हीच ती मृत्यूची खाई, माणसालाही बघताबघता गिळंकृत करणारा जनरलने सांगितलेला हाच तो भुसभुशीत वाळूचा परिसर! त्याने पाय मागे ओढून घ्यायचा प्रयत्न चालवला, पण तिथल्या दलदलीत तो आणखीनच आत खेचला जाऊ लागला. तेव्हा सर्व शक्तीनिशी आपला पाय त्याने त्या मातीसकट अक्षरशः उपटून बाहेर काढला. भुसभुशीत जमीन पाहून त्याच्या मनात एक नामी शक्कल सुचली. तिथून बारा-पंधरा फूट मागे सरून, त्याने हातानेच भराभर माणसाच्या उंचीचा एक खोल खड्डा खोदायला सुरुवात केली. खड्ड्यात खांद्यापर्यंत आत गेल्यावर, त्यातून वर चढून तो बाहेर आला. आता आसपासच्या झाडांच्या वाळक्या कठीण फांदोर्या छाटून घेऊन त्याने त्या चांगल्या टोकदार होईपर्यंत तासल्या. हे तासलेले खुंट त्यांची धारदार टोके वरच्या बाजूला घेऊन त्याने खड्ड्याच्या तळाशी भक्कम रोवले. हातासरशी धावती वीण घालून, गवता-काटक्यांची एक हलकी चादर त्या खड्ड्याच्या तोंडावर अशा बेताने अंथरली की खाली खड्डा असेल असे सहज चालणार्याच्या लक्षातही येऊ नये. वीज पडून जळलेले एक झाड जवळच होते. कामाच्या परिश्रमाने दमून भागून, घामाने निथळत त्याच्या बुंध्याआड ओणवा लपला.
रात्रीच्या गार वार्याच्या झोताबरोबर त्याला जनरलच्या सिगारेटच्या धुराचा वास आला, तशी शत्रू पाठलाग करत येतो आहे, हे त्याने जाणले. त्या मऊशार जमिनीवर पडणारे पावलांचे पडसाद आता अगदी जवळ आले. काय होते आहे हे पाहण्याची उत्सुकता त्याला लागली होती. तो इतका अधीर झाला होता की तेवढ्या थोड्या अवधीत जणू एक वर्ष उलटून गेल्यासारखे त्याला वाटले.
आणि पुढच्याच क्षणी तो कमालीचा सुखावला. खड्ड्यावर त्याने पसरलेल्या जाळ्यावर कोणीतरी धडपडून त्या काटक्या-फांद्या मोडल्याचा स्पष्ट आवाज त्याला आला. खाली लपलेल्या धारदार खुंटांचे भाले लक्ष्य छेदून गेले होते आणि पाठोपाठ एक खोल किंकाळी फुटली. रेन्सफोर्ड आनंदातिशयाने उडी मारून उभा राहिला आणि परत तसाच मागे होऊन मोठ्या उत्सुकतेने झाडाआडून पाहू लागला. खड्ड्यापासून तीनच फुटावर त्याला एक व्यक्ती इलेक्ट्रिक विजेरी घेऊन उभी होती.
"कमाल केलीस तू, रेन्सफोर्ड!" त्याला जनरलचा आवाज ऐकू आला. "तुझ्या या बर्मीज वाघांच्या सापळ्याने माझ्या सर्वोत्तम श्वानाचा बळी घेतला आहे. पुन्हा एकदा तुझी सरशी झाली आणि त्यासाठी तुझे अभिनंदन. परत घरी जाऊन मी आता थोडी विश्रांती घेतो; पण या रोमांचक खेळाबद्दल तुझे आभार! माझ्या कुत्र्यांच्या संपूर्ण कळपापासून तू कसा बचाव करतोस हे आता पाहायची मला इच्छा आहे."
पहाटेच रेन्सफोर्ड जागा झाला तोच कुत्र्यांच्या कळपाच्या हाकट्यांनी! त्या आवाजाने खरे तर तो अंतर्बाह्य थरारला. नवीनच भीतीची त्याला जाणीव झाली. क्षणभरच तो विचारात पडला. एक विलक्षण प्रयोग त्याच्या मनात तरळून गेला. कमरेचा पट्टा घट्ट करून त्याने दलदलीच्या दिशेने कूच केले.
भुंकण्याचे आवाज आता अधिकाधिक जवळ जवळ येत चालले. या नवीन आक्रमणाची चाहूल घेण्यासाठी एका टेकाडावर, एका मोठ्या वृक्षावर चढला. जवळून जाणार्या पाण्याच्या ओढ्याच्या दिशेने साधारण पाव-एक मैलावर त्याला तिथल्या झाडा-वेलींमध्ये हालचाल दिसली. नीट निरीक्षण करताना त्याला जनरल झेरॉफची कृश आकृती दिसली. त्याच्या जरासाच पुढे आणखी एक आकृती – त्याने ओळखले, हा तो राक्षस आयव्हान! दहा कुत्र्यांचे गळपट्टे हातात धरून मालकाच्या इशार्यावर तो आगेकूच करीत होता.
‘ते आता कुठल्याही क्षणी पोहोचतील.’ त्याचे मन वेगाने काम करू लागले. युगांडामध्ये तो एक गावठी यांत्रिक सापळा बनवायला शिकला होता. त्याचा इथे वापर करायचा ठरवून तो पुन्हा कामाला जुंपला. एक कणखर, बारीक, गोलाकार वाकेल अशी झाडाची फांदी त्याने निवडली. तिच्या एका टोकाला त्याने त्याच्याकडचा तो लांब शिकारी सुरा बांधला. सुर्याचे पाते माग काढत येणार्या श्वापदांच्या दिशेने खाली लपवले. आता वाटेतल्या जाळीदार वेलींना स्प्रिंगप्रमाणे ती फांदी वळवून बांधली आणि आता तो जिवाच्या आकांताने पळत सुटला.
त्याच्या पळण्याची ही नवीन चाहूल लागली, त्याबरोबर त्या कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाजही वाढला. श्वास घेण्यासाठी तो क्षणभर थांबला. उतावीळपणे कुत्री त्याच्या मागावर झेपावली आणि अचानक त्यांचा कोलाहल शांत झाला, त्याबरोबर रेन्सफोर्डच्या काळजाचे ठोकेही थांबले. ‘सुर्यापाशी पोहोचली असणार ती गँग...’ तो मनात म्हणाला.
मोठ्या उत्सुकतेने तो झरझर जवळच्या झाडावर चढला आणि त्याने मागे वळून पाहिले. पण त्याची आशा क्षणभर मावळली ती, खाली त्या दरीमध्ये जनरल झेरॉफला उभा पाहून. पण आयव्हान मात्र दिसत नव्हता तिथे. याचा अर्थ युगांडातली ही युक्तीही अगदीच विफल झाली नव्हती तर!
रेन्सफोर्ड झाडावरून उतरून जरा कुठे स्थिरावतोय, तितक्यात ती कुत्री पुन्हा कार्यरत झाली.
‘शांत राहा, शांत राहा’ असे स्वतःलाच समजावत तो झपाट्याने पुढे निघाला. समोरच्या घनदाट वृक्षांच्या राईमधोमध त्याला समुद्राच्या निळ्या पाण्याचा एक पट्टा दिसला. त्या दिशेने तो तसाच पुढे झेपावला, तशी त्याच्या लक्षात आले की किनारपट्टीचा एक भाग इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. समोरच्या दरीतून पलीकडे त्याला जनरलच्या गढीची इमारत दिसत होती. वीस फूट खाली त्याला खळाळते समुद्राचे पाणी दिसत होते आणि मागे रक्तपिपासू कुत्र्यांचे भुंकणे. आता तो कळप त्याच्यापासून फार दूर नव्हता. विचार करायलाही आता वेळ नव्हता. हो-नाही करता करता त्याने बेधडक समुद्राच्या पाण्यात लांबवर सूर मारला.
त्याच्या मागोमागच जनरल त्याच्या कुत्र्यांच्या कळपाला घेऊन रेन्सफोर्डचा माग काढत त्या किनारपट्टीवर पोहोचला. तिथला देखावा पाहून तो दिङ्मूड झाला. समुद्राच्या निळ्या-हिरव्या पाण्यावर नजर खिळवून अंदाज घेत राहिला आणि अखेर खांदे उडवून तो खाली बसला. खिशातून एका चांदीची बाटली काढून त्यातल्या ब्रँडीचा आस्वाद घेत, काही काळ ‘मॅडम बटरफ्लाय’ गाण्याच्या ओळी गुणगुणत बसला.
रात्री जनरल झेरॉफ त्याच्या त्या प्रशस्त डायनिंग हॉलमध्ये आला. अतिशय रुचकर जेवण अगदी समाधानाने आणि भरपेट जेवला. मात्र, दोन गोष्टींची त्याला रुखरुख लागून राहिली होती. एक तर आयव्हानचे मोठे प्यादे त्याने गमावले होते, त्याला पर्यायी योजना करणे मुश्किलीचे होते. दुसरे, आणि मुख्य म्हणजे आज त्याला त्याच्या सावजाने अनपेक्षितपणे चकवले होते. यापूर्वी असे कधी झाले नव्हते. तेही सलग दोन दिवसांच्या अथक परिश्रमांनंतर. त्याच्या लायब्ररीमध्ये तो मार्कस ऑरेलिअसची काही पुस्तके चाळत बसला. दहाच्या सुमारास तो आपल्या बेडरूमकडे वळला. स्वतःशीच म्हणाला, ‘आज मी अगदी मस्त थकलो आहे’ आणि त्याने खोलीचा दरवाजा आपल्यामागे बंद केला. चंद्राच्या मंद प्रकाशात खिडकीतून आपल्या प्रिय शिकारी कुत्र्यांच्या कळपाकडे नजर टाकत त्याना उद्देशून म्हणाला, "माझ्या दोस्तांनो, चिंता नाही, पुढच्या वेळी यश आपलेच आहे!" आणि त्याने मागे वळून आपल्या खोलीचा दिवा लावला.
त्याच्या पलंगालगतच्या पडद्यामागे उभ्या असलेल्या एका माणसाची त्याला चाहूल लागली.
"रेन्सफोर्ड!" जनरल चित्कारला. "विश्वास बसत नाही माझा! मला सांग, तू इथे कसा काय येऊन पोहोचलास?"
"पोहत!" रेन्सफोर्ड उत्तरला, "जंगलातून चालत येण्यापेक्षा समुद्रातून पोहत लवकर येता येईल असे मला वाटले."
जनरलने दीर्घ श्वास घेतला आणि बळेबळेच हसत म्हणाला, "तुझे हार्दिक अभिनंदन! तू खेळ जिंकला आहेस!"
रेन्सफोर्ड मात्र हसला नाही. "मी अद्यापही, हुलकावणी दिलेले, शिकारीतले ते सावज आहे," तो घोगर्या स्वरात म्हणाला, "जनरल झेरॉफ, शिकारीला तयार हो!"
कमरेत झुकून जनरलने रेन्सफोर्डला अगदी मनापासून दाद दिली. "असे आहे तर?" तो म्हणाला, "लाजवाब! आपल्यापैकी एकाला या श्वापदांच्या तोंडी जायचे आहे, आणि मागे उरेल, तो या आरामदायी पलंगावर झोपेल. हुश्शा..र, रेन्सफोर्ड...."
"यापेक्षा अधिक सुखदायक पलंगावर मी यापूर्वी कधीच झोपलो नव्हतो." रेन्सफोर्डने निश्चयाने ठरवले की या
शेवटच्या रात्रीही विजयी मीच होणार!
प्रतिक्रिया
29 Oct 2016 - 7:18 pm | हेमंत लाटकर
मस्त
31 Oct 2016 - 3:21 pm | Ujjwal
The man with the golden gun chi athavan zali..
31 Oct 2016 - 4:28 pm | भम्पक
एकदम रोमांचक .....
1 Nov 2016 - 8:27 am | चांदणे संदीप
आवडली!
Sandy
1 Nov 2016 - 11:54 am | चांदणे संदीप
ज्यांना या कथेवर बनलेला चित्रपट पाहायचा असेल अशांसाठी, १९३२ ला या कथेवर बनलेल्या हॉलिवूडपटाची ही लिंक!
भाग १ - https://archive.org/details/Countgore-TheMostDangerousGamePart1483
भाग २ - https://archive.org/details/Countgore-TheMostDangerousGamePart2767
Sandy
2 Nov 2016 - 2:32 pm | शशिधर केळकर
वा सँडी,
ही नवीन माहिती फारच चांगली आहे. मी निश्चितच पाहीन.
2 Nov 2016 - 3:39 pm | चांदणे संदीप
जितक अप्रतिम मूळ इंग्रजीत आणि तुमच्या अनुवादात लिहिलं गेल आहे तितक प्रभावी त्या चित्रपटाला करण्यात अपयश आलेल आहे. शिवाय चित्रपटाला बॉलिवूडछाप विंटरेस्टींग करण्यात मूळ कथेला बरीच उसवण आणि शिवण झेलावी लागलेली आहे.
तरीही अभिनयासाठी एकदा पाहायला हरकत नाही! :)
Sandy
1 Nov 2016 - 2:51 pm | पिंगू
रोमांचकारी कथा आहे..
1 Nov 2016 - 3:24 pm | माझीही शॅम्पेन
अप्रतिम __/।\__
1 Nov 2016 - 3:53 pm | नाखु
अगदी नवल मधल्या बाळ फोंडके आणि लालु दुर्वे स्टाईलची
2 Nov 2016 - 2:35 pm | शशिधर केळकर
खरेतर हा माझा अनुवादाचा पहिलाच अनुभव आहे. त्यामुळे मनात शंकाच होती.
3 Nov 2016 - 4:21 pm | बबन ताम्बे
सुंदर अनुवाद. वाचताना खिळवून ठेवले.
3 Nov 2016 - 5:49 pm | ऋषिकेश
कथा छान आहे पण हा अनुवाद संक्षिप्त व्हर्जनचा आहे का मुळ कथाही इतकीच आहे?
मूळ कथा कुठे वाचायला मिळेल?
3 Nov 2016 - 7:12 pm | शशिधर केळकर
अनुवाद संक्षिप्त कथेचा नाही. मूळ कथाही इतकीच आहे ; माझ्याकडच्या पुस्तकात सुरुवातीचे काही संवाद नाहीत.
मूळ कथा इथे मिळेल. http://fiction.eserver.org/short/the_most_dangerous_game.html/document_view
धन्यवाद!
3 Nov 2016 - 9:23 pm | सही रे सई
मस्त जमलाय अनुवाद.. खूप दिवसांनी अशी थरारक अनुवादित कथा वाचली.. अजून असेच अनुवाद येऊ देत मिपा वर
4 Nov 2016 - 10:20 am | शशिधर केळकर
धन्यवाद! मिपावर अनुवादित कथा चालतात की नाही, ते माहीत नाही.
मला वाटले, की दिवाळी अंकासाठी, आणि त्यातही रहस्यकथा विशेषांकासाठी अनुवाद चालेल, असे असावे.
4 Nov 2016 - 4:02 pm | बापू नारू
एकदम खतरनाक...
6 Nov 2016 - 3:27 pm | पैसा
सुरेख अनुवाद! फक्त शेवट वाचकावर सोडून दिला आहे का?
7 Nov 2016 - 7:42 pm | शशिधर केळकर
अनुवादित कथा आहे; त्यामुळे मूळ कथेप्रमाणे शेवट राखला आहे.
पण प्रश्न छान आहे; काही थोड्या मित्रांनीच विचारला.
मला स्वत:ला हा शेवट आवडला. वाचकाने ठरवायचे - ताडायचे, शेवट काय असणार ते.
दोन रात्री आपले वर्चस्व रेन्सफोर्डने जवळपास सिद्ध केले आहे. त्याने एक नाही, दोन प्यादी मारली आहेत.
स्पर्धा अटीतटीची आहे. कौशल्याची आहे, आणि काही अंशी तत्वाचीही आहे. तरीही, होय, शेवट ज्याने त्याने आपल्या मतिने ठरवायचा हेच खरे.
1 Dec 2016 - 4:27 pm | मद्रकन्या
शेवट खरंच सुरेख आहे. उगा आपला हिरो जिंकलाय असं स्पष्ट वर्णन असतं तर कथेचा भारदस्त पणा जाऊन ती अगदीच मूळमुळीत झाली असती. इतक्या ताकदीने उभ्या केलेल्या व्हिलन कॅरॅक्टर वर खूप अन्याय झाला असता अस वाटतं.
1 Dec 2016 - 5:01 pm | चांदणे संदीप
केळकरांनी दिलेल्या लिंकेतल्या मूळ कथेतल्या शेवटच्या वाक्याप्रमाणे
आपला हिरोच जिंकलाय की ओ! :)
Sandy
7 Nov 2016 - 7:11 pm | टुकुल
लाजवाब.. काय जबरा कथा आहे.. मान गये.
8 Nov 2016 - 4:59 am | पिलीयन रायडर
जबरदस्त!
9 Nov 2016 - 8:22 am | राघव कारेमोरे
Kharch mahol katha. Anuvad khup sundar.
1 Dec 2016 - 4:20 pm | मद्रकन्या
अप्रतिम कथा! खरंतर शब्दच नाहीत वर्णन करायला. हा भन्नाट 'रानमेवा' आम्हाला देणाऱ्या मूळ लेखकाचे आणि अनुवादकाचेही मनापासून आभार… खूप सुंदर अनुवाद.