निलगिरी हिल्स ट्रेकिंग एक्सपीडीशन - भाग १
आज चौथा दिवस. आज मुकुर्थी डॅमवरून पंडियार हिल्स ला जाणार होतो. आज आम्हाला १२ किमीचा पल्ला गाठायचा होता. सगळ्यांनी आपल्या भल्या मोठ्या सॅक आपापल्या पाठीवर लादल्या आणि निघालो. आमच्यासोबत आजचा आमचा ट्रेक लीडर होता 'पुट्टुराज'. तामिळनाडूतच राहणारा पुट्टुराज शांत स्वभावाचा होता पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र नेहमी एक स्मितहास्य असे. आजचा रस्ता मस्त जंगल आणि चहाचे मळे यांमधून होता. हिरव्यागार वातावरणात चालताना थकवा अजिबात जाणवत नव्हता. मध्ये एक छोटे गाव लागले.
घनदाट जंगलात घुसताना
चहाची पाने
येथे आत निलगिरीच्या पानांपासून तेल बनवले जात होते
पंडियार हिल्स ला पोहोचता पोहोचता संध्याकाळचे ५ वाजले. पंडियार हिल्सच्या गेस्ट हाऊसवर पोहोचताच एका ७० वर्षाच्या तरुणीने सुहास्य वदनाने आमचे स्वागत केले. हो...तरुणीच म्हणावं लागेल...गोपी अम्मा...! वयाची सत्तरी गाठलेल्या गोपी अम्मा म्हणजे अजब रसायनच होत्या. गोपी अम्मांनी जवळपास शंभराच्यावर ट्रेक्स केले होते. मग बऱ्याच वेळ त्यांचे ट्रेकिंगचे अनुभव ऐकत बसलो.
पंडियार हिल्स येथील गेस्ट हाऊस
गोपी अम्मा
सूर्यास्तावेळीचा आसमंत
त्याच दिवशी आमच्या ट्रेकिंग ग्रुपमधल्या सर्वात लहान सदस्याचा वाढदिवस होता. पण साजरा कसा करायचा हा प्रश्न होताच...मग तेव्हा बिस्किटांचा केक बनवला आणि वाढदिवस साजरा केला. त्यानंतर लगेच जेवणाकडे मोर्चा वळवला. आज रात्रीच्या जेवणात मस्त 'फ्रुट सलाड' होत. जेवण झाल्यानंतर परत नेहमीसारख्या गप्पा मारत बसलो...थोड्याच वेळात आमच्या तंबूमध्ये पत्त्यांचा डाव पण सुरु झाला. पत्ते खेळता खेळता वेळेचे भानच राहिले नाही...आणि नेहमीप्रमाणेच झोपायला उशीर झाला. नीटशी अशी झोप लागलीच नाही...हे वेगळे सांगायलाच नको.
आज ट्रेकचा पाचवा दिवस. नेहमीप्रमाणेच सकाळी लवकर आवरून तयार झालो...नाश्ता अजून तयार झाला नव्हता...मग आम्ही सगळ्या जणांनी तोपर्यंत जवळच्याच एका डोंगरावर जाऊन यायचे ठरवले. निलगिरी पर्वतरांगेच्या कुशीतील परिसर अत्यंत विलोभनीय दिसत होता. पार्सन्स व्हॅली, मुकुर्थी शिखर असा विस्तीर्ण परिसर नजरेत सामावून पावले परतीच्या वाटेला लागली. परत येऊन मस्त भरपेट नाश्ता केला...आणि गोपी अम्मांचा निरोप घेऊन निघालो. आज आम्ही जाणार होतो 'पायकरा फॉल्स'ला. 'पंडियार हिल्स' पासून 'पायकरा फॉल्स' असे तब्बल १६ किमी चे अंतर चालत जाणार होतो. आजच्या प्रवासाचा सुरुवातीचा काही भाग हा डांबरी रस्त्यावरून होता...त्यामुळे थोडा कंटाळा आला, पण थोड्याच वेळात मस्त जंगलातली वाट लागली. वाटेत मध्येच एक छोटा धबधबा लागला. तिथे सर्वांनी पाणी भरून घेतले. आणि परत एक-दो, एक-दो करत प्रवास सुरु ठेवला. मध्येच एका मुलीचा पाय मुरगळल्याने तिचा चालण्याचा वेग मंदावला होता. मग आम्हीपण थोडे हळू-हळूच चालू लागलो. सपाटून भूक लागल्यामुळे जेवणासाठी विश्रांती घेण्याचा ठराव सर्वानुमते संमत केला गेला. मग मध्येच माळरानावर सगळ्यांनी बस्तान मांडले आणि जेवण आटोपले. वाटेत जागोजागी लागलेले हिरवेगार दृश्य पाहून मन प्रसन्न झाले होते.
आजचे मुक्कामाचे ठिकाण जरा जास्त दूर असल्याने कॅम्पवर पोहोचायला निर्धारित वेळेपेक्षा एक-दिड तास उशीरच झाला. आज आम्हाला तंबूपासुन सुटका मिळणार होती कारण इथे ३-४ खोल्यांमध्ये झोपण्याची व्यवस्था होती. नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून निद्राधीन झालो.
आज ट्रेकचा सहावा दिवस. तयार होऊन नाश्ता केला. सकाळी लवकरच जवळ असलेल्या पायकरा धबधब्याला भेट दिली. तिथून परत कॅम्पवर आलो. ऊटी नंतर 'पायकारा फॉल्स'ला आम्हाला थोडीफार गर्दी दिसली.
पायकारा धबधबा
बॅग्स भरून निघालो आमच्या अखेरच्या मुक्कामाकडे...मुदुमलाई. आम्ही '9th mile' पर्यंत ९ किमी चा ट्रेक करणार होतो. तर तिथून पुढे मुदुमलाई ला जीपने जाणार होतो. आजचा रस्ता हा बऱ्यापैकी जंगलातूनच होता. त्यामुळे चालायला मजा येत होती. दुपारचं जेवण झाल्यानंतर थोड्यावेळ स्पंजच्या चेंडूने व्हॉलीबॉल पण खेळून झालं. पुढे थोडे हिरवेगार गावात असलेलं भलेमोठे मैदान लागलं...जणू काही नैसर्गिक गोल्फ कोर्सचं. ३-३.३० च्या सुमारास '9th mile' ला पोहोचलो. आणि अनौपचारिकरीत्या आमचे ट्रेकिंग पूर्ण झाले. इथे शेवटचा ग्रुप फोटो काढून आमच्यातले काही जण परतीच्या वाटेल लागले. आम्ही बाकी उरलेले सर्व जीपमध्ये बसलो आणि मुदुमलाईला जायला निघालो. रस्त्यातच आम्हाला जीप सफारीचा अनुभव घेता आला. जीप सफारी दरम्यान आम्हाला रानगवा, हरीण, मोर, हत्ती, सांबर, ससे वगैरे प्राणी बघायला मिळाले.
खरं तर आम्हाला एकेठिकाणी हत्तीपूजा बघायला जायचे होते. पण आम्ही तिथे पोहोचताच कळले कि काही कारणास्तव ती पूजा रद्द करण्यात आली आहे. मग तिथून परत निघालो. रस्त्यात एका छोट्या उपहारगृहात डोसे खाल्ले आणि मुदुमलाईला आलो. इथे आमचा ट्रेक पूर्ण झाला. रात्री आम्हाला आमच्या कॅम्प लीडरकडून ट्रेक पूर्ण झाल्याचे प्रशस्तिपत्रक देण्यात आले. शाळेत असताना बरीच प्रशस्तिपत्रके मिळाली होती पण ट्रेकसाठी असे प्रशस्तिपत्रक मिळण्याची हि आमची पहिलीच वेळ होती. प्रशस्तिपत्रक पाहून काहीतरी ध्येय गाठल्याचा मनोमन आनंद होत होता. ट्रेक पूर्ण झाल्याच्या समाधानात आदल्या रात्रींपेक्षा जरा बरी झोप लागली.
सकाळी उठून सगळं सामान वगैरे आवरलं आणि परतीच्या प्रवासासाठी तयार झालो. मागच्या आठवड्याभरात झालेल्या नवीन मित्रमंडळींचा निरोप घेता घेता ट्रेकच्या निमित्ताने पुन्हा भेटण्याचे आश्वासन देण्यात आले. बॅग्स गाडीवर लादून ऊटीकडे निघालो. तासाभरातच उटीला युथ होस्टेलच्या गेस्ट हाऊसवर पोहोचलो. हातात थोडा वेळ असल्याने बाजारात थोडीफार खरेदी केली. बस स्थानकावरून कोईम्बतूरला जाणारी बस पकडली आणि आमचा परतीचा प्रवास सुरु झाला तो तामिळ गाण्यांनी. ऊटी सोडल्यापासून थंडीऐवजी गर्मी जाणवू लागली. एक वाजेच्या सुमारास कोईम्बतूरला पोहोचलो. भूक लागली असल्याने उपहारगृहात जाऊन डोशे खाल्ले व पोटातल्या कावळ्यांना शांत केले आणि रेल्वे स्थानकाकडे निघालो. तीन-साडेतीनच्या सुमारास आमची गाडी होती. पण फलाटावर आधीच गाडी लागलेली होती. मग काय लगेच आपापल्या जागांवर कब्जा केला गेला. गाडी सुटताच बदाम सातच्या उत्तरार्धाला सुरुवात झाली. खादाडी, गप्पा आणि बदाम सात यामुळे कधी पनवेल ला येऊन पोहोचलो कळलंच नाही. प्रवास संपल्याने अखेर १२४ डावांचा आमचा बदाम सातचा मॅरेथॉन खेळ समाप्त झाला. मला पुण्याला जायचे असल्याने मी पनवेलला उतरलो तर बाकीचे मित्र पुढे ठाण्याला गेले. पुण्याला जाणारी बस पकडली. घरी पोहोचल्यावर आठवड्याभरानंतर मनसोक्त आंघोळ केली.
बदाम सात निकाल :) (मी दुसऱ्या क्रमांकावर)
तर असा हा निलगिरी ट्रेक नवीन मित्र-मैत्रिणी, स्मरणीय अनुभव, पुढील ट्रेकसाठी नवी उमेद आणि आणखी बरंच काही देऊन गेला. आजही त्या ट्रेकमधली मंडळी कस्काय समूहाच्या माध्यमाने जोडली गेली आहेत. कोण कुठे ट्रेकला जाणार आहे, अथवा जाऊन आले त्याची माहिती आणि फोटो वेळोवेळी येतच असतात.
(समाप्त)
प्रतिक्रिया
30 Nov 2016 - 1:08 pm | बरखा
छान माहीती, पण काही फोटो दिसत नाहित :(
30 Nov 2016 - 1:12 pm | मंजूताई
दोन्ही भाग आवडले! वर्णन व फोटु सुरेख!
30 Nov 2016 - 1:35 pm | श्रीधर
खूप छान माहिती पण फोटो दिसत नाहित :(
30 Nov 2016 - 2:16 pm | पद्मावति
फारच मस्तं वर्णन आणि फोटो. सुरेख झालीय लेख मालीका.
30 Nov 2016 - 2:21 pm | यशोधरा
फोटो दिसत नाहीयेत. लिहिलंय झकास पण अजूनही लिहिता आलं असतं. गोपीअम्माच्या गप्पा, त्यांनी सांगितलेले अनुभव हे पण लिहायचे होते ना.
30 Nov 2016 - 2:42 pm | पाटीलभाऊ
फोटोंबाबत कळत नाहीये :(
खरं तर गोपी अम्मांनी त्यांचे बरेच अनुभव सांगितले होते, पण ते तितकेसे आठवत नसल्याने लिहिले नाही :(
पण एक ट्रेकिंगची आवड असणारी स्त्री म्हणून त्यांच्या आयुष्यात किती अडथळे आले, घरच्यांचा वगैरे विरोध स्वीकारून कशा त्या यशस्वी ट्रेकर बनल्या हे नक्कीच कौतुकास्पद होते.
आम्हाला त्यांनी कमीत कमी १०० ट्रेक तरी पूर्ण करण्याचं आव्हान दिलं आहे.
30 Nov 2016 - 2:49 pm | यशोधरा
आता फोटो नंबर २, ३ आणि ४ दिसत नाहीयेत आणि हत्तीच्या फोटो खालचा फोटो दिसत नाही. बाकी दिसतायत. छानेत. :)
गोपीअम्मा कसल्या क्यूट आहेत!
30 Nov 2016 - 2:27 pm | पाटीलभाऊ
फोटो दिसत नाहीयेत...यावर कोणी उपाय सांगेल का?
गुगल फोटो वरून येथे टाकले आहेत. आणि सर्वांना शेअर सुद्धा केले आहेत.
कदाचित गुगल वर लॉगिन करून पहा...मग दिसतील.
30 Nov 2016 - 2:51 pm | अमर विश्वास
पाटीलभाऊ
मस्तच ... हा ट्रेक माझ्या to-do list मध्ये टाकलाय ...
पूर्वी वायनाडच्या परिसरात भटकंती केली होती ... पण बाकी निलगिरी रांग अजून करायची आहे
तुमच्यामुळे परत चालना मिळाली .. धन्यवाद ...
आणि हो.. फोटो सुंदर ... व्यवस्थित बघू शकतोय ....
30 Nov 2016 - 4:16 pm | पाटीलभाऊ
नक्की करा...फार सुंदर आहे तो परिसर.
30 Nov 2016 - 3:06 pm | पियुशा
खुपच मस्त झालाय ट्रेक , अन फोटु अशक्य सुन्दर आहेत :)
30 Nov 2016 - 4:21 pm | प्रचेतस
एकही फोटो दिसत नाहीये. लिहिलंय छान.
30 Nov 2016 - 5:36 pm | पाटीलभाऊ
काहींना फोटो दिसतायत तर काहींना नाही...काय अडचण असेल???
30 Nov 2016 - 8:23 pm | दिपस्वराज
नितांत सुंदर ट्रेक डायरी. वाचताना मला सतत निलगिरीच्या जंगलातून फिरतोय असा फिल येत होता.
खरंच मज्या आली.
पाटीलभौ तुमच्या लेखनातील आणखी एक छान गोष्ट म्हणजे लिहिलेले सगळे भाग निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारे. नितळ. जसे आहे तसे . उगाच शब्दांचा पापुद्रा चढवलेला नसतो. मग ते स्पिती असो किंवा निलगिरी. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.
1 Dec 2016 - 12:31 pm | पाटीलभाऊ
धन्यवाद. खरं तर ट्रेकचे अनुभव हे शब्दात मांडायला कधी कधी शब्दच सुचत नाहीत.
त्यासाठी प्रत्यक्ष ट्रेक करून ते अनुभवायला हवं.
30 Nov 2016 - 9:54 pm | अजया
छान झाली लेखमाला.
पुलेशु.
1 Dec 2016 - 4:25 pm | गौतमी
फोटो दिसत नाहित.. :(
1 Dec 2016 - 5:02 pm | एस
फोटो खूप छान आहेत. सुंदर भटकंती.