निलगिरी हिल्स ट्रेकिंग एक्सपीडीशन - भाग १

पाटीलभाऊ's picture
पाटीलभाऊ in भटकंती
24 Nov 2016 - 12:33 pm

युथ हॉस्टेलवर ट्रेकिंगचे पर्याय शोधता शोधता 'निलगिरी हिल्स ट्रेकिंग एक्सपीडीशन' हा पर्याय चांगला वाटला. मग काय कट्ट्यावर भेटून सगळं प्लॅन केलं. ऑक्टोबरमधली ट्रेकिंगची तारीख नक्की केली आणि पुढच्या कामाला लागलो. लगेहाथ रेल्वेचं आरक्षण केलं. युथ होस्टेलच्या साईटवर नंतर नोंदवणार होतो, कारण अजून कोणाच्याच सुट्टीचा काही पत्ता नव्हता. जसजशी ट्रेकिंगची तारीख जवळ येऊ लागली सुट्टीसाठी मिळवण्यासाठी धडपड सुरु झाली. हो धडपडच...IT मध्ये सुट्टी मिळवणं हि पण एक कलाच आहे. महत्प्रयत्नानंतर चक्क ५ दिवसांची रजा मिळवून आमच्या ध्येयाकडे आगेकूच केली. एव्हढ्या मोठ्या ट्रेकला प्रथमच जाणार होतो...काय न्यायचे आणि काय नाही...यात चांगलीच तारांबळ उडत होती. कारण कोणतेही सामान बॅगेत भरताना बॅगेचे वाढणारे वजन हा चिंतेचा विषय होताच. गरजेपुरते कपडे, चालत चालत खाता येईल असे काही पदार्थ, प्रथमोपचारासाठी थोडी औषधी वगैरे बॅगेत खुपसले. तरी अजून हे पण, ते पण करता करता बॅग फुगलीच.
जायचा दिवस (अका रात्र) उजाडला. पुण्यातून स्वारी निघाली पनवेलला...बाकीची मंडळी ठाण्याहून ट्रेनमध्ये बसणार होती. पनवेलला ट्रेनमध्ये प्रवेश केला आणि एका मस्त सफारीची सुरुवात झाली. मस्त गप्पा मारल्या, बिर्याणी खाल्ली आणि निद्राधीन झालो. सकाळी जाग आली तर गाडीने कोकण पार करून गोव्यात प्रवेश केला होता. आधी वाटले होते २४ तासांचा प्रवास म्हणजे अतिशय कंटाळवाणा होईल...पण मित्रमंडळी सोबत असल्यावर कंटाळा येणे शक्यच नाही. तेव्हा सोबत आणलेले पत्ते काढले आणि 'बदाम सात' खेळण्यास सुरुवात केली. मध्ये मध्ये ज्या ज्या स्टेशनवर गाडी थांबेल तिथे पोटपूजा सुरूच होती...हे सांगायला नकोच...! महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू अशा पाच राज्यांमधून फिरून अखेर दुसऱ्या दिवशी रात्री कोइम्बतूरला पोहोचलो…आणि आमच्या 'बदाम सात' च्या सामन्याचे मध्यांतर झाले.
कोईम्बतूरला उतरून हॉटेलवर गेलो. हॉटेलवर पोहोचताच एक सुवार्ता मिळाली...कि किचन बंद झाल्याने जेवण मिळणार नाही. मग काय पोटातल्या कावळ्यांना शांत करण्यासाठी बाहेर आलो. एक छोटी खानावळ दिसली...तिथे मनसोक्त डोशांवर ताव मारला. परत हॉटेलवर येऊन झोपण्याचा प्रयत्न केला पण काही रक्तपिपासू डास सुखाने झोपू देतील तर शप्पथ. सकाळी लवकर उठून आंघोळ आटोपून न्याहारी करायला जवळच्याच एका रेस्टॉरंट मध्ये गेलो. तिथल्या मसाला डोश्याची चव अप्रतिम. नंतर 'पनकरकंडू दूध' प्यायलो आणि निघालो ऊटीकडे.
कोईम्बतूर बस स्थानक मोठे आणि नीटनेटके होते. ते पाहून मला आपल्या महाराष्ट्रातल्या बस स्थानकांची कीव आली. कोईम्बतूरवरून ऊटी साठी नियमित बसेस असतात. बसमध्ये शिरून आप-आपल्या जागेवर स्वार झालो. 5 मिनिटांतच बस पूर्ण भरली आणि निघालीसुद्धा. बसमध्ये जोर-जोरात तमिळ गाणी सुरु होती. कळतं काहीच नव्हतं...पण ते ऐकण्यात पण एक वेगळीच मजा होती. ऊटी जवळ येताच वातावरण आल्हाददायक होऊ लागलं. रस्त्याने आजूबाजूला मस्त नारळाच्या बागांमधून नारळाची झाडे डोके वर करून कुणालातरी शोधात होती. रस्त्यातच बाजूने 'निलगिरी पर्वत रेल्वे' दिसली. प्रवास सुरु करण्याआधी फार प्रयत्न केले होते कि या गाडीचं आरक्षण मिळावं म्हणून...पण ते कितीतरी दिवस आधी फुल झालं होतं. त्यामुळेच आज आम्हाला बसने प्रवास करावा लागला होता. 'मेट्टूपलायम' आणि 'कुन्नूर' येथून ऊटी साठी हि गाडी असते. असं म्हणतात कि ऊटीला जावं तर याच गाडीने. म्हटलं नंतर कधीतरी नक्कीच. घाट चढून ऊटी बस स्थानकावर पोहोचलो. अहं...माफ करा ऊटी नाही...'उधगमंडलम'! कोइम्बतूरपासून ऊटी पर्यंत एक गोष्ट मात्र समान होती...ती म्हणजे 'अम्मा'! हो…जिथे पाहावं तिथे अम्माच अम्मा...होर्डिंग्जवर, बसवर, गाड्यांवर एव्हढेच नाही तर लहान पोरांच्या दप्तरांवर पण अम्मा विराजमान होती. ऊटी बस स्थानकावरून रिक्षा पकडली आणि पोहोचलो ते थेट युथ होस्टेलच्या गेस्ट हाऊसवर. तिथे पोहोचताच सगळ्यात आधी पोहोचल्याची नोंद केली...ट्रेकिंगच ओळखपत्र घेतलं आणि झटपट आत जाऊन आपापल्या जागा पटकावंल्या.

ऊटी येथील युथ होस्टेलचे गेस्ट हाऊस

आज रात्री इथेच मुक्काम होता आणि पुढच्या दिवशी सकाळी ट्रेकला सुरुवात होणार होती. संध्याकाळी ओळख परेड झाली. जवळपास ३०-३५ जण होते. आमच्या ग्रुपमध्ये ८ वर्षांच्या चिमुकलीपासून ६५ वर्षांपर्यंतचे काका होते. रात्रीच आधी ट्रेक करून आलेल्या एका ग्रुपमधील काही लोक परतले होते...त्यांनी त्यांचे अनुभव सांगून आम्हाला शुभेच्छा दिल्या. ऑक्टोबर असल्याने थंडीची चाहूल लागत होती. जेवण करून सर्वांशी मस्त गप्पा मारल्या आणि झोपायला गेलो.
सकाळी लवकरच उठलो...फ्रेश होऊन मस्त इडली-सांभाराचा नाश्ता केला. आंघोळ करावी कि नाही या विचारात असतानाच सुवार्ता मिळाली कि गरम पाणी उपलब्ध आहे म्हणून...मग काय लगबगीने नंबर लावला आणि अभ्यंगस्नान आटोपून घेतले. दुपारच्या जेवणासाठी डबे भरून घेतले. साधं शाकाहारी पण उत्तम जेवण आणि त्यासोबत उकडलेली अंडी. बॅग भरून तयार झालो तेव्हा आमचा ट्रेक लीडर बोलला कि रात्री जंगलात पाऊस पडल्याने ट्रेक करणे थोडे धोकादायक असेल त्यामुळे आपल्या पहिल्या मुक्कामापर्यंत गाडीने जावे लागेल. आमचा पहिला मुक्काम होता 'पार्सन्स व्हॅली'. आमच्या भल्यामोठ्या बॅग्स गाडीच्या टपावरती चढवल्या आणि निघालो पार्सन्स व्हॅलीकडे.

निलगिरी पर्वत परिसर

ट्रेकचा नकाशा

चहाचे मळे

पार्सन्स व्हॅली ऊटीपासून १२ किमी अंतरावर आहे. ऊटीपासून एवढ्या जवळ असून देखील पर्यटकांच्या नजरेआड असलेलं ठिकाण. चांगलंच आहे म्हणा...! अर्ध्या-पाऊण तासातच युथ होस्टेलच्या गेस्ट हाऊसवर पोहोचलो. कॅम्प लीडरशी ओळख वगैरे झाली. आणि आत जाऊन आपापले बेड पटकावलेसुद्धा. बाहेरच काही काळी वानरं झाडावरती खेळताना दिसली.

पार्सन्स व्हॅली येथील युथ होस्टेलचं ट्रेकिंग शेड

दुपारी जेवण करून थोड्यावेळ निवांत पडून राहिलो. पार्सन्स व्हॅलीमध्ये जंगलात थोडा फेरफटका मारला. तिथेच आमच्या दृष्टीस पडली जंगली म्हैस म्हणजेच feral buffalo.

पार्सन्स डॅम पर्यंत छोटासा ट्रेक केला. याच पार्सन्स डॅम वर रोजा चित्रपटाचा शेवटचा क्षण चित्रित झाला आहे.

पार्सन्स डॅम

रोजा चित्रपटातील अंतिम क्षण येथेच चित्रित झाला होता.

फिरून परत आल्यावर आमच्या नवीन कॅम्प लीडरने आम्हा सर्वांना आमचे पूर्वानुभव सांगण्यास सांगितले. ग्रुपमधल्या बऱ्याच जणांना ट्रेकिंगचा चांगलाच अनुभव होता. सगळ्यांनी याआधी कोणकोणते ट्रेक केले आहेत त्याचे अनुभव कथन केले. रात्री जेवण केले आणि गप्पा मारत बसलो. आमचे कॅम्प लीडरने आम्हाला प्राण्यांची जनगणना (Animal Census) बद्दल माहिती दिली. ते स्वतः प्राण्यांच्या जनगणनेच्या कामात हातभार लावत होते. गप्पा मारता मारता बराच उशीर झाला आणि मग मात्र सकाळी लवकर उठायचे असल्याने निमूटपणे झोपण्यास गेलो. झोप लागलीच होती कि तेव्हढ्यात एक-दोन जणांचे चांगलेच सूर लागले होते. त्यामुळे झोपेचा खेळ-खंडोबा झाला. मग डोळे घट्ट मिटून जबरदस्तीने झोपण्याचा प्रयत्न सुरु ठेवला. पण हतबल...! असो तर शेवटी पहाटे लवकरच उठलो.
सकाळी लवकरच आटोपून न्याहारी वगैरे करून तयार सुद्धा झालो. थोड्याच वेळात मुकुर्थी शिखर बघायला एका मोकळ्या मैदानात गेलो. तिथे जवळच विनायक मंदिर आणि नवग्रह मंदिर होत. तिथे दर्शन घेऊन निघालो परत गेस्ट हाऊसवर.

विनायक मंदिर

नवग्रह मंदिरातील मुर्त्या

परत येऊन आवराआवर केली आणि बाकीची जनता तयार होईपर्यंत पत्त्यांचा एक डाव सुद्धा आटोपला...! अखेर निघालो आमच्या पुढच्या मुक्कामाकडे तो म्हणजे 'मुकुर्थी डॅम'. आज खऱ्या अर्थाने आम्ही ट्रेकिंगला सुरुवात करणार होतो. पार्सन्स ट्रेकिंग शेड पासून मुकुर्थी डॅम असा १० किमी चा ट्रेक आहे. १५-२० किलोच्या बॅग्स उचलून मजल-दरमजल करत चालण्यास सुरुवात केली.

ग्रुप फोटो

जंगलातून जाताना

पॅनोरमा मोड

मध्येच एका ठिकाणी आमच्या कॅम्प लीडरने आम्हास एकदम शांतपणे चालण्यास सांगितले. कारण तिकडे वाघ दिसण्याची शक्यता होती. आधीच्या ग्रुपला तिथे एक वाघीण आणि तिचे दोन बछडे दिसले होते. आम्ही पण वाघ दिसतोय का म्हणून इकडे तिकडे नजर ठेऊन होतोच. पण कसलं काय...आमच्या नशिबात व्याघ्रदर्शन नव्हतं...!
बरंच चालून गेल्यावर सावलीत थांबलो. चांगलीच भूक लागली असल्याने सोबत डब्यात आणलेल्या जेवणाचा फडशा पाडला. भरलेल्या पोटानेच पुढची वाटचाल सुरु केली. अखेर ५-६ तासांची पायपीट केल्यानंतर मुकुर्थी डॅमच्या साईटवर पोहोचलो.

मुकुर्थी डॅम

मुकुर्थी डॅमचे बॅकवॉटर

आमचा कॅम्प होता ते म्हणजे तामिळनाडू राज्याच्या इलेक्ट्रिसिटी बोर्डाच वापरात नसलेलं गेस्ट हाऊसच होत. आमची राहायची सोय मात्र तंबूंमध्ये होती. आमच्या तंबूत आम्ही ६ जण होतो. आपापल्या जागा पकडून जरा निवांत बसलो.

मुकुर्थी डॅम गेस्ट हाऊस

थोड्याच वेळात आमच्या कॅम्प लीडरने थोडी सुकी लाकडे गोळा करून शेकोटी केली. आज रात्रीच्या जेवणात गोड पदार्थ म्हणून गुलाब जामुन होते. मस्तपैकी भरपेट जेऊन सगळे जण शेकोटीभोवती गप्पा मारत बसलो. आजूबाजूला जंगल असल्याने थंडी जरा जास्तच जाणवत होती. शेकोटीमुळे थंडगार पडलेल्या शरीराला जरा ऊब मिळाली. त्यानंतर थोड्यावेळ आमच्या सुरेल(?) आवाजात गाणी वगैरे म्हटली. बऱ्याच वेळ गळे काढल्यानंतर झोपायला गेलो. तंबूत झोपण्याची आमची पहिलीच वेळ होती. तरी बऱ्यापैकी चांगली झोप लागली.

(क्रमशः)
(टीप: बरेच फोटो मोबाईलच्या कॅमेराने काढले असल्याने त्यांचे रिझॉल्युशन कमी आहे.)

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

24 Nov 2016 - 12:41 pm | पद्मावति

वाह, मस्तं. पु.भा.प्र.

विचित्रा's picture

24 Nov 2016 - 1:07 pm | विचित्रा

पुभाप्र

श्रीधर's picture

24 Nov 2016 - 1:13 pm | श्रीधर

खूप छान
दोन फोटो दिसत नाहीत :(
बाकी फोटो आणि वर्णन छान.

सुरेख आहेत फोटो! वर्णनही मस्त.
पण यूथ हॉस्टेलचे ग्रूप खूप मोठे असतात. हे खरेय का?

पाटीलभाऊ's picture

24 Nov 2016 - 1:36 pm | पाटीलभाऊ

हो ग्रुप मोठा असतो बऱ्यापैकी. आमच्याच ग्रुपमध्ये ३५ च्या आसपास लोक होते.
पण तरी अशी गैरसोय कुठे जाणवली नाही. आणि मुख्य म्हणजे परवडेबल आहे.
त्यामानाने इंडिया हाईक्स वगैरेचे ग्रुप थोडे लहान असतात.

तसे नव्हे, मोठे ग्रूप असले की कलकलाट खूप असतो :)

पाटीलभाऊ's picture

24 Nov 2016 - 3:06 pm | पाटीलभाऊ

पण शक्यतो अशा मोठ्या ट्रेकला निसर्गवेडी मंडळीच असतात, जे शक्यतो गोंधळ घालत नाहीत.
आम्हाला देखील पूर्ण ट्रेकमध्ये असा कलकलाट अथवा गोंधळ जाणवला नाही. ट्रेकच्या सुरुवातीला तशा सूचना सर्वांना दिल्या गेल्या होत्या...आणि पाळल्याही गेल्या.
तुम्ही म्हणताय तसे गोंधळ घालणारे ट्रेकिंग ग्रुप्स मी आपल्या सह्याद्रीतल्या अनेक गड-किल्ल्यांवर बघितले आहेत...:(

ओके. तहहयात मेंबरशिप घेण्यात येईल. धन्यवाद.

वेल्लाभट's picture

24 Nov 2016 - 1:46 pm | वेल्लाभट

सही आहे!

कविता१९७८'s picture

24 Nov 2016 - 1:50 pm | कविता१९७८

मस्तय

किसन शिंदे's picture

24 Nov 2016 - 3:17 pm | किसन शिंदे

हे एक मस्तंय, एकदा प्रयत्न करायला हवा.

मित्रहो's picture

24 Nov 2016 - 3:42 pm | मित्रहो

फोटो सुद्धा मस्त

सिरुसेरि's picture

24 Nov 2016 - 4:15 pm | सिरुसेरि

मस्त वर्णन आणी फोटो .

बसमध्ये जोर-जोरात तमिळ गाणी सुरु होती. कळतं काहीच नव्हतं...पण ते ऐकण्यात पण एक वेगळीच मजा होती.

+१००

तेजस आठवले's picture

24 Nov 2016 - 5:01 pm | तेजस आठवले

छान. धरण आणि बॅकवॉटर चा फोटो बघून मस्त वाटले. पुढचे वर्णन पण येऊ द्या फटाफट.

शब्दबम्बाळ's picture

24 Nov 2016 - 5:03 pm | शब्दबम्बाळ

मस्त वर्णन आणि झक्कास फोटो!!

पाटीलभाऊ's picture

24 Nov 2016 - 5:39 pm | पाटीलभाऊ

धन्यवाद सर्वांचे...!

कंजूस's picture

24 Nov 2016 - 5:55 pm | कंजूस

व्वा!

अमर विश्वास's picture

24 Nov 2016 - 5:59 pm | अमर विश्वास

मस्त वर्णन

पाटीलभौ एक प्रश्न ...

हा ट्रेक युथहॉस्टेल बरोबर न करता ४ - ५ जणांच्या छोट्या ग्रुपने करणे शक्य का?

म्हणजे सुरक्षितता आणि सुविधा या दृष्टीने?

पाटीलभाऊ's picture

24 Nov 2016 - 6:22 pm | पाटीलभाऊ

कारण माझ्या माहितीप्रमाणे निलगिरी जंगल हे संरक्षित आहे. आणि तिथे जाण्यासाठी जंगल विभागाची परवानगी घ्यावी लागते(कदाचित निलगिरी वृक्षांच्या बेसुमार कत्तलीमुळे).
युथ हॉस्टेल वाल्यांकडे त्याची परवानगी असल्याने त्यात काही अडचण येत नाही.
बाकी काही भागात रस्ता हरवण्याची भीती आहे. पण आमच्यासोबत तिथला स्थानिक गाईड असायचा...त्यामुळे काही तशी वेळ आली नाही.

जबरदस्त ट्रेक, फोटो आणि वर्णन देखील छान.

फोटो आणि वर्णनाची सुरेख संगती आहे तुमच्या लेखात.
पुभाप्र

वरुण मोहिते's picture

24 Nov 2016 - 6:22 pm | वरुण मोहिते

युथ हॉस्टेल चे ट्रेक नेहमी नियोजित आणि चांगले असतात ..मी स्वतः एकदा हिमाचल ला गेलोय त्यांच्यासोबत . चांगला अनुभव होता .पुढे एकटाच इतका फिरलो कि त्यांच्यासोबत जाण्याची वेळ नाही आली . बाकी वर्णन छान इथे गेलो नाहीये जमवेन कधीतरी .

पाटीलभाऊ's picture

25 Nov 2016 - 12:49 pm | पाटीलभाऊ

तुमचे अनुभव येऊ द्या

पिशी अबोली's picture

25 Nov 2016 - 3:24 pm | पिशी अबोली

छान अनुभव व लेख.

पाटीलभाऊ's picture

26 Nov 2016 - 6:47 am | पाटीलभाऊ

सर्वांना धन्यवाद :)