झुक्किनी - चीज बाइट्स

रुपी's picture
रुपी in पाककृती
22 Nov 2016 - 6:15 am

ऑक्टोबर हीट सरुन आता हळूहळू पारा खाली सरकतोय. बाकी ठिकाणीही कुठे बोचरी थंडी, कुठे हिमवर्षाव सुरु झालाय. अश्या वेळी काहीतरी नवीन चमचमीत, गरमागरम करुन बघावे म्हणून आणि घरात आणलेल्या झुक्किनीचा काही उपयोग करता येईल म्हणून हा पदार्थ बनवून पाहिला. आप्पेपात्राचाही सदुपयोग आणि तेलाचाही नाममात्र वापर, शिवाय पाकृ फार वेळखाऊ नाही, आणि चवीला.. अहाहा! त्यात गरम बाइट्समधले वितळलेले चीज .... दुपारच्या चहाबरोबर, जेवताना स्टार्टर्स म्हणून सर्वांनाच हे बाइट्स फारच आवडले. तुम्हीही नक्की करुन पाहा :)

bites

साहित्यः
१ झुक्किनी
१ उकडलेला बटाटा
१०-१२ पालकाची पाने
२ मोठे चमचे तांदळाचे पीठ
अर्धा चहाचा चमचा चाट मसाला
१ चमचा तिखट किंवा २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
अर्धा इंच आले
३-४ लसूण पाकळ्या
मीठ चवीप्रमाणे
२ चमचे तेल
चीज क्युब्स - १ से.मी. चे तुकडे करुन

कृती:
१. झुक्किनी किसून घ्या, पालक अगदी बारीक चिरुन घ्या. मी दोन्ही चॉपरमध्ये बारीक करुन घेतले.
२. एका भांड्यात दोन्ही घ्या आणि यात उकडलेला बटाटा, तांदळाचे पीठ, चाट मसाला, तिखट, मीठ, आले-लसूण किसून सगळे नीट एकत्र करुन घ्या.
३. लिंबाएवढा गोळा घेऊन हाताने वाटीसारखा आकार द्या.
४. मध्यभागी एक चीजचा क्यूब ठेवून गोळा बंद करा.
५. असे सर्व मिश्रणाचे गोळे करुन घ्या.
६. आप्पेपात्र गरम करण्यास ठेवा. थोडे थोडे तेल घाला. तेल गरम झाले की हे गोळे त्यात ठेवा.

bites2

७. २-३ मिनिटांनी गोळे उलटवा.
८. सगळीकडून छान भाजले गेले की आप्पेपात्रातून काढा आणि केचपबरोबर खायला द्या.

bites3

जास्त बाइट्स लागणार असतील तर आधी आप्पेपात्रात थोडे कमी वेळ ठेवून सर्व बाइट्स बनवून घ्या, आणि खाताना ऐन वेळी पुन्हा १-२ मिनिटे आप्पेपात्रात गरम करुन घ्या.

झुक्किनीऐवजी कदाचित घोसाळी वापरुन बघू शकता. मी पाहिली नाहीत, पण चव तशीच लागत असावी :)

प्रतिक्रिया

आहाहा... सकाळी सकाळी असं काही वाचुन पाहुन लयं त्रास्स्स व्हतो बघा !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- haye mera dil - alfaaz ft honey singh - official full video

रेवती's picture

22 Nov 2016 - 7:01 am | रेवती

पदार्थ छान दिसतोय. आज थंडीमुळे पुरती वाट लागलेली असताना हा पदार्थ समजला म्हणून बरे वाटतेय. करून पाहीन.

त्रिवेणी's picture

22 Nov 2016 - 8:57 am | त्रिवेणी

मस्त दिसताआहेत आणि सोपी करायला.

प्रीत-मोहर's picture

22 Nov 2016 - 9:14 am | प्रीत-मोहर

स्लर्प!"

यशोधरा's picture

22 Nov 2016 - 10:21 am | यशोधरा

छान दिसतो आहे पदार्थ!

श्रीरंग_जोशी's picture

22 Nov 2016 - 11:14 am | श्रीरंग_जोशी

अरे वाह. एकदम चविष्ट बनत असणार हा प्रकार. ग्रीक रेस्तराँमध्ये झुक्किनी बाइट्स खाल्या आहेत परंतु त्या गिलक्यांच्या भजांप्रमाणे थेट काप घालून तळलेल्या होत्या. ही पाकृ तळायला लावणारी नसल्याने खूपच उपयुक्त आहे.

हो.. चव, भारी लागते एकदम. शिवाय, पालकाऐवजी शेपू, मेथी, कोथिंबीर हवं ते आणि घरात असेल ते घालता येईल.

पियुशा's picture

22 Nov 2016 - 11:38 am | पियुशा

दिसतय भारी एकदम :) झुक्किनी म्हनजे काय पण ?

संजय पाटिल's picture

22 Nov 2016 - 12:21 pm | संजय पाटिल

हेच म्हणतो..

इशा१२३'s picture

22 Nov 2016 - 11:39 am | इशा१२३

मस्त चटपटीत दिसताहेत.करुन पहाते.

सस्नेह's picture

22 Nov 2016 - 4:23 pm | सस्नेह

एखादा कट फोटो टाकायला हवा होता, चीज दिसणारा !
..आणि झुक्किनीचा पण !
a

संजय पाटिल's picture

22 Nov 2016 - 12:21 pm | संजय पाटिल

आपल्याकडे (भारतात) मिळतं?

काय माहिती ? जालावरचा फोटो.

भारतात मिळते बहुतेक झुक्किनी, मोठ्या शहरांत मिळत असावी. चीजसहीत फोटो काढला, पण चांगला आला नाही, पुढच्या वेळी टाकेन :)

यशोधरा's picture

23 Nov 2016 - 9:38 pm | यशोधरा

मिळते.

पद्मावति's picture

22 Nov 2016 - 2:11 pm | पद्मावति

आहा! सहीच.

बाजीप्रभू's picture

22 Nov 2016 - 2:51 pm | बाजीप्रभू

"झुक्किनी" इकडे थायलंडमधे खूप मिळतात, इकडे बरेच पदार्थ बनवतात (अर्थात उल्टी आणणारे). दमणमधे असतांना तिथल्या बाजारात खूप दिसायचे. "तुरई" का कायसं म्हणायचे तिथले लोक. कधी हिम्मत झाली नाही खायची पण हा "झुक्किनी-चीज बाइट्स" भलताच टेस्टी प्रकार दिसतोय.

रेडिमेड खाण्यात जास्त आनंद मानणारा,
बाजीप्रभू

"तुरई" का कायसं म्हणायचे तिथले लोक

तुरई म्हणजे घोसाळं बहुतेक!!

त्रिवेणी's picture

22 Nov 2016 - 8:55 pm | त्रिवेणी

तुरई म्हणजे दोडके बहुतेक.
झुकिनी मिळते आपल्याकडे.

हो, तुरई म्हणजे दोडका. पण काहीजण तुरईचं इंग्रजी भाषांतर म्हणून झुक्किनी शब्द वापरतात.

मलाही घोसाळी आणि झुक्किनीमध्ये बरंच साम्य वाटतं.

नूतन सावंत's picture

22 Nov 2016 - 3:15 pm | नूतन सावंत

मस्त दिसताहेत.नक्की करून पाहणार.याआधी झुकीनी सूप,सॅलड आणि फ्राय खाल्ली आहे.

स्वाती दिनेश's picture

22 Nov 2016 - 4:14 pm | स्वाती दिनेश

एकदम स्लर्प.. थंडीत खायला मजा येते..
स्वाती

अनन्न्या's picture

22 Nov 2016 - 6:02 pm | अनन्न्या

फोटो पण झक्कास!

सिंगापुर ला खूप मिळायचा हा प्रकार आणि सलाड मध्ये पण वापरतात .

वा! मस्त. नवा पदार्थ मिळाला!

प्रचेतस's picture

22 Nov 2016 - 8:48 pm | प्रचेतस

जबराट

झुकिन्या आणल्यात गं, करून पाहते उद्या व कळवते.

आज हा पदार्थ केला. सगळ्यांना आवडला. करायला सोपा आहे.
चार आप्पे खाल्ल्यावर पोट भरले.
पहिल्यांदाच केल्यामुळे गडबड झाली ते टप्पे-
हाताशी थोडा वेळ असणे आवश्यक. शांतपणे करण्याचा पदार्थ आहे. उलटताना गडबड नको.
झुकिनी पाणीदार असते त्यामुळे तांदळाचे पीठ कमी जास्त प्रमाणात लागू शकते हे लक्षात ठेवणे, खासकरून शेवटचा बॉल वळेपर्यंत झुकिनीला पाणी सुटलेले असते.
झुकीनिला मीठ व मिरची कमी पुरते. माझ्याकडून दोन्ही किंचित जास्त झाले.
चीजक्यूब्ज आणलेले नव्हते म्हणून श्रेडेड मोझारेला वापरले, त्याने काही त्रास झाला नाही पण क्यूब्ज वापरणे फारच सोयिस्कर आहे.
आता पुढीलवेळी या गोष्टी ध्यानात ठेवल्यास करणे आणखी सोपे होईल.
आज ब्रेफाला पोहे, उप्पीट, थालिपीठ टाईप पदार्थ समोर न आल्याने मुलाला फार्फार बरे वाटले.

अरे वा.. लगेच करुन पाहिला आणि मुलाला बरे वाटले हे वाचून बरे वाटले ;) आणि बाकी सविस्तर मुद्द्यांबद्दलही धन्यवाद.
माझे प्रमाण तसे जरा अंदाजे असते, पाकृ लिहिताना जरा हिशेब लावून लिहावे लागते, त्यामुळे चुकले असावे =)

सामान्य वाचक's picture

23 Nov 2016 - 9:30 pm | सामान्य वाचक

तोंडात टाकावेसे वाटताहेत

विशाखा राऊत's picture

24 Nov 2016 - 3:40 am | विशाखा राऊत

मस्त दिसत आहे

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Dec 2016 - 6:06 pm | कैलासवासी सोन्याबापु

झुकिनीला मराठीत काय म्हणतात कोणी मला सांगेल काय? इतक्या उत्तुंग नाव असणाऱ्या भाज्या ऐकूनच दडपून जायला होतं आम्हा अज्ञ गावठी जनांना, नंतर कळते त्या भाजीला गावात काय म्हणतात ते, जमल्यास मराठी नाव द्याच, ही आग्रहाची विनंती

रुपी's picture

9 Dec 2016 - 7:04 am | रुपी

मराठी नाव नाही बहुतेक झुक्किनीला. स्ट्रॉबेरीला मराठीत स्ट्रॉबेरीच म्हणतात तसं झुक्किनीच म्हणायचं :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Dec 2016 - 6:12 pm | कैलासवासी सोन्याबापु

.

रातराणी's picture

8 Dec 2016 - 11:39 pm | रातराणी

वेगळी पाकृ. आवडली.

रेवती's picture

9 Dec 2016 - 3:49 am | रेवती

सोन्याबापू, तुरई वेगळी, झुकीनी वेगळी. एकाच घराण्यातल्या भाज्या आहेत पण झुकिनीला अजिबात चव नसते पण बेक केल्यावर चांगली लागते.

अमिता राउत's picture

10 Dec 2016 - 10:33 pm | अमिता राउत

एकदा करायलाच हवा मस्त दिसतोय ..

नरेश माने's picture

12 Dec 2016 - 1:18 pm | नरेश माने

छान दिसतेय पाककृती.

कंजूस's picture

12 Dec 2016 - 2:04 pm | कंजूस

काकडी नव्हे?