पळीचा सोडा

अजया's picture
अजया in भटकंती
6 Nov 2016 - 8:56 pm

आज सकाळी उठुन अचानकच कुठे तरी फिरायला जाऊया विचार करायला लागलो.आमच्या रायगड जिल्ह्याचं एक बरं आहे एका दिवसात जाऊन परत येता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं आहेत. मग जवळच अलिबागला जाऊन येऊ ठरवलं.
पुणा हायवे आमच्या गावाच्या अंगणात तर गोवा हायवे परसात आहे.जातानाचा आमचा रसायनी ते आपटामार्गे खारपाडा रस्ता माझा अतिशय आवडता रस्ता आहे.दुतर्फा गर्द झाडी,डोंगर,बाजूने लांबून छान जवळून पूर्ण प्रदूषित नदी!
एकदा का पेणचा रस्ता सुरु झाला की सगळी हाडं खिळखिळी व्हायला सुरूवात होते ती थेट वडखळ जाईपर्यंत. वडखळला मिसळ वडा स्टाॅप घ्यावाच लागतो असा अलिखित नियम आहे! वडखळ पोयनाड गेलं की छानसा दोन्ही बाजूनी झाडी ,कौलारू घरं असं टिपिकल कोकणी दृश्य दिसायला लागलं की समजायचं पळी गाव आलं!
अलिबागच्या दिशेने प्रवास करताना उजवीकडे अगदी जुन्या पध्दतीचं उतरत्या कौलाचं छोटंसं घर .त्यावर डि सॅमसन सोडा फॅक्टरीचं नाव दिसेल. दुतर्फा गाड्या लागलेल्या असतीलच.
.
.

आत गेलं की जुनाट लाकडी बाकडी,जुन्या सोडा बाटल्या असा कारभार, अगदी माफक किंमती लिहिलेला दर फलक बघून बिचकू नका.आपण अगदी बरोबर ठिकाणी आलो आहोत!
.
.

अलिबाग भागात अनेक शनवार तेली म्हणजेच ज्यू कुटुंबं स्थायिक झालेली आहेत. त्यातलेच एक दिघोडकर.त्यांच्यातल्या डॅनियल दिघोडकरांनी या जागी १९३८ मध्ये ब्रिटिशांना आवडेल असे शीतपेय म्हणून आईसक्रिम सोडा बनवायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी युरोपातून ८० वर्षापूर्वी मशिन आयात केली.पण त्यावेळी जवळचे तीनविरा धरण नव्हते. मग अंगणात विहिर खोदून त्या विहिरीचे पाणी वापरून त्यांनी आपल्या सीक्रेट फाॅर्म्युलाने हा सोडा बनवायला सुरूवात केली. तीच पध्दत आजतागायत त्यांच्या तिसऱ्या पिढीने सांभाळून ठेवली आहे. अगदी आजही त्याच पध्दतीने सोडा बनवला जातो.मुख्य म्हणजे आता हे दुकान त्यांनी परंपरा म्हणून सुरु ठेवले आहे.यातून धंदा करणे हेतू नसल्याने अजूनही हे माफक दरात देणे त्यांना परवडते आहे. इतर सोड्याची जळजळ या सोड्यात जाणवत नाही. आईसक्रिमचे माधुर्य आणि सोड्याचा फिझीनेस यांचे लाजवाब मिश्रण त्यांना साधले आहे .इथे निरनिराळ्या प्रकारचे सोडा मिळतात.फळांच्या फ्लेव्हरचा,मसाला सोडा आणि माझा आवडता आईसक्रिम सोडा. हल्ली घरी न्यायला पेट बाटली मात्र मिळायला लागली आहे.
माझ्या मुलाने आधी प्यायला नव्हता हा सोडा.यावेळी बाटली मिळाल्याने घरी आणता आला.मुलाला अतिशय आवडला.मग म्हंटलं मिपाकरांबरोबर शेअर करूचया हे चविष्ट प्रेक्षणीय स्थळ.अलिबागला जाताना घ्याच एकदा आस्वाद.
( ही जाहिरात नाही!)

प्रतिक्रिया

सुधांशुनूलकर's picture

6 Nov 2016 - 9:04 pm | सुधांशुनूलकर

पूर्वी इथे 'गोटी सोडा'ही मिळायचा. बाटलीच्या तोंडावर तळहात जोराने मारला की 'पॉक्क' असा आवाज करून बाटलीच्या तोंडावरची गोटी आत जायची आणि सोडा फसफसत बाहेर यायचा.
हल्ली पर्लपेटच्या बाटलीतही मिळतो, हे माहीत नव्हतं.

माम्लेदारचा पन्खा's picture

6 Nov 2016 - 9:16 pm | माम्लेदारचा पन्खा

लवकरच याचा समाचार घेतला जाईल !

पुणा हायवे, पूर्ण प्रदूषित नदी???

असो असो. भावी पुणेकर व्हायला तुम्ही डिस्क्वालिफाय आहात बरं! ;-)

बादवे, एक दिवस इथे जाऊन सोड्याचा आस्वाद घेण्यात येईल. 'गाडीपर्यंत सर्व्हिस नाही' हे वाचून अगदी पुण्यात असल्यासारखे वाटले. एकच नंबर!

सतिश गावडे's picture

6 Nov 2016 - 10:09 pm | सतिश गावडे

त्या बहुतेक कुंडलिका नदीबद्दल बोलत आहेत. पुण्यातील गटाराबद्दल नसावे ते. ;)

आपटामार्गे खारपाड्याला गोवा हायवेला आमची पाताळगंगा नदी जाते. सर्व केमिकल कंपन्यांनी प्रदूषित करुन या भागात नदी हिरवी झाली आहे :(

बहुत सुना है सॅमसन के बारे में!

अवांतर: पुणा हायवे वाचून एकदम आजोळी आल्यासारखं वाटलं!

आधी वाटले पाककृती असावी पण हे वेगळेच निघाले. आईस्क्रीम सोडा कसा दिसत असेल हे डोळ्यासमोर येत नाहीये.
फोटू आवडले. एकदम भारतवारी झाल्यासारखे वाटले.

पद्मावति's picture

6 Nov 2016 - 10:42 pm | पद्मावति

वाह मस्तं.

कपिलमुनी's picture

7 Nov 2016 - 12:08 am | कपिलमुनी

ईथला आइसक्रीम सोडा अतिशय बेक्कार लागतो, पळीचा सोडा तर मारुतीचा बेंबीत गार लागते याचा परफेक्ट नमुना आहे

कविता१९७८'s picture

7 Nov 2016 - 1:12 am | कविता१९७८

मस्त

चौलमध्येही भोवाळे तलावाजवळ ( दत्तमंदिराजवळ) गोटी सोडा मिळतो. दहा रु बाटली. जिरा,कोकम ,सोडा. कार्बनडाइओक्साइड सिलिंडरने बाटल्या भरून ठेवतात.
तिनचारवर्षांपुर्वी नळाचे/विहिरीचे पाणी वापरण्यावर बंदी आणली सरकारने.

सौन्दर्य's picture

7 Nov 2016 - 9:35 am | सौन्दर्य

लेख चांगला लिहिला आहे, आईस्क्रीम सोड्याची माहिती देखील छान. ह्या लेखातील 'शनवार तेली' म्हणजे ज्यू हे वाचून उत्सुकता चाळवली गेली आहे.

अवांतर : हे नाव ज्यू लोकांना का किंवा कसे पडले ह्याची माहिती इतर मिपाकरांना असल्यास ती वाचायला आवडेल.

सब्बाथमुळे ज्यू लोक शुक्रवार संध्याकाळ ते शनिवार संध्याकाळ धंदा बंद ठेवतात. म्हणून पडलं असावं.

होय, शनवारी सुट्टी घेत म्हणून ते शनवारे तेली असं कुठेतरी वाचल्याचं आठवतंय.

आणि ते ज्यू लोकांचा पारंपारिक तेलाचा व्यवसाय करत म्हणून तेली नाव.

प्राची अश्विनी's picture

7 Nov 2016 - 10:04 am | प्राची अश्विनी

हा आईसक्रीम सोडा मागे घेतला होता पण इतिहास माहित नव्हता.

पैसा's picture

7 Nov 2016 - 10:28 am | पैसा

येवल्याला असे वेगवेगळ्या चवींचे सोडा अगदी स्वस्तात चाखले होते.

स्वाती दिनेश's picture

7 Nov 2016 - 10:35 am | स्वाती दिनेश

अजया, मस्त आहे माहिती.खूप वर्षे झाली गोटी सोडा /आइसक्रिम सोडा पिऊन.
अवांतर-भिंतीवरची चांदणी हे'ज्यू' कुटुंब आहे ते सांगते आहे.
स्वाती

आतिवास's picture

7 Nov 2016 - 10:44 am | आतिवास

छान.
पण लेख आटोपता का घेतला ते समजलं नाही.

कंजूस's picture

7 Nov 2016 - 1:26 pm | कंजूस

हो,थोडं इकडचं तिकडचं - रेवदंडा बाजारातला मारुति,पडलेली तटबंदी,फफेंची जनता खानावळ आणि पेढे, गेटवे ते रेवसमार्गे अलिबाग इत्यादी वाढवता येईल॥ विशाखा राऊत मदत करतीलच.

रायनची आई's picture

7 Nov 2016 - 11:19 am | रायनची आई

आमच गाव पण चौल-अलिबागच आहे : ) खूपदा जाण होत..पण हे ठिकाण नक्की कुठे येते ते कळले नाही..पोयनाड जवळ?
बाकी एकदा का पेणचा रस्ता सुरु झाला की सगळी हाडं खिळखिळी व्हायला सुरूवात होते ती थेट वडखळ जाईपर्यंत ह्या वाक्याशी सहमत.

पोयनाड गेलं की थोड्याच वेळात.त्याच रस्त्यावर पुढे.कार्ले खिंडीच्या अलिकडे.

स्वच्छंदी_मनोज's picture

7 Nov 2016 - 1:00 pm | स्वच्छंदी_मनोज

मस्तच.
अलीबाग साईडला ट्रेकला गेलो की प्रत्येक वेळा ह्याची चव चाखलीय..

गोव्यात मिळतो तो गोटी सोडा आठवला!

अरे वा.. मस्त वाटत आहे सोडा वर्णनावरुन!

थप्पड से डर नही लगता साहब....
वडखळ अलिबाग रोड से डर लगता है.....

बाकी हे दुकान संध्याकाळी 7 ते 7:30 ला बंद होत....

इशा१२३'s picture

9 Nov 2016 - 5:39 pm | इशा१२३

मस्त माहिती! नव्या ठिकाणाबद्दल समजले.

इशा१२३'s picture

9 Nov 2016 - 5:39 pm | इशा१२३

मस्त माहिती! नव्या ठिकाणाबद्दल समजले.

बोका-ए-आझम's picture

9 Nov 2016 - 10:53 pm | बोका-ए-आझम

हा लेख अजयाताईंनी ६ तारखेला टाकला, मी आत्ता वाचला पण ४ तारखेपर्यंत मी याच्या जवळच्या भागात होतो. हा सोडा पिता आला असता. असो. पुढच्या वेळी. बाकी लेख भारी.

विखि's picture

10 Nov 2016 - 2:02 am | विखि

डी सॅमसन सोडा, १०० % जाणार.......

Maharani's picture

10 Nov 2016 - 6:27 pm | Maharani

Pudhachya veli nakki janar
...

मिपावर चौलांचे अजून दोघे आयडी आहेत हे वाचून आनंद झाला.. आम्ही पण चौलांचेच

स्नेहानिकेत's picture

11 Nov 2016 - 12:42 am | स्नेहानिकेत

मस्त लेख अजयाताई!!!