भूत
"मला तुला एक फार महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मला भुतं दिसतात." चेहर्यावरची सुरकुतीही न हलवता मराठे मला म्हणाला. आम्ही हापिसातल्याच एका सोफ्यावर बसून दुपारचा चहा पीत होतो. गेले दोन आठवडे मी आणि मराठे इथे बसून चहा घेतो. बाकी हापिसातले लोक्स शिष्ट आहेत साले. माझ्यासारख्या नव्याकोर्या अॅप्रेंटिससोबत बोलायला जीभ झडते साल्यांची. मराठे तसा बरा वाटला - कामापुरता संंबंध आल्यावर त्यानेच एकदा "चहा?" म्हटल्यावर मीही फार भाव न खाता गेलो.
पण आजच्या चहाची चर्चा वेगळीच निघाली.
"खरंच?" मीही त्याला तितक्याच गांभीर्याने विचारलं. "हो." मराठेचा चेहरा खरंच गंभीर होता. मला एक क्षण वाटलं की त्याच्या जोकचा पंच आता फुटेल - पण त्याने कपातला चहा फुंकण्याखेरीज काहीच केलं नाही. साधारणपणे अशा वेळी मी दोनच गोष्टी करू शकलो असतो - त्याला थट्टा पुरे करायला सांगून पुढल्या विषयाकडे वळणं किंवा त्याच्या थिअरीवर विश्वास ठेवून संभाषण चालू ठेवणं. पण मी काय करायचं ते ठरवायच्या आत तोच म्हणाला-
"मला माहितीये तुझा विश्वास बसणार नाही ते. कुणालाच हे खरं वाटत नाही. माझ्या बायकोलासुद्धा. सो फरगेट इट."
"नाही, अरे तसं नाही, पण..."
"मग कसं?"
"बरं, मी मानून चालतो की तुला भुतं दिसतात. पण हे कशावरून? आणि तुला कसं माहीत की ते भूत आहे म्हणून?" मी वेळ मारून न्यायला प्रश्न टाकले. आणखी दहा मिनिटं तरी मला माझ्या सीटवर परत जायचं नव्हतं.
"सांगतो. एक तर तुम्ही लोक भूत म्हटल्यावर जे काही डोळ्यापुढे आणता, तसं ते मुळीच नसतं. त्यामुळे उलटे पाय, भयानक चेहेरा, वेडेवाकडे अवयव इ. गोष्टी विसरून जा. भुतं ही एक वेगळीच संकल्पना आहे." मराठे उत्साहाने सांगायला लागला. मला माझी दया यायला लागली. त्याची तर आधीपासूनच येत होती.
"असं बघ - पाणी जेव्हा उकळतं, तेव्हा त्याचा आकार, रंग, रूप कायम राहतं का? नाही. त्याचे सगळेच गुणधर्म बदलतात. तीच गोष्ट बर्फाची. बर्फाकडे बघून जर तुला सांगितलं की हे पाणीच आहे, तर प्रथमदर्शनी तू विश्वासच ठेवणार नाहीस. बरोबर?" मराठेने रोखून माझ्याकडे पहात मला विचारलं.
"बरोबर." अजूनतरी तो काही वेडवाकडं न बोलल्याने मी हे कबूल केलं.
"तर मग मला सांग, भुतांनी तरी माणसासारखं का दिसावं?" मराठेने विजयी सुरात मला प्रश्न केला. आणि उरल्यासुरल्या चहाच्या घोटासोबत त्याचं उत्तरही -
"म्हणूनच मी म्हटलं की भूत ही संकल्पनाच वेगळी आहे. आपण त्याला माणसाच्या रूपाशी जोडल्याने ते अर्थहीन वाटतं. आता मला सांग - तू पाण्याला बूट घालून फिरायला जायला सांगू शकतोस का?"
आता खरं तर मला मराठेची भीती वाटायला लागली. पण मराठे गुंगला होता.
"नाही. कारण पाणी ही संकल्पनाच बूट घालून फिरायला जाणं ह्या संकल्पनेशी जोडली जाऊ शकत नाही. मग ती निरर्थक वाटायला लागते. भुतांचंही तसंच आहे. आपण त्यांना नीट समजून घेतलं, तरच त्यातला अर्थ आपल्या लक्षात येऊ शकतो. भुतं असतात ह्यात वादच नाही, पण त्यांना कसं आणि कुठल्या स्वरूपात शोधता येईल हे आपल्याला ठाऊक असलं पाहिजे. काय?"
"ह्म्म्म्म्.. " मला आता त्याचं बोलणं थोडंफार इंट्रेस्टिंग वाटायला लागलं होतं. "म्हणजे तुला म्हणायचंय की तुला जी भुतं दिसतात, ती अशी माणसासारखी दिसत नसून वेगळीच असतात?"
"करेक्ट. मला भुतं त्यांच्या ओरिजिनल रूपात दिसतात."
"पण तुला कळतं कसं की ते भूत आहे?" मला अजूनही १००% खातरी वाटत नव्हती की मराठेला वेडा आहे की नाही? की तो आपली फिरकी घेतोय?
"मी तुला मघाशी म्हटल्याप्रमाणे, बर्फ जर पुन्हा वितळवला तर त्याचं पाणी होईल की नाही? आता पाण्यासाठी तापमान हा बदलाला कारणीभूत ठरतो. तसंच आहे. भुताचं मूळ माणसात पुन्हा तात्पुरतं रूपांतर करणारा कारक आपल्याला सापडला की झालं. उदा. मिस्टर इंडियाचं घे. त्याला लाल रंगात बघितलं की लोकांना कळायचं की तो तिथे आहे. इतर वेळी मात्र दिसणं नामुमकिन! तसंच भुतांचं आहे. कळलं का?"
"थोडंफार. म्हणजे तुला असं म्हणायचंय की भुतं आणि माणूस हयांचं रूपांतर करणारा कारक पदार्थ जो काही आहे तो तुला सापडलाय, आणि त्यामुळे तुला भुतं ओळखता येतात?" मी जवळपास अविश्वासाने त्याला विचारलं.
"अगदी बरोबर ओळखलंस."
"ह्म्म्म, मला अजूनही हे सगळं खरं वाटत नाहीये..." मी सोफ्यावरून उठायच्या तयारीत म्हणालो. मला आता ह्या संभाषणाने जरा नाही म्हटलं तरी विचित्र फीलिंग येत होतं.
"नो प्रोब्लेम. तुला हवं असेल तर मी तुला आज रात्री भूत दाखवू शकतो. तू तयार असलास तर..."
मी कोलमडून खालीच पडलो असतो, पण सोफ्याच्या गुबगुबीत हाताचा मला फायदा झाला. "तू खरंच हे बोलतोयेस? नो जोक्स?"
"मी १०१% खरं बोलतोय. तुला भूत बघायचं असेल, तर मला रात्री १०च्या आत फोन करून कळव." म्हणून मराठे आपल्या क्युबिकलकडे निघूनही गेला. मी भारावल्यासारखा बघत राहिलो.
-*-
मालाडच्या स्मशानात रात्री १ वाजता मी कधी पाऊल टाकीन असं मला जन्मात वाटलं नव्हतं.
पण आजचा दिवस खरंच वेगळा होता. दुपारी मराठेने मला भूत बघायची ऑफर दिल्यानंतर मी जवळपास दोन तास विचार केला. हा विषयच इतका चमत्कारिक होता की नक्की काय करू ते मला सुचत नव्हतं. घरी आल्यावर मी टी.व्ही. लावून पडून राहिलो. माझ्या ब्याचलर जीवनात जेवण बनवणं, घरकाम असल्या फालतू गोष्टींना वेळ नव्हता. उगाच च्यानलवरून उड्या मारल्यावर मी कॉम्प्युयुटर उघडला आणि भुतांच्या नावे बराच सर्च मारून पाहिला. मराठेची विचित्र थिअरी मला कुठे दिसली नाही. मग मी मराठेच्या नावेही एक सर्च करून पाहिला, पण त्यात त्याचं फेसबुक पेज, लिंक्डइन, आणि गतकाळातली काही फोरम्स एवढाच मामला आढळला. आता काय करावं?
उत्सुक तर मी होतोच. हा प्रकार तरी काय असावा, ह्याबद्दल मला प्रचंड कुतूहल होतं ते स्वस्थ बसू देईना. शेवटी ९.२०ला मी मराठेला फोन लावला.
"बोल रे." त्याचा आवाज थोडा घाईत येत होता.
"मला इंट्रेस्ट आहे भूत बघण्यात." मी थोडंसं चाचरत, ओशाळ्या आवाजात प्रस्तावना केली.
"व्हेरी गुड! मग एक काम कर, मला जोगेश्वरी स्टेशनला ११ वाजता भेट. ओके?" "चालेल. येतो मी." पलीकडून फोन ठेवल्याचा आवाज आला. आता वेस्टर्न रेल्वे पकडायची म्हटल्यावर तासभर तरी लागेल, म्हणून मी उरलंसुरलं म्यागी खाऊन घराबाहेर पडलो. ट्रेन पकडून दादरला पोहोचेपर्यंत अर्धा तास गेला. तेवढ्यात पुन्हा मराठेचा फोन -
"अरे, एक काम कर, मालाडला भेटू आपण. पण स्टेशनवर नको. तिथल्या एका जागेचा पत्ता मी तुला सांगतो, तो नोट कर आणि तिथे भेट. ओके?"
म्हटलं, बरं. मालाड तर मालाड. पत्ता ऐकला आणि मी गूगललं तर भेंडी हा स्मशानाचा पत्ता निघाला! आता काय करायचं?
आता एवढी मजल मारल्यावर मला मागे हटवेना.
शेवटी तासाभराने मी मालाडला पोहोचलो. वाट हुडकत स्मशानाच्या दरवाजाजवळ पोहोचलो, तर मराठे तिथे उभाच होता.
"जायचं?"
"हो. चल."
आम्ही दरवाजा उघडून स्मशानात शिरलो.
-*-
आसपास फारसा आवाज नव्हता. मुंबईत शांतता म्हटली तरी असते कुठे? पण तरीही इथे तशी शांतता होती. मराठे शांतपणे माझ्याकडे बघत उभा होता.
"आता?" मी त्याला विचारलं.
"तिथे बघ." मराठेने दूर आकाशात कुठेतरी आपलं बोट स्थिर केलं. मी मान मागे वळवून तिकडे बघायला लागलो. मला तिथे काहीच दिसलं नाही.
"नीट बघ, म्हणजे दिसेल." मागून मराठेचा आवाज आला. मी लक्ष देऊन बघायला लागलो, इतकंच मला आठवतंय. त्यानंतर माझ्या मानेवर एक जोरदार फटका बसला, आणि अंधारी येऊन मी खाली कोसळलो बहुतेक.
-*-
"प्रत्येकाचा एक वीक प्वाईंट असतो. कुणाचा पैसा, कुणासाठी sex, काहींना पोझिशन. तुझा वीक प्वाईंट होता कुतूहल. ते ओळखलं मी." मराठेचा आवाज लांबून कुठूनतरी माझ्या कानात येत होता. माझ्या डोळ्यांवर बहुधा पट्टी होती, हात बांधले होते आणि कानांत एक स्वस्तातला ब्लूटूथ रिसीव्हर बसवला होता. हालचाल करता येत नव्हती आणि लाथा झाडल्या तरीही पायांतून सणकून कळ आली. मी कुठे होतो? काय चाललं होतं?
"फार वाईट वाटून घेऊ नकोस. तुला काही स्कोप नव्हता जास्त. असं होतं कधीकधी." मराठे शांत सुरात बोलत होता. "आधी मी तुझं काय होणारे ते सांगतो. मी तुला एका ख्रिश्चन शवपेटिकेत कोंबलंय. साधारण वीस फूट खोल असशील तू.
आणखी फार तर दोन दिवस तू ग्लानीतून बाहेर येत, म्लान होत जगशील. मग खेळ खलास."
मला हे ऐकून भीती वाटलीच, पण एक क्षण वाटलं की हे सगळं स्वप्न असावं. हे काय चाललंय? आणि मी का?
"तुला आधी विचार आला असेल की हे सगळं का? त्याला उत्तर नाही. हे जग अतिशय अनियमित आहे - random and chaotic. त्यात कसलीही रचना, कारणमीमांसा शोधायला जाणं हेच मूर्खपणाचं लक्षण आहे. तेव्हा तो विचार सोडून दे.
तुला असंही वाटेल की मीच का? तर त्यालाही उत्तर नाही. भात जेवताना तू तोंडात घातलेल्या प्रत्येक शिताने केलेला आक्रोश जेवढा अर्थपूर्ण आहे, तितकाच तुझा प्रश्नही. तेव्हा त्यापलीकडे जाऊन तुला उत्तर देतो. ऐक.
मला माणसं मारायला आवडतात. खरंच. तो माझा छंद आहे. तेच माझं खरं जगणं आहे. हापिसातलं काम वगैरे निव्वळ धूळफेक. IT, software, sales ह्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. मी रमतो ते माणसं मारण्यात."
हे सगळं माझ्याबरोबर घडतंय, हे मराठेचा आवाज ऐकूनही मला खरं वाटत नव्हतं. तो पुढे बोलतच गेला-
"तुला सगळया गोष्टीत इंट्रेस्ट आहे हे मला माहिती होतं. शिवाय आजकाल इंटरनेट किती कामी येतं बघ. तुझं फेसबुक प्रोफाईल, त्यातले चेक इन्स, Goodreadsवरची आवडत्या विषयांची पुस्तकं, Linkedinवरची माहिती - सगळी तू पब्लिकली available ठेवली आहेस. त्यामुळे तुला इथे ह्या ठिकाणी कसं आणायचं ते ठरवणं मला फारसं अवघड गेलं नाही. अर्थात तू इथे येण्यापूर्वी कुणाला फोन केला असशील, निरोप दिला असशील, म्हणून मग जोगेश्वरीचं मालाड केलं आयत्या वेळी. आपण बदललेले बेत कुणाला सांगतो? घरी कुणी वाट बघणारं असेल तर. नाहीतर कोण कुणासाठी एवढ्या रात्री जागतो रे? त्यातून तू एकलकोंडा, आई-बापांशी फाटकून वागणारा जीव. गेले २ आठवडे तुझी कर्मकहाणी ऐकून कान किटले असले, तरी सगळं डोक्यात ठेवलं मी. त्यामुळे इथे तुला कोणी शोधत येण्याची शक्यता कमीच."
पण स्मशानात - तेही मुंबईत कित्येक लोक येत असतात. त्यांना हे सगळं कळेलचं ना? माझ्या मनात विचार आला.
"हो, स्मशान. तेही बरोबर आहे तुझं." माझ्या मनातले विचार ओळखल्याप्रमाणे मराठे म्हणाला. "पण तू एक गोष्ट विसरलास. गूगलून पाहिलेली सगळी माहिती खरी नसते. तू ज्याला स्मशान समजतोयेस, ती एक rogue entry आहे. कित्येकदा जुनी माहिती इंटरनेटवर अद्ययावत होत नाही आणि अशा जागा हमखास चुकीच्या सदरात मोडतात. ज्याला तू स्मशान समजलास, तिथे आता नक्की काय झालंय ते प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कळणं अवघड आहे. असो, ते तूच शोधून काढ!"
मला आता त्या कुंद हवेच्या भपकार्यात गरगरायला लागलं होतं. ताकद संपत आली होती. तुला सोडणार नाही मी. माझ्यामागे पोलिसांत तक्रार होईल आणि साल्या पकडतील तुला.
"आणि तू नाहीसा झाल्यावर समजा पोलीस तपास झाला, तरी त्यांना काय कळणार आहे? फार तर एक प्रीपेड नंबर. त्यापासून सुरूवात करून इथे जमिनीखाली लपलेल्या तुला शोधतील ते? तुझ्यापासून माझ्यापर्यंतचा धागा मिळेल त्यांना? मिळाला तर मिळूच देत. मलाही आजकाल हा खेळ खूपच एकतर्फी वाटायला लागलाय. Anyways, Good Bye!"
मराठेचा आवाज बंद झाला आणि मला भोवळ आली.
-*-
प्रतिक्रिया
29 Oct 2016 - 1:13 am | सच्चिदानंद
डेक्स्टरची आठवण आली.
सगळ्या सोज्वळ चेहर्यांमागे कोठलं ना कुठलं जनावर असतंच असतं .
29 Oct 2016 - 7:31 am | बोका-ए-आझम
मालिकेचं पोटेन्शियल आहे. त्यावर विचार करावा ही विनंती!
29 Oct 2016 - 12:22 pm | यशोधरा
हायला! भारी आणि भीतीदायक!
29 Oct 2016 - 2:56 pm | भाग्यश्री कुलकर्णी
डेन्जर आहे हे. भारीये की.
30 Oct 2016 - 8:06 am | प्रचेतस
भारी.
दुसरा भाग नक्कीच निघू शकेल.
1 Nov 2016 - 8:33 am | नाखु
आणि तो बदला घेण्याचा असेल तर आणखी उत्तम.
1 Nov 2016 - 10:59 pm | मोदक
+१११
दुसरा भाग लिहाच..!!
3 Nov 2016 - 12:50 am | पिलीयन रायडर
+२२२
बदला हवाच!
5 Nov 2016 - 8:22 pm | स्रुजा
खरंच त्याचं भूत झालं आणि त्याने बदला घेतला तर मजा येईल !
30 Oct 2016 - 9:40 pm | Ram ram
पुलेशु
30 Oct 2016 - 11:03 pm | कविता१९७८
खतरनाक, कुणावर विश्वास ठेवावा??
31 Oct 2016 - 5:12 am | अनन्त अवधुत
.
31 Oct 2016 - 1:45 pm | मारवा
या कथेचा विस्तार अजुन होऊ शकला असता
मोट्या पोटेन्शीयल ची कथा
ग्रेट
31 Oct 2016 - 8:02 pm | पाटीलभाऊ
पुढचा भाग येऊ द्या.
1 Nov 2016 - 8:25 am | ज्योति अळवणी
मस्त. थोडी आज7न खुलवता आली असती. पण रात्री वाचली तर परिणाम भलताच मस्त असेल
1 Nov 2016 - 10:38 pm | अनिरुद्ध.वैद्य
पण भुत कुठंय?
1 Nov 2016 - 11:31 pm | सौन्दर्य
गोष्ट छानच आहे, फ्लो ही उत्तम. पण एक गोष्ट नाही कळली. डोळ्यावर पट्टी बांधलेली, हातपाय बांधलेले तरी देखील कानात 'स्वस्तातला' ब्ल्यू टूथ रिसिव्हर लावला आहे हे कसं कळलं ? पुढे वाचायला आवडेल.
2 Nov 2016 - 1:48 am | भृशुंडी
ती चूक झाली आहे- "स्वस्तातल्या (चायनीज?) मालाचा सांगोपांग अभ्यास असल्याखेरीज गोष्टीतल्या 'मी' ला हे कळणं शक्य नाही"
2 Nov 2016 - 1:50 am | भृशुंडी
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!
पुढल्या भागाची आयडिया सुचवलीच आहे, प्रयत्न करून पहातो
2 Nov 2016 - 2:53 am | मराठमोळा
कथा आवडली आणि त्यातला संदेशही आवडला..
आजकाल कुणावर विश्वास ठेवणे (दुर्भाग्याने) कठीण आहे, तसेच आपली खाजगी माहिती सहजतेने ईंटरनेटवर उपलब्ध आहे आणि त्याचा किती गैरवापर होऊ शकतो याची बर्याच लोकांना पुसटशीही कल्पना नसते.
पुलेशु.
2 Nov 2016 - 6:49 pm | मारवा
एक गॅरंटीने सांगतो लेखकाचा हेतु इंटरनेटवर माहीती देऊ नये बरे नसते इतका मर्यादीत "शाळकरी" नसणारच. आपल्याला कॉन्फीडन्स आहे बॉस.
लेखकाकडुन खात्री करा वाटल्यास.
त्यांनी त्याहुन अधिक खोलवर वेध घेत कथा गुंफलेली आहे.
2 Nov 2016 - 6:49 pm | मारवा
एक गॅरंटीने सांगतो लेखकाचा हेतु इंटरनेटवर माहीती देऊ नये बरे नसते इतका मर्यादीत "शाळकरी" नसणारच. आपल्याला कॉन्फीडन्स आहे बॉस.
लेखकाकडुन खात्री करा वाटल्यास.
त्यांनी त्याहुन अधिक खोलवर वेध घेत कथा गुंफलेली आहे.
2 Nov 2016 - 2:33 pm | अमृत
आवडली.
2 Nov 2016 - 4:33 pm | सस्नेह
शेवटही जबरी.
2 Nov 2016 - 4:41 pm | अभ्या..
चैला. भारीच लिहिलय अगदी. सुपर्ब.
टाईटल जरा कॅची मारायला पाहिजे होते.
2 Nov 2016 - 6:54 pm | अत्रुप्त आत्मा
प्लस वण.!
समांतर- पांडु कुठाय?
3 Nov 2016 - 12:31 am | अभ्या..
तुमीच त्याला ब्ल्युटूथ वगैरे देउन पेटीत नाही ना बसवले? ;)
3 Nov 2016 - 8:25 am | नेत्रेश
तसा महागातलाही चालणार नाही २० फुट जमीनी खाली.
पण गोष्ट भयानक आवडली.
3 Nov 2016 - 8:40 am | आतिवास
कथा आवडली.
वेगळी आहे जरा, म्हणून जास्त आवडली.
3 Nov 2016 - 3:14 pm | शलभ
खतरनाक..
3 Nov 2016 - 8:01 pm | जव्हेरगंज
जबरा कल्पना आहे!
पण कथेचा शेवट झाला असे वाटले नाही.
कृपया करावा !
5 Nov 2016 - 11:06 am | नूतन सावंत
कथा आवडली,पुढील भागही वाचायला आवडेल.
5 Nov 2016 - 5:08 pm | एक एकटा एकटाच
चांगलीय
5 Nov 2016 - 7:58 pm | पियुशा
20 फूट खोदणे शक्य आहे का पण एका माणसाला? उगा आपलया प्रश्न ;) पण तरीही मला हि कथा खूप आवडलि न पुढचा भाग टा का च हो :)
6 Nov 2016 - 3:37 pm | पैसा
बाब्बौ! घाबरवणारी कथा आहे. पुढचा भाग असायलाच हवा.
6 Nov 2016 - 6:59 pm | सतिश गावडे
भारी आहे कथा. ब्लुटुथने बाटलीतल्या माणसाशी बोलायची कल्पना भन्नाट आहे.
10 Nov 2016 - 5:26 pm | स्वाती दिनेश
भारी आहे.
पुढे काय झाले असावे? असा प्रश्न गोष्ट संपताना शिल्लक राहतो आहे, त्यामुळे पुढचा भाग लिहायचे मनावर घ्या.
स्वाती
15 Sep 2017 - 4:17 pm | तुडतुडी
दुसरा सूडाचा भाग यायलाच हवा . २०१७ च्या दिवाळी अंकात टाकता येतोय का बघा .
15 Sep 2017 - 5:09 pm | तुडतुडी
जमिनीपासून २० फूट खाली मोबाईलला रेंज येते का ;-D . असो