किल्ले ढाकची भरकटलेली भटकंती

हृषीकेश पालोदकर's picture
हृषीकेश पालोदकर in भटकंती
19 Oct 2016 - 1:37 pm

खंडाळयाच्या घाटातील राजमाची किल्ला तसा ब-याच जणांच्या परिचयाचा आहे. राजमाची किल्ला हा श्रीवर्धन आणि मनोरंजन ह्या दोन वेगळ्या दुर्गांचा मिळून बनलेला आहे. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार हा किल्ला अजूनही मजबुतीने उभा आहे . घनदाट जंगलात वसलेल हे ठिकाण एकदा अवश्य भेट देण्यासारख आहे. दुरून ही जोडगोळी जितकी आक्राळ विक्राळ वाटते तितकी मात्र ती नाही. एखाद्या धष्टपुष्ट पाहिलवानाने अदबीने आणि नम्रतेने मृदु आवाजात बोलल्यास आपल्याला त्याच्याबद्दल जो आदर निर्माण होतो तोच अनुभव गडाजवळ गेल्यावर येतो.
राजमाची सर करायला आम्ही चौघा मित्रांनी सायंकाळी सात वाजता लोणावळयातुन सुरुवात केली. २००५ चा मार्च महिना होता. वन्य प्राणी पाहायला मिळावे म्हणून अंधाराची वेळ मुकरर केली होती. पोर्णिमा दोन तीन दिवसांवर होती, तसा चंद्रप्रकाश भरपुर होता त्यामुळे बॅटरी घेतली नव्हती. आणि त्याकाळी आमच्यापर्यंत मोबाईल पण पोहोचले नव्हते.आमची सहल वेळेवर ठरल्याममुळे मावळे कसेबसे कॉलेज उरकून हाताला येईल ते सामान आणि कपडे घेउन आले होते. लोणावळा स्टेशन वरून काही अंतर चालून तुंगार्ली धरणा नंतर एक घळ आहे तिथून खरा जंगल प्रवास सुरु होतो. घळीत जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा डोळे उघडे आहे हे पाहायला डोळ्यात बोट घालून पाहाव लागाव इतका काळाकुट्ट अंधार होता. दाट झाडी होती. हे अंतर कसंबसं धडपडत पार पडलं. पुढे दोन तीन तास आंधळी कोशिंबीर खेळत आणि छत्रपती शिवरायांचा जयघोष करत रात्री एक वाजता आम्ही उधेवाडी या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात पोहोचलो. कुत्र्यांच्या संरक्षक टोळीने आमचं धडाक्यात स्वागत केल. सुदैवाने गावातली एक व्यक्ती जागी होती.त्यामुळे एका घरात पथारी टाकायला जागा आणि प्यायला पाणी मिळाले.
सकाळी मावळे निवांत उठले. रात्रीच्या प्रवासाच्या गप्पा मारत मारत चहा नाश्ता झाला मग श्रीवर्धन आणि मनोरंजन च्या देशेने कूच केल. गडांवरून सभोवतालचा परिसर खूप सुंदर दिसतो . खंडाळ्याच्या घाटातली रेल्वे तर खेळण्या सारखीच दिसते. गडावरील वास्तू पाहत आणि वेगवेगळे ऐतिहासिक प्रसंग आठवत वेळ कसा जातो कळत नाही. श्रीवर्धन गडावर एक विस्तीर्ण गुफा आहे त्यासमोर मोठा पाण्याचा हौद आहे. चांगला दोन तीन पुरूस खोल. त्यात दोन तोफा पडलेल्या आहेत. या गुहेत बरेच ट्रेकर्स मुक्काम करतात. बाले किल्ल्यावरून पूर्वेला ढाकचा बहिरी दक्षिणेला लोहगड आणि विसापूर किल्ले दिसतात. ढाकचा बहिरी त्यामानाने जवळ वाटतो. आमच्यातल्या एका मावळ्याने ताबडतोब ढाकच्या स्वारीचा प्रस्ताव मांडला आणि तो सर्वानुमते संमत झाला. त्यानंतर एक तासाच्या आत जेवणाच्या भाकरी घेऊन आम्ही ढाकसाठी निघालो. उन चांगलच तापल होत. चार पाच तासांची पायपीट करून दाट जंगलात हा किल्ला आहे . वाचून या गडाबद्दल थोडीफार माहिती होती. वरवंड गावातुन पुढील वाटेची खातरजमा केली. “वाट चांगली हाय पण जंगलात चुकू नका अन गडाच्या टाक्याशिवाय रस्त्यात कुठंच पाणी गावायच नाय “ असा मोलाचा सल्ला एका गावकरीने दिला.
कसला गड आणि कसली गुफा. तीन एक तासाची पायपीट बाकी होती. सहयाद्रीच रौद्र रूप,घनदाट जंगल, ती सगळी निरव शांतता, किडयांचा विचित्र आवाज, चढ उतारांची ती वाट, कुठल्या तरी नवीन जगात आल्यासारखं वाटत होत . मधुनच कुठल्यातरी जंगली वनस्पतीचा सुगंध दरवळुन जायचा. तो आजही आठवल कि नाकात दरवळतो. संध्याकाळ जवळजवळ झालीच होती. साक्षात शिवरायांनी दोनदा भेट दिलेल्या जांबोली गावाजवळ असलेल्या कुंडेश्वर शिव मंदिरात आम्ही पोहचलो. आधी विचार होता मंदिरातच मुक्काम करावा परंतु तिथे थांबायची कुणाची हिम्मत होत नव्हती. सोमवार असल्याने पूजा वगैरे कुणीतरी करून गेलेले होते पण बाकी भयाण वाटत होते. इथुन दोन तीन वाटा फुटतात नशिबाने आम्ही जी पकडली तीच वाट बरोबर होती. थोडा वेळ चालल्यावर ढाकच्या डोंगराच्या अलीकडे एक दरी पार करावी लागते.संपुर्ण पश्चिम दिशा हया डोंगराने अडवल्यामुळे सुर्यनारायणाने आम्हाला तासभर आधीच निरोप दिला होता. त्या दरीत खुप दाट झाडी होती. हळु हळु अंधार पडायला लागला आणि पक्षांचे विचित्र आवाज यायला लागले.वाटेत एखादा वाटसरू भेटेल हा आमचा अंदाज साफ चुकला.राजमाची किल्ला आणि ढाक यात खुप जास्त फरक आहे हे कळायला आम्हाला फार उशीर लागला.
ढाकचा किल्ला म्हणजे एक महाकाय डोंगर.सभोवती घनदाट जंगल आणि नसल्यात जमा असलेली मानव वस्ती. गडाचा एकीकडचा संपुर्ण भाग म्हणजे केक कापल्याप्रमाणे सरळसोट कातळकडा ज्यात बहिरोबाची गुफा आहे आणि दुसरीकडे नावापुरती वाट असलेला पण त्यामानाने जरा बरा डोंगराचा भाग. दोन पावलांपुरतीच जागा असलेली ही वाट सरळ गडावर जाते. आजमितीस गडावर किल्याचा एकही अवशेष शिल्लक नाही. बहिरोबाच्या गुफेकडे जाण्यासाठी घळी उतरल्यावर पाउलवाटेने एका गुफेपर्यंत जाता येते.ती पण नावापुरतीच गुफा आहे. इथुन झाडाच्या मुळा टांगलेल्या आहेत. त्यांना पकडुन अंदाजे पन्नास साठ फुट चढल्यावर एक दुसरी मोठी गुफा आहे हेच आहे भैरोबाचे मंदीर. हया मंदीरावरूनच गडाला ढाकचा बहीरी हे नाव पडले आहे. हय गुफेतच कधीही न आटणारी पाण्याचे दोन टाके आहेत. अर्थात हि सगळी माहिती नंतर कळाली.
आम्ही जिथे उभे होतो तिथून एक वाट दरीत आणि दुसरी वाट डोंगरावर जात होती . दरीतल्या वाटेने थोड पुढे जाऊन पहिल पण पावलागणिक ती अवघड होत होती त्यामुळे ती फसवी वाट असावी म्हणून दुसऱ्या वाटेने गडावर चढायला सुरुवात केली . सुरुवातीला मोठी वाटणारी ती वाट हळूहळू खूप निसरडी आणि अदृश्य व्हायला लागली . पुढे तर एक पाय ठेवण्य पुरती पण जागा नव्हती . आम्ही गडबडलो . आपण चुकलो हे लक्षात आलं. सगळा धीर सुटला . दुरून आकर्षक वाटणाऱ्या ह्या जंगलात संध्याकाळ इतकी भयाण असते अस कधी वाटल नव्हत . अंगातले त्राण गेले . आता कुठलीही वाट पकडणे म्हणजे आत्महत्या करण्यासारख होत . तिथे थांबणे म्हणजे वन्य प्राण्यांची भीती . कसबस धीर एकवटून रात्र इथेच घालवायची अस मावळ्यांनी ठरवलं . दाट झाडी पासून दूर डोंगराच्या एका कड्यावर जागा शोधली. आम्ही जिथे बसलो होतो तिथून समोर तीन चार फुटाचं अंतर होतं व पुढे खोल दरी. बसायला आणि टेकायला त्यातल्या त्यात ही बरी जागा होती. आसपास झाडी नसल्यामुळे प्राण्यांची भीती नव्हती. जंगलातुन चित्रविचित्र आवाज येत होते.सभोवतालचं भयानक जंगल, आक्राळ विक्राळ डोंगर , नजर न पुरणारी दरी आणि विचित्र आवाजांचं पार्श्वसंगीत असा डोळयासमोर हॉलीवूड पिक्चरचा खराखुरा सेट तयार झाला.
पुण्यावरून निघाल्यापासून आम्ही मित्र एकमेकांशी ऐतिहासिक भाषेतच बोलत होतो. अविश्रांत बडबड करणार आमचं सैन्य आता मात्र केंव्हाचं चिडीचूप होत. आसपासच्या वाळलेल्या काड्या ,गवत गोळा करून आग पेटवली. प्रकाशाने धीर वाटला. आता एकाच गोष्टीची फिकीर होती ती म्हणजे आमच्याकडे फक्त अर्धी बाटली पाणी,दीड नाचणीची भाकरी आणि दोन बिस्किटचे पुडे एवढंच सामान शिल्लक होते. दिवसभराच्या चालण्याने खूप भुका लागल्या होत्या. उपाय म्हणून दर एक दीड तासाने प्रत्येकाने अर्धा अर्धा बिस्किट खायचं असा इर्मजन्सी प्लान ठरला. रात्रभर सगळयांनी जे जे येईल ते सांगायचं , गायचं आणि जागत राहायचं. प्राणी आल्यास कुठल्या बाजुला पळायच , ओरडायच कसं हयावर चर्चा करून आम्ही एक दोन तास अजुन ढकलले. मधुनच चंद्र आमची थट्टा करायला यायचा आणि परत ढगामध्ये लपून जायचा. कुणीतरी खटयाळपणे जोक करायचे. कुणी डुलक्या मारत होते.कुणी झोपेत बोलत होते,असं वाटत होतं की आडवं पडायला तरी मिळावं किंवा निदान पाय पसरावे पण समोर मोठी दरी.त्यातच दुर कुठल्यातरी डोंगरात वणवा पेटला होता.त्यामुळे ती पण भीती मनात घर करायला लागली होती. एक दोनदा प्राण्यांचे भास झाले. ती भयाण रात्र आपला एक एक डाव मांडत होती.
सुर्यनारायणा च्या स्वागताची रांगोळी पूर्वेला क्षितिजावर दिसू लागली . मोरांचे आवाज यायला लागले आणि जीव भांड्यात पडला. सकाळी येणाऱ्या पक्ष्यांचा किलबिल आवाज आणि रात्रीच्या पक्ष्यांचा भेसूर आवाज यात जीवन आणि मृत्यूचे सूर आहेत अस त्यादिवशी जाणवल. वेळ न घालवता सगळयांनी आधी शेकोटी नीट विझवली ,चतकोर भाकरी आणि पाण्याचा घोट घेऊन परतीच्या वाटेला लागलो. किल्ला बघण्याचा विचार देखील कुणी केला नाही. उन लगेच चढायला लागले होते. प्रचंड तहान लागत होती.बाटलीत फक्त चार घोट पाणी शि ल्लक होत आणि तेही जर कुणाला फारच त्रास झाला तर देण्यासाठी. कण्हतं कुथत पावलं मोजत आम्ही चालत होतो पण पाण्याविना चालवत नव्हत. कधी आपण पोटभर पाणी प्यू अस वाटत होत. निर्जळी चे संकट सोसायची ताकद उरली नव्हती. एक दोन ठिकाणी वाळूत झीरे उकरण्याचा प्रयत्न केला पण जमल नाही. पुढे एका ठिकाणी सुकलेला ओढा होता. त्यात एक घाण पाण्याचे डबके होते. जेमतेम टोपल्यात मावेल एवढे पाणी .त्या पाण्याची अवस्था वेगळी सांगायला नको , पण ती काही आम्हाला ते हिरवेगार पाणी पिण्यापासुन थांबवु शकली नाही.त्या पाण्याचा दुष्परिणाम नंतर बरेच दिवस जाणवला पण त्यावेळी आम्हाला जिवंत ठेवण्याचं काम त्या पाण्याने केलं. सगळे निमुटपणे चालत होते. काही वेळाने एकदाच वरवंड गाव आलं. गावातल्या एका घरात भरपेट पाणी प्यालो.तिथल्याच एका दुकानातुन बिस्किटचे पुडे मागवले आणि उन शांत होईपर्यंत तसेच बसुन राहिलो. मजल दरमजल करत कसेबसे मावळे एकदाचे घरी पोहोचले आणि आमची भरकटलेली भटकंती संपली.
लोक नियोजन करून अविस्मरणीय ठिकाणी फिरायला जात असतात पण विना नियोजनाची आमची ट्रीप अविस्मरणीय झाली . आजही कुणी ढाक चे नाव काढल्यास आम्हाला आधी पाणी आठवतं आणि मग ढाकचा किल्ला.
टीप : फोटो उपलब्ध नाहीत.

प्रतिक्रिया

एस's picture

19 Oct 2016 - 2:27 pm | एस

:-)

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Oct 2016 - 2:57 pm | अनिरुद्ध.वैद्य

काही न होता सुखरुप परत आलात! बाकी वर्णन मस्त!

हृषीकेश पालोदकर's picture

19 Oct 2016 - 5:48 pm | हृषीकेश पालोदकर

धन्यवाद

भटकंती अनलिमिटेड's picture

19 Oct 2016 - 3:09 pm | भटकंती अनलिमिटेड

ट्रेक हे माहिती न काढता जाण्याची ट्रिप नव्हे हे पटले तुम्हांला. सुदैवाने कुठला वाईट अनुभव आला नाही.

हृषीकेश पालोदकर's picture

19 Oct 2016 - 5:23 pm | हृषीकेश पालोदकर

खरय्र

जयंत कुलकर्णी's picture

19 Oct 2016 - 3:18 pm | जयंत कुलकर्णी

१९७२च्या आसपास मी आणि माझा एक मित्र असेच या जंगलात हरवलो होतो. नशिबाने आम्हाला काही भाविक भेटले. त्यांनी आम्हाला सगळ्या चामड्याच्या वस्तू जंगलात काढायला लावल्या, बूट, घड्याळ काढायला लावले व तेथेच एका झाडाखाली ठेऊन मग आम्ही बहिरीला गेलो. गंमत म्हणजे त्यातील एका माणसाच्या गळयात एक बकरी अडकविली होती. कसलातरी नवस फेडायला मंडळी वर चालली होती. आमचीही वरात त्यांच्याबरोबर निघाली. वर मोठ्या कष्टाने गेल्यावर गर्वाचे घर एका सेकंदात खाली झाले कारण तेथे गुहेत असंख्य माणसांनी आपली नावे लिहिलेली आढळली. ती अजून तेथे आहेत का हे माहीत नाही. कारण परत काही जाणे झाले नाही. आणि आता तर शक्यच नाही. येताना परत सामान गोळा केले व खाली आलो.... आज मला तुमच्यामुळे ते सगळे आठवले. त्याकाळात ट्रेकींग करणारे फार थोडे असायचे त्यामुळे रस्ते विचारणे इ...ही भानगड विशेष नसायची. :-)

भटकंती अनलिमिटेड's picture

19 Oct 2016 - 3:21 pm | भटकंती अनलिमिटेड

ती नावे आणि भिंती मागच्या वर्षी एका ग्रुपने स्वच्छ केली. त्या ग्रुपाचा मीही अगदी लहानसा भाग.

हृषीकेश पालोदकर's picture

19 Oct 2016 - 5:46 pm | हृषीकेश पालोदकर

खुपचं चांगलं काम केलत तुम्ही.

भटकंती अनलिमिटेड's picture

19 Oct 2016 - 3:22 pm | भटकंती अनलिमिटेड

ती नावे आणि भिंती मागच्या वर्षी एका ग्रुपने स्वच्छ केली. त्या ग्रुपाचा मीही अगदी लहानसा भाग.

हृषीकेश पालोदकर's picture

19 Oct 2016 - 5:25 pm | हृषीकेश पालोदकर

१९७२ म्हणजे जंगल तुफान असेल. तुमचा अनुभव भारी आहे.

टवाळ कार्टा's picture

19 Oct 2016 - 3:29 pm | टवाळ कार्टा

निष्काळजीपणाचे उदात्तीकरण? बाकी स्वतःला मावळे वगैरे म्हणवून घेणे ही फॅशनच झालीये आजकाल...इतके निष्काळजी वागूनसुद्धा स्वतःला मावळे वगैरे म्हणवून घेणे हा "मावळा" या शब्दाचा अपमान नाही का?

हे असे फक्त मलाच वाटतेय का?

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Oct 2016 - 3:38 pm | अनिरुद्ध.वैद्य

म्हणवुन घेतात हो. अस नाय करु.

हृषीकेश पालोदकर's picture

19 Oct 2016 - 5:45 pm | हृषीकेश पालोदकर

धन्यवाद !निष्काळजीपणा आहे यात शंका नाही. उदात्तीकरण अजिबात नाही.
छत्रपती शिवरायांचे आणि स्वराज्याचे सैनिक म्हणजे मावळे होणे हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असावे आणि अशी फॅशन वाढतच जावो.
त्यासाठी लागणारी पात्रता प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात असतेच.

जयंत कुलकर्णी's picture

19 Oct 2016 - 9:22 pm | जयंत कुलकर्णी

मी स्वतः जेव्हा ट्रेकिंग करायचो, तेव्हा अमचे गुरु होते कर्नल डॉ. बापूकाका पटवर्धन. यांच्याबद्दल कोणाला माहीत नसेल तर मी लिहीन. त्यांनी कधीच ट्रेकिंगकडे एक क्रिडाप्रकार याशिवाय दुसर्‍या कुठल्याही दृष्टिकोनातून पाहिले नाही. त्यांनाही असाच राग यायचा... पण प्रामाणिकपणे सांगतो त्यांच्याबरोबर आख्खा सहुआद्री पालथा घातला पण प्रत्येक गडावर पोहोचल्यावर मावळ्यांची युद्धघोषणा तोंडातून बाहेर पडायचीच.... त्यावेळेस ते फक्त स्मितहास्य करायचे...

प्रचेतस's picture

19 Oct 2016 - 9:53 pm | प्रचेतस

बापूकाका पटवर्धनांबद्दल बरेचसे ऐकलेले आहे.
काका, तुम्ही त्यांच्यासोबतच्या आठवणींबद्दल अवश्य लिहा. वाचायला आवडेल.

डॉ. पटवर्धनांच्या ट्रेकिंग च्या नोंदी सायक्लोस्टाइल पद्धतीने प्रिंट केलेल्या खासगी सर्क्युलेशन मध्ये आहेत असे ऐकलेले आहे. तुमच्याकडे त्या आहेत का?

वेल्लाभट's picture

19 Oct 2016 - 5:57 pm | वेल्लाभट

कमॉन टका. उदात्तीकरण नाहीये हे. तिथे असं म्हटलंय का की 'जा बिन्धास काय नाय होत!' जो आला अनुभव प्रामाणिकपणे सांगितलाय. इन फॅक्ट छान लिहिलाय अजून फुलवता आला असता.
मावळा शब्दाबद्दल ज्याचं त्याचं मत ब्वा पण निष्काळजीपणाचं उदात्तीकरण मुळीच नाहीये.

शब्दबम्बाळ's picture

19 Oct 2016 - 6:26 pm | शब्दबम्बाळ

छान लिहिलंय त्यांनी!
असे उपद्व्याप चुकून कधी तरी झालेलेच असतात, त्यांनी तेच मांडलय... उदात्त्तीकरण काय त्यात!
आणि त्या वेळेचे "मावळे" म्हणजे माणसेच होती हाडामांसाची! तेही चुकले असतीलच कधी ना कधी...
त्यामुळे आजच्या कोण्या माणसाला "मावळा" म्हणवून घ्यावासा वाटलं तर इतकं काय वाईट वाटून घ्यायचं त्यात!

जयंत कुलकर्णी's picture

19 Oct 2016 - 9:16 pm | जयंत कुलकर्णी

टकासाहेब हे आपण ट्रेककडे कुठल्या दृष्टीकोनातून पाहताय यावर अवलंबून आहे. जे लोक याकडे एक क्रिडाप्रकार म्हणून बघतात त्यांना हे असले काही पटणे शक्यच नाही. पण ज्यांना इतिहासात थोडेतरी शिरायचे आहे त्यांना मावळे, महाराज आठवणारच. शिवाय हे सगळे होवून गेल्यावर अजून काय लिहिणार ना ते ? नाही का ?

वेल्लाभट's picture

19 Oct 2016 - 5:57 pm | वेल्लाभट

चांगलं लिहिलंयत. शेवट खिळवून ठेवणारा झालाय. लिहीत रहा.

हृषीकेश पालोदकर's picture

19 Oct 2016 - 6:17 pm | हृषीकेश पालोदकर

धन्यवाद !

कंजूस's picture

19 Oct 2016 - 6:12 pm | कंजूस

छान वाटली भटकंती.
मीही सांडशी(कर्जतकडून)ढाकचा परिसर चारपाचवेळा भरकटत काढलाय.एकदाच बरोबर कोंडेश्वरला पोहोचलो.तिकडे देवळात मुकाम करता नाही आला कारण आत काम चालू होते त्याचे सिमेंट पडलेले होते. जवळच एका घरात कोणी राहात होते.पण तिकडे न राहता ओढ्यापाशी एक कुडाचं खोपट होतं सहा बाइ सहाचं. आत सारवलेली माती आणि एक वरवंट्यावढा वनदेव होता. तिथेन रात्र काढून सकाळच्या आठच्या जांभूली-कामशेत बसने परत आलो. ढाक गाव गडाच्या पार उत्तरेला आहे एक तासावर.

हृषीकेश पालोदकर's picture

19 Oct 2016 - 6:24 pm | हृषीकेश पालोदकर

व्वा ! खुपदा फिरलाय तुम्ही. मस्तच.

ढाकचा रस्ता तसा लोणावळामार्गे न चुकण्यासारखाच. तुंगार्लीवरून उतरणारा रस्ता कुठेही न सोडल्यास तो थेट ढाकपाशीच घेऊन जातो. मध्ये फक्त राजमाचीसाठी डावी मारावी लागते. ती न मारल्यास थेट ढाकच. रस्ताही प्रचंड सुंदर, सह्यधारेच्या कडेने जाणारा. डावीकडे मांजरसुंब्याचं नाकाड अगदी आभाळात घुसल्यासारखे दिसते आणि एका विवक्षित स्थळी ढाकचा खडा पहाड अगदी अंगावर आल्यासारखा समोर येतो. सह्याद्रीतल्या सर्वोत्तम दृष्यांपैकी ते एक दृश्य.
जीवधनवरून दिसणारा वानरलिंगी, रतनगडावरून दिसणारा कात्रा कडा आणि ढाकच्या पहाडाचे अचानक होणारे प्रथमदर्शन ही तीन दृश्ये आयुष्यात कधीही न विसरण्याजोगी.
बहिरीच्या गुहेत जाताना चुकण्याचा संभव आहे तो फक्त ढाकच्या घळीच्या खालच्या घनगर्द राईत. तिकडे पानांच्या सड्यामुळे वाटा हरवून जातात. भीमाशंकरला जाणारा रस्ता तिथूनच फुटतो. तशी एक बाणाची खूणदेखील तेथे आहे. बाकी ढाकच्या कड्याबद्दल काय वर्णावे...धडकी भरवणारे रौद्र सौंदर्यच ते.

हृषीकेश पालोदकर's picture

19 Oct 2016 - 11:55 pm | हृषीकेश पालोदकर

प्रचेतस तुमचं अगदी बरोबर आहे. गड आणि सुळका त्यामधली घळी आम्ही उतरलो पण अंधारामुळे गड समजणे कठीण होते.दरी घाबरवणारी आहे आणि प्रचंड वानरसेना तिथे गोंधळ घालीत होती.यामुळे बरोबरची मंडळी मागे फिरण्यासाठी आग्रही झाली. अश्या ठिकाणी सर्वांना धरून चालणे महत्वाचे असते हे आपण जाणताच. वेळ कठीण असते आणि काही सदस्य संयम सोडतात.महत्वाचे असते सर्वांची एकी बाकी वाटा तर चुकतच असतात.

स्पार्टाकस's picture

20 Oct 2016 - 8:27 pm | स्पार्टाकस

जीवधनवरून दिसणारा वानरलिंगी, रतनगडावरून दिसणारा कात्रा कडा आणि ढाकच्या पहाडाचे अचानक होणारे प्रथमदर्शन ही तीन दृश्ये आयुष्यात कधीही न विसरण्याजोगी.

कुलंगच्या मागच्या कड्याखाली दिसणारी दरी, हरीहरची अचानक समोर येणारी दगडी शिडी, गोरखगडाचा रॉक पॅच उतरताना एका क्षणी अचानकपणे समोर उभी राहणारी दरी, भीमाशंकरच्या दुसर्‍या शिडीखालची दरी, भवानी टोकाचा अचानक समोर येणारा फ्री फॉल, सवाष्णीचा घाट उतरताना ... बर्‍याच जागा आहेत अशा अचानकपणे समोर येणार्‍या...

प्रचेतस's picture

20 Oct 2016 - 10:20 pm | प्रचेतस

अगदी.
सह्याद्रीत अशा बऱ्याच जागा आहेत पण प्रत्येकाच्या मनात खोलवर काही जागा खास घर करून असतात तशातला प्रकार :)

हृषीकेश पालोदकर's picture

20 Oct 2016 - 10:24 pm | हृषीकेश पालोदकर

बापरे !!!
मला अजून पोहोचायचं आहे या जागी.
कुलंग ...नाव ऐकूनच पोटात गोळा येतो.

अजया's picture

19 Oct 2016 - 10:39 pm | अजया

लेख आवडलाच.
प्रचेतसरावांचा प्रतिसाद पण! तीनही जागा बघून याव्याशा वाटल्या प्रतिसाद वाचून!

पद्मावति's picture

20 Oct 2016 - 12:09 am | पद्मावति

थरारक भटकंती. छान लिहिलंय.

कंजूस's picture

20 Oct 2016 - 6:24 am | कंजूस

मला डोंगरावर कोणी मावळे भेटतात आणि त्यांनाही मी मावळाच वाटतो आणि समजतात.काही संदर्भ सांगतात तेव्हा तो कळावा म्हणून पुरंदरे थोडक्यात लिहून घेतलय.

अमलताश's picture

21 Oct 2016 - 9:44 am | अमलताश

थरारक अनुभव .. नवख्या ट्रेकर्स ना बऱ्याचदा असे अनुभव येतात आणि नंतर आयुष्यभराच्या आठवणींचा भाग बनून जातात. माहुलीच्या जंगलात आम्हीही असेच वाट चुकलेलो रात्रीच्यावेळी त्याची आठवण झाली. बाकी तुमच्या हिंमतीला दाद दिली पाहीजे.
ढाकच्या जंगलाबद्दल काय बोलावे. या परिसराभोवती एक गूढतेचे वलय आहे. सांडशीहून वर चढताना लागणाऱ्या जंगलात ते अधिक प्रकर्षाने जाणवते. या वाटेने चढताना भरदिवसा तीनदा रस्ता चुकलोय. जांभुलीहून येणारा रस्ता तुलनेने सोपा आहे. पण शेवटचा र‌ॉ‌कपॅच काही चुकत नाही.मी मी करणाऱ्या भल्याभल्यांची गाळण उडते तिथे. स्थानिकांच्या श्रद्धेनुुसार ढाक बहिरीच्या गुहेत महिलांना प्रवेश नाही. गेल्यावर्षी hidden trekkers नावाच्या एका ग्रुपसोबत ढाकच्या गुहेत राहीलो होतो. बाजूच्या गुहेत साफसफाई करण्यासाठी ते आले होते.
त्यांची फारच मदत झाली.
आणखी एक, जांभुली गावात राहणारा व स्वतः ला बहिरीचा पुजारी सांगणारा एक माणूस आहे. चेहर्‍यावर देवीचे व्रण आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेकर्स ना, गुहेपर्यंत जाणारी शिडी लावायची आहे असे सांगून देणग्या मागत असतो. गावातल्या लोकांच्या सांगण्यानुसार कोंडेश्वर मंदिरात रात्री राहणाऱ्यांंकडून पण तो पैसे घेतो असे कळले.

हृषीकेश पालोदकर's picture

21 Oct 2016 - 10:53 am | हृषीकेश पालोदकर

छान फिरला आहात तुम्ही.
सांडशीवरून मी गेलेलो नाही पण तुम्ही सांगता त्यावरून मस्त असेल तो रस्ता.
पैसे घेणाऱ्या माणसापासून सांभाळून राहायला हवे....कारण पैसे न दिल्यास चुकीच्या वाटा दाखवल्याच्या घटना घडल्या आहेत, अर्थात त्या खूप तुरळक.

संदीप ताम्हनकर's picture

21 Oct 2016 - 8:18 pm | संदीप ताम्हनकर

मनोरंजन नाही, मनरंजन. तपासून पाहावे....

तिमा's picture

22 Oct 2016 - 7:35 pm | तिमा

ढाकच्या मोहिमेवर नियोजनाशिवाय जाणं, म्हणजे वेडं साहस. तुम्ही सर्व सुखरुप परत आलात, ह्याचा आनंद आहे. आमचा ग्रुप गेला होता, तेंव्हाही , आमच्यासारखे लिंबु टिंबु खालीच थांबले होते. मुळांना धरुन हाताच्या जोरावर वर जाण्याची ताकद नव्हती आमची!

ट्रेड मार्क's picture

25 Oct 2016 - 12:40 am | ट्रेड मार्क

कॉलेजमध्ये असताना असंच मित्राने ढाकला ट्रेकिंगला जाऊ म्हणून म्हणून प्रस्ताव ठेवला. त्याने बरेच ट्रेक केले होते, ढाकला पण एकदा जाऊन आला होता. याउलट मी एकही ट्रेक केला नव्हता, पर्वती पायऱ्यांवरून चढून जाणे हेच फक्त माझ्या खाती जमा होते. आम्ही ४ मित्रांनी जायचे ठरले. त्यातले दोघे ट्रेकिंगचा अनुभव असलेले व उर्वरित दोघे (मी धरून) अगदीच अननुभवी. मी नकाराचा सूर लावला म्हणून मला असे सांगण्यात आले की अगदी सोपा ट्रेक आहे, वरपर्यंत जायला छान रस्ता वगैरे आहे. म्हणून मी तयार झालो.

साधारण दुपारनंतर पुण्यातून निघालो. अनुभवी दोघे अगदी व्यवस्थित हंटर शूज घालून आले होते आणि अननुभवी आम्ही दोघे साधे कॅनव्हासचे बूट घालून. घरून निघताना तयार अन्न घेतले होते. रात्री धरणाशेजारी बसून जेवून घेतले. तिथूनच माझ्या धडपडीला सुरुवात झाली. हात धुण्यासाठी म्हणून जरा बाजूला गेलो तर एक पाय ३ फूट खड्ड्यात गेला. त्यामुळे एक पाय वर आणि एक खड्ड्यात असा उभा राहिलो. पुढे बराच वेळ चालल्यावर एका देवळात थांबलो. सकाळी पुढे चालू लागल्यावर मी किती मोठी चूक केलीये त्याची प्रचिती वारंवार येऊ लागली. दुपारी जेवायला म्हणून बसलो तर दोघांकडचे अन्न खराब झालं होतं. उर्वरित अन्नामध्ये चौघांनी खाऊन घेतलं आणि पुढे वाटचाल सुरु ठेवली.

ती खिंड, आडवा पार करायला लागणारा कातळ - ज्याला हाताची आणि पायाची बोटं ठेवायला फक्त जागा आहे आणि खाली काही हजार फूट दरी, २x२ च्या चौथऱ्यावर टेकलेला आणि वर फक्त एका खिळ्याला बांधलेला वेल, ती गुहा हे सगळंच अविस्मरणीय आणि तेवढंच खतरनाक.

त्यात आमच्या जवळ खायला काही नव्हतं. दुसरा एक ट्रेकिंग ग्रुप भेटला. ते शिधा घेऊन आले होते. ते तिथे बनवत असतानाच बहुतेक आमची उतरलेली तोंडं बघून त्यांना कळले आणि त्यांनीच थोडं खायला दिलं म्हणून उपासमार टळली. उतरताना मुरुमावर कॅनव्हासचे बूट अजिबात पकड घेईनात. त्यामुळे निम्म्याच्यावर अंतर मी बसूनच उतरलो. माझी पॅन्ट आणि बूड दोन्हीची पार वाट लागली होती. माझ्या आयुष्यातला तो एक अविस्मरणीय अनुभव आहे. सुखरूप परत
आलो हेच नशीब.

हृषीकेश पालोदकर's picture

25 Oct 2016 - 12:51 pm | हृषीकेश पालोदकर

जबरी मजा आली तर....

ट्रेड मार्क's picture

25 Oct 2016 - 8:18 pm | ट्रेड मार्क

मजा तर आलीच परंतु बाकी पण बरंच काय काय झालं....
जागा आणि प्रसंगानुरूप - पश्चाताप (कुठून इथे आलो), xx फाटणे (कातळ व वेलीवर), भीती, हरवून जाणे (निसर्गसौन्दर्य बघून), स्वतःच्या जीवाची किंमत कळणे, अन्न व पाणी किती आवश्यक आहे त्याचा पुनःप्रत्यय येणे, संपूर्ण खाली उतरल्यावर जीवात जीव येणे, उतरल्यावर खालून त्या गुहेचे दर्शन झाल्यावर अभिमान आणि आपण खूपच धाडसी आहोत असं वाटणे हे सर्व २-३ दिवसात झालं.

उतरताना एकदा आम्ही दोघे अननुभवी ट्रेकर हरवले पण होतो. झालं काय की डोंगराच्या साधारण मध्यावर आम्ही दोघे उभं राहून उतरण्यासाठी धरायला काही मिळतंय का ते बघत होतो आणि तेवढ्यात अनुभवी दोघे भराभर खाली उतरले. आम्ही दोघे पुढे उतरलो तर आम्हाला एक भले मोठे झाड आडवे पडलेले मधेच आले व पुढे मार्ग दिसेना. आम्हाला खालच्या दोघांचा आवाज येत होता व त्यांना पण आमचा आवाज जात होता परंतु कोण कुठे आहे काही कळत नव्हते. साधारणतः ३० मिनिटे शोधाशोध करून सापडले एकदाचे.

पैसा's picture

26 Oct 2016 - 6:29 pm | पैसा

थरारक अनुभव. मुलं थ्रिलसाठी जातात तेव्हा घरच्यांना नेमके काय करत आहेत हे बहुधा माहीत नसतेच.