पुण्यातला पहिला सायकल कट्टा संपन्न होतानाच या औरंगाबाद सायकल कट्ट्याची बीजे रोवली गेली होती. मोदकरावांचा पुण्यातल्या सायकल कट्ट्याचा हा लेख तुम्ही वाचला असेलच !अर्थातच या दोन्ही कट्ट्याचे प्रणेते मोदकरावाच आहेत हे येथे नमूद करणे अत्यंत महत्वाचे आहे.
तर, औरंगाबाद सायकल कट्टा २४ व २५ सप्टेम्बर ला करायचा असे ठरले. व त्याप्रमाणे कायप्पा ग्रुप स्थापन करण्यात आला. त्यात पुण्यातले औरंगाबाद सायकल कट्ट्याला येऊ इच्छिणारे आणि यजमान औरंगाबादकर ( संख्या ३) असे सामील झाले. २४ तारीख येत येत पुण्यातले ८ पैकी ३ गाळपाटले आणि ५ फायनल झाले. लातूरहून एकमेव मानसरावजी चंद्रात्रेसाहेब येणार होते ते पण ऐनवेळेला गाळपाटले . यथावकाश २१ तारखेला सगळ्यांचे कान्फरमेशन घेण्यात आले. आणि पूर्वतयारी पण झाली. ( फार काही नाही, गाडी कोणाची कोण चालवणार वगैरे).
ज्या २४ तारखेची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो ती तारीख उजाडली. प्रशांतराव सगळ्यांना गोळा करत करत शेवटी मला घेऊन आम्ही ठरलेल्या वेळेच्या दीड तास उशीरा म्हणजे ८.३० वाजता प्रस्थान केले. लगेचच मोदकरावानी जाहीर केले की नगर मध्ये नितीन पाठक साहेब आपल्यासाठी नाश्त्याला थांबले आहेत. पण मग त्यांनाच भूक अनावर झालेली असल्यामुळे त्यांनीच आपण शिरूर ला नाश्ता करू आणि पाठक साहेबाना सदिच्छा भेट देऊ असे जाहीर केले.
शिरूर बाजूला जाणेयेणे असल्यामुळे शिरूर च्या आधी सरदवाडी ला " दिग्विजय " ला मिसळ खाऊ असा मी प्रस्ताव मांडला आणि सार्वमताने तो पास होईपर्यंत आम्ही दिग्विजय ला पोहोचलो पण.
मिसळ खाल्ली . नंतर मोदकरावानी पान खाण्याचा ( सकाळी ११ वाजता ?) आग्रह केला. पण मला सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसल्यामुळे मी त्यांना नम्रपणे नकार दिला. आणि थोडी घाई करावी असे सुचवले.
नगर मध्ये आल्यावर नितीन पाठक साहेब आमची बी एस एन एल ऑफिस बाहेर आमची वाट बघत उभे आहेत असे समजले.
पाठक साहेबांनी लगेच आम्हाला जवळच्या उपाहारगृहात नेले आणि मग गप्पांची मैफिल जमायला वेळ लागला नाही. त्यात पाठकसाहेब गेली ३५ वर्ष सायकल चालवत आहेत आणि आतापर्यंत त्यांनी दीड लाख किलोमीटर पेक्षा जास्त सायकल चालवली आहे( सडपातळ बांधा असण्याचे कारण समजले) हे ऐकून आम्ही गपगार झालो. आणि सायकल चालवण्याच्या बाबतीत किती मागे आहोत ( विशेषतः मी ) हे जाणवले .
दीड दोन तास मनमुराद गप्पा झाल्या आणि टॅंक म्युझियम बघायला येण्याचे नक्की करून आम्ही नगर सोडले. प्रवासादरम्यान गप्पा चालू होत्याच. निवांत गप्पा मारत औरंगाबाद ला पोहोचलो. टुरीस्ट होम नामक हॉटेलात आम्ही राहण्याची उत्तम व्यवस्था यजमानांनी केली होती.
मग फोनाफोनी करून योगेश साळुंखे आणि केदार गोगटे आले आणि सर्वात शेवटी आपला दवाखाना बंद करून डॉ. श्रीहस बर्दापूरकर पण आले. ते सुद्धा सायकल चालवत! ( फार रेगुलर सायकल चालवतात)
ओळखी पाळखी झाल्यावर गप्पाना सुरुवात झाली. विषय अर्थातच सायकल हाच होता.
रात्रीचा बेत चिकन दम बिर्याणी , मटण सुखा , सलाड असा होता. आमच्यातले दोघे व्हेज अंड खाणारे असल्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल अंडा बिर्याणी मागवली होती त्यामुळे आम्हाला चिकन बिर्याणी वर यथेच्छ ताव मारता आला.
त्यानंतर अर्थातच पान! तारा पान!
इतक्या वेळेला औरंगाबाद ला येऊनही आपण या पानाच्या दुकानातले पान का खाल्ले नाही या विचाराने मला विलक्षण दुःख झाले. त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी मी दोन वेगवेगळी पाने खाल्ली. मोदकरावांना जरा जास्तच दुःख झाले असावे कारण त्यांनी पानांवर यथेच्छ ताव मारला ( च्यायला , बिर्याणी खाऊन पण यांच्या पोटात एवढी जागा कशी?)
तिथून १२च्या सुमारास हॉटेलवर परत आल्यावर मोदकरावांचा लेह लडाख ट्रिप चा दृकश्राव्य कार्यक्रम झाला. जोडीला मोदकभाऊ प्रत्येक फोटोमागे दडलेली कहाणी सांगत होते.आणि आम्ही आश्चर्यचकित होऊन ते बघत होतो. ( मोदकरावांची त्याबद्दलची लेखमाला चालू आहेच). कुतूहलमिश्रित प्रश्नांना मोदकभाऊ न कंटाळता उत्तरे देत होते.(पान इफेक्ट यु सी ). शेवटी एकेकाची विकेट पडायला लागली आणि कार्यक्रम २.३० ला आवरता घ्यावा लागला.
दुसऱ्या दिवशी लवकर निघायचे ठरले होते कारण वाटेत प्रा. डॉ. दिलीप बिरुटे सर भेटणार होते. त्यांनी नाश्त्याचे आमंत्रण दिले होते. औरंगाबाद हुन निघताना सकाळचा चहा विथ गप्पा झाल्या. तिथे डॉ.श्रीहास यांनी पुण्याला सायकलवर येण्याचा मानस बोलून दाखवला आणि त्यांचे पुण्यात ढोलताशाच्या गजरात जंगी स्वागत होईल असा विश्वास आम्ही त्यांना दिला. आणि आम्ही निघालो.
वाटेत सर भेटले . त्यांच्याबरोबर भरपूर गप्पा झाल्या . आम्लेट पाव, कटलेट, भुर्जी , तंदुरी चिकन असा भरपेट नाश्ता करून सरांचा निरोप घेतला.
वाघोली ला डिकॅथलॉन ला आमची ही सहल संपन्न झाली.
अत्यंत महत्वाची टीप : हा लेख मोदकभाऊंच्या नाकावर टिच्चून लिहिला आहे. कारण आपल्या ट्रिप चा एक फर्मास लेख तुम्ही लिहा अशी सगळ्यांनी विनंती / विनंत्या करूनही लेख लिहिण्याच्या दृष्टीने फोटो काढले नाहीत असे फुटकळ कारण देऊन त्यांनी नकार दिला .
अत्यंत दुर्लक्ष करण्याची टीप : खरे तर मी हा लेख/ वृत्तांत लिहिण्या मागची प्रेरणा मोदकभाऊ आणि बिरुटे सर आहेत. मोदकभाऊ त्यांच्या सायकलिंग ने , लेख लिहिण्याने आम्हाला प्रोत्साहित करत असतात हे नाकारून चालणार नाही.
फोटो मुद्दामून दिले नाही आहेत . फोटो कट्टेकऱ्यानी इथे टाकावेत अशी नम्र विनंती.
लेख लिहिण्याचा हा तिसराच प्रयत्न आहे. आपल्या सगळ्यांच्या पसंतीला उतरेल अशी आशा आहे. धन्यवाद.
प्रतिक्रिया
2 Oct 2016 - 4:17 pm | महासंग्राम
रिटर्न कसे आले शिवनेरी ने का ????
2 Oct 2016 - 4:37 pm | अरिंजय
"मानसरावजी चंद्रात्रेसाहेब" हे वाचुन उगाच बारामतीकर असल्या सारखे वाटते. मी आपला लातूरकरच बरा.
कट्ट्याला येऊ न शकल्यामुळे सुरु झालेली जळजळ आत्ता कुठे थांबली होती. लेख वाचुन पुन्हा सुरु झाली.
2 Oct 2016 - 6:22 pm | मोदक
त्ये "मानसचंद्ररावजी चंद्रात्रे साहेब" असे आहे.
2 Oct 2016 - 5:24 pm | बाबा योगिराज
वाह.
उप वृत्तांत आणि फोटू जमतील तसे टाकण्यात येतील.
बाबा योगीराज
2 Oct 2016 - 6:15 pm | मोदक
येस्स, उपवृत्तांत जरूर टाकणेत येईल.
आनंदरावांनी झकास लेख लिहावा म्हणून मी चालढकल केली (हा युक्तिवाद ग्राह्य धरावा)
2 Oct 2016 - 5:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आनंदराव, प्रथम लिहिते झालात, आनंद वाटला. वृत्तांतही चांगला लिहिला आहे. मोदकरावांना आपल्या इतका चांगला वृत्तांत लिहायला जमलाच नसता. (लावता का पैज) पाककृती आणि वृत्तांतलेखन यात फोटोशिवाय मजा नाही. म्हणून आपल्या वृत्तांतासाठी तातडीने फोटो डकवला आहे. बाकी, आपल्या सर्वांबरोबर गप्पा मारायला मजा आली. धन्स दोस्तहो.
डावीकडून नंबर एक Sagarsdy, अभिजित, प्रशांत, प्रा.डॉ., मोदक, आणि वृत्तांत लेखक आनंदराव.
-दिलीप बिरुटे
2 Oct 2016 - 8:05 pm | कंजूस
भारी आहे सायकल ग्रुप आणि फिरते कट्टे. >>त्यात पाठकसाहेब गेली ३५ वर्ष सायकल चालवत आहेत आणि आतापर्यंत त्यांनी दीड लाख किलोमीटर पेक्षा जास्त सायकल चालवली आह>>~~~!!!!!
2 Oct 2016 - 10:23 pm | एस
सायकल चालवण्याचे वर्णन नाहीये. सायकलकट्टा होता की फक्त सायकलप्रेमींचा कट्टा होता?
2 Oct 2016 - 11:41 pm | खेडूत
+१
सायकली दिसेनात कुठं!
तारा पान! गेल्याच आठवड्यात तिथे गेलेलो.
पान खाता खाता तिथला दरफलक वाचला. १० रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंतची पाने पहाता पहाता खाल्लेलं पान विरघळलं सुद्धा!
3 Oct 2016 - 9:24 am | नाखु
मोदकच्या साय्कल कट्टा धाग्यात सायकल नाही म्हणजे नंदी विना शंकरच की !!!!
(पळा आता) नाखु
3 Oct 2016 - 1:05 pm | पद्मावति
पाच हजारी पान??? बापरे!!
3 Oct 2016 - 12:54 pm | आदूबाळ
पानाचे फोटो न टाकल्याबद्दल संबंधितांचे आभार.
3 Oct 2016 - 2:20 pm | केडी
वाह, मस्त, शॉर्ट अँड स्वीट! अजून लिहीत जा आनंदराव!
3 Oct 2016 - 2:35 pm | शलभ
खूप मस्त कट्टा झाला आणि वृत्तांत पण. फोटो आधिच बघितलेत ग्रुपवर..:)
3 Oct 2016 - 3:08 pm | नितीन पाठक
आनंदरावांचा लेख मस्त जमून आला आहे. आपला सगळ्यांचा कट्टा एकदम मस्त झाला. तुम्हा सगळ्यांना भेटून खूपच आनंद झाला.
जसे श्री. चंदात्रे यांना "मानसरावजी चंद्रात्रेसाहेब" हे वाचुन उगाच बारामतीकर असल्या सारखे वाटते तसे मला तुम्ही "साहेब" म्ह्टल्यावर उगीचच "बारामतीकर आणि लातूरकर" (संयुक्त) असल्यासारखे वाटते.
डॉ. श्रीहास ज्यावेळी औरंगाबाद हून पुण्याला जातील त्यावेळी मला त्यांनी नगरला जरूर भेटून पुढे जावे ही नम्र विनंती.
3 Oct 2016 - 10:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाठक साहेब, मला तुम्हाला नक्की भेटायचं आहे !
-दिलीप बिरुटे
4 Oct 2016 - 2:43 pm | नितीन पाठक
नमस्कार डॉ. प्रा.
मी मिपा चा नियमित वाचक असून तुमच्या लेखाचा पंखा आहे. नगरला सर्व ही दिग्गज मंडळी भेटली तेव्हा लक्षात आले की आपल्याला अजून बरेच काही करावयाचे राहिले आहे. ह्या सगळ्या मंडळींचे दौरे म्हणजे एकदम भारी. कुठच्या कुठे आणि ते सुध्दा सायकल वर, बुलैट वर !!!!!!!!!!!! आणि त्याहुन भारी म्हणजे त्यांचे लेख !!!!!!!!!!!
या सगळ्यांची गप्पा मारता मारता तुमची आठवण काढली होती. त्या दिवशीच्या एका लेखावर तुम्ही अगदी जोरदार फटकेबाजी केली होती, ती खूप खूप आवडली होती.
कधी येताय भेटायला ?
3 Oct 2016 - 3:15 pm | असंका
लै भारी रे!! वृत्तांत पण बेष्ट जमलाय!!
3 Oct 2016 - 7:24 pm | कवितानागेश
भारी!
मोदकाला सायकलिंग मानवलंय एकंदरित असं दिसतंय! ;)
3 Oct 2016 - 9:12 pm | खटपट्या
सद्या एक फोटो बघीतलाय. बाकी वाचतोय
3 Oct 2016 - 9:36 pm | स्थितप्रज्ञ
तारा पान शॉप बाहेर एक क्षण
3 Oct 2016 - 10:41 pm | अरिंजय
फोटु दिसंना
4 Oct 2016 - 9:19 am | स्थितप्रज्ञ
4 Oct 2016 - 9:25 am | स्थितप्रज्ञ
4 Oct 2016 - 2:15 pm | मोदक
आनंदरावांनी लैच कौतुक केल्याने संकोचून हा वृत्तांत लिहीत आहे.
...तसे आनंदराव कुणालाही घोड्यावर बसवण्यावर तरबेज आहेत.. त्याबद्दल नंतर कधीतरी.. ;)
पुण्यातला कट्टा मल्टीस्पाईसमध्ये पार पडला.
...तसा हा कट्टा तळेगांवला मटण भाकरी संगे होणार होता.. त्याबद्दलही नंतर कधीतरी... ;)
तर.. पुणे कट्टा पार पडतानाच औरंगाबाद कट्ट्याची बीजे रोवली गेली.
सायकल ग्रूपवर...
एकूण जनसंख्येने पुणेकरांचा..
डॉ श्रीहास, जॅक ऑफ ऑल आणि बाबा योगीराज यांचा औरंगाबादहून वेग आणि नियमीतपणाने..
आणि श्री मानसचंद्ररावजी चंद्रात्रे साहेबांचा लातूरहून सायकलिंगच्या सातत्याने असा एकत्रीत वचक आहे.
मग पुण्याला भेट झाली तर आता औरंगाबादला भेटूया असा प्लॅन ठरला आणि पहिल्या संदेशालाच पाध्ये, आनंदराव, स्थितप्रज्ञ आणि प्रशांतने होकार दिला. शैलेंद्र, कपिलमुनी वगैरे तळ्यात मळ्यात असणारी मंडळी नीट लक्ष ठेवून होतीच.
मग पुढचे सगळे प्लॅनिंग संभाजीनगरकरांवर सोपवले.
गपशहरातली भटकंती, हे ठिकाण बघ, ते ठिकाण बघ असे प्रकार आजिबात नको आणि जेवणाचे फक्त काय ते स्पेशल जेवण बघा अशा किरकोळ अटी घालून एकदाचा कट्ट्याचा दिवस ठरला.
मानसचंद्ररावजींची सायकल आयत्यावेळी धरणात गेली (म्हणजे त्यांचा येण्याचा प्लॅन कॅन्सल झाला) :D
पुण्यातून प्रशांत, आनंदराव, पाध्ये, स्थितप्रज्ञ आणि मी असे सकाळी निघाणार होतो तोच सकाळी सकाळी प्रशांतरावांच्या गाडीच्या एका चाकाने निषेध पुकारला आणि ते मूकपणे संपावर गेले.
आमची जमवाजमव होईपर्यंत ८:३० वाजले होते आणि नगरला नाष्ट्याला पोहोचण्याच्या बेताचे १२:०० वाजले होते.
नगर रोड - वाटेतील गांवे पार करत करत मिसळीच्या ठिकाणी पोहोचलो आणि झकास मिसळ हादडली. या आडगावांमध्ये साध्या पुणेरी पानाचे पान सहजरीत्या मिळते ते भाग्य पुण्यात नाही. पुण्यात फक्त कलकत्ता किंवा बनारस पान. बस्स.!!
मग मिसळीनंतर पान हादडले.
यथावकाश नगरला पोहोचलो. नितीन पाठक साहेबांची भेट झाली.
त्यांचे दीड लाख किमी सायकल चालवणे बघून आम्ही अक्षरशः हैराण झालो. भरपूर गप्पा मारून आणि पुढील नगर वारीचे प्लॅनींग करून नगरला टाटा केला.
येथे उल्लेखनीय बाब म्हणजे "सर्दी झाली म्हणून मस्तानी नको, कारण त्यात आईसक्रीम असते" असे नोंदवून पाध्येंनी पिस्ता मिल्कशेक मागवला. मिल्कशेकचा ग्लास आला तेंव्हा त्यात आईसक्रीमचा स्कूप व्यवस्थीत डुंबत होता. =))
हे सगळे सुरू असताना औरंगाबादकरांची फोनाफोनी सुरूच होती. प्राडाँचाही एकदा फोन येवून गेला.
यथावकाश आंम्ही ३ च्या दरम्यान हाटेलात पोहोचलो. तेथील माणसाला शोधायला थोडा वेळ गेला नंतर रूममध्ये एंट्री केली व प्रशस्त अशा डॉर्मिटरीमध्ये सगळे जण पसरलो..
थोड्या वेळात बाबा योगिराज आले.. नंतर जॅक ऑफ ऑल आले.. (..आणि बाबा परत गेले, आनंदरावही त्यांच्या नातेवाईकांकडे भेट देण्यासाठी गेले)
मग वेगवेगळ्या सिरीज, इंग्रजी पिच्चर, कोकण ट्रीपा, जॅक साहेबांचा गोप्रो "१ हजार रूपये पर मिनीट" दराने रेकॉर्डिंग करून समुद्रात वाहून कसा गेला याची दर्दभरी कहाणी वगैरे वगैरे विषयांवर गप्पा रंगल्या. थोड्यावेळाने पेशंटांना मार्गी लावून डॉक्टर उगवले. त्यांची मेरीडा MTB सर्वांनी चालवून बघितली..
पुन्हा गप्पा रंगल्या..
पिस्ता मिल्कशेक आणि मस्तानीच्या भानगडीत दुपारचे जेवण झालेच नव्हते.. म्हणून संध्याकाळी काहीतरी खावे तर रात्रीचे जेवण मार खाणार अशा द्विधा अवस्थेत काहीतरी खादाडी करूयाच्च अशा निर्णयाने पायी पायी भटकत स्टेशन जवळील एका ठिकाणी भेळ, मक्का पालक, चीज वडापाव असे पदार्थ पोटात ढकलून पुन्हा हाटेलवर आलो..
पुन्हा गप्पा रंगल्या..
थोड्या वेळाने डॉक्टर गेले आणि आवरून परतले...
आता बाबा योगिराज परतले.. पण आनंदरावांचा पत्ता नव्हताच.
"बिर्याणीचे पातेले आणून ठेवतो मग तुम्हाला हवे तेंव्हा घ्या" अशी खानसाम्याने दिलेली सूचना आंम्ही विनाविलंब धुडकावली. कारण आनंदराव येईपर्यंत फक्त पातेले शिल्लक राहील याची सर्वांना भिती (आणि / अथवा खात्री..!!) होती.
एकदाचे आनंदराव उगवले. मग पुढील पाऊण तास चिडीचूप शांतता पसरली (इतके सर्वजण खाण्यात गुंतले होते.)
बिर्याणी ला दाद देत देत पातेले रिकामे झाले.. नंतर सर्वांनी तारा पान शॉपकडे मोर्च वळवला.
तेथे भरपूर वेगवेगळ्या पानांवर हल्लाबोल करून रात्री उशीरा हॉटेलात परतलो.. मग लेह-लदाख वर एक स्पेशल सेशन झाला. एक एक मेंबर आपआपल्या बेडवर ढेर होत होता.. सरतेशेवटी अडीच वाजता सर्वांना टाटा केला व झोपी गेलो.
सकाळी ८ वाजता निघायचे ठरले होते त्याप्रमाणे सर्वजण ८ / ८:१५ च्या दरम्यान निघालो.
एका ठिकाणी झक्कास चहा घेतला आणि निरोपांचे अनेक राऊंड पार पडले तरी पाय निघत नव्हता. शेवटी प्राडाँचा फोन आल्यावर निघालो.
प्राडॉ भेटले ते बहुदा सकाळी बॅडमिंटन खेळून आले होते आणि आमची वाट बघत मराठा मोर्चाच्या धाग्यावर बॅटींग करत बसले होते. ;)
त्यांच्या सोबत भरपूर गप्पा आणि खादाडी झाली.
वाटेत गप्पा हाणत आणि वेगवेगळे विषय चावत संध्याकाळी पुण्याला परत पोहोचलो.
झक्कास मजा आली... भरपूर गप्पा झाल्या.. पुढील कट्ट्याचे प्लॅनींग ठरले... औरंगाबादकरांनी केलेल्या आदरातिथ्याचे (विशेषत: बिर्याणीचे) नंतर अनेक दिवस कौतुक सुरू आहे..!!
4 Oct 2016 - 3:43 pm | महासंग्राम
उपवृत्तांत हि भारी झालाय. पण फोटू येऊ द्या कि राव
4 Oct 2016 - 4:42 pm | अरिंजय
लय चिमटे काढायले राव समदे
पण उपवृतांत एकदम भारी
4 Oct 2016 - 2:44 pm | नितीन पाठक
औरंगाबाद कट्टा वृत्तांत आणि उप वृत्तांत एकदम लय भारी .............