झपाटलेला ट्रेक

योगेश आलेकरी's picture
योगेश आलेकरी in भटकंती
24 Sep 2016 - 10:21 pm

झपाटलेला ट्रेक

जून चा पहिला आठवडा चालू होता. उन्हाळा संपून आता पावसाळा सुरु होणार होता. तसे बदलही वातावरणात जाणवत होते. नुकतेच मला वरिष्ठानी नोकरीच्या बंधनातून मुक्त केल्यामुळे वेळ च वेळ होता. भटकायची जणू पर्वणीच. २ दिवस मस्त सह्याद्रीत व्यथित करायचे मनसुबे आखले गेले. डोंगर रंग ठरली. तैलबैला-सवाष्णी घाट- धोंडसे मार्गे सुधागड. ठरलं. जोडीला कोणी मिळालंच नाही, म्हणून नियोजनात बदल नाही.

शनिवारी सकाळी सकाळीच मुंबईहुन तैलबैला कडे निघालो, गाडी भांबुर्डयाची होती तिकीट काढताना मूड बदलला व सरळ घनगड ला गेलो. दुपारी घनगडावरून समोर सुधागड पाहत न्याहारी सोडली तर उजवीकडे तैलबैला रात्री मुक्कामाला खुणावत जो मुक्काम सुधागडावर होता. संध्याकाळी तैलबैला गावात मुक्काम करून सकाळी निवांत पणे सवाष्णीकडे निघाल. मळभ भरून आलेले. एकटाच भटकत होतो भुतासारखा रानोमाळ. घाट उतरणीला जरा एका झाडाखाली गार सावलीला बसलो. १० मिनिटासाठी आडवा झालो न तब्बल २ तासांनी उठलो. भयंकर गाढ झोप. दचकून उठलो घड्याळ पाहिलं ३ वाजलेले, वातावरणात एक प्रकारची अस्वस्थता जाणवत होती. माझी होती कि वातावरणाची माहिती नाही. उरलेला घाट घाईतच उतरलो . दातपाडी नदी पार करून सुधागडच्या धोंडसे वाटेल लागलो ४ वाजलेले. सुधागडच जंगल आज वेगळाच वाटत होत. गूढ. अनामिक भीती सुरु झाली होती. मावळतीकडे दिवस कलू लागला होता, जंगलाचा घनदाटपणा वाढत चालला होता, मी एक एक पाऊल महादरवाज्याकडे सरकत होतो. रविवारची संध्याकाळ होत होती, एकटाच गडावर जात होतो . उतरणारा एक ग्रुप माझ्याकडे पाहत निघून गेला, मी निःशब्द धीर गंभीर मुद्रेत. का कुणास ठाऊक पण एक नकारात्मकता आली होती अनामिक भीती दाटली होती. पावले जड झाली होती.. धोंडसे मार्गाचे जंगल आज भकास गूढ अनाकलनीय वाटायला लागला होत. तशातच गडावरून उतरणारे गावकरी भेटले त्यांनी वरती न जाण्याचा सल्ला दिलाच वरतून अमावस्या एक दोन दिवसावर आल्याची आठवण करून दिली, त्यामुळे रात्र हि काळीकुट्ट असणार यात तिळमात्र शंका नव्हती. तरीही म्हटलं जाऊच जाऊन काय गपगार झोपायचंय काय फरक पडतो .

७ ला बर्रोब्बर महादरवाज्यापुढे उभा एक इवलासा बिंदू होऊन . अंधार पडलाच होता. त्या दुर्गम भागात या वेळी मी एकटाच चहुबाजूनी गूढरम्य अशा जंगलाचा वेढा, व समोर हा अक्राळविक्राळ दरवाजा जणू मला गिळंकृतच करणार असं भासत होत. दुपारी झोपून उठल्यापासून सर्व दुनियाच बदलल्यासारखी वाटत होती, काहीतरी अघटीत घडणार आहे असच वाटत होत, त्यामध्ये त्या गावकऱ्यानी अमावस्येची घातलेली भीती, आणि आज हे जंगल पण कसे भयानकच वाटत होते आणि हा महादरवाजा ? नेहमीचा परिचयाचा तरीही आज अनोळखी वाटत होता. जणू एकाद्या सापळ्याचं दे लोभसवाणं दार वाटत होत. का असं होत होत काहीच कळत नव्हतं फक्त काहीतरी विचित्र होणार याची जाणीव झाली होती. आणि मी त्या दरवाजातून आत प्रवेशलो जणू कोणत्यातरी अमानवीय शक्तीच्या सापळ्यात अलगद शिरलोय. आता वाट चांगलीच रुंद झालेली उंचच उंच झाडे त्या झाड्याच्या कचाट्यात सापडलेले भग्नावशेषातील पडके वाडे, घरे, जोत्यांचे अवशेष चित्र विचित्र पसरलेल्या वेली यावर विजेरी मारत भोराई मंदिरासमोर आलो. लांबून च वंदन करून एका जोत्यावर आडवा झालो. बाजूला एक ग्रुप शेकोटी पेटवून मजा मस्ती करत होता विचारपूस झाली. बॅग तिथेच ठेऊन मी शांततेच्या शोधात उजव्या बाजूला असणाऱ्या समाध्यांच्या परिसरात गेलो इतिहासकाळातील स्मशानच ते असंख्य समाध्या आजूबाजूला आपल्या वीरपुरुषांची स्मरण लेऊन स्थिरावलेल्या अन तिथे मी एक जिवंत प्राणी!!

एका सपाट पृष्ठभाग असणाऱ्या समाधी च्या कट्ट्यावर आडवा होऊन आकाशाकडे पाहता पाहता मन कधी इतिहासात गेले कळलेच नाही. मूठभर मावळ्यांनी गवताच्या भाऱ्यात तलवारी लपवून गडावर आणल्या व शत्रू सपासप कापून काढले रक्ताला विजयाची किनार लाभली. तिथं पासून ते भोर संस्थान विलीन होईपर्यंत सुधागडच्या वाचलेला इतिहास मानपटलावरून सरकू लागला त्यातील युद्धांचे प्रसंग अंगावर काटा आणू लागले तशातच नारायणधारपांपासून ते शेरलॉक पर्यंतच्या सर्व कथा डोळ्यांसमोर नाचू लागल्या, म्हणून त्यातून बाहेर पडून जरा फेरफटका मारला ईशान्येकडे अंधुकशी तैलबैल्याची आकृती दिसत होती तर पश्चिमेला पाच्छापूर अन मागे संपूर्ण सुधागड पठार अंधारात काळाकभिन्न. वेळ झाला होता वाड्यात जाऊन खिचडी बनवायची होती मंदिराजवळील तो ग्रुपही वाड्यात जेवायला गेलेला ती मिन मिनती शेकोटी विजवून मीही निघालो. उजव्या बाजूला असणाऱ्या अनामिक मूर्त्यांना नमस्कार करून डावीकडील काळ्याकुट्ट अंधारात चमचमणारा तलावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत वाड्या भोवतालच्या त्या गच्च रानात शिरलो विजेरी इतकीच जागा दिसेल इतका गडद अंधार. चाचपडत कसाबसा वाड्यात आलो. माझं धीर गंभीर आणि एक्कलकोंडं वर्तन पाहून प्रथमतः तो ग्रुप हि घाबरला असेलच पण नन्तर २ शब्द बोलल्यावर वातावरण निवळल. त्याचं झालं कि मी त्याच चुलीवर खिचडी करणार हे समजतातच त्याची जेवणच आमंत्रण दिलं व मीही जास्त आढेवेढे न घेता स्वीकारल. गप्पाष्टकात जेवणे झाली तेव्हा मला समजलं कि हा ग्रुपही आता night trek चा आनंद घेत लगेच उतरणार आहे, रविवार ची रात्र त्यामुळे आता कोणीच नव्हतं माझ्याशिवाय गडावर. त्यांनी मला त्यांच्यासोबत निघण्याची विनंती केली पण आता उतरायचा म्हणजे खूप कंटाळवाणा काम त्यापेक्षा मस्त झोपण्याला मी प्राधान्य दिल.

वाडा (साभार गुगल प्रतिमा )
wada
११ ला हे लोक गेले. आता या ऐतिहासिक पडक्या वाड्यात, नव्हे या सुधागडच्या विस्तृत पठारावर अंधाऱ्या रात्री या भयंकर स्थतीत मी एकटाच !!! या कल्पनेनेच माझी झोप उडाली. दक्षिणेकडील ओसरीवर पथरी अंथरली बाजूला विजेरी व मिन मिनती, फडफडत तेवणारी एक मेणबत्ती . समोर वाड्याचा चौक.
आता हा भकास वाडा मला खायला उठला. दुपार पासून का असे होतंय याची गणितं उलगडायला लागली. चौसोपी हा वाडा मला भव्य दिव्या अक्राळविक्राळ वाटू लागला, वाऱ्याने फडफडणारे पत्रे मनात धडकी भरवू लागले. रात किड्याची किरकिर्र मस्तकशूळ उठवू लागले.बाजूच्या बंद खोलीत उंदीर घुशींच्या हालचालीचे आवाज वातावरण शांत होताच लांबून कुठून तरी कोल्हेकुई तर कधी घुबडाचे आवाज .. !!
जोत्याचे एक एक खांब माझ्याकडे रोखून पाहणाऱ्या राक्षसासारखे वाटू लागले, ज्या ज्या गोष्टीवर नजर जाईल ती ती गोष्ट अक्राळ विक्राळ आकृतीत रूपांतरित हात होती, वाऱ्याचा आवाजही मला कोणीतरी कर्कश: आवाजात बोलावताय असं भासू लागला होता १२ वाजले. वातावरणातील गूढपणा वाढत चालला होता.

एक चित्र प्रयोग
wada
आता माझी शक्ती क्षीण होत आलेली न एक क्षणाला मी झोपी गेलो ते २ तासांनीच दचकून उठलो एका भयंकर स्वप्नातून बाहेर येऊन कि स्वप्नातच पुढेही माहिती नाही.. स्वप्नात तो वाडा चक्क ३ मजली झालेला व तिसऱ्या माळ्यावर मी झोपलेलो एका जग्ग् विद्रुप चेहऱ्यच्या म्हाताऱ्या व्यक्तीने घरातील बेडकी बाहेर फेकावी तसं मला खाली फेकून दिलं. दणकन आदळताच मला जाग अली. मी होतो त्याच जागी होतो ते स्वप्न होतं याची जाणीव होताच त्या धक्क्यातून बाहेर आलो तोच दुसरा धक्का, स्वप्नांतील ती भयंकर व्यक्ती समोरच्या ओसरीवर उभी- रापलेला काळपट चेहरा मोठाले डोळे तुरळक पण विस्कटलेले केस कंबरेला गुंडाळलेलंमळकट वस्त्र हातात काठी व येरझाऱ्या घालणारी मुद्रा व मध्ये मध्ये माझ्याकडे खुनशी नजरेने बघत कोणत्या तरी अनाकलनीय भाषेत असंबंध बडबड चालू होती . सोबतीला दोन्ही ओसरीवर अत्यंत वृद्ध, कातडी हाडांनाच चिकटलेली वाटावी एवढ्या कृश स्त्रिया जणू सांगाडेच ते. अगतिक नजरेने माझ्याकडे पाहत. सारच अनाकलनीय इतक्यात त्या विक्षिप्त मनुष्याने हातातील कोणतीतरी वस्तू माझ्याकडे भिरकावली खाण कण आवाज !! मी सावरलो तो भास होता. या आभासी जागाच मी एक बाहुलं बनून गेलो होतो. कोणत्यातरी अमानवीय शक्तीच्या कचाट्यात मी अडकलो होतो. १५-२० फूट उंच उचलून फेकल जातं होत तर कधी अत्यंत क्रूर रित्या फरफडत ओढले जातंय, असले भास होत होते, बसल्या जागेवरूनच याची अनुभूती मिळत होती पण ते भासच होते एकटा जीव आयताच जाळ्यात पडला होता.
कोणे एके काळी सकाळी योगासन वर्गाला जात असताना भल्या पहाटे केंद्राच्या बाजूच्या इमारतीत नाथ संप्रदायाची प्रवचने चालायची त्यातील काही मंत्रोच्चार सतत कानी पडत. आत्ता त्यातील आठवलेले काही शब्द जुळवून मंत्रोच्चाराचा केविलवाणा प्रयत्न चालला तोच त्या रानटी अमानवी आकृतीकडून एक कोणती तरी मजबूत वस्तू माझ्याकडे फेकली गेली. पुन्हा आवाज खाणकनं . . . !!! मात्र यावेळी भास नव्हता कपाळावर टण्णू आला आणि मी मुर्च्छितावस्थेत प्रवेशिलो व या अघोषित वास्तुपुरुषाशी पुकारलेल्या युद्धात शरीराने हार मानली, मात्र मन अजूनही लढतच होतं संघर्ष संपला नव्हता रात्रीच्या भयाण काळोखात मनाच्या खेळांना उधाण आलेलं. गडावरील घनदाट जंगलाच्या परिसरात वसलेल्या त्या वाड्यात अमावस्येच्या पूर्वरात्रीला एक मूर्च्छित देह, ३ अमानवी शक्ती व एक कणखर मन यांच्यात एक संघर्ष चालू होता. पहाटे कधीतरी मनाची शक्ती संपल्यावर हा गूढ रित्या सुरु झालेला संघर्ष कोणत्याही निकाला विना संपला असावा. सकाळी ९ ला शुद्धीवर आलो कि जागा झालो माहिती नाही. सर्व सामसूम झालेलं, उठलो. अंगात त्राण नव्हता रात्रीच्या गूढतेमुळे शारीरिक व मानसिक बळ खर्ची पडलेलं कसाबसा उठलो बॅग पाठीवर टाकली न पाच्छापूर कडे उतरलो

शेकोटीवर आणखी एक चित्र प्रयोग करताना
wada

वाड्याचे बाहेरून चित्र (गुगल वरून )
wada

समाप्त:
तळटीप --
[ महत्वाची सूचना
वरील कथा 'मनाचे खेळ' या संकल्पनेवर आधारित कल्पना विस्तार आहे. यातील घटना, पात्र, ठिकाणे काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काही संबंध आढळ्यास निव्वळ योगायोग समजावा. धन्यवाद ]

प्रतिक्रिया

म्हणजे अस काही झाल कि नाही?

योगेश आलेकरी's picture

3 Oct 2016 - 7:28 pm | योगेश आलेकरी

नाही झालं ;-)

हेच केलंय,हाच ट्रेक पण एवढं टेंगुळ येण्याइतकं भाग्य कुठाय?
आता तिकडे उतरण्यासाठी शेड बांधली आहे ती छान आहे.रात्री आठनंतर प्रचंड वारा सुरू होतो तो सकाळपर्यंत पत्रे थाडथाड वाजवतो.
मजेदार वर्णन आणि फोटो.

योगेश आलेकरी's picture

3 Oct 2016 - 7:28 pm | योगेश आलेकरी

धन्यवाद :-)

Rahul D's picture

25 Sep 2016 - 3:41 pm | Rahul D

१० मिनिटासाठी आडवा झालो न तब्बल २ तासांनी उठलो. भयंकर गाढ झोप. दचकून उठलो घड्याळ पाहिलं ३ वाजलेले, वातावरणात एक प्रकारची अस्वस्थता जाणवत होती. माझी होती कि वातावरणाची माहिती नाही.

योगेश आलेकरी's picture

3 Oct 2016 - 7:29 pm | योगेश आलेकरी

:-) :-) खुप खुप धन्यवाद.....

प्रसाद_१९८२'s picture

25 Sep 2016 - 4:08 pm | प्रसाद_१९८२

यातील घटना, पात्र, ठिकाणे काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काही संबंध आढळ्यास निव्वळ योगायोग समजावा. धन्यवाद ]

घनगड, तैलबैला, सवाष्णी घाट, सुधागड व पाच्छापूर हि ठिकाणे काल्पनिक आहेत?? :)

बाकि कल्पनाशक्ती आवडली

योगेश आलेकरी's picture

3 Oct 2016 - 7:30 pm | योगेश आलेकरी

योगायोग हो निव्वळ :D

सिरुसेरि's picture

27 Sep 2016 - 2:02 pm | सिरुसेरि

थरारक प्रवास

योगेश आलेकरी's picture

3 Oct 2016 - 7:31 pm | योगेश आलेकरी

;-) ;-)

कथालेखनाचे चांगले कौशल्य आहे तुमच्याकडे...

योगेश आलेकरी's picture

3 Oct 2016 - 7:31 pm | योगेश आलेकरी

धन्यवाद सर

किसन शिंदे's picture

27 Sep 2016 - 8:02 pm | किसन शिंदे

असं काही झालं नसावं याबद्दल खात्री आहे. बाकी योगेशराव तुम्ही लिहीता मात्र थरारक.

योगेश आलेकरी's picture

3 Oct 2016 - 7:32 pm | योगेश आलेकरी

सर्व कल्पनाविलास ;-)

थ्यँक यू :-)