पधारो म्हारे देस : मुंबई – उदयपूर – जयपूर – मुंबई .

ज्याक ऑफ ऑल's picture
ज्याक ऑफ ऑल in भटकंती
2 Oct 2016 - 3:55 pm

आम्ही , म्हणजे अस्मादिक आणि आमचं खटलं , साधारण जुलै मध्ये राजस्थान स्वारी वर गेलो होतो. संपूर्ण ट्रीप नेहमी प्रमाणे मी स्वत:च प्लान केली होती. सबब अगदी पहिल्या दिवसापासून Adventure असणार ही कल्पना होतीच. पण ते मुंबई पासूनच सुरु होईल याची तिळमात्र ही कल्पना आम्हांला नव्हती. त्यात अस्मादिक पडलो मराठवाडी , त्यामुळे निजाम-गती (ही कूर्मगती पेक्षा पण हळू असते) ही आमच्या पाचवीलाच पुजलेली . त्यामुळे आमच्या सौ”नी सांगून सुद्धा ,”अगं विमान १२ चे आहे, आपण ११ पर्यंत पोचलो तरी चालेल !" असं म्हणून क्याब ८ ची बुक केली. की बाबा अगदी मुंबई मुंबई म्हणतात तशी गर्दी लागली तरी ३ तासात ३८ किमी पोचणे अवघड नाही !!

इथेच घात झाला. त्यात निघायला पण १५-२० मिनिट उशीर झाला, पण त्यादिवशी फारफार गर्दी दिसल्यावर मी आपलं धास्तावूनच ड्रायवर ला विचारलं, “पोचू नं ? “ त्यावर तो "आगरी पार्थसारथी" म्हणाला , “सायेब तसं म्हणाल तर ता १-१:३० तासात पोचायला हवं , पण कंदी ४-५ तास पन लागतात . अन आज मेगाब्लॉक आय ना ... ता गर्दी आसनार भुतावळी-पिसवली पासून !!” . ईथे आवंढा क्रमांक १.

या संवादानंतर मी आपलं उगाच “मुंबई मध्ये कशी गर्दी आहे , लोकांनी कसं काय राहायचं या गर्दीत ?” अश्या निराशाजनक गप्पांवर आलो. पण त्याचा ड्रायवर (अन बायकोवर पण) परीणाम होत नाहीये हे पाहून मी आपलं “वड्याचं तेल वांग्यावर” या न्यायाने “कांडी-क्रश” मध्ये डोकं खुपसलं . कॅब मध्ये बसून साधारण २ तास झालेत हे लक्षात आल्यावर मी आपलं ड्रायवरला आवाजात उसना विश्वास आणून विचारलं की “झालं आता पोचूच बहुदा अर्ध्या तासात नं ?” , त्याने स्थितप्रद्न्यपणे (स्थितप्रद्न्य लक्षणे - ईती स्थितप्रज्ञ लक्षणं ) मागे पाहून मला सांगितलं , “साहेब अजून पवई पन नाय आला , आजून २-१ तास लागतील !!” ईथे आवंढा क्रमांक २ .

झाsssssलं .... माझं उरलं सुरलं अवसान गळून पडलं. त्यात बायको “कळलं आता?” युक्त नजरेने माझ्याकडे बघून खिडकीबाहेर पाहायला लागली. माझी आपली “मुंबई-गर्दी-ट्राफिक-गर्दी-मुंबई” ही टेप परत सुरु झाली. ईथे आवंढा क्रमांक ३ .

थोड्या वेळाने मी सवयी प्रमाणे (मी व्यवसायाने सीए असल्याने) समजा विमान चुकले तर ? असा हायपो. प्रश्न “Cost-Benefit” मांडण्यात मग्न झालो. त्या क्षणापर्यंत मी “आता कोठे धावे मन ? तुझे चरण देखिलिया !!” ईतपत विरक्ती पर्यंत आलो होतो. त्यामुळे “काय होईल ? फार तर ट्रीप चे ४०,००० जातील आणखी काय ?” या त्यागपूर्ण विचारापर्यंत आलो होतो . (कारण नंतर बायकोला काय तोंड द्यायचे या विचाराने घाम फुटायची वेळ येणार होती - हा विचार मनास शिवला नव्हता हे सांगायला नको ). तो शिवल्या नंतर आवंढा क्रमांक ४.

तितक्यात ड्रायवर ने “साहेब वेब चेकीन केलाय काय ?” असं विचारलं. अन मी चमकून त्याच्याकडे पहिलं . यावेळेस “स्थितप्रद्न्य” मी झालो होतो. मला काय उत्तराव कळेना. वेब चेकीन चा यत्न केला पण तो फेल झाला. फ्लाईटच्या एक तास आधी वेब चेकीन होत नसतं ही आमच्या ज्ञानात भर पडली. तो पुढे म्हणाला “साएब , इथून नायका एरपोट ९ किमी आय. तसं तर १ तास पन लागू शकतो , पण कालजी नका करू , आपन तुमाला पोचवायचा फुल प्रयत्न करनार . तुमी कालजी करू नका !!” अचानक मला तो ड्रायवर “शंखधारी-पद्मपाणी-चक्रवर्ती आभावलय असलेला पार्थसारथी" वगैरे वाटू लागला. आमचा हा संवाद चालू असताना आम्ही पवई लेक जवळ पोचलो होतो. आणि ड्रायवर एखाद्या सराईत मेजर-कर्नल वगैरे सारखा मला सूचना देत होता. “आपण आता असं असं पोहचू. तुम्ही सामान उचलून सेक्युरीटी ला जावा. मी वैनीना दारावर बरोब्बर सोडतो. पैसे वैनी देतील. तुमी पला.” इत्यादी.

आणि काय सांगावं ? फास्ट फ्युरीयस मधला डॉम टोरेतो काय गाडी चालवेल अशी तो गाडी हाणू लागला. एकीकडे “स्पीड लिमिट” तुटलीये म्हणून GPS मधली बाई जीवाच्या आकांताने ओरडायची थांबत नव्हती. प्रत्येक जाणाऱ्या किमी मागे ड्रायवर बद्दल माझा आदर सम प्रमाणात वाढत होता. आणि ११:४० वाजता ड्रायवर ने म्हणल्या प्रमाणे खरंच गाडी विमानतळासमोर उभी केली. शेवटचे ६-७ किमी त्याने खरंच १०-१२ मिनटात पार केले. ते पण मुंबई च्या गर्दीत. “अत्यंत आदर” – फक्त आणि फक्त .

८ ला बसलेलो , ११:४० ला विमानतळावर पोचलो. सगळं प्लानिंग बोम्बललं होतं. पण याच Adventure साठी तर “ग्रुप-टूर” टाळला होता. आणि हा टूर अपेक्षे प्रमाणे झक्कास होणार याचीच ही नांदी होती. पण हे जरा जास्तच फाष्ट होत होतं. म्हणजे आपण पोरीला प्रपोज करायला जावं , आणि तिने चल आपण “आपल्यासाठी” घर शोधुया का ? असं म्हणावं इतकं फाष्ट.

हुश्श .... शेवटी पोचलो. आता दुसरा पेपर सुरु झाला. सेक्युरीटी वगैरे सोपस्कार पार पडल्या नंतर आत गेलो अन लक्षात आलं की ब्यागेज चेकीन आणि बोर्डिंग बंद झालं होतं. आवंढा क्रमांक ... काय बर? जाऊदे मायला .. मी आवंढे मोजणंच बंद केलं होतं एव्हाना . तरी ईतक्या जवळ आलोय .. आता हरायचं नाही असा निश्चय करून एका क्र्यू ला अडचण सांगितली. त्याने अत्यंत प्रोफेशनली आम्हाला अटेन केलं आणि आश्वासक आवाजात “डोंट वरी , आय विल गेट यु ईन !!” असं म्हणत पुढचे सोपस्कार पार पडून आम्हाला बोर्डिंग गेटच्या दिशेला लावून दिलं. हुश्श .... शेवटी ... आम्ही उदयपुर ला जाणार”च” होतो.

एकदाचे इंडिगो च्या बुंssssग मध्ये बसून हवेत उडालो ... आता अर्ध्या तासाच्या निश्चिंती नंतर खरोखरच उदयपुर स्वारी सुरु होणार होती.
बाय बाय मुंबई ..
बाय बाय मुंबई ..

बाकी ते विमानाने जायचं असलं की करतात तसं CA KEDAR D GOGATE is travelling to Udaipur from Chhatrapati International Airport to Dabok International Airport with one other - Feeling Excited " अशी चिंधीगिरी आम्ही पण करून घेतली ...

हे असे फोटो टाकणं मस्ट असतंय
हे असे फोटो टाकणं मस्ट असतंय

काना-मनात ऑलरेडी “केसरिया बाssssलम .. पधारो नी म्हारे देस !!” रुंजी घालायला लागलेलं होतं.

पोचलो एकदाचे
पोचलो एकदाचे

आता उदयपुर दर्शन ......

(क्रमश:)

प्रतिक्रिया

बाबा योगिराज's picture

2 Oct 2016 - 5:17 pm | बाबा योगिराज

झ्याक जमलय बगा,
उपमा आवडल्या गेल्यात.

पण फोटूच बगा वो कै तरी, गणेशा झालाय.

बाबा योगीराज

ज्याक ऑफ ऑल's picture

3 Oct 2016 - 12:22 pm | ज्याक ऑफ ऑल

काय म्हणू लागले काय की ..

बाबा योगिराज's picture

4 Oct 2016 - 8:01 am | बाबा योगिराज

पुढील वेळेस जरा मोठ्ठा भाग टाका.

पुलेशु, पुभाप्र.

बाबा योगीराज

फोटु दिसताहेत दोनतीन आहेत ते.पुढे काय वाढून ठेवणार त्याचा अंदाज आलाय.

ज्याक ऑफ ऑल's picture

3 Oct 2016 - 12:24 pm | ज्याक ऑफ ऑल

कीप गेसिंग ...

एस's picture

2 Oct 2016 - 9:33 pm | एस

मस्त.

मोदक's picture

2 Oct 2016 - 9:38 pm | मोदक

झक्कास...!!!!

पुढील भागांच्या प्रतिक्षेत!

सुरुवात दणक्यात झालिये.

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Oct 2016 - 11:41 am | llपुण्याचे पेशवेll

सी ए पटू, ज्युडोसम्राट ज्याक ऑफ ऑल यान्चे लेखन छान वाटले, सुरुवात जोरात. पण आडनावानुसार वाटत नाही हो तुम्ही! :) एक्दम देशस्थी घोळ वाटतोय. :)

ज्याक ऑफ ऑल's picture

3 Oct 2016 - 12:29 pm | ज्याक ऑफ ऑल

त्यात अस्मादिक पडलो मराठवाडी , त्यामुळे निजाम-गती (ही कूर्मगती पेक्षा पण हळू असते) ही आमच्या पाचवीलाच पुजलेली

. - सबब देशस्थी घोळ काही प्रमाणात का होईना , अंगवळणी पडणे साहजिक आहे ...

गोठ्यात राहून शेणाचा वास येतो म्हंटल्यान कसं चालेल महाराजा ??

ज्याक ऑफ ऑल's picture

3 Oct 2016 - 12:30 pm | ज्याक ऑफ ऑल

सीए पटू ? जुडोपटू ठीके ब्वा ...

नाखु's picture

3 Oct 2016 - 11:57 am | नाखु

"सर्वोदय" आव्डला...

पु भा प्र.

स्वगतः सी ए असला म्हणून काय झालं घरच्या ऑडीटरपासून कोण वाचले आहे??

ज्याक ऑफ ऑल's picture

3 Oct 2016 - 12:32 pm | ज्याक ऑफ ऑल

सर्वोदय ?
पु भा प्र ??

नवे आहोत मिपा वर.... चुभूदेघे ... कोकणस्थ आहोत पण म्हणून सगळेच शोर्ट-फॉर्म लगेच कळतील असंही नाही ... :P

ज्याक ऑफ ऑल's picture

3 Oct 2016 - 12:27 pm | ज्याक ऑफ ऑल

एस , मोदक , रेवती - धन्यवाद !!

प्रीत-मोहर's picture

3 Oct 2016 - 1:51 pm | प्रीत-मोहर

मस्त सुरवात.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Oct 2016 - 1:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर सुरुवात ! पुभाप्र.

ज्याक ऑफ ऑल's picture

3 Oct 2016 - 2:42 pm | ज्याक ऑफ ऑल

धन्यवाद प्रीत-मोहर , डॉ म्हात्रे अन नाखु सुद्धा !!

मस्तं लिहिताय. अगदी खुसखुशीत. पु.भा.प्र.

ज्याक ऑफ ऑल's picture

3 Oct 2016 - 4:00 pm | ज्याक ऑफ ऑल

पु भा ल टा
खी ..... :)

माझीही शॅम्पेन's picture

4 Oct 2016 - 1:28 pm | माझीही शॅम्पेन

मस्तं लिहिताय. अगदी खुसखुशीत. पु.भा.प्र.

+ १००

असंका's picture

3 Oct 2016 - 3:19 pm | असंका

कहर केलाय अगदी!!!
मजा आली वाचताना!

धन्यवाद...!!

ज्याक ऑफ ऑल's picture

3 Oct 2016 - 4:01 pm | ज्याक ऑफ ऑल

प्रोत्साहनाबद्दल ___/\____

नितीन पाठक's picture

3 Oct 2016 - 3:22 pm | नितीन पाठक

लय भारी लिखाण. आवडले.
पुढचा भाग टाका लवकर ..............

छान साधलाय...सुरवात चांगली झालीये ..पुलेशु

संत घोडेकर's picture

4 Oct 2016 - 10:32 am | संत घोडेकर

आवडले

रातराणी's picture

4 Oct 2016 - 1:25 pm | रातराणी

भन्नाट सुरुवात! पुभाप्र!

एक नंबर लिहिलाय नाव बंधू गोगटे! :-))
आता पुढचा भाग लवकर टाका!

लिहीताय छान!! पण मराठवाड्याचे असल्याने असेल कदाचित, पण आगरी बेरिंग काय जम्या नय. बाकी झकास.

एक आगाऊ सल्ला; ते प्रत्येक प्रतिसादाला धन्यवाद धन्यवाद करु नका. बरं दिसत नै ते. दोनेक दिवसांनी एकच आभाराचा प्रतिसाद ठेवा.

ज्याक ऑफ ऑल's picture

8 Oct 2016 - 8:58 pm | ज्याक ऑफ ऑल

पण मराठवाड्याचे असल्याने असेल कदाचित... ---- शक्यय
बाकी झकास... - __/\__
एक आगाऊ सल्ला; ते प्रत्येक प्रतिसादाला धन्यवाद धन्यवाद करु नका.... ओके .. यापुढे लक्षात ठेवू

अरिंजय's picture

8 Oct 2016 - 8:18 am | अरिंजय

भारी लिहिता दादा. आता पुढचं लवकर लवकर येऊद्या.

अनन्न्या's picture

10 Oct 2016 - 1:15 pm | अनन्न्या

कोकणस्थ आहात आणि पंधरा वीस मिनिटं उशीर? आम्ही तर वेळेआधी अर्धातास सामानासकट तयार असतो!