निगेटिव्ह थिंकिंग - प्रचंड मोठा अडथळा, उपाय ?

यशोदेचा घनश्याम's picture
यशोदेचा घनश्याम in काथ्याकूट
30 Jan 2008 - 7:46 pm
गाभा: 

आई वडिलांच्या छत्रछायेखाली असताना, सामाजिक जीवन, मित्र, नातेवाईक, स्पर्धा, यश - अपयश... ह्या, आणि यासारख्या संज्ञा, फक्त अभ्यास, खेळ आणि कलागुण यांतील उल्लेखनिय प्रगतिच्या भोवतिच रेंगाळत असतात. पण शिक्षण पूर्ण करून, अर्थार्जनाची सुरुवात केल्यावर या संज्ञांची अंधारातली बाजू समोर यायला लागते. कदाचित, शाळा - कॉलेजात मिळणारे यश हे, सर्टिफिकेट, मेडल आणि मार्कलिस्ट मिळवून देते, तर नंतर मिळणारे यश हे, सॅलरी इंक्रिमेंट, प्रमोशन, बिझ्नेस ग्रोथ, सुखसोयी (बंगला, गाडि, नोकर्-चाकर) मिळवून देते, त्यामूळे या संज्ञांकडे पाहण्याचा आपलाच द्रुष्टिकोण बदलतो.
आपलेच जिवाभावाचे मित्र - नातेवाईक मुद्दामहून किंवा नकळत आपल्याला त्रास होईल असे वागतात... नोकरि - व्यवसायात आपण कुठेतरि अडखळतो, आणि इतरवेळी नाहक सल्ला देणारे, अशावेळी मदत / मार्गदर्शन करायचे सोडून आपल्याकडे पाठ फिरवतात... अशा बर्याच घटना सांगता येतील, कि ज्यामुळे समाजाबद्दल एक कटुता मनात निर्माण होते. अशा परिस्थितीत दोन प्रकारे मनुष्य घडू शकतो. एक म्हणजे, या सर्वांवर उपाय काढून प्रचंड यश मिळवलेला, किंवा हतबल, निराश आणि कष्टी जीवन जगणारा. खरेतर समोर येणारे अडथळेच प्रगति करून देण्यास कारणीभूत ठरू शकतात. म्हणतात ना, 'जहाज हे किनार्यावर सुरक्षित असते, पण त्याचा निर्माण किनार्यावर राहण्यासाठी झालेला नसतो!'. संदिप - सलील (वर्तमान मराठी युवांचे प्रचंड आवडते संगीतकार) या प्रसिद्ध जोडिची कविताहि हेच सांगते - "जपत किनारा शीड सोडणे... नामंजूर!". अशा अडचणींवर मात करून यश मिळवणे यातच खरी कसोटि असते. किंबहूना, ज्याला या अडचणींना सामोरे जावे लागत नाहि, तो/ ती अतिशय निरस जीवन जगतो आहे असे म्हणावे लागेल.
पण या अडचणींशी लढताना सामोर येणारी सर्वात मोठि अडचण म्हणजे, निगेटिव्ह थिंकिंग! आपण स्वतःच स्वतःशी शत्रुत्व ओढवून घेतो. आणि या शत्रुशी लढणे प्रचंड अवघड होउन बसते. निगेटिव्ह थिंकिंग हे एक जाग्रुतावस्थेत पडणारे भयस्वप्न आहे. मला यश कधीच मिळणार नाहि... माझे मित्र नातेवाईक यांना स्वतःच्या स्वार्थाशिवाय काहि दिसत नाहि... माझ्या वाईटातच त्यांचा आनंद आहे... असेच दु:खी जीवन जगण्यासाठी माझा जन्म झाला आहे... असे विचार करत आपण आपली स्वप्ने, ईच्छा - आकांक्षा पूर्ण करण्यासाठी झगडा करणेच थांबवतो. आणि ईथे आपली खरी हार होते. आणि पेराल तसे उगवेल या नियमाप्रमाणे, जितके जास्त निगेटिव्ह विचार होत राहतात तितक्या अधिकाधिक निगेटिव्ह घटना घडतही जातात. जी नाती खरेतर ईतकी कडवी मुळिच नाहित, त्यांत आपण स्वतःच विष ओतू लागतो... जे यश सहज मिळाले असते ते घालवून बसतो.... स्वतःशीच कसे लढावे !?
यावरचे काही उपाय मी ऍकले आहेत... योगासने... साधना - ध्यान... निसर्गसानिध्य... उत्तम छंद... वगॅरे...
अँटी डिप्रेशन टॅबलेट्स हि मी ऍकल्या आहेत (या काम कशा करतात माहित नाहि). पण मी माझ्या आईने केलेल्या संस्कराप्रमाणे, असे विचार माझा कब्जा करायला लागले कि, नामस्मरण वाढवतो (कुलदॅवतेचे). माझी श्रद्धा असल्याकारणाने मला योग्य परिणामहि मिळतो.
कधीकधी नवनव्या रहस्यमय कथा कादंबर्या वाचायला घेतो (माझी आवड).
ईथे झणझणीत मिसळ खायला येणार्या सदस्यांच्यासमोर हा विचार मांड्ल्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण आपण, कसे स्वतःशी लढलात... कोणते उपाय अवलंबलेत... कसे अनुभव आले... याबद्दल ईथे लिहावे. कारण आज ना उद्या प्रत्येकाला स्वतःशी युद्ध करावे लागतेच!

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

30 Jan 2008 - 10:30 pm | स्वाती राजेश

दिलगिरी कशाला व्यक्त करता?
मिसळपाव वर वैयक्तिक कोणालाही न दुखवता आपले मत मांडण्याचा अधिकार आहे बहुतेक!
राहिला "विषयाचा" प्रश्न ,तो तर खरच छान आहे.

अन्या दातार's picture

30 Jan 2008 - 10:45 pm | अन्या दातार

घनश्याम साहेब,
येथे उगीचच नाही त्या गोष्टींबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहात. याला मी निगेटीव्ह थिंकिंग म्हणू इच्छितो.

राहता राहिला प्रश्न त्यावरील उपायांचा. मी तरी शास्त्रीय संगीत ऐकतो. त्याने खरंच खूप फरक पडतो.

चतुरंग's picture

30 Jan 2008 - 10:52 pm | चतुरंग

यांचं "दि सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल" हे पुस्तक वाचले आहे का?
ह्यातून फारच चांगले विचार मांडले आहेत. माझ्याकडे हे आहे. जरूर वाचा.

समर्थ रामदासांचा "दासबोध"ही फारच सुंदर मार्गदर्शन करतो. हा तर आपलाच आहे त्यामुळे विचार अगदी चटकन पटतात.

चतुरंग

नेट वरून डाउनलोड करून ठेवले आहे. अजून वाचले नाहि.
'द मंक हू सोल्ड हिज फेरारी', आणि 'यू कॅन विन' वाचत आहे सध्या.

प्राजु's picture

30 Jan 2008 - 11:19 pm | प्राजु

खूपवेळा असे होते. कधितरी, असे वाटते की, मी एकटिच आहे, मला कोणीही नाही. परदेशात कोणाशी बोलावे कळत नाही. मी गायत्री मंत्र ऐकते. जगजीत्सिंग यांचे 'हे राम' भजन ऐकते, रामरक्षा म्हणते. आवडती गाणी ऐकते. आणि तरिही काही नाहीच झाले तर माझ्या आईला फोन करते भारतात.
संत ज्ञानेश्वरांचे "पसायदान" खूप आवडते मला. काहीप्रमाणात मला थोडं मन हल़कं वाटतं.
हा विषय इथे सुरू केल्याबद्दल धन्यवाद.

- प्राजु

विसोबा खेचर's picture

30 Jan 2008 - 11:50 pm | विसोबा खेचर

कुठल्याही समस्येला सर्वतोपरी प्रयत्न करून सोडवायचा प्रयत्न करणे व न सुटल्यास ती गोष्ट सरळ फाट्यावर मारून 'जो होगा, देखा जाएगा' असे म्हणून पुढील परिणामांना सामोरे जायचे ही आपली ष्टाईल! यात निगेटिव्ह विचारसरणीला जागा आहेच कुठे? :)

तात्या.

संजय अभ्यंकर's picture

31 Jan 2008 - 12:54 am | संजय अभ्यंकर

तात्यांची विचारसरणी योग्य आहे.

नोकरीच्या सुरवातीच्या काळात, मला त्रास देणारे बरेच भेटले. तसेच मदतगारही भेटले.
आपल्याल त्रास देणारे, आपल्याल सदैव जागरुक ठेवतात, आणी कठोर कष्ट करायची प्रेरणा देतात.

परंतु कोणी अतिरेकी त्रास देत असेल तर त्याला फाट्यावर मारणे आणी मी तुला फाट्यावर मारतो ह्याची त्याला जाणिव करुन देणे आवश्यक.

संजय अभ्यंकर

यशोदेचा घनश्याम's picture

31 Jan 2008 - 1:49 pm | यशोदेचा घनश्याम

परंतु कोणी अतिरेकी त्रास देत असेल तर त्याला फाट्यावर मारणे आणी मी तुला फाट्यावर मारतो ह्याची त्याला जाणिव करुन देणे आवश्यक.

अतिशय योग्य... काहि ठिकाणी जशास तसे वागावेच लागते!

आनंदयात्री's picture

31 Jan 2008 - 3:34 pm | आनंदयात्री

त्रासावर नामस्मरण आणी संयम हे दोनच उत्तम उपाय. बाकी एहिक जगतात त्रास देणार्याना फाट्यावरच मारावे.

केशवसुमार's picture

31 Jan 2008 - 3:54 pm | केशवसुमार

ते नेहमी भल्या साठी होते. इतके लक्षात ठेवा..
बाकी तात्या म्हणतो तसे 'जो होगा, देखा जाएगा'
एखादा छंद असेल तर तो जोपासा .. मिसळपाव आहेच इथे या चर्चा करा.. गप्पा मारा.. विडंबने करा..
आयुष्य खूप सुंदर आहे..आणि ते तुम्ही त्याच्या कडे कसे बघता तसे ते तुम्हाला वाटते/दिसते.. तेव्हा झटकून द्या ते निगेटिव्ह विचार..
लागा कामाला..
(बी +)केशवसुमार

विसोबा खेचर's picture

31 Jan 2008 - 4:01 pm | विसोबा खेचर

आयुष्य खूप सुंदर आहे..आणि ते तुम्ही त्याच्या कडे कसे बघता तसे ते तुम्हाला वाटते/दिसते.. तेव्हा झटकून द्या ते निगेटिव्ह विचार..

हेच म्हणतो!

काही गोष्टींनी साध्य काहीच होत नाही, उलट त्रासच होतो फुक्कटचा. नकारात्मक विचारसरणी ही त्यापैकीच एक! तेव्हा ती लवकरात लवकर झटकून देणे हेच उचित आहे...

आपला,
(सकारात्मक) तात्या.

बापु देवकर's picture

31 Jan 2008 - 7:52 pm | बापु देवकर

मी या गोस्टीचा विचार करत नाही...पण अस झालच तर इतरासारखा नामस्मरण करतो,आवडती गाणी ऐकतो,पुस्तक वाचतो....आणी महतत्वाच पुन्हा नवी सुरवात करतो...

विसोबा खेचर's picture

1 Feb 2008 - 12:16 am | विसोबा खेचर

आणी महतत्वाच पुन्हा नवी सुरवात करतो...

हे आवडले! :)

आणि माझ्यामते तेच खरेही आहे!

तात्या.

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा
फुलला पहा सभोती(सभोवती) आनंद जीवनाचा
असे एक गाणे आहे.
तसेच अजून एक गाणे....
अंधाराची खंत तू कशाला करशी रे
गा प्रकाश-गीत..

ह्या गाण्यांचा अर्थ जाणून घ्या.

जीवन म्हटले की आशा-निराशा,सुख-दु:ख वगैरे गोष्टी येणारच. तेव्हा त्या तशा स्वीकारण्याची मनोवृत्ती तयार केली तर मग यशाने माणूस हवेत तरंगत नाही आणि अपयशाने खचून जात नाही. तेव्हा ज्या गोष्टीत आपले मन रमते ते करावे. मग ते नामस्मरण असो,योग असो,वाचन-लेखन,गायन-श्रवण अथवा अजून काही असो. ते जरूर करावे. अशुभस्य कालहरणम! असे म्हटले आहे. तेव्हा हा काल जमेल तसा आणि तितका आनंदात घालवण्यासाठी आपल्याला असलेल्या छंदात व्यतीत करावा. छंद नसल्यास लावून घ्यावा. रडत बसण्याने काहीच साध्य होत नाही. जे क्रमप्राप्त आहे ते धीराने सोसण्याचे बळ अंगी यावे ह्यासाठीचे हे उपाय आहेत. ज्याला जे जमेल त्याने ते करावे.
केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे! ह्या न्यायाने सतत काही तरी करत राहा. मग पाहा निराशा तुमच्या सावलीला देखिल उभी राहणार नाही.

अर्थात नेहमीच सकारात्मक गोष्टी गृहित धरू नये. त्यामुळे अतिउत्साहात अपयश येऊ शकते आणि माणूस अजून दु:खी होतो. एखाद्या गोष्टीचा विचार करताना त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाबी ध्यानात घेतल्याच पाहिजेत. ह्यालाच सारासार विचार असे म्हणतात. अशा प्रसंगी एखाद्या विश्वासातल्या अनुभवी माणसाचा सल्ला घ्यायलाही हरकत नाही. इतके करूनही अपयश आलेच तर रडत बसू नये.अपयशामागच्या कारणांची मीमांसा करावी. त्यातूनही नवा मार्ग सापडू शकतो.

चतुरंग's picture

31 Jan 2008 - 8:20 pm | चतुरंग

अर्थात नेहमीच सकारात्मक गोष्टी गृहित धरू नये. त्यामुळे अतिउत्साहात अपयश येऊ शकते आणि माणूस अजून दु:खी होतो. एखाद्या गोष्टीचा विचार करताना त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाबी ध्यानात घेतल्याच पाहिजेत. ह्यालाच सारासार विचार असे म्हणतात.

तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. "सारासार विचार" फार महत्त्वाचा. अतिउत्साहाच्या भरात वरवर आकर्षक वाटणार्‍या आणि भुरळ पाडणार्‍या कित्येक गोष्टी ह्या विचाराअंती तोट्याच्या असल्याचे सिध्द होते.

चतुरंग

धोंडोपंत's picture

31 Jan 2008 - 8:58 pm | धोंडोपंत

लोकहो,

या ठिकाणी आम्हांला ज्योतिषशास्त्राचा फार उपयोग होतो. जी गोष्ट होणार नाहीये किंवा होणार आहे त्याबद्दल चिंता आणि खेद करण्यात आपण आपली बरीच उर्जा खर्च करीत असतो.

अनेकदा नको तो आटापिटाही होत असतो. पण ज्योतिषविषयाची माहिती असेल तर अनेक आडाखे मनाशी बांधता येतात आणि अनेकदा अत्यंत थक्क करणारे अनुभवही येतात.

नुकतेच घडलेले उदाहरण सांगतो.

शेअरबाजार गेले तीन महिने फार तेजीत होता. निर्देशांक जवळपास रोज नवीन उच्च पातळी गाठत होता. आम्ही जेव्हा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ग्रहस्थितीची सांगड मार्केटशी घातली तेव्हा मंगळ मार्गी लागण्यापूर्वी एक जबरदस्त तडाखा मार्केटला देईल अशा निष्कर्षाप्रत आम्ही आलो .

आणि आमच्या काही समूहांवर त्याबद्दल लेखनही केले. त्यावेळेस स्वतःला शेअरबाजारातील जाणकार समजणार्‍या अनेक "तज्ज्ञांनी "आम्हांला वेड्यात काढलेही होते.

आमच्या मित्रमंडळींनीसुद्धा ..."हे जरा लईईईई होताय" अशा स्वरूपाचे प्रतिसाद आम्हाला ऑफलाईन दिलेले होते. कारण तेव्हा प्रत्येक जण सेंसेक्स २५००० वर पोहोचेल अशी स्वप्ने पहात होता.

पण गेल्या १० दिवसात काय घडले आहे हे आम्ही सांगायची गरज नाही.

आपला,
(भविष्यवेत्ता) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Feb 2008 - 12:56 am | llपुण्याचे पेशवेll

मी देखील नामस्मरण करतो. जेव्हा जेव्हा असे विचार मनाला त्रास देतात. तेव्हा माझ्या आईने सांगितलेली रामदास स्वामींची ओळ मनात स्मरतो. "सदा सर्वदा देव सन्निध आहे कृपळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे|". आपल्यामागे आपल्याला सांभाळणारा कोणीतरी आहे ही भावना फार बळ देते जगण्यासाठी.
तसेच मी एक गोष्ट कायम मनात धरून आहे की संधी प्रत्येकाला मिळत असते. आज दुसर्‍याचे चांगले झाले पण माझे झाले नाही ठीक आहे कधीतरी माझे पण चांगले दिवस येतील. हींदी मधे म्हणतात ना 'कुत्ते का भी दिन आता है|" सो मेरा भी दिन आयेगा जरूर.
त्यामुळे याच दिवसाची वाट बघत जे काही घडत आहे ते स्वीकारत आणि शक्य ते सर्व प्रयत्न करून ते स्वत:ला अनुकूल बनवित असतो. मनाप्रमाणे घडले तर उत्तम नाही घडले तर पुढच्या वेळेला नक्की घडेल असे मनाशी पक्के करतो.
(हिम्मतवान)
डॅनी.
पुण्याचे पेशवे

यशोदेचा घनश्याम's picture

1 Feb 2008 - 11:40 am | यशोदेचा घनश्याम

सदा सर्वदा देव सन्निध आहे कृपळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे|". आपल्यामागे आपल्याला सांभाळणारा कोणीतरी आहे ही भावना फार बळ देते जगण्यासाठी.
- अगदि बरोबर.

योग्य वेळि योग्य शब्द वापरून आपल्या भावना - मते इतरांकडे व्यक्त करायला येणे खूप महत्वाचे आहे. आई हिच फक्त अशी असते कि, तिला न बोलताहि मुलांच्या भावना, ईच्छा, अपेक्षा कळतात. पण ईतर ठिकाणी बोलावेच लागते. अगदि ईश्वराकडेहि मनातली ईच्छा बोलून दाखवावी लागते. स्वतःला स्पष्टपणे ईतरांसमोर मांडता आले पाहिजे. त्यामुळे नोकरी, नातेसंबंध दृढ व्हायला मदत होते. नाहितर पूर्वग्रहदूषित मनोवृत्तीने वागल्यास नकारात्मक विचारांना खतपाणीच मिळते.

बापु देवकर's picture

4 Feb 2008 - 7:05 pm | बापु देवकर

आई...कारण ती बाळाशी एकरुप झालेली असते...असेच जेव्न्हा आपण दुसरर्‍याबरोबर होऊ तेव्न्हा नक्कीच कोणी दु:खी होणार नाही.ऊलट आपण त्या परमेश्वराजवळ जाऊ...

राजाजी....