मला ना लहानपणी काही विशिष्ठ गावे आणि जागा या निव्वळ दंतकथा वाटायच्या. उदाहरणार्थ - टिमबकटू , झुमरीतलैय्या किंवा केप ऑफ गुड होप. मला ही ठिकाणं म्हणजे अनुक्रमे- वाक्प्रचार म्हणून वापरायला, फिल्मी गाण्यांच्या फर्माईशी पाठवायला आणि वास्को डी गामाला शॉर्ट कट मारुन हिंदुस्तानात येता यावे म्हणून निर्माण केलेल्या काल्पनिक गोष्टी वाटायच्या…….
पुढे वयोमानपरत्वे समजले की या जागा दंतकथेतल्या नसून खरोखरीच अस्तिवात आहेत. त्यापैकी केप ऑफ गुड होपला तर आज प्रत्यक्ष जाण्याचा आमचा बेत ठरला होता. सहाजीकच तीथे जाण्यासाठी आम्ही कमालीचे उत्सुक होतो.
ब्रेकफास्ट नंतर आम्हाला घ्यायला आमची टूर गाइड आली होती. तिचे नाव मर्टल. साधारणपणे आज काय काय बघायचे यावर मर्टलशी थोडी चर्चा केली. गाडी तिचीच होती. केप टाउन मधे असेपर्यंत आम्ही गाडी रेंट केली नव्हती, तशी गरजच वाटली नाही. एकतर आमचे राहण्याचे हॉटेल खूप मध्यवर्ती जागी होते आणि सगळीकडे फिरायला टॅक्सी आणि हॉप ऑन हॉप ऑफ बसेस खूप सोयीच्या आहेत. शहराच्या बाहेर जायचे म्हणजे मग मात्र रेंटल कार हवीच कारण या भागात ट्रेन्स्, बसेस जवळपास नाहीतच.
सुमारे साडे नऊ वाजता आम्ही हॉटेल मधून निघालो. आज आमचा या शहरातला शेवटचा दिवस होता त्यामुळे हवामानाला आज सुद्धा चांगले असण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. नाहीतर हा शेवटचा दिवस अगदी वाया गेला असता.
केपटाउन पासून साधारण दोन तासांच्या ड्राइविंगच्या अंतरावर केप पॉइण्ट / केप ऑफ गुड होप आहे. हा भाग म्हणजे साऊथ आफ्रिकेचे अगदी दक्षिण टोक. रस्ता जरी दोनच तासांचा असला तरीही तिथे जाऊन यायला पूर्ण एक दिवस राखून ठेवावा लागतो. याचे कारण असे की हा संपूर्ण मार्ग समुद्राच्या कडेकडेने जातो. अधेमधे सुंदर समुद्र किनारे आणि डोंगर रांगा....जातांना मधेच कुठेतरी थांबून निवांतपणे निसर्ग डोळ्यात भरून घ्यावा. डोंगराच्या कडेला गाडी उभी करावी आणि भान हरपून खाली उसळणार्या लाटांकडे बघत बसावे. हिरव्या- निळ्या रंगांच्या इतक्या अगणीत छटा त्या पाण्यात पाहतांना मन अगदी थक्क व्हायला होते. रस्ते अतिशय उत्तम आहेत. डोंगरांमधून बरेच वेळा रस्ता जातो पण तरीही तो मला कधी धोकादायक वाटला नाही. अप्रतिम हवा, अगदी बेताची रहदारी, स्वच्छ गुळगुळीत रस्ते, ऐसपैस गाडी, आजूबाजूला वेड लागेल असा निसर्ग आणि गाडीत कटकट न करता शांत बसलेली मुलं......सुख, सुख काय म्हणतात ते हेच हो.....
केपटाउनच्या दक्षिणेला चॅपमन'स पीक हा पर्वत आहे. याच्या माथ्यावर जाण्यासाठीचा जो रस्ता आहे त्याला चॅपमन'स पीक ड्राइव म्हणतात. हा ड्राइव केप टाउन मधे आल्यास तुमच्या मस्ट विज़िट यादीमधे असावाच. सुदैवाने इथे जायला विशेष काही वेगळे करावे लागत नाही. केप पॉइण्ट कडे जातांना अनायसे इथूनच जावे लागते. या डोंगराचा पश्चिमेकडील भाग हा म्हणजे एक प्रचंड सरळसोट कडा आहे, जणू एखादी भिंत . ही भिंत उतरते ती थेट खाली अटलांटिक महासागरात.....आणि या सरळ सपाट भिंतीला जो आडवा, नागमोडी रस्ता छेदून जातो तो म्हणजे चॅपमन'स पीक ड्राइव. अत्यंत सुरेख मार्ग. अरुंद आहे पण तरीही व्यवस्थीत बांधला आहे त्यामुळे घाट वळणाचा असूनही कुठेच भीती वाटत नाही.
डोंगराचा माथा म्हणजे चॅपमन'स पीक. इथे उभे राहून जो सृष्टीचा जो अप्रतिम नजारा दिसतो त्याचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही……
साऊथ आफ्रिकन नौदलाचा तळ आणि आफ्रिकन पेंग्विन्सची वस्ती या दोन गोष्टींसाठी सायमन्स टाउन हे शहर प्रसिद्ध आहे. केप टाउन आणि केप पॉइण्टच्या बरोबर मधे हे टूमदार गाव आहे. इथून हार्बरचा नजारा खूप छान दिसतो. गाडी थांबवून या गावात आम्ही फेरफटका मारायला बाहेर पडलो. डोंगर पायथ्याशी असलेले हे सुंदर गाव. रस्त्याच्या दुतर्फा छोटी, छोटी दुकाने, कॅफे आणि रेस्टोरेंट्स आहेत.
जवळच बोल्डर बीच आहे. आफ्रिकन पेंग्विन्स सहजासहजी भरवस्तीत बघायला मिळत नाहीत. हे पक्षी इतक्या जवळून पाहता येतील अशा अत्यंत कमी जागा आहेत जगभर. सायमन्स टाउन शहर आणि हा किनारा त्यापैकी एक.
बीच एखाद्या शांत सरोवरासारखा आहे. मुलांसाठी पाण्यात खेळायला अगदी सुरक्षित. हे बोल्डर्स करोडो वर्षे प्राचीन आहेत असे म्हणतात . पाण्यात पोहतांना आपल्याबरोबर पेंग्विन्सही मस्तं पोहत असतात. त्यांना लोकांची इतकी सवय आहे की ते बिनदिक्कतपणे आपल्या जवळ येतात. फोटोसाठी पोज़ वगैरे सुद्धा देतात......
या बीच पासून अगदी जवळच फॉक्सी बीच आहे. भरपुर पेंग्विन्स बघायचे असतील तर या फॉक्सी बीच वर जावे. पार्किंग लॉट मधे पार्किंग करून, बीच तिकीट काढून आम्ही आत गेलो. समुद्र किनारी किंचित उंचीवर लाकडी पायवाटा बनवल्या आहेत. इथे फक्त या प्लॅटफॉर्म वरुनच फिरता येते. पेंग्विन्सची सुरक्षितता आणि संवर्धन हा उद्देश. आपल्यासाठी सुद्धा हे पक्षी पाहण्याची ही उत्तम सोय आहे. या पायवाटेवरुन फिरत फिरत हजारो पेंग्विन्स आपल्याला अक्षरश: हाताच्या अंतरावरून पाहायला मिळतात. आरामात किनार्यावर पहुडलेले असतात, तुरुतुरू चालत असतात आणि मस्तं मासोळी सारखे पाण्यात पोहायला सूर मारत असतात. पंचवीस वर्षांपूर्वी पेंग्विनची नर आणि मादी अशी एक जोडी आणल्या गेली होती आज जवळपास तीन हजारांवर त्यांची संख्या गेलीय. या किनार्याजवळच्या पाण्यात पेंग्विन्स जे मासे खातात ते मासे मुबलक प्रमाणात आहेत याचबरोबर या पेंग्विन्सची काळजी देखिल अतिशय चांगल्या तर्हेने घेतली जाते.
इकडे दिवसभर वेळ घालवला तरीही कमीच वाटेल पण आम्हाला रेंगाळण्याची ऐश परवडण्यासारखी नव्हती. जितका उशीर केप पॉइण्टला पोहोचायला होईल तितकी येतांना ट्रॅफिक मधे फसण्याची शक्यता जास्ती. वर पुन्हा इथल्या हवेचा काही भरवसा देता येत नाही त्यामुळे हवा चांगली आहे तोपर्यंत फिरून घ्यावे असा आमचा हिशोब.
आता आजच्या दिवसाच्या हायलाईटकडे म्हणजेच केप पॉइण्टकडे आम्ही निघालो होतो.
वाटेत यांचेही दर्शन झाले...
केप पॉइण्ट जसा जवळ येत चालला होता तशी आमची उत्सुकता अगदी उतू जायला लागली होती. साधारणपणे शेवटी दुपारी तीन ते चारच्या सुमारास आतापर्यंत जो फक्त इतिहास आणि भूगोलाच्या पुस्तकातच आम्हाला भेटला होता त्या केप ऑफ गुड होपच्या दाराशी आम्ही जाऊन पोहोचलो.........
क्रमश:
प्रतिक्रिया
21 Sep 2016 - 4:39 pm | पिशी अबोली
वर्णन छान. फार आवडतंय.
(अवांतरः जळतेय जळतेय.. हे काहीच बहुतेक बघता येणार नाहीये. :( )
21 Sep 2016 - 4:41 pm | पाटीलभाऊ
मस्त फोटो...चॅपमन पीक ड्राईव्ह अतिशय सुंदर रस्ता आहे...गाडी चालवावी तर अशा रस्त्यांवरती...!
न्यास्ना (Knysna) ला जाऊन आलात कि नाही ?
21 Sep 2016 - 4:43 pm | यशोधरा
तुला लाख दुवाऐं ह्या धाग्याबद्दल :) कसा नितळ धागा आहे!
छान लिहिते आहेस.
21 Sep 2016 - 5:05 pm | प्रचेतस
खूप छान.
पेंग्विन आफ्रिकेच्या दक्षिण किनार्यावर पण आहेत हे माहित नव्हतं.
21 Sep 2016 - 5:39 pm | रेवती
पाण्याचा रंग. पेंग्विन्स असे सगळे आवडले. पंचवीस वर्षात चांगली काळजी घेतली गेलिये असे दिसते.
21 Sep 2016 - 7:16 pm | पगला गजोधर
सर्वात दक्षिणेच्या टोकाला 'केप अघुलस' असे म्हणतात (जिथे हिंद व अटलांटिक महासागर संगम होतो), केप ऑफ गुड होप हे सर्वात दक्षिणेकडे नाही.
असो तिथे एक दोन्ही महासागरांच्या संगमावर काल्पनिक रेषा (मॉन्युमेंट) आहे, त्या रेषेच्या वर उभे राहून (दोन्ही पायांच्या मध्ये रेष येईल) अश्या रीतीने फोटो काढणे मस्ट असते !!!
22 Sep 2016 - 2:16 pm | पगला गजोधर
22 Sep 2016 - 2:21 pm | पद्मावति
आहाहा.....क्लास!!!!! धन्यवाद गजोधर. मस्तं. काय सुंदर ठीकाण आहे हे. एकदम युनिक.
बाकी सर्व प्रतिसादकर्त्यान्चे पण खूप खूप आभार.
21 Sep 2016 - 7:40 pm | एस
क्या बात है! भारी.
21 Sep 2016 - 8:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारी ! लहानपणापासून भूगोलांत वाचलेल्या अश्या जागांना भेट द्यायची मजा काही औरच !
21 Sep 2016 - 8:20 pm | पिलीयन रायडर
पेंग्विन्स!!! कसलं क्युट!
हा ही भाग आवडला. आनंद झाला. जळजळ झाली. सगळं नीट चालु आहे रुटीन प्रमाणे!
लिहीत रहा!
21 Sep 2016 - 8:32 pm | स्वाती दिनेश
हा भागही आवडला, वर्णन आणि फोटो दोन्ही मस्त!
स्वाती
21 Sep 2016 - 10:00 pm | खटपट्या
सद्या फक्त फोटो बघीतलेत. खूप छान.
21 Sep 2016 - 10:03 pm | अजया
काय सुंदर ठिकाणं आहेत एकेक.ते पेंग्विन बघून माझ्या लेकाला लहानपणी पिंगू कार्टुन आवडायचं त्याची आठवण झाली!
21 Sep 2016 - 11:18 pm | उल्का
मस्तच लिहिलं आहेस.
21 Sep 2016 - 11:38 pm | रुपी
मस्त. लेखनशैली नेहमीप्रमाणेच भारी! पहिल्या वाक्यापासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी.
"अप्रतिम हवा, अगदी बेताची रहदारी, स्वच्छ गुळगुळीत रस्ते, ऐसपैस गाडी, आजूबाजूला वेड लागेल असा निसर्ग" पर्यंत ठीक आहे, पण
हे कसं साध्य केलं?
22 Sep 2016 - 1:17 pm | पियुशा
वा काय सहिये ही जागा :)
22 Sep 2016 - 2:37 pm | पैसा
फार सुरेख लिहिलंस. फोटो तर मस्तच!
22 Sep 2016 - 2:55 pm | सुमेधा पिट्कर
पेंग्विन्स!!! कसले भारी फोटो आहेत,लेखनशैली भारी! पहिल्या वाक्यापासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी.
22 Sep 2016 - 5:48 pm | संजय पाटिल
सुरेख लेखन आणे फोटो..
पुभाप्र...
22 Sep 2016 - 5:49 pm | संजय पाटिल
आणे - आणी !
22 Sep 2016 - 7:31 pm | अभ्या..
मस्त ट्रीप पद्माक्का,
३ नंबर फोटोतलं ते भुताळी घर काळे काळे कसले डेंजर दिसतेय.
22 Sep 2016 - 7:31 pm | अभ्या..
मस्त ट्रीप पद्माक्का,
३ नंबर फोटोतलं ते भुताळी घर काळे काळे कसले डेंजर दिसतेय.
23 Sep 2016 - 1:21 pm | Sanjay Uwach
सुंदर प्रवास वर्णन. खूप आवडले
28 Oct 2016 - 1:25 am | निओ
पेंग्विन्स...फक्त अंटार्टिका सारख्या दुर्गम अतिशीत भागात आढळतात असे समजत होतो. इथे पाहून नवल वाटले.