स्मार्टफोन, गूगल मॅप्स , रस्ते, वीज, घड्याळे, वहाने यांपैकी काहीच नसताना समर्थ रामदासांनी भारतभर उभ्या केलेल्या व आजवर टिकलेल्या एका जबरदस्त अद्भुत "इंटेलिजन्स नेटवर्क" ची अभ्यासपूर्ण कहाणी...
नमस्कार! एक इतिहास अभ्यासक व "विमुक्त भटका" या नात्याने हे लिखाण करीत आहे. (समर्थ भक्त या नात्याने नव्हे!)
रामदासी संप्रदायामध्ये समर्थांनी ११११ किंवा ११०० रामदासी मठ संपूर्ण भारतभर स्थापन केले असे सांगितले जाते.
कुणालाही प्रथम ऐकताना हे विधान १११ % अतिशयोक्त वाटू शकते. हे ११११ नक्की काय गौडबंगाल आहे?खरेच असे मठ आहेत का?असतील तर कुठे कुठे आहेत हे मठ? सध्या काय स्थितीत आहेत?
पाहुयात! मुळात ११०० हा आकडा खरा की ११११? ११११ या आकड्यामागे एक कारणपरंपरा आहे. "समर्थ रामदासांच्या लिखाणात अनेक कोडी आढळतात व ती सोडवणे हे येणा-या पिढीतील तरुणांपुढचे मुख्य काम आहे." असे समर्थहृदय शंकर श्रीकृष्ण देव म्हणत असत. हे तेच देव ज्यांनी समर्थांच्या अनेक मठांमध्ये फ़िरून लाखो कागद गोळा करून समर्थांचे सर्व लिखाण प्रकाशित केले व हे सर्व महत्वाचे कागद-दस्त धुळ्याला स्वत:च्या राहत्या घराची जागा दान देऊन एक संस्था उभी करून तिथे जतन करून ठेवले, आजही ते समर्थ वाग्देवता मंदिर धुळ्याला उभे आहे. असो.
तर अशाच एका रचनेत समर्थ लिहितात,
अक्रा अक्रा बहु अक्रा। काय अक्रा कळेचिना।
गुप्त ते गुप्त जाणावे। अनंदवनभूवनी॥
या वरून पुढे संप्रदायात समर्थ त्यांनी विस्तारलेल्या हजारहून अधीक मठांच्या जाळ्याबद्द्ल तर बोलत नाहीत ना, अशा शंकेने हा आकडा ११११ मठ असा सांगितला जाऊ लागला. कारण तत्कालीन "भारतवर्षात" (ज्यात अफ़गाणिस्तान, पकिस्तान, बलुचिस्तान, इराण पासून हे ब्रह्मदेश, नेपाळ, तिबेट, बांग्लादेश, लंका हा सर्व प्रांत गणला जात असे.) समर्थांनी जागोजागी आपले काही शिष्य (सांप्रदायिक आकडा अर्थातच ११!) पाठवून त्यांना तिथे मठस्थापना करावयास लाविली होती. या मठातून रामभक्तीचा प्रसार, प्रचार व अन्य अनेक उत्सवादी चालत जेणॆकरून तत्कालीन हिंदू समाजाला एकत्र येण्यास कारण मिळत असे.
"गुप्त ते गुप्त जाणावे" असे का? तर या मठांमधून खरोखरीच अध्यत्म प्रसाराखेरीज अजून बरीच कार्ये चालत असत असे खात्रीशीरपणे सांगता येते.
शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे व या मठांचे काहीतरी संबंध नक्की असणार अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे कारण परप्रंतात, परभाषीय प्रदेशात आपला स्वभाषीय व स्वविचारांचा व बलदंड मनुष्य मिळणे, ज्याला त्या प्रांताची, तिथल्या भूगोलाची, माणसांची, भाषेची, रीतिरिवाजांची खडान खडा माहिती असेल, तसेच हक्काचा आसरा, निवारा मिळणे हे गुप्तहेरांच्या दृष्टीने स्वर्ग प्राप्त झाल्याप्रमाणेच आहे!
एक महत्वाची नोंद, या लेखात मी वैयक्तिक भेट देऊन पाहिलेल्या, अनुभवलेल्या वा या ना त्या मार्गाने संपर्कित झालेल्या मठांबद्दलच केवळ लिहिणार आहे. अशा मठांची तिथल्या मठपतींची, त्यांच्या भाषांकासह, पत्ता व इमेल आयडीसह एक यादी प्रस्तुत लेखकाने तयार केलेली असून ती दासबोध.कॉम या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. या लेखाच्या निमित्ताने अशा अंधारात राहिलेल्या अजून काही मठांबद्दल माहिती वाचकांकडून कळली, व ती यादी अधीक परिपूर्ण झाली तर ती हवीच आहे! असो.
आज या मठांची स्थिती काय आहे? याचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला असता असे लक्षात आले की आजही (इ.स. २०१६) असे २५० हून अधीक रामदासी मठ पूर्ण भारतभर कार्यरत आहेत! महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्र, तेलंगण, कर्नाटक, गुजराथ, तमिळनाडू उत्तरांचल, राजस्थान इ. राज्यांत आज २०१६ साली देखील हे मठ आढळतात.
मुळात मठ म्हणजे काय ते ध्यानात घ्यावे. मठ म्हणजे दर वेळॆस एखादा टोलेजंग वाडा व त्यात अतिभव्य देवालय, धावपळ करणारी शिष्य मंडळी इ. असेलच असे नाही. समर्थांच्या बहुतांश मठांत श्रीरामाचे, मारुतीचे अथवा पांडुरंगाचे मंदिर असते. (होय पांडुरंगाचे मंदिर! असेही मठ आहेत! उदा. मेथवडे मठ, अमळनेर-भांड्याचे इथला मठ इ.) परंतु बरेचसे मठ आज वेगळया स्थितीत आहेत. काही मठ अक्षरश: पैशाअभावी पडझड होऊन नष्ट पावले आहेत, पावत आहेत, तर काही मठांमध्ये तर कोट्यावधी रुपयांची जीर्णोद्धाराची कार्ये सुरु आहेत उदा. मिरज वेण्णास्वामी मठ, हनुमानटाकळीचा मठ इ.
काही मठाना ब्रह्मचारी परंपरा असल्याने त्यांचे नावावर आजही शेकडो एकर जमिनी आहेत. तर एकीकडे संसारी मठपतींमध्ये भावाभावात वाटण्या होऊन अनेक मठांना शिवकाळात व मराठेशाहीत मिळालेल्या जमिनी आज त्यांचे नावावर नाहीत.अनेक जमिनी कुळकायद्यात गेलेल्या आहेत. अनेक मठ गांधी हत्येनंतर जाळून खाक झालेले आहेत. (जातीयवाद्यांसाठी माहिती: समर्थांचे मठपती सर्वजातीय होते, आजही शिरवळचे तांबे महाराज यांचे मराठा वंशज मठ पहातात. किंवा मसूरचा मठ पवार नामक एक वृद्ध स्त्री सांभाळते ) काही मठांमध्ये अठरा विशे दारिद्रय आहे, इतके की मठपतीलाही २ वेळच्या जेवणाची भ्रांत आहे तर काही मठात रोज लाखो लोकांना अन्नदान होते आहे (उदा. गोंदवले मठ, सज्जनगड मठ) तरीदेखील आपल्या घराण्यातील ही रामदासी परंपरा अनेक रामदासीनी यथानुशक्ती, यथामती कसोशीने जपली आहे. टिकवली आहे, वर्धिष्णू केलेली आहे.
काही मठांवर वारकरी मठपती आहेत (उदा. निजामाबाद मठ, इंदुर बोधन मठ ) तर काही मठांमध्येच सज्जनगड ते पंढरपूर आषाढी/कार्तिकी वारीची परंपरा आहे, उदा. पंढरपूर येथील 3 मठ.
समर्थशिष्य गिरीधर स्वामी यांनी त्यांच्या श्री समर्थप्रताप या ग्रंथात वरीलपैकी काही मठांची यादीच दिलेली आहे, त्यावरून केलेला भूमान (नकाशा) सोबत दिलेला आहेच. परंतु याहून अधीक रामदासी मठ खात्रीशीरपणे आजही जिवंत आहेत! कशावरून? सांगतो! सध्या समर्थस्थापित मठांची नक्की स्थिती काय आहे, हे जाणून घेण्याच्या हेतून श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड या रामदासी सांप्रदायाच्या मातृसंस्थेने २०१० साली पहिले रामदासी मठपती सम्मेलन सज्जनगडावर आयोजित केले होते व आता प्रतिवर्षी त्याचे आयोजन होते आहे. या सम्मेलनाला दर वेळेस नवनवे मठपती उपस्थिती लावत आहेत! व या सर्वांचे मत एकच आहे! या सर्वांना असेच वाटत होते की आता रामदासी संप्रदाय जवळपास संपलाच आहे ! आपल्याच घरी, आपणच काय ते रामदासी परंपरा टिकवून ठेवलेली आहे व ती आमरण ठेऊच..परंतु जसे त्यांना कळले की अरे, अन्यही मठ जिवंत आहेत, नव्हे नव्हे जोमाने कार्य करीत आहेत, तेंव्हा हे लक्षात आल्यावर त्यांना काय आनंद झाला असेल कल्पना करून पहा!
आपण एकटे नाहीत, ही भावना विषेशत: सांप्रदयिकांना फ़ार सुखावणारी असते, हुरूप देणारी, बळ देणारी, उभारी देणारी असते. याचे उत्तम उदाहरणा म्हणजे दक्षिणेकडील मठ!
आजही तंजावर सारख्या अति दक्षिणेकडील राज्यात समर्थांचे ६ मठ पूर्ण शक्तीने कार्यरत आहेत! व समर्थ शिष्यांची समाधी मंदिरे इ. पकडता एकून १४ रामदासी स्थाने तिथे आजही उभी आहेत! हे सर्व लोक उत्तम मराठी भाषा आजही लिहितात, वाचतात, बोलतात हे किती विशेष आहे!
आशिया खंडातील अति भव्य ग्रंथालयांपैकी एक व तंजावरकर भोसले घराण्याचा खाजगी ग्रंथसंग्रह असलेले "श्री सरस्वती महाल ग्रंथालय" येथील मराठी विभागप्रमुख म्हणून गेली अनेक दशके भीमराज गोस्वामी हे रामदासी मठपतीच होते! व आजही रामचंद्रबुवा केसकर हे रामदासी मठपतीच ती धुरा समर्थपणे पेलत आहेत! रामचंद्र हे तंजावरी मोडीचे एकमेव तज्ञ असून त्यांनी दक्षिणेत समर्थ संप्रदाय टिकावा म्हणून अत्यंत भरीव योगदान दिलेले आहे. आजही शिवरायांच्या तंजावर गादीतील वंशजांचे व या मठपतींचे अत्यंत स्नेहाचे संबंध आहेत! तंजावरचे भोसले घराण्यातील वंशज आजही दासबोध वाचतात हे प्रस्तुत लेखकाला स्वत: वंशजांनीच सांगितलेले आहे!
मराठ्यांच्या इतिहासाची अनेक दुर्मिळ कागदपत्रे या ग्रंथालयात अभ्यासकांची वाट पहात धूळ खात पडून आहेत! तिथे जाऊन कुणाला याचा अभ्यास करावयाचा असल्यास कुठल्याही समर्थ मठात निवास व अन्य अभ्यासाची सोय आज ३५० वर्षांनीही होऊ शकते! रामेश्वरचे मठपतीही दरवर्षी न चुकता सज्जनगडावर येतात. मण्णारगुड्डी मठ देखील असाच मोठा मठ आहे.
समर्थांची अनेक अस्सल तैलचित्रे तंजावरकर भोसले घराण्याच्या संग्रहात आहेत.
या शिवाय आंध्र-तेलंगणात समर्थांचे ६५ मठ आज शिल्लक आहेत. पैकी निजामाबाद, इंदुर-बोधन, जुक्कल इ. मठ फ़ारच भव्य आहेत व जोमाने कार्य करीत आहेत. जुक्कल येथून तर दर वर्षी दासनवमीला जुक्कल ते सज्जनगड अशी शेकडो तेलुगु समर्थभक्तांची पदयात्रा येते! या मठातील कोणत्याही कार्यक्रमाला किमान ३-४ हजार लोकांची उपस्थिती असतेच असते.
येथील केशव रामदासी मठपती अत्यंत तरुण व उच्चविद्याविभूषित असून त्यांनी स्थानिक तरुणांचे मोठे संघटन उभे केलेले आहे.
कर्नाटकात आज ३६ मठ शिल्लक आहेत (नोंद झालेले) व या प्रत्येक मठाने समर्थ साहित्याचे स्थानिक भाषेत भाषांतर केलेले आहे हे वेगळे सांगणॆ नलगे!
ग्वाल्हेर मठ हा देखील अत्यंत मोठा मठ असून तिथे अनेक कार्यक्रम आजही होत असतात. ज्योतिरादित्य शिंदेंसह सर्व शिंदे सरकार घराण्यातील लोक या मठात "शिवछत्रपतींची गुरुगादी" म्हणून दर्शनाला आवर्जुन येतात. उपेंद्र महाराज शिरगांवकर हे तेथील कार्यभाग बघतात व त्यांच्या समर्थ प्रेस च्या माध्यमातून त्यांनी रामदासांचे सर्व लिखाण हिंदी भाषेत नेलेले आहे! हिंदी भाषकांना ओवी वृत्त फ़ारसे भावत नाही हे पाहून नुकताच त्यांनी दोहाबद्ध दासबोध प्रकाशित करण्यास घेतला आहे!
जयपूर, उदयपूर हे असेच जुने रामदासी मठ! पण त्याहून अप्रूप वाटते ते बद्री येथील २ रामदासी मठांचे! कारण येथुन तिबेट-चीन ची सीमा केवळ ३० किमी आहे!
आज ब-याच मठात कुणी रामदासी शिल्लक नाहीत, तर भक्तगण, अथवा ट्रस्टी तेथील कारभार, पूजाअर्चा पहातात.
परंतु पुच्छ ते मुर्डिले माथा अर्थात डोक्याहून पुढे शेपूट गेलेला पठडीतला समर्थ स्थापित हनुमान आपल्याला तो रामदासांनीच स्वहस्ते बनविलेला असल्याची खात्री देत असतो! (होय, समर्थांचे सर्व मारुती स्वहस्ते बनवलेले आहेत व त्याला माध्यमाचे वावडे नाही, अगदी शेणाचा, मेणाचा, मातीचा, शेंदराचा,लाकडाचा, दगडाचा, कशाचाही मारुती ते बनवत असल्याची इतिहासात नोंद आहे. ) असे अनेक मारुती आपणही किल्ल्यांवर, आपल्या गावात, इतरत्र पाहिले असतील! महाराष्ट्रातील ट्रेकवेड्यांना तर असे शेकडो मारुती क्षणात आठवतील!
मुळात हनुमान हे दैवतच उत्तरेतून महाराष्ट्रात आणून त्याला गावोगावच्या वेशीवर स्थापन करण्याचा मान समर्थांना जातो.समर्थपूर्व काळात मारुतीचे मराठीत स्तवन केलेले आमच्या तरी पाहण्यात अजून आलेले नाही. महाराष्ट्रात परंपरेने भैरवनाथ, देवी, दत्त, गणपती व शंकराची मंदिरे जास्त आहेत. (दक्षिणेला १२०० वर्षांपूर्वी एका हनुमान भक्ताने मारुतीला "आंजनेयस्वामी" असे नाव देऊन त्या नावाने अनेक मारुती मंदिरे स्थापिली आहेत, तेी वेगळी)
अशा अनेक स्थानांचे संशोधन केले तर आजही आपल्याला अनेक अप्रकाशित समर्थ मठांचा शोध लागणार आहे!
समर्थांच्या अनेक घळी हे देखील त्यांचे मठच होत! पैकी शिवथर घळीसारखे मठ (सुंदरमठ) आजही जोमाने कार्यरत आहेत.
या शिवाय हेळवाक घळ, मोरगिरीची घळ, चंद्रगिरीची घळ, तोंडोशीची घळ, दाढोलीची घळ अशी अनेक स्थाने आजही दुर्गम व अस्पर्शित आहेत!
मुळात समर्थ गेल्यानंतर देखील ३५०-४०० वर्षांनी या मठांचा हा काथ्याकूट कशाला? असा प्रश्न कुणास पडला तर ते स्वाभाविक आहे, व त्यामागचे कारण विषद करणे क्रमप्राप्त आहे. आपण आज जो शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतो तो अत्यंत तोकडा आहे. ३६ वर्षे सामरीक आयुष्य जगलेल्या या महात्म्याची केवळ २०० च्या आसपास अस्सल पत्रे उपलब्ध आहेत. बराचसा इतिहास शत्रूंनी काळाच्या उदरात गडप केलेला आहे. रायगडाच्या इंग्रजांनी जाळलेल्या दफ़्तरखान्यात अशी सर्व पत्रे नष्ट झालेलेआहेत. त्यामुळे अशा समकालीन मठात उपलब्ध असलेले अक्षरधन भारताच्या इतिहासासाठी लाख मोलाचे आहे,
असे जितके मठ सापडतील व तिथले जितके कागद पुन्हा एकदा एकत्र केले जातील तितके आपले इतिहास संशोधन पुढे पुढे जाणार आहे. या मठांचा व शिवाजी महाराजांचा किती जवळचा संबंध होता याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे चाफ़ळची सनद होय! चाफ़ळ हा समर्थ स्थापित पहिला मठ, या मठाचा सर्व खर्च स्वराज्याच्या खजिन्यातून व्हावा या अर्थाची चक्क सनद शिवरायांनी लिहून दिलेली आहे! व अशी सनद केवळ त्यांची कुलस्वामिनी प्रतापगडवासिनी भवानीमाता व चाफ़ळचे प्रभुराम याच मंदिरांना त्यांनी दिली आहे. अगदी तुळजापूर, पंढरपूर, जेजुरी, जोतिबा, करवीरनिवासिनी, आंबेजोगाई अशा तत्कालिन प्रसिद्ध देवस्थानांनाही हा मान लाभला नाही!
आज या मठांमधील हा अनमोल ठेवा वाळवी, उंदीर, घुशी, महापूर यांचे खाद्य बनून राहिलेला आहे...४०० वर्षांच्या पुढे हे कागद तग धरणे अशक्य आहे! आपण वेळीच हातपाय मारले नाहीत तर अशा फ़ार मोठ्या ठेव्यास आपण खचितच मुकणार आहोत...मुळात असे मठ, मठपती शोधणे, त्यांचे प्रबोधन करणे, या सर्व ठेव्याचे डिजिटायझेशन करणे ही आपल्या व पुढच्या पिढ्यांची आद्य कर्तव्ये आहेत.
नागपूरच्या म.रा. जोशी यांनी ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा संपादित केलेली आहे तेंव्हा त्यांना या ग्रंथांच्या ८०० हून अधीक प्रती रामदासी मठांतूनच मिळाल्याचे ते त्यांनी प्रकाशित केलेल्या दासबोधाच्या प्रस्तावनेत लिहितात. मुळात रोज काहीतरी लिहिण्याचा दंडकच समर्थांनी या मठपतींना घातलेला होता. दिसामाजी काहीतरी ते लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥
व "मठ करोनि ताठा धरु नये" अशी अज्ञा केलेली असल्याने हे सर्व मठ कागदांनी ओतप्रोत भरलेले आहेत. त्याचा करू तितका अभ्यास थोडा आहे!
सध्या असे कार्य काही मोजके तरुण रामदासी करत आहेत उदा. मंदारबुवा रामदासी या सत्पुरुषाने देवदास स्वामींच्या दादेगाव या मठाचा जीर्णोद्धार केलेला आहे. श्रीधर रामदासी हा तरुण राम वडगाव मठातले कागद अभ्यासून जपतो आहे. प्रशांत सबनीस हा तरुण जो सज्जनगडचा सबनीस आहे, त्याचेही संशोधन चालू आहे. सचिन जहागीरदार हा कल्याण स्वामी परंपरेतील डोमगाव मठपती त्याच्या परीनं संघटन करतो आहे. नुकतेच श्री अमित चिंचपुरकर-जोशी या वेदमूर्तींनी रामदासी उत्सव पद्धती व दिनचर्या यांचे संशोधन करून एक अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला आहे. रमण चितळे नामक समर्थ भक्तांनी समर्थांवर व शिवरायांवर लिहिलेली बहुतांश पुस्तके आयुष्यभर गोळा करून जपली आहेत.
राजप्रसाद इनामदार हा कण्हेरी मठाचा मठपती संप्रदायाचे कामात पुन्हा अग्रेसर झालेला आहे, परंतु हि उदाहरणे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी कमी आहेत.
समर्थांच्या आदेशाचेच पालन करायचे असेल तर
मराठा तितुका मेळवावा । आपुला "महाराष्ट्र धर्म" वाढवावा ।
ये विषयीं न करितां तकवा । पूर्वज हासतीं ॥
किंवा
आहे तितुके जतन करावे । पुढे आणखी मेळवावे ।
"महाराष्ट्र राज्य" करावे । जिकडे तिकडे ॥
हे उपदेश आपण ध्यानी घेणे आवश्यक आहे!
सदर लेख वाचून एका जरी व्यक्तीस वरील संकेतस्थळावर जाऊन तेथील मठपतींची यादी काढून, त्यातील आपल्या जवळचा मठ कुठला हे शोधून, तेथील हस्तलिखितांचे जतन, संवर्धन करता आले तर या लेखनप्रपंचाचे सार्थक झाले असे मानता येईल किमानपक्षी आपल्या माहितीतले, ऐकिवातले , गावातले असे मठ जरी आम्हास कळविले (dasbodh.com@gmail.com) तरी ते फार मोठे कार्य होणार आहे!
!! जय जय रघुवीर समर्थ !!
प्रतिक्रिया
16 Sep 2016 - 6:58 pm | अभ्या..
सुंदर धागा. मस्तच भटकंती. अप्रतिम शोध. छान माहीती.
.
.
फक्त एक रिक्वेस्ट हं. म्हणजे एक कूतुहल म्हणून विचारतो.
हा तुमचा आयडी कुणी एकच जण वापरतोय की साईटतर्फे आहे? त्या मुंग्रापं सारखी काय भानगड नै ना?
16 Sep 2016 - 7:08 pm | दासबोध.कॊम
हा आयडी एकच व्यक्ती वापरते व संकेतस्थळाचे काम समर्थ करवून घेतात आपल्या माध्यमातून असा दृढ विश्वास व अनुभव देखील आहे, म्हणून २ व्यक्ती म्हणा फ़ारतर...
16 Sep 2016 - 7:11 pm | अभ्या..
ओके, काही हरकत नाही. चांगल्या कामासाठी अशी एकी हवीच.
आम्हीही तिघे आहोत. ;)
16 Sep 2016 - 7:16 pm | यशोधरा
वाटलंच!
16 Sep 2016 - 7:18 pm | दासबोध.कॊम
त्रिगुणात्मक त्रैरंग स्क्रीन हा जाणा। त्रिरंगी अवतार त्रैलोक्य माना ।
16 Sep 2016 - 8:16 pm | अभ्या..
अगदी अगदी,
हेच त्रैरंगात्मक त्रैमूर्ती: आणखी एक विचार
II जय जय रघुवीर समर्थ II
16 Sep 2016 - 11:34 pm | अभ्या..
आपल्या उपक्रमाविषयी वाचले बरेच, बरीच माहीती मिळाली. खूप मोठे काम, खूप मोठ्या आशिर्वादाने करत आहात. आपणास तर आमची माहीती प्राप्त झालीच आहे त्वरीत, तरी सांगू इच्छितो कि कोणतेही मला करण्याजोगे काम सांगा. यथाशक्ती करेन.
धन्यवाद.
17 Sep 2016 - 8:56 am | दासबोध.कॊम
या लेखावर इतक्या प्रतिक्रिया येतील व त्याही इतक्या सकारात्मक असतील असे वाटलेच नव्हते...
आपल्या सर्वांचे मनपासून आभार!
आपण खालीलप्रकारे मदत करू शकता
१) अशी काही दुर्मिळ पुस्तके असतील तर ती कॅमस्कॅनर सारख्या ऍप्स च्या मदतीने आपल्या स्मार्ट्फोनवरच डिजिटाइझ करून आम्हाला पाठविणे...
२) ते शक्य नसल्यास अशा पुस्तकांची माहिती पाठविणे
३) आपल्याला ज्ञात असलेल्या अशा काही स्थळांची/व्यक्तिंची माहिती आम्हाला व आपली माहिती त्यांना कळविणे
४) दिसामाजि काहीतरि ते लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे हे आपण सर्वजण करताच...त्यात शक्य तेंव्हा समर्थ वचने उद्धृत करणे
५) आपल्या मित्रांना, आप्त्नांना अशा खजिन्याच्या असण्याबद्दल सांगणे, प्रबोधित करणे
६) या पूर्णपणे निनावी व नफ़ाविरहित सेवाभावाने चाललेल्या कार्याचा अधिकाधिक प्रचार व प्रसार करणे हे देखील एक फ़ार मोठे कार्य ठरणार आहे...
17 Sep 2016 - 9:10 am | मुक्त विहारि
..... व त्याही इतक्या सकारात्मक असतील असे वाटलेच नव्हते..."
मिपाकर नेहमीच योग्य त्या ठिकाणी दाद देतात आणि जमेल तितकी मदत पण करतात, प्र्संगी पदरमोड पण करतात.
हा स्वानुभव आहे.
16 Sep 2016 - 9:22 pm | खटपट्या
अस्सं आहे तर
16 Sep 2016 - 7:04 pm | चंपाबाई
छान.
... दासनवमीला जन्मलेला चंप्य्या
16 Sep 2016 - 7:15 pm | दासबोध.कॊम
भाग्यवान आहात चंपाभाई !
16 Sep 2016 - 7:16 pm | यशोधरा
वाचते आहे...
16 Sep 2016 - 7:44 pm | साहना
हे कार्य जबर आहे. शुभेच्छा आम्ही काही मदत करू शकतो तर बिनदिक्कत संपर्क करा ।
16 Sep 2016 - 7:44 pm | आदूबाळ
जबरदस्त!
अशा कोड्यांबद्दल आणखी लिहाल का?
16 Sep 2016 - 8:16 pm | दासबोध.कॊम
आनंदाने लिहू! 7 ते 8 कोडी आहेत अशी..
16 Sep 2016 - 8:18 pm | पुंबा
लिहाच.. हा लेख अप्रतीम..
16 Sep 2016 - 8:07 pm | प्रचेतस
उत्तम लेख. आपले कार्य स्पृहणीय आहे.
समर्थांचे श्लोक कूट काव्यपंक्तींनी भरलेले आहेत ह्यात शंकाच नाही. त्याबाबतीत अधिक लिहावे.
समर्थपश्चात लगेचच उद्धव गोसावी आणि रामाजी-भानाजी गोसावीत लागलेल्या कलगीतुऱ्याची आठवण झाली.
16 Sep 2016 - 8:22 pm | दासबोध.कॊम
महापुरुषांचा पराभव असा एक धडा वाचल्याचे स्मरते.
अनुयायांच्या पुढे साष्टांग लोटांगण!
असो, सार तितुके घेऊन आपण आपले काम करत राहणे हेच इष्ट
16 Sep 2016 - 9:47 pm | प्रचेतस
ते बाकी खरंच.
16 Sep 2016 - 9:03 pm | अमितदादा
उत्तम लेख तसेच कार्य . माहितीत भर पडली
16 Sep 2016 - 9:31 pm | अनिरुद्ध.वैद्य
काळाने किती ऐतिहासिक गोष्टी दडवल्या असतील देव जाणे!
16 Sep 2016 - 9:58 pm | सौन्दर्य
खूप छान माहिती आणि कौतुकास्पद कार्य. अनेक शुभेच्छा.
16 Sep 2016 - 10:05 pm | स्वाती दिनेश
माहितीपूर्ण लेख आवडला,
स्वाती
16 Sep 2016 - 11:13 pm | मुक्त विहारि
रामदास स्वामींचे मठ म्हणजे पुर्वीच्या हेरांची ठिकाणे असावीत, असा माझा अंदाज.
माझा अंदाज चूकीच असल्यास जरूर सांगा.
(अज्ञानी) मुवि
ता.क. ===> कोड्यांच्या अपेक्षेत आहे.
16 Sep 2016 - 11:32 pm | बॅटमॅन
एकदम जबरदस्त. दासबोध.कॉम ही वेबसाईट अप्रतिम आहे हे बाकी सांगणे अवश्य आहे. जी लागेल ती मदत नक्की करीन, काही वाटले तर तुम्हीही संपर्क साधावा ही विनंती.
(पळणीटकर गुरुजीकृत समर्थचरित्राचा फॅन) बॅटमॅन.
17 Sep 2016 - 8:19 am | इशा१२३
कार्य आणि लेख दोन्हीही उत्तम.
17 Sep 2016 - 9:19 am | कंजूस
व्वा!
17 Sep 2016 - 10:39 am | मंजूताई
खूप छान माहिती आणि कौतुकास्पद कार्य. अनेक शुभेच्छा.
17 Sep 2016 - 11:24 am | महामाया
कार्य आणि लेख दोन्हीही उत्तम.
17 Sep 2016 - 11:42 am | सिरुसेरि
"सामर्थ्य आहे चळवळीचे , जो जो करिल तयाचे"
"जय जय रघुवीर समर्थ"
17 Sep 2016 - 11:50 am | Jabberwocky
निःकाम बुद्धीचिया भजना | त्रैलोकीं नाहीं तुळणा |
समर्थ्येविण घडेना | निःकाम भजन ||
कामनेनें फळ घडे | निःकाम भजनें भगवंत
जोडे | फळभगवंता कोणीकडे | महदांतर ||
नाना फळे देवापासी | आणी फळ अंतरीं भगवंतासी |
याकारणें परमेश्वरासी | निःकाम भजावें ||
निःकामभजनाचें फळ आगळे | सामर्थ्य चढे
मर्यादेवेगळें | तेथें बापुडी फळें | कोणीकडे ||
भक्तें जें मनीं धरावें | तें देवें आपणचि करावें |
तेथें वेगळें भावावें | नलगे कदा ||
दोनी सामर्थ्यें येक होतां | काळास नाटोपे सर्वथा |
तेथें इतरांची कोण कथा | कीटकन्यायें ||
म्हणोन निःकाम भजन | वरी विशेष ब्रह्मज्ञान |
तयास तुळितां त्रिभुवन | उणें वाटे ||
येथें बुद्धीचा प्रकाश | आणीक न चढे विशेष |
प्रताप कीर्ती आणी येश | निरंतर ||
निरूपणाचा विचार | आणी हरिकथेचा
गजर | तेथें होती तत्पर | प्राणीमात्र ||
जेथें भ्रष्टाकार घडेना | तो परमार्थही दडेना |
समाधान विघडेना | निश्चयाचें ||
17 Sep 2016 - 12:46 pm | Kadamahesh5
शिवथर प्रांतातील शिवथर घळीचे सत्य स्वीकारण्याचे आवाहन.
हीच खरी घळ ह्याचे ठोस पुरावे,
1) छत्रपती शिवाजी महाराजांचे रामनगर पेठ वसवण्या संदर्भातील पत्र की श्री येऊन राहिल्याउपवरी येथील व्यापाऱ्यांकडून बारा वर्षे दिवाण माफ यावरून समर्थ वास्तव्याच्या कालावधीचा अंदाज करावा.
पत्ता कोड नलवडा मौजे पारमाची ताा शिवथर
दूसरे पत्र समर्थशिष्य योगीराज श्री कल्याण स्वामी यांनी दिवाकर गोसावी यांना पाठवलेल्या पत्रातील उल्लेख की श्री ..... च्या दरशनास पारमाचीस सिवथर प्रांती नवलवाडीयाचा कोड तेथे जाभलीच्या चउथरीयावर श्री संतोषरूप बैसले होते.
जर शिवथर प्रांतात समर्थांच्या दर्शनाची जागेचा उल्लेख आहे.
हे नलवडा वा नवलवाडी चा कोड म्हणजेच सध्याचे रामदास पठार.आणि शिवथर हा तेव्हाचा तालुका चे ठिकाण होते. हया येथील मंदिराच्या जागेचे आज ही सरकार दरबारी सातबारा वरील नाव मठाचा माळ असा आहे. हया ठिकाणाहून संशोधित शिवथरघळ अवघ्या सहाशे मीटर वर आहे म्हणजेच पायी पंधरा ते वीस मिनीट. ही दोन्ही पत्र विश्वासनीय आहेत व आज ही ती समर्थ वाग्देवताच्या बाड मध्ये पहायला मिळतात.
2) घळीची भौगोलिक स्थान आणि रचनेचा उल्लेख समर्थ शिष्य गिरिधर स्वामी यांच्या समर्थ प्रताप मध्ये आहे तो खालील प्रमाणे
समर्थे पर्वती केले येक गुप्तसदन।
प्रसंगे ठेवावया देवार्चन।
सूर्यप्रकाश उदक सन्निध उर्ध्वगमन।
मार्ग सोपान करूनी जावे॥
समर्थ प्रताप गिरीधरस्वामींनी समर्थ रामदास स्वामींच्या या सदनाचे वर्णन केले आहे. हे सदन पर्वतावर आहे, गुप्त आहे, तेथे प्रसंगी देवार्चन म्हणजेच देवघर ठेवता येते, सूर्यप्रकाश सन्निध आहे, म्हणजेच या गुप्तसदनाला पूर्व-पश्चिमेचा उगवतीचा व मावळतीचा सूर्यप्रकाश समोर आहे, उदक म्हणजे या रामगंगा धबधबा समोर ठेऊन उर्ध्वगमन म्हणजेच उर्ध्व दिशेने जावे आणि यासाठी मार्ग सोपा करून सोपान म्हणजे शिडीसारखे चढून जावे, अशी वर्णनानुरूप परिस्थिती आढळते.
आज ही सरकार दरबारी घळीचे सातबारा वरील नाव मठाचा माळ असा आहे. तर बाजूच्या धबधबाचे नाव भटाचा माळ आहे.
3) आनंदवनभुवनी म्हणजे समर्थांनी केलेल्या शिवथर प्रांतातील वास्तव्यातिल स्वानुभव,हया जागेचा महिमा आणि या जागेतच पुढे काहि घडणार आहे असा उल्लेख केला आहे. तसेच हया वनभुवनाला सर्व प्रथम मान दया अशी आज्ञा केली आहे. त्यातील काही ओवी देत आहे.
गुप्त उदंड भुवने म्हणजे शिवथरघळ
सकळ देवांची साक्ष | गुप्त उदंड भुवने |सौख्य जे पावणे जाणें | आनंदवनभुवनी ||१५||
रामगंगा म्हणजे बाजूच्या धबधब्याचे वर्णन
स्वर्गीची लोटली तेथे |रामगंगा महानदी |तीर्थासी तुळणा नाही | आनंदवनभुवनी ||१३ ||
गुप्तगंगा चा उल्लेख
ग्रंथी जे वर्णिली मागे .| गुप्तगंगा महानदी |जळांत रोकडे प्राणी | आनंदवनभुवनी ||१४
अकरा हया अंकाची प्रचिती
आक्रा आक्रा बहु आक्रा |काये आक्रा कळेचीना |गुप्त ते गुप्त जाणावे |आनंदवनभुवनी ||१७ ||
दासबोध नव्याने लिहिल्याचा उल्लेख
लिहिला प्रत्ययो आला | मोठा आनंद जाहाला |चढता वाढता प्रेमा |आनंदवनभुवनी ||३८ ||
गणपतीला केलेली प्रार्थना त्याबद्दल
जे साक्ष देखिली दृष्टी |किती कल्लोळ उठीले|विघ्न्घ्ना प्रार्थिले गेलो | आनंदवनभुवना ||८ ||
देवालये दीपमाळा |रंगमाळा बहुविधा |पूजिला देव देवांचा | आनंदवन भुवनी || ४०||
नवीन दासबोध लिहिल्याचा उल्लेख.
वेद शास्त्र धर्म चर्चा |पुराणे महात्में किती |कवित्वे नूतने जीर्णे | आनंदवनभुवनी ||५० ||
त्या ठिकाणचे महत्व:
वेद तो मंद जाणावा | सिध्द आनंदवनभुवनी |आतुळ महिमा तेथे |आनंदवनभुवनी ||५२ ||
मानसी प्रचीत आली | शब्दी विश्वास वाटला |कामना पुरती सर्वै | आनंदवनभुवनी ||५३ ||
येथूनी वाचती सर्वै | ते ते सर्वत्र देखती | सामर्थ्य काय बोलावे | आनंदवनभुवनी ||५४ ||
उदंड ठेविली नामे | आपस्तुतीच मांडिली |ऐसे हे बोलणे नाही | आनंदवनभुवनी ||५५ ||
पुढे हया ठिकाणी खरे काही घडणार आहे त्याची कल्पना समर्थांना ठाऊक होती.आणि काय होईल ते पहावे हया ठिकाणी अस सावध करत आहेत.
बोलणे वाउगे होते |चालणे पाहिजे बरे |पुढे घडेल ते खरे | आनंदवनभुवनी ||५६ ||
स्मरले लिहिले आहे | बोलता चालता हरी |काये होईल पहावे | आनंदवनभुवनी ||५७ ||
महिमा तो वर्णवेना | विशेष बहुतांपरी | विद्यापीठ ते आहे | आनंदवनभुवनी || ५८ ||
सर्वसद्या कला विद्या | न भूतो न भविष्यती |वैराग्य जाहाले सर्वै |आनंदवन भुवनी ||५९ ||
अशा सिद्ध स्थानास सर्वात प्रथम मान दया अशी समर्थांच्या आज्ञाचे स्मरण राहू दया
'इति श्रीवनभुवनी नाम मान प्रथम॥'
17 Sep 2016 - 4:06 pm | मनिमौ
कामय. वेबसाईट सुध्दा खुप छान आहे
18 Sep 2016 - 1:15 pm | नपा
दुर्लक्षित होत चालेल्या परंपरेला पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या आपल्या कार्याला सलाम...आणि शुभेच्छा.
नुकताच नाशिक जवळच्या टाकळी येथील श्री समर्थ रामदासांच्या मठाला जाण्याचा योग्य आला. या ठिकाणी स्वामींनी अगदी सुरुवातीची 12 वर्षे तपश्चर्या केली. तेथील शेण्या (शेण, माती) मारुतीची मूर्ती हि स्वतः स्वामींनी बनवलेली आहे. ती बनवत असताना उत्स्फूर्तपणे जे स्तोत्र त्यांनी म्हंटलं ते म्हणजे मारुती स्तोत्र.
18 Sep 2016 - 1:49 pm | भ ट क्या खे ड वा ला
खूप छान माहिती आणि कौतुकास्पद कार्य. अनेक शुभेच्छा.
एक शंका : सज्जनगड गडावर अनेक वेळा गेलो, तेथे दोन वेगवेगळ्या संस्था आहेत तो काय प्रकार आहे ? मी ज्या समर्थभक्ता बरोबर जात असे ते फक्त संस्थान च्या ऑफीस मध्येच जात असत. (जीथे स्वामींच्या वापरातील साहित्य आहे ती जागा )दुसरी संस्था जी गडावर गेल्यावर लगेच दिसते) अशा दोन वेगवेगळ्या संस्था का आहेत .
19 Sep 2016 - 1:15 am | Kadamahesh5
दुर्लक्षित असलेल्या समर्थ मठाची माहिती. शिवकालात हा मठ समर्थ साम्प्रदायची राजधानी होती. सुंदर मठ म्हणजेच सध्याचे रामदास पठार
http://realshivtharghal.blogspot.in/2010/12/real-swayanbhu-shivthar-ghal...
19 Sep 2016 - 7:59 pm | सुमीत भातखंडे
उत्तम माहिती. आज पहिल्यांदाच www.dasbodh.com वर गेलो. मस्त साईट आहे.
29 Mar 2017 - 12:51 am | Kadamahesh5
http://www.maayboli.com/node/62114
30 Mar 2017 - 5:42 pm | प्रसाद गोडबोले
हा लेख आधीही कोठेतरी वाचल्याचे आठवते . सदर प्रकरण वरकरणी फ्रॉड किंव्वा मारकेटिंग स्टेट्रीजी वाटत आहे . त्यांना मी आधी सवालही केल्याचे आठवते की सदर घळ जर मुळ शिवथर घळ असेल तर त्याचे मॅनेजमेन्ट रामदास स्वामी संस्थान कडे आहे की तुमचे खाजगी आहे ? खाजगी असेल तर आदरपुर्वक ते संस्थानकडे हस्तांतरित करणार का ?
त्यावर काही उत्तर आल्याचे आठवत नाही !
26 Apr 2018 - 1:31 am | दासबोध.कॊम
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
टीप: दासबोध ग्रंथाची मूळ प्रत सुदैवाने अत्यंत सुस्थितीत व सुरक्षित असून अन्य अनेक समर्थ शिष्यानी नकलून घेतलेल्या हजारो प्रति भारतभरातील समर्थ मठांमध्ये सुरक्षित आहेत व त्यात जराही पाठभेद नाहीत. मूळ शिवथर घळ व दासबोध ग्रंथाशिवाय रामदासी संप्रदायामध्ये "खरी शिवथर घळ" किंवा "खरा दासबोध" असे काहीही वेगळे अस्तित्वात नसून हा इस्लामप्रणीत ब्रिगेडीनी हिंदुंच्या फुटी साठी चालविलेला अपप्रचार आहे याची सुज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी...
31 Mar 2017 - 8:56 am | Kadamahesh5
किती खेद्जनक आहे ही गोष्ट. मी तुम्हाला समर्थ वास्तव्याची शिवथर प्रांतातील जागेची पुराव्यांनिशी माहिती देत आहे. ह्या जागेवर समर्थांचे वास्तव्य २८ वर्षे होत. व समर्थ काळात हि समर्थ सांप्रदायाची राजधानी होती. तीच माहात्म्य समर्थानी आपल्या शब्दात सांगितलं आहे . तुम्हाला त्याला भेट देण्याची वा ते पुरावे पडताळण्याची इच्छा न होता ही तुम्ही संस्थान कडे सूपूर्त करणार का ह्या गोष्टीत तुम्हाला रस वाटतो .
समर्थांच्या अनेक अप्रकाशित मठांचे शोध लागणार आहेत वरील लेखातील ह्या दुव्याला धरून मी प्रतिक्रिया दिली होती. पण होणारे ह्या जागा रामदासी संस्थान कडे सूपूर्त न केल्यास त्याचे सत्य स्वीकारणार नाही अशी भूमिका लेखकाची नसून तुमची वैयक्तिक आहे असं समजतो. कारण संप्रदायातील माणसे संस्थे अगोदर समर्थाना जोडलेली आहेत.
⛳ "प्रत्यक्ष भेट द्या." एकाकी एकदा यावे आनंदवनभुवनि.⛳
31 Mar 2017 - 9:36 am | सतिश गावडे
सध्या शिवथर घळ म्हणून प्रचलित असलेली घळ "खरी" शिवथर घळ नाही का?
31 Mar 2017 - 11:25 am | माहितगार
' मार्कस ऑरेलियस' यांनी शंका काढलीच आहे तर सदर संदर्भ इतिहास प्राध्यापकांनी तपासून दुजोरा दिला आहे का ? कथित संस्थानाधिपतींची किंवा इतरांची काही वेगळी मांडणी आहे का ? या बाबत विश्वास ठेवण्याच्या दृष्टीने पारदर्शकता महत्वाची गोष्ट ठरते असावी.
साशंकता व्यक्त कराव्यात हे उत्तमच, बाकी जोपर्यंत कायदेविषयक अवैध काही होत नाही तो पर्यंत अगदी व्यवसाय अथवा संघटन स्वातंत्र्य भारतीय राज्यघटना बहाल करते. किमान नैतिकदृष्ट्या काही अवैध होत नाही तो पर्यंत व्यवसाय अथवा संघटन स्वातंत्र्यावर घाला घालण्यासारखे काही नसावे.
बाकी समर्थ प्रचारार्थ सध्या कोण कोणत्या संस्था आहेत त्या काय काय करतात, कोणत्या वेगळ्या आहेत कोणत्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत याची पारदर्शक आणि अधिक माहिती आंतरजालावर उपलब्ध असावी. असो
31 Mar 2017 - 4:07 pm | प्रसाद गोडबोले
किती शब्दच्छल करता कदम साहेब ,
हे घ्या मी जाहीर पणे कबुल करतो की तुम्ही म्हणता तीच शिवथरघळ खरी ! आता बोला , खर्या शिवथरघळीचे व्यवस्थापन संस्थान कडे हस्तांतरित करणार का ? कधी ?
की माहीतगार म्हणाल्याप्रमाणे स्वातंत्र्य आहे म्हणुन व्यवसाय चालवणार ?
समर्थांनी ११०० मठ स्थापन केले पण मुख्य केंद्र कायम सज्जनगड आणि रामदासस्वामी संस्थानच होते , , अन्य मठ स्वतंत्रपणे चालवणे म्हणजे फ्रॅन्चायझी टाकल्या सारखे होईल. एकदम देऊळ चित्रपटात नाना पाटेकर म्हणतात तसे !
26 Apr 2018 - 1:33 am | दासबोध.कॊम
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
टीप: दासबोध ग्रंथाची मूळ प्रत सुदैवाने अत्यंत सुस्थितीत व सुरक्षित असून अन्य अनेक समर्थ शिष्यानी नकलून घेतलेल्या हजारो प्रति भारतभरातील समर्थ मठांमध्ये सुरक्षित आहेत व त्यात जराही पाठभेद नाहीत. मूळ शिवथर घळ व दासबोध ग्रंथाशिवाय रामदासी संप्रदायामध्ये "खरी शिवथर घळ" किंवा "खरा दासबोध" असे काहीही वेगळे अस्तित्वात नसून हा इस्लामप्रणीत ब्रिगेडीनी हिंदुंच्या फुटी साठी चालविलेला अपप्रचार आहे याची सुज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी...
31 Mar 2017 - 11:16 am | Kadamahesh5
ऐतहासिक पुराव्यांनुसार शिवथर हा शिवकालात तर्फे (तालुका) होता. शिवथर तालुक्यातील घळ म्हणून हिला शिवथरघळ म्हणत असत. समर्थ वास्तव्याचा पत्ता नवलवाडी (रामदास पठार ) मौजे पारमाची शिवथर तर्फे असा छत्रपती शिवाजी महाराज आणि कल्याणस्वामी यांच्या पत्रात पहावयास मिळतात. ह्या गावातील मंदिराची जागा आणि घळीच्या शेजारील धबधबा ह्यास मठाचा माळ व घळीला भटाचा माळ असा महसूल कागदपत्री नोंद आढळते. प्रत्यक्ष घळ व तेथील परिसर पाहता तुम्हाला आणखी हा विषय समजेल.लेखातील पुराव्यानुसार प्रचलित असलेली शिवथर गावातील शिवथरघळ हे समर्थ वास्तव्याचे स्थान नव्हते हे निश्चीत. हे शिवथर गाव शिवकालात बीरवाडी तर्फेत होत अशी नोंद सापडते. पूर्वी पृथ्वि सपाट आहे अस कित्येक वर्ष लोकांचा समज होता पण नंतर संशोधनात पृथ्वि गोळ आहे हे सिद्ध झाल व सर्व जनमाणसांनी ते स्वीकारले सुध्दा. तसच समर्थ वाड्मयाचे अभ्यासक श्री शंकर देव यांचे अपूर्ण राहिलेले हे काम आत्ता पूर्ण झाल आहे.
कोणत सत्य व कोणत असत्य हे इतिहास संशोधक, व ह्या विषयाचे अभ्यासक पुरावे तपासून ठरवतिल. आम्ही आमच्या अभ्यासात आलेली माहिती मांडली आहे.