धन्यवाघ !!!

हृषिकेश पांडकर's picture
हृषिकेश पांडकर in भटकंती
14 Sep 2016 - 11:16 am

सौरव गांगुलीला बंगाल ‘टायगर’ म्हणतात,मन्सूर आली खान पतौडीला ‘टायगर’ पतौडी म्हणतात अगदी हेच नाही तर बाळासाहेब ठाकर्यांना महाराष्ट्राचा ‘वाघ’ म्हणतात या गोष्टी आता सर्वश्रुत आहेतच.वरील संदर्भामध्ये प्रत्येकाला वाघाची उपमा दिली आहे.वाघाला इतके श्रेष्ठत्व का आहे. किव्वा असंख्य प्राण्यांमध्ये वाघालाच अग्रस्थान का मिळाले याचे तुटपुंजे आणि पुस्तकी उत्तर मला शाळेत असतानाच मिळाले होते.सुनीताबाई देशपांड्यांनी लिहिलेला 'दर्शनमात्रे' हा प्रसंग आम्हाला माध्यमिक शाळेत अभ्यासाला होता.अभ्यासाला असलेले लेखन हौशीने वाचायची वेळ आली नाही तो भाग वेगळा.पण त्यावेळी व्याघ्रदर्शनाचे वेगळेपण कायमचे स्मरणात कोरले गेले.

तर वाघाचा दर्जा काय आणि कसा ठरवला गेला हे कुतूहल उलगडण्याच्या प्रयत्नाला अखेरीस यश आले.पेशवेबाग,हैदराबाद प्राणीसंग्रहालय,म्हैसूर प्राणीसंग्रहालय या ठिकाणी एखाद्या ठराविक जागी घुटमळणारा वाघ अनेकवेळा पहिला.पण या बंदिस्त जागेत येरझार्या घालणाऱ्या प्राण्याला पाहून वरच्या उपमा नक्कीच देण्यात आलेल्या नाहीत हे आता पदोपदी पटते.
जगात आपल्या मनाचा राजा असलेला वाघ पाहणे या एका इच्छेवर याआधी चार पाच वेळा जंगलात जावून आलो.एकदा वाघाचे बछडे ओझरते दर्शन देवून मनाची चुटपूट वाढवून निघून गेले.बाकीच्या वेळी तर रेतीत उमटलेल्या पंजांचे ठसे पाठीमागे सोडून हूल देवून गेला.राजाच तो शेवटी… कोणाच्या पुढे पुढे का करेल आणि का करावे ? बर बापाचे राज्य असल्या सारखे डौलाने फिरणारा प्राणी तो,कशाला आपल्यासामोरून फिरेल.आपण पाहायला गेलो आहोत.दिसला तर आपले भाग्य,नाही दिसला तर आपलेच दुर्दैव.

अशाच आशेवर जंगलात जाण्याची संधी मिळाली.जंगल हे जंगल म्हणूनच बघयला जावे.फक्त वाघ बघायला गेल्यास हिरमोड होण्याचा संभव असतो.असे मत व्यक्त करणाऱ्या लोकांनी आधी वाघ बघितलेला असतो.कारण जोपर्यंत साक्षात वाघ दिसत नाही तोपर्यंत जंगलाची ओढ हि वाघाचीच ओढ असते असे किमान माझे तरी प्रामाणिक मत आहे.अर्थात वाघ दिसल्यावर जंगलाची आस तसूभर देखील कमी होत नाही हि काळ्या दगडावरची रेष आहे.

थंडीच्या डिसेंबर मध्ये,अकाली पावसाच्या भीतीखाली आणि नागपूरच्या उन्हाळ्यात भारताच्या 'व्याघ्र राजधानीत' अर्थात ताडोबात प्रवेश केला.चार तासाच्या चार सफारींचे बुकिंग करून सोळा तासाच्या 'व्याघ्र जुगाराचा' खेळ सुरु झाला.पहिल्या बारा तासातील वाघाच्या बाबतीतले अपयश यावेळीदेखील हाती धुपाटणे देणार असेच वाटत होते.शेवटच्या चार तासात जंगल काय दाखवते या ओढीने सुमारे २ डिग्रीच्या थंडीत आशेची ऊब पांघरून साखर झोपेला फाटा देवून जंगलात निघालो.
पहाटेची वेळ म्हणजे जाणकारांच्या मते वाघाच्या 'Movement' ची वेळ आणि अर्थातच वाघ दिसण्याची सर्वोत्तम वेळ.हरीण,माकड,सांबर आणि असे असंख्य प्राणी आणि पक्षी नजरेस पडत असताना देखील कुठेतरी काहीतरी अपूर्ण पडत असल्याची भावना क्षणोक्षणी बळावत होती.त्या कित्त्येक किलोमीटरवर पसरलेल्या जंगलात फिरत असताना वाघ कुठे फिरत असेल याची पुसटशी देखील कल्पना नसते.बर नुकताच पाऊस ओसरल्यामुळे दुतर्फा असलेली गर्द झाडी नजरेच्या क्षमतेला नैसर्गिक बांध घालत होती.

S1

त्या चार तासातील पहिला तास कडाक्याची थंडी आणि धुके यांचे चोचले पुरविण्यातच गेला.गळ्यात लावलेला कॅमेरा फक्त मानेवर ओझे बनून वावरत होता.सूर्यकिरणांची पहिली तिरीप झाडातून जंगलाच्या पृष्ठभागावर स्थिरावली.आणि आशेचा किरण प्रकाशमान झाला.हळुवार चालणार्या जिप्सीच्या डाव्या बाजूला वाघाच्या पंजांचे ठसे स्पष्ट दिसत होते.ठशाच्या खोलीवरून आज पहाटेचेच असणार यावर शिक्कामोर्तब झाले आणि त्याचा पाठलाग सुरु झाला.काही अंतर गेल्यावर डाव्या बाजूचे ठसे नाहीसे होवून उजव्या बाजूला उमटलेले दिसले.गाडीने मार्ग बदलला.पण ठशांनी मार्ग सोडला आणि नशिबाने साथ…

अस्वलाने दर्शन दिले, गव्याने मार्ग अडवला,दुर्मिळ प्राणी डोळ्यासमोरून गेले.प्रतीक्षेचा धनी असलेला जंगलाचा राजा मात्र अंत बघत होता.निसर्गाच्या नियमांचे पालन करणारा भास्कर दिवसाच्या प्रवासाला केव्हाच निघाला होता.चारतील पहिले दोन तास वाघ सोडून सगळ्या गोष्टी दाखवत होते.आता थंडीची जागा उन्हाने घेतली.लपत छपत येणारी सूर्यकिरणे न घाबरता थेट अंगावर येवू लागली.सकाळच्या लगबगीनंतर जंगल स्थिरस्थावर होत होते.माकड,हरीण यांचे आशादायी 'Alarm Calls' थंड पडत चालले होते.उरल्या सुरल्या अशा देखील संपल्याच्या खुणा स्पष्ट होत होत्या.सुंदर सूर्योदय,हिरवीगार कुरणे,उंच उड्या मारणारी हरणे,गरुडाचा लांबून येणारा लयबद्ध आवाज,प्रदर्शनाला आपला stall मांडावा त्याप्रमाणे रस्त्यालगत कोळ्याने विणलेले नक्षीदार जाळे,दुसरी जिप्सी गेल्यामुळे उडालेला धुराळा सुर्याकिरणात मिसळून तयार झालेली सोनेरी झालर. तळ्यावर आच्छादलेली धुक्याची रजई आणि कापसाचे बोळे तरंगावेत त्याप्रमाणे पाण्याच्या पृष्ठभागावर संथपणे तरंगणारी बदके.मधूनच वेड लागल्यासारखे जमिनीलगत उडणारा वेडा राघू आणि थव्याने घिरट्या घालणारे जलपक्षी.केवळ वातावरणाने भुरळ घातली जाईल असा तो नयनरम्य निसर्ग.पण काहीसे चुकल्यासारखे भासवणारी ती मनस्थिती यावर भारी पडत होती.

1

चार तासाच्या सफारीचा उत्तरार्ध येवून ठेपला होता.तीन तास फिरल्यानंतर मनाची तयारी करून बाहेर पडणे याखेरीज फारसे काही हातात नव्हते.तीन दिवसाच्या जंगल सफारीचा शेवटचा तास हळू हळू उलगडत होता.नियमांची अंमलबजावणी करण्याच्या प्रामाणिक हेतूने आणि काहीश्या नाईलाजास्तव आम्ही परत फिरलो.मगाशी असलेला उत्साह आता नशिबाला वाकुल्या दाखवत होता.इतकावेळ वाघाला शोधत असलेली नजर देखील आता थंडावलेली होती.चार दिवसाचा निसर्गाच्या सान्निध्यातील मुक्काम आता संपला होता.आणि पुन्हा तेच घिसेपिटे आयुष्य ज्याला ‘रुटीन’ हे गोंडस नाव दिले जाते त्याच्या स्वाधीन करायची मानसिक तयारी सुरु झाली होती.मगाशी थंडीने गारठलेले रस्ते आता उन्हाने न्हाऊन निघत होते.जंगलातून बाहेर पडणाऱ्या रस्त्यावर आम्ही मार्गस्थ झालो.
तीनचार दिवस चालू असलेली वन्यजीवनावरील चर्चा उद्यापासून असलेल्या रहाटगाडग्याच्या गप्पांमध्ये रुपांतरीत झाली.जंगलातील वेगाच्या मर्यादा तंतोतंत पाळत आम्ही बेतानेच पुढे सरकत होतो. दुतर्फा असलेली घनदाट झाडी रस्त्याचे वेगळेपण अधोरेखित करत होती.
हे चालू असताना आधीच कमी असलेल्या आमच्या गाडीचा वेग अचानक अजून कमी झाला आणि क्षणार्धात गाडी स्तब्ध झाली.पुढच्या सीटवर बसलेला आमचा गाईड शांत राहा अशी खूण करून जागच्या जागी उभा राहिला.आम्ही सहाही जण आहे त्या जागी उभे राहिलो.गाईडने फक्त डाव्या बाजूच्या झुडपात बोटाने खुण केली.आणि ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास ती साक्षात जंगलाची राणी डाव्याबाजुने डौलात चालत रस्त्यावर आली.

2

आमच्या मागे किव्वा पुढे एकही गाडी नसल्याने त्या रस्त्यावर फक्त आमची गाडी आणि समोर दहा फुटावर सुमारे सात फुट लांबीची ती वाघीण असा तो नजारा होता.संपूर्ण वाढ झालेली ती चट्टेरी पट्टेरी आपणच या जंगलाची सर्वेसर्वा आहोत या थाटात रस्ता ओलांडत होती.आपल्यासमोर एखादी गाडी उभी आहे किव्वा मनुष्यप्राणी आहे याला यत्किंचितही न जुमानता आपले मार्गक्रमण करीत होती.प्राणी पक्षांचे आवाज किव्वा पानांची सळसळ या गोष्टींनीही आता मौन धारण केले होते. कॅमेर्याचा क्लिक आणि दीर्घ श्वासोश्वास सोडला तर शांततेचा भंग करणारा एकही आवाज नव्हता.आपण वन्यजीवन साखळीत सर्वोच्च स्थानी का आहोत आणि पर्यायाने आपल्याला जंगलाचा राजा होण्याचा मान का मिळाला आहे याचे संदर्भासहित स्पष्टीकरण याची देही याची डोळा मी अनुभवत होतो.आपल्या शिकारीची सहज चिरफाड करणारे ते पंजे वाळलेल्या पानावर मात्र इतके अलगद पडत होते कि पानाखाली असलेल्या किड्याला देखील त्याची कल्पना येणार नाही. ते पिवळे धमक शरीर आणि त्यावर असलेले पट्टे यामुळे तयार झालेला रेखीव आणि आगळा आकृतिबंध नजरेचे पारणे फेडत होता.तब्बल पस्तीस सेकंदाच्या कालावधीनंतर ती पलीकडच्या गर्द झाडीत नाहीशी झाली.
कॅमेर्याने आपले काम चोख बजावले होते.वाघीण नजरेआड झाली आणि आयुष्यातील 'ते' मिनिट सोनेरी करून गेली.इतका वेळ असलेले नैराश्य किव्वा सल आता त्या मिनिटाने स्वच्छ धुवून काढली होती.चार दिवसाची जंगलभेट शेवटच्या मिनिटाला फलद्रूप झाल्याची गोड भावना पाठीशी घेवून मी कॅमेरा आनंदाने बंद केला.इतकावेळ चालू असलेले गप्पांचे विषय सरड्याच्या रंगाप्रमाणे क्षणार्धात बदलले.मगाशी रुसलेले नशीब एका मिनिटात फळफळले होते.जंगलही मगाचचेच होते,लोकही मगाचचेच होते. मात्र उत्साहाच्या पातळीत अमुलाग्र बदल जाणवत होता.वाघ दिसल्या नंतरची सर्वात पहिली प्रतिक्रिया काय होती हे सांगण्यात सगळ्यांनी मनसोक्त वेळ घेतला.आनंद आणि समाधान यांची मिश्रित भावना इतरांसमोर व्यक्त करायची आता घाई झाली होती.काय जादू भरली आहे त्या चटयापट्ट्यात हे नक्की सांगता येत नाही पण आज प्रत्यक्ष अनुभवायची संधी मिळाली.
गाडी जंगलाच्या बाहेर आली.आता विदर्भाचे उन देखील सुसह्य वाटत होते.नाश्त्याची वेळ टळूनसुद्धा भुकेने गाऱ्हाणे मांडले नाही.मिनिटभराच्या प्रसंगाने संपूर्ण सफारीचा कायापालट केला होता.त्या वाघिणीला या प्रकारची कल्पना नसेलच,ती तिच्या दिनचर्येत मग्न असेल.पण या प्राण्याचा प्रभाव किती आहे हे जाणून घेण्यासाठी तरी किमान एकदा जंगल बघाच.मुळातच विविधरंगी असलेले जंगल या चटयापट्ट्यांनी सौंदर्याची परम सीमा गाठते.

हृषिकेश पांडकर

प्रतिक्रिया

वा काय मस्त वाघीणीचा फोटो, अगदी कातिल आहे.

एकनाथ जाधव's picture

14 Sep 2016 - 12:38 pm | एकनाथ जाधव

काय सुन्दर वर्णन आणी कातील फोटो.

महासंग्राम's picture

14 Sep 2016 - 12:57 pm | महासंग्राम

फोटो दिसत नै ओ

छान लिहिलेय, फोटोही आवडले.

पैसा's picture

14 Sep 2016 - 2:56 pm | पैसा

सुरेख लिहिलंय. पण आमचा ब्राऊझर की अँटिव्हायरस फोटोच्या साईटवर जायला देत नाही.

प्रीत-मोहर's picture

14 Sep 2016 - 4:53 pm | प्रीत-मोहर

मला पण दिसत नाहीये फोटो. gpbn वर बॅन आहे ही साईट

चौकटराजा's picture

14 Sep 2016 - 3:36 pm | चौकटराजा

ही वाघीण आहे का....? मी वाघ झालो असतो तर किती बरं झालं असतं... अर पण आमचं जमायच्या आत मी पेशवे पार्कचा
रहिवासी झालो असतो तर,,,,,,,,?

प्रसन्न३००१'s picture

15 Sep 2016 - 11:55 am | प्रसन्न३००१

हि ताडोबाची जगप्रसिद्ध सोनम वाघीण आहे का ? तिच्या मानेवरचा S स्पष्ट दिसतोय म्हणून खडा मारून बघितला..... जाणकारांनी खुलासा करावा

या वर्षी फेब्रुवारी मध्ये मी सुद्धा ताडोबाला गेलो होतो वाघ आणि बिबळे/चित्ते सोडून सर्व प्राणी दिसले :(

हृषिकेश पांडकर's picture

16 Sep 2016 - 10:00 am | हृषिकेश पांडकर

होय !
सोनमच आहे ..तेलिया तलाव परिसरात वास्तव्य.