हे लिखाण भटकंती सदरात टाकावे की जनातलं मनातलं या सदरात, या संभ्रमात होतो शेवटी इथे लिहायला सुरुवात केली.
सकाळी साडेसात-आठची वेळ म्हणजे हातघाईची, जणू काही रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. मुलींची शाळेला जाण्याची घाई, माझी आणि माझ्याहून चांगल्या अर्धांगिनीची (Better-half हो, तीही हा धागा वाचणार ना, म्हणून लिहिलं!) कामाला जाण्याची घाई. आजचा दिवसही काही वेगळा नव्हता, except रिपरिप पडणारा पाऊस आणि गच्चं भरलेलं आभाळ.
हैद्राबादचा पाऊस हैद्राबादी लोकांसारखाच आळशी आहे पण जनरली तसा शहाणा आहे. रात्री केंव्हातरी पडतो आणि सकाळी आठच्या आत, पांढऱ्या-निळ्या कॉलरींची कामं करणाऱ्या लोकांची कामाला बाहेर पडण्याची वेळ होण्याच्या आत थांबतो. आज मात्र पावसाने चांगलाच मनावर घेतलेलं दिसत होतं. उघडीप होण्याची काही लक्षणं दिसत नव्हती. मुलींना शाळेत पाठवावं की नाही याचा निर्णय होण्यापूर्वी त्या शाळेत निघून गेल्या. (आत्ताच १०:१० वाजता, पावसामुळे शाळेला सुट्टी जाहीर केल्याचा एसेमेस त्यांच्या शाळेतून आलाय.)
सव्वा आठ वाजता घरून बाहेर पडून नऊला पाच कमी असताना ऑफिसात लॉगिन करायचं माझं रोजचंच ध्येय असतं पण प्रत्यक्षात जायला सव्वानऊ-साडेनऊ होतातच.आज तर पावसाचा अडथळा होता, ऑफिसला दांडी मारावी का या विचारात होतो पण मग मिसळपाववरचे भटकंतीचे धागे आठवले. फटफटीवर बसून आपले मोदकराव (आणि इतर मिपाकर्स) दोन दिवसात जवळजवळ दीड हजार किमी जातात, हां हां म्हणता लेह-लडाख व्हाया श्रीनगर करून येतात, सायकलीवर बसून कोकण पालथा घालतात आणि मी इथून २० किमी वर हाइटेक सिटीत जाऊ शकत नाही? केवळ पाऊस आहे म्हणून? कुठे नेऊन ठेवलाय मिपाकर माझा?
झालं, मी ठामपणे एक निर्णय घेतला (म्हणजे नेमकं काय केलं देव जाणे?). पावसाच्या अडथळ्याचं मी एका मस्त संधीत रुपांतर करण्याचं ठरवलं. मी आणि दोन महिन्यापूर्वी पटवलेली माझी गर्लफ्रेंड - रॉली / फटफटी / बुल /बुलेट / मीन मशीन असे दोघे पावसात चिंब भिजत ऑफिसला जाऊयात असं तिला न विचारताच ठरवलं. ड्रायफिट टीशर्ट, थ्री-फोर्थ, जॅकेट, रबरी स्लीपर्स, हेल्मेट असा पेहराव केला. ऑफिसात घालायचे (अंतर्बाह्य) कपडे, शूज, टॉवेल दुपारचा डबा इत्यादी सामान एका बॅकपॅक मध्ये भरलं. बुलेट झोपलेली होती. तिचं पांघरून काढलं आणि एक किक मारून तिला उठवलं. बॅगेला प्लास्टिक गुंडाळून रबरी दोऱ्या लावून बॅग गाडीला फिक्स केली आणि निघालो.
माझ्या मार्गावरचा रस्ता तसा चांगलाच आहे खड्डे नाहीत पण काही ठिकाणी मॅनहोल्स उघडे पडलेले असतात. तेवढी काळजी घेत होतो. नेहमीच्याच रस्त्यावर पण भर पावसात जायला खूप मजा येत होती. फूट दीड फूट पाण्यातून बुलेट घालताना मस्त पाणी उडत होतं इतर वाहनांचं पाणी अंगावर येत होतं. सौमित्रचा गारवा गुणगुणत, अविरत श्रावणसरींत, माझ्या प्रिय बुलेटचा सहवास मी उपभोगत होतो.
रस्त्यावर फारशी ट्रॅफिक नसेल असा माझा अंदाज बराचसा चुकला, बऱ्यापैकी गाड्या होत्या. एका सिग्नलवर थांबलो, बाजूला एक थंडरबर्डवाला होता त्याला हाइ करून "एन्जॉयिंग रेन राइड आ?" असं विचारलं. प्रत्युत्तरात, रॉयल एनफिल्डच्या मालकाला शोभणारं एक मस्त स्माईल मिळालं. तो काही बोलण्याचा आत सिग्नल मिळाला आणि आम्ही पुढे झेपावलो.
नामपल्ली, लकडी-का-पूल, मासाबटॅंक, रोड नं १२ हे टप्पे भरभर मागे पडत असतानाच, एका चढावर बुलेटच्या घश्यातुन घरघर की गुरगुर असा आवाज येऊ लागला. म्हणजे क्लच दाबल्यावर इंजिन नॉर्मल चालत होतं पण क्लच सोडली की इंजिन बंद पडेल कि काय असं वाटत होतं. न्यूट्रल करून, इंजिन चालूच ठेऊन रोडच्या बाजूला थांबलो. ऑफिस अजून ८ किमी दूर होतं, पुढे रोड नं ९२, केबीआर पार्कचा चढ होता आणि माझी बुलेट माझ्यावर रुसली होती. रस्त्यावरचं पाणी उडवण्याची मजा, सजा ठरते की काय असं वाटत होतं.
शेवटी पुन्हा गाडीवर बसलो आणि हळूहळू गाडी चालवायला सुरवात केली. इंजिन हळूहळू लोड घेऊ लागलं. नेमकं काय झालं होतं काही कळलं नाही पण त्यानंतर काही त्रास झाला नाही. बुलेटचा रुसवा बहुधा आपोआपच दूर झाला होता. बंजारा हिल्स, ज्युबिली हिल्स, कावुरी हिल्स या मार्गे मस्त पाऊस-प्रवास करून ऑफिसात आलो.
अंग कोरडं केल्यावर कपडे घालताना लक्षात आलं, बाकी सगळं बॅगेत बरोबर ठेवलं होतं पण शर्ट ठेवला नव्हता. मग ऑफिसबॉयला कंपनीचा टी-शर्ट मागितला आणि खाली फॉर्मल पँट्स आणि वर टी-शर्ट असा विचित्र वेष करून कामाला, म्हणजे हा लेख लिहायला सुरुवात केली!
"नुसताच मजकूर लिहिलाय, फोटू कुठैत?" असं प्लीज म्हणू नका, फोटो काढणं शक्य होतं पण मला पावसा-प्रवासाचा आनंद घेण्यात अधिक सुख मिळत होतं, इन फॅक्ट मी बाकी सर्वकाही विसरूनच गेलो होतो.
मी हैद्राबादी आहे= आळशी आहे, टंकाळवाणा तर खूपच आहे. खूप फिरलोय पण "पहिल्यांदाच भटकंतीबद्धल लिहिलंय पण लिहून लिहून लिहलंय काय तर ऑफिसला जाण्याबद्धल!" असं वाटू देऊ नका; मला खरंच खूप मस्त वाटलं आणि नेटानं लिहून टाकलं!
प्रतिक्रिया
31 Aug 2016 - 1:22 pm | सामान्य वाचक
खरेतर आनंदाचे क्षण हे असेच अवचित मिळून जातात
31 Aug 2016 - 1:33 pm | avinash kulkarni
एक उनाड दिवस
31 Aug 2016 - 2:04 pm | जगप्रवासी
खुसखुशीत झालाय लेख, और आन दो
31 Aug 2016 - 2:10 pm | अजया
छान लेख.
31 Aug 2016 - 2:22 pm | nashik chivda
झ्कास !
31 Aug 2016 - 6:31 pm | नीलमोहर
मस्त !!
31 Aug 2016 - 9:56 pm | सिरुसेरि
मस्त लेख . "फोटो किधर होना ?" असे विचारणार नाही . पुर्वी आमीरपेटवरुन शेअरिंग ऑटोमधुन "इ वर्षम साक्षिगा" , "निलुवद्दम" , "बन्नी बन्नी " अशी गाणी ऐकत हायटेक सिटी , माधापुर पर्यंत केलेले प्रवास आठवले .
7 Sep 2016 - 9:10 pm | Nitin Palkar
चालू द्या राव ! बरं वाटतंय वाचायला.