काही गावं, जागा आणि शहरं वर्षानुवर्षे भेटूनसुध्दा आपल्याशी फटकून वागतात तर काही अगदी तटस्थ, अनोळखी राहतात. काही मात्र आपल्याला पहिल्या भेटीमधेच स्वत:च्या धाडकन प्रेमात पाडतात..... केप टाउन हे शहर हे निर्विवादपणे या तीसरया प्रकारात येतं.
स्वच्छ सुंदर सूर्यप्रकाश, भर वस्तीत असूनही सतत असलेली निसर्गाची साथ, सभोवताली उधाणणारा महासागर, एका हाकेच्या अंतरावर असलेले द्राक्षांचे मळे, तर श्वास घ्यावा इतक्या सहजतेने या शहरात भिनलेला आणि रमलेला देशाचा मानबिंदू असा एकमेवाद्वितीय टेबल माउंटन!!!
आयुष्यात कधीतरी साऊथ आफ्रिकेला जायला पाहिजे अशी माझी खूप वर्षांपासून इच्छा होती. तिथला अप्रतिम समुद्र, जंगल सफारी, गार्डन रूट आणि जमलंच तर इथून एका फ्लाइटच्या अंतरावर असलेला विक्टोरीया फॉल्स.... पण प्रत्येक वेळेस कधी सुट्टी नाही, तर कधी बजेट नाही तर कधी मुलांना घेऊन एव्हडा दहा अकरा तासांचा प्रवास करण्याची हिंमत नाही अशा कारणांमुळे बेत बारगळतच गेला. पण शेवटी या वेळेस मात्र आम्ही 'अब चाहे सर फुटे या माथा...' असे म्हणत तयारी सुरू केली. अर्थातच वरच्या सर्व कारणांमुळे फार महत्वाकांक्षी बेत ठरवणार नव्हतोच. बरीच काटछाट केल्यानंतर शेवटी केप टाउन, गार्डन रूट आणि सफारी साठी क्रुगर नॅशनल पार्क असा प्लान ठरला.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जायच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता विमानतळावर जाऊन पोहोचलो. चेक इन च्या रांगेत आमचा नंबर आला. सगळी कागद पत्रे बघीतल्यावर काउंटर वरच्या मुलाकडून प्रश्न आला की तुमची मुलं अठरा वर्षांखालची दिसताहेत त्यांचा जन्मदाखला कुठेय तो द्या...आता साऊथ आफ्रिकेत जातांना अठरा या वयाच्या खालील मुलांसाठी त्यांचा जन्म दाखला दाखवावा लागतो नाहीतर विमानात चढूच देत नाही ही आमच्यासाठी एक नवीनच माहिती होती. अर्थातच जन्मदाखले आमच्या सोबत नव्हतेच. तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून मी त्या मुलाला ''ओ, करून घ्या ना जरा अड्जस्ट...'' असे म्हणून बघितले. पुढच्या वेळी मुलांचेच काय पण आमचेही जन्माचे दाखले देईन असेही शपथेवर सांगितले. पण त्याने मला '' काहीही हां काकू......" टाइप लुक्स दिले आणि तातडीने आमचे दुसर्या दिवशीच्या फ्लाइट मधे बुकिंग करून तो मोकळा झाला...असो.
दुसर्या दिवशी पुन्हा अ ब क ड.. लवकर उठा, एक दीड तासांचा घर ते विमानतळ प्रवास, चेक इन ची लाइन, सेक्यूरिटी इत्यादी प्रकार करत शेवटी विमानात जाउन बसलो आणि दहा अकरा तासांनंतर स्थानिक वेळेनुसार दुपारी केप टाउन मधे येऊन पोहोचलो.
हॉटेल साधंच पण सोयीच्या मध्यवर्ती ठीकाणी होते. रूम वर जाउन आंघोळ केली आणि ताजेतवाने झालो. रूममधेच पटकन कॉफी, बिस्किटे असलं काही बाही खाल्लं. हॉटेलच्या मालकिणबाई उर्सुला खाली होत्या त्यांच्याकडून नकाशे घेतले आणि गावात फेर फटका मारायला बाहेर पडलो.
ही काही क्षणचित्रे...
आम्ही जिथे राहत होतो त्या भागाचे नाव होतं बो काप. तेथलं वैशिष्ट्य म्हणजे ही रंगीत संगीत घरे.
इथला सगळ्यात लोकप्रिय भाग म्हणजे विक्टोरीया अँड आल्बर्ट वॉटरफ्रंट. केप टाउनची शान. अतिशय सुंदर आणि उत्साहाने सळसळता असलेला हा भाग. काय नाही इथे? रोज संध्याकाळी इथे चक्कर मारली तरीही कंटाळा येणार नाही इतक्या गोष्टी करायला. पाण्याच्या कडेने असलेले रस्ते, बसायला बेंचेस. सायकलींग करा, स्केट बोर्डींग, वॉक करा. सगळीकडे स्वच्छता आणि सुव्यवस्था.
सर्व प्रकारची असंख्य उपाहार गृहे, पब्स, कॅफेस. शॉपिंग साठी हाय एण्ड ब्रॅंड्स मॉल पासून स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणारे, तिथल्या वस्तू विकण्यासाठीचे दुकानं, स्टॉल्स. मुलांसाठी एक छानसं अक्वेरियम तीथे आहे आणि एक मोठा आकाश पाळणा देखील. त्या आकाश पाळण्यात बसून संपूर्ण शहर आणि समुद्र असा नजारा उंचीवरुन बघता येतो . फारच सुंदर दृष्य असतं ते.
शहरात फिरतांना टॅक्सी हा उत्तम पर्याय आहे. शक्यतो हॉटेल वाल्याने ठरवून दिलेल्या टॅक्सी आम्ही वापरायचो पण एक दोन वेळेस रस्त्यावर टॅक्सी केली ती पण सुरक्षितच वाटली. दुसरा पर्याय तो म्हणजे हॉप ऑन- हॉप ऑफ बसेस. अगदी मस्तं भरवशाची सर्विस. आरामात बसच्या वरच्या मजल्यावर बसून केप टाउन फिरा. एखादी सुंदर जागा दिसली की त्या स्टॉप वर उतरा, कुठेतरी छान लंच करा मग पुन्हा बस मधे चढा. शहरात फिरतांना जाणवतं की निसर्गाची साथ इथे कधीच सुटत नाही.
केप टाउन हे शहर बाकी साऊथ आफ्रिकेच्या तुलनेत अतिशय सुरक्षित आहे. आम्ही मुलांना घेऊन रात्री उशिरा जरी परतलो तरीही आम्हाला कुठे भीती अशी वाटली नाही. नाही म्हणायला आमच्या हॉटेल मधे संध्याकाळ नंतर ग्रिलचा दरवाजा लावून घेण्याची पद्धत बघितली. आम्ही आलो की इंटरकॉम वरुन आल्याचं सांगायचो मग दार उघडल्या जायचं.
रात्री परतल्यावर उर्सुलाकडून दुसरया दिवशी कुठे फिरावं या बाबतीत विचारणा केली. त्यावर तिने सांगितले की येथील हवामान खूप लहरी आहे. त्यामुळे कुठेही जायचं असल्यास वेळेवरच बेत ठरवावा. खास करून टेबल माउंटन च्या बाबतीत. सकाळी उठल्यावर त्या डोंगराकडे बघावं डोंगरावरती ढगांचा पडदा दिसल्यास प्लान कॅन्सल. हवा चांगली नसेल तर वरती जायच्या केबल कार्स बंद ठेवतात.
टेबल माउंटन तर बघायचाच होता त्यामुळे दुसर्या दिवशी हवामान चांगले असु दे अशी आशा करत आम्ही झोपी गेलो.....
प्रतिक्रिया
27 Aug 2016 - 1:39 am | अभिजीत अवलिया
पु.भा.प्र.
27 Aug 2016 - 2:58 am | पिलीयन रायडर
अरे वा!! जे लोक्स केपटाऊनला जाणार आहेत त्यांना अगदी वेळेवर महत्वाचा लेख आला बुवा! ;)
सुरवात मस्तच! पटकन पुढचे भागही येऊ देत!
27 Aug 2016 - 8:11 am | पिशी अबोली
अगदी अगदी :D
वाचून फार फार भारी वाटतंय.
27 Aug 2016 - 3:04 am | स्रुजा
अरे वा ! छान चालू झाली आहे मालिका.
27 Aug 2016 - 3:21 am | निशाचर
गार्डन रूटबद्दल ऐकलंय. पुभाप्र
27 Aug 2016 - 3:59 am | रुपी
अरे वा.. मस्तच! ती रंगीत घरे खूपच आवडली.
28 Aug 2016 - 9:45 am | प्रभास
सहमत... ईतर फोटो पण छान आहेत...
27 Aug 2016 - 7:07 am | पगला गजोधर
Reminded me, my beautiful days spent in Kaapstad....
27 Aug 2016 - 7:15 am | यशोधरा
मस्त लिहिते आहेस पद्मावती, लिहायची शैली खूप आवडली.
फोटोही मस्त आहेत, पटपट पण बैजवार लिही.
पुढील भागांची वाट बघते.
27 Aug 2016 - 8:05 am | अभ्या..
भारी लिहिलय पदमाक्काने. घराचे कलर्स जब्बरदस्तच.
27 Aug 2016 - 8:39 am | रेवती
मस्त गं पद्मावती.
डोंगराचं जावळ काढल्यासारखा फोटू मस्त आहे.
27 Aug 2016 - 8:53 am | बाजीप्रभू
मी दरबनला होतो कामानिमित्त पण कधी केप टाऊनला जाण्याचा योग आला नाही. तुमच्याकडून चांगली माहिती मिळतेय. पुढल्या भागाच्या प्रतीक्षेत.
माहितीत भर पडली विशेषतः 'बर्थ सर्टिफिकेट बद्दल'.
27 Aug 2016 - 9:30 am | प्रचेतस
मस्त सुरुवात.
27 Aug 2016 - 9:30 am | अजया
मिपावर अच्छे दिन आलेत.एकाहून एक सुंदर प्रवासवर्णनं येत आहेत.
छान लिहिलं आहेस पद्मा.तू पण माझा खर्च वाढवणार असं वाटतंय केपटाउनचं वर्णन वाचून!
27 Aug 2016 - 11:19 am | प्रीत-मोहर
टु विजिट लिस्टात अजून एक ऍडिशन.
सुंदरच लिहिलयस आणि फोटोपण सुरेख.
काहींसाठी अगदी वेळेवर आलाय हो लेख ;)
27 Aug 2016 - 11:37 am | शान्तिप्रिय
पद्मा वती
छानच एच डी फोटो आहेत.
आणि लेखन
पुढच्या भागाची वाट बघतोय.
27 Aug 2016 - 4:52 pm | एस
सुंदर आखीव-रेखीव शहर. तसेच छान वर्णन. पुभाप्र.
27 Aug 2016 - 4:55 pm | इशा१२३
छान सुरवात.फोटोही मस्त!
27 Aug 2016 - 4:55 pm | इशा१२३
छान सुरवात.फोटोही मस्त!
27 Aug 2016 - 11:55 pm | बोका-ए-आझम
फोटोही मस्त!पुभाप्र!
28 Aug 2016 - 10:45 am | डॉ सुहास म्हात्रे
फोटोंवरून हे शहर खूपच सुंदर आहे असे दिसते आहे !
दक्षिण अफ्रिका पर्यटन यादीत आहेच. त्यामुळे ही लेखमाला एक पर्वणीच ठरली आहे.
28 Aug 2016 - 5:25 pm | पगला गजोधर
Crocodile farm on N2 ...
28 Aug 2016 - 5:59 pm | पगला गजोधर
क्रोकोडॉयल फार्म ला भेट दिली तेव्हा तो बंद होता, नाहीतर तिथे क्रोकोडॉयल मीट डिश मिळते, ती मला ट्राय करून पाहायची होती (एक जीवनातील ऍडव्हेंचर म्हणून)
28 Aug 2016 - 8:24 pm | अभ्या..
देखो मगर प्यारसे
28 Aug 2016 - 8:53 pm | पगला गजोधर
क्रोक मीट खायचं होतं.
28 Aug 2016 - 6:13 pm | श्रीरंग_जोशी
आणखी एका पर्यटनविषयक लेखमालिकेची उत्तम सुरुवात. फोटो अन वर्णनशैली नेहमीप्रमाणेच खिळवून ठेवणारी आहे.
१८ वर्षाखालील मुलांचा जन्माचा दाखला प्रवासासाठी आवश्यक असण्याचे उदाहरण प्रथमच आढळले. दक्षिण आफ्रिकेच्या ऑन अरायव्हल व्हिसासाठी लागणार होते का?
पुभाप्र.
28 Aug 2016 - 7:10 pm | पद्मावति
मन:पूर्वक आभार सर्वांचे.
गजोधर - नाही हो, क्रॉकडाइल फार्म ला जाणं नाही जमलं :(
क्रॉकडाइल मीट....बापरे :)
श्रीरंग, तो जन्मदाखल्याचा द. आफ्रिकन सरकारचा कायदा आहे म्हणे. चाइल्ड ट्रॅफीकिंग रोकण्यासाठीचा एक उपाय म्हणून जन्मदाखला मागतात, मुलं तुमचीच आहे हे सिध्द करण्यासाठी.
28 Aug 2016 - 7:55 pm | श्रीरंग_जोशी
हे एकदम सबळ कारण वाटते. भारतीय पासपोर्टवर मातापित्यांचे नाव असले तरी इतर देशांच्या पासपोर्ट्सवर तसे असेलच असे नाही. त्यामुळे अशा ठिकाणी जन्माचा दाखला उपयुक्त ठरतो.
28 Aug 2016 - 7:17 pm | स्वाती दिनेश
खूप छान लिहिले आहेस. फोटो पण मस्त!
पुभाप्र.
स्वाती
29 Aug 2016 - 3:05 am | जुइ
फोटो आणि छोटेखाणी वर्णन आवडले. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
29 Aug 2016 - 4:18 am | खटपट्या
खूप छान माहीती आणि फोटो.
29 Aug 2016 - 12:22 pm | नाखु
तंतोतंत सहम्त आहे
29 Aug 2016 - 1:10 pm | पाटीलभाऊ
वा वा...छान लिहिलंय..क्रुगर नॅशनल पार्कला जायची इच्छा आहे..
मागील 7-8 महिन्यांपासून केपटाऊन मध्येच आहे...अतिशय सुंदर शहर...!
लिखाणाचा थोडा सराव झाल्यावर केपटाऊनवर लेख लिहीन म्हणतो.
"येथील हवामान खूप लहरी आहे"...सहमत...येथे एका दिवसात तीनही ऋतू अनुभवण्यास मिळतात.
29 Aug 2016 - 1:53 pm | मोदक
सुंदर सुरूवात.. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
29 Aug 2016 - 7:41 pm | उल्का
छान लिहिलंय.
मस्त मालिका.
29 Aug 2016 - 7:59 pm | Sanjay Uwach
खुपच छान प्रवास वर्णन व फोटो
29 Aug 2016 - 8:30 pm | Madhavi1992
मस्तच लिहिते आहेस. फोटो अप्रतीम
29 Aug 2016 - 9:55 pm | पैसा
मस्त लिहिलंय!
30 Aug 2016 - 8:47 am | ऋषिकेश
छान सुरुवात! खास लॉगिन करून प्रातिसाद द्यावा वाटला यातच काय ते आलं. जियो!
30 Aug 2016 - 4:52 pm | सुहास बांदल
जन्म दाखल्याची माहिती आणि महती एवढी असेल याची कल्पना नव्हती. पुढील भाग च्या प्रतीक्षेत.