दापोली एक रम्य स्थळ भाग -१ :- केशवराज आसुदबाग

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in भटकंती
25 Aug 2016 - 12:00 pm

पुर्वी मामाकडे आजोळी बांध-तिवरे येथे जायचो तेव्हा कुठल्या का कारणासाठी होईना आमच्या मामाची दापोलीची २ दिवसा आड एक फेरी ठरलेली असायची. तेव्हा मामा आईला "मी कापात जाऊन येतोय गं काय आणायचंय का? असे विचारत असे तेव्हा कापात म्हणजे काय हे कळायचे नाही. पुढे कळलं की कापात म्हणजे कॅम्पचा अपभ्रंश आहे. या गाववाल्यांनी खर तर कॅम्पचा उल्लेख कापात असा केला आहे.

इंग्रजांनी दापोलीचे महत्व ओळखले होते आणि त्यांच्या काळात एक कॅम्प दापोली येथे होता. इंग्रजांनी बांधलेले आल्फ्रेड गॅडनी हायस्कुल आजही तिथल्या मुलांच्या शिक्षणाची आस पुरी करत आहे. या शिवाय १९७२ साली बांधलेले कोकण कृषी विद्यापीठ ही दापोलीची शान आहे. बारमाही थंड हवेचं ठिकाण असल्याने मिनी महाबळेश्वर म्हंटले जाते शिवाय समुद्र किनारा जवळ या सार्‍या मुळे जागेच्या किंमतीचे भाव शहरी दरापेक्षा जास्त आहेत.

तेव्हा या दापोलीत अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. दरवर्षी श्रावणातील एक सोमवार कुलदैवताचे पुजनासाठी तिकडे जातो तेव्हा दापोलीला मावशीकडे २ दिवसांचा मुक्कम करायचा आणि उरलेल्या वेळेत एकेक करुन जमेल तशी ही स्थळे बघण्याचा कार्यक्रम असतो. या वेळी मी केशवराज हे विष्णुचे मंदिर पाहिले.

दापोलीतील मावशीचे घर:

"अभय घर बघ , अभय नळ बघ" काय जुना बालभारतीचा धडा आठवला ना?

हे मागल्या अंगणातले पाणी फुकट नाही जात आहे तर त्या पाण्यावर कासाळु , अळु, चिकु, पेरु, जास्वंद, फणस, सुपारीच्या २ पोफळी, माड एवढ्या झाडांना फिरवले जातं.

श्री. व्याघ्रेश्वराकडे जाणारा रस्ता. या रस्त्याला शेवटी ते इंग्रजी व्ही आकाराचे झाड दिसतंय ना तिथुन खाली तांबड्या रस्त्याला खाली उतरायचे की नारळी पोफळीच्या बाग आणि त्यामध्ये असलेली कौलारु घरे अशा रम्य पाऊलवाटेतुन तुम्ही केशवराजकडे पहिले पाऊल टाकता.

काय येत आहेत का सुर्यकिरणे खाली:-

कोकणातील सकाळंचं वातावरण काय मस्त असतं , नारळ पोफळीच्या बागांमधुन लपंडाव करत खाली येणारे सुंदर सोनेरी सुर्याची किरणे , कवडसे, धुकं आणि चुलीतुन वर वर जाणारा धुर, पावसाने धुतले गेल्यानंतर मातकट विटकरी रंगाची कौले आणि त्यांची कडेकडची बाजु मात्र हिरवी शेवळी म्हणजे जणु म्हणजे लाल जरीकाठची पैठणी आणि त्याला हिरवा पदर अस एकंदर रम्य वातावरण असतं. त्याला जोड असते ती पाटातुन खळखळ वाहणार्‍या पाण्याचा आवाजाची आणि विविध रंगीत पक्ष्यांच्या गुंजारवाची.

हाच तो साकव जिथे "गारंबीच्या बापु" या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते पण आता नुसतेच खांब उरले आहेत:-
आता तो पलिकडचा जो डोंगर दिसतोय ना तिथे वर चढयचंय फक्त २०० पायर्‍या. मग येताय ना?

हुSSश! दमलात ना ? पण हे काय हे आलंच केशवराज विष्णु मंदिर. देवळात विष्णुची २ फुटी काळ्या दगडाची मुर्ती उभी आहे. गाभारा साधासाच आहे.

मंडपा समोरील गायमुख आणि त्यातुन खाली दगडाच्या द्रोणीत पडणारे बारमाही झर्‍याचे पाणी. चवीला मधुर आणि उन्हाळ्यात सुध्दा थंडगार.

या झर्‍याचे उगमस्थान मंदिरासमोर असलेल्या डोंगरावरुन मंदिरापासुन थोडे उंचावर असलेल्या वडाच्या झाडाच्या मुळातुन होत आहे. या पाण्याला डोंगराच्या कपारीतच चर खणुन त्या पुढे पाटत सोडले आहे. हा पाट पण असा की त्यालाच दोन्ही बाजुला जे समांतर दगड आहेत त्यावरच आडव्या दगडी विटांच्या पायर्‍यांचे बांधकाम केले आहे म्हणजे तुम्ही त्या पायरीने वर जायचे आणि तुमच्या पायाखालुन तो पाटाचे पाणी वहात जाईल.

हे पहा से असे चर खणुन पाणी खाली आणले आहे.

चला वर जाऊया हे पाणी कुठुन येते ते पहायला.


मध्येच दगडाचीच एक चौकोनी छोटीशी द्रोण आहे ज्या मध्ये प्रवाह पुढे जातो आणि लाल माती खाली बसते. आहे की नाही कमाल?

अखेर मोठा कातळ लागला ज्यात बघा कसा चर खणला आहे पाण्यासाठी. याच्यावर तो संपल्यावर एक वडाचे झाड आहे त्यातुन हा झरा खाली वहात आहे. घसरण जास्त होती म्हणुन मी काही वरती गेलो नाही.

मंदिराच्या बाहेर देपोलकरांच्याच घरचे घरगुती कोकम सरबत प्यायला मिळाले. या मंदिराच्या पुजारी श्री. देपोलकरांची मागे झी टिव्हीला एक मुलाखत झाली होती. या मंदिराच्या आवारात जास्त थांबु दिले जात नाही आणि आजुबाजुला मानवी वस्ती नाही दुकान नाही आणि त्यामुळेच गडबड , गर्दी, प्लास्टीकचा कचरा या पासुन हा परिसर मुक्त आहे.

तुम्हाला जर ब्राम्हण पध्दतीचे जेवण करायचे असेल , तर येताना वाटेत लागणार्‍या ब्राम्हण कुटुंबात आगावु नोंदणी करावी म्हणजे दर्शन घेवुन परत येई पर्यंत जेवण तयार झालेले असते.

!! श्री केशवराज प्रसन्न!!

प्रतिक्रिया

फोटो दिसत नाहीत.. बाकी या परिसरात अनेकदा जाणे झाले आहे. काहीतरी कारण काढून परत परत येथे जावेसे वाटत राहते.

__/\__

नेत्रेश's picture

25 Aug 2016 - 12:08 pm | नेत्रेश

जरा फीक्स करा की

मृत्युन्जय's picture

25 Aug 2016 - 12:10 pm | मृत्युन्जय

फटु दिसत नाहित हो. केशवराज मंदिर बघितले आहे एकदा. तेव्हापासुन दुसर्यांदा जायची ओढ लागुन राहिली आहे.

प्रमोद देर्देकर's picture

25 Aug 2016 - 12:24 pm | प्रमोद देर्देकर

मी तर जीमेल द्वारे व्यवस्थित शेयर केले आहेत. सं.मं. जरा कराल काय? कृपया दुसरा ब्राऊजर वापरुन बघा आणि सांगा.

किसन शिंदे's picture

25 Aug 2016 - 12:28 pm | किसन शिंदे

फोटो दिसत नाहीत. दापोली, दाभोळ, हर्णे ही खूप आवडीची ठिकाणं.

वर्णन वाचून फोटो दिसत नाहीत ह्याची हळहळ वाटली..

पद्मावति's picture

25 Aug 2016 - 1:54 pm | पद्मावति

वर्णन वाचून फोटो दिसत नाहीत ह्याची हळहळ वाटली..

+१

लोनली प्लॅनेट's picture

25 Aug 2016 - 12:34 pm | लोनली प्लॅनेट

फोटो दिसत नाहीत जर google photos ची लिंक दिली असेल तर फोटो दिसणार नाहीत त्यापेक्षा photobucket वरून लिंक द्यायची ते सोईस्कर आहे

पाटीलभाऊ's picture

25 Aug 2016 - 12:40 pm | पाटीलभाऊ

वर्णन छान..पण फोटो न दिसल्याने थोडी निराशा.
अत्यंत रम्य परिसर आहे हा...4 वर्षांपूर्वी तेथे भेट दिली होती...नंतर जाणे झालेच नाही.

फोटो दिसत नसल्यामुळे फारच हळहळ वाटली. छान वर्णन. दापोली हे आवडते ठिकाण आहे.

पाटीलभाऊ's picture

25 Aug 2016 - 2:09 pm | पाटीलभाऊ

पहिला फोटो दिसत आहे...बाकी फोटोंच्या प्रतिक्षेत

पहिला फोटो वगळता बाकीचे दिसत नाहीत. डिसेंबरात दुसर्‍यांदा जाऊन आलो. अतिशय सुंदर ठिकाण आहे. दाबकेवाडीत जेवण छान मिळतं, तिथे जेवलात की नाही?

कपिलमुनी's picture

25 Aug 2016 - 2:21 pm | कपिलमुनी

छान वर्णन .. पण बारमाही थंड हवेचं ठिकाण हे काय पटले नाय बॉ !

संत घोडेकर's picture

25 Aug 2016 - 2:25 pm | संत घोडेकर

+१
या वर्षी एप्रिल महिन्यात गेलो होतो, हवेत आर्द्रता प्रचंड होती. पण आसूद चे सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडणारे आहे.

शान्तिप्रिय's picture

25 Aug 2016 - 3:01 pm | शान्तिप्रिय

फोटो?

जगप्रवासी's picture

25 Aug 2016 - 3:32 pm | जगप्रवासी

फोटो दिसत नाहीत..

आता बय्राचवेळाने चारपाच फोटो दिसताहेत.

पक चिक पक राजा बाबू's picture

26 Aug 2016 - 12:20 am | पक चिक पक राजा बाबू

दापोली स्वर्ग आहे,लहानपणी आम्ही सारंग वरुन वनभोजनासाठी असुद ला येत असू.व्याघ्ह्रॅश्वेर चे मंदिर आमचे अत्यन्त आवडीचे ठिकाण होते,दीवस भर दंगमस्ती करुन गोमुखतील पाणि हाताच्या ओंजळीने पिणे हा एक रम्य सोहळा असायचा,

मुक्त विहारि's picture

26 Aug 2016 - 6:54 am | मुक्त विहारि

तुमच्या लेखामुळे परत एकदा मानसिक सफर घडली.

धन्यवाद....

कंजूस's picture

26 Aug 2016 - 7:22 am | कंजूस

फोटो नं १,२,५,६ दिसतात.

अजया's picture

26 Aug 2016 - 7:30 am | अजया

छान वर्णन.दोनदा गेलेय दापोलीला पण काही ना काही कारणाने केशवराज मात्र नाही झाले.तेवढ्यासाठी परत जायचे आहे.