साहित्य
शाकाहारी सारणासाठी
२०० ग्रॅम पनीर
१ गाजर, किसून
२ ते ३ पातीच्या कांद्याचा पांढरा भाग, बारीक चिरून
१/२ कप बारीक चिरलेली ढोबळी (शिमला) मिरची (असल्यास लाल, पिवळी, हिरवी वापरा)
६ ते ८ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
१ चमचा सोया सॉस
१/२ चमचा व्हिनेगर
मीठ, चवीनुसार
१ चमचा तेल
१ चमचा काळीमिरी पावडर
१ साखर
चिकनच्या सारणासाठी
पाव किलो बोनलेस चिकन ब्रेस्ट
१ माध्यम आकाराचा कांदा, चिरून
१ मोठा चमचा काळीमिरी पावडर
१ मोठा चमचा तेल
६ ते ८ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
१ चमचा सोया सॉस
१/२ चमचा व्हिनेगर
मीठ, चवीनुसार
आवरणा करिता
१ मध्यम आकाराचा कोबी
मोमोज, मूळचा तिबेटियन पदार्थ, सिक्कीम, नेपाळ आणि दार्जिलिंग ह्या भागांतून पसरत हल्ली गल्ली बोळात आणि मॉल्स मध्ये सर्रास मिळू लागलेला आहे. मैद्याच्या आवरणात, सारण भरून हा वाफवून मग सेपेन (एक पारंपरिक तिबेटियन तिखट चटणी/सॉस) बरोबर गरम गरम खायचा हा एक पदार्थ!
मैदा, हा तसा आपण शक्यतो टाळतो, तर काही लोकांना तो वर्ज असतो. म्हणून मग मैद्या ऐवजी, कोबीचे पाने वापरून आपण मोमोज चा आस्वाद घेऊ शकतो. एक तर अत्यंत कमी तेलाचा वापर, त्यात वाफवलेला आणि मैदा नं वापरल्यामुळे हा एक पौष्टीक पण चविष्ट पर्याय आहे.
कृती
पनीर सारणाकरिता
एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात लसूण घाला. कांदे पात , गाजर आणि ढोबळी मिरची टाकून मिश्रण २ ते ३ मिनिटे शिजू द्या. त्यात काळीमिरी, सोया सॉस, व्हिनेगर घालून ढवळून घ्या. चवीनुसार मीठ आणि एक चिमूट साखर घालून मिश्रण गॅसवरून काढून घ्या. भाज्या पूर्ण शिजवायचा नाहीयेत, कारण नंतर आपण मोमोज वाफवून घेणार आहोत. मिश्रणात पनीर किसून घाला, एकजीव करून हे गार करायला बाजूला ठेवा.
चिकन सारणाकरिता
दिलेले सगळे जिन्नस मिक्सर मधून बारीक करून घ्या.
कोबीची पानं अलगद वेगळी करून घ्या. मीठ घातलेल्या उकळत्या पाण्यात १ मिनिट ठेऊन मग बाहेर काढा. थोड्याशा गरम पाण्यात पानं भिजून ठेवा. (हे केल्यामुळे पानं नरम राहतील, व मोमोज करताना फाटणार नाहीत). आता तयार सारणाचे एक ते दोन चमचे कोबीच्या पानात भरून कोबीच्या पानाच्या पुड्या बांधा.
मोदक किंवा इडली पात्रात हे मोमोज वाफवून घ्या. व्हेज मोमोज साठी साधारण १५ मिनिटे, तर चिकन साठी साधारण २० ते २५ मिनिटे वाफवून घ्या. (चिकन ब्रेस्ट वापरल्यामुळे, आणि मिक्सर मधून बारीक करून घेतल्यामुळे, शिजायला २० ते २५ मिनिटे पुरतील)
गरम गरम मोमोज तिखट सेपेन किंवा शेजवान चटणी/सॉस बरोबर सर्व्ह करा!
सेपेन ची पाककृती लवकरच टाकेन. त्याची पाककृती इंग्रजीत माझ्या संकेतस्थळावर आहे.
प्रतिक्रिया
12 Aug 2016 - 4:08 pm | प्रमोद देर्देकर
मस्त रेसीपी. मला मोमोज हा खाण्याचा प्रकार असतो हे यावर्षीच दार्जिलींगच्या सफरीत कळले आणि आवडलाही. अफलातुन चव असते.
12 Aug 2016 - 4:11 pm | स्मिता चौगुले
लवकरच करुन बघेन ..
12 Aug 2016 - 5:00 pm | पगला गजोधर
;)
12 Aug 2016 - 5:15 pm | केडी
;)...ती शृंखला संपली हो :=)
12 Aug 2016 - 5:03 pm | पैसा
मस्त पाकृ. मैद्याऐवजी सरळ कणीक किंवा तांदुळाचे पीठ वापरून मोमो करता येतील की! कोबीच्या पानाचे कव्हर नावीन्यपूर्ण आहे. आता सारणात नारीक चिरलेला कोबी घालून एखादी व्हरायटी तयार करा!
पहिला फोटो दिसत नाहीये. शेअरिंगचा प्रॉब्लेम असावा.
12 Aug 2016 - 5:14 pm | केडी
पहिला फोटो असा आहे, मला तरी नीट दिसतोय, इतर कोणाला प्रॉब्लेम आहे का?
12 Aug 2016 - 5:57 pm | पैसा
दिसत नाही
12 Aug 2016 - 9:55 pm | रुस्तम
दिसत नाही
12 Aug 2016 - 8:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
फोटो "पब्लिकली शेअर " केला नसावा.
मोमो आवडता पदार्थ आहे. तो कोबीच्या पानात बनवण्याची कल्पना मस्त आहे. पण त्यामुळे चवीत बदल होईल का हे मात्र चाखून पहावे लागेल. मोमो आपण कधीमधी खाण्याचा पदार्थ नसल्याने मैद्याची फार काळजी नसावी. जर चवीत फरक नसला तर मात्र सोनेपे सुहागा ! :)
मोमो चीनमध्येही सर्वत्र आवडीने खाल्ला जाणारा आणि चीनी कुसीनची खासियत म्हणून मिळणारा पदार्थ आहे... वेगवेगळ्या सामिश व भाज्यांचे सारण घालून केलेले व वेगवेगळ्या आकारांचे १५-२० किंवा त्यापेक्षा जास्तच प्रकार मिळतात.
.
12 Aug 2016 - 9:04 pm | कैलासवासी सोन्याबापु
सहसा कोबीला एक उग्र वास असतोच काका, पण मला वाटते एकतर मिठाच्या पाण्यात ब्लांच करणे अन नंतर उकडणे ह्यामुळे तो कमी/सुसह्य/इतर मसाले, घटकांच्या चवींस पूरक असा होत असावा
12 Aug 2016 - 9:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
कोबी माझी स्वतःची आवडती भाजी आहे आणि कोबीची कच्ची पाने मी आवडीने (सलादमध्ये किंवा स्वतंत्रपणे) खातो. त्यामुळे माझा रोख मुख्यतः मैद्याच्या व कोबीच्या चवीतल्या फरकावर होता.
मोमो तर मी चीनी मोदक म्हणत पटापट गट्टम करतो :) ;)
12 Aug 2016 - 9:11 pm | केडी
साधारण मोमोज च्या धर्तीवरचा पदार्थ.
कोबीच्या पानाचा वास ब्लाँच केल्यामुळे निघून जातो.
12 Aug 2016 - 5:32 pm | सामान्य वाचक
हा प्रकार तुर्कस्थान मध्ये खाल्ला होता
बाकी लडाख मध्ये मोमो भारी मिळतात
12 Aug 2016 - 6:27 pm | केडी
संपादक मंडळाला विनंती
पहिल्या फोटो मधला दुवा कृपया हा द्यावा
https://lh3.googleusercontent.com/S3ukWDQl1oL2r90FdGGeXqS1obEjNyKnTbFO-W...
12 Aug 2016 - 7:54 pm | पिलीयन रायडर
12 Aug 2016 - 7:56 pm | पिलीयन रायडर
तुम्ही चुकीचा दुवा देताय. मी दुरुस्त केला! (हौशी साहित्य संपादक!)
बाकी रेसेपी अत्यंत भारी. परवाच फेसबुकवर कुणीतरी कोबीच्या पानातले रोल्स टाकले होते. तेव्हापासुन वाटत होतं की करुन पहावेत. तुम्ही त्या तिखट चटणीची रेसेपी टाकलीत की करुन पाहिन! मी कणिक वापरुन मोमोज करुन पाहिके होते नुकतेच, पण चटणी शिवाय मजा नाही. :(
12 Aug 2016 - 8:23 pm | केडी
मग लेखात आता फोटो दिसतोय का?
12 Aug 2016 - 8:26 pm | पिलीयन रायडर
अहो!!! म्हणजे मी प्रतिसाद दिला दुरुस्त करुन! मला अधिकार नाहीत धाग्यात काही दुरुस्तीचे. साहित्य संपादक करतील ते. तुम्हाला धागा एडिट करता येतोय का? (बहुदा नाही येणार..)
सासं, हा वरचा फोटो टाकुन द्या ना.
12 Aug 2016 - 8:43 pm | केडी
आलं लक्षात ! :-)
सेपेन ची पाकृ टाकेन नक्की पुढच्या आठवड्यात.
12 Aug 2016 - 8:08 pm | कैलासवासी सोन्याबापु
चिकनवाले मोमो पाहून खास ईस्ट युरोपियन किंवा स्कॅन्डीनेव्हियन अश्या कॅबेज रोल्सची आठवण आली बघा, फक्त त्यात बीफ असते खीमा स्वरूपात अन ते सर्व करताना कसल्याश्या ब्रॉथ मध्ये सर्व करतात, त्याबद्दल तुम्ही काही माहिती देऊ शकाल काय??
12 Aug 2016 - 8:29 pm | केडी
स्वीडिश कालडोमर बद्दल बहुदा लिहिलंय। झुरिच मध्ये एका रेस्टॉरंट मध्ये खाल्लेले आठवतायत. एकदा करून बघेन आणि लिहीन. आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद!
12 Aug 2016 - 8:41 pm | आनंदी गोपाळ
मला कुणीतरी प्लीज समजवून सांगेल का, की मैदा = विष अशी कन्सेप्ट कुठून व का आली आहे?
12 Aug 2016 - 9:05 pm | पिलीयन रायडर
तुम्हीच आम्हाला सांगा! आम्हाला अंदाजपंचेच माहिती आहे.
मला मागे कुठे तरी वाचलं त्यावरुन आठवतंय की High GI आणि फाईन असल्याने फायबर्स चे प्रमाण कमी ह्या कारणारे मैदा टाळल्या जातो. मैद्याचे अनेक पदार्थ तळलेले असल्यानेही तसा समज दृढ झाला असावा.
12 Aug 2016 - 9:15 pm | केडी
आम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे मैदा वाईट समजला जातो, तुम्हाला वेगळी माहिती असेल तर ती जरूर सांगा.
13 Aug 2016 - 12:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
मैदा = पूर्ण गव्हाचे पीठ (होल व्हीट फ्लोर किंवा आटा) - गव्हाचा चोथा (फायबर / ब्रॅन).
याचा अर्थ असा की, खूप बारीक चाळण लावून गव्हाचे पीठ चाळले की मैदा मिळतो.
म्हणजेच...
१. मैदा म्हणजे विष किंवा टाकाऊ पदार्थ किंवा वाईट पदार्थ नव्हे. किंबहुना, गव्हाच्या पिठात मैदा हाच मुख्य अन्नपदार्थ असतो.
धान्याचा चोथा हा अन्नपदार्थ नसला व तो शरिरात शोषला जात नसला तरी त्याचा आपली आतडी साफ आणि निरोगी ठेवण्यासाठी फार मोठा उपयोग होतो (हे कसे होते ते जरा क्लिष्ट आहे तेव्हा ते नंतर केव्हातरी).
धान्यांच्या चोथ्यांत अनेक जीवनसत्वे असतात व चोथा टाकून दिल्याने नैसर्गिकरित्या व फुकट मिळणारी जीवनसत्वेही व्यर्थ जातात.
या कारणांसाठी, नेहमीच्या जेवणात पूर्ण गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याचा सतत वापर करणे आरोग्यदायी नाही.
या वाक्यातले "नेहमीच्या जेवणात" आणि "सतत" हे शब्द फार महत्वाचे आहेत.
हेच अतीसडीचे (पॉलिश / डबल पॉलिश करून पांढरेशुभ्र केलेले) तांदूळ खाल्यानेही होते. त्याऐवजी बिनसडीचे किंवा कमी सडीचे तांदूळ (ब्राऊन राईस) जास्त आरोग्यदायी असतात.
मात्र, कधीमधी मैदा अथवा पांढरेशुभ्र तांदूळ वापरून बनवलेले पदार्थ खाणे अजिबात वाईट नाही.
२. ग्लुटेन इंटॉलरन्स (गव्हात व इतर काही धान्यांत असलेल्या ग्लुटेन नावाच्या प्रोटीन्सची अॅलर्जी) असलेल्या लोकांना, अर्थातच, ग्लुटेन असलेली धान्ये वर्ज असतात. हे इतर अॅलर्जी निर्माण करू शकणार्या पदार्थांच्याबाबतीतही खरे असतेच, उदा: दूध, अंडी, वांगी, ई, ई, ई. असे पदार्थ त्यांची अॅलर्जी असणार्यांमध्ये अनारोग्य (आजार) निर्माण करतात, म्हणून त्यांना ते वर्ज्य असतात.
13 Aug 2016 - 12:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
अर्थातच, कोबीची पाने वापरून केलेली पाककृतीचे व्हेरिएशन स्वागतच आहे आणि ती चाखायला जरूर आवडेल... कदाचित ती अधिक चवदार असल्यास अधिक आवडेल.
वरच्या प्रतिसादाचा उद्द्येश केवळ मैद्याबद्दलचे गैरसमज दूर करणे हाच आहे.
12 Aug 2016 - 9:08 pm | कैलासवासी सोन्याबापु
तुम्ही कायमच यॉर्कर चेंडू टाकता बुआ डॉक्टर साहेब =)),
स्वगत :- बाप्या लगा माणूस डेंजर हाय ह्यो, एकतर थेट ब्लॉकहोलला नाहीतर परफेक्ट यॉर्कर! किंवा जे सापडेल खाण्यालायक ते पुडी करून खड्ड्यात टाकतो (आगीने भरलेल्या) =)) =)) =))
12 Aug 2016 - 9:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
ही, ही, ही...
अतिरेक फक्त वाईट गोष्टींचा करतात असे असते काय ?
कमी फायबरवाल्या गोष्टींचा अतिरेक नको म्हटल्यावर काही लोक लगेच त्या गोष्टी म्हणजे विष आणि पूर्णपणे टाळा असे करतात... आजारापेक्षा उपाय वाईट, असे म्हणतात ते उगाच नाही ;) :)
12 Aug 2016 - 9:18 pm | कैलासवासी सोन्याबापु
मला वाटते भारतीय वातावरणात मैदा वाईट नसून मैद्यातल्या शुगर्स मोडून त्यात किण्वन घडवून मग बेक केलेले पदार्थ वाईट असावेत!
आता मी पळतो!
बाकी, गोयंच्या चिकन सागुतीबर खायला पावच हवा! भाकरी भात वैगरे ने मजा नाय तितकी येणार
13 Aug 2016 - 10:14 am | आनंदी गोपाळ
गहू खूऽप बारीक दळून कोंडा काढून टाकला की मैदा बनतो. त्यात अनारोग्यकारी असे काय आहे? उरलेला कोंडा न फेकता रोजच्या पोळ्यांच्या कणकेत मिक्स करा अन खा की सगळी जीवनसत्व अन फायबर! असंही रोजच्या जेवणात आपण मैद्याचं काय अन किती खातो? उगा त्या पदार्थाची मूळ चव का बदलायची?
आपल्या पारंपारिक पाककृतींत मैदा वापरल्यामुळे पटकी झाल्याची किती उदाहरणं इतिहासात आहेत? कोबीची पानं प्रयोग म्हणून सुंदर आहेत, रोज नाश्त्याला ब्रेड. जेवणात नूडल्स अन डिनरला पास्ता खाणार्यांनी कोबीचाच मोमो खावा. रोजच्या जेवणात घरची कणकेची पोळी वरण भात खाणार्या आपल्यासारख्यांना महिन्यातून एकादेवेळी ५-७ मैद्याचे मोमोज हाणायला काय बी प्राब्लेम नस्तोय.
वरती डॉक्टरांनी सांगितलंच आहे की! तुलनेने कमी फायबर आहेत, म्हणून मैद्याचा अतिरेक नको असं म्हटलं, की मैदा म्हणजे अरे बापरे! चुकून तोंडात आला की तुम्ही आता आजारी होणारच! अशी भीती निराधार आहे.
या पाककृतीतील इनोव्हेशन व निगुतीला नांवे ठेवण्याचा हेतू अजिबात नाही. तसे चुकून ध्वनित झाले असल्यास क्षमस्व.
फक्त, मैदा उगंच बदनाम झाल्याने, कधीनवत करण्याच्या पाककृतींची ऑथेंटिक चव चाखायला हरकत नाही, इतकेच म्हणणे आहे.
13 Aug 2016 - 10:58 am | केडी
.
अजिबात नाही, गैरसमज नसावा.
माझ्या माहिती प्रमाणे मैद्या ब्लिच करतात, जेणेकरून तो अधिक पांढरा दिसतो. बाकी तुम्ही लिहिल्या प्रमाणे, गव्हातून कोंडा काढल्यामुळे त्यातील पोषक तत्व निघून जातात.
आणि, मैदा आपण विकतच आणतो, त्यामुळे त्यावर अजून काय प्रक्रिया केली असते ते ठाऊक नाही.
अर्थातच, सध्या दिवस रात्र पिझ्झा बर्गर ब्रेड खाल्ला जातो, म्हणून, आणि एक इनोव्हेशन म्हणून कोबीची पानं वापरली आहेत.
प्रतिसादाबद्दल आभार!
13 Aug 2016 - 11:20 am | पैसा
मला बर्याच वस्तूंची अॅलर्जी आहे. त्यातला प्रकार असू शकेल. पण मी जेव्हा कधी नाइलाज म्हणून बिस्किटे, केक वगैरे मैद्यापासून बनवलेले पदार्थ थोडेसेही खाते तेव्हा पोटात सिमेंट भरल्यासारखे वाटायला लागते.
13 Aug 2016 - 12:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुम्हाला माईल्ड ग्लुटेन इंटॉलरन्स असू शकतो. माझ्या वरच्या एका प्रतिसादात त्याबद्दल उल्लेख आला आहे.
किंवा त्या पदार्थांत असलेल्या इतर काही घटकांची अॅलर्जीही असू शकते.
16 Aug 2016 - 1:51 am | पिलीयन रायडर
तुमचा मुद्दा अगदी मान्य आहेच. पदार्थाची ऑथेंटिक टेस्ट महत्वाची आहेच. आणि जर रोजचे जेवण पोळी-भाजी स्वरुपाचेच असेल (शिवाय व्यायाम वगैरेही नियमित असेल..) तर थोडा मैदा खायला काहीच हरकत असु नये. उलट मोमोज मध्ये तर उकडलेल्या फॉर्ममध्ये मैदा असल्याने अजुन कमी त्रासदायक असावा. (अनेकदा मैदा तळलेल्या फॉर्ममध्ये जास्त दिसतो म्हणुन म्हणलं..)
पण तरीही असंही वाटतं की आजकाल बाहेर खाण्याचं प्रमाणही खुप वाढलं आहे. आणि बाहेरच्या खाण्यात मैद्याचा वापर खुपच जास्त आहे. जसं की पिझ्झा, नान, मंचुरियन, नुडल्स इ. अगदी घरातही ब्रेड, बिस्किट, मॅगी इ. चे प्रमाण लक्षणीय असते. माझ्या लहानपणी बाहेर खाणे आणि घरातही पदार्थात मैदा असणे अगदी कधीतरीच व्हायचे. पण आता कितीही ठरवले तरी किमान आठवड्यातुन एकदा तरी बाहेर खाणे होतेच. घरातही ब्रेड्चा वापर वाढलाय.
पोळी भाजीला रिप्लेस करण्याचे प्रमाण वाढल्याने मैद्याविषयी हा प्रचारही वाढलेला असावा. विचार केला तर मैदा नाहीच खायचा ठरवलं तर निम्मे फास्ट फुडचे पदार्थ खाता येणार नाहीत. बाहेरचा तळलेला तर एकही पदार्थ खाता येणार नाही. त्यामुळे मैदा टाळा म्हणलं की अनेक डॅमेजिंग पदार्थांना आपोआप फाटा मिळतो. याकारणास्तव मैदाविरोधी प्रचार जोरात असेल.
12 Aug 2016 - 9:29 pm | रेवती
ग्रेट दिसतायत मोमोज. कोबीची पाने वापरून तुम्ही पाकृ सुबकपणे मांडून ठेवलियेत.
12 Aug 2016 - 9:55 pm | केडी
प्रतिसादाबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल
13 Aug 2016 - 12:11 pm | सविता००१
अप्रतिम दिसताहेत.
13 Aug 2016 - 12:15 pm | पद्मावति
खूप मस्तं पाककृती आणि सादरीकरण सुंदर.
13 Aug 2016 - 12:23 pm | रातराणी
जबरा!
13 Aug 2016 - 12:49 pm | यशोधरा
मस्त पाककृती आणि सुंदर सादरीकरण .
13 Aug 2016 - 1:07 pm | अजया
मस्त पाकृ.
13 Aug 2016 - 1:40 pm | बाबा योगिराज
वल्लाह है यह...!
14 Aug 2016 - 5:41 pm | नूतन सावंत
झकास पाककृती,तेवढी ती चटणीची पाककृती लवकर टका प्लीज.
14 Aug 2016 - 5:59 pm | मदनबाण
अजुन हा पदार्थ चाखला नाहीये... लिस्ट मध्ये अॅड करावयास हवा !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेनु काला चश्मा जचदा ए...जचदा ए गोरे मुखडे ते.... ;) :- Baar Baar Dekho
27 Aug 2016 - 4:31 am | केडी
सेपेन ची पाकृ इथे टाकली आहे.
27 Aug 2016 - 11:32 am | पिंगू
मोमोज पुण्यात असताना बर्याच वेळेस खाल्ले होते. आता केदारने दिलेली पाककृतीची आयडिया भन्नाटच आहे.
27 Aug 2016 - 11:48 am | केडी
अहो पुण्यात या कि एकदा. एक छोटीशी राईड मारू. तुम्ही दर्शनाला दुर्लभ झालेले आहेत.
27 Aug 2016 - 1:43 pm | पिंगू
सध्या मलाच पुणे भेट दुर्लभ झाली आहे आणि माझी सायकल पण पुण्यातच मुक्काम करुन राहिलीये..