सखि मंद झाल्या तारका!

शशिधर केळकर's picture
शशिधर केळकर in काथ्याकूट
29 Jan 2009 - 12:44 am
गाभा: 

परवा झी टीव्ही वरील नक्षत्रांचे देणे कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पंडितजीनी गायलेले एकमेव (म्हणूनही अद्वितीय ) भावगीताचा - 'सखि मंद झाल्या तारका' थोडे ऐकण्याचा योग आला. इथे मिपावर त्याचा धागा मिळून अनेकदा ऐकून झाले होतेच; तरीही पुनःप्रत्ययाचा आनंद.

मनात आले, की पंडितजीनी इतर सर्व प्रकारची गाणी गायली. नाट्य - चित्रपट - शास्त्रीय, उपशास्त्रीय, विविध भाषांमधे गायली. किती - याला मोजदादच नाही, किती छान - याला काही सीमाच नाही. परवाच्या कार्यक्रमात पुलं नी त्याना हवाई गंधर्व म्हटले वगैरे उल्लेख आला - किती लोकांनी त्याना अशा किती लहान मोठ्या उपाधीनी गौरविले - याला ही काही तोड नाही. पण ते असो. हे फार अवांतर झाले. तर, मनात असे आले, या गाण्याच्या निमित्ताने, की त्यानी आणखी भावगीते का नाही गायली? आणि गायली असती तर? ती अशीच इतकी लोकप्रिय झाली असती का? (हा काय प्रश्न आहे? तरी पण!)

की त्याना इच्छा असूनही त्याना ती गायला मिळालीच नाहीत? तेव्हाचे इतके मातबर संगीतकार त्याना कसे काय विसरले? की मंगेशकर कुटुंब आणि बाबूजी यांची इतकी जबरदस्त मोहिनी त्यां संगीतकारांवर होती की अण्णाना तिथे जागाच नव्हती?

पण तसे म्हटले तर इतर अनेक शास्त्रीय संगीत गायक गायिकांनी अनेक भावगीते गाण्यात स्थान प्राप्त केले - लगेच आठवणारे - कुमार गंधर्व, छोटा गंधर्व, रामदास कामत, वसंतराव देशपांडे, ज्योत्स्ना भोळे, किशोरी आमोणकर, .... कितीतरी.

आणि तसे पाहिले, तर भीमसेनांनी गायिलेली अभंगवाणी मधील सर्व 'गाणी' तशी 'भाव'गीतेच की! (अवांतरः भाव तेथे देव, देवाची गाणी, म्हणून भावगीते)

की त्याना अशी गाणी पसंत नव्हती?

वेळच नव्हता असे म्हणणे युक्त आहे. पण पुरेसे समाधानकारक नाही.

मनापासून असे वाटले - विशेषतः सखि मंद झाल्या तारका ऐकून, की आणखी खूप खूप भावगीते त्यांच्या गळ्यातून ऐकायला मिळायला हवी होती!

तुम्हाला काय वाटते? यातील काही उल्लेख चुकीचा असेल, तरीही कृपया सांगावे.

प्रतिक्रिया

शंकरराव's picture

29 Jan 2009 - 12:52 am | शंकरराव

की त्याना इच्छा असूनही त्याना ती गायला मिळालीच नाहीत? तेव्हाचे इतके मातबर संगीतकार त्याना कसे काय विसरले? की मंगेशकर कुटुंब आणि बाबूजी यांची इतकी जबरदस्त मोहिनी त्यां संगीतकारांवर होती की अण्णाना तिथे जागाच नव्हती?

त्या वेळचे संगीतकार , गायक व त्यांची आवड निवड ठरवणारे आपण कोण ?

आनंद घारे's picture

29 Jan 2009 - 9:29 am | आनंद घारे

कुठलाही महान कलाकार कोणत्या अद्भुत रचना करतो याला महत्व आहे. त्याने काय काय केले नाही याचा विचार करायचे कारण नाही. सर्वांनी सगळ्याच प्रकारच्या रचना कराव्यातच अशी अपेक्षा ठेवणे बरोबर नाही.

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

महेंद्र's picture

29 Jan 2009 - 2:39 pm | महेंद्र

श्रिनिवास खळे ह्यांचा इंटर्व्हु पाहिला टीव्ही वर. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भिमण्णाचा पींड हा क्लासिकल गाण्यातला! त्यांना इतर प्रकारची गाय़की फारशी आवडत नव्हती. तसा सुरुवातीच्या काळात केवळ गाण्यावरिल प्रेमासाठी त्यांनी संगित नाटकांत काम केल्याचा उल्लेख ही कोणितरी केल्याचं आठवतं.
कुठलाही राग आळवुन आळवुन गाणे हे त्यांना खुप आवडायचे..

"अहो अण्णांच्या तोंडुन भावगितं ऐकण म्हणजे कल्पवृक्षा खाली बसुन ताक मागण्यासारखं आहे हो.."

अण्णांच्या कडुन मारवा आणि दरबारी कानडा ऐका जरा.. आणी पुरिया म्हणजे अप्रतिम..

तरी पण , इतर रिकाम्या वेळात त्यांनी गायली असती तर नक्कीच आवडली असती भावगितं देखिल...

प्रमोद देव's picture

29 Jan 2009 - 4:25 pm | प्रमोद देव

अण्णांना भावगीत गायला लावायचे म्हणजे सिंहाला पिंजर्‍यात डांबण्यासारखे आहे.
समुद्राच्या लाटांवर उन्मुक्तपणे स्वार होणार्‍याला तलावात पोहायला लावण्यासारखे आहे.

शंकरराव's picture

29 Jan 2009 - 4:38 pm | शंकरराव

अण्णांनी लावलेल्या पहील्याच सुरात असंख्य गीतांचे भाव आम्ही जाणले आहेत
शशिसाहेब एक नम्र विनंती
जरा कानात जीव आणून ऍका
नुसते भाव नाही
ह्याची देही स्वर्गानंद लाभेल

अम्हाला भिमसेनजींचा अतिषय आदर आहे
परत भिमसेनजीं वर लिहाल तर त्या प्रगल्भतेची जाणीव ठेवून लिहा

शंकरराव

शशिधर केळकर's picture

29 Jan 2009 - 5:51 pm | शशिधर केळकर

शंकरराव दादा!
लाख लिहिलंत!
खरेतर मीही गेली कित्येक वर्षे अण्णांचे गाणे ऐकतो आहे. मलाही शक्य तितका सर्व आदर त्यांच्याबद्दल आहे. अहो भाऊ सांगण्याचा मथितार्थ इतकाच, की संगीत या विषयावर मी अनभिज्ञ नाही.
कदाचित तुम्ही जो आनंद म्हणता तो मला 'सखि मंद...' मध्येही मिळाला म्हणून हे सर्व लिहिण्याचा खटाटोप केला!
असो. व्यक्ति तितक्या प्रकृती - तुम्हाला हे पटावेच असा माझा आग्रह नाही. तुम्ही अण्णांचे गाणे इतका आनंद घेऊन ऐकता - तुमच्याबद्दल ही तोच आदर व्यक्त करतो.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद आणि भावना दुखावल्याबद्दल क्षमस्व!

शंकरराव's picture

31 Jan 2009 - 4:24 am | शंकरराव

शशिसाहेब,
आपण अण्णांचे दर्दी रसिक आहात ह्याचा आणंद झाल व आम्हाला आपला आदर आहे.
आपल्या भावना पोहोचल्या,
धन्यवाद!

आपला अभिजित's picture

29 Jan 2009 - 10:57 pm | आपला अभिजित

भीमण्णांच्या आवाजात?
कधी? कुठे?
मला फक्त बाबूजींचे हे गीत माहित आहे. अधिक माहिती मिळेल??

शशिधर केळकर's picture

30 Jan 2009 - 12:17 am | शशिधर केळकर

श्री प्रमोद देव यानी यापूर्वी मिपावर एक धागा दिला होता. मी जिथे हे गाणे ऐकले आणि मग उतरवले होते ती ही जागा:

http://www.sendspace.com/file/ihrpms

धन्यवाद!

आनंद घारे's picture

30 Jan 2009 - 9:57 am | आनंद घारे

शास्त्रीय संगीताची स्तुती करतांना भावगीताला कमी लेखण्याची गरज नाही. शास्त्रीय, भावगीत, भजन, पोवाडा, लोकगीत, गझल, कव्वाली, इ.इ. प्रकारांची वेगवेगळी मजा आहे आणि त्यातील प्रत्येक प्रकारात कांही कलाकारांनी आभाळाइतकी उंची गाठलेली आहे. कांही श्रेष्ठ गायकांनी यामधील एकाहून अधिक प्रकारात कामगिरी केली आहे एवढेच.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/