राजगड ते रायगड मार्गे अग्याची नाळ.
- एक थरारक प्रवास.
खूप दिवसापासूनची इच्छा पूर्ण होणार होती, राजगड ते रायगड हा ट्रेक पूर्णत्वास जातोय. तारीख ठरली १-२-३ ऑक्टो. प्रचंड उत्सुकता होती उत्साह शिगेला पोहोचला होता. मानसिक शारीरक तयारीही झाली होती, फक्त राजगड ते रायगड बाकी होत.
ओंकार नायगांवकर या उस्मानाबाद च्या अवलियाच्या प्रयत्नातून खर तर हा योग जुळून आला होता. ३ महिने आधीच ग्रुप तयार झाला चिक्कार भरणा झाला, नियोजन झाले, राजगडच्या पायथ्याशी पाली गावात नाना धुमाळ देशमुख यांच्या घरी भेटण्याचे नक्की झाले. २३ उत्साही तरुण प्रत्यक्ष सहभागी झाले. यामध्ये मुंबईतून मी, रवि दादा, समीर शिर्के, पार्टे व अमित तर पुण्यातून राहुल बुलेबुले व सहकारी. उस्मानाबाद वरून ओंकार दादा, शैलेशदादा, रोहित आदी. तर कोल्हापूर वरून सुनील अडसुळे व सहकारी अशी विविध ठिकाणांवरून मांदियाळी जमली.
हां. . . तर आमचे (मुंबईकर्स) चे adveture पनवेल पासून च सुरु झालेले, १:३७ ला स्वारगेट ला उतरलो. ६:३० ची बस होती निवांत झोपायचं होत पण मच्छरानी त्यावर फेरले. मग स्वारगेट स्थानकात एका विक्रमाची नोंद केली. चक्क डेपोच्या आवारातच तंबू लावला व निवांत पहुडलो. पुणेकरांनी सह्याद्री पासून एवरेस्ट पर्यंत टेंट लावले असतील पण स्वारगेट स्थानकात ?कदाचित नासेलच...
१. स्थानकातील टेन्ट
असो.
दिवस पहिला-
सकाळी पुणेकर मंडळी आली, गाठीभेठी झाल्या, अत्यंत वेगात पाली गावात दाखल. नानांच्या घरी नाना व उस्मानाबादकर मंडळी वाट च पाहत होते. घमेलीभर पोहे हादडले, बाटल्या भरल्या, शिवगर्जनेने आसमंत दुमदुमला व राजमार्गाने २३ भटके मेणा दरवाज्याकडे चालते झाले. खंडोबाच्या माळावर ओळखपरेड पार पडली तसे ओंकारदादांनी नियोजित कार्यक्रम सांगितला, तो असा राजगड -अळू दरवाजा-बुधला-भट्टी - हरपुड- मोहरी-मुक्काम - सिंगापूर नाळ- पाने - मुक्काम - रायगड. या संमिश्र चमू चे नेतृत्व ओंकार दादांकडे असल्याने आम्ही निर्धास्त होतो. दादांच्या मदतीला कांचेश्वर हे एक अजब रसायन होतं. श्रावण संपलेला, राजगड चे सौदर्य आणखीनच खुलून होतं. यंदा कारव फुलाल्याने सोने पे सुहागा ! कारवीने सर्वत्र जांभळ्या रंगाची उधळण केलेलीच.सोबतीला सोनकी, रानहळद यांच्या पिवळ्या फुलांनी पिवळ दुलई पसरलेली.
२.कारवी फुललेली
बघता बघता पाली दरवाज्यातून पद्मावतीवर आलोही. पद्मावतीचे आशीर्वाद घेत संजीवनीकडे कूच केली, २.५ किमी ची संजीवनी माची दोन्ही बाजूनी चिलखती तटबंदीने बांधून घेतलेली. वास्तुशाश्त्राचा अजब नमुनाच!! तो पहावाच, शाब्दांत वर्णन कठीणच !आता उजवीकडे दूरवर तोरणा तिच्या लांबवर पसरलेल्या बुधला मचीसह आमची वाटच पाहत होता. डावीकडे दूरवर येसाजी कंक जलाशय सूर्यकिरणे परावर्तीत करत संथ पडला होता. संजीवनी उतरताना निसर्गाने कौल आमच्या बाजूने दिल्याने सर्वजण जम खुश. वातारण ढगाळ झाले, सरी बरसल्या, गारवा दाटून आला, धुक्यात परिसर गडप झाला. उन लागणार नाही यामुळे सार्वजन हरकून गेले.
३.संजीवनी उतरलो
संजीवनीचा सरळसोट कातळकडा मागे टाकून ती निसरडी वाट उतरून खिंडीत दाखल झालो. शिदोरी खोलली. भरपेट ताव मारला. १० एक पदार्थ तोंडाला लागले. आता पुढील चढाई राजगड तोरणा या मार्गावरील होती.
४.करावी तील वाट
नायगावकरांच्या नेतृत्वाखालील या चमूचा वेग पाहता ५ सदस्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत खिंडीतून पाली instead of रायगड असा बेत केला व तो तडीस नेलाही.
तर इकडे उरलेले आम्ही १७ जन धुक्यांत हरवलेल्या कारवी झाकलेली वाट व त्या वाटेवरील कराव फुलांचा सडा तुडवत कोंढाळकरवाडी गाठली.
५.स्वर्गातील वाट
६.बांबूच्या बेटात ग्रुप फोटो
सर्वत्र धुक्याचं साम्राज्य, बुधला माची कुठच्या कुठे अदृश्य, भट्टी गाव त्यापलीकडे. इथे एक आजोबा गुरे चारत असलेले दिसले, ओंकारदादा, रवीदादा, शैलेश दादा असे त्रिसद्स्सिय शिष्टमंडळ त्यांच्याकडे अचूक वाटेची माहिती घेण्यास गेले असता, पसली जवळ आहे असे बाबांकडूनऐकताच पूर्वनियोजित प्लान ३६० मध्ये वळवून परत आले. कारण पसलीतून अग्याच्या नाळी मार्गे रायगड जवळ पडेल व हा मार्ग दोघांनी आधी केलेलाही होता (पण डिसेंबर मध्ये)
झालं !! अग्याच्या नाळीची घोषणा झाली, उत्तरादाखल आम्ही "अपनेकू क्या बस रायगड पाहुचना है !!"असे सर्वानुमताने अनुमोदन दिले अन् प्रवास सुरु थरारक, उत्कंठावर्धक घटनाक्रमाने भरलेला. सिंगापूर नाळेने जाणारे रस्ते, भट्टी हे गाव बुधला माची पलीकडेच ठेवून आम्ही कोंढाळकर वाडीतून पसलीकडे चालते झालो. धुक्यातून वाट शोधत एक टेकडी उतरून, भातशेती तुडवत एक ओढा पार करून जोरकरवाडी रोड वर आलो. जरा आराम केला न भूकेने तोंड ऊघडला सुख खाऊ, चटपटीत, खुशखुशीत मालमसाला निघाला मजा केली ;) ;)
७.जोरकरवाडी रोड वर खाण्याचा प्रोग्राम झाला
इकडे पाऊस पडून गेलेला त्यामुळे वातावरण सुंदर होत. उजवीकडील डोंगर रांगेवरून फेसाळत असंख्य धबधबे कोसळत होते तर डावीकडील ओढा या सर्व धबधब्यांना कवेत घेऊन खळाळत चालला होता. अशा या मनमोहक परिसरात वसलेल्या बालवड गावात कधी आलो कळलच नाही. मग पुढे उजवे वळण घेऊन छोटासा घाट चढून शेनवड जवळ पोहोचलो, न पावसाने जोर वाढवला मग एका घराच्या ओसरीवरच आमची फौज थांबली. पावसाचा जोर अन् सर्वांचे क्षीण चेहरे पाहून मी त्या घरातून इथेच आजच्या मुक्कामाची परवानगी मिळवली. पण जेवणाची बोलणी करण्यास अपयशी ठरलो मग ती धुरा रवी दादांनी लीलया पेलली व १६:१ गुणोत्तर पास करून घेतले. (१६nonveg १veg )घर एकदम साधेच पण उत्तम बांधणीचे, बाहेर बाहेरील आडवी एकत्रित मोठी प्रशस्त, तिथेच आडवे झालो. बाहेर पावसाने संततधारेचे रुपांतर मुसळधारेत केलेलं. थांबण्याचा निर्णय योग्यच होता जो कि मुक्काम पसलीत होता. ९:०० ला जेवण तयार झाले आयत्या वेळी उपलब्ध काकुनी उत्तम स्वादिष्ट जेवण बनवलेलं, हीच गावाकडील खासियत असते. ५० भाकरी, टोपभर चिकेन व घमेलीभर भात रेकॉर्डब्रेक पद्धतीवर पोरांनी संपवला. सगळे पट्टीचे खादाडे निघाले :D
पावसाने उघडीप दिल्याचे औचित्य साधून बाहेर एक फेरफटका झाला, थंडीचा जोर वाढला तसे अंथरून जवळ केले. दिवसभराच्या पायपिटीने झोप अनावर झालेलीच. हमरस्त्यावरील त्या एकांड्या घरात रानातील शांतता व रातकिड्यांची किरर्र ऐकत निद्रिस्त झालेले शिलेदार आता संथपणे घोरण्याच्या स्पर्धेत उतरलेले, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले ते थेट ४:४० ला कोंबड्याच्या बांगेने लक्ष वेधून घेइपर्यन्त.
दिवस दुसरा
पहाट झाली गावातील लोकांची शेतावर जायची लगबग, वैरण पाणी सुरु झालं. आम्हीही सुरांत सूर मिसळत आन्हिक उरकले व तयार झालो. चहा-बिस्कीट झालं, पिशव्या पाठीवर लागल्या अन् सुरु झाला प्रवास अग्याच्या नाळीच्या दिशेने. आजचा पल्ला मोठा होता जागोजागी वाट शोधण्याचे आव्हान होते.
८.समीर शिर्के ने माझा काढलेला एक अप्रतिम फोटो. कॅनवासच.
पासलीकडे रवाना झालो बार्शीचा माळ मागे टाकून एक ओढा पार करून पसलीत आलो, ७:१५ झालेले. स्वच्छ वातावरण, सकाळच्या सोनेरी किरणांनी सृष्टी अगदी न्हाऊन निघालेली.गवतावरील दवबिंदू मोत्यांसारखे चमकत होते जणू एखद्या चित्रकाराने स्वप्नातला स्वर्ग कॅनवास वर उतरवलाय कि काय !!
९.पसलीकडे रवाना. डावीकडून- पार्टे, शिर्के, रवी शेडगे, योगेश आलेकरी`
थंडी अजूनही जाणवत होतीच. पसली गाव मागे टाकत शाळेजवळून उजवीकडे जाणाऱ्या शोर्टकट वाटेने पुन्हा हमरस्त्यावर आलो, ओढ्याला पाणी भरपूर. पूल पार करून पुन्हा उजवीकडे झाडीत जाणाऱ्या वाटेने समोरील डोंगरावर चढाई सुरु झाली हि वाट माथ्यावरील केळद-एक्कलगाव- सिंगापूर या रस्त्यावर घेऊन जाते.
१०.हिरवळ
आता केळद खिंड लांब उजवीकडे राहते व आम्ही पुन्हा हिरव्यागार डोंगरावर, जांभळ्या फुलांच्या कारवीच्या झालरीतून वाट काढत माथ्यावर पोहोचलो. ९:३० चा सुमार. आता सगळीकडेच मनमोहक दृश्यांची रेलचेल. पाठीमागे दूरवर राजगड उजवीकडे प्रचंड उंच असा प्रचंड उंच असा प्रचंड गड उर्फ तोरणा, तर डावीकडे खाली शेवते गाव व पुढे शेवत्या घाटाची रांग, त्यापुढे मढे घाट तर दक्षिणेकडे दूरवर महाबळेश्वर रांग ढगांतून, धुक्यांतून आपलं अस्तित्व दाखवत होती. हे अद्भुत नजरे डोळ्यांत साठवत असताच ११:३० ला एक्कलगाव खिंडीत हजर. अन् समोर दुर्गराज रायगडाच पाहिलं दर्शन झालं. _/\_
११.समोर ढगांना स्पर्श करणारा रायगड.तर उजवीकडून ३री घळ अग्याची नाळ
पोरं आनंदानं उड्या मारायला लागली, हरकून गेली, बहरून गेली, बागडून गेली. लक्ष्य नजरेच्या टप्प्यात आलं होतं, जर निवांत पण झाला नुकतच प्रसिद्ध पावलेल्या एका लोक गीतावर (शांताबाई )थोडीशी मज्जा मस्ती झाली.
१२.शांताबाई या लोकगीताची चित्रफित बघताना मान्यवर
१३.निवांतपणा
खान पान आवरला , पाणी भरलं. पावसाळ्या व्यतिरिक्त या मार्गावर फक्त इथेच पाणी असतं.
आता समोर खालच्या पठारापासूनची ३री घळ - अग्याची नाळ दिसत होती तर समोर रायगड, उत्साह संचारला.
निघालो ! २ वळणं घेत एका एकांड्या झाडाखाली थांबलो. आता काय ?? " शोर्टकट मारायचा आपण "इती- नायगावकर. कसा ? कुठं ? "इथतर वाट दिसेना-"
"तसच घुसायच" ऐकायला बरे वाटले तसं done हि झालं. !
१४.स्वताची वाट स्वतः शोधून चाललेले भटके
१५.समीर शिर्के गवतातून उतरताना
रस्त्याने सरळ सिंगापूर च्या दिशेने गेल्यावर डावीकडील उतारावर २-४ घरं दिसतात त्यामागुनच घळीला वळसा घालून पुढे येउन अग्याच्या नाळीच्या तोंडाशी येणारी कायदेशीर वाट बाजूला ठेऊन लवकर रायगड गाठण्याच्या आशेने या बेकायदेशीर मार्गावर पाय ठेवला अन् झाला एक भन्नाट प्रवास सुरु- इथली वाट म्हणजे वाट नव्हतीच मुळी. ओंकारदादाने दूरवर बोट करून एक टेकडी दाखवावी व सांगायचं तिथ जायचय. जिथून न जस सोप्पं पडेल तसं आपलं आपण जायचं.
हां हां म्हणता सर्वजण त्या उतारावरील झाडीत घुसली, झाडं-झुडपं, गवत, तण काटे -कुटे कशाची तमा नव्हती बस एक च ध्येय रायगड !! क्षणार्धात खालच्या पठारावर पोहचलो एकेकाचा मलिंगा झालेला.
१६.रायगडाकडे डोळे लाऊन बसलेले कार्यकर्ते
सर्व एकत्र जमलो व पुन्हा अशीच एक विस्कळीत घुसखोरी करत खाली भात शेतीत उतरलो, चिखलगाळ तुडवीत ओढ्यात आलो, बुट्ट धुवून काढली न लगेच पुढच्या घुसखोरीस सज्ज! पुन्हा तसाच.
१७.
एक टेकडी पार झाली आता शेवटची घळ पार केली कि अग्याच्या नाळीतच ! या शेवटच्या ओढ्यातील शेती फारच सुंदर होती पण.
१८.
आता असाच सर्वजण वरच्या दिशेने घुसलो ते थेट नाळीच्या काठावरच अवतरलो, आता पंचायत झाली समोर तुटलेला कडा, डावीकडे खोल दरी तर नाळीत उतरायची जागा म्हणजेच तोंड उजवीकडेच खूप वरती राहिलेलं . मग काय पुन्हा घुसखोरी अक्षरश: गव्यांचे कळप पिकांत घुसावे तसे. यासाठी उर्जा ? ती म्हणाल तर दुर्गराज रायगड !! एक च उत्तर !
१९.नाळेच्या काठावर पोहोचलो , समोर तुटलेला कडा
करवंदी, कारवी, झाडे-झुडुपे, गवतात सार्वजन विखुरले गेले. लांब वरतून कोणीतरी आवाज दिला, वाट सदृश काहीतरी मिळाल होतं. युरेका !युरेका ! ओरडतच पोहोचलो. पार थकून गेलेलो, सर्वजण एकत्र झालो, हलकंच खाणं झालं. (हाच काय तो सुखच क्षण ) अन् शिवगर्जना करत घाटावरून कोकणात उतरायला लागलो. हर हर महादेव च्या आरोळीने दऱ्या-खोऱ्या दणाणून गेल्या, वृक्षवल्ली शहारली, जीवसृष्टीत उत्साह संचारला!
२० नाळेत उतरताना
आता नाळ म्हणजे काय ? तर दोन कड्यांच्या मधून उतरता येईल अशी निमुळती जागा, बहुतांशी ती पाण्याच्या प्रवाहाची असते. आपल्याकडे बहुतांशी नाळी या घाटावरून कोकणात उतरतात. पैकी हि एक.
तर अशी हि रौद्रभीषण अग्याची नाळ उतरायला लागलो तेच एक एक आव्हानं पेलत. पावसामुळे सर्वच निसरडे झालेले, त्यात उतरायची वाट झाडाझुडुपात गडप झालेली. त्यामुळे अगदी जनावराप्रमाणे मुसंडी मारणे एकच पर्याय! ओरबाडत, सरपडत, सरकत, वाकून, रांगत जमेल तसे प्रयत्न करत एक एक जन अर्ध्या तासात ते झाडा झुडूपानी वेढलेले तोंड संपवून कारवीत आले,इथ जरासा आराम मिळाला पण पाऊस सुरु झाला आणि खरचटलेल्या जखम टोचू लगल्या पण थोड्याच वेळात त्या बधीर होणार होत्या व झाल्याही. पुढे मोठ मोठी दगड धोंडे पार करत मध्यावर पोहचलो. जरा फोटोग्राफी ला उसंत मिळाली.
२१.ब्लॉग लेखकाची एक स्वतंत्र छबी
दोन्ही बाजूला सरळसोट कातळ, खाली भयाण खोली, व त्यामध्ये वीरा नदीचे खोरे. घनदाट जंगल, रोंरावत कोसळणारे धबधबे , वरून आभाळ दाटलेलं, पाऊस वाढण्याची शक्यता लक्षात घेत गती वाढवली. २ तासांच्या अविश्रांत कष्टाने नाळ उतरलो खरं तर ४ लाच शेवटच्या टप्प्यात उंचच उंच वृक्षानि वेढलेला परिसर भायाणतेची जाणीव करून देत होता. शेवटचा अवघड टप्पा पार करून थेट एका धबधब्या समोरच आलो. वर झालेल्या पावसामुळे पाणी वाढलं, धबधबा जोमाने कोसळू लागला होता. त्यामुळे तयार झालेल्या डोहात १:३० तास येथेच्छ बागडलो, अगदी मनसोक्त!!
२२.
एक चित्रफीत --->
एक चित्रफीत --->
(इथून पुढे सर्व कॅमेरे बंद करून ठेवल्याने फोटो दुष्काळ जाणवेल )
नाळ उतरल्याच सेलेब्रेशन कोणी जलपरी होऊन तर कोणी २ कवचाच कासव दाखून तर कोणी आदिमानव होऊन केले. :D कंटाळलो !!घड्याळात पाहिलं ५:३० होऊन गेलेले. २ तास बाकी आहेत असा शैलेशचा आश्वाशक आवाज आला. म्हणजेच ७:३० ला गावात जाऊन झोपायचं, किती सुंदर कल्पना. आता हि धबधब्याची नदी आमची सोबती होती. दोन्ही बाजूला उंचच डोंगर घनदाट वृक्षांनी वेढलेले तर खाली दगड धोंड्यांची शेवाळलेली, वेगवान पाण्याच्या खळखळाटाची नदी, मज्जा वाटत होती. दे दणादण करत २० च मिनिटात एका रौद्रभीषण ठिकाणावर आलो. नदीचे तोंड निमुळते झाले दोन्ही बाजूला घनदाट झाडी अन समोर प्रलयकारी वाटावं असा एक धबधबा ६०/७० फुट खोल कोसळत होता पुढे इंच भर देखील सरकायला संधी नाही. पाऊस सुरु झाला, निसर्ग विरोधात गेल्याची पहिली सूचना. वेळ जात होता ६ वाजले. मार्ग सुचेना धो धो पावसाने वाढत्या पाण्याने कड्याच्या बाजूने जाणारी निसरडी वाटही बंद झालेली, शैलेशने उजवीकडे वरती जाणारी वाट शोधली थोड समांतर चालत गेल्यावर ५०-६० फुटांवर तीही संपली. आता त्या धबधाब्याचे भयंकर रूप समोरून दिसू लागले. त्याची दाहकता आता भासू लागली कारण आता आम्ही त्याच्या बाजूच्या कड्यावर आलो होतो. आम्ही असाच पुढ पुढं सरकत होतो दिशाहीन. कंचेश्वर दादा पुढे सरकले गवत झाडे झुडुपे यातून वाट पाह्यला न एक ५/६ फुटाचा हरणटोळ साप त्यांच्या हातात. दादा धावत मागे! आता मात्र एकेकाचा संयम सुटू लागला. नीट सिंगापूर नाळेने चाललो होतो ते इकडे येउन अडकलो अशीही काही वाक्ये निघाली.
आम्ही पुरते अडकलो होतोच मार्ग निघणे कठीण झालेले. वरून पाऊस, खाली चिखल, नदीतून जावे तर तोही आता बंद, बाजूने जंगलात घुसलो एका बाजूला कोसळणाऱ्या धबधब्याच्या कडा तर एकीकडे जंगल. घुसखोरी एकच उपाय !
आता मात्र परिस्थीति हाताबाहेर जात होत होती, बाग ठेऊन अनुभवाच्या जोरावर वाट काढावी असाही मनात आलं पण म्हंटल बघू जरा वेळ कोणी पुढाकार घेतय का. नाहीतर आहोतच आम्ही ;) असही त्राण उरलं नव्हतं अन् ब्याग चिखलात ठेवायची इच्छा नव्हती. आणि आता मागून नायगावकर पुढे आले ब्याग टाकून घुसले कुठेतरी अगदी जनावरासारखे कडा कड, धडाधड आवाज करत काटे कुटे मोडत पलीकडील एका झऱ्यात उतरले तो झरा खाली नदीत घेऊन जाणारच मग आवाज दिला एका मागमाग एक निघालो . आजूबाजूची कारवी पकडून ठेवायची पुढचा गेला कि सोडायची कि,सर सट्याक आपण त्याच्या जागी, मागचा आपल्या जागी,अगदीआपोआप . अशी त्या उतारावर लटकलेली रंग दिसू लागली. घसरगुंडीचा आनंद अगदी फ्री मध्ये मिळाला होता. बघता बघता सार्वजन लोळत, रांगत, सरपडत या नाळेतील शेवटच्या टप्प्यावर आले , रॉक प्याच पिंपळाच्या मुळीच्या सहाय्याने उतरलो.
रक्ताच व मातीचे नातं काय असतं व ते कसे जुळतं हे पुरेपूर सोदाहरण उमगले होते.
नदीत आलो, मागे तो रुद्रावतार कोसळतच होता त्याला वाकुल्या दाखवत जिंकल्याच्या अविर्भावात पुन्हा जल्लोष झाला . ७ वाजलेले अंधार दाटलेला. आता २ च तासात गावात, किती सुंदर कल्पना. फक्तअर्धा तास लेट. dosn't matter . अंधार पडला टोर्च निघाले, किती ? ६ अन् माणसे १७ . अजून एक संकट. तोडगा निघाला १:३. नदी नुसत्या दगड गोट्यांनी भरलेली, शेवाळलेली, बुळबुळीत झालेली पाय ठेवताच प्रसाद. एक एक पाऊल जिकिरीने न सांभाळून टाकाव लागत होतं. पावला-पावलावर आधाराची गरज नाहीतर ? डुबुक! :D साखळी करूनच पुढे सरकत होतो. कुठे उथळ तर कुठे खोल तर कुठ मोठ मोठ्ल्या शीळा. कोकणातील खट्याळ, वेगवान नद्यांत तग धरणे लईच मुश्कील झालेले, पण पर्याय नव्हता.
८ वाजले चालतोयच. अजूनही बाजूनी डोंगर दिसत होते, पावसाच तर काही सोयारसुतकच राहिलं नव्हतं. खरचटलेल्या जखमा बधिर झालेल्या. बस आज दापोली न उद्या रायगड एवढच दिसत होतं. ९ वाजले गावाचा आता पता नाही, अजूनही नदीतच, दूर दूर वर लाईट etc चा नामोनिशाण नाही. आत्ता मात्र कहर झाला होता तब्बल २तास पाण्यातील चाल अक्षरश: काहीजण ब्यागेसह पाण्यात पडली, बुडाली, पुन्हा उठून चालू पडायचं. एक शब्द नाही तोंडातून . सांगतो कोणाला ? ऐकतो कोण ? सावंच दुखणं सारखाचं . !!!
कंचेश्वर दादा,मी व रवि दादा वाट शोधायला मोठ्या torch घेऊन पुढे होतोच. काठीने पाणीच्या खोलीचा अंदाज घ्यायचा डोह पार करायचा. कधी गुडघ्या एवढे तर कमरेएवढे तर कधी छाती एवढे पाणी रात्रीच्या अंधारात ब्याग डोक्यावर घेऊन ते पार करणे म्हणजे एक दिव्यच. ! पायाखाली निसरडे दगड गोटे, काटे कुठे, वाहून आलेली फांद्या असलं काहीही आम्हाला रोखू शकत नव्हतं. कधी नदीच्या उजवीकडून तर कधी डावीकडून मार्ग मिळे, नदी क्रॉस करणे आले की , मानवी साखळी करूनच पार करायची ट्रेकिंग हे टीम वर्क कसे असते सर्वाना एव्हाना ज्ञात झाले होते. पात्र अरुंदच पण वेगवान प्रवाह, दगड गोटे यामुळे जिकीरीचे झालेले.
आणखी एक चित्रफीत -->
आणखी एक चित्रफीत -->
१० वाजले ! अजूनही नदीतच. शारीरिक क्षमतेवर हि मर्यादा होत्या, वेग मंदावला. सार्वजन आता अर्धमेले झालेलेच, पायाची बोटे फाटलेल्या बुटातून बाहेर येउन विचारू लागली- " अरे बाबा अजुन किती ?" मागच्यांसाठी थांबावं तर झोप लागायची. इथे आम्ही जाऊन जरा बसलो व एक वीडेवो केला तो पाहिल्यावर जाणवेलच आपणास गांभीर्य.
११ वाजले अजूनही नदीतच. "२ तासात गावात जाऊन झोपायचं किती सुंदर कल्पना" आता हे आठवलं कि रडूच कोसळायच ;) :। एक दोन (यात मी धरून )सोडले तर सर्वांनीच डुबकी मारलेली कपडे अंथरून वगैरे भिजलेलं त्यामुळे पाठीवरचं ओझं वाढलेलेच. सोसतोय ते कमी होतं म्हणून हि वाढ :( :(कोणी मटकी आणली असती ना तर सकाळी नाश्त्याला मोडेच ! :p :p
१२:३० झाले. एक बैठक झाली काहीजणांनी इथेच झोपण्याचा मांडला पण पाणी कधीही वाढू शकते म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव हा रद्द ठरवला, नाहीतर जाग यायची अन् आपला रिवर राफ्टींग चालू असायच :D :p
कितीही खलबतं केली, कितीही चर्चा केली तरी उत्तर एकाच नीघायचं- बेमुदत चालणे. बस !!!
त्राण संपलेलेच जवळजवळ, पण रायगड व शिवरायांचा एक जयघोष झाला आणि सारेच पल्लवित झाले, नव्या जोमाने चाल झाली इतक्यात राहुल खराडेच्या BSNL वर gps मिळाले थोडंच बाकी होत आता, शेवटी बंधारा आला,त्यांनतर डावीकडे, मग सरळ आणि तो क्षण आला आम्ही गावात दाखल. . . बरोब्बर १:३३ ला मोरे काकांच्या दारावर थाप टाकली. आनंदाला पारावर उरला नाही, दर खोललं, आणि बघता बघता पोरं आडवी झाली बुटासहित- ब्यागांसाहित.
१० एक मिनिटांनी सुद्धीवर येत एकेकाने आपापला सेट अप लावला :D काकांनी भात आमटी करायला घेतले. गरमा गरम भात व बटाट्याची आमटी असा डिनर आमचा पहाटे ४:०० ला पार पडला. तडतीने झोपण्यात आले. ७ ला उठलो, अवरले ,शिवरायांच्या मूर्तीजवळ एक छायाचित्र घेतले आणि दापोली गाव सोडला.
दिवस तिसरा-
२३.दापोली गावातील शिवरायांच्या मूर्तीसोबत समुह्चित्र
२४.दापोली सोडून रायगडाकडे रवाना
. वाकण डोह, लोखंडी पूल पार करून वाघेरीत आलो मध्येच इथ शिदोरी सोडली भरपूर खाल्ला अगदी तुपातलं.
२५.वाकण डोह वरील पूल
२६.
. . !! आता वाघेरीतून वरांगी-छत्री-रायगड वाडी असा नियोजित प्रवासाला पुन्हा एकदा फाटा देऊन एक शोर्ट कट घेतला, रायगडाच्या दिशेने टकमकाच्या खालून जाणाऱ्या पायवाटेकडे. पुन्हा संकट छातीएवढ्या वाढलेल्या गवतात वाट हरवली. कंचेश्वरदादांनी प्रचंड शोधाशोध केली पण निष्फळ. आता मात्र गटबाजी झाली, दोन मतप्रवाह झाले पण लगेचच एक मत होऊन मागे फिरणार तोच एक धनगर दत्त म्हणून उभा. त्याला योग्य मानधन देताच तो रायगडवाडीपर्यंत यायला तयार झाला. निघालो. धनगरवाडा आला,रायगड प्रदिक्षिनेचा मार्ग लागला.
२७..धनगरवाडा . टेकला कि हि अवस्था असायची सर्वांची
मग जाणते चेकाळले, रायगड टप्प्यात आला. समोर उंच असे टकमक टोक, तर मागे डावीकडे लिंगाणा.
थोडे पुढे जाताच महादरवाजाच दर्शन झाले, आनंदी आनंदी झाला.
२८.महादरवाजा दिसला आणि हीच ती हावर स्याक जीन खूप सोसलाय माझ्यासोबतच
एक समाधी लागली अधिकृतरित्या ती कोणाची सागता येत नाही. तिथ जर आराम झाला, बोलता बोलता त्या धनगर युवकाने एक धक्का दिला- त्याचे वय २९-३० व त्याला ११ अपत्ये पैकी पहिल्या मुलीला मुलगी झाल्याने हा युवक आता आजोबा झालेला. आजही दुर्गम भागात हे वास्तव आहे.
२९.
असो प्रवास पुढे- रायगड वाडी आली ,रत्यावर बसलो अन पुन्हा शिदोरी सोडली, इंधन आहे तर इंजिन आहे, खाल्ली, गड चढलो, खास भेटण्यासाठी व स्वागतासाठी पुण्यावरून आलेली मंडळी भेटली. समाधान पावलो. सार्वजन राजसदरेवर नतमस्तक झाले, फक्त रायगडाच्या उर्जेने एक महाभयंकर प्रवास करून राजगडावरून रायगडावर दाखल झालेलो.
३०.शेवटी रायगडाशी नतमस्तक
लिहण्यासारख बरंच आहे पण लेखन सीमा. राहुल बुलबुले व काहींनी गडावरच राहण्याचे ठरविले तर आम्ही उतरणीला लागलो. १० ला जेऊन अहद स्थानकात आलो तर गाड्या फुल, जाम वैतागलो. चौकशी केली सकाळी ५ ला महाड मधून सुटणारी एष्टी होती, मग की विक्रमाची नोंद, महाड स्थानकात २ तंबू लागले. ४:४५ ला उठून गाशा गुंडाळला आणि गाडीकडे धावलो. बाल्कनी (मागची लांब सीट) सोडता सर्व गाडी आरक्षित, कोकणातील लोकांना आरक्षण करून प्रवासाची भारी हौस . यष्टीच्या त्या मागच्या सीट वर आम्ही ४ जन मी, रवि दादा, सम्या ,अमित यष्टीरक्षकाच्या (विकेटकीपर ) भूमिकेत आपसूकच गेलो कारण चालक लागला तेज तर्रार गोलंदाज. पनवेल गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे आमचे उडालेले बोउन्सर्स एकमेकांचे खांदे पकडून विकेट मागे रोखत होतो नशीब मागची खिडकी बंद होती नाहीतर फुटबॉल म्याच होऊन एक दोन गोल नक्कीच झाले असते :D असो तब्बल ४:३० तासानंतर दादर आले, झोपेचे मनसुबे पार उधळले गेलेले. यंत्रमानावासारखे चालत घरी आलो आणि एकदाचे हे महाभयंकर कथानक संपलं.
जय भटकंती जय सह्याद्री _/\_ _/\_
समाप्त:
प्रतिक्रिया
22 Jun 2016 - 12:04 pm | स्पा
__/\__
22 Jun 2016 - 12:08 pm | महासंग्राम
अर्रर्रर्रर्र ऑफिस मुले हा ट्रेक हुकला होता, आता पुन्हा इनो घ्यावे लागणार. जखमेवर मीठ लावलात योगेशराव. बाकी कट्टर भन्नाट आणि दिलदार माणूस.
25 Jul 2016 - 9:16 pm | योगेश आलेकरी
मीठ कसले हो .. आता हुकला तर तेवढ जळणं आलाच ;)
22 Jun 2016 - 12:14 pm | किसन शिंदे
निव्वळ अप्रतिम !! दंडवत स्विकारा मालक.
25 Jul 2016 - 9:25 pm | योगेश आलेकरी
धन्यवाद दादा दंडवत नको , तुमचं वाचून शिकलोय तुम्हीच स्वीकारा _/\_
22 Jun 2016 - 12:24 pm | प्रचेतस
अचाट साहस केलंत. फोटोही खूप छान.
22 Jun 2016 - 2:25 pm | प्रभास
हेच् म्नतो.....
25 Jul 2016 - 9:27 pm | योगेश आलेकरी
धन्यवाद दादा
22 Jun 2016 - 12:58 pm | प्रमोद देर्देकर
+१ अचाट साहस आणि तुमचे लिखाण ही खुप आवडलं.
25 Jul 2016 - 9:27 pm | योगेश आलेकरी
धन्यवाद दादा :)
22 Jun 2016 - 1:04 pm | राजा मनाचा
आम्हाला तर ईनो पण नको, असली मुलुखगिरी आमच्याने होणे नाही, वर्णन वाचूनच आम्ही क्रुत्क्रुत्य झालो.
25 Jul 2016 - 9:28 pm | योगेश आलेकरी
धन्यवाद दादा :)
22 Jun 2016 - 1:12 pm | कंजूस
अफाट;;!!!
25 Jul 2016 - 9:28 pm | योगेश आलेकरी
धन्यवाद दादा :)
22 Jun 2016 - 1:37 pm | टवाळ कार्टा
बेक्कार साहस...पण दोर्या आणि बाकी संरक्षक वस्तू बरोबर नसताना नदी/झर्याच्या घळी उतरणे आणि ते सुध्धा पावसात याला बेजबाबदारपणासुध्धा म्हणावा का?
22 Jun 2016 - 2:46 pm | जगप्रवासी
तुम्ही अफाट धाडस केलात आणि त्यात यशस्वी झालात मान्य पण जर चुकून काही बरे वाईट झाले असते तर. मदत तरी करायला कोणी पोचले असते का? नेहमीची वाट सोडून शॉर्टकट मारणे हे ट्रेकर कधीच करत नाही. एव्हढा ट्रेक करायला जाताना सोबत बॅटरी नेत नाही, १५ जणांपैकी फक्त ६ जणांकडे बॅटरी??? एक विनंती आहे पुढच्या वेळेला जाताना संरक्षक साहित्य सोबत न्या.
22 Jun 2016 - 3:21 pm | स्वच्छंदी_मनोज
वाचून आश्चर्य वाटले. कोंढाळकर वाडीत आयत्यावेळी ठरवलेत आग्याने जायचे आणी तेही धुवांधार पावसात? ते सुद्धा तुमच्या १७ जणात फक्त दोघे पुर्वी जाऊन आलेले आणी तेसुद्धा हिवाळ्यात? ह्या भागात आग्या, फडताड, जननी, अश्या एकसोएक भयानक दर्या आहेत त्या तुम्ही पावसाळ्यात उतरलात? ह्या इतर ऋतूतपण उतरायला दहादा विचार करावा लागतो.
तुम्ही सुखरूप परत आलात हे त्या निसर्गदेवाचीच कृपा समजा अन्यथा काही वेडेवाकडे घडले असते तर?
तुमच्या जिद्दीला सलाम पण अंधार पडल्यावर पण फक्त सहा टॉर्चवर रात्रभर उतरत राहीलात तेही माहीती नसलेल्या रस्त्यावर हे म्हणजे अतीच आहे.
मला खात्री आहे की तुम्ही झालेल्या चुका पुढच्या ट्रेकला लक्षात ठेवाल.
पुढच्या ट्रेकला शुभेच्छा.
23 Jun 2016 - 4:13 am | यशोधरा
धाडस केलेत आणि यशस्वीपणे पार पडले, हे उत्तमच पण स्व_म ह्यांच्याशी सहमत. ट्रेक करताना इतक्या बेजबाबदारपणे करू नये, असे वाटते.
फोटो चांगले आहेत मात्र शेवटच्या फोटोमधली प्लास्टिकची बाटली डोळ्यांना खुपते आहे. तुमची नव्हती ना? उचलली आणि योग्य ठिकाणी टाकली का? तसे केले असल्यास खूप कौतुक.
23 Jun 2016 - 9:36 am | नाखु
वरील तिन्ही प्रतिसादांशी सहमत.
काळजी+खबरदारी घेऊन साहस करा...
पुलेशु
25 Jul 2016 - 9:52 pm | योगेश आलेकरी
धन्यवाद :)
आम्ही जाता जाता लागेल तो कचरा ब्यागेत भरून नेतो, बाटली पण सुटली नाही ती :)
23 Jun 2016 - 10:55 am | अनिरुद्ध.वैद्य
हे धाडस बेतले असते तर कठीण झाले असते.
25 Jul 2016 - 9:53 pm | योगेश आलेकरी
सह्मत
रात्र जंगलात काढावी लागली असती
25 Jul 2016 - 10:27 pm | योगेश आलेकरी
तुमचे म्हणणे बरोबर आहे पण अपवाद या शब्दाला जागून काही जणांनी टॉर्च आणला नाही तर काहींचा पाण्यात भिजून निकामी झाला. मग उरले ६. आणि आम्ही पावसाळ्यत नव्हतो तर ऑक्टो. मध्ये गेलो होतो व परतीचा अनिश्चितेचा पाऊस होता तो, त्यावर कोणत्याही साधनांचा उतारा नव्हता. तर राहिला विषय अग्याच्या नालीचा तर हि मोहीमच साहसी असल्याने सिंगापूर पेक्षा साहसाला इकडे वाव असल्याने सार्वमताने तो निर्णय झालेला. :) विषय जीवघेणा नक्कीच नव्हता फक्त अनियोजित रात्र अवघड परिस्थितीत काढावी लागली असती हा.
माझं मत. (पटेल न पटेलहि कदाचित ) :)
25 Jul 2016 - 9:50 pm | योगेश आलेकरी
धन्यवाद :)
त्याची गरज असताना न घेता उतरणे याला बेजाबदार पणा म्हणावा ;)
या वाटेवर त्याची गरज नव्हती कुठे, साधनांअभावी आम्ही कुठं अडकलो किंवा खोळंबून राहिलो असं कुठं झालं नाही. पाऊस वाढला गती कमी झाली यावर कोणतसुरक्षेचे साधन कमी आलं असतं असं मला नाही वाटत. प्राजंळ मत :)
22 Jun 2016 - 1:51 pm | अजया
_/\_
22 Jun 2016 - 2:46 pm | सूड
__/\__
असं काही आमच्या ग्रूपमध्ये झालं तर काय काय प्रतिक्रिया असत्या ते विचार करत होतो वाचता वाचता.
22 Jun 2016 - 5:07 pm | नया है वह
_/\_
22 Jun 2016 - 5:13 pm | अनुप ढेरे
मस्तं!
22 Jun 2016 - 8:42 pm | विखि
काही वर्षापुर्वी केलेला़ कळ्सुबाई - रतन्गड- कात्राबाई- हरिशचन्द्रगड आठवला.
25 Jul 2016 - 9:30 pm | योगेश आलेकरी
लेखनतुन् येउद्य .आवाडेल वाचायलं
22 Jun 2016 - 9:28 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
धन्यवाद ,ईनो घेतल्या गेले आहे
23 Jun 2016 - 12:18 am | डॉ सुहास म्हात्रे
अचाट साहस !!!
पण पुढच्या वेळी सुरक्षेची पूर्ण तयारी करूनच असे धाडसी ट्रेक करावेत असे वाटते.
25 Jul 2016 - 9:45 pm | योगेश आलेकरी
धन्यवाद :)
पण सुरक्षेच्या साधनांअभावी अडकलो किंवा त्यासाठी खोळंबा झाला असा कुठेही अनुभव आला नाही, मुळात या ट्रेक ला सुरक्षेची साधनांची आवश्यक भासणार नाही असाच रूट आहे हा :)
23 Jun 2016 - 8:07 am | नरेंद्र गोळे
ती राजगडाहून रायगडाची वाट
ती रानवाट, ते घाट, जिगर भन्नाट
मनसोक्त बागडे छंद, धुंद सैराट
जगलात जिणे ते, दाविल भावी पहाट
25 Jul 2016 - 9:31 pm | योगेश आलेकरी
ओळी अगदी चपखल बसतायत
धन्यवाद
23 Jun 2016 - 10:16 am | मालोजीराव
ट्रेक भन्नाट झाला, पण आगाशी नाळ चुकीचा निर्णय होता असं मला वाटतं....रायगडला पायर्यांजवळ भेटला तेव्हा ओंकार,केतन,रवी एकदम संकटातून सुटल्यासारखे भेटले ;)
25 Jul 2016 - 9:33 pm | योगेश आलेकरी
चुकिचा असेल पन अम्हि नंतर बरोबर ठरवला आम्ही ;)
23 Jun 2016 - 10:40 am | धनंजय माने
अरे काय जीव वर आलाय काय पोरानो???
सांभाळून काय ते करा की! दुर्घटना माझ्या बाबतीत होणार नाही हे गृहीतक फार चुकीचं असतं आणि ते चुकीचं सिद्ध होइस्तोवर लैच उशीर होतो तेव्हा सावधपणा ठेवून काय ते करा.
लेख वाचताना आता तरी वाटेला लागले का असा सतरांदा प्रश्न पडला. जास्त लोक होते म्हणून 'निभावलं' आहे. असो!
25 Jul 2016 - 9:42 pm | योगेश आलेकरी
काही चुका झाली त्यातून शिकायलाही मिळालं खूप.
23 Jun 2016 - 4:53 pm | प्रीत-मोहर
__/\__
24 Jun 2016 - 1:53 pm | नि३सोलपुरकर
___/\___.
24 Jun 2016 - 3:41 pm | देवेन भोसले
मस्त अप्रतिम
25 Jul 2016 - 9:41 pm | योगेश आलेकरी
__/\__
24 Jun 2016 - 3:42 pm | देवेन भोसले
शेवटचा फोटो +११११११
25 Jul 2016 - 9:41 pm | योगेश आलेकरी
__/\__
24 Jun 2016 - 6:30 pm | राजेंद्र मेहेंदळे
पायाचे तुकडे पडेपर्यंत प्रवास केलात की..पण रायगड गाठलात शेवटी...
वर अनेक जण म्ह्णाल्याप्रमाणे योग्य खबरदारी आणि साहित्य सोबत घेउनच ट्रेक करा.अशा पावसा पाण्यात कुठे फसलात किंवा काही दुर्घटना घडली तर मदत मिळायलाही कठीण होईल.
26 Jun 2016 - 11:00 pm | चाणक्य
+१
25 Jul 2016 - 9:40 pm | योगेश आलेकरी
रायगड गाठणे हेच ध्येय होत :)
सहमत.,
25 Jun 2016 - 3:03 am | खटपट्या
लेख आवडला. पुन्हा असे धाडस करु नका. अनुभवी वाटाड्यांना बरोबर घ्या. तयारीत जा.
आपल्या घरी आपल्यावर प्रेम करणारी, आपल्यावर अवलंबून असणारी माणसे असतात.
25 Jul 2016 - 9:39 pm | योगेश आलेकरी
धन्यवाद :)
धाडसी मोहीम होतीच हि. वाटाड्या म्हणाल तर दोघांनी केला होता ट्रेक, वाट चुकलो असं कुठं झालं नव्हत :) कधी कधी असे अनुभव होतात पण हा जीवघेणा नव्हता पण त्रासदायक होता नक्कीच
27 Jun 2016 - 7:58 pm | बाबा पाटील
पण अशी वेडी धाडस करताना,घरी कोणीतरी वाट पहात असत याच भान ठेवा . शिवबाने याच वेड्या हिमतीवर हे राज्य उभे केले पण तुमच्यावर वेगळ धाडस करण्याची वेळ आहे ,हे नव्हे. हकनाहक,किंवा विनाकारण जीव धोक्यात नका घालवु. ___/\__
25 Jul 2016 - 9:36 pm | योगेश आलेकरी
असं नाही काही. सर्व धोके विचारात घेऊन च हि साहसी मोहीम आखली होती. पाऊस जास्त झाला व काही लोक तयारीत नव्हते म्हणून जरासा त्रास झाला :) बाकी खबरदारी घेऊच पुढे शिकायलाही मिळालं