दीड वर्षांपूर्वी जर्मनीत आल्यापासूनच आल्प्सच्या पर्वतरांगा मला खुणावत होत्या; मात्र तेथे जाण्याचा योग काही येत नव्हता. अखेरिस २०१५ च्या ऑगस्ट महिन्यात एका कार्यशाळेच्या निमित्ताने आल्प्सच्या कुशीत वसलेल्या 'ब्रिक्सेन' (Brixen) नामक शहरास भेट देण्याची संधी मला मिळली आणि आल्प्समध्ये भटकंती करण्याची माझी इच्छा पूर्ण झाली.
सर्वप्रथम आल्प्सचा आणि ब्रिक्सेनचा थोडक्यात परिचय: आल्प्स ही पर्वतरांग युरोपात फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, इटली, स्लोव्हिनिया आणि लिश्टेनश्टाईन इ देशांमध्ये पसरली असून तिचा टिरोल (Tirol) ह्या प्रांतातील भाग (जो 'टिरोलिअन आल्प्स' या नावाने ओळखला जातो) हा नयनरम्य निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
Süd Tirol मधील 'डोलोमाइट्स' म्हणजे चुनखडिचे डोंगर (छायाचित्र आंतरजालावरुन साभार)
टिरोल प्रांताचा बहुतांश भाग हा ऑस्ट्रियात आहे तर दक्षिण भाग (Süd Tirol) इटलीमध्ये आहे. ब्रिक्सेन हे Süd Tirol मधील एक शहर. हे शहर इटलीमध्ये जरी असले तरीही येथील दोन-तृतीयांश लोकांची पहिली भाषा हि जर्मन आहे. पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रियाने हा प्रांत इटलीला गमाविला. नंतर मुसोलिनीने ह्या प्रांताचे 'इटालियनायझेशन' करायचा पुरेपूर प्रयत्न केला उदा. ब्रिक्सेनचे ब्रेस्सानोने (Bressanone) असे नामांतरण करण्यात आले. त्यामुळे आज हे शहर ह्या दोन्ही नावांनी ओळखले जाते आणि आज इथे ऑस्ट्रियन आणि इटालियन अशा दोन्ही संस्कृतींचा सुंदर मिलाफ पहावयास मिळतो.
३० ऑगस्ट च्या संध्याकाळी म्युनिक रेल्वे स्थानकावरून निघालेली आमची युरोसिटी एक्स्प्रेस आल्प्सच्या डोंगररांगातून वाट काढत आणि स्थापत्य-अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना असलेले पूल व बोगदे पार करत सुमारे ४ तासानंतर ब्रिक्सेन ला पोचली. ब्रिक्सेनमध्ये प्रवेश करताच चहुबाजूंना असलेल्या हिरव्यागार डोंगररांगा पाहून मन प्रसन्न झाले. पुढचे ५ दिवस कार्यशाळा होती मात्र सभोवतालचा निसर्ग सारखा खुणावत होता.
शेवटच्या दिवशी आमच्यातील काही जणांनी भटकंतीचा बेत आखला. जवळच एका डोंगरावर अंदाजे २००० मी. उंचीवर 'प्लोस' नावाचे स्कि-रिसोर्ट आहे. तिथे जाण्यासाठी रोप-वे ची सुविधा आहे. तिथून अनेक हायकिंग ट्रेल्स निघतात. त्यातील एक त्या डोंगराच्या माथ्यावर (अंदाजे २५०० मी. उंच) जातो. आम्ही त्या ट्रेलने डोंगराचा माथा सर करायचे ठरविले.
आमचा ६ जणांचा फुल्ल इंटरनॅशनल ग्रुप होता - इंडियन, जर्मन, इराणियन, फिनिश, मोरोक्कन आणि पोलिश ! सर्वांच्या आवडीनुसार एका पिझ्झेरिया मध्ये पोटोबा उरकून दुपारी २ च्या सुमारास आम्ही रोप-वेच्या पायथ्याशी पोहोचलो. बाय द वे, इकडे आणि आपल्याकडे मिळणाऱ्या पिझ्झात बराच फरक असतो. असो, वातावरण मस्त होते. उकाडा नाही, पाऊस नाही, नजर जाईल तिथे हिरवी-गर्द सुचिपर्णी वनराई. रोप-वे तून वर जात असताना अनेक धाडसी सायकलपटू सायकलीने डोंगर चढताना दिसत होते. त्यावरून इकडे माउंटन बायकिंग किती प्रचलित आहे याची कल्पना येत होती.
रोप-वेने २० मिनिटांत आम्ही २००० मी. उंचीवर पोहोचलो. आता वातावरणात चांगला गारवा होता. समोरच हायकिंग ट्रेल्सचा दिशादर्शक फलक दिसला. त्याच्या आधारे आम्ही लगेचच डोंगरमाथ्याकडे कूच केली.
साधारण ५०० मी. चढायचे होते. सह्याद्रितल्या भटकंतीची सवय असल्याने चढण मला तशी सोपी वाटली मात्र आमच्यातील काही जणांना ट्रेकिंगचा आजिबात अनुभव नसल्याने थांबत-थांबत, गप्पा-टप्पा करत, सभोवतालच्या निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घेत आम्ही चढत होतो. जसजसे वर जाऊ लागलो, तसतसे सृष्टीतले बदल जाणवू लागले. पाईन वृक्षांची जागा आता पिवळसर गवताळ कुरणांनी घेतली होती, त्यात घोडे, मेंढरं निवांत चरत होती. आणखी वर गेलो तसा ब्रिक्सेन खोऱ्याचा विस्तीर्ण प्रदेश दिसू लागला.
सुमारे १ तासाच्या पायपिटीनंतर आम्ही माथ्यावर पोहोचलो तेव्हा दाट धुक्याने आमचे स्वागत केले. जोडिला झोंबणारा वाराही होता. माथ्यावर एक छोटेसे कॅफे होते आणि त्याच्या बाजूलाच सभोवतालचा परिसर पाहण्यासाठी एक पॉईंट होता. त्या पॉईंटपाशी कोणत्या दिशेला कोणती पर्वतशिखरे दिसतात ह्याची तपशीलवार माहिती दिली होती. तिथून पहिल्या चित्रात दाखविलेले डोलोमाइट्स पण पाहता येतात. दुर्दैवाने ढगांच्या आच्छादनामुळे आम्हाला काहीच पाहता आले नाही. मात्र माथा सर केल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर होते. आमच्यातील काही जण आयुष्यात प्रथमच एवढ्या उंचीवर आले असल्याने जरा जास्तच खूष होते.
संध्याकाळचे आता ५ वाजले होते आणि थंडीदेखील वाढली होती. शेवटी कॅफेमधील 'हाइसे शोकोलाडे' (Hot Chocolate) चा आस्वाद घेऊन आम्ही परतीच्या वाटेने उतरायला सुरुवात केली. वेगळ्या लोकांसोबत आणि वेगळया भौगोलिक प्रदेशात केलेली ही भटकंती माझ्या मनात कायमची कोरली गेली आहे.
(मिपावरील लिखाणाचा हा माझा पहिलाच प्रयत्न असल्याने चांगल्या / वाईट प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहे.)
प्रतिक्रिया
17 Jun 2016 - 8:01 pm | कंजूस
पहिला प्रयत्न असला तरी छान थोडक्यात आणि मोजकेच सुंदर फोटो.आवडलंय.
17 Jun 2016 - 8:15 pm | मिहीर शेठ
धन्यवाद!
17 Jun 2016 - 8:04 pm | सूड
धाग्याचं फेसबूक न केल्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन. सुंदर फोटो, लिहीत राहा.
17 Jun 2016 - 8:15 pm | मिहीर शेठ
धन्यवाद!
17 Jun 2016 - 8:37 pm | सूड
नवीन आहात म्हणून छोटीशी टिप, सगळ्याचं आभार प्रदर्शन एका प्रतिसादात करावं, म्हणजे आपले कष्ट वाचतात आणि सदस्यांचे प्रतिसाद=आपले प्रतिसाद असं होत नाही.
अर्थात तुम्ही काय करावं हा तुमचा प्रश्न आहे, तरीही.
17 Jun 2016 - 8:21 pm | सत्याचे प्रयोग
हे सगळं सिनेमातच पाहायलय हो लय हेवा वाटतो
17 Jun 2016 - 8:24 pm | सुबोध खरे
फारच जळजळ झाली आहे
यांची "कार्यशाळा" 'ब्रिक्सेन' सारख्या शहरात होते
आणि आमची मुंबईतच कुठेतरी रेनेसां सारखी आणि पाहायला काय तर पवई तलाव. तो सुद्धा स्वखर्चाने.
बाकी फोटो फारच सुंदर आहेत.
18 Jun 2016 - 6:59 pm | टवाळ कार्टा
+१११
17 Jun 2016 - 8:34 pm | चौकटराजा
माझा भाऊ १९९३ मधे स्वीसला थोडाफार प्रवास करून आला. त्याला विचारले होते स्वीस कसे आहे . त्यावर तो उत्तरला होता
स्वीस म्हणजे देवाने बांधलेला निसर्गसुंदर किल्ला. आपले फोटो. खास करून पाहिला फोटो पहाता त्याने केलेले वर्णन किती
सहज होते याचा प्रत्यय येतो. आपले सर्व फोटो मस्त आलेयत.
17 Jun 2016 - 9:32 pm | मिहीर शेठ
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
17 Jun 2016 - 10:16 pm | नूतन सावंत
मिपावर स्वागत.
माहितीपूर्ण रोचक लेख आणि सुरेख,समर्पक प्रकाशचित्रे.
17 Jun 2016 - 11:35 pm | पद्मावति
मस्तं!
17 Jun 2016 - 11:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुस्वागतम् !
थोडक्यात पण छान लिहिले आहे. फोटो अप्रतिम ! आल्प्सची चक्कर मारली आणि त्याच्या प्रेमात पडला नाही असा माणूस सापडणार नाही !
18 Jun 2016 - 5:11 am | मिहिर
मिसळपाववर स्वागत मिहीर! लेख आणि फोटो दोन्ही आवडले.
18 Jun 2016 - 4:52 pm | मिहीर शेठ
धन्यवाद!'मिहिर'मधला 'हि' र्हस्व असतो का? मी आजपर्यंत दीर्घ लिहित आलेलो आहे.
18 Jun 2016 - 11:48 am | मृत्युन्जय
फोटो बघुन फारच जळजळ झाली आहे. अप्रतिम शहर आहे. अश्या शांत ठिकाणी २ -३ महिने निवांतपणे राहता आले आणि निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता आला तर पुढची ४ -५ वर्षे त्या आठवणीत आनंदात व्यतीत करु शकतो.
18 Jun 2016 - 1:12 pm | जगप्रवासी
वाह सुंदर निसर्ग टिपलात, मिहिर शेठ
18 Jun 2016 - 1:45 pm | सुजल
मस्त :)
18 Jun 2016 - 7:43 pm | आतिवास
प्रकाशचित्रं पाहून डोळे निवले.
19 Jun 2016 - 1:18 am | यशोधरा
पहिला आणि डोंगरमाथ्याचे फोटो आवडले.
19 Jun 2016 - 10:51 am | पियुशा
अशक्य सुन्दर फोटो :)
19 Jun 2016 - 4:47 pm | अभिजीत अवलिया
मस्त फोटो ...