सांधण दरी--जिथे एअरटेलचे नेटवर्क गंडते

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in भटकंती
1 Jun 2016 - 12:19 am

फ़ेब्रुवारी मध्ये एक-दोन जोरदार ट्रेक कम भ्रमंती पार पडल्या आणि हळूहळू उन्हाळा तापू लागला .बेडूक जसे भूमिगत होऊन पावसाळा सुरु होण्याची वाट बघत निद्रीस्तावस्थेत जातात तद्वतच आम्हीसुद्धा आता जुलै पर्यंत घरातच पडी मारून बसायचे नक्की केले.पावसाळ्यात भ्रमंतीची जोरदार सुरुवात एक दिवसीय पन्हाळ-विशाल ट्रेकने होणार त्यामुळे या छोट्या ब्रेकचे फारसे दु:ख होत नव्हते. पण स्वस्थपणे घरात बसून राहतील तर ती कसली ट्रेकर मंडळी ? चर्चा तर होणारच...आणि ग्रुपमध्ये चर्चा सुरु झाली सांधण दरी ट्रेकची. एकीकडे वाढता उन्हाळा , पाण्याची टंचाई, जीवाची काहिली आणि दुसरीकडे वेगवेगळ्या ब्लॉग्सवर लिहिलेली सांधण दरीची माहिती सांगत होती की हा ट्रेक फक्त नोव्हेंबर ते मे महिन्यातच करता येतो. कारण ही पाण्याची घाटावरून कोकणात उतरणारी वाट आहे आणि इतर वेळी म्हणजे पावसाळ्याचे ४ महिने आणि नंतरचे काही महिने हा मार्ग बंद होतो.

आता नोव्हेंबरपर्यंत थांबायचे म्हणजे फारच झाले. एव्हढे लांबचे प्लानिंग कोण करत बसणार ? असे म्हणत म्हणत शेवटी मे महिन्यातच हा ट्रेक करायचे ठरले. सह्याद्रीतील एव्हढा जबरी ट्रेक ठरला आणि आपण गेलो नाही म्हणजे केव्हढा अपमान ? आणि परत असा ग्रुप जमेल कि नाही? आपल्याला सुट्टी मिळेल का ? वगैरे विचारांती एक-दोन,तीन करत करत ५० जण जमले.त्यातले अर्धे पुणेकर आणि अर्धे कल्याण,डोंबिवली, ठाणेकर . सगळ्यांनी एकत्र भेटायची जागा ठरली कल्याण स्टेशन.पण ५० जण कल्याण हून इगतपुरीपर्यंत कसे जाणार ?कसारा लोकल पकडून जायचे आणि वाटाड्याने कसाऱ्याला ४ -५ जीप पाठवायच्या असे सुरुवातीला ठरले.पण एकूण खर्चाचा विचार करता आणि लहान मुले आणि बायकांची संख्या लक्षात घेता सरळ कल्याण ते इगतपुरी आणि पुढे साम्रद पर्यंत खासगी बसने जाणे हाच पर्याय निवडला गेला.तीच बस तिसर्या दिवशी आम्हाला आसनगाव जवळ डेहणे गावी घ्यायला येणार होती आणि कल्याण ला पोचवणार होती. चला..वाहतुकीचा प्रश्न तर सुटला.दुसरा प्रश्न होता पुणेकरांच्या जेवणाचा. बाकी लोक घरूनच जेवून येणार होते.पण पुणेकर सायंकाळीच इंद्रायणीने निघणार होते. आमच्या ट्रेक लीडर्सनी तोही प्रश्न सोडविला. २० जणांसाठी चक्क पोळी भाजीची व्यवस्था करून त्यांनी आम्हाला सुखद धक्काच दिला. अशा तर्‍हेने एक एक गोष्ट मार्गी लागत होती आणि ग्रुपवर त्याचे अपडेट्स येत होते.ट्रेकला काय आणावे ,काय आणू नये याचेही तपशील येत होते. युद्धाची तयारी सुरु झाली कि घोडी जशी फुरफुरू लागतात तसे वातावरण तयार होत गेले आणि तो दिवस उजाडला.

संध्याकाळच्या इंद्रायणीने निघून पुणेकर मंडळी कल्याणला पावती झाली आणि स्टेशन बाहेरच कल्याणकरांनी त्यांचे जंगी स्वागत केले.बस येईपर्यंत भेटीगाठी ,नमस्कार चमत्कार ,जुन्या ट्रेक्सची उजळणी यांना उत आला.यथावकाश बस आली आणि वाटेत नमस्कार मंडळापाशी थांबून बाकीच्या लोकांना घेऊन निघाली.माझ्या मनात एकदम जुन्या आठवणी जाग्या झाल्या.आमच्या शाळेची पहिली ते चौथी किवा नंतरची सुद्धा ट्रीपची सुरुवात येथूनच होत असे. ट्रीपला जाणारी दोनशेक मुले, त्यांचे तेव्हढेच पालक,१०-१५ शिक्षक आणि २-३ एस.टी. महामंडळाचे गणवेशधारी लोक, असा लवाजमा कलकलाट करत उभा असे. शेवटी "बालक मंदीर बालक मंदीर मराठी विद्यालय, आम्ही सारे विद्यार्थी चढू हिमालय " अशा घोषणेने आसमंत दुमदुमून टाकत बसेस निघत असत.

विचार करता करता बस कधी लाल चौकी ओलांडून पुढे आली समजलेच नाही. गांधारीजवळ खाडी ओलांडून मधली छोटी छोटी गावे पार करत बस नाशिक हायवेला लागली.बसमध्ये शांताबाई, झिन्गाट आणि तत्सम गाण्यांवर मंडळींनी जोरदार ताल धरला होता.तासादोन तासातच बस घोटीजवळ टोल नाक्याला आली आणि पुढे उजवीकडे वळण घेउन घोटी रस्त्याला लागली सुद्धा.आता गाणी जरा थांबवून कार्यकर्ते बसच्या केबिनमध्ये आले आणि रस्त्यावरच्या पाट्या , ब्लॉग्सवर वाचलेली माहिती आणि गुगल मॅप यांच्या सहाय्याने ड्रायव्हरला मार्गदर्शन करू लागले.गर्द अंधारात उजवीकडे कळसुबाई शिखरावरील दिवा दिसत होता. पावसाळी ढगांमुळे वातावरणात थंडावा पसरू लागला होता. एक दोन ठिकाणी चुकत माकत अखेर रात्री ३ च्या सुमारास बस साम्रदला पोचली. गावातील १-२ कुत्री भुंकत स्वागताला पुढे आली आणि पाठोपाठ आमचा वाटाड्या आलाच तोंड भरून हसून स्वागत करत .ओळखीच्या मंडळींना नावाने हाकारत सर्वांनी एक एक करून सॅक उतरवल्या आणि काळोखात ठेचकाळत अर्धवट झोपेत सर्वजण त्याच्या घराकडे चालू लागले.

पोचल्यावर काही जणांनी त्याच्या घरात तर काहींनी घरासमोर स्वच्छ सारवलेल्या अंगणात पथार्‍या टाकल्या . वारा सुसाट वाहत होता. आणि माझ्याकडे पांघरूण नव्हते. त्यामुळे मी मात्र ईतर काही जणांबरोबर गावातल्या मारुती मंदिरात झोपणे पसंत केले. अर्थात झोप काय २-३ तासांचीच होती.
a
६ वाजता उठायची हाक आली आणि सगळेजण पुढच्या चालीचा विचार करून पटापट उठले.आवरून होईस्तोवर चहा नाश्ता तयार झाला आणि खाणे पिणे उरकल्यावर लगेच सामान बांधाबांधीला सुरुवात झाली.साडेसात वाजताच्या सुमारास सगळेजण तयार झाले आणि वाटाड्याच्या मागोमाग चालू लागले.वातावरण जरासे पावसाळी वाटत होते. समोरच्या डोंगरावर ढग ओठंगलेले दिसत होते.
b
एकीकडे फोटोग्राफर मंडळींची वेगवेगळी दृश्ये टिपण्याची लगबग चालू होती तर बच्चे कंपनीची सगळ्यात पुढे राहण्याची धडपड
c
d
गावाबाहेर पडताच काही अंतरावर झाडीत शिरणारी एक वाट खुणावत होती.तीच सांधण दरीची सुरुवात.
e

पण झाडीत अजून एक गम्मत आमची वाट पाहत होती.करवंदे...लगेच होशी मंडळींनी काटे किती लागतायत याची पर्वा न करता करवंदे खाऊन तोंड चिकट करून घेतले.
f
थोडे पुढे गेल्यावर वाट अजून खाली उतरली आणि एक मोकळवन आले.ट्रेकच्या नियमाप्रमाणे निघताना मोजणी झाली नसल्याने इथे सगळेजण थांबले आणि नावे पुकारून मोजणी झाली.कोणी मागे राहिले नसल्याची खात्री झाल्यावर पुन्हा चालायला सुरुवात झाली.
g
हळूहळू ट्रेकची काठीण्य पातळी वाढत होती.छोटे छोटे दगड धोंडे मागे पडून आता मोठ मोठ्या शिळा आमच्या स्वागताला सज्ज होत्या.काही ठिकाणी तर एकमेकांना हात देऊन किंवा सेक पहिले पुढे पास करून मग उतरायला लागत होते.आश्चर्य म्हणजे इथेही लहान मुलेच सगळ्यांच्या आधी पुढे चालत होती."किस चक्की का आटा खाते हो भाई?" असे त्यांना विचारावेसे वाटले.
h
जसेजसे पुढे चाललो होतो तसे तसे सांधण दरीचे नवे नवे विभ्रम उलगडत होते. दोन्ही बाजवानी शे-दीडशे फुट उंच ताशीव कडे मनाला मोहवीत होते.
j
मधून जाणारी हि पाण्याने कापून तयार केलेली वाट, कुठे २०-२५ फुट तर कुठे अवघी १० फुट रुंद होती. वाटेत पडलेले अजस्त्र धोंडे किती हजार किंवा लाख वर्षांपूर्वी तिथे पडले असतील,किती उन्हाळे पावसाळे त्यांनी झेलले असतील कुणास ठावे.किती पावसाचे पाणी इथुन वाहून गेले असेल.
k
किती गिरीजनांच्या पिढ्या त्या पाण्यावर जगल्या वाढल्या असतील ह्या आणि अशा अनेक विचारांनी मला आपले शहरी खुजेपण मनात उठून दिसत होते.
i
l
अंतर्मुख होत हळूहळू वाट चालू लागलो. पावसाळ्यात हा ट्रेक करणे का जमत नसेल ते आत्ता कळू लागले होते. या अशा बेचक्यात पाण्याच्या लोंढ्या ची सामना करत काय हा ट्रेक करणार कप्पाळ ? शीर्षकात उल्लेख केल्याप्रमाणे सर्वच मोबाईलची नेटवर्क आता बंद पडली होती. त्यातल्या त्यात एअर टेलची जाहिरात ईथे घेतली आहे म्हणुन त्यावर बरेच जोक झाले.
m
११ वाजत आले होते,पण अजून उन्हाचा ताप जाणवत नव्हता.दोन्ही बाजुंनी असलेले कडे सावली पुरवत होते.वेग थोडा मंदावला होता आणि एकूण टीमचे ३-४ ग्रुप पडले होते.मात्र वाटाड्याने पुढे जाऊन आपले पहिले लक्ष्य गाठले होते. ते लक्ष्य होते ५० फुटी रॉक पॅच . हा पॅच रॅपलिंग तंत्राने उतरायचा होता.त्याप्रमाणे त्याने रोप वगैरे लावून तयारी करून ठेवली.
n
एक एक जण जसा जसा येऊ लागला तसा त्याला उतरवण्याचे काम सुरु झाले. पण आमच्यातील काही जणांची मानसिक तयारी व्हायला वेळ लागत होता तर काही जण आयुष्यात प्रथमच असे काही साहस करत होते. एकुण आम्हाला २-३ तास हा पॅच पार करायला लागले आणि त्यामुळे आमचे वेळेचे गणित कोलमडले. आता उनही चढले होते आणि उतारांची तीव्रता जास्त जाणवत होती.काही ठिकाणी रोप लावण्या सारखी गरज नव्हती पण तरी ही ते पॅच चांगलेच खडतर वाटले.एक दोन ठिकाणी तर मोठ्या शिळा एकमेकांवर पडून त्यांच्या खालून भुयारातून पुढे जायचा मार्ग होता.थोडक्यात अनेक थ्रिलिंग अनुभव एकाच दिवशी घ्यायचे असतील तर ह्या ट्रेक ला पर्याय नाही.
o
p
३ च्या सुमारास दुसरा रॉकपॅच आला पण हा काही तेव्हढा कठीण नव्हता.एक रोप लावून त्याच्या सहाय्याने मंडळी एक एक करून उतरली.वाटेत एका ठिकाण पाण्याचा झरासुद्धा मिळाल्याने मस्त तहान भागली आणि मोठीच सोय झाली.
lk
लवकरच तिसरा पॅच आला आणि इथेही गाठी मारलेल्या रोपच्या सहाय्याने लोक खाली उतरले.
lp
आता मात्र भूक आणि तहाने मुले सर्वजण व्याकुळ झाले होते. त्यातच आदल्या दिवशीचे झालेले जागरण त्रास देत होते. अजुन एक टप्पा पार केला आणि अचानक खालून आम्हाला घ्यायला आलेले एक मामा दिसले. त्यांना बघून आमचा आनंद गगनात मावेना.आमच्या वाटाड्या ने त्याची एक तुकडी खाली कँपवर ठेवली होती.त्यांचे काम होते आम्ही पोचल्यावर आम्हाला जेवण देणे.आणि त्यासाठी ते लोक बिचारे सकाळपासून मुक्कामाच्या ठिकाणी येउन बसले होते.
अर्थात आता आम्हाला तासभरच चालायचे होते. आणि तसेच झाले.थकले भागलेले जीव अजून एक तास भर पाय ओढत का होईना चालले आणि शेवटी कँपच्या ठिकाणी पोचलो.
gh
कँपसाईटवर पोचलो आणि एक वेगळाच नजारा स्वागताला उभा राहिला.पुढे वाहणारा पाण्याचा झरा आणि नंतर त्याचा झालेला डोह, समोर उंच कातळ, पाठीमागे डोकवणारा रतनगड आणि खुटा, एका बाजुला बाण सुळका असा सुंदर माहोल संध्याकाळाच्या सोनेरी उन्हात चमकत होता.जवळ जवळ ११ तासांची रपेट झाली होती.पाणी आणि बरोबर घेतलेला कोरडा खाऊ या भांडवलावर सगळे जण चालले होते. काही ठिकाणी कसोटीचे क्षणही आले होते पण आमचे वाटाडे आणि बरोबरचे खंदे कार्यकर्ते यांच्या जीवावर ते पारही पडले होते. मात्र सह्याद्री मधील एक अप्रतिम ट्रेक पदरात पडला होता. आणि त्यामुळेच दिवसभर केलेल्या मेहनतीचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते.
=======================================================
समारोप- रात्रभराचा उघड्यावरचा जंगलातला मुक्काम, भन्नाट वारा , चंद्रप्रकाशातील जेवण, किरकिरणारे रातकीडे, गाण्याची जमलेली मैफल, आणि दुसर्‍या दिवशी सकाळी उठुन परत डेहणे गावापर्यंत केलेली वाटचाल, वाटेत पाडलेल्या कैर्‍या, करवंदे,भाजुन काढणारे उन आणि शेवटी दिसलेली आमची बस हे एक पुर्ण स्वतंत्र प्रकरण आहे. ते असे झटकन उरकुन लिहिणे योग्य नाही.त्याबद्दल पुन्हा कधीतरी...

टिप- सर्व छायाचित्रे माझा मित्र श्री.प्रवीण पाटील याच्या सौजन्याने.

प्रतिक्रिया

छान झाली आहे भटकंती.फोटोही मस्त.खालचे गाव कोणते?

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Jun 2016 - 3:56 pm | राजेंद्र मेहेंदळे

खालचे गाव डेहणे...आजोबा किंवा अजा पर्वताला जायला सुद्धा ईथुनच रस्ता आहे.
तिथुन जवळचे मोठे गाव शहापुर. किंवा स्टेशन म्ह्णाल तर आसनगाव.

कपिलमुनी's picture

1 Jun 2016 - 2:32 am | कपिलमुनी

५० जणांचा ग्रुप ट्रेक ??
याक् !!

लिखाण आणि फोटो दोन्ही आवडले. हा ट्रेक लिस्ट्वर आहे पण रॅपलिंग कधी केले नाहीये, तेव्हा जरा धाकधूक आहे.
बाकी ५० जणांचा ग्रूप यशस्वी रीत्या मॅनेज करणे हे एक मोठेच काम अहे!

प्रचेतस's picture

1 Jun 2016 - 6:59 am | प्रचेतस

सांधण दरी पूर्ण उतरली नाही तरी चालते. त्या रॉकप्याचपर्यंत जाऊन आलात तरी खूप काही पदरात पडल्यासारखे असते. आणि हो त्या कड्यांच्या वरच्या बाजूने शेवटपर्यंत चालत जाउन सांधणचे मुख बघणे अविस्मरणीय.

यशोधरा's picture

1 Jun 2016 - 7:13 am | यशोधरा

अच्छा. करायला हवे एकदा. धन्यवाद!

रॅपलिंग अगदी सोपा प्रकार.
जराही ताकद लावावी लागत नाही.
फक्त भीती सोडून द्यायची आणि सांगितलेल्या सूचनांप्रमाणे वागायचं. बस्स.
मात्र रॅपलिंग करवणारा क्रु भरवशाचा हवा.

यशोधरा's picture

1 Jun 2016 - 10:01 am | यशोधरा

हो करायचे आहे एकदा.

सतिश गावडे's picture

1 Jun 2016 - 7:16 am | सतिश गावडे

पाणी नसताना गेला होता का तुम्ही?

नाखु's picture

1 Jun 2016 - 9:23 am | नाखु

अता तुम्हीच घ्या मनावर (पाणी नसताना जाऊ यात).
म्हणजे पिल्लांना नेता येईल.

अन्यथा आम्हा खोंडांना कोण नेणार अश्या ठिकाणी ????

राजेंद्र महोदय, किमान वय असलेले बालक किती वर्षाचे होते (म्हणजे काठीण्यपातळी कळेल)

कृपाभेलाषी नाखु

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Jun 2016 - 3:53 pm | राजेंद्र मेहेंदळे

सर्वात लहान मुलगा ६ वर्षे वयाचा, मग ८,११ आणि अजुन एक १२ अशी वये होती. सर्वात मोठे बहुतेक ५५ वर्षे असेल.
पण मुले रोज धावत खेळत असल्याने जास्त काटक असतात आणि सहज ट्रेक करु शकतात असे मी अनुभवाने सांगतो. मोठी माणसेच कधी कधी धीर सोडतात आणि एखाद्या रॉकपॅच वर अडुन बसतात.

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Jun 2016 - 3:55 pm | राजेंद्र मेहेंदळे

२० मे च्या सुमारास गेलो होतो. पाणी एक दोन ठिकाणीच होते. ते ही जेमतेम पाउलभर असेल.

प्रसाद गोडबोले's picture

1 Jun 2016 - 4:05 pm | प्रसाद गोडबोले


पाणी नसताना गेला होता का तुम्ही?

खरं आहे ! सांदण दरीला पाणी नसतानाच जावे , मागे आम्ही सांदण ट्रेकला गेलो होतो तेव्हा जवळपास छातीपर्यंत (आमच्याच हो) पाणी होते ... त्यातुन एक कलाकार तेवढ्या पाण्यातुन जाताना व्होडोयो घेत होता , तेव्हा दुसरा एक कलाकार पलीकडचा टोकाला पोहचुन भिजलेली चड्डी काढताना चित्रित झाल्याने सदर व्हिडोयो जालावरही टाकता येत नाहीये ... ह्ही ह्ही ह्ही

=))))

स्पा's picture

1 Jun 2016 - 4:48 pm | स्पा

=))

हकु's picture

1 Jun 2016 - 9:51 am | हकु

मस्तच जमलाय लेख!
नेमका आणि आटोपशीर.
बस बघून मलाही बालक मंदिरची ट्रीप आठवली होती. अगदी सेम फिलिंग.
बाकी फोटोज बद्दल मी पामर काय बोलणार …! _/\_

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Jun 2016 - 3:58 pm | राजेंद्र मेहेंदळे

फोटोज नेहमीप्रमाणेच आपल्या गुरुजींनी काढलेले ढापलेत. :)

स्पा's picture

1 Jun 2016 - 10:18 am | स्पा

छान भटकंती

गावडे , प्रगो, ५०, वप्या किसन्स, वल्लेश सारख्या दिग्गज लोकांबरोबर सदर ट्रेक केल्याने अजुन मज्जा आली होती, पाणी लय थंड असते ब्वाॅ

एक नंबर! आणखी फोटो मिळतील का?

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Jun 2016 - 3:48 pm | राजेंद्र मेहेंदळे
बापू नारू's picture

1 Jun 2016 - 10:59 am | बापू नारू

मस्त भटकंती केलीत , तिथल्या वाटाड्याचा नंबर मिळेल काय?

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Jun 2016 - 3:47 pm | राजेंद्र मेहेंदळे

व्य.नि. करतो

विअर्ड विक्स's picture

1 Jun 2016 - 11:20 am | विअर्ड विक्स

मस्त भटकंती …. पाण्यातून कुठे चालावे नाही लागले का ? का इथे पण दुष्काळाची झळ ???

अवांतर - सध्या गुरूग्राम ला मुक्काम आहे , तरी १२ जुलै जमवायचा विचार आहे !!!!

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Jun 2016 - 3:46 pm | राजेंद्र मेहेंदळे

आणि हो...या वर्षी ८-९ जुलै आहे बर का...साटम सरांना फोन करा.

जगप्रवासी's picture

1 Jun 2016 - 2:36 pm | जगप्रवासी

खूप छान झालेला दिसतोय ट्रेक. बघू आम्हाला कधी करायला जमतोय ते, हॉट लिस्टवर आहे हा ट्रेक.

ते वाटाड्या, साम्रदचे संपर्क क्रमांक मिळतील का भौ?

बाकी वृत्तांत, ट्रेक फोटो सगळं अव्वल आहे. अप्रतिम अफाट अस्सल

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Jun 2016 - 3:44 pm | राजेंद्र मेहेंदळे

वाटाड्याचा नंबर व्य.नि. करतो. आमचा कमा आणि कमळुच होते.

नाखु's picture

1 Jun 2016 - 4:21 pm | नाखु

व्यनी करणे...

ही विनंती