भरतपूर : पक्षांचा स्वर्ग दरबार

हृषिकेश पांडकर's picture
हृषिकेश पांडकर in भटकंती
31 May 2016 - 10:17 am

फार पहाटही नव्हती सकाळची साडे आठ पाऊणे नऊची वेळ.शेवटचा डबा प्लॅटफॉर्मला टेकला आणि गाडी स्तब्ध झाली.इतकावेळ दारात ठेवलेले सामान खाली ठेवले.उघडे अवयव गारठतील एवढी थंडी नक्कीच होती.धुक्यामुळे स्टेशनची पाटी धुसर दिसत होती.फलाटावर पाय ठेवला आणि गाडीने स्टेशन सोडले.

राजस्थानात असलेले 'ब्रज' प्रदेशातील शहर 'भरतपूर'.स्टेशन मधून बाहेर येताना घोंगडी,स्वेटर इत्यादी वस्त्र लपेटून सोडायला किव्वा घ्यायला आलेली मंडळी,झोपलेले भिकारी,आमच्यासारखे उतरलेले किवा काही चढणारे प्रवासी,४/५ स्टेशन झाडणारे सफाई कर्मचारी,द्रोणामध्ये वडापाव विकणारे २/३ छोटे ठेलेवाले आणि प्रवाशांना इष्ट स्थळी पोहोचवण्यासाठी स्पर्धा करणारे रिक्षा आणि टॅक्सीवाले असा तो प्रथमदर्शनी नजारा.

स्टेशन वरून बाहेर आलो आणि गाडीत बसलो.धुक्याच्या पडद्यामुळे सूर्यदर्शन अजून व्हायचे होते.ठरल्याप्रमाणे हॉटेलवर सामान टाकून जंगलात जायचे होते.तीन तास रेल्वे उशिरा पोहोचल्याने सकाळचे दोन तास वायाच गेले होते आणि त्यात धुकं पांघरल्याने जंगलात काय पाहणार किव्वा काय दिसणार या आशेला सुरुंग लागला होता.पावसाला चुकवून नोव्हेंबर निवडला आणि धुक्याने घात केला असे मन खात असतानाच उन्हाची तिरीप चेहेर्यावर आली आणि उत्साहाचा कायापालट झाला.इतक्यावेळ संथ चालणारे भरतपूर उन्ह पसरल्यावर वेगळेच दिसू लागले.मी हॉटेलवर पोहोचलो आणि आवरून जंगलाकडे निघालो.सकाळचे दहा वाजत आले असावेत जेमतेम.

Bharatpur

जंगल म्हणलं कि जिप्सी या समीकरणाचे गुलाम आम्ही...यंदा मात्र त्यात खंड पडला.राजस्थानातील पारंपारिक वाहन असलेली सायकल रिक्षा घेऊन आम्ही जंगलाकडे निघालो.एव्हाना उन वर आले होते पण थंडी कमी व्हायचे नाव घेत नव्हती.आग्रा-बिकानेर महामार्गावरून कधी सायकल रिक्षातून जाईन याची कल्पना सुद्धा केली नव्हती.दहा मिनिटांच्या अंतरानंतर 'केवलादेव नॅशनल पार्क' असे लिहिलेले मोठे प्रवेशद्वार डाव्या हाताला दिसले.भारतातील नावाजलेल्या राखीव जंगलापैकी पक्षांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य म्हणजे 'केवलादेव नॅशनल पार्क'.

सायकलवरून सफारी या कल्पनेनीच मी प्रचंड उत्साहित होतो.नवीन जंगल,फिरण्याची नवीन पद्धत आणि नवीन पक्षी बघायची संधी या तीनही गोष्टींनी माझ्यावर भुरळ घातली होती.डोळ्यांनी काय पहिले हे लिहिता येऊ शकते पण प्रत्यक्ष असण्याचा अनुभव निराळाच.सोपस्कार पार पडून गेट मधून आत गेलो.नाकासमोर जाणारा एकमेव रस्ता.दुर्तफा असलेले जंगल,मधूनच दिसणारी दलदलयुक्त तळी.धुक्याने उघडीप दिल्याने घसरलेली उन्हे आणि त्या कोवळ्या उन्हात सुरु झालेली पक्षांची हालचाल यांच्या साक्षीने आम्ही सायकलला पाय मारला.( 'पाय मारणे' हा शब्दप्रयोग 'लाथ मारणे' असा नसून शब्दशः 'पाय मारणे' असाच आहे.मुद्दाम नमूद करायचा हेतू असा कि 'हात मारणे','तोंड मारणे', किव्वा 'डोळा मारणे' यासारखा तो वेगळ्या अर्थी वापरलेला प्रयोग नाही.)

वेळेच बंधन नव्हतं.आपण चालवू तो वेग,आपण थांबू तो विसावा.आपण पाहू ती फ्रेम,रस्त्यावर उतरण्याची मुभा,कॅमेर्याच्या तोफा घेऊन हिंडणारे परदेशी फोटोग्राफर,काही तुरळक सायकल रिक्षातून सफारी करणारे लोक,झाडांच्या छताखालून जाणारा एकमेव रस्ता आणि पक्षांच्या आवाजाखेरीज कुठलाही नसलेला आवाज.विलक्षण अनुभूती...

थंडीची चाहूल लागल्याने उत्तरेकडील पक्षी स्थलांतर करून खाली सरकतात.अशा पक्षांची रेलचेल पहायला मिळत होती.मध्य भारत आणि दक्षिणेकडील पक्षांमध्ये रंगाचा बदल असल्याने वेगळेपण जपलेले पक्षी देखील पहावयास मिळाले.दुतर्फा तलाव असल्याने पाण्यावरचे पक्षी बरेच दिसत होते.त्यांच्या राहण्याच्या जागा हालचालींची पद्धत,मासा टिपण्याच्या क्लुप्त्या आणि उन्हात वाळत घातल्यासारखे पंख उघडून बसण्याची पद्धत या गोष्टी डोळ्या इतक्याच कॅमेर्यालाही सुखावत होत्या.

BB2

राजस्थान म्हणलं कि डोळ्यासमोर येणारा वाळवंट सर्वश्रुत आहेच.पण जैसलमेरची रेती,रणथंबोरचे गर्द जंगल आणि भरतपूरचे हे पक्षांचे नंदनवन या तीनही एकमेकांपासून अतिशय भिन्न असलेल्या गोष्टी एकाच राज्याचे तीन वेगळे पैलू आपल्यासमोर मांडतात.
जंगलात प्रवेश केल्यानंतर काही वेळातच पाणवनस्पती नजरेत येत होती.पाण्याभोवती असणारी उंच झाडे आकाशाचा रंग झाकत होती.त्यावरून जवळच पाणी असल्याचा लगेच अंदाज येत होता..

पश्यामि बहुलान्त्रा जन्वृक्षानुदकसंश्रयान् |
सारसानां च निर्हादमत्रोदकमसंशयम् ||

या 'अरण्यक पर्वातील' श्लोकाप्रमाणे येणारा बगळ्यांचा आवाज,पाण्याभोवतालची वनस्पती यांचे याची देही याची डोळा दर्शन होत होते.सुभाषितात वर्णिल्याप्रमाणे 'सारस क्रेन' देखील दृष्टीस पडत होते.करकोचा आणि बगळा यातील फरक पावलागणिक स्पष्ट होत गेला.एखाद्या बुद्धीजीवी प्रमाणे स्तब्ध असलेला बगळा आणि अखंड आवाजाने पाणवठा गाजवणारा करकोचा आपापले वेगळेपण अधोरेखित करत होते.
वेळ सरकत होता.सुर्य देखील अंग चोरून उन्ह पसरत होता.अगदी सावली पडावी एवढे ऊन नव्हते पण पाण्यातून उंचावलेल्या एका पर्णहीन फांदीवर पंख पसरून बसलेला कॉर्मोरंट खाणीतून नुकत्याच काढलेल्या कोळशासारखा चमकत होता.घरातल्या गॅलरीमध्ये अर्धवट पिळलेला शर्ट जेव्हा दोन चिमट्यांनी लटकवला जातो आणि मग काही थेंब खाली पडतात अगदी तसेच त्या कॉर्मोरंटच्या पंखातून पाणी निथळत होते.

BB3

थोडे पुढे गेल्यावर दलदल सदृश्य पाणवठा होता.निरनिराळी बदके,बगळे पेरून ठेवावेत तसे इतस्ततः पसरले होते.मधूनच एखादा थवा पाण्याला खेटून उडताना दिसत होता.छोटी बदके समूहांनी स्थलांतर करत होती.पाण्यात उतरताना येणारा पाण्याचा आवाज शांततेचा भंग करत होता.विस्कटलेला पृष्ठभाग काही तरंगानंतर पूर्ववत होत होता.
जेवायची वेळ झाली होती.सायकल झाडाला टेकवून ठेवली.शेजारी एक बाकडे होते.इतक्यावेळ खांद्याला लटकविलेले कॅमेरे काढून ठेवले आणि झाडाखाली जेवायला बसलो.
काही जेवणे पदार्थाच्या चवीमुळे जिभेवर रेंगाळतात.काही जेवणे बरोबरच्या व्यक्तीमुळे स्मरणात राहतात.काही ठिकाणची बैठक व्यवस्था आणि भोवताल यामुळे आपलंसं करते आणि काही ठिकाणची जेवणे केवळ पोटात खड्डा पडल्याने पार पडतात.आजची परिस्थिती निराळीच होती.दुपारचा एक वाजून गेला होता.वातावरणात जर गारवा असूनही सायकल चालवल्यामुळे उबदारपणा जाणवत होता.भुकेने मर्यादा सोडल्या होत्या.सोबत तर मित्रांचीच असल्याने तो मुद्दा केव्हाच सर झाला होता.भोजनाची जागा अर्थात 'अॅम्बीयन्स' याहून कोझी,एलिगन्ट आणि रीलॅक्स मिळायची शक्यता तशी कमीच..निबिड अरण्यात जेवायचा तो प्रसंग कायमचा स्मरणात राहील एवढे निश्चित.

BB4

जेवणं उरकली आणि पुन्हा कॅमेरा उचलून सायकल मारायला सुरुवात केली.जंगल काहीसं विसावलं होतं.पक्षांनी वामकुक्षी घेतली होती.निरव शांतता मजेशीर वाटत होती.फक्त एखादे झाडाचे पान पाण्यात पडल्याने निर्माण होणारे तरंग पाण्याचा पृष्ठभाग विस्कळीत करत.रस्त्यालगतच्या झाडावरची माकडे माकडचाळ्यात रममाण होती.त्यांनी मारलेल्या झाडांवरच्या उड्यामुळे होणारा फांद्यांचा आवाज जंगलातील हालचाल जिवंत ठेवत होतं.

शांत जंगल अनुभवणे हा पण नवीनच अनुभव होता.पक्षांचा मागमूस नव्हता.पाण्यातली बदके डोळे मिटून सावलीला निजली होती.पाण्यातले पक्षी नाहीसे झाले होते.वाळलेल्या पानावरून सायकल गेल्यावर होणाऱ्या आवाजांनी एखादा झुडपातला पक्षी दचकुन उडत होता.या वेळात फोटो फार काढले नाही पण शांततेचा आवाज मात्र आज कान भरून ऐकला.

दुपारचा प्रहर ओसरत होता.मध्यान्ह टळून संध्याकाळ लागत होती.सुर्य पश्चिमेला झुकला होता.पक्षांची हालचाल सुरु होत होती.सकाळ पासून फोटो काढत असल्यामुळे कॅमेऱ्याची बॅटरी ही एकमेव गोष्ट थकल्यासारखी वाटत होती ती बदलून सूर्यास्त टिपण्यास सुरुवात केली.उन्ह उतरून संधी प्रकाशास सुरुवात होत होती.वाळक्या फांदीवर बसलेले आणि सूर्याची पार्श्वभूमी लाभलेले असंख्य पक्षी पाहायला मिळत होते.

सूर्य क्षितिजावर विसावला.अगदी अंधार नसला तरी थंडीने ताबा घ्यायला सुरुवात केलीच होती.जंगलातून बाहेर निघायची वेळ झाली होती.जस जसे मुख्य दाराजवळ येत होतो तस तसं महामार्गावरील गाड्यांचा आवाज कानावर पडत होता.इतका वेळ असलेल्या निसर्ग बरोबरच्या एकांताला मानवी हस्तक्षेपाचा तडा जात होता.काही वेळातच मुख्य दार डोळ्यासमोर आले.सायकल त्यांना परत केली.उरलेले सोपस्कार केले आणि कॅमेरा आत ठेवून बाहेर पडलो.
आज जंगलाने सगळे प्रकार दाखवले.एखाद्या फॅशन शोला यावे आणि आपले सौंदर्य उधळावे त्याप्रमाणे जंगल आपले वैभव मांडून बसले होते.

एका दिवसात इतके विविध पक्षी बघायची पहिलीच वेळ.सगळाच अनुभव आनंददायी होता.दिवसभरातल्या फोटोनी भरलेला कॅमेरा आणि डोळेभरून पाहिलेले पक्षी या दोन गोष्टी घेऊन मी आज जात होतो.पुन्हा येणार हा आग्रह तर कायम असणारच पण सध्या मी जंगलाचा निरोप घेतला.भारतातील अजून एका नवीन जागेने आज पुन्हा वेड लावले.आपल्याकडे पाहण्यासारखा काय नाही या प्रश्नाचे उत्तर अजूनच तोकडे होत गेले.

आमच्यासारखे बरेच लोक बाहेर निघताना दिसत होते.पक्षांच्या वस्तीतून बाहेर पडत होते.बाहेर अहोरात्र वाहणारा जयपूर-बिकानेर महामार्ग आ वासून उभा होता.रस्त्यापलीकडे भरतपूर शहर होते.चालतच रस्ता ओलांडला आणि हॉटेलकडे मार्गस्थ झालो.

आज सुदैवाने कुंपण शहराला घातले होते.पिंजरा पक्षांचा नव्हताच मुळी..किव्वा पक्षी उडून दुरही जात नव्हते.पक्षी तिथेच होते… बाहेर आम्ही पडलो होतो..

BB5

हृषिकेश पांडकर

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

31 May 2016 - 11:10 am | चांदणे संदीप

हरीण असलेला फ़ोटो बघून तर जीव हरखून गेला! वा! नितांतसुंदर फोटो!!

पण अजून काही टाकायला हवे होते. हे म्हणजे पंगतीला जेवायला बसलो आणि वाढपी सांगत आले की जेवण संपलाय...उठा! :(

लिहिलंय पण छान! :)

Sandy

नाखु's picture

31 May 2016 - 1:02 pm | नाखु

काय आम्च्या पर्यंत आमटी आणि शाकभाजी पोचलीच नाय..

नुसत्या भातावरच भागवाव लागलंन!

पंगतीतला अर्धवट उपाशी नाखु

राजकुमार१२३४५६'s picture

31 May 2016 - 1:09 pm | राजकुमार१२३४५६

लोकाग्रहास्तव परत पंगत बसवा. आम्ही तर दुसऱ्या लाइन मध्ये उभे आहोत, ताट घेऊन. :)

अश्विनी वैद्य's picture

31 May 2016 - 12:38 pm | अश्विनी वैद्य

सुरेख...फोटोंचा वेगळा धागा टाका इथे...!

सस्नेह's picture

31 May 2016 - 12:41 pm | सस्नेह

पक्ष्यांचे भरपूर फोटो पाहायला मिळतील असे वाटले होते.
निराशा झाली.

आत्ता कुठे सुरुवात झाली होती आणि लगेच संपवलात. फक्त दोन फोटो त्या नंदनवनाचे पण एकदम झकास. आमच्या डोळ्यांना पण मजा घेऊ द्या की त्या नंदनवनाची.

छान लेख. भरपुर फोटो हवे होते .

वेल्लाभट's picture

31 May 2016 - 2:23 pm | वेल्लाभट

ओह. कडक. पण फोटो कैच्च नाही त्या कॅमेरांच्या फोटोकडे बघून वाटलं होतं हा धागा रसग्रहित करायला चार एक दिवस जातील.

मला तीनच फोटो दिसू शकले. उत्तम आहेत. भरतपूरला सकाळच्या 'गोल्डन अवर्स' मध्ये जादुई फोटो येतात. सुधीर शिवराम यांचे भरतपूरचे फोटो नॅटजिओ मॅगझिनमध्ये छापले गेले आहेत. ते अवश्य पहा.

वर्णन छान आणि कलात्मक केलेय. कॅनन १००-४०० लेन्स का? बाकीच्या ७०-३०० दिसताहेत.

सायकलवर बसलेला पक्षी असा फोटो असला तर द्या.बाकी पाणपक्षांचे फोटो पाहून कंटाळा आलाय.

मॅक's picture

11 Jun 2016 - 12:32 pm | मॅक

पक्षी ..??????