राजमाची : उन सावल्यांचा खेळ आणि काजवे

राजकुमार१२३४५६'s picture
राजकुमार१२३४५६ in भटकंती
30 May 2016 - 8:03 pm

नेट वरती राजमाची वरील काजव्यांचे फोटो बघून डोळ्यापुढे काजवेच चमकले. म्हणून कालच (२९ मे ) ला राजमाची ला जायचा प्लान तयार केला. नेट वरून कळाले कि, मुंबई ट्रेकरचा पण एक ग्रुप २९ मे लाच येणार होता. त्यामुळे या दिवशी काजवे दिसणार अशी आशा बळावली. कारण हे लोक अभ्यास आणि माहिती गोळा करूनच येत असतात. तसेच गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते. पाऊन पडण्याची शक्यता होती. असे वातावरण काजवे दिसण्यासाठी आदर्श असते.

पुण्याहून दुपारी ३ ला निघालो. ४ पर्यंत लोणावळ्याला पोहोचलो. तिथे एकाला विचारले कि, राजमाचीला रस्ता कुठून जातो. तर त्याने सांगितले कि, तुम्ही तुंगार्ली वरून जाऊ नका. रस्ता खूप खराब आहे. पुढल्या रस्त्याने जा. आता हा पुढला रस्ता कुठे सापडणार, असे विचारले असता. तो म्हणाला कि, डेल्टा ला जा. काहीच कल्पना येत नव्हती. नंतर विचार केला कि, आहे त्या रस्त्यांनी जाऊ. मग आम्ही तुंगार्ली वरून गेलो. रस्ता भयानक खराब होता. तुंगार्ली सोडल्यानंतर एक मोठा डोंगर चढून वर गेलो. त्यापुढे एका धरणाच्या कडे कडे ने जाउन पुढे खाली उतरलो. खाली उतरल्यावर एक घर लागले आणि त्यापुढे थोड्याच अंतरावर एक फाटा दिसला. एक रस्ता राजमाची ला जात होता आणि दुसरा रस्ता डेल्टा वरून येत होता. मग डोक्यात टूब पेटली कि, हाच तो रस्ता होता जो तो माणूस आपल्याला सांगत होता. आता येताना ह्याच रस्त्याने जायचे असा विचार करून पुढे निघालो.

सुर्य मावळतीला चालला होता. तरी पण तो भयंकर आग ओतत होता. त्याचे ते तेज काही कमी झाले नव्हते. अंगातून पूर्ण घामाच्या धारा वाहत होत्या. पण थोड्या थोड्या वेळाने आकाशातील मोठाले ढग आमच्या मदतीसाठी धावून येत होते. ते संपूर्ण सूर्याला झाकून टाकत होते. त्यामुळे थोड्या वेळा पुरता का होईना अंधार दाटून येत होता. सुर्य आणि ढगामध्ये जणू पाठ शिवणीचा खेळ चालू झाला होता. कधी कधी सुर्य वेगाने पुढे सरकत होता तर कधी कधी ढग त्याला घेरत होते. त्यामुळे वातावरणात कधी उन पडत होते तर कधी सावली. उन सावलीचा खेळच सुरु झाला होता. त्यांचा हा खेळ मी कैमेरा मध्ये बंदिस्थ करत होतो.

लोणावळ्या पासून राजमाची चा रस्ता संपूर्ण खराब आहे. रस्त्यात संपूर्ण घनदाट जंगल आहे. जंगल इतके घनदाट आहे कि, काही ठिकाणी सुर्य पण दिसेनासा होतो. रस्ता डोंगराच्या कडे कडेने जातो. एका बाजूला डोंगर आणि दुसर्या बाजूला दरी. दरीच्या दुसर्या बाजूला राजमाची. हीच जी दरी आहे तिच्या उगम स्थानाकडे हा रस्ता जातो. जिथे उगमस्थान आहे तिथे एक पूल बांधलेला आहे. पुलावरून पुढे गेल्यानंतर जांभळाची आणि आंब्याची झाडे दिसतात. आंबे लागलेले होते. दगडाने चारपाच आंबे पाडले. आंबा खायला गोड लागला. इथून पुढे उधेवाडी गावाची शिव सुरु होते. गावाच्या अलीकडेच श्रीवर्धन किल्ला म्हणजेच राजमाची चे सुंदर दर्शन झाले. गावाच्या तोंडालाच एक रस्ता किल्याकडे जातो आणि एक रस्ता उधेवाडी गावात. आम्हाला खूप उशीर झाला होता.

सहा वाजले होते. आम्ही किल्याच्या दिशेने गेलो. सर्वत्र सामसूम होती. तिथे आमच्या दोघांशिवाय कुणीच नव्हते. किल्याच्या दिशेने पुढे थोडा चढ आणि पायऱ्या चढून गेल्यावर भैरवनाथाचे मंदिर लागते. इथून दोन रस्ते फुटतात. एकदम एकमेकांच्या विरुद्ध दिशेला. एक रस्ता जातो मनरंजन गडा वर आणि उजव्या बाजूचा रस्ता जातो श्रीवर्धन गडावर म्हणजेच राजमाची वर. खूप अंधार पडू लागल्यामुळे आम्ही गडावर गेलो नाही. तिथेच भैरवनाथाच्या मंदिरा पाशी बसून लोनावाल्यावरून आणलेले डबे खात बसलो.

खूपच अंधार पडला होता. आता आम्हाला वेध लागले होते ते काजव्यांचे. जेवण झाल्यानंतर आम्ही गावात आलो. गावात बबन सावंताच्या हॉटेल मध्ये बसून चहा घेतला. तिथे आधीच चार ट्रेकर बसले होते. ते पण काजवे पाहायला आले होते. तेथील मावशीनी सांगितले कि, आज काजवे काही दिसणार नाहीत. कारण अजून म्हणावे तितकेसे पावसाचे वातावरण तयार झाले नाही. आम्ही दोघे.... मी आणि मित्र एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागलो. दोघांचा हिरमोड झाला होता. हे ऐकल्याबरोबर ते चार ट्रेकर निघून पण गेले.

संध्याकाळचे ७ वाजले होते. सुर्य पूर्णपणे मावळला होता. अंधार दाटू लागला होता. तरी पण आमची आशा अजून जिवंत होती. आम्ही गावाचा फेर फटका मारून गावाच्या बाहेर असलेल्या कट्ट्या वरती येउन बसलो. आमच्या मागून गावातील दोन तीन पोर सिगारेट फुकट तिथे आली आणि आमच्या पाशी बसून सैराट पिक्चर मोबाइल वर पाहू लागली. सर्वत्र अंधार पसरला होता. एक कुत्री पण शेपटी हलवत आमच्या पाशी येउन बसली. सर्वत्र सामसूम पसरली होती. मधूनच रातकिड्यांचा कीर कीर आवाज येत होता. अश्या शांत वातावरणात आर्चीचा आवाज मात्र घुमत होता. "ये मंग्या??? बाहेर हो.. मराठीत सांगितलेलं कळत कि नाही कि...."

थोड्यावेळाने माझी नजर मागे असलेल्या झाडा कडे गेली. १० ते १२ काजवे चमकत होते. लगेच आमच्या माना इकडे तिकडे वळू लागल्या. प्रत्येक झाडावरती १० ते १२ काजवे चमकत होते.
मग आम्ही त्या पोरांना विचारले कि, आहेत कि काजवे मग गावातील लोक काय म्हणतात कि काजवे नाहीत. त्यावर ती मुले म्हणाली कि, अहो हे २% पण नाहीत. पूर्ण जंगल भरत काजव्यांनी. हे तर काहीच नाही. गावात पण शिरतात काजवे. घराच्या ओट्यावरती पण काजवे दिसतात. तरी पण आमच्या साठी हे दृश्य पण खूप भारी होते. एका ताला मध्ये सर्वांची लाईट लागत होती आणि एका तालावर्तीच जात होती. माझ्या मागचे झाड संपूर्ण काजव्यांनी उजळून निघाले. म्हणता म्हणता भरपूर काजवे तिथे चमकू लागले. बाकीच्या झाडावर मात्र विरळच काजवे होते. दोन ते तीन काजवे माझ्या कानाजवळून गेले. त्या एकाच झाडावर काजव्यांची जत्रा जमली होती. बराच वेळ आम्ही ते दृश्य डोळ्या मध्ये साठवत होतो. परत काय माहिती असे दृश्य पाहायला मिळते का नाय मिळते. फोटो काढायचा प्रयत्न केला पण काही जमले नाही.

संध्याकाळी नऊ वाजता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. पूर्ण जंगल अंधारमय झाले होते. संपूर्ण जंगलात आम्हीच होतो. क्वचित एखादी मोटारसायकल पुढून यायची. गावची शिव आम्ही ओलांडली. त्यानंतर तो पूल पण ओलांडला. त्यानंतर मैदान लागले आणि परत घनदाट झाडी सुरु झाली. विशाल गाडी चालवत होता आणि मी मागे बसलो होतो. माझी नजर जंगलाच्या काना कोपऱ्यात काजव्यांच्या शोधात होती. विशालला मात्र गाडीच्या लाईट मुळे काही दिसत नव्हते. एका ठिकाणी वर पाहिले असता दोन ते तीन काजवे दिसू लागले. विशालला लगेच म्हणालो, गाडी थांबव थांबव. त्याने गाडी थांबवली आणि गाडीची हेड लाईट बंद केली. पाहतो तर काय. समोरील संपूर्ण झाड काजव्यांनी भरले होते. तो नजारा बघून इथे आल्याचे सार्थक झाले. आज आम्ही रिकाम्या हातानी जाणार नव्हतो. थोडे फार का होईना हा नजारा नजरेत साठवून जाणार होतो. असाच नजारा आम्हाला कुणे गावाच्या अलीकडे म्हणजे डेल्टा च्या खूप अलीकडे. जिथून आम्हाला यायचे होते पण तुंगार्ली मार्गे यावे लागले त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्या ठिकाणी हॉटेल मधून निघून गेलेले ते चार ट्रेकर पण आम्हाला दिसले. ट्रायपॉड लाऊन फोटो काढायच्या प्रयत्नात होते.

रात्री साडे दहा वाजता आम्ही लोणावळ्याला पोहोचलो. तिथून लगेच पुणे गाठले. पण माझे मन अतृप्तच राहिले. आता परत जून च्या पहिल्या हफ्त्या मध्ये इथे यायचा मानस आहे. माझ्या माहिती प्रमाणे जर तुम्हाला पण काजवे बघायचे असतील तर काही ठळक बाबी पुढील प्रमाणे :

१) लोणावळा वरून जर राजमाचीला जायचे असेल तर "डेला एडवेनचर पार्क" च्या रस्त्याने जावा. हाच चांगला रस्ता आहे. ह्या रस्त्याने कसे जायचे तर पुण्याहून लोणावळ्याला आल्यानंतर सरळ ३ किमी खंडाळ्याच्या दिशेने पुढे जावा. एक पूल उतरल्यानंतर उजव्या बाजूला "डेला एडवेनचर पार्क" ची पाटी दिसते तिथून आत जावा. तो रस्ता सरळ राजमाचीला जातो. तुंगार्ली मार्गे जाऊ नका. खालील नकाशा पहा.

२) पाउस नसेल तर चारचाकी आणि मोटारसायकल राजमाची पर्यंत जाते.

३) काजवे वर्ष्यातून फक्त १५ दिवसच पाहायला मिळतात. ते पण जून च्या पहिल्या हफ्त्यामध्ये. जेव्हा पाउस पडण्याचे वातावरण तयार होते तेव्हाच. पाऊस पडल्यानंतर ते झाडावरून मरून खाली पडतात.

४) भैरवनाथ मंदिरा पाशी राहण्याची सुविधा आहे. फक्त चादर ब्लंकेत सोबत घेऊन जावे. बहुतेक ट्रेकर तिथेच राहतात. गाववाले सांगत होते कि, पुढच्या वर्षी ते पण बंद करणार आहे. खालीच गेट बसवून संध्याकाळी ६ नंतर भैरवनाथ मंदिरा पाशी जाण्याचा मार्ग बंद करणार आहेत.

५) गावात लाईट ची सुविधा नाही. गावात अजून लाइतच आलेली नाही. संपूर्ण गाव सौर उर्जेवर चालते.

६) गावात हॉटेल आहेत. खाण्याची व्यवस्था चांगली आहे. बोलले तर राहण्याची पण व्यवस्था होऊ शकते.

७) संपूर्ण जंगल भयानक असले तरी आम्हाला कसली भीती वाटली नाही. तर गावकरी सांगतात कि, जंगला मध्ये बिबट्या, कोल्हे, रानटी डुकरा, माकडे आहेत.

८) रात्रीचे जाणार असाल तर टूब लेस टायर वाली मोटार सायकल घेऊन जावा. कारण चुकून पंक्चर झाली तर तुम्हाला हेल्प करणारे कोणीही भेटणार नाही एवढ्या रात्री.

9) बी.एस.एन.एल आणि वोड फोन ला 3g रेंज आहे. नेट मस्त चालते. बाकीच्यांचे माहित नाही.

शेवटी सर्वाना एकाच सांगणे आहे. तुम्ही पण अशी संधी सोडू नका. यावर्षी नक्की जावा, अजून वेळ गेलेली नाही.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्षणचित्रे :

कुणे गाव आणि डेला रोड ने जावा. रस्ता चांगला आहे.


तुंगार्ली, पांगोली आणि आजूबाजूचा परिसर


खराब रस्ता


उन-सावल्यांचा खेळाला सुरुवात


हा फोटो बघून मुन्नारच्या चहाच्या मळ्यांची आठवण झाली.


दूरवरून दिसणारा राजमाची किल्ला


लाल मातीचा रस्ता


इथलेच आंबे आम्ही तोडून खाल्ले.


डाव्या बाजूला सर्वात उंच दिसणारा राजमाची म्हणजेच श्रीवर्धन गड आणि उजव्या बाजूला छोटा मनरंजन गड


गडावरती तेजोवलय झाले आहे. प्रतेक्ष्यात शिवाजी महाराज अवतरले आहेत असाच ह्या फोटो मध्ये भास होत आहे. राजमाची च्या आड सुर्य गेल्यानंतर हा फोटो काढला आहे.


राजमाची किल्ला श्रीवर्धन गड


पुणे मुंबई महामार्ग

काजव्यांचे काही फोटो आंतरजालावरून :

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

30 May 2016 - 8:34 pm | मुक्त विहारि

आणि तसेच सुंदर लेखन.

राजकुमार१२३४५६'s picture

30 May 2016 - 9:53 pm | राजकुमार१२३४५६

आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद !!

जीवाभावाचा राजमाची खूप बदललाय आता.
राजमाची रस्त्यावर काजव्यांनी लगडलेली झाडे खूपदा पाहिलेली आहेत. अगदी ऐन पावसाळ्यातही काजवे सोडून इतरही प्रकाश फ़ेकणारे कीड़े पाहिलेत. शेपटीचा भाग हिरवट पिवळसर प्रकाशमय असणारे अळ्यांसारखे सरपटणारे बोटभर लांबीचे जीव पाहिलेले आहेत.
माचीतल्या काजव्यांचे प्रमाण हल्ली खूपच घटलेले आहे.

एकदा परतीच्या मार्गे जाताना कुणे मार्गे गेलो होतो. दहाबारा किमी जास्तीची तंगडतोड पदरात पडली होती.

फोटो उत्कृष्ट.

राजकुमार१२३४५६'s picture

30 May 2016 - 9:53 pm | राजकुमार१२३४५६

प्रचेतस सर, आपण आणि वेल्लाभट यांनी लिहिल्लेल्या राजमाची वरील धाग्यामुळे आम्ही पण राजमाची च्या प्रेमात पडलोय. राजमाचीला जाने हा खरच भारी अनुभव होता. आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद !!

वेल्लाभट's picture

31 May 2016 - 2:20 pm | वेल्लाभट

भाऊ...

काय फोटो काढलेत राव ! काजव्यांचा फोटो मला कधी जमेल असं वाटलंच नाही मी गेलो असता. अतिशय प्रचंड भारी. आणि वर्णन पण. मिस करतोय मी ट्रेकिंग आजकाल. फार हळहळ वाटते असे धागे बघून. मजा करा अजून भारी फोटो दाखवा आम्हाला.

राजकुमार१२३४५६'s picture

1 Jun 2016 - 6:55 pm | राजकुमार१२३४५६

तुम्ही सांगितल्या प्रमाणे, शेपटीचा भाग हिरवट पिवळसर प्रकाशमय असणारे जे किडे असतात. तेच किडे अंडी घालून काजव्यांना जन्म देतात. त्यांची लांबी पण जास्त असते. यावर अजून माहिती आली पाहिजे

ह्या अळ्या चांगल्याच लांबलचक होत्या..इंचापेक्षाही जास्त. शिवाय हे मी पाहिलेत ते ऐन जुलैच्या मध्यरात्रीच्या धुव्वाधार पावसात. टू बी स्पेसिफिक २३ जून. मला आठवतंय कारण हा पाऊस असाच पुढे सतत दोनतीन दिवस कोसळत राहिला होता आणि मुम्बई आणि इतर महाराष्ट्रातही तो २५ / २६ जुलैचा महाप्रकोप घडला होता.

जुलै अखेरीस काजव्यांची लार्वा स्टेज राहू शकते काय? अधिक माहिती कदाचित नूलकर काका सांगू शकतील.

राजकुमार१२३४५६'s picture

1 Jun 2016 - 9:28 pm | राजकुमार१२३४५६

मला सापडलेली माहिती अशी,
"अगदी थोडयाच काजव्यांच्या बाबतीत अंडे, अळी, कोश व प्रौढ या विकासाच्या सर्व अवस्थांत प्रकाशाची उत्पत्ती होते. तथापि बहुतेक सर्व काजवे फक्त अळी व प्रौढावस्थेत स्वयंप्रकाशी असतात.

काजवे साधारणतः दोन सेंमी. लांब, मऊ शरीराचे असून मंद काळसर, भुरे, पिवळे किंवा तांबूस रंगाचे असतात.
त्यांचे एक वैशिष्टय म्हणजे त्यांच्या बहुतांशी माद्या अळीसारख्या असतात व त्या हालचाल कमी करतात. त्या
पंखहीन व इलीट्रारहित (कठीण झालेले पुढचे पंख नसलेल्या) असतात, तसेच त्यांचे डोळेही कमी विकसित असतात.

नरात प्रकाश देणारा अवयव उदराच्या सहाव्या व सातव्या खंडात आणि मादीत त्यामागील खंडात असतो. नर
चांगले उडू शकतात व ते भरपूर उजेड देतात. त्यांना पंख असतात व डोळेही चांगले विकसित असतात. दिवसा ते लपून बसतात आणि रात्र झाली की बाहेर पडतात.

प्रौढावस्थेत काजव्यांना फारच थोडे अन्न लागते किंवा लागत सुध्दा नाही. मात्र त्यांच्या अळया मांसाहारी असतात
आणि गोगलगाई व स्लग (कवचहीन गोगलगाय) यांवर त्या आपला उदरनिर्वाह करतात. त्याआपले खाद्य विळयासारख्या चिबुकास्थीने (जबडयासारख्या अवयवाने) पकडतात. प्रत्येक चिबुकास्थीमध्ये अगदी बारीक वाहिन्या आडव्या असतात व त्यांमधून खाद्यावर गडद रंगाचा स्त्राव सोडला जातो. हया स्त्रावाने मॉलस्कांच्या (मृदुकाय प्राण्यांच्या) स्नायूंचे अपघटन (मूळ रेणूचे तुकडे पडून लहान रेणू अथवा अणू बनणे) होऊन बहुतांशी पचन बाहेरच होते. अळीमध्ये तयार अन्न सिबेरियमच्या (तोंडाच्या अगोदरच्या वतोंडाच्या अवयवांनी वेढलेल्या जागेच्या) साहाय्याने आत ढकलले जाते. अळयांना लाळग्रंथी नसतात."

राजकुमार१२३४५६'s picture

1 Jun 2016 - 9:32 pm | राजकुमार१२३४५६
कंजूस's picture

30 May 2016 - 10:43 pm | कंजूस

फोटोपाहून धन्य झालो.

यशोधरा's picture

31 May 2016 - 5:22 am | यशोधरा

सुरेख लिखाण आणि फोटो.

चांदणे संदीप's picture

31 May 2016 - 9:54 am | चांदणे संदीप

कहर फोटू... काजव्यांच्या गावात यावर्षी नक्की जाणार!

Sandy

सिरुसेरि's picture

31 May 2016 - 11:03 am | सिरुसेरि

सुरेख लिखाण आणि फोटो ..+१००
काजव्यांचे फोटो..+२००

सत्याचे प्रयोग's picture

31 May 2016 - 1:00 pm | सत्याचे प्रयोग

अप्रतिम फोटोग्राफी. अश्शी फोटोग्राफी जमली पाहिजे.

सत्याचे प्रयोग's picture

31 May 2016 - 1:00 pm | सत्याचे प्रयोग

अप्रतिम फोटोग्राफी. अश्शी फोटोग्राफी जमली पाहिजे.

राजकुमार१२३४५६'s picture

31 May 2016 - 1:05 pm | राजकुमार१२३४५६

धन्यवाद !! राजमाची चा समोरील बाजूचा फोटो तुम्ही येताना ज्या ठिकाणावरून काढला होता त्याच ठिकाणावरून काढला आहे. तुमच्या त्या फोटो पासूनच प्रेरणा मिळाली.

जगप्रवासी's picture

31 May 2016 - 2:06 pm | जगप्रवासी

भारी फोटो आलेत आणि वर्णन पण छान

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jun 2016 - 9:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर ठिकाणाच्या सहलिचे सुंदर सचित्र वर्णन !

काजव्यांचे फोटो तर अप्रतिम आहेत !!

तुम्हाला पण इतक्या संख्येने काजवे दिसले का? माझा तर विश्वास बसत नाहीये. हे तर एखाद्या चित्रपटातल्या सीन सारख दिसतंय.

तुम्हाला पण इतक्या संख्येने काजवे दिसले का? माझा तर विश्वास बसत नाहीये. हे तर एखाद्या चित्रपटातल्या सीन सारख दिसतंय.

राजकुमार१२३४५६'s picture

5 Jun 2016 - 12:24 am | राजकुमार१२३४५६

नाही... एवढ्या प्रमाणात नाही. आमची जाण्याची वेळ चुकीची होती. एक पाउस पडल्यानंतर जायला पाहिजे होते.

आता निघालोय भोरगिरीला. पाहू कितपत दिसतात ते.

चासच्या पुढे पार भोरगिरीला जावेतो तूफ़ान पाऊस कोसळत होता. रात्री अडीचच्या आसपास थांबला. काजवे अधेमधे कुठेही न दिसता फ़क्त भोरगिरी परिसरात दिसले. काही काही झाडे अक्षरश: लगडलेली होती. सिंक्रोनाइजेशन खूपच छान दिसले. पुढच्या आठवड्यात खूप मोठ्या संख्येने दिसावेत.

राजकुमार१२३४५६'s picture

5 Jun 2016 - 9:06 am | राजकुमार१२३४५६

एका पावसानंतरच प्रमाण वाढेल. मी पण ऐकून होतो भीमाशंकर आणि आजूबाजूच्या परिसरात काजवे खूप दिसतात. भोरगिरी वरील फोटो आणि लेख येऊ द्या.

महासंग्राम's picture

6 Jun 2016 - 1:40 pm | महासंग्राम

कालच जाउन आलो. आलो काजवे भरपूर दिसलेत पण, ते पहायला येणाऱ्या लोकांना साधा कॉमन सेन्स नाही हे पाहून प्रचंड वाईट वाटले. काजवे अंधारात चमकतात. काही वाढीव मंडळी सरळ त्या झाडांवर टॉर्च प्रखर झोत मारत होती. त्यांच्या बुद्धीची कीव करावी तितकी आहे.

बाकी उधेवाडी गावात वारे काकांच्या घरी राहण्याची आणि जेवणाची सोय होते. जेवण अप्रतीम असते.

राजकुमार१२३४५६'s picture

6 Jun 2016 - 8:08 pm | राजकुमार१२३४५६

एकाच झाडावर होते का? पूर्ण जंगलभर पसरलेले होते?

महासंग्राम's picture

7 Jun 2016 - 10:03 am | महासंग्राम

पूर्ण जंगलभर नव्हते १०-१२ झाडावर होते. पण ते सुद्धा सुंदर दिसत होते.

आंतरजालावरील काजव्यांचे फोटो छान आहेत. दोन वर्षांपूर्वी भोरगिरीवरून परत येताना अशीच काजव्यांची झाडे दिसली होती. या फोटोंना जास्त मोठा शटर इंटर्व्हल ठेऊन चालत नाही. आयएसओवर खेळ चालतो. नंतर डॉज व बर्न वापरून प्रतिमा सुधारली जाते. तसेच कुठले प्रतिमासंस्करण न करता काजव्यांचे किंवा आकाशगंगांचे असे फोटो थेट कॅमेर्‍यात मिळवणे जवळजवळ अशक्य असते. माझ्याकडे काही फोटो आहेत का ते बघतो जुने अल्बम चाळून.

राजकुमार१२३४५६'s picture

7 Jun 2016 - 4:46 pm | राजकुमार१२३४५६

मला असे वाटते कि, काजव्यांचे प्रमाण, अंधार किती होता , काजवे किती अंतरावर होते यावरून सुद्धा फोटोची प्रत अवलंबून आहे. खालील फोटो मध्ये जेवढे काजवे दिसतायेत तेवढेच काजवे सध्या राजमाची मध्ये दिसून येतायेत.

कैमेरा : Nikon D7000
लेन्स : 18-105mm f/3.5-5.6
फोकल लेन्थ : 18.3 mm
ƒ/3.5 , 30s , iso-2000

aa

मी पण काढायचा प्रयत्न केला पण काही जमले नाही.

पियुशा's picture

8 Jun 2016 - 10:43 am | पियुशा

मस्त आलेत सगळे फोटो :)

विशाखा राऊत's picture

18 Jun 2016 - 3:18 am | विशाखा राऊत

सगळे फोटो मस्त