सिन्नरचं आयेश्वर मंदिर पाहण्याच्या आधीच जवळपास दोनेक तास गोंदेश्वर मंदिरात थांबलो होतो. माध्यान्ह संपून नुकतीच कुठे मावळतीला सुरुवात होत होती. भर एप्रिलचाच काळ असल्याने उन्ह मात्र अगदी रणरणत होतं. सिन्नर हा दुष्काळी भाग, सगळं कसं रखरखीत, कोरडं, रुक्ष. उन्ह अक्षरशः भाजून काढत होतं. मात्र त्या उन्हातही मंदिर सोन्यासारखं झळकत होतं.
गोंदेश्वराचं आवार विस्तीर्ण. भलं प्रशस्त. तटबंदीयुक्त. तटबंदीतच यात्रेकरुंसाठी देवड्या बांधलेल्या. तटबंदीच्या आत पटांगण, इतकं मोठं की क्रिकेटची मॅच सहज खेळता यावी. पटांगण मोकळं ठेवूनही मध्यभागी भलं थोरलं अधिष्ठान. त्या चौथर्याच्याही मध्यभागी एक प्रचंड मंदिर. इतकं उंच भूमिज मंदिर महाराष्ट्रात दुसरं नसावं. भूमी म्हणजे मजला. मंदिराचा शिखरभाग मुख्य शिखराच्या लहान लहान प्रतीकृतींनी जोडत जोडत जाऊन थेट कळसास पोहोचलेला. त्या शिखरप्रतीकृतींच्या मधूनच जाणारी सरळसोट जीवा. हीच ती भूमिज शैली. मुख्य मंदिराच्या चारही बाजूंना चार लहान आयतनं. मुख्य मंदिर भूमिज पण त्याच्या बाजूची उप आयतनं मात्र नागर शैलीतली, मधूनच एखादं वेस्सर शिखर. ह्या विभिन्न शैलींमुळे मुख्य आयतनाला येथे कमालीचा उठाव मिळालाय. मुख्य मंदिर शिवाचे त्यामुळे हे शिवपंचायतन.
मंदिराच्या पटांगणातच उभा राहून मी हे सर्व पाहात होतो. अप्रतिम, सुपर्ब, मार्व्हलस अशी विशेषणं फिकी पडावीत असंच ह्याचं प्रथमदर्शन. मंदिराचे हे प्रवेशद्वार मात्र आडबाजूचे. मंदिरात येणारा मुख्य रस्ता ह्याच मार्गाने आल्यामुळे, मूळचे मुख्य प्रवेशद्वार मात्र पूर्वाभिमुख, नदीच्या बाजूने. पाण्याच्या स्त्रोताच्या बाजूनेच मुख्य द्वार हवे किंवा त्याबाजूने एकतरी द्वार हवे हा नियम येथेही पाळला गेल्याचे दिसतो.
मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे ते पूर्व बाजूनं. येथेही एक आश्चर्य दडलेले आहे. खिद्रापूरच्याच स्वर्गमंडपाची लहानशी पुनरावृत्ती ह्या प्रवेशद्वाराच्या छतावर केलेली आढळते. खिद्रापूरचा स्वर्गमंडप हा तर अतिशय सुंदर आणि तो सभामंडपाच्या अगोदर, त्याला अगदी लागूनच. त्यामानाने गोंदेश्वरचा स्वर्गमंडप हा प्रवेशद्वारावर, मंदिरापासून थोडासा लांबच. पण ह्याचेही सौदर्य अजिबात उणावत नाही. आकाशाची निळाई काय खुलून दिसते येथून. भन्नाट
स्वर्गमंडपाच्या पुढ्यात खोलवर गेलेली नदी व तिचे आटलेलं, शेवाळलेलं पात्र. मागे फिरलो. मुख्य मंदिराच्या पुढ्यातच नंदीमंडप आहे. शिल्पकामाने कोरुन काढलाय. हा नंदीमंडप खुलामंडप ह्या प्रकारात मोडतो. नंदीमंडपाच्या भिंतीवर रामायणातील विविध प्रसंग, सुरसुंदरी , वादक, मैथुनशिल्पं आदी कोरलेले आहेत. मूर्तींची अगदी सहजच संगती लागत असते. पहिल्यांदाच इथे येऊनही, मूर्ती अगदी झिजलेल्या असूनही अगदी सहज ओळखल्या जातात, जणू ह्यांचे आपले जन्माजन्मांतरीचे नाते आहे.
मला आठवतंय, लोणी भापकरला असाच एक नंदीमंडप आहे. तिथल्या मंडपात सध्या नंदी नाही मात्र बाह्य भिंतीवरील शिल्पेही अगदी अशीच.
नंदीमंडपाच्या भिंतीवरील मैथुनशिल्पे
हे रामायणातील काही प्रसंग
ह्या सुरसुंदरी, त्यात कुणी पुत्रवल्लभा, कुणी दर्पणा, कुणी मर्कटलीलांनी त्रस्त झालेली अभिसारिका
तर मध्येच विष्णूचे अवतार, वराह, नरसिंह
इतकी सारी शिल्पं बघत बघतच नंदीमंडपाला फेरी मारत निघावी आणि मुख्य आयतनात यावं. द्वाराच्या शेजारीच एक भयप्रद व्याल आपलं स्वागत करतो. इतके मोठे व्याल इकडील मंदिरांत तसे दुर्मिळच. दक्षिणेत मात्र अगदी विपुल.
प्रवेशद्वाराची चौकट येथेही व्यालांनी, वादकांनी, प्रतिहारींनी, द्वारपालांनी सजलेली आहे. प्रवेशद्वार हे मुखमंडपात आहे. मुखमंडपाचं छतही कमळासारख्या फुलांच्या आकृतीने नक्षीदार कोरलेले आहे.
गोंदेश्वराचा सभामंडप अंधारी, इथे छायाचित्रं काढणं तसं जिकिरीचं काम. इथला सभामंडपही भरजरी स्तंभांवर तोललेल्या आहे. स्तंभांवर असंख्य शिल्पं आहेत.
ही पुत्रवल्लभा, आपल्या लहानग्या बाळाला हातांवर तोलत ही त्याचे कौतुक करीत आहे.
ही दर्पणा, सतत आरशातच बघत असते :)
ही आपल्या सेवकाच्या पाठीवर पाय ठेवून स्वतःची केशरचना करीत आहे
हे बहुधा शिवाचे तांडवनृत्य. नंदी आणि भृंगी शेजारी असावेत.
हे मैथुनशिल्प. असा उघडा शृंगार चाललेला पाहून एका सेविकेने चक्क पाठ फिरवलीय तर दुसर्या सेविकेने लाजून आपले डोळेच झाकून घेतलेले आहेत. :)
मध्येच काही ठिकाणी द्वंद्व कोरलेले आहे
तर इथे एक मर्कट शिंकाळ्यातले दही चोरते आहे.
एका स्तंभावर उग्र नरसिंह हिरण्यकश्यपूला अंकावर घेऊन आपल्या नख्यांनी त्याचे पोट फाडतोय तर प्रल्हाद भक्तीभावाने प्रार्थना करतोय, गरुडही वरच्या बाजूस हात जोडून नम्रतेने उभा आहे.
नंतर बळीराजा (हा प्रल्हादाचा नातूच. वैरोचनी) हा वामनाला तीन पावले जमिनीचे दान हातांवर पाणी सोडून देतोय. दान देताच वामन त्रिविक्रमरुप प्रकट करुन पृथ्वी आणि आकाश व्यापून तिसरे पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवण्यासाठी सज्ज झालाय.
ही अजून एक पुत्रवल्लभा
मग विषकन्या दिसतेय. तिच्या एका हाती सर्प तर दुसर्या हाती मुंगूस असून ती दोघांनाही भिडवतेय. जणू तुम्हा दोघांवरही माझेच वर्चस्व आहे असेच ती जाणवून देतेय.
अशी एक ना एक असंख्य शिल्पे आहे सभामंडपात. गर्भगृहाच्या दारावर देखील नेहमीप्रमाणेच दासी, प्रतिहारी, शैव द्वारपाल आहेत. आतले शिवलिंग मात्र साधेसे.
आता मंदिराला फेरी मारण्यास निघालो. मंदिराच्या अधिष्ठानावर गजथर, त्यावरील जंघेवर नरथर आणि त्यावर देवकोष्ठ आहेत. सुरसुंदरी इथे मोठ्या संख्येने दिसत नाहीत तरीही त्या मंदिरांच्या भिंतींवर काही प्रमाणात आहेत. अर्धमंडपांच्या बाहेर रामायणातील बरेच प्रसंग कोरलेले आहेत. देवकोष्ठात आज मूर्ती अभावानेच दिसतात, किंबहुना त्या नाहीतच. मी अशी देवकोष्ठं रिकामी असलेली बरीच मंदिरे पाहिलेली आहेत. मूर्तीभंजकांमुळे भग्न झालेली असावीत किंवा कसे, पण आज ती बर्याच ठिकाणी नाहीत. कित्येकदा ती मंदिरांच्या आवारातच इतस्ततः भग्नावस्थेत विखुरलेली दिसतात.
इथली भिंतीवरील रामायणपटांत विविध प्रसंग कोरलेले आहेत.
ही रावणानुग्रहशिवमूर्ती. वेरूळच्या कैलास लेण्यांत ह्याचं अतिभव्य असं स्वरुप आहे. अक्षरशः डोळे दिपवणारं. येथे मात्र हाच प्रसंग मिनिएचर रुपात मांडला गेलाय.
मारुती इथे अशोकवनाचा विध्वंस करताना दिसतो तर त्याच्याच पुढच्या पटात तो रावणकुमार अक्षाचा वध करताना दिसतो.
-
कधी रावणाचा दरबार दिसतो तर कधी राक्षसींनी वेढलेली सीता दिसते.
मधूनच सेतूबंधनाचा देखावा दिसतो तर रावणाच्या दरबारात चाललेली वानरशिष्टाई
अजूनही कित्येक शिल्पं येथे आहेत पण विस्तारभयास्तव ती येथे देणे शक्य नाही.
असेच काही रामायणातील प्रसंग मी वेरूळ, लोणी भापकर, किकली येथील मंदिरांतही पाहिलेले आहेत. प्रसंग तसे भिन्न भिन्न, शैलीही भिन्न मात्र शिल्पांची रंजकता तीच. खरंच सांगतो. हे शिल्पपट, त्यातल्या मूर्ती, त्यातले प्रसंग ओळखायला खूप मजा येतं. काही वेळा काही प्रसंग अनाकलनीयच राहतात. किकलीच्या मंदिरातला गरूड आणि हनुमानात झालेली एका फळावरुन झालेली जुगलबंदी हा प्रसंग असाच अनाकलनीय. कोडं काही वेळा सुटतं, काही वेळा नाही, पण न सुटल्याची काही खंत अशी नसते.
भिंतींच्या उपांगांवर मधूनच काही सुरसुंदर्या दिसत जातात, कुणी आरश्यात पाहून नटण्या मुरडण्यात वेळ घालवतेय तर कुणी वृक्षांचा आधार घेऊन उभी आहे, कुणी नुसतीच मुग्ध आहे तर कोणी हाती कमंडलू घेऊन उभी आहे. कुणी पोराला हाती घेऊन उभी आहे तर कुणाची नुसतीच लगबग चालू आहे.
मधूनच देवकोष्ठात चामुंडा प्रकटलेली दिसते. भयप्रद चेहरा, तोंडातून बाहेर आलेल्या कराल दाढा, हाडांचा सापळा, लोंबलेले स्तन, पोटात विंचू, प्रेतवाहना अशी ती सहज ओळखू येत असते. ही चामुंडा शीळ देखील वाजवती आहे. अशाच व्हिसलींग चामुंडा मी पिंपरी दुमाला, खिद्रापूर येथेही पाहिलेल्या आहेत. चामुंडेवरनं आठवलं, भुलेश्वरला चामुंडेचं एक अप्रतिम शिल्प आहे. मी पाहिलेल्या चामुंडांमधलं सर्वोत्तम.
चामुंडा म्हटल्यावर भैरव आलाच. येथे एक भैरवाची अष्टभुज मूर्ती आहे आणि ती देखील बैठी. अष्टभुज शिव बैठ्या अवस्थेत मी फक्त येथेच पाहिला.
गाभार्यातील शिवपिंडीच्या शाळुंकेतील पाणी बाहेर जाण्यासाठी मकरमुखाची योजना केलेली आहे. त्या मकरावर शंख, चक्र, गदाधारी विष्णूची योजना केलेली आहे. त्या मकराचे बंद होत असलेले मुख कोणी एक आकृती आपल्या हातांच्या आधारे उघडून ठेवत आहे.
मंदिराच्या बाह्यांगांवर मूर्तींची संख्या तशी कमीच. गोंदेश्वर हे भूमिज शैलीतले तुलनेने उशिरा निर्माण झालेले (१२/१३ वे शतक) मंदिर असल्याने येथे मूर्तीकामाचा थोडा अभाव जाणवतो, त्याची जागा येथे नक्षीकामाने घेतलेली आढळते.
आधीच सांगितल्याप्रमाणे हे पंचायतन आहे. मुख्य मंदिर हे शिवाचे असल्याने हे शिवपंचायतन. गोंदेश्वराचे शिवपंचायतन महाराष्ट्रात सर्वात प्रचंड. ह्या इतर चार उप आयतनांत अनुक्रमे विष्णू, गणेश, दुर्गा आणि सूर्य अशा मूर्ती आहेत. ह्यातल्या काही मूर्ती मला जास्त प्राचीन वाटल्या नाहीत. कदाचित मूळच्या मूर्ती भंग पावल्या असाव्यात.
ही चार उपायतने देखील विलक्षण सुंदर आहेत. गोंदेश्वर मंदिराभोवती फेरी मारताना विविध कोनांतून हे पंचायतन विलक्षण सुंदर दिसते. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी प्रकाशामुळे ह्यांच्यावरील रंग सतत बदलत असतात. मावळतीला तर हे झळाळून निघत असते.
उत्तुंग पोहोचलेली शिखरं स्थापत्यशैलीचा अद्भूत आविष्कार दाखवतात.
आतापर्यंत इतकं मंदिरं पाहिली. डावं उजवं खरंच करता नाही आलं, आवडलं नाही असं कुठलंही मंदिर नाहीच. जे ८०० वर्षांच्या पलीकडचं आहे ते ते सगळंच आवडीच. मग त्यात वेरूळचं अतिभव्य लेणं येवो, कार्ल्याचा प्रचंड चैत्य येवो वा कुठेतरी झाडाझुडपात पडलेली एखादी शिळा. वेरुळच्या कैलासचं अढळ स्थान मात्र कधीच खाली उतरणार नाही. त्यासम तेच. कोपेश्वरही खूपदा पाहिलं, आवड्लं देखील. इतकं सुंदर, कोरीव पण का कोण जाणं समरस होता आलं नाही, भुलेश्वराशी मात्र मनापासून समरस झालो. काहीतरी ऋणानुबंध असणार.
गोंदेश्वराचं स्थान मात्र त्याच्या उत्तुंग शिखरांमुळे मनात एक वेगळंच स्थान पटकावून आहे.
प्रतिक्रिया
21 May 2016 - 2:30 pm | अभ्या..
अप्रतिम, लाजवाब, केवळ जबरद्स्त
काय म्हणावे ह्या माणसाला. सालं आम्ही अभ्यासक्रमाला असताना सुध्दा ज्या गोश्टी माहीत नाहीत त्या ह्याला मुखोद्गत असतात. प्रचंड व्यासंग आणि झोकून देउन केलेली भटकंती यातून साकारलेल्या वल्लीच्या ले़खांचे ग्रंथ प्रकाशित व्हावेत. निदान हे प्रॉपरली पीडीएफ अथवा अन्यमार्गे जतन व्हावेत हीच भगवंतचरणी इच्छा.
21 May 2016 - 2:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरुवातीच्या तीनचार ओळींनीच लेख जिंकायला लागतो. हल्ली आपल्या लेखनातली ही सुधारणा मला आवडली आहे. बाकी, लेखन नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि सुंदर. बाकी, तुम्ही इतकी मंदिरं फिरले आहात रामायणपट वेरुळचाच तपशीलवार आहे, असावा असे मला वाटते. बाकी, मैथूनशिल्पे पाहून त्याकाळातील लोक जास्तच समाजाचं वास्तव चित्रण करणारे होते असे म्हणावे लागेल.
बाकी, 'व्हिसलींग चामुंडाला' फिसकन हसु आलं. गोदेश्वराचं मंदिर कुठे आहे, हे अजून तपशीलवार आलं पाहिजे असं वाटलं. असो, लिहित राहा. सुरेख लेखन. आपल्यामुळेच आता कुठेही मंदिरात गेलो की कुठे वीरगळ दिसतात का ? मंदिराची शैली कोणती असावी ? शिल्प दिसल्यावर हे कोण असेल बरं ? अशा गोष्टींची उत्सुकता लागते. धन्स वल्ली.
-दिलीप बिरुटे
21 May 2016 - 11:07 pm | नीलमोहर
'मैथूनशिल्पे पाहून त्याकाळातील लोक जास्तच समाजाचं वास्तव चित्रण करणारे होते असे म्हणावे लागेल.'
-याबाबतीत एक शंका होती, अशा प्रकारची शिल्पे मंदिरांमध्ये असण्यामागे काय लॉजिक असू शकतं, म्हणजे साधारणतः हा एक taboo विषय मानला जातो, तरीही अशी शिल्पे पूजास्थळांमध्ये असण्यामागे काय कारण असावे ?
की हे taboo वगैरे नंतर मानलं जाऊ लागलं, आधी असा काही समज नव्हता.
'आता कुठेही मंदिरात गेलो की कुठे वीरगळ दिसतात का ? मंदिराची शैली कोणती असावी ? शिल्प दिसल्यावर हे कोण असेल बरं ? अशा गोष्टींची उत्सुकता लागते'
- अगदी, आतापर्यंत अशी मंदिरं, शिल्पं फक्त पहायचो, आता थोडे निरीक्षण आणि अभ्यास करायची सवय लागेल.
सुंदर फोटो आणि नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख.
22 May 2016 - 6:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>>अशा प्रकारची शिल्पे मंदिरांमध्ये असण्यामागे काय लॉजिक असू शकतं,
लॉजिक मीही सांगू शकत नाही. पण मानवी जीवनाचे भाव, राग, लोभ, मद, मत्सर, कारुण्य, भय, या साऱ्या विकाराबरोबर सौंदर्य, मैथुन शिल्प ही हजार वर्षापूर्वीचीच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थिती शिल्पामधुन सांगतात नव्हे तर ते शिल्प आपल्याशी बोलते. आज जी वर्गवारी आपण पवित्र अपवित्रच्या केल्या आहेत, त्या काळात तो विचार तेव्हा टोकदार नसावा असे वाटते. म्हणून वेरूळ लेणीच्या शिल्पात मुख्य कैलास लेणीत सभामण्डपात अशी असंख्य शिल्प आहेत अर्थात ती खुप मोठी नाहीत, अगदी वितभर आकाराची अशी शिल्प आहेत, पण मंदिरात अशी शिल्प का आहेत याचं ठाम कारण मी सांगू शकत नाही. (प्रश्न वल्लीकड़े पास) राष्ट्रकूट राजांच्या काळातील कैलास मन्दिरातील ही शिल्प आणि त्याचा इतिहास त्यांचा हेतू आपल्याला प्रचू उर्फ़ प्रचेतस शिवाय दुसरं कोण सांगू शकतं ?
-दिलीप बिरुटे
23 May 2016 - 8:53 am | प्रचेतस
मैथुनशिल्पांबाबतचं सरांचं म्हणणं तसं बरोबर आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थितीतचं दर्शनच अशा शिल्पांद्वारे होत असतं पण ही शिल्पे आहेत म्हणून तेव्हाच्या समाजात मोकळीक, स्वैराचार असा काही होता का तर उत्तर नाही हे आहे. अर्थात तेव्हाही गणिका होत्याच. तत्कालीन साहित्यातून तसे उल्लेखही आलेले आहेत. चंद्रगुप्ताच्या पदरी अनेक विषकन्या होत्या परंतु सर्वसाधारण महिलांना आचारविचारांचं मुक्त स्वातंत्र्य होतं का तर नाही, त्यांचे जीवनही चार भिंतींंआडच व्यतीत होत असावे. तरीही ही शिल्पं का?
तर ह्याची काही कारणे असावीत असे मला वाटते.
पुरुष- प्रकृतीचे मिलन म्हणजे मोक्ष. हे बऱ्याचदा शिवपार्वती क्रिडेच्या रुपात आपणास दिसते. उपनिषदांतही पुरुष- प्रकृति मिलनाबाबतचे श्लोक आलेले आहेत. पण शिव पार्वती क्रिडा सोडून इतरही युग्मशिल्पे दिसतात त्याचे काय आणि मंदिरांच्याच भिंतींवर का असावीत?
साधकाने अशा विचलित करणाऱ्या शिल्पांकडे पाहूनही विचलित न होता आपली साधना पूर्ण करावी व योगस्थिती प्राप्त करून घ्यावी हां तर उद्देश नसेल?
मला सर्वात जास्त वाटते ती चार पुरुषार्थांची शक्यता.
धर्म, अर्थ, काम, मोक्ष अर्थात ह्या चारही अर्थांचे पालन मनुष्याने आपल्या जीवनात पूर्णांषाने करावे. एक धार्मिक व दोन ऐहिक अर्थांचे पालन करून शेवटी मोक्षाप्रत पोचावे.
म्हणूनच ह्या चार पुरुषार्थांची प्रतिके असलेली ही शिल्पे मंदिरांत असावीत असे मला प्रकर्षाने वाटते.
23 May 2016 - 9:40 am | चौकटराजा
म्हणूनच ह्या चार पुरुषार्थांची प्रतिके असलेली ही शिल्पे बर्याच मंदिराना भेट देऊन मी आलो आहे. पार श्रीनगर पासून तंजाउर . सर्च ठिकाणी शिल्पात वेगवेगळे विषय हाताळळेले दिसतात. कोन्रार्क येथील रथाच्या चाकावर तर एका स्त्रीचे दिवसभरातील सर्व कर्मांचे दर्शन घडते. त्यात काम हा एक भाग आहेच. आपण केवळ या विषयाकडे जास्त चिकित्सक पणे पाहतो एवढेच . ताक घुसळणारी स्त्री, शिकारी लोक , पुराण प्रसंग ,भजन करणारी माणसे असे ही शिल्पविषय पहायला मिळतातच की.
24 May 2016 - 5:06 am | रमेश आठवले
देशात शिव मन्दिरे हजारोनी आहेत. या सर्वात मध्ये लिंग , भोवती योनी ,आणि वरती अभिषेक पात्र असते. हे सर्व प्र्जोत्पादनाला आपल्या समाजात खूप महत्व दिले जात होते, त्याचे द्योतक आहे असे आपल्याला वाटते का ?
24 May 2016 - 6:56 am | प्रचेतस
पुरुष प्रकृतीचे मिलन.
23 May 2016 - 11:19 am | स्पा
शेवटचे ५-६ फोटो तर जामच आवडले
लय भारी
21 May 2016 - 2:47 pm | सिरुसेरि
अप्रतिम फोटो आणी माहिती .
21 May 2016 - 3:56 pm | बाबा योगिराज
मस्तच. मन्दिर एकदम ब्येस हाय बगा.
पण आमाले त्ये स्वर्गमंडप कळलं नै. जरा इस्कटून सांगता का?
.
.
.
.
.
अवांतर,
ओ वल्ली शेठ,
आमाला तुमची दर्पनसुंदरी दाखवणार होते ना? (वेरूळ ला आल्यावर)
21 May 2016 - 5:26 pm | प्रचेतस
स्वर्गमंडप म्हणजे छताचा गोलाकार भाग तसाच मोकळा ठेवणं. जेणेकरुन त्यातनं आकाश दिसावं. आकाश हे स्वगाचं प्रतिक.
बाकी वेरुळला दर्पणसुंदरी खूप कमी आहेत. मी तरी एकच पाहिलीय फ़क्त. १५ क्रमांकाच्या दशावतार लेणीत. मध्यमंडपाच्या डावीकडच्या भिंतीवर आहे. तिथे गेलात तर शोधा. :)
आमची दर्पणसुंदरी पुण्याजवळच भुलेश्वरला आहे.
21 May 2016 - 4:18 pm | चांदणे संदीप
केवळ महाराष्ट्रातल्या मंदिरं किंवा एकूणच पुरातन स्थापत्यशास्त्र यावर कुठले पुस्तक आहे काय?
नसल्यास तुम्ही ते लिहिणार काय?
असल्यास, आणि तरीही तुम्ही ते नव्याने पुन्हा लिहिणार असल्यास त्यात नवीन किंवा वेगळेपण काय असेल?
लैच्च अडाणी हाय मी, पण लिहायला मदतनीस म्हणून काम करायची तयारी आहे आपली! :) काय नाय तर कमीत कमी तुमच्या पुस्तकांचे गठ्ठे तर उचलायला मदत करीनच करीन! :)
Sandy
21 May 2016 - 4:25 pm | सतिश गावडे
त्यांना अजून पुस्तक लिहीण्याची पेर्ना मिळत नसावी.
मात्र दिवसेंदिवस वल्ली सरांची लेखनशैली हळूवार होत चालली आहे असे एक निरिक्षण आहे. पूर्वी त्यांच्या लेखात फक्त चित्रे आणि त्यांची माहिती असायची.
आताशा त्यांच्या लेखातील शिल्पे, मंदिरे आपल्याशी बोलू लागली आहेत, हितगुज करु लागली आहेत.
21 May 2016 - 4:28 pm | नाखु
वल्ली साम्गतेत आणि चांदणे लिहितीत मध्येच एखादी कवीता तुकडा जोड्तेत असे दृश्य डोळ्यासमोर आले.
गणपतीसारखी अट टाकू नका म्हणजे झालं.
मू:ळ अवांतर ही शिल्पे पहायची तर फक्त तुमच्या बरोबर, आम्हा अडाण्यांच्या त्याच त्याच प्रश्नांना न कंटाळता उत्तरे देणे काय खायची गोष्ट आहे काय?
कुठे आहे हे मंदीर आणि पिंची पासून एक दिसात जाण्या सारखं आहे का?
सध्या इतकेच,
नाखु
21 May 2016 - 4:29 pm | सतिश गावडे
तुम्ही प्रपंचात राहून परमार्थ साधू पाहत आहात.
21 May 2016 - 4:54 pm | मुक्त विहारि
एका दिवसात करण्यासारखे असेल तर, मी सहकुटुंब येणार.
तुमच्या गाडीत आमच्या सीट्स राखून ठेवालच.
पेट्रोलचा खर्च आमचा.
22 May 2016 - 6:51 am | कपिलमुनी
पिंचिहून गोंदेश्वर एका दिवसात बघून परतता येते
21 May 2016 - 5:40 pm | प्रचेतस
महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर: स्थापत्य व कला ( जामखेडकर) आणि Medieval Temples of Deccan- Henry Cousens ह्या दोन पुस्तकांत महाराष्ट्रातील मंदिरांबाबत बऱ्यापैकी तपशीलवार माहिती आहे. मात्र ही दोन्ही पुस्तके बरीच क्लिष्ट आहेत. ह्यातल्या संज्ञा समजणे तसे अवघड जाते. सोप्या भाषेतलं पुस्तक मला अजून माहीत नाही. देगलूरकर सरांचे एक पुस्तक लवकरच येईल.
बाकी माझा तसा पुस्तक काढायचा विचार नाही. दिग्गजांनी आधीच लिहून ठेवलंय बरंच. मी जास्त करून मूर्तींच्या अंगाने लिहितो. मंदिरशैली, मंदिरांचे विविध भाग जसे जंघा, कुंभ,महाकुंभ, ग्रीवा, श्रुंग, उपश्रुंग, सप्तरथ वगैरे समजणे तसे अवघड आहे. खूप अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यात फारसा रसही नाही. मूर्ती पाहणे मात्र आवडीचा विषय :)
14 Jun 2016 - 5:06 pm | चौकटराजा
पुस्तक काढाच व दीर्घ प्रस्तावना ( दीर्घ घोरण्याच्या क्रियेसह) गावडे सर लिहतीलच तर दुग्ध शर्करा योग !
21 May 2016 - 4:27 pm | जव्हेरगंज
21 May 2016 - 4:50 pm | त्रिवेणी
http://i.imgur.com/t0DRflh.jpg
माझ्याकडचे दोन तीन फ़ोटो टाकते इथे चालेल न.
21 May 2016 - 4:52 pm | कानडाऊ योगेशु
सगळीच चित्रे सुरेख. पण तो स्वर्गमंडपाचा पहीला फोटो सुरेख. फक्त फोटो पाहत असताना असे वाटले कि एखाद्या खोल विहीरीचा असावा.
बाकी वल्ली/प्रचेतस ह्यांच्या व्यासंगाला सलामच. तेथे कर माझे जुळती!
21 May 2016 - 4:52 pm | मुक्त विहारि
आधी वाखूसा.....
बादवे,
आकूर्डी पासून हे ठिकाण किती दूर आहे?
आयेश्व्रर आणि गोंदेश्वर एका दिवसात करता येते का?
21 May 2016 - 5:42 pm | प्रचेतस
पुण्यापासून साधारण १७० किमी. सिन्नर येथे. पुण्याहून एका दिवसात सहज करता येते. दोन्ही मंदिरे जवळजवळ आहेत. साधारण दोनेक किमी अंतर आहे एकमेकांमध्ये.
21 May 2016 - 4:53 pm | त्रिवेणी
21 May 2016 - 4:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
वल्लीचे लेखन म्हणजे सुंदर कोरीव देवळे, गुंफा आणि मूर्ती यांचे अभ्यासपूर्ण विवेचन हे समीकरण नक्की आहेच. हल्ली त्यात एक भावनिक तरल हळवेपणाची झालर जाणवू लागली आहे ( ;) ). त्यामुळे हे लेखन वाचायची मजा द्विगुणित झाली आहे.
और आंदो, आंदते रहो.
21 May 2016 - 4:56 pm | त्रिवेणी
21 May 2016 - 5:00 pm | त्रिवेणी
काकां तुम्ही सुद्धा.
21 May 2016 - 9:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
तीनच्या पटीत प्रतिसाद द्यायचा हक्क तुम्ही राखून ठेवला आहे हे विसरलोच की !!! स्वाssssssरी :) ;) =))
21 May 2016 - 5:04 pm | यशोधरा
सुरेख फोटो आणि लिखाण. वाखु साठवली आहे.
21 May 2016 - 5:55 pm | चौकटराजा
गोन्देश्वर मंदिर - मु पो सिन्नर महाराष्ट्र
स्थान - पुणे नासिक मार्गावर सिन्नर बस स्थानका पासून दीड किमी.
फोटो व माहिती सुंदर . त्रिवेणी यांचेही फोटो उत्तम आलेत.
21 May 2016 - 6:07 pm | पद्मावति
अप्रतिम लेखन आणि फोटो.
21 May 2016 - 6:09 pm | अजया
तीन वेळा गोन्देश्वराची भेट झालीये.अप्रतिम मंदिर पंचायतन आहेच ते.
फोटो अाणि लेख मस्त.
रच्याकने-लेखणी खरंच हळुवार होत चाललेली दिसतीये मात्र दर लेखागणिक ;) दर्पणेची जरा कल्जीच वाटली!
21 May 2016 - 8:36 pm | रमेश आठवले
खूप माहितीपूर्ण आणि अभ्यास पूर्वक लिहिलेला लेख. धन्यवाद. फोटो पाहिल्यावर एक प्रश्न पडला. ८०० वर्ष जुन्या असलेल्या मंदिराची पडझड झालेली दिसत नाही. तसेच आत असलेल्या शिल्प कृती इतर तत्कालीन मंदिरा सारख्या कालाच्या ओघात भग्न झालेल्या दिसत नाही . याचे काय कारण असावे ?
23 May 2016 - 9:00 am | प्रचेतस
इतर तत्कालीन मंदिरांतही बऱ्याच अभंग शिल्पकृती आहेतही. अंतर्भागात असल्याने उन, पाऊस, वारा ह्यांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो.
शिवाय इकडील(पक्षी दक्षिणेकडील) मंदिरांत तुलनेने मूर्तीभंजकांचा मारा कमी झालाय. जे काही भंजन झालंय ते सूरुवातीच्या खिलजी, मलिक काफूर इत्यादींकडुन आणि नंतर औंरंगजेबाकडून व् काही प्रमाणात अफजलखानाकडून. बहमनी, शिवाय ती फुटल्यानंतरच्या पाच शाह्या किरकोळ अपवाद वगळता काही प्रमाणात सहिष्णू होत्या असे म्हणता यावे. अर्थात ह्याची काही राजकीय कारणे आहेत.
21 May 2016 - 8:38 pm | कंजूस
थोडक्यात छान ओळख करून दिली आहे गोंदेश्वरची.मंदिररचनेविषयी दोन पुस्तकांचा फोटो देत आहे.नॅशनल बुक ट्रस्टची आहेत आणि पन्नास साठ रुपये किंमत आहे.वीसेक चित्रे आणि शंभर दिडशे पाने.
21 May 2016 - 8:41 pm | मुक्त विहारि
ही पुस्तके डोंबोलीत कुठे मिळतात?
21 May 2016 - 8:54 pm | कंजूस
यात कमिशन कमी असल्यामुळे नेहमीचे पुस्तकवाले ठेवत नाहीत.मी नॅशनल बुक ट्रस्टच्या प्रदर्शन स्टॅालमधुन मिळवली.डोंबिवलीत अक्षरधाराचे प्रदर्शन होते.त्यांची कायमची जागा पश्चिमेला कुठेतरी आहे.पुस्तक सांगितले की आणूनही देतात. नॅशनल बुक ट्रस्टचे office, J J Hospital compound मध्ये( भायखळा) आहे पण ते पाहिले नाही.
23 May 2016 - 9:06 am | प्रचेतस
ही पुस्तके कुठे मिळाली तर घेऊन ठेवा.
इथे साधनामध्ये पाहावे लागेल.
23 May 2016 - 6:51 pm | कंजूस
नक्की.तोपर्यंत माझी देतो.संग्रह करण्यात अर्थ नाही.फक्त एक उत्सुकता असते काय लिहिलंय त्याची.एकाचं वाचून झालं की दुसय्राकडे पाठवा.
21 May 2016 - 8:40 pm | अत्रुप्त आत्मा
अप्रतिम !
@तर इथे एक मर्कट शिंकाळ्यातले दही चोरते आहे. ›››
24 May 2016 - 11:53 am | अन्या दातार
=)) =)) =))
21 May 2016 - 9:06 pm | आतिवास
उत्तम लेखन आणि प्रकाशचित्रं.
21 May 2016 - 10:12 pm | हृषिकेश पांडकर
लिखाणाला अनुरूप फोटो..नवीन गोष्टी समजल्या..लँडस्केप आणि आर्किटेक्चर फोटोग्राफीसाठी उत्तम जागा..मजा आली .
21 May 2016 - 10:55 pm | चतुरंग
अतिशय अभ्यासपूर्ण लेखन आणि सुरेख प्रकाशचित्रे. कितीतरी संज्ञा मी पहिल्यांदाच वाचल्या.
मंदिराच्या एकूण रचनेत आणि शिखरांच्या रचनेत एक आकर्षून घेणारा डौल आहे.
अशी मंदिरं निर्माण करताना सगळ्या भागांचं एकमेकांशी काय प्रमाण असावं? अंतिम मंदिर कसं दिसेल? याचं आर्किटेक्टर कसं करत असतील याबद्दल कायमच अचंबा वाटतो. इतकी प्रमाणबद्धता साधणं आणि तेही दगडातून, एखादा घाव कमीजास्त झाला की परतीची वाट जवळपास अशक्यच, हे कमालीच्या कौशल्याचं आणि प्रचंड आत्मविश्वासाचं काम आहे!
इतकी सुरेख सफर घडवल्याबद्दल वल्लींचे मनापासून आभार!
(शिल्पप्रेमी)चतुरंग
22 May 2016 - 7:02 am | कपिलमुनी
मंदिर खूप वेळा पाहिला पण तुमच्या लेखातून मंदिर समजतात , वाटता येता.
बादवे गोंदेश्वर मंदीराचा दगड कोणत्या प्रकारचा आहे?
त्यामुळे झीज जास्त झाली आहे का?
23 May 2016 - 9:02 am | प्रचेतस
दगडांचा अभ्यास नाही पण हा सह्याद्रीत सर्वसामान्यपणे आढळणारा अग्निजन्य बसाल्ट खडक आहे.
22 May 2016 - 8:40 am | इशा१२३
सुंदर फोटो आणि माहिती.
नाशिकला जातेय तर हि देवळे पहातेच.लेखामुळे नीट समजतील.
धन्यवाद!
22 May 2016 - 8:40 am | इशा१२३
सुंदर फोटो आणि माहिती.
नाशिकला जातेय तर हि देवळे पहातेच.लेखामुळे नीट समजतील.
धन्यवाद!
22 May 2016 - 1:14 pm | एस
काय नेहमीप्रमाणेच.
अजून काय प्रतिसाद द्यावा हे समजत नाही. शब्दभांडार संपत चालले आहे.
22 May 2016 - 8:55 pm | Rahul Sable
सर्व वर्णन आणि फोटो सुरेखा. विशेषता मकरमुख शिल्प अकल्पनातीत
मकरमुख आणि गदाधारी विष्णु यांच्यामधे मकरावरील असलेल्या आक्रुत्या काय आहेत??? त्या शिल्पकला काय अर्थ आहे?
23 May 2016 - 9:05 am | प्रचेतस
हिंदू मिथकांप्रमाणे मकर हा हायब्रीड प्राणी आहे. गज, सिंह आणि मगर ह्या तीन प्राण्यांचे मिळून मकर बनलेला आहे.
23 May 2016 - 6:46 pm | कंजूस
लखुंडीच्या कल्याण चालुक्यांनी या प्राण्यास शुभ मानलं.पाच प्राण्यांच्या अंगातून हा बनला आहे.
हत्तीची सोंड,
मगरीचा जबडा,
सिंहाचे पाय,
घोड्याचे शरीर ,आणि
मोराचा पिसारा.
22 May 2016 - 10:26 pm | प्रशांत
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि सुंदर
22 May 2016 - 10:30 pm | पैसा
छान ल्हिलंय
23 May 2016 - 11:11 am | सस्नेह
सुन्दर फोटो. रोचक माहिती. (नेहमीप्रमाणेच)
23 May 2016 - 11:39 am | असंका
निरक्षर माणसाला पुस्तकाकडे बघून काय वाटत असेल त्याचा अंदाज येतो आपले लेख वाचून.
थक्क व्हायला होतं हे सगळे आपल्या नजरेतनं पाहिल्यावर! नाहीतर आम्ही मंदिरात गेल्यावर, मुख्य मूर्ती सोडून इतर कुठे अगदी चुकून बघितलं तरच बघणार, आणि बघणार फक्त- कळणार काही नाहीच आम्हाला! काला अक्षर भैस बराबर!
अनेक धन्यवाद या माहितीबद्दल!
23 May 2016 - 3:04 pm | सूड
सुंदर!!
23 May 2016 - 3:44 pm | गवि
या विषयातली तुमची आवड आणि दिलेले तपशील कौतुकास्पद आहेत.
23 May 2016 - 4:21 pm | राजेंद्र मेहेंदळे
वल्लींचे लेख म्हणजे आम्हाला मेजवानीच. ऑफिसमध्ये बसल्या बसल्या मस्त माहीती मिळतेय.
हा पण लेख नेहमीप्रमाणेच सुंदर!!
23 May 2016 - 4:25 pm | मोहनराव
या वल्लीसाहेबांना एकदा भेटलोय काही वर्षांपुर्वी.. तेव्हा साहेबांची ख्याती जास्त माहित नव्हती..
अप्रतीम वर्णन, छान फोटो.. परत आपल्याला भेटण्याचा योग केव्हा येणार कोण जाणे... _/\_
23 May 2016 - 5:32 pm | अभ्या..
आम्हालाही वल्लीसाहेबांची ख्याती अजून माहीती नाही.
परत आपल्याला भेटण्याचा योग केव्हा येणार कोण जाणे...
24 May 2016 - 4:24 pm | नाखु
तंतोतंत
24 May 2016 - 4:28 pm | मुक्त विहारि
+ २
23 May 2016 - 4:42 pm | शलभ
खूपच मस्त.. _/\_
23 May 2016 - 6:34 pm | नूतन सावंत
वल्ली,तुम्ही शिल्प वाचता आणि आम्हाला वाचायला शिकवता याबद्दल धन्यवाद.
24 May 2016 - 2:13 am | निशाचर
अगदी असंच वाटतं!
24 May 2016 - 4:34 pm | नंदन
नेहमीप्रमाणेच सुरेख आणि माहितीपूर्ण!
24 May 2016 - 9:31 pm | भाग्यश्री कुलकर्णी
गोंदेश्वर मंदिर बघतानाच हे काहीतरी भारी आहे हे कळलेले पण आज ते किती समृद्ध आहे ते तुमच्यामुळे कळले.
29 May 2016 - 8:40 pm | हेम
सुरेख माहिती वल्लीसाहेब.
दिपमाळा कोणत्या मंदिराबाहेर असतात? की या काळात ती पद्धत नसावी? ती कधी सुरु झाली असावी? गोंदेश्वरचं जोतं इतकं उंच कां?
29 May 2016 - 9:28 pm | प्रचेतस
धन्स रे हेम.
दिपमाळा जुन्या मंदिरांत दिसत नाहीत. अगदी क्वचित ठाणवई दिसते. दिपमाळा यादवोत्तर कालखंडात सुरु झाल्या. साधारण १६ व्या शतकात. त्याही शक्यतो खंडोबा, देवी, शिव अशा देवता मंदिरांतच बहुतकरुन दिसतात.
गोंदेश्वर मंदिराचं जोतं इतकं उंच असायचं कारण म्हणजे मंदिरशिखरांचा आकार अधिक उठून दिसावा हेच असावं. किंवा मंदिर भव्य असे उभारायाचे असल्याने पाया खोल करून त्याला अधिकचा आधार देण्यासाठी जोतं उंच केलं असावं.
29 May 2016 - 9:07 pm | चित्रगुप्त
आणखी एक नितांत सुंदर लेख आणि प्रतिमा. काही मूर्तींवर जे पांढरे डाग दिसत आहेत ते कसले आहेत ? पूर्वी या मूर्तींवर चुना लावलेला असावा का?
29 May 2016 - 9:31 pm | प्रचेतस
चुना नाहिये..दगडातला दोष आहे तो. हा दगड काहीसा सच्छिद्र असून आता स्फटिक तयार झालेले आहेत. उन्ह, वारा, पावसामुळे झीज होऊन अंतर्भाग उघडा पडला आहे.
30 May 2016 - 3:54 pm | खुशि
सुंदर, फोटो छान आलेत,ते पाहात पाहात माझेही गोंदेश्वर दर्शन झाले.
30 May 2016 - 4:19 pm | दिगोचि
लेख आवडला आणि फोतो पण आवडले. सहज एक विचार आला तो असा मन्दिराच्या आवारात एकही झाड दिसत नाही. का? कोणालाहि तेथे झाडे लावावीत असे सुचले नाही हे आश्चर्यच आहे. तेथील गावकरी सरकार झाडे लावायची वाट पहात आहेत असे दिसते. भारतीयान्ची एक सवय म्हणजे आपण काही न करता दुसर्यावर अवलम्बणे. कोणीतरी हे काम अन्गावर घ्यावे म्हणजे मन्दिराचे आवार चान्गले दिसेल.
14 Jun 2016 - 8:36 am | दीपा माने
तुमच्यातील शिल्प माहितीचा अगाढ साठा पाहुन अचंबित व्हायला होते. तुमचे कौतुक मिश्रित अभिनंदन करते.
28 Oct 2018 - 10:40 pm | चित्रगुप्त
वा. अतिशय सुंदर चित्रे.
29 Oct 2018 - 5:13 pm | MipaPremiYogesh
ha lekh vachun jayla have hote ajun nit baghta ale aste. Apraim mahiti ani sundar photos Prachetas. Thank you.
mala he swargmandapacha mahit navta. Me tya darachya javal jaun alo pan pudhe gelo nahi :(.
atachya navin darachya bajula ekdam gol gargarit dagad patra ahe kay ahe mahiti ahe ka tumhala?
30 Oct 2018 - 8:29 am | प्रचेतस
तुम्हाला हेच अपेक्षित आहे का?
हा मंदिराच्या शिखराचा भाग आहे. स्कंधावर ही घंटा किंवा आमलक आणि त्यावर कळस.
31 Oct 2018 - 10:52 am | MipaPremiYogesh
Ho barobar, hech mhanyache hote..dhanywad
1 Nov 2018 - 6:05 pm | सविता००१
अप्रतिम,
हा लेख सुटला होता वाचनातून. काय सुरेख फोटो आहेत.. आणि माहितीही सुरेख
वल्ली, तुला कसं काय कळतं रे की हे शिल्प म्हणजे रावणाचंच आहे वगैरे???????
प्रचंड अडाणी प्रश्न आहे. पण खरच मला हा प्रश्न पडलाय बाबा.
1 Nov 2018 - 6:51 pm | प्रचेतस
भारतीय मूर्तीशास्त्र आख्ख्या भारतात बऱ्यापैकी सारखंच असतं, मूर्तींची लक्षणे सर्वसाधारणपणे सर्वत्र समानच असतात, शिल्लपटांचे देखील असेच. तुम्हाला काही लक्षणे माहीत असली, काही पौराणिक कथाप्रसंग माहीत असले की शिल्पासोबत त्यांची संगती सहजी लावता येते. इतकं काही अवघड नाही ते.
1 Nov 2018 - 8:07 pm | सविता००१
किती पटकन उत्तर दिलंस. धन्यवाद. आता असं अगदी लक्ष देउन एखादं मंदिर पाहीनच. मग सांगेन तुला.
1 Nov 2018 - 8:05 pm | टर्मीनेटर
वाखू साठवली आहे.मधेच कधीतरी नाशिक - शिर्डीला जाता येता बघता येईल हे मंदिर. खूप छान माहिती मिळाली.
धन्यवाद.
12 Jul 2020 - 1:26 pm | चौथा कोनाडा
या माझं नाशिक ( http://www.misalpav.com/node/47153 ) या धाग्याच्या निमीत्ताने हा सुंदर लेख वाचला !
वाह, क्या बात है !
28 Jul 2020 - 9:44 pm | प्रविन ९
खुप खुप छान मंदिर आहे आणि शांत परिसर आहे.
दरवर्षी श्रावण महिना सुरू झाला की सोमवारी किंवा शनिवारी या मंदिरात जातोच. यावेळी मात्र कदाचित नाही जमणार.
25 Dec 2023 - 12:43 pm | राजेंद्र मेहेंदळे
वाचुन पुन्हा एकदा वर काढतो आहे.